उन्हाळ्याची सुट्टी.

ह्या पोस्ट मधे जो काळ आहे तो साधारण पणे ३५ वर्षापुर्वीचा काळ आहे. काही संदर्भ काल बाह्य वाटू शकतात.

आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणजे वरोऱ्याला जाणे व्हायचे. ( बरोडा गुजरातेतलं नाही, वरोरा हे चंद्रपुर जिल्ह्यातलं गांव– बाबा आमटॆंचं आनंदवन इथेच आहे) आमचा खूप मोठा गोतावळा असायचा. माझ्या ३ मावश्या आणि ४ मामा, त्यांची प्रत्येकी २-किंवा ३ मुलं असे सगळे मिळून जवळपास घरामधे ३०-४० लोकं व्हायचे. आजोबा असे पर्यंत सुट्ट्यांमधे प्रत्येक सुना आणि मुलगी  ही उन्हाळ्याच्या सुट्टी मधे घरी यायची . आजोबांचा खुप दरारा होता. जुने मामले दार होते वरोऱ्याचे खूप शेती वाडी होती , बरीच म्हणजे १००० एकरांच्या वर.. घरामधे गडी माणसं.. (त्यांना नोकर म्हणत नव्हते त्या काळी) असायची.मग रात्री गाद्या घालणे ते सकाळी उचलणे ही सगळी कामं तेच करायचे.

घरामधे मोठ्या मोठ्या कणग्या (  जवळपास 5 फुट व्यासाचे आणि ६ फुट उंच असे एक भांडे.. बांबु च्या काड्यांपासुन बनवलेले…बांबूच्या काड्यांची मोठी ढोली,ही कणगी बरेच वेळा शेणाने सारवून सगळी बारीक भोकं बुजवल्या गेलेली असत.पूर्वी च्या काळी सुप किटवणे हा एक प्रकार होता , तसाचा काहिसा प्रकार होता किटवण्याचा..) की ज्या मधे साठवणी ची गहू, ज्वारी इत्यादी वस्तू साठवून ठेवल्या जात. बाजारात भाव वाढले की मग ते बाहेर काढुन विकले जात. पेवा मधे पण साठवणीचे तुर वगैरे ठेवले जायचे. पेव म्हणजे जमिनीतल्या केलेल्या खड्ड्यांमधे व्यवस्थित लाइनिंग करुन साठवणी चे धान्य ठेवले जायचे.

सकाळ झाली की सगळे उठायचे. मागच्या अंगणामधे एक मोठी चुल पेटलेली असायची. त्या वर एक मोठी हंडी , आणि त्यात आंघोळीसाठी पाणी तापत असायचं,. ह्या व्यतिरिक्त एक तांव्याचा बंब होता, त्या मधे पण पाणि गरम करायला ठेवायचे. ह्या चुलीमधे पऱ्हाटी च्या काड्या घालत आणि सोबत  एक  मोठं लाकूड ही टाकलं जायचं . ही पऱ्हाटी ची म्हणजे कापसाच्या झाडाची काडी पोकळ असते. तेंव्हा एखादा वात्रट मुलगा, त्यातली एखादी काडी तोंडात धरुन उगाच धूर उडवायचा. मग तेवढ्यात एखादं लहान कार्टं , जे आमच्या खेळण्या मधे नसायचं ते आत जाउन अनाउन्स करुन यायचं की बाहेर काय उद्योग सुरु आहेत ते. आणि मग एखादा पाठीमधे धपाटा, थोडी रडा रड होत सगळं शांत व्हायचं.

