नारायण…

कांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला  गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही  मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या कामासाठी सुटी घेणं वगैरे सगळं करण्याची त्यांची तयारी असते. स्वतःचा कुठलाही स्वार्थ नसतांना हा माणुस कधीही अगदी मध्य रात्री पण मदतीला तयार असतो.

वेळ प्रसंगी स्वतःचा पैसा पण खर्च करतील ,एक वेळ भाच्याच्या मुलाच्या मुंजीला जाणं टाळतील, पण अशा मदतीला नेहेमी तयार असतात हे लोकं.  अशा लोकांचं नाव असतं, पण माझ्या मते पुलंनी बरोबर नांव ठेवलंय अशा लोकांचं.. नारायण.. मग ते कुठलंही नांव असो, याला नारायण नाव चपखल बसेल असं वाटतं.

एखाद्याच्या घरी कोणी आजारी पडलं, आणि ते या आपल्या नारायणाला कळलं, की हा लगेच त्या माणसाची घरी जाउन चौकशी करतो. आणि मग, अहो असं निष्काळजी राहू नका हो.. आपले ते मनोहरपंत होते नां, त्यांना पण असंच झालं होतं, आधी वाटलं की असेल गॅसचा त्रास, आणि म्हणून दुखत असेल छाती मधे, पण तो तर हार्ट अटॅक होता हो.. बरं तर बरं, मी तिथे पोहोचलो वेळेवर आणि त्यांना डॉ. कर्वेंच्या कडे घेउन गेलो . ते तर आधी डॉक्टरांकडे यायलाच तयार नव्हते.. पण नेलं जबरदस्तीने..  डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि म्हणाले, अहो घ्या लवकर टेबल वर.. यांना कॉरेनरी डिसिज आहे.. आणि  ताबडतोब एंजीओ प्लास्टी केली त्यांची आणि जीव  वाचवला.

डॉक्टर म्हणाले, नारायणराव, तुमच्यामुळे जीव वाचला बर का..आणि तुम्हाला सांगतो, अहो त्यांची बायकॊ तर चक्क माझे पाय धरुन रडू  लागली.  म्हंटलं वहिनी.. अहो मी नाही, त्या डॉक्टरांचे आभार माना.. आणि संस्कृतमधलं एक गीतेमधलं वचन फेकतो…

या नारायणाला सगळं काही व्यवस्थित माहिती असतं, कुठला डॉक्टर कलर डोपलरचे १००० रुपये घेतो, कुठला ५०० मधे पण चांगलं काम करतो, हार्ट साठी डॉ. साने, किडनी साठी डॉ. पवार.. असे प्रत्येक रोगासाठी कुणाकडे जायचं ते पण ह्याला चांगलं माहिती असतं. बरं एवढंच नाही, तर रोगांची नांवं पण ( जी उच्चारताना सामान्यांची जीभ अडखळेल) ते पण याला व्यवस्थित उच्चारता येतात. डॉक्टरांनी कांही सांगितलं, की हा लगेच डॉक्टरांना पण काहीतरी सल्ला दिल्याशिवाय रहात नाही.

तुम्हाला नुसती सर्दी झालेली आहे, आणि या नारायणरावांचा फोन आला, त्यांना नुसता तुमच्या सर्दीचा वांस जरी आला फोन वर तर ते लगेच तुम्हाला सल्ला देऊन मोकळे होतील की अहो.. हे स्वाइन फ्लु पण असु शकेल बरं.. जा चेक करुन घ्या.. तुम्हाला आता साधी सर्दी पण स्वाइन फ्लु आह का असे वाटायला लागेल.नारायण लगेच तुमच्या घरी येउन तुम्हाला डॉ . अबक च्या कडे घेउन जाईल. डॉ. च्या पण हे नारायण खूप परिचयाचे.. अहो नेहेमीच गिऱ्हाीक आणून देणारे.. मग त्यांचं अगदी तोंड भरुन स्वागत करणार डॉक्टर..

नमस्कार.. नारायणराव.. काय काम काढलंत?? काय? बरं बीरं नाही कां तुम्हाला? यावर नारायण .. नाही हो.. मला काय धाड भरली आहे, रोज मौक्तिक भस्म , आणि सुवर्ण भस्म खातो मी सकाळी, जेवणानंतर मग मोराववळा, आणि रात्री दुधा सोबत घेतो गुलकंद – डोकं थंड रहायला हो….  . मला कांही होणेच शक्य नाही. नारायण आपलं रोजची दिनचर्या ऐकवतो डॉक्टरांना.. आणि  आपल्या ह्यांना ( तुमच्या कडे बोट दाखवून)  सर्दी झाली आहे… हो.. म्हंटलं की स्वाइन फ्लु पण असू शकतो हां…. म्हणून आणलं तुमच्या कडे.

डॉक्टर तुम्हाला तपासून .. नाही हो.. कांहीच झालेलं नाही तुम्हाला असं म्हणून दोनशे रुपयांची खंडणी घेणार.. तुमचं डॊक ख्रराब.. उगीच दोनशे रुपये गेलेत म्हणून. आणि नारायण यावर कॉमेंट टाकतो, आपण तपा्सून घेतलं ते.. खात्री झाली नां….   की तुम्हाला स्वाइन फ्लु नाही याची..

