खीर भवानी….

khirbhavani.. याच ठिकाणा पासून मिलिटन्सी सुरु झाली होती. बारामुल्ला.. दोन्ही बाजुला अर्धवट जळलेली काश्मिरी पंडितांची घरं दिसत होती. टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, सर इसी जगहसे टेररिझम शुरु हुवा था. साथ साथ रहने वाले हजारो काश्मिरी पंडीतोंकॊ उनके पडोसियोने मार डाला, या फिर भगा दिया. घरोंपर जबरदस्ती कब्जा कर लिया. जिन्होने घर छॊडनेसे इन्कार किया उनके घरोंके साथ उन लोगोंको भी जला दिया था.जो लोग साथ मे इद और दिवाली मनाते थे एक दुसरेके खुनके प्यासे  हो गये थे.हे सगळं तर आधी पण बरेचदा ऐकलं होतं , आणि वाचलं पण होतं, पण जेंव्हा स्वतःच्या डोळ्यांनी   पाहिलं तेंव्हा मात्र मन विष्ण झालं.

इथल्या काश्मिरी पंडितांच्या तरुण मुलींना आणि सुनांना पळवून नेवून त्यांच्यावर अत्याचार केले त्या टेररिस्ट लोकांनी. रस्त्याच्या शेजारच्या घरांच्या कडे पाहिलं की त्या घरांवरील हिंदु ठसा लक्षात येत होता. एक घरावरचा ॐ खोडून  त्यन जागी लिहिलेलं ७८६ नजरेत भरत होतं.घराचे केशरी रंग, जरी त्यावर हिरवे रंग पोतले असले तरीही  अधूनमधून डोकं बाहेर काढत होते, आणि ते पाहून अजूनच कसं तरी होत होतं.. सहज बरोबर असलेल्या बायको कडे आणि दोन  मुलींच्या कडे लक्ष गेलं.  काहीच न बोलता शांत पणे कारच्या खिडकी च्या बाहेर पहाणं सुरु केलं. काश्मीरचे सौंदर्य, जे गेले आठ दिवस मनाला मोहवत होतं तेच आता नजरेला बोचायला लागलं.

समोर पोंचू घातलेल्या बायका आणि पठाणी ड्रेस घातलेले ते पुरुष, सगळेच मला टेररिस्ट वाटतं होते. त्यांच्याकडे पाहिलं की वाटायचं की आत्ता हा त्य अ पोंचु च्या आड लपवलेली बंदुक काढेल आणि गोळीबार सुरु करेल. किंवा एखादा ग्रेनेड काढून आमच्या क्वॉलिस वर फेकेल. दोनच दिवसापूर्वी आम्ही जेंव्हा श्री नगरला होतो तेंव्हा श्रीनगरला शालिमार गार्डन जवळ ब्लास्ट करण्यात आला होता.

जम्मुला एअरपोर्टला उतरल्यापासुनच आम्ही क्वालिस भाड्याने घेतली होती. पुर्ण टुर होत १५ दिवसांचा. सोबत आपलं वाहन असलं की बरं असतं. सगळा टुर मी स्वतःचा प्लान केला होता. मुंबईला काश्मीर टुरिझम चं ऑफिस आहे ड्ब्लु टी सी ला त्यांच्याकडेच सगळं बुकिंग केलं होतं. फक्त टॅक्सी एका जम्मुच्या मित्राकडून बुक केली होती. म्हटल ओळखीचा ड्रायव्हर असावा, आणि तो मुस्लिम नसावा.. बस्स! इतकीच माफक अपेक्षा होती. थोडं हसू आलं.. अरे हा काय विचार करतोय मी? ड्रायव्हर जो जम्मूचा हिंदु होता तो म्हणाला ,साहब, हे टेररिस्ट   लोकं टुरिस्ट लोकांना अजिबात त्रास देत नाही . कारण इथली सगळी एकॉनॉमी टुरिझम वरंच अवलंबून आहे.जर टुरिस्ट आले तरच इथल्या लोकांना पैसा मिळणार , नाहितर नुसते आक्रोड आणि बदाम खाऊन पोटं भरावी लागतील.