कोणी तरी कांदे आणि बटाटे आणायचं आतल्या कोठी घरातून आणि त्या फुफाट्यामधे (चुलीच्या ) टाकायचे. भाजल्या गेल्यावर कांदा आणी बटाटा एकदम मस्त लागतो.. बार्बेक्यु विसरुन जाल इतकी सुंदर चव असायची. तेवढ्यात एखादा गडी जनावरांना घालण्यासाठी  पेंड +कुट्टी+धान्याचं पिठ+ ढेप हे सगळं एकत्र करुन  म्हशीच्या समोर ठेवायचा. जिचं दुध काढायचं आहे तिच्या समोर घमेल्यात हा गोळा ठेवला जायचा.८ -१० म्हशी, दोन गाई होत्या आजोबांकडे. एखादी म्हैस जर नाठाळ असेल तर तिचे मागचे दोन पाय दोरीने बांधुन मग तो गडी दुध काढायला बसायचा.दुध काढणं सुरु करण्या पुर्वी त्या म्हशीचे वासरु तिच्या आचळाला तोंड लावायला सोडायचा, थोडं दुघ त्याचं पिउन झालं की त्या वासराला दुर करुन दुध काढलं जायचं. बरं, त्या मधे पण एक नियम होता, एका आचंळाचे दुध तो कधीच काढत नसे, म्हणायचा ते त्या वासरा साठी आहे.. आम्ही सगळे बाजुला उभे राहिलो की तो वैतागायचां.. अहो छोटे मालक, म्हस बह्यकते नं वो.. जरा दुर उभे ऱ्हा.. असं म्हणायचा. मग आम्ही थोड्या अंतरा वरुन त्याला दुध काढतांना पहायचो. दुधाची धार त्या चरवी मधे पडली की जो एक चुर्र चुर्र आवाज येतो तो आवाज ऐकायला खूप आवडायचं.

आमच्या इथे एक गाय पण होती. ती अगदी गरीब स्वभावाची होती, तिच्या पायाखाली आंचळाकडे बघत तोंड उघडुन डायरेक्ट धार तोंडात उडवायला मजा यायची. तो गडी माणूस धार उडवायचा, पण कधी ती डोळ्यात तर कधी नाकात उडायची. तो तोल सांभाळत आ वासुन खाली उभे रहाणे … एक वेगळाच अनुभव असायचा….!आणि तोंडात न चुकता धार पडली की मग अवर्णनीय आनंद व्हायचा.

सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की दोन ग्रुप पडायचे . मुलींचा वेगळा आणि आम्हा मुलांचा वेगळा. दर दोन दिवसा आड पडवितल्या खांबाला लागुन एक रवी होती, तिने दही घुसळून लोणी काढले जायचे. कृष्ण सिरियल मधे दाखवतात ना तसलीच रवी असायची आणि दही घुसळले जायचे  ते एका मोठ्या रांजणात.. ताक तर झाडाखाली फेकुन दिले जायचे, किंवा जो कोणि मागायला येइल त्याला दिले जायचे.

आम्हा भावंडांमधे सगळ्यात जास्त वात्रट मी आणि माझा मावस भाउ राम.. ( अशी अपेक्षा करतो की तो हे पोस्ट वाचणार नाही 🙂  ) बाकी सगळे जण सरळ होते. जास्त खोलात जात नाही , नाहितर त्यावरच एक पुर्ण कादंबरी होइल .. आमच्या वात्रट पणावर..! त्या काळी जुन्या टाइपचे संडास होते.. आणि माझा मावस भाउ त्या मधे रोज एक भांडं टाकायचा.. फार तर ७-८ वर्षाचा असेल तो, माझ्या पेक्षा ४ वर्षानी लहान..

वरच्या मजल्यावरच्या खोलीमधे आंब्याचा ’माच’ ( म्हणजे गवतावर सगळे आंबे लावुन ठेवलेले असायचे पिकायला म्हणुन. त्यावर पुन्हा गवत घातलं जायचं. त्याला आंब्याचा माच म्हणतात आमच्याकडॆ) एका मोठ्या बादलीत पाणी घेउन त्यात पिकलेले आंबे बुडवून ताबडतोब खाणं सुरु करायचो. आमच्या शेजारिच जयंत काकडे (कार्टूनिस्ट आणि लेखक, हे तरुण भारत मधे नियमित लिहायचे , यांचं नांव तसं विदर्भात फेमस आहे.) यांचे घर होत. आंबे खाणं झालं की कोय त्यांच्या आणि भैय्यासाहेबांच्या अंगणात फेकायचो.

