मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..

आजकाल  लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही.

आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित  नागडं  पोर असतं ते. जास्त  केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन फिरणारी बाई पण अगदी अगतिक दिसणारी, अंगावरचे कपडे फाटलेले .. अशी….. !! .कधीही पहाल तर ते कडेवरचे मुल नेहेमी कुठल्यातरी गुंगीतच असते , किंवा झोपलेलं असते.कितीही थंडी असो, किंवा पाउस असो, ते कडेवरच मुल नेहेमीच नंगु असतं.

लोकलच्या ब्रिजवर पण नेहेमी दिसणारं दृष्य….एक लहानशी मुलगी ५-७ वर्षांची, अंगावर फाटका फ्रॉक घालुन ,  समोर एक अगदी लहानसं बाळ घेउन बसलेली असते. ते बाळ अगदी तास अन तास शांत झोपलेलं असतं. समोर थोडी चिल्लर पडलेली असते. बरेचदा ही मुलगी सतत रडत असते-की रडण्याची ऍक्टींग करित असते. .

तुम्ही सकाळ, दुपार संध्याकाळ ,केंव्हाही पहा,  ही बाळं नेहेमी झोपलेलीच आढळतील . का??   मी आजपर्यंत कुठलंही नॉर्मल असं बाळ तासन तास शांत झोपलेलं पाहिलेलं नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की , बहुतेक  या लहान तान्ह्या मुलांना अफु किंवा कुठलंतरी औषध देऊन झोपवलेल असावं. लहानपणापासून अशी नशेची सवय झालेली ती बाळं मोठी झाल्यावर काय करतील?? विचार करुनच मेंदुचा भुगा होतोय.  असंही वाचण्यात आलं आहे की अशी लहान मुलं भाड्याने पण दिली जातात. मुंबईला काय भाड्याने मिळेल ते सांगता येत नाही. एकदा मुल भाड्याने घेतलं की मग त्या मुलाशी कसं वागायचं हे ते भाड्याने घेणारेच ठरवतात.

माझं ऑफिस पुर्वी फोर्ट ला होतं . तेंव्हा रस्त्यावर (द्वारका हॉटेलच्या शेजारी – काळ घोड्याच्या बाजुच्या गल्लीत) एक बाई आपली गाय घेउन उभी असायची . तिच्या शेजारी गवताचा भारा ठेवलेला असायचा. शेजारीच स्टॉक मार्केट!! त्यामुळे मार्केटमधे जाणारे दलाल लोकं इथे थांबून त्या गाईला नमस्कार करुन , त्या बाईकडून गवत विकत घेउन खाउ घालायचे. हे रोजचं दृष्य बघून मला मोठी गम्मत वाटायची.कारण- गाय पण त्याच बाईची , गवत पण तिचंच.. आणि त्या गाईला खाउ घालण्याचे पैसे मात्र तुमचे…… 🙂 असो.. विषयांतर होतंय..

परवाच रात्री टिव्ही वर मुलींनी एक सिरियल लावलं होतं. सारखा लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकु येत होता. मी होतो आतल्या खोलीत, आणि त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाजाने  अगदी न रहावल्यामुळे  बाहेर आलो.   “पती पत्नी और वो” नावाचं एक नवीन सिरियल सुरु झालंय, द ग्रेट राखी सावंत शो- हे सिरियल टिव्ही वर सुरु होतं.. या सिरियल मधे दोन लोकांनी पती पत्नी म्हणून एकत्र रहायचं, आणि एक मुल सांभाळायचं असा कन्सेप्ट आहे.

