हिमालयातलं कॅंपिंग..

पुण्याच्या चार वर्षांच्या वास्तव्यात जवळपासचे सगळे गड,किल्ले पालथे घातले. दर सुटीला कुठे ना कुठे तरी ट्रेक असायचाच. एक गृप होता , त्यांच्या सोबत मी ट्रेकिंगला जायचो.

या ट्रेकर्सचं एक बरं असतं, कोणीही ट्रेकिंगला तुमच्या बरोबर  येतो म्हंटलं, की यांना खुप आनंद होतो, आणि ते नवीन र्माणसाला पण आपल्या मधे पुर्ण सामावून घेतात. त्याला असं अजिबात वाटत नाही , की आपण ह्या गृप मधे नवीन आहोत.
पुण्याला असतांना जे कांही ट्रेकिंग केलं ते फक्त ‘डे ट्रेक्स’ असायचे. म्हणजे भल्या पहाटे ५ वाजता निघायचं आणि रात्री पर्यंत परत यायचं. रात्रीचा मुक्काम असलेला ट्रेक कधीच केला नव्हता.

सगळे गड किल्ले हे दोन तिन तासाच्या अंतरावर असल्यामुळे कदाचित असेल तसं. कॅंपिंग ला जाण्याची खूप इच्छा होती, सारखं वाटायचं की कॅंपिंगला कुठे तरी जाउन मस्त पैकी पॉट लक ट्राय करावं.. पण आमच्या ट्रेक्स मधे बाहेर ट्रेकला गेल्यावर बाहेरच कुठेतरी जेवायची सोय करायचॊ.स्वतः कधीच स्वयंपाक वगैरे केला नाही.त्यामुळे ती एक इच्छा राहुन गेली.

माझी आप्पांच्या बरोबर रायगड पहाण्याची खूप इच्छा होती. मी एक दोन वेळेस तळेगांवला जाउन आप्पांना भेटून आलोर्होतो. त्यांनी पण हो… नक्की नेईन रे तुला म्हणून आश्वासन दिलं होतं. पण ……म्हणतात ना , मॅन प्रपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस’…. माझी ट्रान्सफर सर्व्हिस डिपार्ट्मेंटला झाल्यामुळे टुरींग सुरु झालं होतं. सलग, दिड -दोन महिने टुर असायचा.

खरा आउटींग चा अनुभव घेतला तो हिमालयामधे. एकदा माझं पोस्टींग कलकत्त्याला असतांना दार्जिलिंग डुवाट्झ टी गार्डन्स मधे असतांना मला एका चहाच्या मळ्यात कामा साठी जावं लागलं.काम सुरु केलं आणि काही ऑ पार्ट्स हवे म्हणून काम बंद झालं. सामान कलकतयाहुन यायचं म्हणून दोन दिवस वेळ होता. चहाच्या मळ्यात काही काम नसतं . जर काम नसेल तर तुम्ही नक्कीच कंटाळून जाल. करमणुकीचं एकच साधन, ते म्हणजे पुस्तकं.. बस, नुसती पुस्तकं वाचून वेळ घालवायचा.

बरं वाचन तरी किती करणार? कंटाळा यायचा मग..  त्या गार्डनचा मॅनेजर , त्याला खूप आवड होती कॅंपिंगची. म्हणाला दो दिन यहां बैठके क्या करेंगे??  चलो कॅंपिंग चलते है.  चहाच्या मळ्यात जो मॅनेजर असतो, त्याला सगळे लोकं   ’बडा साब’  म्हणायचे.. सपोझ्ड टु बी अ किंग ऑफ दट एरिया, तो म्हणेल ती पुर्व दिशा. या मॅनेजर्सची फॅमिली बहुतेक दार्जिलिंग ला मुलांच्या सोबत असायची, त्या मुळे हा सडा फटींग एकटाच रहायचा. तेंव्हा नक्षलवादी इतके ऍक्टीव्ह नव्हते, त्यामुळे परिस्थिती ्खूपच वेगळी होती.