आंबे पण किती खाणार नां?त्याचाही कंटाळा आला की टाइम पास करण्याचे एक ठिकाण म्हणजे तेल घाणी आणि कुंभाराचे घर. आमच्या आजोळी तेल हे विकत आणले जात नव्हते. घरचे तिळ घेउन माणुस घाणीवर जायचा अन , तिळाचे तेल काढून आणलं जायचं.घाणिवर तिळाचे तेल काढतांना पहाणे पण एक मजा होती. आम्ही सगळे जण तेल काढून आणायला जायचॊ. गावातले सगळे लोकं ओळखायचे की आप्पा साहेबांचे नातवंड आलेत म्हणुन. सगळे लोकं आपल्याला ओळखतात म्हणून एक वेगळीच गंमत वाटायची… ते दिवसच वेगळे होते.

जवळच एक कुंभार रहायचा, त्याच्या घरासमोर एक मोठ्ठं बैलगाडीचं चाकं लावुन त्यावर तो माठ आणि इतर भांडी बनवायचा. आम्ही सगळे तासन तास ते बघत उभे रहायचो..शेवटी त्या कुंभारालाच सारखं आम्हाला बघुन कंटाळा यायचा! थोडा जास्त वेळ झाला की त्याच्याच कडचे माठातले थंडगार पाणी पिउन आम्ही परत घरी यायचो.

हिवाळ्यामधे कधी वरोऱ्याला जाणे झाले की मग हुर्डा खाण्याची चंगळ असायची. शेतावर जाउन हुर्डा पार्टी केली जायची.आता इतके सगळे उद्योग करे पर्यंत जेवायची वेळ व्हायची अन सगळे घरी परत यायचो.  जेवणात हमखास घरच्या आंब्यांचा रस असायचा. सगळ्यांची एकत्र पंगत बसून जेवणं व्हायची.

संध्याकाळपर्यंत काही तरी रिकामटेकडे उद्योग ,पत्ते खेळणे इत्यादी प्रकार चालायचे. मजा यायची. संध्याकाळी बस स्टॅंड शेजारच्या तलावाच्या पाळीवर जाउन बसायचो. तिथे ते संथ पाणी पहात बसणॆ हा पण एक टाइम पास होता.
एखाद्या वेळेस आनंदवनामधे जाउन यायचो.आनंदवनात जायचं म्हणजे रेंगी ( एक प्रकारची विदर्भातली बैलगाडी ) काढून जायचो. मला रेंगी चालवायला खुप आवडायचं. मग आमची भांडणं व्हायची.. शेवटी, घरापासून ते बस स्टॅंड एकाने , तिथुन पुढे दुसऱ्याने , परतीच्या मार्गावर तिसरा चालवेल असं ठरायचं…आमटेंचं घर अगदी आजोबांच्या घरा शेजारिच होतं. आजोबांना मात्र बाबा आमटेंचं काम कधीच पसंत पडलं नाही. म्हणायचे अरे तो आमट्यांचा मुरली सगळं सोडून तिकडे महारोगी गोळाकरुन बसलाय त्या आनंदवनात… चांगलं शेती करावी.. ते नाही. नसते उद्योग करतो नुसते… पण नंतरच्या काळात मात्र बाबा आमटेंना चांगलं म्हणायला लागले- म्हणायचे.. त्या मुरली ने बघ कसं चांगलं काम केलं.. नाहितर तुम्ही.. शिका जरा त्याच्या कडून..  माणसाची विचारसरणी कधी बदलेल तेच सांगता येत नाही.
स्वतःबद्दल लिहायला बसलो, की कळत नाही आपण किती अन काय लिहितोय ते.  थांबवतो इथेच आता. पुढची गोष्ट नंतर कधी तरी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

7 Responses to उन्हाळ्याची सुट्टी.

 1. fanfare says:

  tall he blog is blossoming, won’t be surprised if this finally transforms into a nice book with your musings… how do you make time for writing on so many varied subjects??amazing!!!

  • आयुष्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात जे काही भले बुरे अनुभव आले ते लिहितोय इथे. तुम्हा सगळ्यांच्या कॉमेंट्स मुळे अजुन लिहिण्याचा हुरुप येतो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद..

