मी मुंबईकर !!

localमुंबईला अगदी नवीन आलो होतो, ( १२-१५ वर्षापुर्वी) तेव्हाची ही गोष्ट. ऑफिस होतं चर्च गेट (लायन गेट) जवळ आणि रहाणं होतं मालाड ला. मी ज्या फ्लॅट स्कीम मधे रहातो, त्याच स्कीम मधे कंपनीचे अजुन एक  फ्लॅट आहे. त्या मुळे एक मित्र होता , कसं जायचं ते सांगायला.
मालाडला सकाळी सगळ्याच लोकल्स पुर्ण भरलेल्या असतात. आणि माझ्यासारख्या नवशिक्याला तर गाडीत चढणं शक्यच होत नव्हतं.

फक्त एक आशेचा किरण होता ,तो म्हणजे मालापासून सुटणारी ८-३५ ची चर्चगेट फास्ट. कारण ही ट्रेन मालाडहुन सुटायची.त्यामुळे कमीत कमी उभ्याने तरी प्रवास करता यायचा.तरी पण ८-३५ ची मालाड फास्ट पकडून चर्चगेट प्रर्यंत प्रवास करायचा म्हणजे अंगावर काटा यायचा. त्या गर्दीची भीती वाटायची. कधीच गाडीत चढून सीट पकडता आली नाही. नेहेमी असं वाटायचं की आपण पडणार .पण सुदैवाने असं काही झालं नाही.

ह्या ८-३५ च्या ट्रेनचं महत्त्व कळण्यासाठी एकदा सकाळी ८ ते १० च्या दरम्यान कुठलीही बोरिवली ते चर्चगेट ट्रेन, मालाडपासून  पकडण्याचा प्रयत्न करा .तुम्ही मुंबईत नवीन असाल तर १०१ टक्के तुम्हाला चढता येणार नाही. आणि लगेच ८-३५चं  महत्त्व तुमच्या लक्षात येइल.

केवळ एकदाच पाय घसरला होता चढतांना पण एका गृहस्थाने सांभाळले. ज्याने मला सांभाळले होते तो एक चार्टर्ड अकाउंटंट होता. मुळ आग्रयाचा म्हणुन सगळे गाडीतले त्याला भैया म्हणायचे. केवळ एकच भैया,  म्हणुन त्याची खुप मस्करी केली जायची. आणि त्याने पण कधी मनाला लाउन घेतले नाही.

सकाळची गाडी म्हणजे , सगळे शेअर बाजारचे दलाल लोक आणि पंचरत्न मधे काम करणारे लोक फ़र्स्ट क्लास च्या डब्यात असायचे. एक गृप फॉर्म झाला होता. आठवड्यात ३ दिवस कोणीतरी काहीतरी खायला आणायचं.(सगळी मंडळी गुज्जू , त्यामुळे जास्तीत जास्त वेळा ’फाफडा अने जलेबी’अथवा ’जैन समोसा अने जलेबी’ ह मेनु असायचा. मी त्या गॄप मधे कधी आणि कसा  शिरलो आणि त्यांच्यातलाच एक म्हणून  ऍक्सेप्ट झालो ते कळलंच नाही.

हे शेअर बाजार वाले फारच अंध विश्वासू. ट्रेन ३ नंबरला लागली तर तेजी आणि ४ नंबरला लागली तर मंदी असा होरा चालायचा. मला तर शेअर्स बद्दल काहीच माहिती नव्हते. पण काही दिवसात मी पण इंडेक्स, पीई रेशो, फिफ्टी टु विक हाय आणि लो, बोनस इश्यु, राइटस आणि एक्स बोनस , कम बोनस वगैरे नॉमिनिक्लेचर शिकलो. आयसीआयसीआय बॅंकेत अकाऊंट उघडला आणि शेअर्स मधे इन्ह्वॉल्व्ह झालो. अरे जितु भाई  टाटा केम नु १०० माल पडेला छे, हवे तो माल वेचवानो कोई जल्दी नथी पर नवा आयपीओ माटे पैसा जोइजे– सुं करवाणु?  वगैरे बोलणे जमू लागलं होतं.मुंबईकर होण्याची दुसरी पायरी पार केली.

