लहानपणची होळी

holifire7आज होळी. मी रंगांचे दुष्परिणाम, किंवा लाकडं जळाल्याने  होणारी निसर्गाची हानी, किंवा ग्रिन हाउस इफेक्ट बद्दल लिहायचं नाही असं ठरवलंय.. कारण हेच विषय बऱ्याच ब्लॉग वर वाचून झालेत.

माझ्या मुलींना माझ्या लहानपणच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. आजी इथे आली की आजी कडून फक्त ’बाबांच्या गोष्टी’ सांग म्हणून मागे लागतात. कदाचित वेगळं वातावरण, वेगळंच काही तरी अगदी गोष्टीतल्या सारखं ऐकायला बरं वाटत असेल.तर अशाच काही गोष्टींपैकी ही एक गोष्ट.. माझ्या लहानपणची होळी….इथे जे काही लिहिलंय ते म्हणजे आमची होळी कशी असायची ते…

त्या मधे काय चूक अन काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करु नये. आमचं लहान पण म्हणजे साधारण ३०-३२ वर्षा पूर्वीचे  दिवस आणि आत्ताचे दिवस यात खूपच फरक आहे त्यामुळे काही घटना काल बाह्य वाटतील.

यवतमाळ ! होळी चा दिवस जसा जसा जवळ येऊ लागायचा , तसा तसा आम्हाला होलिकाज्वर चढणं सुरु व्हायचं.२ ते ३ आठवडे आधीपासुन होळीची तयारी चालायची. आमच्या घराशेजारी खुप झाडं होती. कुऱ्हाडी घेउन झाडांच्या फांद्या तोडण सुरु व्हायचं. मोठी मुलं मोठ्या झाडांवर कुऱ्हाडी चालवायच्या, तर लहान मुलं अगदी सिताफळाच्या झाडांच्या ( जे नॉर्मली कंपाउंडला लागुन असायचे)फांद्या तोडाचे. कुऱ्हाडीने तोडतांना एक लयबद्ध आवाज आला, की मग ज्याचं झाडं तोडणद सुरु असेल तो धावत येउन तोडणाऱ्या मुलांवर डाफरायचा.

आमच्या इथे कुंटे म्हणून आजी रहायच्या. त्या एकट्य़ाच होत्या. मुळ कोंकणातलं पण विदर्भात लग्न करुन आलेल्या . वय अंदाजे ७५ च्या वर. मुलं लाकडं तोडायला आली की मग त्या शिव्या द्यायच्या…”मेल्या रांडीच्च्यांनो…. वगैरे वगैरे” कोंकणी शिव्यांची लाखोली वहायच्या.ह्या सगळ्या शिव्या पण आम्हाला नवीनच ना, त्या मुळे  त्यांच्या तोंडुन शिव्या ऐकायला मिळाव्या  म्हणून मुद्दाम त्यांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवायचे आणि एक मुलगा साळसूदपणे त्यांना जाउन सांगायचा की मुलं झाडं तोडताहेत. मग काय..आजी बाहेर येउन शिव्या देणे सुरु करायच्या.. अगदी ठेवणीतल्या .. की त्या आत इथे लिहिता येणे शक्य नाही…. त्यांच्या शिव्यांचा कधीच राग आला नाही, उलट त्यांना शिव्या द्यायला आम्हीच प्रवृत्त करायचो.. खूप छान होत्या त्या आजी स्वभावाने तशा..

घरासमोरच पारगांवकर देशमुखांचा एक जुनाट बंगला होता, की ज्या मधे कोणीही रहात नव्हतं. त्याच्या आसपास तर भरपूर झाडं होती. मला आठवतं ,एकदा शाम्या जोशीने ( आर्टीस्ट, मुर्तीकार, सर्प मित्र, आणि बरेच काही करतो आता हा, पण लहान असतांना वात्रट पणाचा कळस होता शाम्या म्हणजे ) एक पिंपळाच्या झाडाचे चांगले २ फुट व्यास असलेले मोठ्ठं खोड तोडलं होत. नंतर होळीमधे ते जवळपास २ दिवस जळत होतं.