तुम्ही आता आपल्याला स्वाईन फ्लु नाही म्हणून आनंद मानावा, की दोनशे रुपयांना फोडणी बसली म्हणून दुःख मानावं ह्याचा विचार करत असता.

बरं हे तर आपलं नेहेमीचं.. पण समजा एखाद्याला डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला बॉम्बे हॉस्पिटलला न्या, तिथेच पुढली तपासणी करुन घ्यावी लागेल.. तशी मी तुम्हाला चिठ्ठी देतो डॉक्टरांच्या नावे.. तिथे जा तुम्ही.. तर नारायण लगेच म्हणतो, अहो मी चांगला ओळखतो त्या डॉक्टरांना, मी जाईन ना सोबत  यांच्या .. ( मान ना मान , मै तेरा मेहमान)  तो पेशंट पण जरा घाबरलेलाच असतो हो.

हो ना, डॉक्टरांनी मुंबईला जायला सांगितलं म्हणजे नक्कीच कांहीतरी मोठठा आजार झाला असणार आपल्याला. आधीच घाबरलेल्या त्या पेशंटला, नारायणाचा खूप आधार वाटु लागतो. नारायणाच्या ओळखी रेल्वे मधे पण असतात. त्या पेशंटला नारायण सांगतो, नको हो जास्त खर्च करायला, आपण सेकंड क्लासनेच जाऊ या तिकिटं मी करतो सोय.. आपले बबनराव आहेत ना रेल्वे मधे , अहो त्यांच्या बरोबर मीच तर गेलो होतो मुंबईला त्यांच्या आईला बरं नव्हतं तेंव्हा… तर अशा तऱ्हेने तो पेशंट, नारायण आणि त्या पेशंटच्या घरचे लोकं असे सगळे निघतात मुंबईला..

नारायण पण आपली व्हिआयपी ची एक सुटकेस.. (बहूदा त्याला लग्नात मिळालेली असावी) ती घेउन तयार होतो.त्या सुटकेस मधे एक मळकी चादर, एक पॅंट एक शर्ट आणि अंतर्वस्त्रे, सोबतच बायकोने बरोबर दिलेले बेसनाचे लाडू आणि चिवडा.तिला  बिचारीला  माहीत असतं आपला नवरा कसा आहे ते..  ह कधी तोंड उघडून मागणार नाही आपल्याला भूक लागली म्हणून.

तसा नाराय़ण पुर्वी आलेला असतो बॉम्बे हॉस्पिटलला, पण   नारायणाची खरं तर कांहीच ओळख वगैरे नसते इथे. अनोळखी ठिकाणी मात्र  नारायणाची सोबतच त्या पेशंटला खूप आधार देून जाते. नारायण पुढे रिसेप्शन ला जाउन विचारपूस करणे, डॉक्टर कोण आहेत, रजिस्ट्रेशन कुठे करायचे, वगैरे सगळी माहिती काढून आणतो .

मग तो पेशंट पण त्याच्या बायकोला सांगतो, बघ, नारायणरावांना बरोबर आणलं ते किती छान झालं?? नाहीतर आपण काय केलं असतं?? ती पण सम्मती दर्शक मान हलवते, आणि उगीच आपण नारायण रावांना बरोबर घेउ नका म्हणून नवऱ्याशी वाद घातला म्हणून खजील होते..

नारायणाला,   स्वस्त हॉटेल्स , लॉज पण माहिती असतात, तो डिक्लिअर करतो, आपण इथे तपासणी झाली की विरारच्या लॉज मधे जाउन राहू. अहो फक्त दोनशे रुपयात खोली मिळते, लोकलचे ३० रुपये धरले तरीही खूप स्वस्त पडते. खोली च्या सोबतंच जेवण वगैरे पण स्वस्त आहे तिकडे, इथे मुंबईला रहाणं खूप महाग पडेल.

सगळी तपासणी झाली, डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल, तर ह्या नारायणाची ओळख त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या हापिसात पण असते.. तिथे लोन कसं काढायचं, कुठले कागद पत्रं लागतात, हे सगळं नारायणाला ठाउक असतं.पीएफ ऑफिसमधे पण त्याला ओळखणारे बरेच लोकं असतात.

नारायण एकदा सांगत होता, एका बायपास नंतर दिलेल्या बिलामधे एका व्हॉल्व्ह चे पैसे लावले होते, डॉक्टरांनी. नाराय़णने बिल पाहुन विचारले, काहो तुम्ही एखादी फॉरिन  बॉडी बसवली आहे कां? आपल्याला तर बायपास करायची होती नां?? डॉक्टर म्हणाले नाही, नुसती बायपासच केली.. मग हे कसले पैसे लावले तुम्ही असा प्रश्न विचारल्या वर त्या डॉक्टरांनी ३० हजार रुपये  कमी केले व्हॉल्व्ह चे. तुम्हीच सांगा, बायपास झाल्यावर बिलात काय लावलंय हे कोणी पाहिल तरी का? पण नारायण आहे ना सोबत, तर मग अजिबात काळजी करायची नाही..तर अस्सा आहे नारायण..

