मानसिक बेड्या

 

vaibhav lakshmi

वैभव लक्ष्मी

 

मी नास्तिक नाही, पण जेंव्हा पासून रामकृष्ण परमहंसांचं गॉस्पेल वाचलं तेंव्हा पासून रिच्युअल्स बद्दल चं आकर्षण कमी झालंय हे अगदी खरं. प्रत्येक धार्मिक गोष्टी कडे किंवा कृती कडे उघड्या डोळ्यांनी पहायची सवय लागलेली आहे.  श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या १०० वर्षांच्या वरच्या आयुष्यात  मुस्लिम धर्म दोन वर्षं, ख्रिश्चन धर्म एक ते दीड  वर्षं असे आणि उरलेला सगळा पिरियड  हिंदू या तिन्ही धर्माचं पालन केलं होतं.

माझा या देवा,धर्मावर अभ्यास पण नाही. पण मला जे वाटतं ते लिहिणार आहे आज यावर..कोणाचाही उपमर्द करण्यासाठी हे लिहिलेलं नाही.

आपण जेंव्हा देव म्हणतो तेंव्हा  देव प्रवृत्ती अपेक्षित असतात-माझं चांगलं चिंतणारा/ करणारा तो देव… देव म्हंटलं, की तो माझा सखा, वडील, बंधु सगळा कांही असतो, मग माझं सर्वस्व असलेला असा तो देव माझं वाईट कसं काय करू शकेल? जो चांगलं करतो तो देव आणि जो वाईट करतो तो दानव अशी सोपी व्याख्या केली जाऊ शकते यांची.

आपण सत्यनारायणाची पुजा वगैरे करतो, तेंव्हा पुजा झाल्यानंतर भटजी  बुवा एक कथा सांगतात, की एका माणसाने पुजा केली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो पूजा करायचं  विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा पुजा केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला..

अशाच आशयाच्या दोन तिन कहाण्या सांगितल्या जातात. या कहाण्या केवळ पुजा करणाऱ्यांचा ब्रेन वॉश करायचा म्हणून वारंवार सांगितल्या जातात. मग होतं काय, की दुसऱ्या वर्षी जर काही वाईट घडलं, की ते आपण पुजा न केल्यामुळे घडलं असं वाट्त आणि.आणि गिल्टी कॉन्शसमुळे तो माणुस पुजा करतोच.. उगिच विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्ह्णून…

देव जर माझं केवळ त्याची पुजा, किंवा ते व्रत केलं नाही, म्हणून जर मला त्रास देणार असेल/ किंवा मला आयुष्यातुन उठवणार असेल ,  तर तो  देवा कसा?  देवा  पेक्षा मला तो ्पूजेची खंडणी मागणारा “भाई”   वाटेल  . आपण म्हणतो ना.. की  जो चांगलं करतो तो देव, आणि वाईट  प्रवृत्ती असणारा तो दानव.. मग जर एखादी वाईट करणारी शक्ती  असेल  तर  तिला देव कसं काय मानायचं हा प्रश्न नेहेमीच सतावतो मला..

माझं स्पष्ट मत आहे, की ्पूर्वीच्या ब्राह्मण समाजाने, सगळ्या समाजाला घाबरवून ठेवलं होतं , कारण व्रत, वैकल्य लोकं करतील तरच यांचं पोट भरेल. म्ह्णून तुम्ही ह्या सगळ्या कहाण्या तयार केल्या गेल्या असाव्यात.  अर्थात, केवळ पुजा करणे हाच एक त्या काळी ब्राह्मणांचे  उदरनिर्वाहाचं साधन होते. जर लोकांनी पूजाच केली नाही, तर त्या काळी ब्राह्मणांचा उदरनिर्वाह कसा काय झाला असता????

पण आजच्या परिस्थितीमध्ये पण आपण त्याच त्या कथा मनोभावे हात जोडून ऐकत बसतो.. !! केवळ सत्यनारायणाच्या च नाही तर जवळपास सगळ्याच पूजांचा शेवट अशाच प्रकारे कथा सांगून केला जातो.मग घाबरुन का होईना, पण दर वर्षी एकदा तरी पुजा करतात लोकं.

माझा आक्षेप हा पुजा करण्यासाठी नाही.. तर, एखादी पुजा करायची असेल तर  मानसिक शांती करता  देवावर प्रेम आहे म्हणून प्रेमाने केली पाहिजे.. देव माझा सत्यानाश करेल/ मला त्रास देईल  म्हणुन नाही.    मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.

आता हे का आठवलं मला म्हणताय???? तर ऐका….हल्ली ते एक लक्ष्मी व्रत करण्याचं फॅड आलंय. दर गुरुवारी बायकोला शेजारी पाजारी हळदी कुंकु साठी बोलावणं असतं, आणि नंतर  तिला एक लक्ष्मी व्रताच पुस्तक पण प्रेझेंट दिलं जातं.. आमच्या घरी अशी बरीच लक्ष्मी व्रताची बरीच पुस्तकं जमा झाली आहेत.