आम्ही जेंव्हा जम्मु ते श्रीनगर प्रवास केला, तेंव्हा आमची कार एका मिल्ट्री कारव्यासोबतच होती अगदी श्रीनगर पर्यंत. अगदी प्रत्येक शंभर फुटावर एक मिल्ट्रीचा जवान होता हातात स्टेनगन घेउन- अगदी  ’तयार ’पोझिशन मधे..!त्यामुळे अगदी सेफ वाटत होतं. इथल्या मिल्ट्री जवानांच्या जीवाला खूप धोका आहे. कोण कधी कुठुन हल्ला करेल ते सांगता येत नाही. मिल्ट्री च्या ट्रक्स वर तर नेहेमीच हल्ले होतात, पण टुरिस्ट लोकांना मात्र कधीच काही केलं जात नाही. हे ऐकुन पुन्हा जरा बरं वाटलं … आणि नंतर स्वतःच्या कमकुवत मनाची लाज वाटली- सैनिकांवरच हल्ला करतात हे ऐकुन मला सेफ वाटलं?? कसं मन असतं नाही माणसाचं. स्वतःची सेफ्टी आधी महत्वाची वाटते.. इव्हन ऍट द कॉस्ट ऑफ अदर्स  लाइव्ह्ज….. !!

गेले आठ दिवस बायको मुलांच्या बरोबर होतो, त्यामुळे बरेचसे विषय चघळुन झाले होते.मुंबईला असतांना संवाद तर कमीच होतो. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो. पण इथे मात्र चोविस तास बरोबर…..मुलगी कारच्या अगदी मागच्या सिटवर आडवी पडून झोपायचा प्रयत्न करित होती. दुसरी मुलगी पुस्तक वाचत बसली होती. काश्मीरच्या सृष्टी सौंदर्याची जादू  आता कमी झाली होती. आम्ही सगळे त्या सुंदर निसर्गाशी नकळत पणे  एकरुप झाले होतो. त्या निसर्गाचाच एक भाग झालो होतो. बायकोने डोक्याभोवती ओढणी बांधुन घेतली होती केस उडू नये म्हणून.. सहज लक्षात आलं, बायको अजुन ही तरुणच दिसते, तिचं एजिंग कमी झालंय माझ्या पेक्षा. कदाचित कमी खाणं आणि जिम चा परिणाम असावा. पुर्वी नियमीतपणे पणे जिमला जायची ती.

शेजारच्या घरांच्या कंपाउंड वॉल्स वर गुलाबाचे ताटवे बोगन वेली प्रमाणे सोडलेले होते. काही घरांच्या कंपाउंड वॉल्स तर अगदी लाल चुटूक दिसत होत्या. दूर असलेल्या पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर घरं उठ्न दिसत होती.पण त्या घरामधे जिवंतपणाचं काही लक्षण दिसत नव्हतं.एखाद्या चित्रकाराने एक सुंदर  मुलीचं चित्र काढावं पण त्यात नेमकं त्या मुलीचे किंवा पापण्या काढणं, किंवा भुवया काढणं…सुंदर डोळे काढणं विसरुन जावं तसं काहिसं दिसत होतं..

शेवटी एकदचं आम्ही खीर भवानीच्या मंदिराजवळ पोहोचलो. कार पार्क केली आणि आम्ही निघालो दर्शनाला. मंदिराचं मुख्य दार  बंद होतं. तिथे समोर रेतीची भरलेली बरीचशी पोती होती.. त्यांच्या आड काही मिल्ट्री चे जवान गन्स घेउन बसले होते. समोर दुकानं होती युजवल पूजेच्या सामानाची.त्या सामानात नेहेमीच्या पूजेच्या सामाना व्यतिरिक्त फक्त एकच गोष्ट जास्त होती. ती म्हणजे खिरीचे मोदक.. तांदुळाच्या, साखर आणि दूध घालुन डिहायड्रेट केलेल्या स्टिक्स.. खीर भवानी देवीचं मंदिर एका लहानशा टाक्यात आहे. चारही बाजुला पाणी असतं. त्या मधे आपण आणलेले खिरीचे ते स्टीक्स टाकायचे अशी प्रथा आहे. सुंदर दुधाळ रंगाचं पाणी दिसत होतं, पंडितजी म्हणाले, की जेंव्हा एखादं परकीय आक्रमण किंवा धोका असेल तेंव्हा हेच पाणी लाल होतं..

