कुंकवाची पेटी

कुंकवाची पेटी

कुंकवाची पेटी

लहानपणापासून कांही गोष्टींना मोठी माणसं हात लाउ देत नाहीत मग त्या गोष्टींबद्दल खूप आकर्षण वाटत रहातं. जसं, मुलांच्या बाबतीत बाबांची शेव्हींग किट, किंवा मुलींच्या बाबतीत आईचा पावडर कुंकवाचा डबा. अशा तर अगदी खूप गोष्टी असतात ज्यांना हात लावणं वर्ज्य असतं.चुकून जरी तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर ओरडा ऐकायला लागतो.
पण त्यापैकी  लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे माझ्या आजी ची  कुंकवाची पेटी.

शिसवी काळ्या लाकडाची ही पेटी म्हणजे आमच्या दृष्टीने अलिबाबाची गुहा होती.नेहेमी च्या पेटी बद्दल एक आकर्षण वाटत रहायचं, त्या पेटीला आजी कधीच हात लाऊ देत नसे. कारण काय ते माहिती नाही पण आजी त्या कुंकवाची  पेटी बद्दल  खूपच सेन्सिटीव्ह होती.

माझी आज्जी खूप सुंदर होती दिसायला, आणि आजोबा तेवढेच भितीदायक. सहाफुट उंची, पांढरी दाढी – गळ्यापर्यंत लांब, चेहेऱ्यावरचे मुजोर भाव, कोणीही पाहिलं तर भितीच वाटावी असे व्यक्तिमत्व होतं आजोबांचं. ते जेंव्हा घरच्या गड्याला रागवायचे तेंव्हा तो अगदी चळा चळा कापायचा. एखाद्या वेळेस जर उलट्या हाताची पडली की मग झालं.

आज्जी मात्र अगदी ५ फुट  २ इंच वगैरे उंच असावी, आजोबांच्या समोर ती खुपच कृश वाटायची. स्वच्छ गोरा रंग, नितळ कांती, डोक्यावर बांधलेला अंबाडा, त्याला खोचलेले आकडे. पुर्वी सोन्याचं फुल लावायची, पण नंतर सोडुन दिलं तिने.

उन्हाळ्याची सुटी सुरु होती. आम्ही सगळे जण एकत्र जमायचो सुटी च्या दिवसात. चार मामा आणि तिन मावश्या, प्रत्येकी दोन मुलं, काही मामा मावशांना तिन मुलं पण होती. त्यातली कच्चे लिंबु टिंबु वगळले की आम्ही १३-१४ जण साधारण एकाच वयाचे असायचो. उन्हाळ्याच्या सुटीची तर वाट पहात रहायचॊ आम्ही. कधी एकदा एकत्र जमतो आणि मज्जा करतो असं होऊन जायचं.

vintage-shaving-box-3_45575_3आजोबा मालगुजार होते, त्यामुळे बराच   जमीनजुमला होता. मोठं जुनाट घर, पण  भलंमोठ्ठं.. दोन मजली घर होतं.घराच्या मागे एक दिड एकराचा रिकामा प्लॉट , तिथे गाई, म्हशींचा गोठा, एक विहीर. काही झाडं, मुद्दाम लावलेली, संत्रं, आंबा, पेरू, डाळींबं इत्यादी..  दुर परसदाराकडे संडास- घरापासून दुर..

रिकाम्या जागेत पऱ्हाटी, ज्वारीचे धांडे, कापसाची सुकलेली झाडं,रचुन ठेवलेली-त्याला पऱ्हाटी म्हणायचे, अगदी पेट्रोल प्रमाणे पेट घेते पऱ्हाटी म्हणुन चुल पेटवायला वापरली जायची. मागच्या अंगणातल्या चुली वर आंघोळीचं पाणी तापवलं जायचं. त्या चुलीमधे भाजुन खाल्लेल्या कांद्य बटाट्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते..  जवळच लाकडं पडलेली. एक लहानशी खोली, त्यामधे कुऱ्हाड टांगुन ठेवलेली. मागच्या अंगणातल्या चुलीमधे लाकडं पेटवायला त्या तुरीच्या काड्या, किंवा कापसाची वाळलेली झाडं वापरली जायची. ज्वारीचे धांडे जनावरांना खायला घालायचे. घरी गडी माणसं भरपूर.. जेवण झाल्यावर हातावर पाणी घालायला पण माणुस असायचा.

