रोजच्या जीवनातले……

काल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात? म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे अनेक नारायण सतत आपल्या अवती भोवती वावरत असतात. त्यातलीच ही दोन उदाहरणं.

मी इंदौरला गेलो होतो गेल्या आठवड्यात, तेव्हाची गोष्ट आहे ही. रात्रीचे ८ वाजायला १० मिनिटे कमी होती. मी टॅक्सी मधे बसलो होतो आणि एअरपोर्टला निघालॊ होतो. फ्लाईटची वेळ होत आली होती. आणि नेमका ट्राफिक जॅम.. असे प्रसंग तर माझ्या पाचवीलाच पूजलेलं आहेत. नेमकं, एखाद्या दिवशी लवकर निघावं, की एअरपोर्टवर जाउन काही थोडं खाऊन घ्यावं.. दिवसभरात वेळ मिळाला नाही म्हणून, तर नेमकं कुठेतरी अडकतो.

मुंगीच्या गतीने हा ट्राफिक समोर जात होता. कारण काय ते कळत नव्हतं, पण अर्धा रस्ता ब्लॉक होता, आणि उरलेल्या अर्ध्या रस्त्याच्या मधूनच सगळे लोकं जात होते. मी पण आता काहीच करता येत नाही, म्हणून इकडे तिकडे पहात बसलो होतो. शेवटी ती वेळ आली.. ज्या कारणामुळे ट्राफिक जॅम झाला होता ती कार दिसली एकदाची.. तिचा फोटो खाली दिलाय.

बरं कार बंद पडली याचं काही नाही, पण इतर दोन ’नारायण’ बाइक वर बसून त्या कारला धक्का देत चालले होते.. आपल्या मागे ट्राफिक जाम झालाय, याचं त्या दोघांनाही अजिबात काही वाटत नव्हतं. अगदी शांत पणे पायाने रेटा देत ती कार ढकलत जात होते ते..मजेशीर दृष्य होतं ते.. .हे बघितल्यावर एक क्षण मला तर हसूच आवरत नव्हतं.. काय करणार नां? त्याचा फोटो काढल्यावर त्याने मागे वळून पाहिलं, आणि बेशरम सारखा हसला…राग, संताप, चीड, सगळॆ भाव मनात आले एकदम.. आणि एक  कचकचून शिवी द्यायची इच्छा झाली. अहो इच्छा झाली काय दिलीच शिवी..  …आता खिडकी बंद असल्यामुळे त्याला ऐकू गेलं नसावं..

इंदौर , बाइकर्स कारला धक्का देतांना..

इंदौर , बाइकर्स कारला धक्का देतांना..

बरं त्या फोटो मधले ते ्बाईक वाले बघा, एकाच्या मागे खूप मोठं पोतं बांधून ठेवलंय. तो ते पोतं, स्वतःला, आणि बाईकला सांभाळत , बाईक वर बसून त्या कारला धक्का मारतोय..  उंटावर बसून शेळ्या हाकणं ह्यालाच म्हणत असतील का?

परवा सकाळी दिल्लीला गेलो होतो.हल्ली लिक्विड्स अलाउ करित नाहीत हॅंड बॅगेज मधे म्हणून एक ड्रेस आणि शेविंग किट असलेली बॅग चेक इन केली होती. दिल्लीला उतरलो. एअर इंडियाचं विमान होतं. इन फ्लाईट सर्व्हीस नेहेमी प्रमाणेच, त्या बद्दल न बोललेलंच बरं. पण जेंव्हा कन्व्हेअर बेल्ट जवळ आलो, तेंव्हा एक मजेशीर दृष्य दिसलं. त्या कन्व्हेअर शेजारी लोडर्सनी ट्रॉली  मांडून ठेवल्या होत्या एका रांगेत.

