काहितरी लिहायचं म्हणुन..

कांही कार्यालयीन कामा साठी काल नागपुरला आलो. सकाळच्या फ्लाइटने नागपुरला विमान उतरताना बाहेरचे तापमान ३२ डिग्रीज सेल्सियस आहे म्हणून सांगितलं तेंव्हाच छातीमध्ये धस्स झालं. म्हंटलं, सकाळचे ८-१५ झालेत आणि आत्ताच ३२ म्हणजे दुपारी  काय पुढे वाढून ठेवले आहे ते कोणास ठाऊक.

तसा मी नागपुरला पूर्वी राहिलो आहे. सगळं लहानपण इथेच गेलं पण आता मात्र जास्त कोरडं उन्हं   सहन होत नाही. दुपारी बाहेर फिरावं लागलं. एका डिलर कडे बसलो होतो, तो सांगत होता ,की कालचे टेम्परेचर ४६ होतं.ऐकूनच एकदम काटा आला अंगावर. नागपूरचा उन्हाळा म्हणजे दिवसा ४५-४६ तापमान आणि रात्री १० वाजे पर्यंत  गरम हवा. सुर्यास्ता नंतर पण कमीत कमी ४ तास गरम वारे सुरु असतात.

कांही वर्षांपूर्वी मी ह्याच टेम्परेचरला अगदी भर दुपारी बाइक घेउन फिरत असे. दुपारी बाहेर निघतांना एक पांढरा पंचा फोल्ड करुन डोक्याला मुंडासं बांधून बाहेर निघायचो, त्या मधे एक कांदा ठेवण्याची पण पद्धत आहे इथे. कांही  लोकं कांदा फोडून पण ठेवतात डोक्यावर.पण काल मात्र अगदी जिवावर आलं बाहेर फिरणं.  कारण तो पंचा नव्हता बांधायला डोक्याला. खिशातला रुमाल काढून कान बांधले. एखादा भुट्टा जसा शेगडीवर शेकावा, तसा शेकला जात होतो.

पूर्वी ह्याच उन्हात बाइक वर किती फिरायचो ते आठवलं. फुल स्लिव्ह शर्ट घालायचॊ पुर्वी त्यामुळे शर्टच्या बाहेर रहाणारा हाताचा भाग म्हणजे पंजाचा मागचा भाग टॅनिंग मुळॆ काळा हौऊन गेला होता तेंव्हा.

उन्हाळा अहमदाबादला पण आहे , पण फक्त रात्री लवकर गार होतं. मी लहान असतांना, घरासमोरच्या अंगणात संध्याकाळी पाणी शिंपडून तिथे तारे आणी चांदण्या मोजत पडून रहायला मजा यायची.  डोक्याशी विविध भारती सुरु असायचा ट्रान्झिस्टर वर.. मराठी आपली आवड लागायची बुधवारी.

एका मित्रा कडे गेलो होतो दुपारी . सहज बोलता बोलता उन्हाबद्दल तक्रार केली तर , तो आधी हासला आणि म्हणतो, कांही फार नाही हे उन्हं.. जसं मुंबई च्या गर्दीचा त्रास फक्त मुंबईत न रहाणाऱ्या लोकांना होतो, तसाच, नागपुरच्या उन्हाचा त्रास इथे न रहाणाऱ्या लोकांनाच होतो… (पुलंचा भक्त आहे ? आलं की नाही  लक्षात??)

230420091339आजचा दिवस तसा दिवस भर नुसता फिरण्यात गेला. काय करणार? तसंही जी सुमो होती तिचा एसी बंद पडलेला होता. तेंव्हा खिशातला रुमाल काढला आ्णि कानाला बांधला, म्हंटलं तेवढाच आराम. दिवस भर वेळ मिळेल तेंव्हा कोल्ड ड्रिंक्स , पाणी पीत होतो. दुपारी मात्र सेमिनरी हिल्स वरुन दुरदर्शनच्या ऑफिस मधून परत येतांना नाकातून थोडं रक्त आल्यासारखं वाटलं. दिवस भर  न जेवता काढला तर सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस अगदी शंभर टक्के. ! म्हणून अभयला म्हंटलं , आपण आधी स्टेटस ला जाउ , तर म्हणे स्टेटस कधीच बंद झालंय त्या ऐवजी त्याच ठिकाणी राजधानी सुरु झालंय ! म्हंटलं ठिक आहे. आणि जेवायला गेलो.

या हॉटेल मधे गेल्याबरोबर एक मुलगा तुमच्या समोर एक तशतरी आणतो आणि एका सुरई ने हातावर पाणी घालुन हात धुवायला सांगतो. आता बेसिनवर गेल्याशिवाय स्वच्छ वाटतच नाही. तरी पण समोर हात केले.एखाद्या क्डून इतकी सेवा करुन घेतांना मात्र कसं तरीच होतं. लखनौ ला कांही ठिकाणी कांही नबाब लोकं असेच नोकर ठेवतात पिंक दाणी सांभाळायला. अगदी तिचीच आठवण झाली.

