इलेक्शन चा निकाल .

बाळासाहेब ठाकरे..

बाळासाहेब ठाकरे..

इलेक्शन  चा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. निकाल विलक्षण अनपेक्षित आणि  विचित्र लागणार आहे यात काहीच संशय नाही.याविषयावर आता भरपूर चर्वण होणार .. म्हणून मी हा विषय लिहायला घ्यायचा टाळतोय.

इथे बसून मला दिसतंय उध्दवच्या  कपाळावर आठ्यांचे जाळे पसरलेले.. आणि राज ठाकरेंचा हसरा चेहेरा..!! कदाचित उद्धव आता विचार करित असेल की बाळासाहेबांना काय सांगायचं ते.. दसरा मेळावा तर होऊ दिला नव्हता.. म्हणत होता की जिंकल्या वरच विजय मेळावा करु म्हणून!! पण आज कसं तोंड दाखवावं बाबांना– हा विचार करित बसला असावा उध्दव.

खरं तर जेंव्हा हटओ लुंगी बजाओ पुंगी नारा दिला होता बाळासाहेबांनी, तेंव्हा मात्र सगळ्या मुंबईला शिवसेना नामक वादळाच्या झंझावातामधे लपेटून घेतलं…. कुठलीही मारामारी, दंगल झाली की शिवसेना वाघाप्रमाणे मराठी माणसांच्या मागे उभी रहायची.नंतर हळू हळू शिवसेनेचा कडवे पणा कमी होत गेला, तसेच मद्रासी लोकांनी पण इथे जुळवून घेणं सुरु केलं.

उध्दव ठाकरे

उध्दव ठाकरे

खरं तर शिवसेनेने मराठी पणाची कांस सोडली, आणि हा पक्ष सर्वसमावेशक झाला तेंव्हाच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं होतं की आता शिवसेना मराठी मना पासुन  दुर होते आहे. ह्या गोष्टीची  शिवसेनेचे जेंव्हा भाजप बरोबर सरकार बनवले गेले ,तेंव्हापासूनच सुरुवात झाली.

उत्तर भारतियांच्या झोपड्या  नियमित केल्या गेल्या भाजपा -शिवसेनेच्या काळात. तेंव्हा जी झोपडपट्ट्टी नियमित  करण्याची आणि मतदार बनवण्याची टूम सुरु झाली ती आजही नियमित  करण्यात सगळ्यात समोर असतात. या राजकीय नेत्यांचं गरिबांच्या वरचं प्रेम अगदी उतु जातं… अशा बाबतीत!

ही गोष्ट झाली होती , जेंव्हा ते निवडुन आले होते तेंव्हाच त्यांनी नवीन स्ट्रॅटेजी च्या अंतर्गत युपी आणि बिहारी लोकांना पण सेने मधे स्थान राहिलं असं म्हंटलं , आणि तेंव्हापासूनच हे सगळे उत्तर भारतीय लोकं महाराष्ट्रामधे रहायचं तर सेनेमधे जॉइन व्हा असा पावित्रा घेउन मराठी मनाशी खेळत राहिलं. शिवसेनेने पण या भैय्या लोकांना शिवसेने मधे मानाच्या जागा दिल्या.बऱ्याचशा दगडांना शेंदुर फासून  देवत्व दिलं गेलं, पण त्याच बरोबर त्याच देवत्व मिळालेल्या दगडांनी जेंव्हा दगाबाजी केली तेंव्हा मात्र हातावर हात धरुन बसण्याशिवाय काहीच करता आलं नाही.

एकमेकांना शेलक्या शिव्यांनी संबोधित करणारे लखोबा .. किंवा टी बाळू नावाने एकमेकांचा उध्दार करणारे…. आता पुन्हा एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागल्याची बातमी वाचली आणि हार्ट अटॅक येण्याचाच बाकी होता.

