लग्नावरची पोस्ट

लग्न म्हंटलं की लग्नाच्या आधीचे सुंदर दिवस आठवतात – पहा.. मला वाटलंच की तुमचा गैरसमज होणार, म्हणजे लग्नानंतरचे दिवस तर चांगले गेलेच ,पण आधीचे दिवस थोडे जास्तच चांगले होते.. थोडं फार लपून फिरणे, सगळ्या बागा, तलावाचे काठ, आणि गर्दी नसलेली रेस्टॉरंट्स   पालथी घातली होती. असं कुठलंही नागपुरातलं उद्यान नाही की जिथून आम्हाला   हाकललेले नाही.. 🙂 खरंच लिहितोय. मग कधी तरी घरी पण बातमी पोहोचायची तिच्या पण.. कुठल्यातरी  ( म्हणजे मी) मुलासोबत दिसली म्हणून….जाउ द्या..स्वतःबद्दल लिहायचं नाही आज..

हा लेख स्वतःच्या लग्नाबद्दल नाही. पण इतर लग्नाच्या गमती सांगायचंय आज.  दर्यापुर नावाचे एक गांव आहे अमरावती जवळ. तिथे लहानपणी आत्याकडे जाणं व्हायचं उन्हाळ्यात.घरामागच्या मंदिरात जवळपास रोजच लग्न लागायची.  मुख्यत्वे  शेतकरी, किंवा शेतावर काम करणारे मजुर वगैरे ह्या क्लासची लग्न तिथे व्हायची.

आम्ही अंगणात झोपलेलं असायचॊ. सकाळी ५ वाजता मोठ्या आवाजात रुप तेरा मस्ताना  लाउडस्पिकर वर सुरु व्हायचं-,वेक अप कॉल ला ! तेंव्हा असा काही नियम नव्हता की लाउडस्पिकर केंव्हा आणि किती वेळ सुरु ठेवायचा, त्यामुळे अगदी जेंव्हा केंव्हा मनात येइल तेंव्हा गाणी सुरु व्हायची.त्यातल्या त्यात जर ती  रेकॉर्ड घासलेली असेल आणि जर अडकत असेल तर मग नुसतं प्यार मेरा.. प्यार मेरा.. प्यार मेरा.. असं सुरु रहायचं . मग तेवढ्यात तो  रेकॉर्डवाला पिंक टाकुन यायचा  आणि गाणं पुढे सरकवायचा.

आम्ही बाहेरच्या अंगणात( रात्री अंगणातच झोपायचो)  तो आवाज नोगोशिएट करायला अजुन डोक्यावरून पांघरूण ओढून झोपायचा प्रयत्न करित असू.पण इतका कर्कश्य आवाज असायचा की ऊठावच लागायचं! लाऊड स्पिकरवर अधूनमधून इतर घोषणा पण  सुरु असायच्या.

अरे हो, एक राहिलंच.. नवरदेवाचा मारुतीच्या मंदिराला जाण्याचा प्रसंग. सनई, चोघडा आणि त्या मागे बऱ्याच स्त्रियांनी वेढलेला नवरदेव ! हळ्दीने पिवळा झालेला त्याचा पांढरा पायजमा आणि नेहरु शर्ट किंवा साधा बुशशर्ट.. हाता मधे एक चाकु, त्यावर खोचलेलं  लिंबु, डॊक्यावर टोपी , त्यावर  बांधलेल्या मुंडावळ्या, कपाळावर लाल भडक कुंकू.. विदर्भातल्या उन्हाळ्यामुळे सुटलेल्या घामाने त्या कुंकवाचे ओघळ सरळ कपाळावरून गळ्यापर्यंत पोहोचलेले. अशा वेशात तो जायचा. त्या व्हिजिट पेक्षा , त्या नवरदेवाला पहायलाच आवडायचं.

