बाल सलोनी

रोज काही ना काहीतरी होतंय.. आणि लिहायला काही तरी विषय मिळतोय.बरेच दिवसापासुन एक ब्लॉग फॉलो करतोय.. बाल सलोनी… एका होतकरू पित्याचे विश्व.. त्यामधे तो आपल्या होणाऱ्या मुलीशी, सलोनीशी संवाद साधतो. त्या ब्लॉग वरच्या पोस्ट ची मी तर नेहेमीच वाट पहात असतो . हल्ली सलोनीशी पण ओळख झाल्यासारखी वाटते. तिचे बाबा पण अगदी जवळचे मित्र वाटतात.  मला ही कन्सेप्टच  खूप आवडली. बाल सलोनिचे बाबा प्रत्येक गोष्ट बाल सलोनीला सांगतात. मग ती सारेगमप लिल चॅम्प्स असो किंवा ओबामाचा शपथ विधी असो प्रत्येक गोष्ट तितक्याच आत्मियतेने सांगण्याची धडपड मनाला स्पर्शून जाते…

इंग्रजी मधे ’प्राइसलेस ’ नावाचा शब्द नेहेमी वापरला जातो. इथे तो शब्द अगदी चपखल बसतो. ह्या बघा काही प्राइसलेस गोष्टी…..पहिल्या इशु च्या वेळेस सौ च्या पोटाला कान लावून आतल्या जिवाची  चाहूल घेण्यासाठी केलेला प्रयत्न…. किंवा थोडा मोठा आवाज झाला की आतल्या जिवाची चुळबुळ, सौ ची लहान सहान गोष्टींसाठी घेतलेली काळजी, सहाव्या किंवा सातव्या महिन्यात ऐकलेली त्या बाळाची ह्र्दयाची धडधड….. आणि ती ऐकल्यानंतर मिळणारा आनंद….मुलं थोडं अजुन मोठं झाल्यावर  बाळाची आतून हालचाल झाल्यामुळे पोटावर दिसणारी थर थर ( जी नंतर पुन्हा पहायला मिळत नाही आयुष्यभर)….तिला आवडते म्हणून अगदी चर्च गेट वरून  ऑफिस मधून येतांना लोकलच्या गर्दी मधुन हातामधे वागवत आणलेले बडे मियां चे कबाब, किंवा विठ्ठल ची भेळ …आणि तो पुडा तिच्या हातात दिल्यानंतर तिच्या डोळ्यां मधला तो निर्व्याज आनंद..  “प्राइसलेस”  !!!!!!!!!

हे सगळे आवाज  नीट ऐकण्यासाठी एका मित्राने चक्क स्टेथास्कोप विकत आणला होता . आपल्या इथे जर आजी वगैरे असेल तर मग सुनेला शेजारी बसवून रामरक्षा ,शिव लिला्मृत म्हणणे, आणि सगळं झाल्या नंतर उदबत्ती चा अंगारा पोटाला लावणे वगैरे प्रकार प्रत्येक घरा मधेच दिसून येतात. मी तर नेहेमी हसायचो हे प्रकार बघून…… पण आता त्यामागची भावना कळते, आणि  त्या काळी आपल्या घरातल्या मोठ्या  माणसांचं   मन का समजू शकलो नाही  म्हणून स्वतःचाच राग येतो.. आपल्यावर आणि आपल्या न झालेल्या बाळावर  जिवापाड प्रेम करणाऱ्या त्या आजीच मन समजून घ्यायला १७-१८  वर्षं का जावी लागली?? दुर्दैव! दुसरं काय!

आपल्या पुराणात पण हा कन्सेप्ट आहेच ना. अश्वत्थामा चक्रव्युह कसा भेदायचा ते शिकला होता आईच्या पोटात असतांनाच..पण आपण मात्र गर्भ संस्कार यावर विश्वास ठेवायला तयार नसतो..प्रत्येक गोष्टीला तर्काची कसोटी घा्सून पहायची सवय जी आपल्याला असते..

हल्ली हे बाकी बरं झालंय की होण्यापूर्वीच सोनोग्राफी मधे समजून जातं की  मुलगा होणार की मुलगी होणार ते. पण ह्याच गोष्टी मुळे ती वाट पहाण्याची मजा , ती अनामिक हुर हुर, संपुन जाते. पहिल्या इश्यु च्या वेळेस ’पहिलटकर बाप’ दवाखान्या मधे बाहेरच्या कॅरिडॊर मधे येरझाऱ्या घालतांना आजकाल दिसत नाहीत.मग डॉक्टर बाहेर येउन त्या हिरव्या ऍप्रनच्या आडून.. मुलगी  …किंवा लक्ष्मी आलीय बरं कां.. किंवा मुलगा असेल तर, पेढे मागवा मुलगा झालाय.. असं काहिसं डिक्लिअर करणार..

माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस  .मी असाच बाहेर उभा होतो वाट पहात! डिलिव्हरी कधी करायची हे  सगळं काही आधीपासूनच ठरलेलं होतं कारण, बेबी ब्रिच पोझिशन मधे होती. डॉक्टरांनी सांगितलं की  मुलगी झाली…. आणि मला एक क्षण काहीच समजलं नाही.. म्हणजे काय झालं? मी बाप झालो.. काय भावना होत्या तेंव्हा? कन्फ्युजन…. आनंद… की काय? मला खरंच काही कळत नव्हतं तेवढ्यात तो लहानसा जीव लालसर पांढरा गोळा   जेंव्हा डॉक्टरांनी हातात आणून दिला, तेंव्हा मात्र समजलं.. आणि टचकन.. डॊळ्यात पाणी आलं.. डॉक्टर म्हणाले काय हो.. मुलगी झाली म्हणून का वाईट वाटतय़..?? —-आता त्यांना काय सांगु? मनातल्या भावना माझ्या मलाच समजत नव्हत्या. पण  डोळे मात्र भरुन आले होते …. संध्याकाळपर्यंत दवाखान्यातच थांबलो. संध्याकाळी   अंबाझरी वर पोहायला गेलो.. आणि त्या संथ पाण्यावर आकाशाकडे पहात २५- ३० मिनिटं फ्लोटींग (फ्लोटींग.. म्हणजे हात पाय न हलवता पाण्यावर तरंगत रहायचे.. माझ्या वडिलांनी शिकवलं होतं लहानपणी) करित होतो. मी आणि आकाश.. आमच्या मधे कोणीच नव्हतं.. नाही म्हणायला एखादा पक्षी अधूनमधून डोक्यावर घिरट्या मात्र घालत होता. संथ लयीत श्वास सुरु होता. श्वासाची लय दोनच मिनिटात आपोआप मेंटॆन झाली.. आणि मी त्या पाण्याच्या मुलायम स्पर्शावर तरंगत होतो.. माझ्या उमललेल्या चित्तवृत्तीं समवेत…..थोडया वेळाने जेंव्हा पाण्याबाहेर आलो, तेंव्हा मात्र मन एकदम शांत झालेलं होतं.. वास्तवाची जाण आली होती…..

माझ्या माहिती मधल्या काही लोकांनी तर डिलिव्हरी च्या वेळेस आपल्या पत्नीच्या बरोबर थांबणे पसंत केले होते. तसेही भारतामधे गर्भ जल परिक्षा किंवा सोनोग्राफी द्वारा मुलगा की मुलगी ते ओळखणं अलाऊड नाही .कुठल्याही दवा खान्यामधे ’आम्ही येथे  गर्भ जल परीक्षा करित नाही ’ अशा पाट्या लावलेल्या दिसतात. पण अशी पाटि दिसली की समजून घ्यायचं की इथे हे सगळं केलं जातं…

तसाही भारतामधे सेक्स रेशो हा खूपच इम्बॅलन्स झालाय. मुलींच प्रमाण खूपच कमी आहे मुलांच्या तुलनेत… असो तो विषय नाही ..विषय भरकटत आहे म्हणून – संपवतो हे पोस्ट…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली. Bookmark the permalink.

7 Responses to बाल सलोनी

 1. आनंद says:

  अतिशय सुंदर लेख! मनाला स्पर्शून गेला! बाल सलोनी ब्लॉग लिंक बद्दल धन्यवाद!

  • आनंद
   पहिला लेख वाचल्या नंतर हा ब्लॉग मी सलोनीचा जन्म होई पर्यंत फॉलो करत होतो.. पण नंतर तिच्या बाबांनी ब्लॉग अपडेट करणं बंद केलं ..

 2. छान आहे लेख. एकदम हृदयस्पर्शी 🙂

 3. nitinbhusari says:

  ‘ आपल्या पुराणात पण हा कन्सेप्ट आहेच ना. अश्वत्थामा चक्रव्युह कसा भेदायचा ते शिकला होता आईच्या पोटात’
  अश्वत्थामा की अभिमन्यु ?????
  माफ करा पण थोडं कन्फ्युजन आहे.

 4. nitinbhusari says:

  लेख मनाला स्पर्श करणारा आहे.
  Hats off Sir ji

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s