या शो मधे पण अशी पाच सहा कपल्स आहेत. त्या पैकी काही रिअल लाइफ कपल्स तर कांही  ऍक्टिंग कपल्स आहेत. प्रत्येकाला एक एक मुल देण्यात आलेलं आहे. मी जेंव्हा पाहिलं तेंव्हा, त्या एपिसोड मधे राखी सावंत ही त्या मुलाला दुध पाजायचा प्रयत्न करित होती. ते मुल नुसतं किचाळत होतं. त्या मुलाचं रडणं ऐकुन मलाच कसं तरी होत होतं. वाटत होतं की त्या मुलाला कसंही करुन शांत करा रे बाबांनो. त्या मुलाची खरी आई मॉनिटरवर पहात होती. तिची अवस्था तर अगदी पहावत नव्हती. शेवटी ती त्या घरात गेली आणि तिने राखीला मुलाला कसं दुध पाजायचं ते शिकवलं..

त्या रस्त्यावरच्या भिकारणीला मुल भाड्याने देणारी ती फुटपाथ वरची बाई, आणि इथे राखी ला   आपलं मुल देणारी ही बाई , या दोघींच्या मानसिक ते मधे मला कुठलाही फरक दिसत नाही. सगळं सारखंच आहे. बदललं आहे तर फक्त, इथे त्या भिकारीण ऐवजी टिव्ही ऍक्ट्रेसेस.मुल भाड्याने देण्याचं कारण पैसा.. बस्स .. सगळा पैशाचा खेळ आहे. मला रहावलं नाही, मी मुलीला म्हंटलं की बदल चॅनल, तर ती तयार नव्हती.. म्हणे पहायचाय शो. अशिच या शो ची टीआरपी वाढते आणि असेच विकृत मनोवृत्तीचे शोज अधिकाधिक दाखवले जातात टिव्ही वर.

एखाद्या मुलाला आपल्या आई पासून दोन तिन महिने दुर ठेवायचं. मला तर त्या आई वडिलांचा पण राग येतोय, की केवळ कांही पैशांसाठी त्यांनी आपली तान्ही बाळं   भाड्याने दिलीत म्हणुन.   त्या लहान बाळाच्या   मानसिकतेचा कोणी विचार केला आहे कां? जे मुल जन्मल्यापासुन आपल्या आईवर पुर्णपणे अवलंबुन असतं , त्याला एक दिवस  तिच्यापासून  तोडुन वेगळं करायचं , आणि अननोन कपलच्या ( ज्या कपलला त्या बाळाबद्दल अजिबात आत्मियता नाही अशा कपल सोबत)  ताब्यात द्यायचं–कितपत योग्य आहे?…… मला तर त्या मुलांच्या खऱ्या पालकांची पण कमाल वाटते.. काय बोलणार??

जग बदलतंय,व्हॅल्युज बदलताहेत.. स्वतःच्या पोटचा गोळा असा पैशासाठी भाड्याने द्यायला नक्कीच दगडाचं काळीज लागत असणार.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , . Bookmark the permalink.

40 Responses to मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..

 1. खरं आहे, व्हॅल्यू बदलतायंत. बालमजूरांचं वय आणखीन कमी झालं. ही खूप खेदाची गोष्ट आहे. पण टी.व्ही. वर ती मिटक्या मारत पाहिली जाते. शो च्या निर्मात्याचं म्हणणं असं की या शोमुळे ह्या सेलिब्रिटी कपल्सना आई-बाप बनण्याचं ट्रेनिंग मिळतंय. आई-बाप बनण्याचं पण ट्रेनिंग?? उद्या क्रॅश कोर्स पण निघेल, कुणी सांगावं? आणखी तारे तोडले निर्मात्याने की मालिकेत वापरलेली मुलं ही उच्चभ्रू घरातील आहेत. 🙂 पण हे त्या मुलांना कळत नाही ना! हे निर्मात्याला कोण सांगणार? आणि उच्चभ्रू घरं म्हणजे असं, मुलं भाड्याने देणं?

  • कांचन
   हा अक्षरशः मुर्ख पणा वाटतो. आज पॅरंटींग चं ट्रेनिंग देताहेत उद्या आई कसं बनायचं ह्याचं पण ट्रेनिंग द्यायला कमी करणार नाहित.आणि हो.. ती मुलं उच्च भ्रु घरातिल नाहित तर कनिष्ठ मध्यम वर्गिय घरातिल असावित असा माझा अंदाज आहे. कारण थोड्या फार पैशांसाठी उच्च वर्गिय लोकं आपली मुलं देणार नाहित अशी भाड्याने..