परवा, सहज त्या पैकी एक पुस्तक वाचलं, तर त्या मधे पण कथा अशी दिलेली आहे ,दर गुरुवारी पुजा करा, आणि संध्याकाळी सवाष्णींना बोलावून हे पुस्तक भेट द्या- म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होील, आणि “सो ऍंड सो” प्रकाशनाचे ओरीजिनल पुस्तकंच द्या, नाहीतर फळ मिळणार नाही.

इतके शिकले सवरलेले लोकं पण अशा फालतू गोष्टींना बळी पडुन कसलेही शेंडा ना बुडखा असे व्रत करतात हे पाहून मला गम्मत वाटते. व्रत करणाऱ्या बायकांमधे सगळ्या उच्च विद्याविभूषित आहेत, एक तर चक्क डॉक्टरेट झालेली पण आहे. असो….

ही पुस्तकं… इतकी रद्दी घरी जमा होते.. त्या पुस्तकांवर लक्ष्मी , गणपतीचे चित्रं असल्याने  फाडून डस्ट बीन मधे पण  फेकता येत नाहीत. .. काय करणार?? अहो किती रद्दी गोळा करायची??  शेवटी एक गठ्ठा बांधून ठेवलाय. समुद्राचं पाणी दूषित करायला…… !!

आणि हे सगळं कोणी जाणूनबुजूनच पण करित नाही.. तर परंपरेने चालत आलेलं आहे हे.. फक्त ह्या सगळ्या पुजा वगैरें अशा का असाव्या म्हणून कोणाच्या मनात कधी प्रश्न येत नाहीत.ही अशी पुस्तकं वाटून जर कोणी श्रीमंत होणार असेल, तर तो पुस्तकं छापणारा पब्लिशर, प्रकाशक!!

स्वामी श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे, या रिच्युअल्स मधे गुंतून पडाल तर भक्ती मार्ग विसराल.. आणि विनाकारण जी गोष्ट अजिबात महत्वाची नाही तिला महत्व देत बसाल..हिंदूंच्या बॆड्या आणि मुस्लिम लोकांच्या बेड्य़ांमधे एक फरक आहे, तो म्हणजे हिंदूंच्या पंडीत लोकांच्या ब्रेन वॉश मुळे कोणी कॊणाचे खून, आत्मघाती हल्ले केले जात नाहीत …या धर्माच्या बेड्यांचा उपयोग  हा पुर्वी पासून समाजाला एकत्रित करण्यासाठी करण्यात आलेला आहे. कितीही  धनदांडगा असो, की बाहुबली असो, तो धर्मासमोर वाकतोच.. आणि हीच एक गोष्ट अशी आहे की जी समाजामधे सेल्फ डिसिप्लिन आणु शकते.थोडा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी जरी असला, तरीही तो क्षम्य आहे असे मला वाटते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

48 Responses to मानसिक बेड्या

 1. आनंद पत्रे says:

  असाच एक प्रकार आहे, IT मध्ये फेमस, देवाचे फोटो असलेले इमैल्स न डीलीट करता पुढे सरकवायचे(forwards). जर डीलीट केला तर अमकं टमक होणार.
  आज पर्यंत मी सगळे डीलीट केले आहेत, सु(दैवाने) अजून काही वाईट घडले नाही 😉

  • आनंदजी, IT काय घेऊन बसलात? आमच्यासारख्या घरी बसलेल्यांना पण येतात ही ईमेल्स. मधे एक ईमेल आलं होतं, ज्यात स्वामी समर्थांच्या फोटोचं लक्ष्मीच्या कॅलेंडरमधील फोटोशी मॉर्फिंग करून एक वेगळाच फोटो पाठवला होता. पुन्हा धार्मिक धमकी होतीच जोडीला ’ईमेल जवळ बाळगू नका. पंधरा मिनिटांत अकरा जणांना पाठवा..’ वगैरे वगैरे. ज्या मैत्रीणीकडून हे ईमेल आलं तिच्याकडून असलं ईमेल यावं याची सुतराम शक्यता नव्हती म्हणून तिला विचारलं तर म्हणाली, “मला माहित आहे, ते मॉर्फिंग आहे पण स्त्री ही शक्ती आहे आणि पुरुष शिव. शिवशक्तीचा संगम आहे त्यात म्हणून ईमेल पाठवलं.”
   शिवशक्ती आम्हालाही मान्य आहे. पण म्हणून स्वामी समर्थ आणि लक्ष्मीदेवी?

  • आनंद
   मी पण पुर्वी अशा इमेल्स नी वैतागुन गेलो होतो, आणि मग मी स्वतः पण एक फॉरवर्ड बनवला होता.. 🙂 अजुनही रोज असे इमेल्स येतातच.. 😦

 2. Pravin says:

  I totally agree with you. You have put this point across very well.