आम्हाला पाहुन तिथला पंडितजी पण समोर आला. आमच्या सगळ्यांच्या कपाळाला त्याने कुंकवाचे बोट टेकवले.सर्व मांगल्य मांगल्ये…. सुरु केलं. श्रध्दापूर्वक देवीला नमस्कार केला आणि झाडाच्या पारावर टेकलॊ. तिथलं कुंद वातावरण, आणि संपुर्ण मोठ्या मंदिरामध्ये फक्त आमची फॅमिली. कसंतरी वाटत होतं. मंदिर म्हंटलं की कसा राबता हवा माणसांचा. त्याशिवाय काही मजा  नाही.इथे जवळपास सगळी मुस्लिम बहुल वस्ती आहे आता. सगळी पंडितांची घरं मुस्लिमांनी विकत घेतली आहेत, त्या मुळे इथे येणार तरी कोण?प्रसाद म्हणून एका वाटीमधे तांदुळाची गरम गरम खीर दिली तिथे.
सौ. मंदिरामधे वॉश रुम मधे गेली आणि मी त्या पंडितजींशी गप्पा मारत बसलो.

पंडितजींनी पण तेचं सगळं सांगितलं जे ड्रायव्हरने सांगितले होते. फक्त डॊळ्यात पाणी आणून म्हणाला, तुम्ही इकडे का आलात? सुंदर निसर्ग तर हिमाचल मधे पण आहे.. तुम्ही इकडे यायला नको होतं . तुम्ही लोकं इथे येता, हाउस बोट्स, घोडे भाड्याने घेता. आणि ’त्या’ लोकांना पैसे देता. मग ह्याच पैशातला मोठा हिस्सा हा ते टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज साठी डोनेट करतात. त्यांच्या मस्जिद मधे जेहादच्या नावाखाली पैसा गोळा केला जातो , आणि तोच पैसा कुठे वापरला जातो ते तुम्ही जाणताच…

तुम्ही लोकं इकडे येता, त्यांना पैसे देता..  . टेररिस्ट फंडींग करताय तुम्ही लोकं – अजाणतेपणी.. मला तर काय बोलावं ते कळत नव्हतं. मी नुसता बसून राहिलो.

पंडितजी म्हणाले, जर तुम्ही कांही वर्षांपूर्वी आले असते तर या मंदिरामध्ये तुम्हाला खूप लोकं दिसले असते. पण आता इथले हिंदु लोकं विस्थापित झाल्यामुळे या मंदिरात येणारे लोकं कमी झालेले आहेत. फक्त सणा वाराला, किंवा आमच्या सारखे टुरिस्ट लोकंच फक्त येतात.. मला खूप वाईट वाटलं. मी पंडितजींना म्हणालो, तुमचं म्हणणं पटलंय मला , आणि मी इतरांना पण कन्व्हे करिन ..

पंडितजींच्या मुलांनी बारामुल्ला सोडलंय. आता पंडितजी आणि फक्त त्यांची बायको दोघंच रहातात तिथे. म्हणाले, मुलगा दिल्लीला गेलाय. मोठ्या मुश्किलीने त्याच्या बायकोची आणि मुलींची इज्जत वाचली ’त्या’ वेळी.. पंडितांनाही खूप बोलायचं होतं, पण तेवढ्यात सौ. आली.

पंडीतजींनी अगदी आपुलकीने आणि काळजी युक्त स्वरात सांगितलं की लवकर जा, अंधार पडण्याच्या आत पोहोचा श्रीनगरला. उगाच त्यांचे डोळे भरुन आले मुलींच्या कडे पाहून.. मला वाटतं त्यांना आपल्या नाती आठवल्या असतील. बायकोचे पण डोळे उगाच पाणावले, जरी तिला आमचं झालेलं बोलणं काहीही माहिती नसलं तरीही आमच्यातला थंड शांतपणा तिला नक्कीच जाणवला असणार..