तुमच्याही पहाण्यात असतील असे नारायण.. वेगवेगळ्या कामात इंटरेस्ट असणारे.. जसे पुलंचा नारायण, लग्नं म्हंटलं की अंगात येणारा. तसाच हा दवाखाना म्हंटलं की अंगात येणारा..तर असे नारायण तुमच्या आमच्या पहाण्यात बरेचदा येतात.उपेक्षित, दुर्लक्षीत, पण पुलंच्या नारायणा प्रमाणेच …    सगळ्याची मदत करणारा हा….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged , , , . Bookmark the permalink.

11 Responses to नारायण…

 1. Girish says:

  MBK,

  marmik ahay, pan tumhala asa narayan recently kadhi bhetla ka ho? ka atta ashi characters faqt fiction madhye urli ahet?

  • गिरिश
   अरे हो.. भेटला होता नां..म्हणुन तर सुचलं हे पोस्ट . उद्या चेक कर, आजकालचे नारायण.. अगदी करंट इशुज .. रोजच्या रोज भेटणारे.. अगदी फोटोच्या पुराव्यासाहित. खरं तर आजच टाकणार होतो, पण जमलं नाही. उद्या सकाळी किंवा जमलंच तर आज रात्री करतो पोस्ट.

   या पोस्ट मधला नारायण पण आहे अस्तित्वात, माझ्या माहितीतला आहे, मुद्दाम नांव लिहिलं नाही.३० हजार रुपये कमी केले ती पण एक सत्य घटना आहे !

   BTW, उद्या मी सकाळी पुण्याला येतोय, बघ वेळ मिळाला तर मार चक्कर. सौरभ पण येतोय अमदाबादहुन..

 2. आनंद says:

  हा लेख वाचून ‘भेजा फ्राय’ मधील ‘भारत भूषण’ आठवला….

 3. bhaanasa says:

  आनंदशी सहमत. मला पण. आजकाल असे नारायण काहीसे दुर्मिळच झालेत.इतक्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठीही वेळ नाही तर…..पण आहेत मात्र.त्यांचा स्वत:चा स्वार्थ काहीच नसतो यात. अगदी असलाच तर इतकाच की मनात कुठेतरी माझी लोकांना मदत होत असेल हा विचार असावा. अर्थात अपवादही असतातच. सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यावेळी अतिशय महत्वाचा भासणारा नारायण–खास पुलंचाच—अगदी मर्तिकाच्या सामानापासून गंगेवरल्या तिलांजली पर्यंतचा…..पण तसे नारायण अजूनही आहेत आणि त्या दु:खाच्या प्रसंगात ते अतिशय उपयोगीही पडतातच.

  • हा नारायण माझ्या चांगला माहितीतला आहे. फक्त त्याचं नांव मात्र इथे दिलेलं नाही, मुद्दाम.. जेंव्हा आपल्यावर वेळ येते ,तेंव्हा मात्र कोणाची तरी मदत हवी हवीशी वाटते.खुप अनसिक्युअर्ड वाटतं… तेंव्हा हे असे लोकं उपयोगी पडतात.
   फक्त आपली नजर स्वच्छ पाहिजे, त्यांना ओळखायला..

 4. ravindra says:

  मला तर असे नारायण मी दिवा घेऊन शोधतो पण सापडत नाहीत. कदाचित माझी नजर…:(
  एक मात्र नक्की आजची पोस्ट पूर्णतः मराठीत लिहिल्या सारखी वाटली (एखाद दुसरा शब्द सोडून) मिंग्लिश (ओळखल असेलच मराठी +इंग्रजी भाषा) मधील शब्द मला दिवा हातात घेऊन शोधावे लागले 🙂 :).

  • शक्य तेवढं शुध्द मराठी लिहिण्याचा प्रयत्न करतो. अट्टाहासाने, प्रचलित नसलेले शब्दं पण वापरण्याचा प्रयत्न करतो हल्ली… 🙂

 5. Pingback: नेकी कर और…. « माझ्या मना …

 6. Arrecha…kay gammat ahe paha… Delhi airport varil he trolleys lavle le drushya me sakalich pahile .. yoga yogane me parva Delhi la hote… I used one of those trolleys kept near the belt… pan nahi click zhale.. ki uts a small good gesture from unknown trolley keeper.. Next time nakich ase narayan disle ki photo kadhnar… !!!

  • पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा तर आश्चर्यच वाटलं होतं. पण नंतर मात्रं त्या नारायणाचं कौतुक वाटलं. स्टॅकिंग केलेल्या ट्रॉलीज मधुन एक ट्रॉली ओढुन बाहेर काढतांना वयस्कर लोकांना खुप त्रास होतो, हे आपण बरेचदा पहातो. कदाचीत त्या नारायणाने पण हेच रिअलाइझ केलं असावं… 🙂 म्हणुन अशा प्रकारे ट्रॉली लाउन ठेवल्या असतिल.

Leave a Reply to tulipsintwilght Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s