 3. खरंय तुमचं म्हणणं. रामकृष्ण परमहंसांनीच कशाला, स्वामी दयानंद तर त्यांच्यापेक्षाही जहरी टीका केली होती या कर्मकांडांवर. गंगेत डुबकी मारण्याने जर स्वर्ग मिळाला असता तर सगळे मासे स्वर्गात गेले असते, ही त्यांचीच टीका होय. पण लोकं कुठं ऐकतात. खरं सांगायचं तर लोकांनाही खऱ्या आध्यात्मिक ज्ञानापेक्षा संपत्ती, सत्ता यांचाच मोह जास्त. म्हणूनच सत्य साईबाबांच्या कार्यक्रमाला गर्दी होते.

  • देवीदास
   सत्यसाईबाबा यांना पाकिस्तानच्या सिमेवर बसवा, आणि त्यांना हात वर करुन हातातुन मिसाइल्स लॉंच करायला सांगा, असे मिसाइल्स की जे फक्त तालिबान्यांना मारतिल.. म्हणजे काय , थोडं देशाचं पण भलं होईल.. हे अंगारे, अंगठ्या आता खुप झालं. आता हातातुन ( हवेतुन ) मिसाइल्स, टॅंक्स वगैरे काढा म्हणाव, म्हणजे देशाचं परकिय चलन तरी वाचेल ..
   मला खरंच मनापासुन या माणसा बद्दल ………असो.. विषयांतर होतंय.. नंतर कधी तरी परामर्ष घेउ त्यांचा..

 4. महेंद्रजी,
  अगदी बरोबर मत तुम्ही मांडलेले आहे. माझे स्व:ताचे असे मत आहे की पेशवाई बुडाल्यावर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ब्राह्मण समाजाने ह्या पुजांचे स्त्रोम निर्माण केलेले असावे. कारण पेशव्यांनी कधी सत्यनारायणाची पुजा केलेली माझ्या वाचनात आलेले नाही. तसेच शिवजी महाराजांनीपण नाही. हे सर्व देवा-धर्माचे करत होते. चांगल्या कामासाठी मुहुर्त पण बघायचे. पण सत्यनारायणाची पुजा नाही.

  “थोडा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी जरी असला, तरीही तो क्षम्य आहे असे मला वाटते..”

  हे ही बरोबर आहे. कारण कोणीही निस्वार्थ बुद्धीने कोणतीही गोष्ट करत नाही.

  • पेशावाई बुडाल्यावर नाही, तर पेशावाईच्या आधिपासुनच हे सुरु आहे. क्षत्रीय- जे शुर वीर असायचे, त्यांना, किंवा राजे लोकांना कंट्रोल करण्यासाठी धर्माचा योग्य वापर करणं हा अगदी हातखंडा होता त्या काळी ब्राह्मणांचा.. सत्यनारायणाची पुजा हे फक्त एक उदाहरण म्हणुन घेतलंय..

 5. संजिव सिध्दुल says:

  काका, अगदी छान पोस्ट झालयं.

  सत्यनारायण पूजा, लक्ष्मी व्रत या बद्दलचे माझे अनुभव नंतर पोस्ट करेन.

  पण तुमच्या पोस्टचा शेवट अतिशय मस्त केलात! अतिशय थोडक्या शब्दांत हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय पंडितांमधील फरक तुम्ही स्पष्ट केलेत.

  • संजीव
   बरेच दिवसांपासुन मन पोखरंत होता हा विषय.. आज नेमका योग आला, आणि शेवटी लिहिलं यावर..

 6. ravindra says:

  हा ब्रम्हांड तयार करणारी कोणती तरी शक्ती आहे हे आपण मानत असणार असा माझा ठाम विश्वास आहे. त्या शक्तिलाच आपल्या पूर्वजांनी देव (किंवा त्या त्या धर्मियांनाची धारणा असले तसे) मानले आहे. मला वाटते या मानव प्रवृत्तीवर जो पर्यंत कोणाचा अंकुश राहत नाही किंवा कोणाची भीती राहत नाही तो पर्यंत तो व्यवस्थित जगत नाही व इतरांना हि जगू देत नाही. हे आपण रोजच्या घडामोडीवरून आपल्याला दिसून येते.. सांगायचा तात्पर्य असा कि समाजावर अंकुश राहावा म्हणून पूर्वजांनी देवाची भीती दाखविली आहे. जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर दिसून येईल कि आपण पूजा करतो म्हणजे दुसरे काही नाही तर मेडीटेशन करतो. सासटांग नमस्कार घालतो हा योगाचा प्रकार आहे. आपण हवन करतो त्यात जे जळतो त्याने वातावरण शुद्ध होते हे पूर्वजांना माहित होते. म्हणून त्यांनी घारातील वातावरणातील अशुद्ध हवा बाहेर घालविण्यासाठी हवन करण्याचे नियम घालून दिले. आपण मना पासून देऊळात प्रवेश केला तरच आपल्या मनाला शांती मिळते. तसेच देऊळात, किचन मध्ये किंवा घरात प्रवेश करतांना चप्पल घालू नये यात धार्मिकता कोठे आहे. त्यातील मूळ उद्देश तेथील स्वस्छ्ता असा आहे. आपण कधीही देवासाठी उपवास करीत नसतो. उपवासाने आपलीच प्रकृती बरी राहते. श्रावणात आपण उपवास करतो तो देवासाठी नव्हे तर पावसाळ्यात आपली पाचन शक्ती कमी झालेली असते म्हणून. मी मागे एक पोस्ट टाकली होती “परंपरा” या नावाने . त्यात हि नमूद केले होते श्राद्ध घालणे म्हणजे आपल्या वाडवडिलांची आठवण ठेवणे होय. आत्मा कधी जेवणाला येत नसते. तसेच आपण एखाद्या अंतिम यात्रेत जातो व परत आल्यावर आंघोळ केल्या शिवाय घरात प्रवेश करीत नाही असे का? बारकाईने विचार केला तर लक्षात येईल कि त्या घरातील वातावरणात एक विशिष्ट गंध असतो. तो इतर कोठे हि नसतो. माझे ठाम मत आहे कि त्या घरातील वातावरणात विशिष्ट जंतू पसरलेले असावेत. म्हणून पूर्वजांनी आंघोळ करण्याचा नियम घालून दिला आहे. कदाचित तेव्हा हि मनुष्य कोणाचे ऐकत नसेल, कोणाला घाबरत नसेल व समाज विस्कात्न्याच्या अवस्थेत यायला लागला असेल म्हणूनच आपल्या पूर्वजांनी भीती दाखवून हे नियम तयार केले असतील. देवाच्या भीतीने का असेना समाज व्यवस्थित नांदेल असा त्यांचा उद्देश असावा.
  तर पूर्वजांनी जे नियम बनविले आहेत त्या बेड्या आहेत असे मानून चालणार नाही.असे माझे तरी मत आहे.