कुमार केतकर

कुमार केतकर

कुमार केतकरांनी एक लेख लिहिला आहे लोकसत्ता मधे .. तिन कोटींचा तमाशा. त्यामधे ते लिहितात की प्रत्येक कॉन्स्टीट्युअन्सी मधे तिन कोटी रुपये खर्च झाले आहेत . लोकशाहीचा चौथा स्तंभ पुर्णपणे पोखरला गेलाय. प्रत्येक बातमी साठी प्रसारमाध्यमांना पैसे देण्यात आले , बातमी तुमच्या फेवरमधली असेल तर काही लाख रुपये, बातमी तुमच्या विरुद्ध उभ्या असलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध असेल तर त्याचे ही पैसे मोजावे लागले. या निवडणुकीत अशा कित्येक करोड रुपयांची देवाण घेवाण झालेली आहे.

राज ठाकरे

राज ठाकरे

हा एक उत्कृष्ट लेख आहे, प्रत्येक मतदाराने जरुर वाचावा असा हा लेख  ! पूर्वीच्या काळी पत्रकारांना फार तर दारु पाजणे, पंचतारांकित हॉटेल्स मधे पार्टी देणं किंवा अगदी फारच झालं तर मग एखादी सुटकेस, एखादा लेमन सेट, किंवा डिनर सेट वगैरे दिलं जायचं. दिवाळीच्या वेळेस पत्रकारांच्या घरी मिठाईचे डबे पोहोचवले जाणे इतकंच फक्त होतं, पण आता प्रत्येक गोष्ट करुन घेण्यासाठी पत्रकारांना कॅश मोजली गेली असंही कुमार म्हणतात, अर्थात त्या मधे शंभर टक्के सत्य असावे असं माझं मत आहे.

आता प्रश्न केवळ एकच आहे, आज जेंव्हा कॉंग्रेस निवडुन आली, तेंव्हा पैसे वाटून किंवा पैशाच्या व्यवहारातुन आली असं केतकर म्हणतील?? असो….

लोकशाही… माय फुट!!! लोकशाहीच्या नावाने तर आपण आंघोळ करुन श्राध्द घातलंय लोकशाहीचं. आजच बातमी वाचली की राईट टु इन्फर्मेशन  म्हणजेच माहितीच्या अधिकारात आता सुधारणा (??? ) करण्यात येणार आहेत.. म्हणजे कुठल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि कुठल्या प्रश्नांची नाही ते शासन ठरवणार. तसेच बऱ्याच गोष्टींना माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात येणार असल्याचे पण बोलले जातंय…

हे सगळं करण्यापेक्षा , मला तर असं वाटतं की सरळ हा कायदाच रद्द करुन टाकावा. आजही या कायद्या अंतर्गत माहिती मागितली तर निरर्थक माहिती किंवा उगीच काहीतरी द्यायची म्हणून दिलेली माहीती दिली जाते. तसं बरेचदा अशा निरर्थक माहिती मधून पण कामाची माहिती पण मिळून जाते ही गोष्ट पण जरी खरी असली तरीही जर एखाद्याने माहिती द्यायची नाहीच असे ठरवून टाकले तर तो तसं मॅनेज करु शकतो!

लोकशाही मधे राजकीय नेत्यांच्या मालमत्ते मधे झालेली वाढ लक्षणीय आहे. आता निवडुन आल्यानंतर केवळ पांच वर्षात मालमत्ता दहा पटीने वाढलेली आहे काही नेत्यांची.

आय आय एम मधे या राजकीय नेत्यांनी लेक्चर्स द्यावेत ऍसेट्स मॅनेजमेंटवर. .. … हे सगळे नेते  उजळ माथ्याने आपली मालमत्ता निवडणूक आयोगापुढे जाहीर करतात. निवडणुक आयोग ही मालमत्ता तुम्ही कुठुन आणली हे कधीच विचारत नाहीत.तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण या नेत्यांच्याकडे कानाडॊळा करतात.. प्रत्येक नेता आपल्या मालमत्तेबाबत अफेडेव्हिट देतो, म्हणजे लिगली तो त्या ऍफेडेव्हिट ला बांधील असतो, पण त्यावर काहीच ऍक्शन घेतली जात नाही. लोकशाहीची पोखरलेली मुल्य़ं हीच आहेत असं मला वाटतं.