इथे तुम्हाला सगळ्यांना हे समजून घेतले पाहिजे की त्या वेळी टिव्ही नावाची आपत्ती नव्हती , त्या मूळे करमणुकी  साठी मित्रांबरोबर  उंडारणे हाच एक उद्योग असायचा.एकदा संध्याकाळी घरी आलो की मग दप्तर फेकायचे आणि  ( कपडे बदलणे हा कन्सेप्ट नव्हता, आज सकाळी घातलेले कपडे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या वेळेसच उतरवले जायचे) बाहेर पडायचे. होळी आली की नेहेमीच्या खेळण्या पासुन वेगळं काहीतरी करायला मिळायचं म्हणून खूप मज्जा यायची. लाकडं गोळा करणं हे पण एक प्रकारचा खेळच होता.

लाकडं तोडतांना प्रत्येकाची नजर असायची एखाद्या घान माकड बनवायला उपयोगी असणाऱ्या खोडाकडे.घान माकड म्हणजे एका सेंटर पिव्हॉट वर ( पिव्हॉट म्हणजे पण चांगलं कडक वाळलेलं लाकडाचा खांब ( ज्याला आम्ही बल्ली म्हणायचो. ही सागवानाचीच कोणाच्या तरी कंपाउंड्ची चोरुन आणलेली असायची). तर हा खांब जमितित गाडून त्यावर एक ( अळी चालतांना कशी दिसते? आपलं अंग आक्रसून घेत्ल्यावर.. तशा आकाराचं एखाद खोड घेउन त्याला जमिनित गाडलेल्या खांबावर मध्यभागी सपोर्ट दिला जायचा. मग दोन टॊकांवर दोन मुलांनी बसलं की मेरी गो राउंड सारखं  त्याला फिरवता यायचं. होळी पेटवली की मग लहान मुलांना मेरी गो राउंड प्रमाणे त्यावर बसवून फिरवलं जायचं.. फिरवणं सोपं व्हावं म्हणुन सेंटर पिव्हॉट ला शामबाबुच्या गॅरेजमधलं ग्रिस आणुन लावलं जायचं. मग कोणीतरी लहान मुलगा पडून रडणं सुरु होई पर्य़ंत हा खेळ चालायचा. नंतर मोठी मुलं  पण  ह्यावर ते लाकूड तुटेपर्यंत खेळायचे.अर्थात हे काही फार वेळ चालत नसे, थॊड्याच वेळात लाकूड तुटलं की होळी मधे फेकून दिलं जायचं.

होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या गांडीवर बंदूकिची गोळी म्हणत बोंब मारणे हा एक आवडीचा उद्योग होता.  या दिवशी तुम्ही कशाही बोंबा मारल्या तरीही कोणी काही म्हणत नसे.

रात्रीचे १२-१ वाजला की मोठी मुलं सिग्रेट्स वगैरे आणायची.. सिग्रेट म्हणजे तेंव्हा ५ नवीन पैशाला पिवळा हत्ती नावाची सिग्रेट मिळायची. मोठी मुलं एकच सिग्रेट १०-१२ जण एक एक कश मारायचा. आम्ही लहान मुलं पण मागे लागायचो…..! अर्थात आम्ही मोठं म्हणजे चिंचेच्या झाडावर चढुन बसण्या इतकं होई पर्यंत सिग्रेट काही ओढली नव्हती.