 2. अगदी पु. लं. च्या रावसाहेबी भाषेत बोलायचं झालं तर (बायका) मुलांना पडद्यावर मारायचं लोकांना रडवायचं आणि पैसै कमवायचे…

 3. आरती says:

  मी सुद्धा परवा तो शो बघत होते…अगदी आश्चर्य वाटलं…त्या नटव्या, थिल्लर मुली नी त्यांचे बोगस नवरे…”आय हेट हेट हेट हेट कुकिंग…”असे म्हणत मोठ्या मिनतवारीने मॅगी करणार्‍या स्त्रिया, लहानशी गोंडस बाळे, त्यांचे आई वडिल…त्यांच्या संगोपनाचे दिलेले ’मॅन्युअल’…..अरे राम! कुणाची ही कल्पना? आणि त्या जोडप्यांची उडालेली त्रेधा मात्र पहाण्या सारखीच होती.. एका जणांना तर जुळे दिले आहेत…फ़ॅमिली सपोर्ट ने आपली मुलं मोठी झाली त्यामुळे इतकं जाणवलं नाही पण यांच्या सारख्या वरवरच्या नटरंगी आयुष्यात मात्र कठीण आहे!

  • आरती
   ह्या लोकांच्या दृष्टीने हा सगळा एक खेळंच आहे. अजिबात भावनिक जवळीक नाही या लोकांची !त्या मुलांशी तुम्ही त्या लोकांना त्या मुलांना हाताळतांना पाहिलंत कां? इतक्या कॅज्युअली कुठली तरी आई आपल्या मुलाला घेईल कां? अशक्य!!

 4. हां, परवाच्या एपिसोड्मध्ये मी ही बगितलं. ती बाई – राखीच्या बाळाची आई – आपल्या मुलाचं रडणं ऐकुन स्वत: रडत होती की अ‍ॅक्टींग करत होती तेच समजत नव्हतं. अशा वेळी फार चिडायला होतं. एक तर तुम्ही निर्लज्जपणाचा कळस करुन टी.व्ही.वर आपलं मुल भाडयानं देता…. आणि मग रडुन दाखवता. कुणी त्या लहानांची मानसिकता जाणुन घ्यायलाच मागत नाही.. टी.व्ही. वाले टी.आर.पी. साठी, पॅरेंटस् पैसा – प्रसिद्धीसाठी तर त्यातले कलाकार अ‍ॅक्टींग साठी त्या बाळांना कसंही तुबलताहेत.

  त्यात ती बाई – राखी मॅडम – बाळाला पायावर पालथं घालुन थोपटत होती.. बाळांना झोपवण्याचा हा प्रकार नविनच बघायला मिळाला! मला वाटतं असाच प्रकार तिच्या स्वतःवर झाला असावा, डोक्यावर पडली असावी, त्यामुळंच वरचा मजला रिकामा राहिलाय!

  एक तर हा कार्यक्रमच बंद व्हायला पाहिजे नाही तर त्या पॅरेंट्स आणि अ‍ॅक्टर्स वरती केस करायला हवी!

  • दिपक
   मला तरी वाटत नाही की ती ऍक्टिंग करित असावी म्हणुन. कितिही झालं तरी आईचं मन आहे ते. हळहळणारंच.. अर्थात प्रत्येक स्त्री साठी हे खरं नाही. कालच एक बातमी वाचली मुंबई मिररला. एका लग्न झालेल्या बाईने आपलं अनौरस मुल उकिरड्यावर फेकुन दिलं , तिचे म्हणे तिच्या नवऱ्याशी अजिबात संबंध नव्हते. तिने घरच्या सगळ्यांना सांगितलं होतं की पोटाचा विकार आहे म्हणुन. आता काय म्हणणार? ती बातमी वाचुन या जगातिल चांगुलपणावरचा विश्वास उडतो की काय असं वाटतंय.
   कार्यक्रम बंद झाला तर मलाही आनंदच होईल. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी.