आज निकाल लागले. पुर्ण मेजॉरिटी करिता आता उमेदवार विकत घेणे सुरु होईल. अहो, एखादी बाजारबसवी पण जितक्या सहजतेने उपलब्ध होत नाही, त्या पेक्षाही सहज पणे हे नेते उपलब्ध आहेत. मला अजीत जोगी चा तो चित्तथरारक पाठलाग आठवतो रायपुरचा.. 🙂

माझ्या मते शिवसेनेचा सत्तेमधला सहभाग  आणि राजनैतिक महत्वाकांक्षा हेच शिवसेनेला मराठी माणसाच्या मुलभुत मुद्यापासुन दुर नेण्यास कारणीभूत झाले असावे. या इलेक्शन मधे एक गोष्ट स्पष्ट झाली ती ही की आज महाराष्ट्रामधे राजनीती करायची असेल तर मराठी कार्ड नाकारुन चालणार नाही. शिवसेनेने भैय्या लोकांना जवळ केले , तर राज ठाकरेंनी भैय्या बॅशिंग सुरु केले.. त्यामुळे शिवसेनेला एक नविन पर्याय मराठी मुलांच्या समोर राज च्या रुपात दिसु लागला. शिवसेनेचे तरुण आणि तडफदार कार्यकर्ते मनसे कडे ओढल्या गेले.  शिवसेनेने भैय्या लोकांना जवळ केल्यामुळे, ज्या मराठी लोकांना डिजेक्टेड वाटत होतं त्यांना राज ठाकरे म्हणजे एक आशेचा किरण वाटू लागले.

आता ही एक सगळ्यात जास्त दुर्दैवाची गोष्ट , की मराठी नेत्यांना फार लवकर ’साहेब’ बनायची घाई होते. राज ला पण राज भाउ, पेक्षा राज साहेब होणं जास्त संयुक्तिक वाटलं. आता भाऊ शब्दामधे जी जवळीक आहे ती साहेब मधे नाही.. अर्थात असं मला वाटतं.! राज ठाकरेंच्या एम एन एस चे बरेच उमेदवार निवडुन आले आहेत. ही दुसरीच निवडणुक.. अशा परीस्थितीमधे  या पक्षाचं राजकीय वजन बरंच वाढलंय.. आता बघायचं काय होतं ते… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

36 Responses to इलेक्शन चा निकाल .

 1. Manmaujee says:

  आताच्या राजकीय नेत्यांपेक्षा इंग्रज परवडले!!!! कधी कधी वाटत अशी लोकशाही असण्यापेक्षा हुकुमशाही बरी!!! आतंकवादी कसाब, अफझल गुरू आज यांच्या सुरक्षेवर करोडो रुपये खर्च केले जातात पण शहीद जवानांच्या कुटुंबीयांची वाताहत होते. . .त्यांच्या मानधनावर यांचा डोळा!!!त्यांच बलीदान अगदी कवडीमोल आहे!!!!

  • मनमौजी
   अगदी माझ्या मनातला विषय आहे हा. कमांडोज ट्रेन करायचे..
   पण कशाला त्या थर्डक्लास सिनेमाच्या हिरोच्या घरासमोर पहारा द्यायला??? की
   गुंड आणि मवाली, पण निवडुन आलेल्या राजकिय नेत्यांच्या रक्षणासाठी हातामधे एल एम जी धरुन उभं रहाण्यासाठी??
   तुमचा मुद्दा पटला.