  • “देवाच्या भीतीने का असेना समाज व्यवस्थित नांदेल असा त्यांचा उद्देश असावा.”
   मी नास्तिक नाही, पण कर्म कांडाला पण फार जास्त महत्व देत नाही. अर्थात, याचा अर्थ हा पण नाही, की मी पुजा, श्राध्द, गणपती वगैरे टाळतो.. माझा मुद्दा वेगळा आहे या लेखातला.. आणि नेमका तुम्ही पण तोच मुद्दा शेवटल्या वाक्यात नमुद केलाय.

   दुसरी गोष्टं , कदाचीत तुम्हाला पटणार नाही, पण हवनामुळे हवा शुध्द होत नाही, तर हवेमधला ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड चं प्रमाण वाढतं.. असो.. तो मुद्दा श्रध्दा आणि अंध श्रध्दा या अंतर्गत येतो. पण त्या धुरामुळे घरातले डांस कमी होण्यास नक्कीच मदत मिळते.. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, आणि शेणाने + गोमुत्राने घर सारवायचे जुने लोकं, घरात डांस वगैरे होऊ नये म्हणुन..

 7. सेवक् राम says:

  तुमचा लेख नेहमिप्रमणे छान झा्लाय एव्हढ मनापासून लिहि्लेल फार कमी वेळा वाचायला मिळ्त [या विशया वर तरी] सत्य कटु असल तरी सत्य असत त्यामुळे लवकर पचनी पडत नाही.माणसाला माणसातला देव दिसत नाही, आईतली देवि दिसत नाही,विद्येतला, श्रमातला पैसा, श्रीमन्ती दिसत नाही, सासुला सुनेत लक्ष्मि दिसत नाही, पोराला बापातला परमे्श्वर दिसत नाही. अज्ञाना पोटी “आहे सर्व जवळि, पण जागा चुकलाशी” म्हणायची वेळ येते, आणी मग “चुकलीया वर्मा फेरा पडे” एवढ मात्र नक्की.
  [खर सान्गायच तर फार कमी वेळा सन्धी मिळते ही खाज बाहेर यायला.उपदे्शाची, इथे तुमचा लेख निमित्त झाला हे नक्की.काही भावना दुखवल्यास क्षमा असावि.]

  • मी पण लिहिलं खरं, पण थोडा संकोच वाटत होता लिहितांना .. खुपच जास्त सेन्सिटिव्ह विषय आहे हा म्हणुन..