युजवली ट्रॉली  एका बाजुला ठेवलेल्या असतात, पण एअर इंडीयाच्या प्रवाशांना त्या ट्रॉली  काढण्याचे पण कष्ट पडू नये म्हणून त्या लोडर ’नारायण’ ने हे असं करुन ठेवलं होतं. खोटं वाटतंय?? इथे फोटॊ दिलाय बघा खाली. ह्या नारायणाने जे कांही केलं ते कोणाच्याच लक्षातही येणार नाही  , आणि त्या नारायणाला या कामाबद्दल  कांही रेकग्निशन पण मिळणार नाही, तरी पण त्याने हे काम केलं.. तेंव्हा हे असं काम करू शकणारा फक्त नारायणच अ्सू शकतो..

कन्व्हेअर्स जवळ लाउन ठेवलेल्या ट्रॉलीज.

कन्व्हेअर्स जवळ लाउन ठेवलेल्या ट्रॉलीज.

ही अशी लहान लहान कामात केलेली मदत, कुठलीही अपेक्षा न ठेवला केलेली बहुतेक वेळेस दुर्लक्षीत रहाते, पण नारायण कांही आपलं काम करणे सोडत नाही.

तेंव्हा एकच विनंती , जेंव्हा कुठे असं काही एखादं चांगलं काम करुन ठेवलेलं दिसेल, तेंव्हा त्या कधीही न पाहिलेल्या नारायणाला थॅंक्स म्हणा मनातल्या मनात तरी.. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged , , , . Bookmark the permalink.

22 Responses to रोजच्या जीवनातले……

 1. bhaanasa says:

  पहिल्या फोटोतले नारायण म्हणजे…..जाऊ दे तू आधीच शिवी दिली आहेसच तेव्हां….
  पण हा बेल्टजवळ ट्रॊलीज नीट लावून प्रवाशांची सोय करणारा नारायण– ग्रेट. जे प्रवासी येतील त्यांना कदाचित गडबडीत/ट्रॊली इतक्या सहजी मिळाली या आनंदात हे लक्षातही येणार नाही की हे कोणीतरी सह्रुदयी माणसाने न पाहिलेल्या माणसांसाठी करून ठेवलेय. पण नंतर ते नक्कीच दुवा देतील शिवाय ह्या अश्या नारायणांना त्याची अपेक्षाही नसते–सहीच.

  • हा फोटो काढला तेंव्हा माझ्या मनातही नव्हतं की कधी हे पोस्ट करायला उपयोगी पडेल म्हणुन. पण आज गिरिश ने म्हंटलं आणि एकदम हे दोन फोटो आठवले..असे लोकं अजुनही आहेत या जगात.. याचं आश्चर्य वाटतं..

 2. सलिल चौधरी says:

  खरंच असे खुप “नारायण” आहेत जगात.

  परवाच एका सदगृहस्थाने नेटभेटच्या “पुस्तक भेट” योजनेसाठी १२ मराठी पुस्तके (नवी कोरी) स्पॉन्सर करतो असे सांगीतले. माझ्या कडुन पत्ता घेतला आणि पुस्तके पाठवुन देखील दीली. नेटभेटच्या या योजनेला मदत म्हणुन त्यांनी हे केले आणि तेही कोठेही नामोल्लेख नको असे कटाक्षाने सांगुन.

  सलिल चौधरी

  http://www.netbhet.com

  • सलील
   ऐकुन बरं वाटलं… आपल्या कडे एक म्हण आहे, कावीळ झाली की सगळं पिवळं दिसतं.. तसंच.. हे आहे, एकदा तुम्ही त्या दृष्टीने पहाणे सुरु केले की असे बरेचसे प्रसंग, लोक आठवतात.. अशा लोकांना शतशः प्रणाम..

 3. manoj says:

  पहिले दोघे नारायण जरा सायकीकच दिसताहेत.
  दुसरा फ़ोटो पाहुन आठवण झाली, सहार एअरपोर्टवर माझ्या भल्या मोठ्ठ्या बॅगांकडे ६०% सहानुभूतीने आणि ४०% यात काय दगड भरलीत काय? अशा नजरेने बघत एका नारायणाने रांगेतला नंबर सोडून खूप मदत केली होती. प्रसंग तसा साधाच आणि खूप कॉमन. पण त्यावेळी ती मदत खूप खूप मोलाची वाटली.