 2. nimisha says:

  हाय़ महेन्द्र्,

  अगदी बरोबर विष्लेषण केलंयस तू ह्या पोखरलेल्या व्यवस्थेच..मी यावेळी मनसेच्या उमेदवाराला मत दिलंय ते ह्याच हेतुने की, पाहू आता हे तरी काय करतात – नविन आहेत म्हणुन अपेक्षा आहेत एवढंच! आनंद एवढाच की मत फुकट नाही गेलं…निदान आत्ता तरी….नंतर या लोकांनी काम नाही केलं तर मात्र हळहळ वाटेलच!

  • निमिषा
   बरेच दिवसांनी आलिस ब्लॉग वर.
   माझं पण गेले चार पाच दिवस जरा दुर्लक्षंच झालं होतं कामाच्या व्यापामुळे.
   मनसेचे १०-१२ कॅंडीडेट्स निवडुन आले तरी पण ते इतक्यातच कांही करतिल असे वाटत नाही .
   कारण शेवटी अपोझिशन मधे राहुन काम करणं खुप कठिण होतं.

 3. nimisha says:

  अरे हो, तुझ्या ब्लॉगवर आज खुप दिवसांनी आले…हा लाल टी-शर्ट मधला फोटो मागच्या त्या गॉगलमधल्या ‘दुबई डॉन’ लुकपेक्षा बरा आहे हं…!! त्या मागच्या फोटोकडे पाहून मला थोडी भितीच वाटत होती ः))

  हे पब्लिश नाही केलंस तरी चालेल हं!

 4. bhaanasa says:

  सत्तेवर येण्याआधी ज्यागोष्टींसाठी लढा मांडलाय, यंव करू त्यंव करू वगैरेची आश्वासन प्रत्येक जण नेमाने देतोय पण पुढे काय??? जाऊ दे झालं आपल्याच( जनतेच्या ) अपेक्षा अवाजवी असाव्यात किंवा आपण दरवेळेला कोणावर तरी विश्वास टाकायचा खुळा प्रयत्न करतोय आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या चालूच. बाकी उमेदवार विकत घेणे प्रकार म्हणजे…… लोकशाही होतीच कधी तर आज/भविष्यात असेल. आपल्याकडे घराणेशाही आणि खाबूशाही. हं चला….आता पुन्हा एकदा पाहायचे कोण कोण शब्दाला जागतेय आणि कोण स्वत:ची तुंबडी भरतेय.
  आढावा चांगला घेतला आहेस.

  • सत्तेवर जाण्यापुर्वी दिलेली आश्वासनं म्हणजे मतं मिळवण्यासाठी केलेला एक वचननामा . त्याला काहिच अर्थ नसतो. आता कदाचित एका तिकिटावर निवडुन आलेले दुसऱ्या पक्षात पण प्रवेश करतिल.
   काहिच सांगता येत नाही.

 5. खुप छान लिहिले आहेत

 6. आनंद says:

  जिंकलेल्या उमेदवारांनी जी रक्कम खर्च केली आहे, ती आता ते वसूल करण्याच्या मागे लागतील……
  किंबहुना जास्त रक्कम जमा करतील. स्विस बँकेचा परत फायदा….

  • आनंद
   अतिशय भयंकर प्रकार आहे हा.जर इतक्या रुपयांची देव घेव होत असेल तर ते खर्च केलेले पैसे पुन्हा व्याजासहित दाम दुप्पट मिळवण्याची खात्री असते ह्या लोकांना, आणि म्हणुनच ते इतका खर्च करतात. याच लोकसत्ताच्या अंकात एका वाचकाचे पत्र पण आहे ते ही वाचनिय आहे. पण नेट वर नसल्यामुळे लिंक देता आली नाही.

 7. प्रशांत says:

  या लोकशाहीने सामान्य माणसाची प्रतिकार करण्याची सगळी क्षमताच हिरावून घेतली आहे. पूर्वी आजोबा इंग्रजांशी लढले. पण आज त्यांच्या नातवांत मात्र आपल्यांशीच लढण्याची हिम्मत नाहीये. या लोकांनी सामान्य माणसाला इतके लाचार केले आहे कि तो एक तर समाजव्यवस्थेविरुद्ध मुळात उभाच राहत नाही आणि जरी उभा राहिला तरी दुसरा एखादा ‘सामान्य माणूसच’ त्याचा गळा दाबतो. वृत्तपत्रांबद्द्ल तर बोलणेच नको, एक एक वृत्तपत्र एका एका पक्षाला आंदण दिलेय.