 8. महेंद्रजी, तुमच्या या लेखाची कालपासून वाट पहात होते. नास्तिक मीही नाही. मात्र, देवाला एका मूर्तीत जखडून त्याची पूजा करत रहाण्याचा सोपस्कार मला मान्य नाही. जे जे सुंदर आहे, त्या प्रत्येकात ईश्वरी शक्ती आहे, असा मला विश्‍वास आहे. घरात काम करत असताना, अचानक एखादं फुलपाखरू घरात येतं. एखादा क्षण भिरभिरतं आणि पुन्हा बाहेर उडून जातं पण तेवढ्या एका क्षणात आपल्याला ते किती आनंद देऊन जातं! देवही शेवटी हेच सांगतो ना की आयुष्य क्षणभंगुर आहे, ते आनंदात जगा!
  देव, या संकल्पनेची चेष्टा मला करायची नाही. सत्यनारायणाची कथा ऐकली ना, की माझी खूप करमणूक होते. किती विरोधाभास आहे हं पहा तुम्हीच – दोन उदाहरणं देते.
  १. आई-वडीलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून दारी आलेल्या विठ्ठलाचं स्वागत पुंडलिकाने विटेने केलं. विठोबा अजूनही विटेवर उभा आहे पंढरपुरी.
  २. सत्यनारायणाच्या कथेत नवरा परत यावा म्हणून कलावती सत्यनारायणाची पूजा करते व पती परत येत आहे ही बातमी कळताच प्रसाद भक्षण करायला विसरते म्हणून सत्यनारायण पतीची नौका नदीत उलटून देतात.
  या उदाहरणांतील सत्यनारायण आणि विठोबा म्हणजे विष्णूच ना! वृंदेच्या पातीव्रत्यामुळे तिच्या राक्षस पतिचा संहार करण्यास असमर्थ ठरलेल्या विष्णूने तिच्या पतिचं रूप घेऊन वृंदेचा पातिव्रत्य भंग केला. तरीही तो देव??
  देवाची कल्पना काय आहे आपली? लक्ष्मी व्रताची ही पुस्तकं वाटणं म्हणजे पूर्वी ’संतोषीमातेच्या’ नावाची पोस्टकार्ड्स यायची, हल्ली देवांची ईमेल्स येतात, त्यातलाच प्रकार आहे. बरं, तुम्हाला माहित नसेल तर सांगते. या लक्ष्मीव्रतात महालक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत असे दोन प्रकार आहेत. वैभवलक्ष्मी म्हणजे वैभव मिळण्यासाठी एकदम जालीम उपाय असतो असंही कळलं आहे. आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ब्राह्मण सामाजाने ब्राह्मणेतर समाजाची जशी दिशाभूल केली, त्यातलाच प्रकार हा!
  महेंद्रजी, आपल्याला देवांच्या फोटोंबद्दल, पुस्तकांच्या कव्हर्सबद्दल इतकी काळजी वाटते. कारण आपण पापभिरू माणसं. गणपती विसर्जनानंतर दुस-या दिवशी गणेशमूर्तींची जी दुरावस्था होते त्याचं काय करायचं?

  • गणपतीचा फोटो आहे मग ते फाडुन कसं टाकायचं?? तुमचं म्हणणं खरं आहे.शेवटी आपण पापभिरु माणसं.. माझे वडिल तर लग्नाच्या पत्रिका पण फाडुन फेकत नाहीत तर नदिमधे शिरवतात निर्माल्याबरोबर.. 🙂

 9. jivanika says:

  खरं सांगायचं तर मी तुमच्या मनाशी अगदी सहमत आहे. मला मान्य आहे कि पूर्वीच्या लोकांनी ज्या परंपरा तयार केल्या आहेत त्या काहीतरी विचार करूनच केल्या असतील. पण आपण आज त्या सगळ्या गोष्टींचा वेगळाच अर्थ काढून भरकटत जात आहोत. मीसुद्धा नास्तिक नाही पण फक्त देव देव करून आपल्याला सगळ मिळत असा मला वाटत नाही. माझ स्पष्ट मत आहे कि या सगळ्या गोष्टी माणसाला निष्क्रिय बनवतात. या गोष्टीवर वाद होऊ शकतो पण तरीही.

  • परंपरांचा अर्थ हा माझ्या मते केवळ समाजाला एकत्र ठेवण्यासाठीच असावा, जसे एकत्रीत पणे साजरे करायचे सण.. किंवा व्रत वैकल्य.. ह्या मुळेच समाज संगठीत राहण्यास मदत होते.बरेचदा वेगळा अर्थ काढला जातो, आणि अनेकदा अर्थ अगदी शब्दशः घेतला जातो. मी सध्या कुराण वाचतोय, त्यावर पण लिहिन लवकरंच..

 10. anukshre says:

  रामकृष्ण परमहंस पुस्तक मी वाचलेले नाही परंतु त्यांची जीवन पद्धती मला माहिती आहे. आपल्या मनातले विचार पुस्तक रूपाने का होईना हे ‘गुरु’ अधिक स्पष्ट करतात. मन गुरु म्हणून मानत नसेल हि कदाचित पण प्रेरणा दायी स्त्रोत तरी कुठेतरी मिळतोच कि जो आपल्या मनात ठसतो. बाकी विषय छान मांडलात पूर्ण अनुमोदन.

  • जर वाचलं नसेल तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने रामक्रिषण परमहंसांचं गॉस्पेल ( ज्या मधे त्यांचा शिष्य एम म्हणुन जो आहे त्याच्याशी साधलेला संवाद आहे) ते जरुर वाचावे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक केवळ रामक्रिषण परमहंसांच्या मठातंच मिळतं. विषय खुपच सेन्सिटीव्ह आहे, म्हणुन आधी विचार केला की पोस्ट करु नये, पण नंतर म्हंटलं ,की वास्तविकते पासुन आपण किती दिवस दुर पळणार?? म्हणुन पोस्ट करुन टाकला..

