सोशलायझेशन…
सप्टेंबर 2, 2010 41 प्रतिक्रिया
आजकाल आयुष्य इतकं व्यस्त झालं आहे की कोणालाच आपल्या मित्रांसाठी वगैरे पण ’रिअल टाइम मधे’ वेळ काढता येत नाही. घरची काही ना काहीतरी कामं असतातच. अगदी जिवश्च कंठश्च मित्राला भेटायच म्हंटलं तरीही कधी वेळ मुद्दाम काढावा लागतो .कधी आपल्याला वेळ असला तर त्याला वेळ नसतो किंवा उलट पक्षी त्याला वेळ असतो तेंव्हा आपण बिझी असतो.
पूर्वीच्या काळी बरं होतं , सोशलायझेशन म्हणजे केवळ गुरुवारच भजन एखाद्याच्या घरी असायचं आणि त्यासाठी जवळपास रहाणारे सगळे लोकं एकत्र जमायचे. मग त्या मधे हौशी कलाकार आपला गळा साफ करून घ्यायला गाणी म्हणायचे. एक फायदा असतो, अशा भजनाच्या कार्यक्रम मधे कोणीही कसंही गाणं म्हंटलं तरीही कोणी काही म्हणत नाही. कमीत कमी महिन्यातल्या चार गुरुवारी किंवा शनीवारी एकत्र भेटणे वगैरे असायचेच.कुठलं ना कुठलं कारण शोधून एकत्र भेटायचे लोकं. आजकाल काही ना काहीतरी कारण काढून भेटणं टाळतात लोकं. प्रत्येक जण आपापल्या पर्सनल स्पेस मधे गुरफटलेला असतो – कोषातल्या अळी सारखा.
या शिवाय प्रत्येक सणावाराला भेटी गाठी व्हायच्या. श्रावण सोमवारी शंकराच्या मंदीरात जातांना पण आई शेजारच्या काकूंना , ’तूम्ही येता का? असे विचारल्या शिवाय कधी जायची नाही.
दर दोन तिन महिन्यातून एकदा दही काला हा पण कोणाच्या तरी घरी असायचाच- विदर्भात त्याला गोपाल काला म्हंटलं जातं. त्या मघे सगळ्यांनी आपल्या घरून काही तरी( म्हणजे पोहे, लाह्या, मुरमुरे, लोणची, एखादं फळ वगैरे) न्यायचं आणि मग एकाच्या घरी मोठ्या भांड्यात एकत्र करून काला बनवायचे. बरं हा दही काला हा कार्यक्रम केवळ स्त्रीयांचाच असायचा. स्त्रीयांची भजनं वगैरे झाली की मग आम्हा सगळ्या मुलांना बोलावून गालाला गुलाल लावून काला मिळायचा. त्या दही काल्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. प्रत्येकाच्या घरचं लोणचं वेगळ्या चवीच, आणि ज्वारीच्या लाह्या हा बेस असल्याने एक वेगळी चव यायची. ज्याच्या घरी काला, तो दही आणि बेस लाह्या अरेंज करणार . त्या काल्यामधल्या लोणच्याच्या फोडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. स्पेशली गोकुळाष्टमीला काला, आणि श्रीकृष्ण जन्म हा तर एक मोठा कार्यक्रम असायचा. खूप मजा यायची. रात्री उशिरापर्यंत अंगणात लगोरी किंवा धाबाधुबी खेळणे सुरु असायचे. वेगळेच दिवस होते ते..
माझं लहानपण अगदी लहान गावात गेल्यामुळे हे सगळं अनूभवता आलं.मी अगदी मध्यमवर्गीय घरामधे जन्म घेतला, त्यामुळे बहुतेक सगळे कन्सेप्ट्स आणि जिवनाच्या व्हॅल्युज अजूनही तशाच आहेत. आज जेंव्हा मुलींना सांगतो, तेंव्हा बाबा हे काय भलतंच सांगताय असे भाव चेहेऱ्यावर असतात. “तूम्ही लोकांच्या घरून वाटीमधे साखर मागून आणायचे?? असा प्रश्न जेंव्हा मोठे डॊळे करून मुली विचारतात तेंव्हा मात्र विचित्र वाटतं….
आज मुंबईला एखाद्या बिल्डींग मधे सातव्या मजल्यावर जर कोणी रहात असेल तर त्याच बिल्डींग मधे माझ्या खालच्या फ्लॅट मधे कोण रहातो हे त्याला माहिती नसते अशी परिस्थिती आहे. माझ्याही बाबतीत ते खरं आहेच.कोणाच्याही घरी जायचं असेल तर, मुंबईला आधी फोन करुन विचारायचं की तुम्ही घरी आहात का? आणि तुमचा काही प्रोग्राम आहे का? जर उत्तर नाही मिळालं, तरंच जायचं . सुरुवातीला जेंव्हा मी मुंबईला रहायला आलो , तेंव्हा तर मला या गोष्टीचं आश्चर्यच वाटायचं , पण नंतर हळू हळू सवय झाली. लक्षात आलं की मुंबईच्या लोकांना सकाळी सात-आठ वाजता कामावर निघाले की घरी यायला रात्री ८ ते ९ वाजतात, ज्यामुळे स्वतःची पर्सनल कामं करायला फक्त रवीवारच मिळतो. आणि ह्याच कारणासाठी म्हणुन रविवारी कोणी घरी आलेलं शक्यतो नकोसं वाटतं लोकांना.