लग्नाच्या मंगलाष्टकाची वेळ झाली की मग मात्र कधी तरी माइक बंद न केल्यामुळे भांडणं पण ऐकु यायची. ओ पावनं, तुम्ही रेडिओ देल्ला नाय अजुन.. किंवा पोराची भैन रुसली मने पैरपट्टी पायजेल म्हनून ( पैरपट्टी म्हणजे पैंजण बरं कां). कोणीतरी समजावतोय, आता दुकानं उघडले नाहीत, नंतर उघडलेकी आणून देईन म्हणून. आणि मग नवरदेवाची रुसलेली बहिण (करवली) मागे उभी रहायला तयार व्हायची.

मंगलाष्टकं संपली की ’सुलग्न’ लावणं सुरु व्हायचं. आणि तेंव्हा सगळ्यात गमतीशिर प्रकार सुरु व्हायचा. लाउडस्पिकरवरुन घोषणा सुरु व्हायच्या.. तडेगांवच्या ( तळेगांवच्या) रामराव सखाराम रावताकडुन १ रुपया बक्षिस ( कांही लोकं चोळी बांगडी साठी १रुपया असेही म्हणायचे). किंवा शहापुर बुद्रुकच्या लक्षमनरावा कडुन झंपरचा (ब्लाउझ) कपडा.. आमची अगदी हसूनहसून पुरेवाट व्हायची.मग कधी तरी अगदी सखारामा कडुन आठ आणे अशी  अनाउन्समेंट व्हायची. कधी सोपानरावा कडुन पितळेचा गडवा ( तांब्या), अशा गमतीशीर अनाउन्समेंट ऐकतांना मजा यायची.

मग जेंव्हा घरी आम्ही पण हाच खेळत असू. म्हणजे जेवायला बसलॊ, की अनंताले आत्याकडून दोन पोळ्या अन भाजी … किंवा श्रीकांतले एक पापड…….अशा अनाउन्समेंटस…… नुसती धमाल असायची.

लग्नघरी जेवणाची वेळ झाली की  मस्त सुगंध सुटायचा. मोस्टली जिलबी, आणि वांग्या बटाट्याची भाजी असायची. मला कसं माहिती म्हणता? अहो चक्क बाहेरच सगळा स्वयंपाक सुरु असायचा . तो आचारी, त्याच्या मोठ्या कढया …. आणि तळणं सुरु असायचं. लहान गांव असल्यामुळे जवळपास सगळ्यांशीच ओळखी असायच्या त्यामुळे जवळपास प्रत्येक लग्नालाच बोलावणं असायचं आत्याच्या घरी. आम्ही पण मग कांही लग्न अटेंड केली होती. पण  अगदी मनांपासून इच्छा असुनही तिथे कधी जेउ दिलं  नाही, ही एक खंत आहेच मनात.एका ठरावीक जमातीचे लग्न असलं की अनाउन्समेंट व्हायची प्रत्येकाने ’पत्तल’ वर बसावे. पत्तल म्हणजे पत्रावळ. जेवण झाल्यावर हात धुवायला नेलेला ग्लास परत ठेवने.. आनी घरी नेउ नये.. अशीही घॊषणा कधी तरी ऐकू यायची.

बरं इतकं झालं, की मग स्त्रियांची धावपळ सुरु व्हायची. नांव घ्या , नांव घ्या म्हणून गदारोळ व्हायचा आणी मग माइक समोर पाहिला की स्त्रिया अगदी हिरिरीने नांवं घ्यायच्या. आता आठवत नाहीत काय नांव घ्यायच्या ते.. संध्याकाळी वरात निघतांना, कधी , बैलगाडी, कधी पायी तर कधी सायकल रिक्षा पण असायची. अशा तर्हे़ने हा सोहोळा पार पडायचा.