  • मनोज
   एखाद्याला मदत करायची हे ठरवलं की मग मात्र तो एक छंद होऊन बसतो..लोकं काय म्हणतील?? असा विचार अजिबात मनात येत नाही. कोणाला मदतीची गरज दिसली, की आपणहुन पुढे जाउन मदत केली जाते..

 4. ravindra says:

  अरे बाबा किती वाहून घेतलं आहेस ब्लॉगला. जेथे जाणार तेथे ब्लोग साठी कलेक्शन. माझ हि असाच झालं आहे. मी आताच नारायण वर कोमेंट टाकली कि मला दिवा घेऊन हि असे नारायण सापडत नाहीत. लगेच हि नवीन पोस्ट समोर आली.”रोजच्या जीवनातले” आणि मग समजल माझी नजर बरोबर नाही ते. असे किती तरी प्रसंग दिसतात. किती तरी लोक असतात निरपेक्ष भावनेने काम करणारे. फक्त आपली नजर चांगली पाहिजे. धन्यवाद माझे डोळे उघडल्या बद्दल.
  एकदा मीच अशी नारायणगिरी केली होती. त्याबद्दल आठवले आहे. लगेच ती पोस्ट टाकायला लागतो. येतो आता.

  • माझी ही फार जुनी सवय आहे. कांही वेगळं दिसलं की सेल फोनच्या कॅमेऱ्याने क्लिक करतो. असे अनेक फोटो असतात फोन मधे कधी तवी काढुन ठेवलेले. जेंव्हा हे असे फोटो काढतो, तेंव्हा मनात ह्या वर पोस्ट लिहायचं वगैरे असे विचार पण नसतात. नंतर कधी तरी हे समोर आले की मग आठवण होते, आणी हे काढलेले फोटो असे उपयोगी पडतात.

   • ravindra says:

    पण त्याला तशी नजर लागतेच. असो जरा माझ्या मनावरील ताजी पोस्ट बघावी.

 5. आनंद says:

  ट्रोलीवाल्या नारायणाला माझा सलाम! मनातून!

  • मी नागपुरला असतांना एकदा माझ्या बाइक मधलं पेट्रोल संपलं होतं तेंव्हा अशाच एका नारायणाने मला हात धरुन – म्हणजे मी पण बाइक वर आणि तो पण बाइक वर- आधी थोडंदुर धावत जाउन बाइक वर बसलो, बाइक मोशन मधे असतांनाच त्याने हात धरुन जवळपास २ किमी अंतरावरच्या पेट्रोल पंपापर्यंत सोडलं. तेंव्हाची मदत तर खुप दिवस लक्षात राहिली होती.

 6. संजिव सिध्दुल says:

  काका, छान वाटलं तुमचे ‘नारायण’ वाचून!
  माझं तर असं मत आहे की, असे ‘नारायण’ आहेत म्हणून तर ह्या जगात अजूनही सदाचार, सत्प्रवृत्ति ह्या शब्दांना अर्थ आहे.
  पुराणांमधे असं आढळतं, ‘नारायण’ म्हणजे अशी व्यक्ति, की जी निस्वार्थ पणे या जगाचा सांभाळ करते. आजचे हे ‘नारायण’ म्हणजे त्या नारायणाचिच आजची रुपे तर नव्हेत!
  संघाच्या माध्यमातून काम करताना मलाही असे अनेक ‘नारायण’ भेटले आणि अजूनही भेटतात! पण या नारायणांबद्दल जास्त लिहिणार नाहि. कारण मी स्वतः कधी कधी ‘नारायण’ बनतो! 🙂 त्यामुळे मला माहिती आहे, ह्या लोकांची मनाची ठेवण कशी असते. या नारायणांना प्रसिद्धि कधीच नको असते!

