तुमचं आमचं सेम असतं…

वरच्या ओठावरची लव थोडी दाट झाल्यासारखी ,सारखं आरशात बघतांना आपलाच चेहेरा वेगळाच वाटणं, एखादी सुंदर मुलगी दिसली की कांही तरी होणं.. मग अगदी ओझरता स्पर्श साडीचा जरी झाला तरीही त्या मुळे जीव कासावीस होणं….तसं काहीसं वाटणं…. हे सगळं म्हणजे नुकतंच वयात येण्याचं लक्षण ..

आय ऍम टू ओल्ड फॉर बार्बी टु यंग फॉर डीस्को.. नावाची एक अमुल चॉकलेटची जी जाहिरात यायची ती अगदी बरोब्बर याच वयाच्या मुलांच्या बद्दलची आहे.. जस्ट १३ वय झालेलं असतं. शारिरीक  बदल, अस्वस्थ करित असतात. तसेच  अपोझिट सेक्स कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. आधी ज्या मुलींचा तिरस्कार वाटायचा, आता त्यांच्याच कडे पाहील्यावर छान वाटायला लागतं- इव्हन त्यांच्याशी मैत्री पण करावीशी वाटते..

बरं आपण मुलींशी बोलतो , हे कुठल्याही मित्राला कळू नये असं वाटु लागतं. कारण मित्रांच्या मधे मुलीशी मैत्री करणारा तो ’बायल्या ’ अशी कन्सेप्ट असतेच.आणि या वयात मित्र म्हणजे तर विश्व असतं.त्यांच्यामध्ये कमीपणा आलेला कोणालाच खपत नाही…

. त्या वयात मिशी पण आलेली नसते. पण लवकर यावी अशी मनोमन इच्छा मात्र असते. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयोग पण केले जाता..दाढी मिशी आलेली नसली तरीही मित्राने सांगितलं की बाबांचं ब्लेड फिरव दाढीवरून, म्हणजे लवकर येईल बघ दाढी  मिशी हा सल्ला…… आणि मग घरी कोणी नसतांना केलेला तो उपद्व्याप.. हनूवटीवर कापून रक्त आल्यावर मग घाबरणं…. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं का?? मला वाटतं हो.. होत असावं… कारण माझ्या बाबतीत तर झालं होतं असं.

या वयातुन तुम्ही आम्ही सगळेच गेलेलो आहोत. कायम आपलं हदय हातावर ठेऊन दिसेल त्या मुलीवर प्रेम करण्याचा नाठाळपणा ( कारण त्या प्रेमाला प्रेम म्हणवत नाही मला. हवं तर इंग्रजी शब्द क्रश वापरा  पण प्रेम … नाही!)आपण सगळ्यांनीच केलेला असतो.या वयात भावविश्वात खूप बदल झालेला असतो. माझा तर  १३ ते १६ वयात दोन तिन दा तरी नक्कीच प्रेमभंग झाला होता 🙂 तसा तो प्रत्येकाचाच होतो, मग मी तरी त्याला अपवाद कसा काय ठरणार??.

माझा पहिला क्रश माझ्या एक टिचर होत्या… त्या मला खुप आवडायच्या.इतक्या  त्या जो विषय शिकवायच्या त्या विषयाचा पिरीयड आला की मस्त वाटायचं.. सारखं त्यांच्या हालचाली कडे बघत रहावंसं वाटायचं. पण लवकरच म्हणजे सहाच महिन्यात त्यांचं लग्नं झालं आणि बस्स.. झाला की पहिला प्रेम भंग.

आमच्या घराशेजारी एक कन्या शाळा होती. त्यामुळे रोज सकाळी , दुपारी संध्याकाळी बऱ्याचशा सुंदर सुंदर मुली शाळेत जायच्या. तेंव्हा त्यांच्याकडे पण पहात एकतर्फी प्रेम करित दिवस कंठत होतो.असो..

आज हे वर जे कांही लिहिलंय , ते म्हणजे आजच्या विषयाची प्रस्तावना.  मुलांच्या या भावविश्वाची नोंद घेउन कोणी कविता वगैरे लिहित नाहीत. पण मंगेश पाडगांवकरांनी मात्र नवा दिवस म्हणून एक काव्य संग्रह प्रकाशित केला होता . त्या काव्यसंग्रहातील कविता याच वयातल्या मुलांच्या भाव विश्वाशी जवळीक साधणाऱ्या  आहेत..

तो कविता संग्रह  जरी तो १३ते१५ वयोगटातल्या मुलांसाठी जरी लिहिला असला, तरीही आपल्याला जुने दिवस आठवण करुन देतो.. याच काव्य संग्रहातली माझी आवडती कविता आहे ती इथे पोस्ट करतोय..