विषयांतर करतोय.. तर माझी पहिली सिग्रेट!! होळीचेच दिवस होते, एक दिवस मस्करी मधे सिग्रेट ओढायची का आपण? असं को्णी तरी  म्हंटलं.. कोण ते आठवत नाही.. अर्थात आमची पण इच्छा होतीच..   पानवाल्याच्या गादीवर गेल्यावर सिग्रेट मागायची कशी? कोणी पाहिल तर? शेवटी घरापासून दूर म्हणजे २ किमी अंतरावरच्या पान टपरीवरुन एक पिवळा हत्ती आणला एकदाचा ! बरं आता सिग्रेट ओढायची कुठे? कोणी पाहिल तर? शेवटी  आमच्या घराच्या मागचं चिंचेचं झाड जरा दाट होतं. जवळ जवळ २ झाडं होती आणि फांद्या पण एकमेकात मिसळलेल्या होत्या. तेंव्हा एका झाडावर चढलो,आणि एकदाची सिग्रेट पेटवली. त्या सिग्रेटला फिल्टर नसल्यामुळे  तोंडाकडला भाग एकदम ओला झाला होता, तरी पण सगळ्यांनी एकेकदा धूर काढला आणि बस्स! एकदाचं आपणही आता मोठं झालो… हे जाणवलं..

की आपण मोठं झालो हेच दाखवायलाच तर ती सिग्रेट ओढली नसेल ना?

तर अशी रात्री होळी पेटवली जायची. रात्री २ च्या सुमारास मग एक रात्र फेरी व्हायची. कोणाच्या घराबाहेर जे काही लाकडी सामान पडलेले असेल ते ( मोडक्या खाटा, मोडकी दारं, कंपाउंड ची लाकडं इत्यादी.. ) होळीला स्वाहा व्हायचं.दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नुसती बोंब असायची..

होळी म्हणजे मार्च चा महिना, ह्या महिन्यामध्ये पळसाची सुंदर फुलं बहरलेली असतात. आम्ही १५ दिवस आधी पासुनच फुलं गोळा करणं सुरु करायचो. यवतमाळ गावा शेजारिच बरेच जंगल होतं आणि पळस तर खूपच होते. ही फुलं वाळवून ठेवली जायची, रंग बनवायला. मग होळीच्या आदल्या दिवशी  थोड्या पाण्यामध्ये ही फुलं खूप उकळली की ह्यांचा सुंदर केशरी रंग तयार व्हायचा. तो रंग नंतर इतर रंगां बरोबरच वापरला जायचा.

holi1रंग खेळण्यासाठी अधीर झालेली  लहान मुलं लवकर बाहेर पडायची. आमच्या सारखी पौगंडावस्थेमधिल मुलं मात्र सकाळी ९ नंतर बाहेर पडायची. आमच्या इथे एक पद्धत होती, सकाळी निघालं की एका मित्रा कडे जायचं तिथे खाणं झालं की दुसरा मित्र असं करता करता पुर्ण टोळकं तयार व्हायचं . मग शामरावच्या गॅरेजमधल्या पाण्याच्या मोठ्या टाकी मधे मधे रंग मिसळून  त्यात जो दिसेल त्याला बुडवायचं असा प्रकार चालायचा.रंग संपला की कारच्या सायलेन्सर मधली काजळी + ऑइल किंवा ग्रिस एकत्र करुन एक मेकाला फासणे हे पण चालायचं. रंग खेळणं म्हणजे एक नशाच असायची… गेले ते दिवस.. आता कोणीतरी कॉलनीतला एखादा भैय्या येतो घरी अन गुलाल लाउन जातो.. बस्स! झाली होळी.

रंग खेळण्याचा कंटाळा आला की मग मात्र इतर उद्योग सुरु व्हायचे. जसे एखादे गाढव पकडून त्याच्यावर एखाद्याला बसवून, समोर पत्र्याचा डबा वाजवत गावभर हिंडणे सुरु व्हायचे. आमच्या शाम्याने एक नवीन शोध लावला होता, पेट्रोल चा थेंब कुत्र्याच्या गुदद्वारास लावला, की तो जीव खाउन पळत सुटतो.. ( पेटा वाल्यांनो कृपया इकडे लक्ष देउ नका) तर , पेट्रोलची तर कमतरता नव्हतीच.. कर्टसी शामबाबु गॅरेज.. बस्स! रस्त्याने फिरणारे कुत्रे पकडून त्यांच्या  गुदद्वाराला पेट्रोल चा थेंब ( कापड भिजवून ते नुसतं टेकवलं, तरी पुरेसं व्हायचं)लाउन ते कुत्रं पळायला लागलं की त्याच्या मागे धावायच….काही दिवसा नंतर असं झालं की आम्हाला पाहिलं की कुत्रे आधीच दूर पळून जायचे. खरंच सांगतोय..  🙂