आजोळ अगदी गर्भश्रीमंत, पण आम्ही मात्र इतके श्रीमंत नव्हतो. तेंव्हा माझे वडील शिक्षक होते अमरावतीला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं अप्रुप वाटायचं. सगळे गडी माणसं , छोटे मालक म्हणुन हाक मारायचे, आणि ते खूप आवडायचं. उगीच आपण खूप मोठं झालो असं वाटायचं.

एक दिवस सकाळी दहाच्या सुमारास एक आदिवासी माणुस हातामधे एका मडक्यामधे मधाचं पोळं घेउन आला. त्या पोळ्या भोवती अजूनही माशा घोंगावत होत्या.  कंबरेला धोतर, अंगात बंडी ( म्हणजे बनियन प्रमाणे शिवलेला एक अर्ध्या बाह्यांचा अंगरखा) , पायात वहाणा नाही, काळे कभिन्न पाय त्या पिंगट झालेल्या धोतरातून बाहेर डोकावत होते. मधेच हाताने शिवलेला तो अंगरखा , धाव दोरा स्पष्ट दिसत होता. आम्ही मुलं खेळत होतो. म्हणाला, मालकीण बाई आहेत कां?

आज्जी बाहेर आली आवाज ऐकुन आणि त्याच्याकडून मध घेतलं विकत. आम्ही गम्मत पहात होतो. त्याने मध देण्यापूर्वी त्या पोळ्याच्या वरचा मेणाचा थर काळजी पूर्वक काढला आणि आज्जीने आणलेल्या लहानशा वाटीत तो काढून दिला. मध तर ठीक आहे, पण ह्या मेणाचा उपयोग??

imagesआज्जीने आपली कुंकवाची पेटी काढली आणि त्यामधल्या चांदीच्या डबीमधे ते मेण भरुन ठेवलं.. अच्छा… म्हणजे ते हे मेण होतं होय?? आज्जी फिक्कट रंगाचं नऊवार पातळ नेसायची. सकाळी अंघोळ करुन आली आणि तिने कुंकवाची पेटी उघडली की आम्ही तिच्या  अवती भवती बसून ती काय करते ते पहायचॊ .  याच पेटी मधे आरसा होता बेल्जियमचा. तो आरसा उघडला की पेटीमधे काय आहे ते सगळं दिसायचं . एक हस्तिदंती फणी, कुंकाचा करंडा, मेणाची डबी आकडे ,काचेच्या बांगड्या, व्यवस्थित एकत्र बांधुन ठेवलेल्या + कांही कानातल्या कुड्या वगैरे त्यात असायचं

.सोबतंच १०-१० रुपयांच्या कांही नोटा. त्या कशाला असायच्या ते माहिती नाही. पण मी लहान असतांना त्यातली एक नोट चोरली होती. अरे खरंच सांगतोय, तेंव्हा फॅंटा नवीनच आलं होतं. ७० पैशाला मिळायचं, ते फॅंटा प्यायला म्हणून एकदा पैसे काढून घेतले होते. पण पकडल्या गेलो.. 🙂

आज्जी नेहेमीच हस्तिदंती फणी वापरायची. कंगवा वगैरे वापरताना कधीच पाहिलं नाही तिला.1Paisa त्या मधे एक ढब्बू पैसा होता. ढब्बु पैसा म्हणजे ज्यामधे एक लहानसं भोकं असतं . तो पैसा कपाळावर ठेवून मधल्या रिकाम्या भागात आज्जी ते मेण लावायची. आणि नंतर त्या मेणावर कोरडं कुंकू लावायची. नुसतं कोरडं कुंकू कपाळावर टिकत नाही म्हणुन ते मेणावर लावायची आज्जी. तसं कुंकवाची बाटली पण मिळायची, पण ते कुंकू कधीच वापरले नाही आज्जीने. हेच ते रहस्य होतं कपाळावरच्या वाट़्टॊळ्या कुंकवाचे. नंतर भरपूर तेल लावून केसांचा अंबाडा घालायची-अंबाडा घातल्या नंतर मग त्या केसांच्यामधे आकडे लावून तो पक्का करणं, आणि नंतर मग सोन्याचं फुल वर लावणं.. हे रोजचंच काम होतं . आम्ही अगदी इमाने इतबारे तिच्यासमोर ब़सून रहायचो तिची तयारी पुर्ण होई पर्यंत. दातामधे आकडा धरलेला असायचा, तेंव्हा… अजूनही डोळ्यापुढे चित्र उभं रहातं….