 5. rohan chaudhari says:

  “पती पत्नी और वो” .. तो तर एक मुर्खपणा आहे. पण भिक मागायची जागा भाड्याने देण्याबद्दल एक किस्सा सांगतो. कुर्ला स्टेशनबाहेर बेस्ट स्टैंड जवळ एक भिकारीण असायची. आम्ही मुंबई युनिव्हरसिटीला जायचो तेंव्हा कधी-कधी खायला द्यायचो. पैसे देण्याच्या मी विरुद्ध आहे. कारण ते त्यांना न मिळता त्यांच्या मालकाला मिळतात.

  एके दिवशी ती तिकडे न दिसल्याने आम्ही बाजुच्या एका फेरीवाल्याला विचारले तर तो म्हणाला. ती भिक मागायची जागा विकून गेली दुसरीकडे. आता उदया पासून इकडे कोणीतरी दूसरा बसेल. :O मी ऐकताच बसलो. पण हे असे आहे. दिवसाला किमान ६०-७० रुपये आणू न दिले तर त्यांना रहायला खायला दिले जाते. नाहीतर उपाशी रहावे लागते.

  • कुर्ला ब्रिज वर ठाणे साईडचा (इस्ट साईडला बाहेर निघणारा) तिथे एक भिकारी असतो, शुक्रवारी नमाजी टोपी, नंतर गुरुवारी साईबाबा सारखा साफा.. जसे दिवस तसा वेश.. भिक मिळण्याची गॅरंटी.. १००%!!
   एक सिनेमा आला होता, सिग्नल नावाचा. त्यामधे हाच विषय होता..
   भिक मागायची जाग विकणे?? मला फारसं आश्चर्य वाटलं नाही.. कारण मुंबईमधे काहिही विकलं जातं… !

 6. sahajach says:

  मुळात या कार्यक्रमाची कल्पना कोणा हुशाराची आहे राम जाणे…..प्रेग्नंसी काय असते हे या ऊडाणटप्पू बायांना अश्या शोमधून समजणार आहे का? त्यांना दिलेल्या त्या बेलीजची त्यांनी केलेली नाटकं पहाता त्यांची नाही पण पुढे त्यांना जर चुकुन मुलं झाली तर त्या बिचाऱ्यांची दया आली……राखी सावंत या प्रकाराबद्दल तर काय बोलावे????? या बायकांचे किचनमधले कौशल्य वाखाणण्याजोगे आहे!!!!!मोठ्यांची नाटकं होताहेत पण त्या अजाण मुलांचे हाल होताहेत….आई वडील मुर्ख असले की मुलांची अशी शोभा होते. उद्या या मुलांनी आपल्या आई वडिलांना भाड्याने द्यावे….कारण जेव्हा असा ’रिऍलिटी’ शो येउ शकतो तर उद्या राखी सावंत म्हाताऱ्यांना कसे सांभाळणार हाही प्रश्न आम्हा सामान्यांना पडू शकतो नाही का?????तथ्य काय तुम्ही मांडलेल्या दोन्ही प्रसंगातल्या बायांना मुलं होतात पण त्या ’आई’ होत नाहीत……
  काल नवे बिग बॉस सुरु झाले आहे…त्यात राखी ची आई आलीये….यांचा हा खानदानी बिजिनेस झालाय आता!!!!
  हे कार्यक्रम पहाणारे आपण मुर्ख दुसरं काय!!!!

  • “मोठ्यांची नाटकं होताहेत पण त्या अजाण मुलांचे हाल होताहेत”
   अगदी सहमत.
   आणि ते राखी म्हाताऱ्यांना कसं सांभाळेल यावर एक मस्त विनोदी लेख होऊ शकतो.. तुम्हिच लिहा..