जास्त लिहित नाही पण, ह्या गार्डनच्या मॅनेजर च्या घरच्या मेड सर्व्हंट्स दर सहा महिन्याने बदलल्या जायच्या.अगदी गरीब असलेल्या त्या प्लॅंटर्स इथे येउन काम करायला खूप खूष असायच्या, कारण बडा साब च्या बंगल्यावर काम केलं, की एक्स्ट्रा बेनिफिट खुप मिळायचे. जाउ दे, विषयांतर खूपच जास्त होतंय..

दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता निघायचं ठरलं. सकाळी ५ वाजत पुर्ण उजाडलेलं होत. मस्त थंडगार वातावरण होतं. अंगात स्वेटर, जर्किन, घालुन तयार झालो होतो. ट्रेकिंग गिअर्स सगळे त्या (मॅनेजरनेच) अग्रवालने घेतले होते. जोंगा जिप – सहा सिलेंडरचं इंजीन असलेली ४बाय ४ ची जीप, वर रात्री कॅंप करायचं म्हणून फ्लड लाइट्स लावलेले, मागच्या भागात एक्स्ट्रॉ डिझल कॅन, स्लिपिंग बॅग्ज, स्टोव्ह, एक मोठं भांडं, फ्राय पॅन, एक लहानशी पिशवी , ज्या मधे खाण्याच्या वस्तु आणि मसाले, तेल वगैरे,एक वॉटर बॅग, एका कोल्ड केस मधे चिकन चे पिसेस (स्टिम्ड )ठेवलेले होते.- फिशिंग करण्याचा काटा,त्याला काय म्हणतात ते माहिती नाही, आणि बराच संसार होता.. मला हे सगळं पाहून गम्मतंच वाटली. मी त्याला म्हंटलं पण, अरे आपण कॅम्पिंगला जाणार की तिथे जेवायला जाणार?? नुसता हसला तो.. आमच्याच गाडी मधे अजुन तिन मित्र होते त्याचे.

आमचा पांच जणांचा गृप निघाला. वळणा वळणाच्या रस्त्याने शेवटी आम्ही इच्छित ठिकाणी पोहोचलो. अगदी व्हर्जिन प्लेस होती ती. अग्रवालला या भागाची चांगली माहिती होती, आणि याच जागी तो आधी पण कॅंपिंगला आलेला होता. समोरच नदीचं खळखळतं पाणी वहात होतं. एका बाजुला जरा खोल पाणी असल्यामुळे जरा थांबून वहात होतं पाणी. त्या पाण्यामधे हात घातला, आणि एकदम बाहेर ओढून घेतला.. बर्फाचं वितळून झालेलं पाणी खुप गार होतं. मागे मागे डोंगर — छे.. हिमालयाला डॊंगर म्हणण्याचा करंटे पणा कसा करु शकतो मी? मागे हिमालय, समोरुन नदीचं पाणी खालच्या अंगाला वहात जाणारं.सुंदर निसर्ग दृष्य होतं.

ड्रायव्हरने वाळलेल्या लाकडं जमा करणं सुरु केलं होतं. आम्ही पण तेच काम करु लागलॊ. पुरेसा लाकुड फाटा जमा झाला होता. टेंट्स आणलेले नव्हते. म्हणजे रात्री ऊघड्यावरच झोपावं लागणार अग्रवाल म्हणतो, रात्री इथे वाइल्ड लाइफ पण बघायला मिळेल. हे ऐकलं, आणि मनातुन घाबरलोच होतो, त्याला प्रश्नार्थक मुद्रेने म्हंटलं…… वाइल्ड लाइफ?? त्यावर तो सहज पणे म्हणाला, कोल्हे, लांडगे, एखादं अस्वल, जंगली हत्ती वगैरे.. सहज म्हणून त्याने शेजारीच पडलेली लिद दाखवली, म्हणाला, ही लिद दिसते आहे ना ती लांडग्यांची आहे – माझा चेहेरा पाहिला, आणि तो अगदी मनसोक्त ह्सला. अरे साहब, कुच नही होगा.. चिंता मत करो, आणि त्याने आपलं रिव्हॉल्व्हर दाखवलं.. म्हणाला, आज तक इतने बार कॅंपिंग किया, लेकिन इसका वापर सिर्फ रॅबिट मारनेके लिये ही किया है…