आज्जी गेली ,बरीच वर्षं झाली त्याला,पण तिची आठवण का आली तेच कळंत नाही. पण आठवण आली म्हणूनच हे पोस्ट.

एक पोस्ट वाचलं सईचं , म्हणून आठवलं असेल कदाचित..पुरुषांनी इतके सेंटी पोस्ट्स लिहू नयेत. .. ते फक्त मुलींनीच लिहावेत.. असो…पण माझा काय वाटेल ते लिहिण्याचा स्वभाव आहे, आणि आज असं वाटतंय , म्हणून हे पोस्ट..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

30 Responses to कुंकवाची पेटी

 1. gouri says:

  kunku laavaNyaasaathi dhabbu paisaa vaaparanyaachi idea bhareech aahe tumachyaa aajjichee!

  • गौरी
   हो ना.. साध्या साध्या गोष्टी वापरुन आपलं काम काढायची सवय असते मोठ्या माणसांना. कुंकु गोल लागावं म्हणुन ते वापरायची ती तो पैसा. तिला पाहिलं की आम्हाला पण वाटायचं , की तो पैसा कपाळावर टेकवुन ते मऊशार मेण लावावं म्हणुन.. 🙂

   ती गेली आता. माझंच वय झालंय ४९. ती जर आज असती तर १०० च्या वर नक्कीच राहिली असती.

 2. sahajach says:

  आमच्या आजीनेदेखील अजून आम्हाला तिच्या पर्सला हात लावू दिलेला नाही….काय असते त्यात देव जाणे, कायम तिचे ते ’पाकिट’ काखोटीला मारलेले असते. कुठे विसरली की ’आण गं जरा माझं पाकिट!!!’ सांगते, पण तिच्या गैरहजेरीत त्यातून पैसे काढण्याची मुभा नाही. तिचे कपाटही असेच, ते ती आमच्यासमोर अजूनही अर्धेच उघडते…..खरच किती कुतूहल असतं ना असं ,की नक्की काय असेल त्यात….
  आठवणीतलं हलकंफूलकं पोस्ट, तरिही थेट मनाला भिडतय…..आजीची पेटी आणि ढब्बू पैसा मस्त!!!!

  • काय माहिती कारण काय ते… पण आज आज्जीची खुप आठवण येत होती.
   मला अट्रॅक्शन होतं ते त्या मेणाच्या डबीचं आणि त्या हस्तिदंती फणीचं..
   कधिच हात लाउ दिला नाही त्याला.
   ती जेंव्हा ती कुंकवाची पेटी उघडुन बसायची तेंव्हा आम्ही सगळे तिच्या समोर बसायचो.
   तिची ती हालचाल पहात.. ती जेंव्हा अंबाडा बांधुन त्यावर ते सोन्याचं फुल खोचायची ते पहाणं म्हणजे मस्तं वाटायचं …
   असो.. गेली बिचारी.. दहा बाळंतपणं झालित पण शेवटी गेली ते गर्भाशयाच्या कॅन्सरने 😦

 3. Rohini says:

  खुप छान झाली आहे पोस्ट. आजींची कुंकवाची पेटी तर खासच. आमाच्या आजी कडे सुद्धा अगदी अशिच कुंकवाची पेटी होती. पुढे कुठे गेली माहिती नाही. सेंटी पोस्ट आहे खरी पण ‘Girly’ नाहिये. शेवटी आजी आजोबांसमोर आपण सगळेच फक्त नातवंड असतो. नाही का?

  • रोहिणी
   लहान सहान गोष्टी पण खुप अस्वस्थ करतात कधी कधी..
   हो ते अगदी खरं.. आज्जी समोर आपण सगळे नातवंडंच असतो..

   अशा जुन्या गोष्टी होत्या हे नंतर आठवतं. जसं आमच्या घरी एक ’कारकुनी डेस्क’ पण होता. खाली जमिनीवर बसुन त्यावर कागद ठेउन लिहिता यायचं. त्यालाच एक खाच होती शाई साठी आणि टांक ठेवायला. तो पण वडीलांनी देउन टाकला कोणाला तरी.