 7. सचिन says:

  सामाजिक सस्था कोठे आहेत ?
  सरकार ह्या अश्या मालिकांना परवा॑नगी कशी देतेय ?
  यासाठी काहि नियम नाहियेत काय ?

  • सचिन
   मला वाटतं अजुन तरी आपल्या कडे सेन्सॉर नाही टिव्ही वरच्या कार्यक्रमासाठी. इथे प्रोड्युसर्स नीच ठ्ररवायचंय किती आणि काय दाखवायचं ते.
   सामाजिक संस्था काय करणार या मधे?? लोकांनीच न पाहिलं तर शो आपोआप बंद होईल. पण तेच होत नाही.

 8. mugdhamani says:

  हा शो भयंकर आहे. ती एवढीशी मुलं या अनोळखी लोकांच्या हाती देण्याचे धाडस करणारे त्यांचे आईबाप धन्य आहेत.
  big boss झालं, खतरोंके खिलाडी झालं, राखीचं लग्न झालं, पती पत्नी और वो, पांचवी पास से तेज झालं, Wife Swap राहिलं आहे तेव्हा ते ही एकदाचं करुन टाका म्हणावं,

  • स्नेहल
   ते पण होणं सहज शक्य आहे. किती आणि काय दाखवायचं याचा ताळतंत्रच सोडलाय चॅनल्स नी.
   बिना मेकपची राखी.. 😀 😛

 9. mugdhamani says:

  राखी नुसती बिना मेक अप समोर आली तरी भले भले रडायला लागतील…तर तिथे त्या छोट्या बाळाची काय बिशाद LOL…

  • sahajach says:

   मा्नलं तुला मुग्धा…..राखी बिना मेक अप येते बघ समोर या शोमधे…भयाण ढोंगी बाई आहे….दया येते त्या ईलेशची….

 10. anuja says:

  महेंद्रजी,
  सचिन ला हि मागे ठेवलेत,एकापेक्षा एक भन्नाट लेख लिहिता कि प्रतिक्रिया मांडण्याचा मोह होतो,मान लिया आपको बॉस, मी मुलाला घेऊन खेळायला जाते त्या मुले टीवी चा फार संबध येत नाही.जो काही विदिओ पाहिला तो भयंकर आहे
  काय बोलणार सुन्न झाले.लोकसत्तेत लेख द्या.लिखाणाची शक्ती.प्रेरणा जबरजस्त आहे.हा ब्लॉग hats of aahe .
  निश्चित विचार करा
  अनुजा

  • अनुजा
   तुम्ही टिव्ही पहात नाही , म्हणजे या मानसिक छळापासुन तुमची सुटका झालेली आहे. सिलिब्रेट करा.. 🙂 खरंच हो.. हे असले टिव्ही सिरियल्स पहाणं म्हणजे एक प्रकारचे मानसिक छळ आहे.
   तुमच्या एनकरेजिंग कॉमेंट करता आभार.
   पेपर मधे वगैरे लिहिणं .. कसं शक्य आहे हो?

 11. Abhijit says:

  हा एक अत्यंत हिडीस शो आहे. BBC च्या Baby Borrowers ह्या शो वर तो बेतलेला असून लोकांना पालकत्वाचे धडे देण्याच्या “उद्दात्त” हेतूने तो सुरु करण्यात आला आहे असे समजते.

  पैशासाठी मुलांना रडवणे आणि ते बघणे एवढ्या खालच्या ठरला आपली मानसिकता गेली आहे का ? कधी कधी असे वाटते की पैशासाठी मुलांना विकणाऱ्या पालकांपेक्षा camera समोर तरी मुलांवर खोटे खोटे प्रेम करणारे celebrity पालक परवडले.