 11. Sagar says:

  Mala vatat ha vadacha mudda banvu naye……KAran ha Purnatah jychacya tyachya shrdhecha prasn aahe……Jar konala ya puja madhun aatmik samadhan labhat asel tar tyat vavage kahi nahi…..Koni purush ysanachya aahari n jata jar karm kandat aaple man ramavat asel tar mala tari tyat vavage vatat nahi…Mhnun ughach he karmkand mhanje nivval thotand ahe…..ya mhannyla kahi ek arth rahat nahi…

  • वादाचा मुद्दा बनवु नये या गोष्टीशी मी सहमत आहे.. श्रध्देला कोणिच चॅलेंज करित नाही इथे..

 12. shyam says:

  MBK, Tase pahilya tar pratyakaychya vaicharik drishticone ahe. Mala ek kaltaya sarvat pahilye apan Manus mhanun jagayala shiklo ani manavata hach ek dharm jar palal tar sagalye kahi sope ani anandi hoil. shevti pooja archa yabaddal mala vatate jug nirman karnari ani tich samtol thevnari ji shakti ahe tilach poojave. Mug tumi tila dev mhana, alla mhana, yeshu mhana kiva hava te mhana. Mandir todo, Majjit todo magar kisi ka dil mat todo. Pratyak mansachi shraddha hi kontya n kontya goshtivar aste. Shevti me manhel andhshradha soda & shraddha balga.

 13. संजिव सिध्दुल says:

  मी लहान होतो त्यावेळी आमच्या घरी होणाऱ्या सत्यनारायणाची पूजा अजुनही आठवतात. पूजेसाठी एक पंडित ठरलेलेच होते. अगदी मस्त पूजा करायचे. आणि कथाही मस्त सांगायचे. त्या कथांमधून बरच शिकायला मिळायचं. ते एक कथा नेहमी सांगायचे. आता ती कथा इथे पूर्ण लिहिणं जमणार नाहि. पण त्यातून एक शिकवण द्यायचे की अंधश्रद्धा कशा तयार होतात. ‘आपण कुठलीही पूजा, साधना करतो त्या वेळी त्या मागची संकल्पनाच मुळात लक्षात घेत नाही. फक्त कोणीतरी सांगतयं, कोणी तरी करतयं म्हणुन आपण करतो. आणि इथेच अंधश्रद्धा सुरु होतात. पण त्या मागील संकल्पना जर लक्षात घेतली तर बऱ्याच चुकिच्या रुढींना आपण आळा घालू शकू व ज्या चांगल्या आहेत त्या त्याच चांगल्या उद्देशाने करू शकू.’
  मी हेही मान्य करतो की ज्या माझ्या घरी अशा अर्थपूर्ण पूजा झाल्या त्याच घरी आज या लक्ष्मीव्रताची किमान ५-६ पुस्तकं तरी आढळतिल. ही सर्व पुस्तके आईला अशीच कोणी कोणी दिलेली आहेत. पण एका गोष्टीचा अभिमान वाटतो की अजुन तरी माझ्या आईने कधी कोणाला अशी पुस्तके दिली नाहित आणि या पुढेही ती देणार नाहि. पण ती स्वीकारणे नाकारू शकत नाहि.

  त्यामुळे मला असं वाटतं की श्रद्धा, भक्ति, वगैरे व त्याच्या पद्धति ह्या वैयक्तिक बाबी आहेत. जो पर्यंत त्या गोष्टीचा इतरांना, समाजाला त्रास होत नाहि तो पर्यंत त्यात कोणी ढवळा ढवळ करू नये. कारण ह्या सर्व गोष्टिमागे मानसशास्त्र आहे. आणि बदलायाचेच झाले तर ते सर्वांनी मिळून बदलावे. हिंदू धर्मामधे दर १२ वर्षानी होणाऱ्या कुंभमेळाव्यांचा खरा उद्देश हाच होता की, सर्वांनी एकत्र यावे व सध्या आपल्या धर्मात कोणत्या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत; ज्या आहेत त्यांचं सध्याच्या काळात काय स्वरूप असावं ह्यावर विचार विनिमय करावा व योग्य ते बदल घडवून आणावे. मान्य, की आज या आशयाने कुंभमेळावे भरवलेच जात नाहित. पण सध्या ह्याही बाबतीत योग्य ते बदल होत आहेत.

 14. sahajach says:

  एक अतिशय संवेदनशील मुद्दा घेतलात आज….तूमचे मतं पटले. माझ्या माहेरी माझे आजोबा कधिही पूजा करत नसत, त्यांचे एकच मत होते माणसातला देव ओळखा आणि नेहेमी चांगले वागा. बाबा देवावर विश्वास ठेवतात पण कर्मकांडांवर नाही. आम्ही औरंगाबादला असताना आम्हाला एकदा एकजण म्हणाले होते, “बालाजीच्या महत्वाला मानत नाही तो बालाजी पाहून घेइल तुम्हाला!!!!”…खरच सांगते ती व्यक्ती आजही जिथे आहे तिथेच आहे पण आमची मात्र प्रगती होतेय, बालाजीच्या कृपेने!!!!तो बघतोय ना!!!!
  असो,माझाही कर्मकांडांवर विश्वास नाही. याबाबत अमितच्या ९५ वर्षाच्या आजीचे फार छान मत होते, कुठल्याही योग्य बदलाचे ती स्वागत करायची आणि म्हणायची, हे बघा ज्या प्रथा आहेत त्यांचीही सुरूवात आपल्यासारख्याच कोणितरी केलेली आहे, मनातली श्रद्धा महत्वाची, नेहेमी चांगले वागा, देव काहिही मागत नाही!!!!