  बाकी माहितीच्या अधिकाराबद्द्ल –
  माहितीचा अधिकार मिळावा म्हणून आण्णा हजारेसारख्यांना आंदोलन करावे लागले. आता असला कायदा रद्द करण्यासाठी दुसर्‍या एका आंदोलनाची गरज आहे.

  • प्रशांत
   माहितीचा अधिकार हा कायदा रद्द न करता त्या कायद्याचे दात काढणे आणि तोंडाचं बोळकं झालेला कायदा आपल्या हाती देण्याचे घाटंत आहे.

   वृत्तपत्राला आपण लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणतो, पण जेंव्हा असा लेख कुमार केतकरांसारख्या मातब्बर व्यक्ती कडुन लिहिला जातो,तेंव्हा त्याचे महत्व अजुनच वाढते. हाअ स्तंभ इतका पोखरला गेलाय की जर वेळीच उपाय योजना केली गेली नाही तर मात्र पुढे काही दिवसांच्या नंतर ही वृत्तपत्रं पीत पत्रकारिते मधे पुर्ण पणे बुडुन जातिल असे वाटते.

 8. Pravin says:

  पराभवाची कारणे तर पहा. भाजप म्हणते एलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मुळे पराभव झाला. सेना म्हणते विभागलेल्या मतान्मुळे पराभव झाला. मनसेच्या जिंकलेल्या १३ जागा अन् अजून तितक्याच जागा युतीला मिळाल्या असत्या (म्हणजे जवळ्पास ३०) तरी पराभव झालाच असता. शिवसेनेला खरच आत्मपरीक्षणाची गरज आहे. मनसे ने गेल्या ३ वर्षात काढलेले मुद्दे नवीन नाहीत. तेच शिवसेनेनेने गेल्या १० वर्षात केले असते तर लोकांनी मत सेनेलाच दिले असते. अन् तो आर टी आय लवकरच बंद होईल असे दिसतय. कारण तुम्ही काही मागणी केली की ती गोपनीय माहिती खाली येते असे सांगितले जाईल. मग लोकच विचारायचे बंद करतील.

  • युध्द हारल्यानंतर ते कां हारले ह्याची कारण मिमांसा आवश्यक आहेच. पण जर ती जस्ट आय वॉश म्हणुन केली तर त्याचा पुढच्या दृष्टीने कांहीच उपयोग नाही. खऱ्या आत्म परिक्षणाची गरज आहे. मी पुर्वी पण एकदा मुद्दा उपस्थित केला होता एका लेखामधे, की उत्तर मुंबई मधे शिवसेनेने लादलेल्या भैय्या उमेदवारांना मराठी माणसं मतं देतिल कां?? आणि नेमकं तेच घडलंय.. शिवसेनेला जी मतं मिळाली, ती होती भाजपा ची. रास्वसंघचा कार्यकर्ता कधिच भाजप शिवाय इतर पक्षाला मतं देणार नाही. म्हणजे शिवसेनेचा बेस नेस्तनाबुत झाला असं समजावे लागेल.

 9. Rohan says:

  आता मनसे कडून जास्त अपेक्षा आहेत. शिवसेनेप्रमाणे पुन्हा बोलाची कढी नकोय मराठी लोकांना. काल राज तेच म्हणाले आहेत. बघुया ‘वचकनामा ‘ कसा आणि किती इफेक्टिव होतोय ते…