दुपारचे १२ वाजत आले होते. भुका लागल्या होत्या. अग्रवाल ने अंडी काढली, म्हणाला रोस्ट अंडा खिलायेगा आपको.. रोस्ट अंडा??? त्याने समोरचा चिखल जमा केला. जरा घट्टंसरंच होता तो. अंडं त्या चिखलाच्या गोळ्यामधे गुंडाळले, आणि तो गोळा अल्युमिनियम फॉइल मधे गुंडाळुन समोरच्या कॅम्प फायर मधे टाकला. म्हणाला, हिमालय का मिट्टी का असर है की ये अंडा जलता नहीं..थोड्यावेळाने, ती अंडी बाहेर काढुन त्यावरचं मातिचं कव्हर जे आत पक्कं झालेलं होतं ते तोड्लं.. आणि बॉस सांगतो.. असं अंडं मी कधी आयुष्यात खाल्लेलं नव्ह्तं..

अग्रवालच्या एक्पिरियन्स कॅम्पर असल्याच्या गोष्टी वर या घटनेने शिक्का मोर्तब केलं. जवळपास कुठेही जाउन या पण फार दुर जाउ नका..  त्याचे दोन मित्र पाण्यामधे गळ टाकुन बसले होते फिश पकडायला. सोबतच एक लांबसर जाळी पण होती. चौकोनी जाळी तिला एक लांब दांडा. म्हणाला जर काट्याने मासे पकडता आले नाही तर ही जाळी धरुन बसायचं, प्रवाहात येणारे मासे सहजतेने पकडता येतात या युक्तीने.

जेवणाची तयारी करायची. आग पेटलेलीच होती. असलेल्या गोष्टी म्हणजे चिकन वगैरे सगळं संपवलं. चिकन पण त्याने आधी अल्युमिनियम फॉइल मधे पक्कं गुंडाळून मग वर चिखलाचा गोळा  लाउन समोरच्या कॅंप फायर मधे टाकलं. ब्रेड होतीच सोबत आणलेली. जेवण होई पर्यंत बराच वेळ गेला. आता मात्र झोप येत होती. इथे दुपारी ४, ४-३० वाजताच अंधार पडणं सुरु होत्तं .

आम्ही फिरायला निघालॊ,बराच वेळ भटकून परत आलो. अग्रवालने समोरच्या उतारावर जाउन सशाची बिळं तपासु लागला, म्हणाला, इथे ससे खुप मिळतात. रात्री करता बघतो एखादा. अग्रवाल आणि एक मित्र ससे पहायला गेले, आम्ही तिथेच त्या नदीशेजारी चंदेरी स्वच्छ पाण्याकडे पहात बसलो होतो.

अंधार पडणं सुरु झालं होतं. फक्त नदीचा खळखळणारा आवाज.. आणि रात किडे, पक्षी यांचे आवाज.  हॉरर सिरियल प्रमाणे वातावरण निर्मिती झालेली होती. थोड्याच वेळात अग्रवाल परत आला, म्हणाला, ससा मिळाला नाही.. तशी फारशी भुक नव्हतीच, पण समोरच्या आगी मधले थोडे निखारे आणि लाकडं बाजुला करुन  तिन दगड माडुन त्यात तांदुळ, चिकन, डाळ, आणि मसाले घालुन शिजत ठेवलं.