थाळी नेहेमी प्रमाणेच ८-१० वाट्या २ फरसाण वगैरे वगैरे.. फक्त चव मात्र गुज्जु नव्हती. अर्धी पंजाबी, थोडी मराठी , थोडी गुज्जू..230420091341

उन्हाळा म्हट्लं की जेवण पण जास्त जात नाही . दिवसभरात आत्तापर्यंत ८-१० ग्लास पाणी+थंड पेय वगैरे झालेले होते. त्या मुळे पोट कसं डब्ब झाल्यासारखं वाटत होतं. तरी पण नाकातून आलेलं थोडं रक्त सांगत होतं – की जेऊन घे .. काही तरी खा! आधी त्या पोराने आणून ठेवलेल्या पन्ह्याचा ग्लास संपवला आणि त्या पोराला सांगितलं , इथेच थांब… आणि ४ ग्लास पन्हं प्यायल्यावर बरं वाटलं.मस्त पैकी ए सी सुरु होता.तो गार वारा खाताना बरं वाटलं.

नागपुरला मी येणार म्हंटलं की आईची तयारी सुरु होते. माझे आई  वडील नागपुरला रहातात. त्यांना मुंबईला शिफ्ट करायचं नाही. त्यांना मुंबईला करमत नाही.  नागपुरला खूप ओळखी आहेत , जुने मित्र आहेत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वडील अजूनही ८२ वर्ष वयातही अतिशय ऍक्टीव्ह आहेत.रोज कमीत कमी ८ किमी पायी फिरतात सकाळी ३ किमी संध्याकाळी ५ किमी. त्यांच्या समाजसेवेत त्यांचा वेळ छान जातो.अधूनमधून मुंबईला येऊन जातात. जास्तीत जास्त एक महिना रहातात मुंबईला आले की.

असो.. तर आईला कळलं की मी येणार आहे तर, तयारी सुरु होते आईची. मला आवडतो म्हणून कांद्याचे काप वाळवून आणि लालसर तळून घातलेला चिवडा,आणि हाताने केलेल्या शेवया मुलींसाठी आजीच्या हातची पुडचटणी ( 220420091331उडिद, चणा वगरे डाळींची आंबट गोड चटणी) म्हणजे विक पॉइंट  , सौ. करता सत्तुचं पिठ , पापड्या, कुरडया वगैरे सगळं करुन ठेवते.याच्याच सोबत फणसाचं आणि हळदीचं लोणचं होतंच.. तिचं पण आता वय ७५-७६ ! तिला म्हणतो, अगं इतकं काही करायची गरज नाही पण ऐकत नाही. घरी आलो तर सुपामधे ज्वारिचे पापड वाळत ठेवलेले दिसले. आणि ताटामधे वाळलेल्या गव्हाच्या चिकाच्या कुर्डया ( मला लहानपणी तो चिक खायला आवडायचा 🙂 अजूनही आवडतो. गॅस शेजारिच चिक शिजवलेलं भांडं दिसत होतं, हळूच थोडाचा तो चिक तोंडात टाकला,–अरे हात धुतले नाहीस नां?? आधी हात धू मग खा तुला हवं ते.. मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. . :)साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, पापडाच्या लाट्या खाण्यातली मजा आता मिस करतो. कितीही नाही म्हंट्लं तरीही   ४८ वय झालंय हे विसरता येत नाही. आपल्या इथे प्रत्येकाने वया-प्रमाणेच वागले पाहिजे अशी अपेक्षा असते.

नागपुरहून परत आलो की मुली पण पहिले पापड कुरडया मायक्रोवेव्ह मधे गरम करुन खाणार.. ( तेल न खाण्याचं फॅड आहे ना.. म्हणून..

मला जर एखाद्या वेळेस लालिपॉप हातामधे दांडी धरुन खावासा वाटला तर त्यात कांही विशेष आहे असे मला तरी वाटत नाही. दुकानदार मी घेइ पर्यंत कांही प्रतिक्रिया देत नाही. पण जेंव्हा रॅपर उघडून मी तो गोळा तोंडात ठेवतॊ अन त्याच्याकडे किती पैसे झाले अशा प्रश्नार्थक नजरेने पहातो, तेंव्हा त्याचा चेहेरा अगदी पहाण्यासारखा होतो..

इथून परत जातांना माझ्या बॅगेत नुसता खजिना असतो खाऊ चा. बेसन लाडू , चिवडा , चकली ते वर लिहिलेले सगळे पदार्थ दाटीवाटीने माझ्या बॅगेत गुण्यागोविंदाने नांदतात. घरी जाई पर्यंत जर कुरडया तुटतात, पापडांचा चुरा होतो. पण पोहोचतो. नागपुरला   चिन्नोर चा तांदुळ चांगला मिळतो. मागल्या वेळेस आईने व्यवस्थित पिशवीत घालुन आणि पिशवीचे तोंड शिवून टाकले होते. सिक्युरिटी मधे , मात्र त्या भैय्या ने खूप त्रास दिला. म्हणे खोलके दिखाओ. अरे म्हंट्लं चावल है इसमे, और तुमने स्क्रिनिंग तो किया है ना फिर क्युं खोलनेको बोल रहे हो? पण ऐकायलाच तयार नव्हता म्हणुन पुन्हा काउंटरवर जाउन चेक इन बॅगेज मधे टाकली ती पिशवी.