मग ह्याचा पण लवकरच कंटाळा आला की मग मात्र कोणीतरी टूम काढायचं कच्चा चिवडा बनवायची.. कच्चा चिवडा म्हणजे पोहे, मुरमुरे, कांदा, दाणे, फुटाणे, तेल , तिखट वगैरे घालुन एकत्र कालवायचे.. बस्स ~ झाला कच्चा चिवडा तयार.. मग प्रत्येकी १ रुपया जमा करुन हे सगळं करण्यात एक तास भर जायचा…चिवडा बनवायला शामरावच्या गॅरेज मधेच एखाद्या पेपर वर हे सगळं साहित्य आणुन मिक्स केलं जायचं आणी  मग त्याच रंगलेल्या हातांनी खाणं व्हायचं.भांग वगैरे पण काही वेळेस दिलिप   कडे केली जायची.. पण नेहेमी नाही.. आता भांग प्यायल्यावर कॊण कसं वागायचं हे सांगून बोअर करित नाही.. ते तुम्ही समजून घ्या..

हे सगळं आटॊपे पर्यंत.. दुपारचे २-३ वाजलेले असायचे.. आणि आईचा ओरडा सुरु झाला की एक एक जण काढता पाय घ्यायचा.. अन.. चल रे.. भेटू संध्याकाळी शाखेमधे …. असं म्हणून निरोप घेतला जायचा….

संध्याकाळी नगर वाचनालयामधे एक मुर्खांचे सम्मेलन असायचे. त्यामधे काही लोक कविता वगैरे म्हणायचे . आम्ही सगळे जण त्या सम्मेलनाला आवर्जून हजेरी लावायचॊ. आणि मग   मुर्ख शिरोमणी  म्हणून कोणि तरी डीक्लिअर केला जायचा… तिथल्या हास्य कवितांच्या बद्दल मात्र मी कधीच विसरु शकत नाही.

तस साधारणपणॆ होळी अशाच प्रकारे साजरी केली जायची.. ….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to लहानपणची होळी

 1. वा! काय लिहिलय राव… सही… अगदी तुमच्या लहाणपणाची एक मिनी-क्लिप पाहिल्यासारखे!

  …. आमची ही होळी ब-यापैकी अशीच असायची… मात्र ते गाणं असायचं – होळी रे होळी.. *** ची पळी…. *** मेला संध्याकाळी, त्याची माती – उद्या सकाळी ..! … अबो…बो..बो…बो …!!

  ** मुद्दामुनच लिहित नाही.. उगाचच पंगा नको.. तसे इथे कुणाचेही नाव घाला आणि त्याच्या नावाने बोंब मारा!

  • काही हरकत नाही.. आज अगदी कोणाच्याही नावाने बोंब मारा… आज होळी आहे नां… !

 2. sachin says:

  lahnpanichya athavani tazya zalya sundar

 3. Sandeep Muke says:

  Kharach !!! Apritam

  Aaj aamhala aaplya lekhnamule lahan panachi aathavan zali mi SATARA cha aslyane aamhi hi lahanpani dusranchi lakde va shenya chorayacho …….

  Thanks
  Sandeep Muke

  • ्संदिप
   आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. अहो , लहानशा गावात वाढलो मी, त्यामुळे आमचे खेळ म्हणजे हे असे रानटीच असायचे… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s