अग्रवालची रमची बाटली निघाली होती बाहेर.. थंडी मुळे थोडं जरी दुर झालं त्या आगी पासुन तर एकदम हुडहुडी भरायची.  पकडलेले मासे पण होते. माश्यांची डॊकी कापुन टाकली आणि मग त्यांना तसंच ग्रिल वर ( ग्रिल म्हणजे चक्क एक ८ एम एम रॉड्स ची जाळी होती) वर भाजायला ठेवले. त्या फिश मधुन थोडं थोडं पाणी खाली निखाऱ्यावर पडुन चर्र असा आवाज येत होता. फिश पलटवायला दोन काड्या घेउन त्यांनीच पलटवल्या फिश.. अर्धवट झालेली फिश , आणि सोबत आणलेले फर्साण, यांच्या बरोबर रम सुरु झाली. किती वेळ आम्ही बसलो होतो काय माहिती. वेळ थांबल्या सारखी झालेली होती.  अग्रवाल म्हणे, उद्या सकाळी आपण ट्रेक ला जाउ या. समोरच एक मंदिर दिसत होतं.. खुप उंचावर.. म्हणे तिथे जाउ या उद्या सकाळी..

मी जरी या सगळ्यांच्या बरोबर बसलो होतो, तरी पण माझी नजर मात्र एखादं हिंस्त्र श्वापद येतं का या विचारानेच इकडे तिकडे शोध घेत होतं.. समोरच्या अंधारात डोळे वगैरे काही चकाकतांना दिसतात कां? म्हणुन मी डोळे फाडुन बघत होतो. चांगले तिन -चार लार्ज झाल्यावर मात्र जेवणं आटोपली आणि स्लिपिंग बॅग मधे शिरलो. त्या रेक्झिनच्या स्लिपिंग बॅगचा थंडगार स्पर्श अगदी हाडांच्या पर्यंत शिरला. अंग शहारलं…बराच वेळ वरचे तारे मोजत बसलो , आणि नंतर कधी झोप लागली ते समजलंच नाही.

हा एक विचित्र  हो.. विचित्रंच अनुभव वाटत होता. थोडी भिती, थोडी  हुरहुर.. थोडी गम्मत, मजा सगळ्यांचं मिश्रण होऊन एक्वेगळं फिलिंग येत होतं. सकाळी उन डोक्यावर आलं होतं -ऊठल्यावर सहज घड्याळात पाहिलं तर फक्त ७ वाजले होते. रम मुळे सकाळी अजिबात हॅंग ओव्हर नव्हता.

ब्रश केला, प्यायचं पाणी जे सोबत आणलं होतं ते संपलं होतं. मी नदिमधलं पाणी पिणार तेवढ्या  अग्रवालने मला थांबवले. समोरच्या नदी जवळ गेला आणि लाकडाच्या तुकड्याने रेतिमधे खड्डा करु लागला. २ -३ इंच खोल केल्यावरच पाणि लागलं, पण तरिही त्याने खड्डा चांगला ८-१० इंच खोल आणि तेवढाच रुंद केला. गढूळ पाणी जमा झालं होतं. एका प्लास्टिक च्या लहान ग्लासने ते पाणि काढुन टाकलं, आणि थोड्याच वेळात स्वच्छ पाणि दिसायला लागलं . ते स्वच्छ पाणी वॉटर बॅग मधे जमा केलं.त्यामधे एक क्लोरिनची गोळी घातली आणि मला म्हणाला, अब ये ठिक है….!! अब इसे पी सकते है..!!

तसा दुसरा दिवस फारसा इव्हेंटफुल नव्हता. आता समोरचं निसर्ग सौंदर्य पहाण्याची पण डॊळ्यांना सवय झालेली होती. जे कांही ’वाह’ तोंडातून निघायचं ते निघून गेलं होतं. समोरच्या मंदीरामधे जायला निघालो. अग्रवालने समोरच्या नदीतून पाणी आणलं आणि आग विझवली. आणि आम्ही दर्शनाला निघालो. सोबत वन्य प्राणी म्हणजे  केवळ माकडं दिसली. इतर कुठलाही प्राणी पहायला मिळाला नाही. अग्रवाल म्हणे , नशिबात नसेल तुमच्या तरच दिसेल .. नाहितर  काहीच चान्स नाही… आमचं नशीब खराब होतं.