  • मला याचं फार बरं वाटतंय की एकही प्रतिक्रिया ही मुद्दा सोडुन नाही.. अगदी मुद्देसुद पणे सगळं मांडलंय प्रत्येकाने. श्रध्दा जरुर असावी, आम्ही पण श्रध्दा ठेवतो, पण .. अंधश्रध्दा नाही. मी पण नेहेमी हेच म्हणतो, देव कधीही माझं वाईट करणार नाही, जर एखाद्या सैतानाने वाईट करण्याचा प्रयत्न केला तर माझा देव मला वाचवील.. ही झाली श्रध्दा..

 15. Amol says:

  गणपतीचा फोटो आहे मग ते फाडुन कसं टाकायचं?? तुमचं म्हणणं खरं आहे.शेवटी आपण पापभिरु माणसं.. माझे वडिल तर लग्नाच्या पत्रिका पण फाडुन फेकत नाहीत तर नदिमधे शिरवतात निर्माल्याबरोबर.. 🙂

  apan kiti diwas as nadi madhe takun pani kharab karat rahnar….devanche photo asale tari te kagadch na? mhanun jivanasathi avashak pani apan gadhul karato ahot….thoda vichar karun paha

  • अमोल
   तुमचे म्हणणे अगदी संयुक्तिक आहे . पण तुम्हीच सांगा, तुम्ही आम्ही स्वतःच्या वडीलांचा, किंवा आईचा फोटॊ पायदळी तुडवु शकाल कां? जरी तो जुना झाला असेल, आणि जीर्ण झाला असेल, तरिही आपण ते करु शकणार नाही.कारण, आपल्या दृष्टीने त्या कागदावर आईचा फोटॊ असल्यामुळे त्या कागदाला महत्व आलंय.. जेंव्हा की तो एक केवळ कागदाचा तुकडा आहे..
   बस्स्स.. हेच होतं नेमकं..!

 16. Rajeev says:

  मुसलमान मौलवींचे फ़तवे काय..आणी अशी व्रते सांगणारे भटजी, गुरूजी,
  गुरू काय..कुठल्याही धर्माची वाट कशी लावायची हेच ते शीकवू शकतात……

  बाकी कर्मकांड कोण करतो ?
  स्व:ताच्या आत्मीक बळाचे अस्तीत्व वीसरलेले लोक हे करू जाणे !!
  त्य़ांचा देव फ़ोटो मधे आहे..
  आत्मवीश्वास असणार्यांचा माणसात आणी कर्तूत्वात…..

  समाजात ४ प्रकारचे लोक आहेत
  १) सुशीक्शीत – सुसंस्क्रुत
  २) अशीक्शीत – असंस्क्रुत
  ३) अशीक्शीत – सुसंस्क्रुत
  ४) सुशीक्शीत – असंस्क्रुत
  आपला समाज ४ थ्या प्रकार चा आहे

  • सुशिक्षीत- असंस्कृत.. हे मस्त लिहिलंस…इतक्या कॉमेंट्सला रिप्लाय करुन माझ्या कडे आता लिहिण्यासारखं काहीच राहिलेलं नाही.. :).

 17. Rajeev says:

  अमोल,
  पत्रीका आणी निर्माल्य वीसर्जीत करतात..
  शीरवत नाहीत

 18. laxmi says:

  खूपच सेन्सिटिव इश्यू आहे हा .देव आहे की नाही हे माहीत नाही पण नक्कीच अशी एक शक्ति असेल
  (माझ तरी असे मत आहे…) जिणे ही सुंदर सृष्टी निर्माण केली.
  @ Ravindraji,agree wid your some points.मुद्दे छान प्रकारे एक्सप्लेन केले आहेत.

  पूजा,व्रत-वैकल्य,उपवास वगैरे ह्यामधे किती श्रद्धा आणि अंधश्रद्धा मानायची हे प्रत्येकावर अवलंबून आहे.
  आणि हो एक मात्र खरे की संकट आले की सर्वाना देवाची आठवण येतेच ना!!!
  (मग ती व्यक्ती कितीही नास्तिक असली तरी देवाच नामस्मरण एकदा तरी करेलच).