एक पिशवी घोळ भाजी ची हमखास असतेच. मंबई ला घॊळ भाजी मिळत नाही. आणि आम्हाला ती भाजी खुप आवडते म्हणून घोळ आणि आंबटचुका ( पालकासारखी आंबट भाजी असते ती ) पण घेउन जातो. भटई म्हणून इथे थोडी कडसर चव असलेली उन्हाळी वांगी मिळतात ती पण बिच्चारी बॅगेतल्या एका कोपऱ्यात निवांत पडुन असतात.तशीच एक चिवळीची भाजी मिळायची इथे . हल्ली मुंबईला पण कधी तरी दिसते. विदर्भात लहान मुलाला उन्हाळ्यात त्या चिवळीच्या भाजीवर एक नरम कपडा घालून झोपवायची पद्धत अजूनही काही घरात आहे. ही भाजी थंड असते असं म्हणतात.  तर काय, ती पण भाजी मी जातांना नेतो. आई म्हणाली , अजुन मिळत नाही  इथे..

कांही गोष्टी ज्या लहानपणा पासुन खाल्लेल्या असतात त्यांना आपण मोठेपणी खुप मिस करतो. मुली म्हणतात, बाबा, तुम्ही भाज्या पण आणता? इतकं काय विशेष आहे त्या भाज्यांमधे? काय सांगणार आपण तरी ??नागपुरचा उन्हाळा म्हटला की संत्री आलीच. पण ह्या वर्षी संत्र्यांची आवक कांही फार नाही त्यामुळे संत्री घेउन जाता येणार नाही.

एकदा चिन्नोर तांदुळाची ५ किलोची पिशवी बनवली होती आईने, पण विमानतळावर सिक्युरिटी मधे एक बाई होती तिने आत हात घालुन तांदुळात काही लपवले आहे कां ते चेक केले.. घरी आल्यावर जेंव्हा बायकोला सांगितलं, तर  ती म्हणाली, पुढच्या वेळी एक ताट पण घेउन जा, आणि तिला सांगा यातले पांढरे खडे निवडुन दे म्हणून……

आपण कितीही मोठं झालॊ तरीही आई वडिलांना बघितलं की आपण अजुनही लहानच आहोत असं वाटतं.म्हणून नागपुरला मी एकटा आलॊ की खुप खुश असतो.. पुन्हा लहान होता येतं ना म्हणुन… 🙂 ..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

6 Responses to काहितरी लिहायचं म्हणुन..

 1. छान वाटलं, वाचताना, पूर्वी मुलीच फक्त माहेरी जात, आता पुरुषांनीही माहेरी जावयाची पध्दत सुरू करायला हरकत नाही. माहेरपण हि जरूरीचे प्रत्येकाला बालपण आठवायला

  • अगदी खरंय.. फारच जरुरीचे आहे . पण त्या व्हिजिट मधे मुलं आणि सौ. सोबत नको.. तरच लहानपण उपभोगता येइल.. खरं नां?प्रत्येकाच्याच मनात एक लहान मुल दडलेलं असतं, कूणि त्याचा गळा दाबुन त्याला मारुन टाकतं, तर कुणी त्याला अकारण जबाबदारीची जाणिव करुन देत प्रौढ करतं.. मी अजुन तरी त्याला जिवंत ठेवलाय .. 🙂

 2. fanfare says:

  ANee kadhee kadhee kahi lokannchya watyala jar lahanpaN alach Nasel ( te lahan asatana )tar mothepaNi hakkane te upabhogayala kahich harakat nahee.. in fact, swat:cha aNee apalya javalachya maNasancha lahanpaN jaNeevpurvak japav asa malawatat .it’s never too late to enjoy your childhood and encourage others cose to you to enjoy theirs I think.

  • मी तर शक्यतोवर प्रयत्न करतो आपल्यातला लहान मुलगा जिवंत ठेवायचा. खरं सांगायचं तर हल्ली जरा अवघड होत चाललंय.. मुलं मोठी झाल्या पासुन ..

 3. Gurunath says:

  chival ghol ambatchuka!!!!!, bas karo dada…. ek varshapasun ghari nahi gelelo….. 😦

  • अरे माझं पण नेहेमी तसंच होतं. आता शुक्रवार शनीवार जातोय नागपूरला. तेंव्हा घोळ आणि चिवळ नक्की आणणार. तसेच भटई पण आता निघाली असेलच.. 🙂 शनीवारी परत येतोय मुंबईला.. हा आठवडा खूप फिरणे सुरु आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s