शेवटी मी पुरुष,आणि पुरुषाच्या डोळ्यात अश्रू नको, म्हणून निग्रहाने ते  अश्रू माघारी पाठवलं .. तरी पण कडा ओलावल्याच. मुलींच्या समोर नको डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायला…त्यांना वाटतं ना, माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट.. :)म्हणून खाली वाकलो आणि पंडितजींना नमस्कार करुन उभा होतांना उगाच डोळ्यांवरून फिरवला, म्हंटलं कुंकु गेलं वाटतं डोळ्यात.. आणि रुमालाने पुसला चेहेरा..पंडितजींच्या पाया पडलो, एक पाचशे रुपयांची नोट त्यांच्या हातात ठेवली. त्यांच्या कडे पाहिलं.. डोळ्यांना डॊळे भिडले , आणि निरोप घेतला… अगदी आपल्या अजोबांना सोडून चालल्या प्रमाणे वाटत होतं.. आणि आम्ही परत निघालॊ श्रीनगरला.

मला वाटतं की    हवेतला बोचरा गारवा , आणि त्यामुळे उमटणारे शहारे.. थोडी मनातली भिती.. सोबत असलेल्या मुलींची आणि बायकोची काळजी.. …. आणि या सगळ्यांच्या सोबत “मी” कधी सगळ्यांसोबत असूनही एकटाच……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , . Bookmark the permalink.

20 Responses to खीर भवानी….

 1. मला नेहमी वाटतं की एकदातरी युरोपला जाऊन मस्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून यावं. पण हल्लीच काश्मीर, द्रास, लेह-लडाखचे काही फोटो पाहण्यात आले आणि म्हटलं की अरे असं निसर्ग सौंदर्य आपल्या भारतातपण आहे. जुन्या चित्रपटांमध्ये देखील खूप सुंदर काश्मीर पाहायला मिळतं. पण दुर्दैवाने ह्या टेररिस्ट लोकांमुळे आपणच काय परदेशी पर्यटक देखील ह्या आनंदाला मुकतात.
  पंडितजी बद्दल नुसते वाचून हळवे व्हायला झाले. तिकडे काश्मीरला जवान आणि सामान्य नागरिक दोघेही कायम जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असतात. आपण मात्र शेकडो मैल दूर सुरक्षित वातावरणात Air Conditionची हवा घेत बसून असतो. कसतरीचं वाटलं.

  • सिध्दार्थ
   आम्ही जेंव्हा जायचं ठरवलं होतं तेंव्हा तर लोकांनी मला मुर्खातच काढलं होतं. म्हणे हा काय मुर्ख पणा? इतक्या पैशात तर तु चक्क सिंगापोर बघुन येऊ शकतोस.. मग काश्मिर कशाला?? पण एक सांगतो, काश्मिर अगदी युरोपच्या तॊडिस तोड आहे . पुन्हा जेवणाचे पण हाल नाहीत. प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेच पाहिजे , इतकं सुंदर आहे. लडाखला तर डायरेक्ट फ्लाईट आहे. एकदम सेफ आहे. जर बाईक वर जायचं असेल तरिही खुपच मस्त ट्रेक आहे, रोहन ची पोस्ट वाचली की नाही??

   • हो काका, रोहनच्या सगळ्या पोस्ट वाचल्या. माझा एक सहकारी देखील लेह-लडाखला जाऊन आला. मला देखील तेंव्हापासून उत्तर भारत भ्रमणाची तीव्र इच्छा झाली आहे. आधी मला काश्मीर, द्रास ह्या ठिकाणी आपण जाऊ शकतो हे अशक्य वाटायचे. पाहु कधीतरी जाईन हे नक्की. काश्मीर, हिमालय, वाघा बॉर्डर हे सगळे एकदातरी बघायचे आहे. सध्यातरी पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरांचलला Vally Of Flowersला जायचा प्लॅन नक्की आहे. यंदा संधी जरासाठी हुकली.

    • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स गुलमर्गला आहे. तसं खजियारला पण सुंदर फुलं असतात. दोन्ही जागा एकदम बेस्ट..

     • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स गुलमर्गला आहेच पण मी उत्तरांचलच्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बद्दल बोलत होतो. तिथे फक्त १५ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या दरम्यान निरनिराळी फुले फूलतात. त्याच वेळी बद्रि, केदारला देखील भेट देण्याचा देखील प्लॅन आहे. पाहु…

 2. gurudrushti says:

  हा खरच एक गहन विषय आहे… काय केल्याने प्रश्न सुटेल?