 2. महेंद्रजी,
  पहिल्यांदा धन्यवाद! कारण… एक नाही …कारणं आहेत…!
  १. तुमची ही पोस्ट वाचुन माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल…
  २. गावचे ते वातावरण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर ठेवल्याबद्दल…
  ३. मनात घर करणा-या लिखानाबद्दल… आणि अशा ब-याच गोष्टींबद्दल…!

  …. तसा मी लहाणपणापासुन मामांकडेच वाढलो… बाबा सैन्यात होते [सध्या रिटा.] आणि त्यामुळे माझ्या शिक्षणाचे बारा वाजु नयेत म्हणुन मामाकडे राहिलो.. तसा मामाचा गोतावळा मोठा म्हणावा तसाच.. म्हणजे तीन मामा – तीन माम्या – त्यांची मुलं [५+४+५ = १४!] .. आजी – आजोबा, मी आणि एक मावस भाऊ..! तुमचा लिख वाचुन उन्हाळ्यातले दिवस आठवले.. तसे आम्ही औलरेडी मामाकडेच असल्यामुळे – सुट्टीमध्ये कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता.. हां, मात्र, उन्हाळ्यातील पहाटे उठुन आंबे गोळा करायला जायचो.. अगदीच अडगळीला आंब्याचा माच असायचा… शिवाया आम्ही मुलांनी चोरुन बनविले पर्स्नल माच वेगळेच.. .मग कधी एकमेकांचा माचांवर ‘डाव’ साधायचा!

  दुपारी आंब्याचा झाडाखाली आंब्याच्या ‘कोय’ [आंब्याचा बी?] याचा ढिग लाऊन त्याचा खेळ खेळायचो. घरीचे दही आणि ताक [ – अगदी तुम्ही म्हणालात तसे – रवीने ताक घुसळाचे ] आणि त्यावर मिरचीचा ठेचा! [अगदी तोंडाला पाणी सुटलंय!] .. असो!

  मी अधिकच लिहायला लागलो तर ‘कमेंटची – पोस्ट’ व्हायची… 😉 मात्र आता तुम्ही आठवणी ताज्या केल्याच आहेत… लिहिन कधी तरी…. मस्त वेळ काढुन !

  आभार,
  भुंगा!

 3. fanfare says:

  actually this does not sound like 35 years ago.It’s far back in time, I guess i am probably in the same age group as yours and I don’t remember these things being part of my childhood…nonetheless it’s a nice post. Back when I was a kid even Pune wasn’t this crowded and Kothrud actually had an AAmrai. Can you believe it? We used to gang up with cousins and target the raw mangos ( kairee) and give all kind sof excuses when hte elders shouted in protest! One of the most feeble ones I have given was- I was just playing with the stones and it happened to hit the kairee:-))

  • वरोरा आंणि पुणे ह्या मधे बराच फरक आहे. त्या वेळी घरी काम करणाऱ्या माणसांना ज्वारी, गहू, ईत्यादी दिले जायचे पगार म्हणुन.. थोडक्यात वेठ बिगारी म्हणा ना. त्या काळात विदर्भातिल गावं फारच मागासलेली होती. वरोऱ्याला पण तेंव्हा ग्रोथ नव्हती. हल्ली तिथे व्होल्टास चा रेफ्रिजिरेटर प्लॅंट सुरु झाल्यापासुन थोडी डेव्हलपमॆंट झालेली आहे.

   तसेच वेस्टर्न कोल फिल्ड्स ची ओपन कास्ट माइन्स सुरु झाल्यापासुन थोडी जास्त डीमांड आलेली आहे. न्यु माजरी डेव्हलप झाली अन वरोरा पण त्याच बरोबर डेव्हलप झाला.मी जे लिहिलंय ते साधारण मी 12-13 वर्षाचा असतांनाचे दिवस आहेत.

   कुळ कायद्यामधे जो कसेल त्याची जमिन ह्या न्यायाने बरिज जमिन कुळांकडे गेली प्रत्येकी फक्त ५४ एकर जमिन शिल्लक राहिली.. तुम्हाला कुळ कायदा जेंव्हा लागु झाला तो पिरियड आठवत असेलच . तेंव्हा पासुन ग्रोथ एकदम फास्ट झाली.

  • by the way ..”I was just playing with the stones and it happened to hit the kairee:-))” is a good one…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s