लहानपणी कोणाही कडे जायचे असले की सहज उठुन गेलो असे असायचे. माणूस हा नेहेमीच सामाजिक प्राणी राहिला आहे. प्रत्येकाला सोशल लाइफ आवडतं. एक सांगतो, परदेशात रहाणाऱ्या एखाद्याने समजा कार किंवा घर वगैरे घेतलं ,की त्याला आपलं कोणीतरी कौतूक करावं असं वाटतंच. बरेचदा असंही वाटतं की आपली ही अचिव्हमेंट आपल्या ओळखीच्या लोकांनी पहावी आणि आपलं कौतूक करावं . जर कोणी कौतूक करणारं नसेल तर त्या नवीन गोष्टीपासून आनंद काय मिळणार?? जर एखाद्या मुलीने सुंदर ड्रेस घातला, आणि तिला कोणी विचारलंच नाही- किंवा जर तिने केस कापले, फेशिअल केलं आणि तरीही कोणी विचारलंच नाही तर तिला कसं वाटेल?? साधारण तशीच भावना असते .
मला आठवतं की मी जेंव्हा पहिली कार घेतली होती आणि घरी आणली, तेंव्हा माझ्या वडीलांच्या डोळ्यातला अभिमान आणि कौतुकाचे भाव पाहिले आणि – बस्स! सगळ जग आपल्या पायाशी लोळण घेतंय असं वाटलं होतं मला त्या क्षणी. वडीलांच्या डोळ्यातले ते भाव आयुष्यभर विसरू शकत नाही मी.असो.
सोशलायझेशन म्हणजे नेमकं काय?? एक गम्मत सांगतो. माझ्या लहानपणी घरी कोणी बसायला आलं आणि चहासाठी दूध नसलं की आई हातात भांड देऊन शेजारच्या काकूंच्या कडून दूध आण, किंवा वाटीभर साखर आण, किंवा कधी तरी आल्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या चार काड्या, वगैरे वगैरे अशा वस्तू मागून आणायला पाठवायची आणि त्या मधे पण कोणाला कसलाच कमीपणा वाटत नसे. नंतर मग त्याच काकूंना, दूध, साखर किंवा काय असेल ती वस्तू नेऊन दे म्हणून आई पुन्हा एकदा पाठवायची.आता चार काड्या कोथिंबिरीच्या किंवा आल्याचा तुकडा परत देण्यात काही विशेष आहे असे नाही. पण आठवणीने परत करणे हे मात्र नक्की व्हायचं. कदाचित आजकालच्या मुलांना ह्या मधे कमीपणा वाटत असेल पण आमच्या लहानपणी हे सगळं अगदी कॉमन होतं.
शेजारचे मामा, मला बटाटे वडा आवडतो, म्हणून मग आवर्जून मला बोलवायचे आणि सोबत बसवून खायला घालायचे. दुसऱ्या काकूंना माहिती असायचं की आई आज बाहेर गेलेली आहे म्हणून, मग बरोबर दुपारच्या खाण्याच्या वेळेस स्वतःच्या मुलांच्या बरोबर आमचीही डीश भरली जायची. कुणाला काय आवडते हे सगळ्यांनाच माहिती असायचं. मला पाटॊडीची भाजी आवडते म्हणून शेजारच्या घरी केली गेली की न चुकता माझ्यासाठी घरी एका वाटी मधे यायची.आईला बरं नसलं की घरच्या सगळ्यांचं जेवण शेजारून यायचं. एक वेगळीच घट्ट विण होती संबंधांमध्ये. काही लोकं असंही म्हणतील, की त्या काळी फ्रीझ नव्हता म्हणून दुसऱ्याकडे दिलं जात असेल वाटीमध्ये घालून. पण तसं जरी असलं, तरीही त्यामधे एक आपलेपणा होता ,ज्याचा आजकालच्या संबंधात बरेचदा अभाव जाणवतो.
शेजार्यांच्या घरचे सगळे नातेवाईक पण माहिती असायचे. शेजाऱ्यांच्या नातेवाईकांशी पण अगदी अघळ पघळ गप्पा व्हायच्या. ते पण अगदी आपलेपणाने आपल्या घरी येऊन बसायचे गप्पा मारायला.
इंटरनेट, टीव्ही वगैरेचं इतकं काही प्रस्थ नव्हतं. टिव्ही तर अजूनही यायचाच होता. फक्त मुंबईलाच टिव्ही सुरु झाला होता तेंव्हा. टिव्ही मुळे सोशलायझेशन कमी झालं का?? मला बरेचदा तसा संशय येतो. कधी कधी असंही वाटतं की अजूनही सामाजिकीकरणाची आवड काही कमी होत नाही माणसाची. म्हणूनच तर आपण बझ, गुगल चॅट, सोशल साईट्स वर एकत्र येऊन आपल्याला आलेला एकटेपणा दूर करायचा प्रयत्न करत असतो. माझं स्पष्ट मत आहे, प्रत्येकालाच सोशलायझेशनची गरज असते- मग ते पुर्वीचं खरं खूरं सोशलायझेशन असो , की आजच्या युगातलं व्हर्च्य़ुअल..