  आजोबा भारीच व्यक्ती वाटते… पण तरीही…

  एक उपयुक्त कविता आठवते…

  it’s between you and me god… (mother teresa) त्याच्या आधारे इतके सांगू शकतो की टेरटिस्टना हप्रा जातो म्हणून तिकडे जाणे लोकांनी टाळणे चूक आहे.

  मला तर वाटते की तिथल्या टेररिस्टना पैसे मिळतात म्हणून घाबरण्यापेक्षा सदैव मरणाशी झुंजणाऱ्या सैनिकासाठीही आपण तिथे जायला हरकत नाही…
  त्या सैनिकांच्या डोळ्यात एकदा बघायला हरकत नाही. त्यांनाही आया बहिणी आहेतच… की…

  • शिरिष
   सैनिकांच्या बद्दल तुम्ही म्हणता ते पण खरंय, पण याच सैनिकांवर हल्ला करायला बंदुका, ग्रेनेड्स वगैरे कुणाच्या पैशातुन आणले जातात हा पण प्रश्न आहेच!! त्याच बरोबर पंडीतजींचं म्हणणं पण पटतंय… म्हणाले, जर पैसेच नसले तर करतिल काय म्हणे हे लोकं? सहा महिने तर नुसता बर्फंच असतो, तेंव्हा बनवलेले कपडे ( एम्ब्रॉयडरी ) आणि गालिचे जर कोणी घेतलेच नाही तर पैसा मिळणार तरी कसा?

   • आकाशात पतितं तोयं प्रमाणे चांगले आणि वाईट त्यांच्या योग्य जागेवर पोहोचून आमुलाग्र बदल होईपर्यंत…
    जंग अभी जारी है जंग अभी जारी है …. हे व्यावहारिक सत्य ठरतं…

 3. महेंद्रजी,
  मला वाटतं आज माझा “सेन्टी डे” आहे. आताच रोहनचे लिखान वाचले आणि आता तुमचे. याआधीही मी काही लेख – “याच विष्यांवर” – वाचलेत, मात्र मनाला काहीच भिडले. पैकी आज वाचलेले हे दोन – अगदी वरच्या नंबरवर.

  लेख आवडला – न आवडला, पटले – नाही पटले, म्हणण्याचा प्रश्नच नाही – किमान माझ्यासाठी तरी. बराच वेळ अंतर्मुख होऊन कमेंट लिहितोय, मात्र अजुनही शब्द सुचलेले नाहीत. भावना पोहोचल्या – एवढंच म्हणेन!

 4. rohan says:

  दादा तुझी पोस्ट सुद्धा मनाला भिडली रे.. सर्व-सर्व काही आठवले ना तूला .. इतक्या वर्षांनी सुद्धा किती बारीक-सारीक वर्णन नीट केले आहेस… तेंव्हा मी खुप लहान होतो. ऐकायला यायचे पण समजायचे नाही काही मला. 😦

  दादा मी ठरवले आहे … दरवर्षी अश्या एका ठिकाणी जायचे जिकडे मी सैनिकांशी संवाद साधू शकेन … काश्मिरची परिस्थिति आता बदलते आहे. पण तिकडे आसाम, मणिपुर पेटले आहे. आणि आपण इकडे बसून काय करू शकतोय ??? हलबल व्हायला होतय. कारगील – द्रास – लडाखला गेलेलो तेंव्हा मला काय काय वाटले ते सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाही आहेत… असो. मला जे जमेल ते मी करणार आहे … 🙂

  • कांही गोष्टी अगदी मनावर कोरल्या जातात.. त्यातलीच ही एक. आम्ही सोनमर्ग हुन परत श्रीनगरला निघालो होतो. तेंव्हा आमच्या ड्रायव्हरने आवर्जुन हे मंदिर दाखवलं . तसा मी खुप धार्मीक नाही . पण कधी तरी एखादं मंदिर वगैरे दिसलं तर हात जोडावेसे वाटतात. आणि ते वर्णन इतकं सटीक आहे, कारण मनावर कोरलं गेलंय प्रत्येक दृष्य..