  • लक्ष्मी
   देव नाही असं कोणीच म्हणत नाही. देव आहेच..श्रध्देच्या निखाऱ्यावर राख बसली की तिची अंधश्रध्दा होते. 🙂

 19. राजीव
  अरे मीच वर कुठेतरी तसं लिहिलं होतं, अमोलने फक्त मी लिहिलेलं कॉपी पेस्ट केलंय.. चुक माझीच आहे खरी…

 20. bhaanasa says:

  महेंद्र, खरं तर आता वेगळं काही लिहावं असं उरलचं नाहीये. तू व वरील सगळ्यांनी अगदी नेमकं व मुद्देसुद मांडल आहेच. मी सहमत आहेच. मात्र त्या फॊरवर्डेड मेल्सचा धुमाकूळ भन्नाटच चालतो. खरेच कधी कधी जो माणूस अश्या गोष्टींवर विश्वास ठेवत असेल असे चुकूनही वाटत नाही त्याच्याकडून आले की माझा आ च वासतो. देव आणि दानव हे दोन्हीही आपल्यातच आहेत. आपण कुठला मार्ग चालतो यावर सगळे अवलंबून आहे.

 21. मला पण कांही जास्तिचं लिहायला शिल्लक नाही… 🙂
  मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.

 22. Madhuri says:

  फार छान वाटले तुमचा लेख वाचून. संपूर्ण चर्चा देखील वाचली. आता नमूद करायला गंमत वाटते पण मी सुद्धा वैभवलक्ष्मी व्रत केले होते. मला सुद्धा पूजा वगैरेचा फार कंटाळा आहे. पण त्याचा एक फायदा म्हणजे घरातील वातावरण धार्मिक राहते. तसेच मनात भलते सलते विचार येत नाहीत. माझ्या सासरी तर श्रावणापासून जो धुमाकूळ सुरू होतो ना तो दिवालीपर्यंत चालतो. जाम कंटाळा येतो नोकरी सांभाळून असे उद्योग करायचा! पण करावे तर लागतेच!

  • माधुरी
   आमच्या घरी पण असाच प्रकार असतो. अगदी अतिरेक म्हणा ना.. आज काय श्रावण सोमवार, उद्या काय तर अंगारकी, परवा, एकादशी, मग प्रदोष.. असं सारखं सुरु असतं..
   तुम्ही पण केलं होतं ते व्रत?? 🙂 खरंच इतक्या सहजपणे लिहिलेलं वाचुन मजा वाटली.. 🙂

 23. sneha says:

  काका, पोस्ट खरच खूप च छान झाली आहे आणि खरच खूप सेन्सिटिव इश्यू आहे हा. इश्यू नीही आहे पण आपण लोकांनी तो इश्यू बनवला आहे. खरे तर माझी कॉमेंट खुपच उशिरा आहे, रीसेंट्ली च मी तुमच्या ब्लॉग ला सबस्क्राइब केला आणि फीडर मला रोज तुमचे जुने पोस्ट्स अनरेड दाखवतो. सो आता वाचायचा योग आला आहे. तुमचा ब्लॉग खरच वाखाणण्यासारखा आहे. किती सारे विषय तुम्ही निर्भीडपणे हाताळलेले आहेत.
  पोस्ट बद्दल म्हणाचे तर, हे पटलय की काही रूढी समाज एकत्र बांधून ठेवण्या साठी केल्या गेल्या होत्या. पण काही केवळ ब्राम्हण समाजाने स्वत:साठी बनवल्या. किती गोष्टी आहेत, पुजेपासून ते अगदी नवसापर्यंत. नवस ह्या गोष्टी चे मला खरच आश्चर्य वाटते. एकीकडे आपण म्हणतो की देव आपल्याला सर्व देतो आणि दुसरीकडे त्यालाच म्हणतो की मला हे दे तर मी तुला ते देतो. अन् वर हे म्हणायचे की जर ते परत देवाला दिले नाही तर देव आपले वाईट करतो, वाईट करतो तो देव कसा बरे! अन् देवच जर सगळे देत असेल तर असे आमिश् दाखवून काय मिळणार आहे? साधे लॉजिक आहे.मला अस वाटते की देव ही एक पॉज़िटिव एनर्जी आहे, जी माणसाने मानलेली आहे. आपण जे करतो त्यासाठी सर्वस्वी आपण जबबदार असतो. चांगले झाले की देवाने दिले आणि वाईट झाले की देवाने शिक्षा दिली ही संकल्पनाच चुकीची आहे. पण आपण वाढलेच असे आहोत की देव शिक्षा देतो ह्या भीतीने आपण बर्‍याच गोष्टी करतो. अगदी लहानपणीच्या देवबाप्पा शिक्षा देतो पासून ते अजूनही सत्यनारायणाच्या पूजेपर्यंत! शेवटी आपणच ठरवायचे आहे की ह्याची सीमा कोणती.
  तुम्ही सजेस्ट केलेले गॉस्पेल नक्कीच वाचेन. अजून एक माझ्या वाचनात आलेले छोटेसे पुस्तक होते तरुणासागर महाराजानी लिहिलेले. मी शक्यतो अशी पुस्तके वाचत नाही पण त्यानी पुस्तकात परखडपणे मानवी वृत्ती आणि देवावरची dependency ह्याचा practically मेळ घातला आहे ते आवडले.

 24. nitinbhusari says:

  धर्म (कर्मकांड) आणि भक्ति
  या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s