  • अभिजीत
   धन्यवाद.. तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल. आजपर्यंत हे माहितीच नव्हतं की हा शो कशावरुन कॉपी केलाय ते. आपल्या कडे प्रोड्युसर -डायरेक्टर्स लोकांना जरा कमीच ’समज’ आहे. त्यामुळे कुठला तरी इंग्रजी शोची कॉपी केल्याशिवाय त्यांना कांहिच करता येत नाही.

 12. anuja च्या मताला अनुमोदन. महेंद्रजी विचार करा.

 13. Rajeev says:

  “भाड्या” ची मुले…..
  ही शीवी उगाच आली नाही…..
  स्वामी रत्नानंद म्हणतात…..
  “दीली मुले “भाड्या” ने..कपाट भरे साड्याने”

  • स्वामी रत्नानंद
   तु आता आर्किटेक्टचा धंदा सोडुन हेच काम सुरु कर.
   खुप स्पॉंटेनिअस रिप्लाइज असतात तुझे.. मस्त एकदम..
   लहानपणापासुन तुला पहातोय, तुझा वात्रटपणा वयाबरोबर प्रपोर्शनेटली वाढतोय.. 🙂

 14. laxmi says:

  पैश्यासाठी “काय वाट्टेल ते….” करायला तयार!!!
  काय बोलणार??

 15. Rajeev says:

  टी.व्ही. वर आपण दीसावे या साठी पुर्वी अंगात “कला”आणी डोक्यात “अकला” असाव्या लागायच्या …
  आता ह्या कार्यक्रमात अंगात आणी डोक्यात काहीच लागत नाही. (कंबरेचे डोक्याला गूंडाळले की बस्स !!!)
  ..अरे राज्या… पोटे भरली की पोटावर चा आणी खालचा तमाशा सुरू… बघणारे आहेतच की !!!.
  वारंगना तरी पोटा साठी ना-ईलाजा ने कूकर्म करतात…. पण ह्यांना काय म्हणाय चे ????
  ही मुले मोठेपणी त्यांचे आई-बाप भड्याने काय वीकत ही देतील…………………

  • बरोब्बर आहे अगदी . पेपरला चक्क जाहिरात देउन विकतिल आपल्या आई बापांना. आणि वर हे पण म्हणतिल नां-
   की तुम्ही आम्हाला दिलं होतं ना भाड्याने , म्हणुन तुम्हाला आम्ही विकणार.. काय दिवस आले आहेत…!

 16. Rajeev says:

  च्यानल फ़िफ़टी फ़ोर
  लावलय डोर टू डोर…
  हौस औफ़ भाड्या………………….
  “भाड्या”चे घर,
  “भाड्या”चे दार
  “भाड्या”ची मुले .रडतात फ़ार…..

  अरे बाबा ती मुले बिना मेकप च्या राखी ला बघुन रडतात….
  ….भीती वाटतेरे तान्हुल्या ना……….
  मला पुतना मावशीची आठ्वण झाली

  • स्वामी राजरत्न.
   हा हा हा… मस्त आहे.
   अरे पण त्या राखी ने मेकप केला की मग ती मुलं अजुन घाबरतात नां … मेकप करुन ती अजुनच भयानक दिसते , म्हणुन.

 17. ravindra says:

  आम्ही त्या कार्यक्रमाचा एक हि इपिसोड पाहिलेला नाही. पण जाहिरात दाखवायचे त्यावरून भाड्याचं मुल आणल असाव हे समजल होत. या सीरिअल वर मी सुद्धा पोस्त लिहायला घेतली होती पण पूर्ण करण्यायोग्य वाटलीच नाही. जग फक्त पैस्याभोवती फिरत आहे. प्रत्येकाला पैसा हवा आहे. कोणत्याही मार्गाने का असेना. कीव येते अस्यांच्या बुद्धिमत्तेची.