  • माझ्या माहितीमधला एक माणुस एम टेक केल्यावर फुल टाइम प्रचारक झालेला अहे.

   • संजिव सिध्दुल says:

    नाही! मी जे बोललो ते प्रचारकांबद्दलचं नाही. प्रचारक पद्धति तर फार वेगळी गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको! They are meant for that type of work only!
    मी ज्यांच्याबद्दल बोललो ते अतिशय सामान्य स्वयंसेवक आहेत! स्वतःचं शिक्षण, प्रपंच सगळं सगळं सांभाळत ही मंडळी असली कामे अतिशय निस्वार्थपणे करतात.

 7. Pravin says:

  Absolutely correct. These two posts are good. Thanks for sharing.

 8. “तो ते पोतं, स्वतःला, आणि बाइकला सांभाळत , बाइक वर बसुन त्या कारला धक्का मारतोय.. उंटावर बसुन शेळ्या हाकणं ह्यालाच म्हणत असतिल कां?” – मला हसू आवरत नाहीये. कसला मस्त फोटो आहे.

  ह्या अशा लोकांना इतर वेडे म्हणत असतील, तर शहाणं कुणाला म्हणावं?

  • कांचन
   त्या दोघांनी आणी कारनी मिळुन पुर्ण पणे दिड लेन ऑक्युपाय करुन पुर्ण रस्ता ब्लॉक करुन ठेवला होता. माझा जीव कासाविस होत होता, आता जर पुढे जायला मिळालं नाही, तर फ्लाइट मिस होणार म्हणुन.. पण झालं एकदाचं..

 9. sahajach says:

  खरच असतात असे नारायण….माझी ’गोष्ट लहान असते’ पोस्ट याच नारायणांवर होती. पण महेंद्रजी या असल्या नारायणांच्या बायकोचे त्यांच्याबद्दलचे मत ऐकणे ही फारच मनोरंजक बाब आहे….मागे एकदा अमितने एक कुटूंब असेच त्यांच्या घरी नेउन सो्डले होते…जवळपास २५-३० किमी. जाउन….त्यामूळे यायला उशीर झाला, गौरी न जेवताच झोपली. बरं हा एकच प्रसंग नाहीये आमच्या गाडीची जनता गाडी केलीये त्यानी…सतत कोणाला तरी नेणे आणणे सुरू असते. आपण ओरडलो तर उत्तर ठरलेले, आपल्याकडे गाडी नव्हती तेव्हा आपलीही फजिती होतच होती ना!!!काय करणार त्या नारायणाच्या शेवटी कार्यालयात चादर टाकणाऱ्या बायकोसारखी मीदेखील हा दमून आल्यावर चहा करायला धावते…..
  एअरपोर्टवए ट्रॉलीज लावणारा तो नारायण खरच ग्रेट म्हणायला पाहिजे…..

  • हे एक वेवगळेच डायमेन्शन आहे या मनोवत्तीला. आता असं पहा, महात्मा गांधींच्या बायको मुलांना पण त्यांच्या ग्रेटनेस चा त्रास झालाच नां??
   एक म्हण आहे मराठी मधे.. शिवाजी असावा, पण दुसऱ्याच्या घरात- जीजाबाई असावी, पण दुसऱ्यांची आई… !!

 10. काका त्या दोघा येडचापच्या कानाखाली सात-बाराचा उतारा काढायला हवा होता…

  • सिध्दार्थ
   तेंव्हा तर तशीच इच्छा होत होती. लोएस्ट फेअर नो रिफंड तिकिट होतं, नो शो झाला असता तर जस्टिफाय करणं कठीण झालं असतं . चालायचंच.. एम पी. मधे हा प्रकार कॉमन असावा, कारण इतर लोकं अगदी चलता है.. नजरेने पहात होते. दुसरी गोष्टं माझी पण आता पन्नाशी येतेय जवळ.. .. त्या मुळे उगिच कोणाशी मारामारी वगैरे करायची हिम्मत होत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s