दर्शन घेउन पुन्हा बेस कॅम्पला आलो. दुपारचं जेवण बनवलं, ससा पण मिळाला नाही अग्रवालला.. मग पुन्हा मासे आणि भात, सोबत उरलेली ब्रेड होतिच.. ती संपवुन परत निघालो गार्डनला.जातांना एका धाब्यावर थांबुन व्यवस्थित जेवलो आणि मग लक्षात आलं , की खरंच भुक लागली आहे आपल्याला खुप म्हणून..

तर असा होता पहिला आउटिंगचा अनुभव. हा अनुभव आहे मी  सर्व्हिस इंजिनिअर असतांनाचा, म्हणजे २२ वर्षांपुर्वीचा…  :)असा अनुभव पुन्हा कधी घेता आला नाही, पण थॅंक्स टु अग्रवाल फॉर प्रोव्हायडिंग सच नाइस एक्स्पिरिअन्स… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

17 Responses to हिमालयातलं कॅंपिंग..

 1. Rajeev says:

  व्यक्तीगत रीत्या घेउ नको पण माझा एक अनुभव आहे.
  काही लोक वारूणी आहे तीथे जाताल..आणी काही लोक जीथे जातात तीथे वारूणी अस्तेच !!!!!!
  आम्ही डोंगरावर फ़ीरायला जातो “चढतांना” ७ जण स्वत:च्या पायावर असतो..नंतर वापस उतरतांना आमचे एक मित्रवर्य आम्हाला भोई बनवतात, दूसरे “उतरे” पर्यंत उतरत नाहीत, तीसरे जंगली जनावरांच्या ( ग्राम केसरींच्या) मागेपळत असतात.घळीत असलेल्य़ा ओह्ळात मत्सयावतारा ऐवजी मंडूकावतारच जाळ्यात येतात.

  एकेकाचे नशीब !!!!

  • अरे मला तो अग्रवाल म्हणाला होता नक्की पकडतो ससा. त्याने दोरी पण बांधली होती, उतारावर जमिनिपासुन ४-५ इंच उंचिवर दोन झाडांच्या मधे. नंतर वरच्या भागात जाउन एक दोन हवाई फायर पण केले होते. म्हणाला असं केलं की ससे पळत बाहेर येतात आणि मग त्यांना मारता येतं म्हणे. अरे पळत्या सशाला शुट करता येत नाही. इतका चांगला नेम नसतो कोणाचा. पण आमचं नशिब नव्हतं नां, म्हणुन एकही ससा त्या जाळ्यात म्हणजे दोरिला अडकला नाही. असो..
   आणि त्या सगळ्यांना वारुणीची सवय होतीच.. तु म्हणतोस ते खरंय, पण आमच्या बरोबरचे सगळे अगदी स्वतःच्या पायांनी परत आलेत. इतकी थंडी होती त्या मुळे अजिबात कोणालाच त्रास झाला नव्हता.
   अविस्मरणिय ट्रेक झाला होता तो..

 2. Rohini says:

  कॅंपिंग चा अनुभव मस्तच… मजा आली वाचताना… तुमचा अग्रवाल म्हणजे व्यक्ती आणि वल्ली मधिल एखादं पात्रच वाटतं 🙂 … पुण्यात ट्रेकिंग चे चार – पाच नावाजलेले ग्रुप्स आहेत. पण बहुतेक सगळे ट्रेक्स जनरली एक दिवसाचेच असतात ते सुद्धा शनिवार / रविवार किंवा इतर सुट्टिच्या दिवशी. मी पुण्याला असताना मला पण ट्रेकिंग करायचं होतं पण राहुन गेलं. बघु आता कधि जमतय.

  • अरे .. पुण्याला असतांना ट्रेकिंग राहिलं? आम्ही तर अगदी दर सुटिला जायचो कुठेतरी.पुन्हा कधी चान्स मिळेल तर जरुर जा..
   तो अग्रवाल म्हणजे एक खरंच वल्लीच म्हणावं लागेल . बायको मुलं दार्जिलिंगला, त्यामुळे इकडे गार्डन मधे एकटाच (??) असायचा. पण एकदम लाइव्हली व्यक्तिमत्व…. बेस्ट माणुस कंपनी साठी….