 4. Aparna says:

  महेन्द्रकाका…खूप जास्तच सेंटि झालंय..आणि का माहित नाही सईच्या पोस्टची आठवण येत होती तितक्यात तुम्ही स्वतःच म्हटलं 🙂
  प्रत्येक आजीचं असं काहीतरी असतं ना? माझ्या आजीची अशी एक ट्रंक होती. ती गेल्यावर त्यातुन काय निघालं माहित नाही पण त्या ट्रंकेला आजीची ट्रंक असंच सगळेजण म्हणत. एखाद्या मुलीकडे ती राहायला जाणार असेल तर त्याला कुलूप लावुन जायची…
  पोस्ट छान असतात हे लिहायचं म्हणजे आता सवय झाली 🙂 पण या पोस्टमधले फ़ोटो जास्त भावले. कुठे मिळाले??

  • अपर्णा
   फोटो मला मेल नेट वर सापडले एका ऑक्शन साईट वर.. आणि अगदी अश्शीच होती ती पेटी… आणि म्हणुनच तर हे पोस्ट लिहिण्याचं सुचलं..
   ट्रंक, आणि त्या ट्रंकेला कुलुप.. आणि ते अर्धवट कपाट उघडणं, आणि त्यामुळेत्या कपाटात किंवा ट्रंकेत काय आहे हे पहाण्याची उत्सुकता वाटंत असेल. इथे तुम्हाला दिसु नये असा प्रयत्न केला की मग मात्र मुद्दाम पहावंसं वाट्तं – त्यात काय असेल ते… जर एखादी गोष्टं सहज मिळाली की मग त्याची किंमत वाटंत नाही.

 5. Sevakram says:

  Kay saheb, purushanni senti ka hou naye,fakta cigarate kinva daru pyaaychi ki tya aivaji? me ter mhanato senti vha hasa… rada… ani tension mukta vha.kay.??.. kititari vela me radoon geto.kunachi tari athavan yete, aajichi, aajobachi radoon gyav. kaya…? baki lekh surekh lihilay tumhi lekhan shaily khupach chhan aahe.

  • अहो आपल्या कडे अशी पध्दत आहे, घरातला पुरुष म्हणजे दगडी पुतळा .. भावना शुन्य.. जरी नसला, तरीही तसं दाखवायचं असतं पुरुषाने म्हणुन असं लिहिलंय.. बाकी भावनाशुन्य हा कोणीच नसतो, फक्त दाखवतात सगळे, की मला कांही वाटत नाही म्हणुन… तुमची प्रतिक्रिया मनापासुन आवडली.. रडुन घ्यावं.. खरंच .. असं वाटतं कधी तरी… पण………………….!!

 6. mugdha says:

  masta jhalie post!! mala “dhabu” paisa thevun kunku lavane mahitach navhte..majhi aajji kordach kunku lavaayachi..tiche babahi “MAALGUJAR” hote 🙂
  aajoba gelyapasun ticha nattapatta banda jhaala..
  pan masta vatla vachun..var aajjilahi bara vatat asel tumhi tichyabaddal blog lihila pahun 😉

  • मला वाट्तं जुन्या काळी कदाचित ही पेटी म्हणजे प्राईड पझेशन असावं स्त्रीयांचं..
   आजकालचा मेकप बॉक्स तशी ही पेटी.. त्यातला तो आरसा ज्या तऱ्हेने तिथे तिरका बसवता येतो, ते पाहुन मजा वाटायची..

 7. mugdha says:

  सांगायचं म्हणजे मागे एकदा मी इथल्या एका ए़क्झिबिशन ला गेले होते..तिथे मी असाच कुंकवाचा डब्बा पाहिला. आणि मोठ्या मोठ्या सोन्याच्या दागिन्यांची पेटीही….. 🙂

  • विकत घेउन ठेवा तो… फार रेअर झाल्याआहेत जुन्या गोष्टी, जर दिसली तर घेउन टाकावी. मी पण आता एक चक्कर मारणार आहे चोर बाजारात..

 8. anukshre says:

  चार दिवस नेट शिवाय काढले आता चालू झाले त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला, आजीच्या गरगरीत गोल कुंकवाची आठवण आली.पोस्ट नेहमीसारखीच फंडू! गर्लीपोस्ट काही वाटत नाही. मी पण सेंटी पोस्ट लिहिण्याचे टाळते. विषय शोधून त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करते, पण भावना अशा लिहायला काहीच हरकत नाहीत.

  • सेंटी पोस्ट लिहायला मला पण फारसं आवडत नाही, पण तो डबा दिसला, आणि एकदम आज्जी आठवली म्हणुन हे पोस्ट.. तसं मनातल्या भावना कधी तरी दाखवायला हरकत नाही, हे पण खरं!!