  • निवडुन दिलेले अंगावर दोन तिन किलो सोन्याचे दागिने बाळगणारे नव निर्वाचित मनसेचे पुण्याचे नेते काल पाहिले टिव्ही वर.. आणी खरं सांगतो भ्रम निरास झाला माझा. अर्थात मुंबईच्या निवडुन आलेले नेते सर्वसामान्य दिसताहेत. पण पुण्याचा निवडुन आलेला मात्र….. न बोललेलेच बरे. पण जर त्याने चांगलं काम केलं तर मात्र सगळं काही क्षम्य असेल.. 🙂
   मनसे कडुन खुप जास्त अपेक्षा आहेतच. जरी ते सत्तेवर नसले तरिही सरकारला धारेवर धरण्याचे काम नक्कीच करु शकतात. आणी झोपडपट़्ट्या नियमित करण्याच्या खेळिला आव्हान दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं.
   राज ठाकरेंचं शेवटलं भाषण सेन्सिबल होतं. त्यात राज ठाकरे म्हणतात, की इथे उत्तर भारतिय, ज्यांना नौकऱ्या वगैरे आहेत त्यांच्या येण्याबद्दल आमचं कांहिच म्हणणं नाही, पण इथे येउन झोपड्या बनवणाऱ्यांना नक्किच विरोध असेल आमचा.. बघु या काय होतं ते.. आता निवडणुका झाल्यात.. मतदार राजा (???? हा हा हा….????) आता काय करेल?? काहिच नाही.. नुसतं बघत राहिलं आणी हात चोळत बसेल…

 10. शिवसेनेने हा पराभव स्वत: ओढून घेतलेला आहे आणी हो या नेत्यांच्या गब्बर मालमत्ता पाहून मलाही खरच खुप आर्श्चय वाटते.त्यांची कधी चौकशी होते की नाही.बाकी नेहामिप्रमाणेच लेख छान झाला आहे.

  • देवेंद्र
   “नेते” अगदी आपल्या नावाला जागतात.. ’ने’ ’ते’ नावाप्रमाणेच नेतात पैसे वगैरे..
   शिवसेनेला जी मत मिळाली ती पण आहेत भाजपाची..
   त्यांचे फॉलोअर्स तर कधिच गेले सोडुन..

 11. anukshre says:

  नमस्कार….मी माझा नवीन ब्लॉग चालू केला.
  http://anukshre.wordpress.com/

  आपले स्वागत …

  अनुजा

 12. Meenal says:

  एम एन एस च्या निवडुन आलेल्या उमेदवारांना घोडेमैदान लांब नाही. आधिच्या उमेदवारांचे अनुभव गाठीशी आहेतच, आता हा बदल (थोड्याफ़ार प्रमाणात का असेना,) कोणती ’भरीव’ कामगिरी करतो हे पहायचे..
  पक्षाकडे बघुन मत द्यायचे की उमेदवारांकडे हा माझा नेहमीचा गोंधळ आहे. 🙂
  तुमचा ई मेल आयडीमिळेल का? मला ब्लॉग वर कुठे दिसला नाही.

  • आता आपल्या हातात काहिही नाही.
   एक दिवसाचा राजा , पुन्हा भिक्षेची थाळी हातात घेउन ,
   काल जे मतांची भिक्षा मागायला आले होते , त्यांच्याकडेच आशेने पहातोय..

   आलिया भोगासी असावे सादर.. चित्ती असुंद्यावे समाधान…
   श्री राम!

 13. Rajeev says:

  हीट्लरचे उदगार प्रसीध्ध आहेत….

  when you win..you need not explain …
  when you loose … you should not be there to explain !!!!!

  देवा देवा झाले ईलेक्शन,
  रीझल्ट आले फ़ार वीलक्शण…
  १२ जुने राजे पडले
  राज कुमारांसाठी दार उघडले…!ध्रु!
  जाती जातीचे बंध होतील दाट..
  कुळा कुळांची रम्य पहाट…
  १४८ चा पहा थाट…
  अपक्शांची लागेल वाट…….!ध्रु!
  उध्धव राज कोठे गेले..
  कमळा चे तर दल कोमेजले..
  रीडलोस चे चुलाण वीझले..
  अपक्शांचे डोळे थीजले…….!ध्रु!
  कॊंग्रेसचा रावा बोलतो…
  जो तो हात नीरखूनी बघतो..
  राश्ट्रवादीची मैना गाते…
  मुख्य खुर्ची कोणास जाते…….!ध्रु!