लहान सहान गोष्टींमधे पण आनंद शोधायचा मानवी स्वभाव इथे पण दिसून यायचा. नंतर एकदा एका मुस्लिम मित्राचे लग्न अटॆंड केलं होतं , मी आसनसोल ला असताना. तो इंजिनिअर होता अर्थ मुव्हिंग इक्विप्मेंट्स हॅंडल करायचा बंगालमधे. तिथेच ओळख झाली होती एका साइटवर. त्याच्या लग्नामधे सगळे मुस्लिम लोकंच होते, केवळ एक मी आणि टी जॉन म्हणून एक  मित्र होता बस्स! आम्ही त्याच्या जवळ बसून गप्पा मारत होतो. अधूनमधून  इतर लोकंही येउन भेटून जायचे त्याला.  थोडा वेळ झाला, आणि तो म्हणाला, आप खाना खा लिजिये, आपको धनबाद से आसनसोल जानेके लिये ४ घंटा तो लगेगाही. म्हंटल, अरे अन्सार लेकिन तेरी शादी तो हो जाने दे.. फिर खा लेंगे. तर म्हणतो, शादी तो हो गई.. मिय़ां.. आणि हसायला लागला.मी आपला आ वासुन त्याच्याकडे पहात राहिलो, नंतर त्यानी सांगितलं की त्यांच्यात लग्न कसं होतं ते.

एका के्रळी मित्राच्या मुलाचं लग्नं होतं. पंचतारांकित हॉटेल मधे लग्न झालं. इथं लग्नापेक्षा वऱ्हाड्यांना इतरच गोष्टीत इंटरेस्ट दिसत होता. आम्ही तर फक्त रिसेप्शन ला गेलो होतो, पण इथे फक्त सगळी कडे नुसता पैशाचा पाउस पडलेला दिसत होता. पदोपदी जाणवत होतं की किती खर्च केलाय  ते  लग्नाला.

इतर बरीच लग्न अटेंड केलीत पण त्या पहिल्या दर्यापुरच्या  लग्नातला लाइव्हली नेस कधिच कुठे पहायला मिळाला नाही. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

7 Responses to लग्नावरची पोस्ट

 1. sahajach says:

  अशी कुठलीही बाग नसेल जिथुन आम्हाला हकलले नाही..हा हा हा!!!!
  असाच अनुभव बरेच जणांना येतो…
  South Indians चे लग्न..हे लोक सोनं तोळ्यात नाही तर किलोत मोजतात….
  बाकी लेख मस्तच…

 2. साउथ इंडीयन्स आणि आमच्या भागात कोमटी लोकांच्या( हे लोक खुप पैसेवाले बरं कां) मधेही सोनं किलोनेच दिलं जातं..

 3. bhaanasa says:

  लॊउडस्पिकरवरून कोणी काय दिले ह्याची अनॊन्समेंट लय भारीच. ती गंमत मीपण अनुभवली आहे. एकदम भडक गावठी गुलाबी रंगाची प्लॆस्टीक जर असलेला शालू अन कपाळाला पुठ्य़ाच्या कलाबूत लावलेल्या मुंडावळ्य़ा…रणरणते ऊन, नुसते चकाकणारे दृष्य. पोस्ट नेहमीप्रमाणे मस्त.

 4. Raj says:

  Zakkkkkkas ahe lekh

 5. भानसा ,तन्वी, राज
  प्रतिक्रिये बद्दल आभार.
  कांही गोष्टी खरंच लिहायच्या राहुन गेल्या.. जसे नवरदेव आणि नवरी ची काळी स्किन हळद लागुन आलेला हिरवट सर रंग.. आणि हो. तो गुलाबी प्लास्टिक जरीचा शालु पण राहुन गेला.
  आणि नेमकं पंगतीच्या वेळी – जन पळ भर म्हणतिल हाय हाय.. सुरु होणं हे तर नेहेमिचंच. किंवा कधी निज माझ्या नंदलाला…पण लागायचं……..
  आणि आमचि हसुन हसुन पुरेवाट व्हायची.

 6. हे दाक्षिणात्य लोक बरेच श्रीमंत असतात. आणि बहुतांशी सगळे स्थूल. त्यामुळे आम्ही गमतीने म्हणतो की, वजनाच्या प्रमाणात हुंडा मिळतो या लोकांना… 😉

  • बरोबर.. लाखांनी मिळतो हुंडा आणि किलो ने सोनं… एखादी आंध्रातली मुलगी असेल तर विचारायलाच नको.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s