 5. sahajach says:

  गेल्या कितीतरी दिवसातल्या तुमच्या पोस्ट वाचायच्या राहिल्या आहेत…आज एक एक करून वाचू म्हटलं तर पहिलीच पोस्ट मनाच्या अगदी जवळच्या विषयाची…..तुम्ही मनापासून लिहीलेलं मनापर्यंत पोहोचले. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण काश्मिरी पंडीत,तिच्याकडून कायम ऐकत आलेय हे सगळं….जेव्हा ती लोकं काश्मिर सोडून आले तेव्हा कसे चमच्यापासून सगळे नवे घ्यावे लागले,त्यांचे हाल…रहातं सुंदर घर सोडतानाचे दु:ख या सगळ्याची आठवण आली……………
  पोस्ट मनाला भिडणारी आहे.
  बाकी ओढणी डोक्याला बांधून ठेवलेल्या सुपर्णा डोळ्यासमोर आल्या आणि तुमचे म्हणणे पटले (ते एजिंग विषयीचे)…..तर असे रहायला जिम जॉईन करा हा सल्लाही तुम्ही नकळत दिलात…..हे कॉम्प्लिमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवा….

  • तन्वी
   ती खुप एंजॉय करायची जिमिंग, पण मुली मोठ्या झाल्यावर बंद केलं. तरी पण खाण्या वर खुपच कंट्रोल आहे तिचा- जो माझा नाही. कधी वडे किंवा एखादी आवडीची गोष्ट असली तर मी अगदी मनसोक्त खातो, आणि गोड खाण्यात तर माझा कोणिच हात धरु शकत नाही.

 6. Aparna says:

  पाण्यानं भरलेले डोळे तसेच वाहु देता येणं याची सोय आमच्याकडे (स्त्री वर्ग)आहे असं हा लेख वाचताना वाटतंय. भरल्या डोळ्यांनीच लिहितेय…
  माझी आईपण इतक्यात काश्मिरला जाऊन आली आणि तिलाही तिथल्या परिस्थितीबद्द्ल विषण्णता वाटली. हा लेख वाचुन खूप उदास व्हायला होतंय.
  आपण काहीच करु शकत नाही ना? उगाच म्हणतो महासत्ता बनु वगैरे पण किती ग्राउंड वर्क बाकी आहे?? कुठे कुठे ठिगळ लावायची. एकीकडे एक असाच शेतकर्यांच्या जीवनावरचा पिक्चर पाहातेय. सगळीकडे उदासीनतेची छाया दाटुन आल्यासारखी वाटते. लिहेन त्यावर जमलं तर.

 7. bhaanasa says:

  मी यापूर्वी दोन वेळा काश्मिरला गेलेय,पण त्यावेळी कधीही भिती अशी वाटलीच नाही. हे सगळे प्रकार वाढले आणि आता फक्त भितीच साचून राहिलीय नंदनवनात.आमच्या घरचे सगळे जायला निघालेत ऒक्टोबर मध्ये. हे वाचून अजूनच उदास वाटतयं. दोन मुली आहेत ना बरोबर लहान व चार म्हातारे.
  फार फार वाईट वाटतं पण कोणीही हा प्रश्न सोडवू शकत नाही हे अजुनच विषण्ण करते.

  • तसा काही प्रॉब्लेम नाही टुरिस्ट लोकांना. अगदी सेफ आहे. दर पन्नास शंभर फुटावर मिल्ट्रीचे जवान असतात, त्यामुळे काळजी करण्याचे कांहीच कारण नाही. निश्चिंत रहा..

 8. ही पोस्ट मला खुप आवडते, आज चवथ्यांदा वाचली. ५ वर्षापुर्वी आम्ही हनिमूनला गेलो होतो काश्मिरला केसरीबरोबर. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता. ते सगळे आठवते मला वाचताना. मिलिटरीच्या जवानांमुळे खुपच सुरक्षित वाटते तिथे. आमच्या गाडीचे चेकिंग करायला एक जवान आला तो सातार्‍याचा होता, त्याला एवढा आनंद झाला आमच्याशी मराठीतुन बोलताना.
  काश्मिरच्या सृष्टीसौदर्याची तारीफ करावी तेवढी कमीच. मला परत जायची इच्छा आहे, पण आपण इनडायरेक्टली टेररिस्ट फंडींग करु याचे वाईटही वाटते.

  • सोनाली
   हिमाचल पण तेवढंच सुंदर आहे. 🙂 तरी पण काश्मिरची सर काही त्याला येत नाही हे पण तितकंच खरं!!

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s