 9. Raghu says:

  काका, लेख खुपच छान झाला आहे. सगळे वाचल्यावर आजीची खूप आठवण आली. माझ्या आजीकडे पण असाच एक बॉक्स होता. तो मी अजुन सांभाळून ठेवला आहे. फोटो मधे दाखवला अगदी तसाच आहे. गावी गेलो की नक्की बघेन.

  • रघु
   अशा जुन्या गोष्टी म्हणजे अमुल्य ठेवा असतो, पण जागेच्या अभावी बरेचदा अशा वस्तु काढुन टाकाव्या लागतात.. शक्य होईल तर सांभाळुन ठेवा.. पुढच्या पिढीसाठी..

 10. bhaanasa says:

  महेंद्र,मस्तच. हळवं झालं मन. माझ्या आजीचेही सकाळी आंघोळ झाली की आणि संध्याकाळी दिवेलागणीच्या आधी वेणीफणी-कुंकू होई. तेव्हां हा असाच अलिबाबाचा खजिना पाहायला मिळे.[:)] तिचे पाहून पाहून मीही शाळेत असताना मेण लावून कुंकू लावत असे. काही नवीन शब्दही कळले,खास विदर्भी.

  • भाग्यश्री
   ते मेण असतं हे मला त्या दिवशी कळलं, तो पर्यंत तो डिंक आहे असंच वाटायचं ! कुंकु चिकटवायचा डिंक.. काय भन्नाट कल्पना असतात नां??

 11. Manju says:

  Mahendrajee,khup chhan…ni halavi post bar ka.
  Mazi aajji…mhanje panajji…aajji pahilich nahi…..
  ti gelyavar mi fish khana sodun dila…. tich kate kadhun dyayachi na..
  Atta maheri gele ki tiche photo,trunk nakki baghanar.
  Mazya baalpanat mala gheun gelat..thnk u

  • मनाली,
   प्रत्येकाच्याच मनात आज्जी बद्दल तर एक जास्तंच जवळीक असते, आई रागावली की वाचवणारी, आई मारायला लागली की स्वतःच्या मागे लपवणारी.. अशी अनंत रुपे आठवतात आजी म्हंटलं की.. जरुर बघा, आजी ची पेटी, कदाचीत एखादं तुम्ही लहान पणी लिहिलेलं पत्रं वगैरे पण सापडेल…खरं तर कुठला खजीना सापडेल तेच सांगता येत नाही.. 🙂

 12. ravindra says:

  माझी आजी तर मी यायच्या आधीच गेली होती. पण मला आठवते माझ्या आईकडे तस कुंकवाच काशाच करंड होत. त्यात मेण व कुंकू असायचं. मात्र आईकडे एक कापडी पिशवी ज्यात पैसे ठेवायची ती असायची. ती मात्र ती जपून ठेवायची. कोणाच्या हाती पडू देत नसे. आई आज हि आहे. अजून हि ती पिशवी तिच्या सोबत असते पण रिकामी. असो पण मला आजीच्या त्या पेटी बद्दल चा अनुभव नाही. पण पोस्ट छान झाली आहे.

 13. Pingback: डबा… « काय वाटेल ते……..

 14. piyu says:

  Mahendarji post kharokharach khup chan zali aahe. Kharach ase hote kadhi kadhi,kahi karan nasatanhi senty vayala hote.
  Baki Kunkavachi Peti khupach sunder aahe. Dhabbu paisa mi hya purvi kadhihi pahila navhata.
  Tanvine aajichya Pakitabaddal lihile aahe pan aamchya aajobanchehi ek lakadi kapat hote , kay asayache tyat tyanach mahiti, pan aamha natavandana hat lavayala ajibat paravangi navahti, kamachi kagadpatre aahet mhanayache, pan itaki kapatbhar kagadpatre?
  Baki lekha mazt zalay.

  • सुप्रिया
   ह्या जुन्या लोकांच्या सवयी असतात अशाच. आता फक्त आठवणी शिल्लक आहेत बस..

 15. Pingback: काय वाटेल ते……..

 16. रविन्द्र जाधव says:

  कुन्कवाची पेटी पोस्ट आवडले. मला आजी आठ्वत नाही. परन्तु माझ्या आीची अशी पेटी होती त्याची आठ्वण झाली.

 17. ललिता says:

  खुप मस्त पोस्ट माझी आजी पण वापरायची अशी पेटी मी जपून ठेवलिय अजून ती

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s