  • रविंद्र
   मी जो एपिसोड म्हणतोय तो जर तुम्ही पाहिला असता तर नक्किच पोस्ट पुर्ण केली असती. खुप भयंकर प्रकार आहे हा. एकदा पाहिल्या शिवाय सिव्हिअरिटी लक्षात येत नाही.
   हे असे शो बंद पडले पाहिजे शक्य तितक्या लवकर…

 18. Rajeev says:

  अरे परवा एका लेखकाचे आत्मनीवेदन वाचण्यात आले.
  त्याची आई आपले दूध पिळुन वाटीत काढून ठेउन, मिल मधे कामावर जात होती..
  आजी ते त्याला पाजायची
  लेकरानी त्रास देउ नाही म्हणुन त्याला अफ़ु द्यायची……
  ही गोश्ट अशीच आहे……………………………………………………………………….
  फ़रक फ़क्त……..
  लेखकाची आई मिल मधे कामा वर जाय ची….but..but but
  .ह्या “माद्या” आणी त्त्यांना सामील त्यांचे “नर”

  हाच तो “आई” आणी “दाई”त ला फ़रक

 19. आनंद says:

  टीवी ला सेन्सरबोर्ड नाही ? आश्चर्याची गोष्ट आहे… फशन टीवी ban केल्या गेला तेव्हा मला वाटले होते कि सेन्सर अस्तित्वात आहे…
  इथे बेगमपेट ला देखील एक स्त्री आपल्या ३-४ वर्षाच्या मुलीस भिक मागावयास लावते … आणि स्वतः तिची आई असल्याची ओळख दाखवत नाही….ती बाहेर देवाचा फोटो घेवून पैसे मागते….पण संपूर्ण लक्ष आत असते, त्या मुलीने कुणाला जास्त आग्रह (भिकेचा) नाही केला तर तिला ती रागवताना मी पाहिलेले आहे….

  देवाचा फोटो दाखवून भिक मागणार्याचा मला अत्यंत राग येतो….

  टीवी शो बद्दल सगळ्या मतांशी सहमत…..

  राजीव 🙂 स्वामी रत्नानंद ची रत्ने आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल अत्यंत आभारी

  • फॅशन टिव्ही हा बॅन केला होता सरकारी प्रेशर मुळे. सेन्सॉर मुळे नाही.
   देवाचा फोटो दाखवुन भिक मागणे, किंवा साधूचे कपडे घालुन भिक मागने दोन्ही सारखंच.पुर्वी एक लेख लिहिलाय कालभैरवाय नमः म्हणुन.

 20. bhaanasa says:

  राखीचे स्वयंवर या भिकार कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तो आवडो का न आवडो पण पाहत राहून इतकी प्रसिध्दी मिळवून दिली आता ते चेकाळलेत. राखी या रसायनाबद्दल काहीही न बोलणेच बरे. मेकअप विनामेक अप ही बया तितकीच भयावह दिसणार कारण दिसणे हे फक्त बाह्यस्वरूपावर अवलंबून असले तरी चेहरा जे भाव दर्शवतो ते अंतरंगाचे असतात. महेंद्र, सिग्नलवर किंवा कुठेही सुपात मेल्यासारखे झोपलेले बाळ ठेवून भिक मागणे व अशा शोजना आपली बाळे भाड्याने देणे यांच्यात कुठलाही फरक मलातरी दिसत नाही. वर आपल्या बाळाचे हाल पाहून रडण्याची निव्वळ नाटके हाही शो चाच एक भाग वाटतो. त्यासाठीही पैसे घेतले असतील. बाकी स्वयंपाकाचा आनंद पाहून हसावे का रडावे. बाहेरच्या देशातील टिव्हीशोजची इतकी भ्रष्ट नक्कल करून जी रिएलीटी दाखवत आहेत ती मात्र कल्पतातीत आहे.

  • भाग्यश्री
   ह्या बाईला बरोबर समजलंय की कसं लाइम लाईट्मधे रहायचं ते.त्या साठी ती काहिही करेल . आउट ऑफ माइंड आउट ऑफ साईट हे तिला अगदी चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी ती बया काहिही करण्यास तयार असते. तिचं असं आहे.. मला पहा अन फुलं वाहा…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s