पहिली पायरी अर्थात गाडी पकडणे , कटकट न करता गर्दी एंजॉय करणे ( मला वाटतं मुंबईतिल गर्दी चा त्रास फक्त मुंबई बाहेर रहाणाऱ्यांनाच होतो) .हळू हळू चालती गाडी प्लॅटफॉर्म वर उभी रहाण्यापूर्वी चढण्यात एक्सपर्ट झालो.पहिल्या दिवशी जेंव्हा सिट पकडली, तेंव्हा ह्या ट्रेन चा फाउंडर मेंबर ( २० वर्ष याच ट्रेन ने प्रवास करणारा) विपिन भाइ म्हणाला, महींदर भाइ एक्स्पर्ट थई गयो.. एकदम धन्य धन्य वाटलं..

पुलंच्या म्हणण्यानुसार तिसरी पण ,सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटवर बोलता येणे ही गोष्ट मला चांगली जमायची.क्रिकेट खेळता जरी येत नसलं तरी बोलता चांगलं येतं, त्यामुळे मला काही फार त्रास झाला नाही मुंबईकर होण्यात.

इतक्या सगळ्या वर्षात बरोबर प्रवास करून सुद्धा काही लोकांची फक्त नांवे माहिती होती- जसे, जितु भाइ, अतुल भाइ, बिपिन भाइ इत्यादी. कारण केवळ नावावरच भागायचं. नाही म्हणायला एक दोन मराठी लोकंपण होती . पण मेजॉरिटी गुजराथी. गॄप चा मेंबर झाल्यावर   मला पण कधी तरी ’नाश्तो’ न्यावा लागायचा गाडीत. पण ते दिवस अजुन ही आठवले की मजा वाटते.

होत होता मी पुर्ण पणे मुंबईकर झालॊ. चर्चगेटला पोहोचलो की ३ रू. देउन बुट पॉलिश करुन घेता घेता कॉफी पिणे वगैरे गोष्टी छान जमायला लागल्या होत्या. कधी कधी एका हातात वडापाव आणि  दुसऱ्या हातात पेपर वाचन सुरु असतांना , आणि प्लॅटफॉर्म वरच्या सुंदर ललनांना न्याहाळताना,((ह्या बाबतीत आमचे मत एकदम पक्कं आहे, मुलींकडे न पहाणे हा त्यांचा अपमान आहे, आणि बिईंग अ थरो जंटलमन, वुई मस्ट नॉट इन्सल्ट लेडीज.. ))

हल्ली जरा बदल झालाय, तरुण मुलगी दिसली, की आपली मुलगी आठवते आणि जरा मध्यम वयीन दिसली की बायकॊ चा चेहेरा डॊळ्यापुढे येतो..:)

पण त्या पॉलिश वाल्या पोऱ्याने टक टक असा ब्रशने आवज केला तरी त्या आवाजाकडे लक्ष जायचे. आजूबाजूला कितीही  आवाज जरी  असले तरी सुध्दा ती टक टक ऐकू  यायला लागली.

नंतर काही वर्षांनी ऑफिस वरळीला , आणि नंतर चेंबुरला  शिफ्ट झालं आणि मग ट्रेन चा संबंध संपला.ऑफिस जवळ आल्याने मी कारने ऑफिस ला जाउ लागलो. पण ते ८-३५ ची ३ वर्ष मी कधीच विसरु शकणार नाही.
अजूनही कधी तरी आठवण आली तर जातो त्या ट्रेन ला आपल्या जुन्या मित्रांना भेटायला,आणि बिलिव्ह मी , अगदी माहेरी आलेल्या मुली सारखं स्वागत होतं गाडीमधे.

हीच आहे मुंबई ची महती.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged . Bookmark the permalink.

4 Responses to मी मुंबईकर !!

  1. शैलेंद्र says:

    फ़ारच छान लेख..१२ वर्ष केलेल्या लोकल प्रवासाची आठवण झाली..ते ग्रुप्स आणि ती ट्रेन पकड़न्या होणारी धावपळ…ते चालत्या गाडीत चढ़ने..खरच आता विचार केला तर गम्मत वाटते…पण तेव्हा काय टेंशन यायचे गाडीत घुसायाचं.

  2. मला वाटतं मुंबईतिल गर्दीचा त्रास फक्त मुंबई बाहेर रहाणाऱ्यांनाच होतो… 😀

  3. nitinbhusari says:

    आम्ही मुंबई पाहिलीच नाही. हे हे हे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s