 14. abhijit says:

  महेंद्रजी सेंसिटिव टॉपिक्स साठी सेक्युर्ड ब्लॉग सुरु करा. व मोजक्याच लोकांना प्रवेश द्या. तो इमेल मला पाठवू शकाल का?

 15. मनोहर says:

  दबावगट म्हणून प्रस्थापित होण्यापलीकडे मनसेजवळ कार्यक्रम नाही.

  • मनोहर
   बघु या दबाव तंत्र कसं वापरतात ते. जर ते सुयोग्य कामासाठी वापरले तर ठिक आहे.

 16. sahajach says:

  खरं तर या पोस्टवर काय कमेंट टाकावे कळत नाहीये, कारण मी ईथून काही बोलणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. मतदान आपण सुशिक्षीत लोक कमी करतो आणि मग या लोकांचे फावते.राज ठाकरेंकडून अपेक्षा आहेत….पण महेंद्रजी या सगळ्या राजकारण्यांना मढ्यावरचं लोणी खायची सवय लागलीये….आमच्या घराजवळचा नगरसेवक आधि कॉंग्रेसमधे होता, मग शिवसेना सद्ध्या मनसे….आता बोला ज्या माणसांना निष्ठा म्हणजे काय हेच माहित नाही, कुठलाही त्याग बिग तर सोडा पण कर्तव्यभावनाही नाही, त्यांच्याकडून विधायक कार्य व्हावीत कशी!!!!!राज ठाकरे सध्या तरी महाराष्ट्राचा आवाज वाटतोय पण या वाघाची शेळी होउ नये शिवसेनेसारखी….शेवटी मराठी माणसाला एकतरी वाली असावा, बाकी काय……

  • मराठी माणसाचा वाली जर पुन्हा मतांच्या पाठीमागे लागला, तर मात्र मनसेची पण शिवसेना होइल. तेच होऊ नये एवढीच माफक अपेक्षा..

 17. समतोल विचाराचा सुंदर लेख आवडला.

 18. archana says:

  RTI act बद्दल तुमचे मत थोदे चुकिचे आहे. खुप लोकाना फायदा झालाय त्याचा. कीतीही नाही म्हटले तरी अंकुश रहातो त्या कायद्यामुळे. तो वापरायचा कसा हे माहीत पाहिजे.शासनाची ही लिन्क बघा .
  http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=1kSXE4TWqLljT9msf4uo6HsAlv2z2LX|OHauHOc/niFcahXdNt21ew==

  link2>>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=4G3CqZD5nX9UOS2RtSJ6IjTeDz2X8YzOwLbHHBR2zSSR0t4MRQv0HQ==

  तुमच्यासारख्या सजग माणसानेच असे मोघम विधान केले तर खुप चुकीचा message जातो. मी तुम्हाला request करते , शासनाच्या ह्या wensiteची जाहीरात तुम्ही तुमच्या blog वर नक्कि करा. शासनाची website असुनही बरीच professionaly maintain केली आहे.

  • अर्चना
   आता नविन आरटीआय मधे बरेच विभाग वगळण्यात येणार आहेत अशी बातमी वाचली होती. आज जसा आहे तसाच तो कायदाठेवला तरंच त्याचा फायदा.. नाहीतर उगिच जास्त बंधनं घातली, आणि कांही विभागाला वगळंलं तर तर त्या कायद्याचा धाक निघुन जाईल असं म्हणणं आहे माझं.
   आजचा जसा आहे तसाच ठेवावा कायदा.. त्या वर काहीच बंधनं नसावीत, किंवा कांहीच बदल पण करण्यात येऊ नयेत.. ..\

   असं म्हणायचं होतं मला. कायदा हा उत्तम आहे .. पण आज आहे तसा..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s