 3. Rajeev says:

  ता.क.

  २ तपां पुर्वी ची आमच्या हीमालय ट्रेकची आठवण ताजी झाली.
  आपण पुन्हा जाउ.. ( मी स्पोन्सर करीन)

  • जाउ या राजिव.. एकदा नक्की जाउ या. पण अ बॅचलर्स ट्रेक. अजुनही माझे काही मित्र आहेत त्या भागात. मी अरेंज करु शकतो. फक्त सुटी चा प्रॉब्लेम मला पण आहे आणि तुला पण आहेच.. नाही कां?? कांही गोष्टींच्या फक्त आठवणिंवरच जगावं लागतं.. 😦

 4. Ganesh says:

  महेंद्रा सर…
  काय मजा आली असेल त्यावेळेस , मला तर इमॅजिन करूनच रोमांचित होतेय…..
  चिकन, मासे..ते पण कॅंप फाइयर करून वा आणि त्यात थरार आहेच साथीला… .. एकदम धमाल…..

  • गणेश
   एक वन्स इन लाइफ टाइम अनुभव आहे तो आउटींगचा.. मजा आली होती. अगदी सगळा प्रसंग लक्षात आहे जसाच्या तसा… 🙂

 5. bhaanasa says:

  सही रे! डोळ्यांनी तारे मोजत मन आजूबाजूला कोणी जनावर तर नाही ना याचा अदमास व थोडीफार गुंगी मस्त झोपला असशील अशा संमिश्र…….:D.

  • बराच वेळ तर अंदाज घेण्यातच गेला , की कोणी जंगली जनावर तर नाही ना आस पास म्हणुन?? कॅंपिंग चा एकुलता एक अनुभव आयुष्यातला. 🙂

 6. अरे वा! महेंद्रजी, छक्कास पोस्ट.. म्हणजे ट्रेकींगवर आणखी एक गडी सापडल्याचा आनंद झाला… 🙂 … सॉलिड अनुभव आहे हा!

  हां, आता हिमालय आणि लेह-लद्दाख ची ट्रीप माझ्याही “बकेट लिस्ट” मध्ये आहे… कधी होतेय ते बघु…!

  • दिपक
   भाजलेली अंडी खाण्याचा अनुभव एकदम ग्रेट. आणि चिकन , बटाटे, आधी ऍल्युमिनियम फॉइल मधे गुंडाळु न नंतर मग माती मधे लपेटुन भाजण्याची आयडिया एकदम खासंच. वन्स इन अ लाइफ टाइम एक्स्पिरिअन्स. दिपक ट्रेकिंग करायचो ते वन्स अपॉन अ टाईम..दोज गुड ओल्ड डेज..
   हिमालयातला ट्रेक तर करायलाच हवा.. मस्ट!!! आणि लडाख पण सुंदर आहे. मला पण जायचंय लडाखला..

 7. Pravin says:

  खरचं मोकळ्या निसर्गातील कँपिंगचा आनंदच काही और असतो अन ती जागा हिमालयात असेल तर क्या बात है. मी होन्नेमर्डूला एक आयलंड वर कँप केलं होतं. कोरॅकल (मोठ्या टोपली सारख्या बोटी) मधून जाताना पाण्यात पड्लो अन सुके कपडे गावात राहिले होते, मग रात्रभर ओल्या कपड्यानिशी रहावे लागले होते. टाकतो पोस्ट वेळ मिळाला कधी तर.

  • पविण
   अवश्य.. चांगलं होईल ते पोस्ट, लवकर लिहा अनुभव.. 🙂 असे अनुभव फारच कमी वेळा येतात.

 8. Manmaujee says:

  महेंद्रजी, मस्त झाली आहे पोस्ट, खरच अगदी अविस्मरणीय असा अनुभव आहे!!!

 9. मंगेश सकलावे says:

  मुठवा पुणे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s