माझ्या वर्गामधली
मुलगी नटी सारखी दिसते!
वेणिला देउनिया झटका
परीसारखी अल्लड हसते!

मी न कधी बोललॊ तिच्याशी,
मी नाही तसला अगाउ!
शाळेमधे अभ्यासाविण
लक्ष कुठे न देतो जाऊ!

बेल वाजली दरवाजाची,
जाउनिया मी दार उघडले;
ती मुलगी दारात उभी की!
माझे डोळे थक्क जाहले!

मला म्हणाली ,” आत येउ का”?
“अवश्य ये !” मी हसुन म्हंटलं
असेल अडचण गणितामधली ,
म्हणुन आली, मला वाटले!

तोच अचानक बसला माझ्या
पाठीवर जोराचा रट्टा!
“ऊठ!  ऊठ!,” ओरडले बाबा
“सांग किती झोपणार मठ्ठा?”

डोळे चोळीत दचकुन ऊठलो
तोच पाठीवर पुन्हा रट्ट!
आणि सुरु  अधिकच जोराने
बाबांच्या  तोंडाचा पट्ट!

खरं तर आजची पोस्ट टाकायला फारसा वेळ नाही. ताबडतोब निघायचंय साईटवर जायला. म्हणून घाई घाईत एक लहानशी पोस्ट टाकायची म्हणून लिहायला बसलो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

42 Responses to तुमचं आमचं सेम असतं…

 1. mandar says:

  प्रत्येकाच्या मनात एका दूर कोपऱ्यात दडलेल्या या सर्व कल्पना इथे सुंदरपणे मांडल्या आहेत.. हा लेख वाचल्यावर सर्वांना नक्कीच त्यांचा शालेय जीवन आठवेल..
  धन्यवाद महेंद्र काका

 2. आनंद पत्रे says:

  डिट्टो! मी नववीला असतानाच वर्ष झर्कन डोळ्यासमोरून गेले…. खरंच ‘तुमचं आमचं सेम असतं’

  • आनंद
   नवा दिवस जरुर वाचा. मस्त आहे कवितांचं पुस्तक १३-१४ वर्षाच्या मुलांसाठीच खास लिहिलंय मंगेश पाडगांवकरांनी.आणि ते पुस्तक वाचलं की आपले जुने दिवस नक्कीच आठवतात..

 3. bhaanasa says:

  खरयं खरयं……:P कोणीतरी आपल्याकडे वारंवार पाहते आहे-घुटमळते आहे हे याच वयात मुलींना बरोबर कळायला लागते. मग कधीकधी तो न दिसल्यास उगाचच, ” अरे! कुठे गेलाय आजकाल, दिसत नाही.” अशी नोंदही होते…पण मनातच बरं का.:) तुझ्या एकतर्फी प्रेमाची नोंद असेल बघ कदाचित त्या मुलीकडे…..हाहा….. बाकी कविता एकदम धमालच आहे. शेवटच्या चार ओळी मस्तच.

 4. sahajach says:

  महेंद्रजी मस्त आहे पोस्ट…उगाच बाईगिरीचा आव आणत मी नाही त्यातली न म्हणता खर सांगते हे मुलांचेच नाही पण मुलींचेही असेच…तेव्हा तुमचं आमचंही सेम असतं!!!!तुम्ही ऑर्कूटवर टाकलेला तुमचा फोटो टाका ना!!!

 5. सचिन says:

  काका,शाळेतुन फिरून आलो………

 6. मला “शाळा” हे पुस्तक आठवले. असेच वर्णन आहे त्यात शालेय जीवनाचे.

 7. मस्त कविता आहे! शाळा – कॉलेजच्या बरोबर – प्रेमभंगाच्याही ;)- आठवणी जाग्या झाल्या…
  खरंच काय सॉलिड दिवस असतात ते!!

  • शाळेला जाता
   परतुन येता,
   ती एक मुलगी
   रोज हसायची…
   शाळेच्या वाटेवर…

   ’घे घे रे घे रे.. घेरे सायबाच्या चालिवर म्हणा ही कविता..
   …:)

 8. Manju says:

  Kharach tumacha aamacha same asata barr ka..

  aamchi kanya shala hoti tyamule Jr coolege che te divas “Phulpankhi” hote…
  majja aali haa Mahendra jee..

  • मंजु
   प्रतिक्रियेकरता आभार वगैरे लिहिलं तर ते फारच फॉर्मल वाटतं, म्हणुन लिहित नाही. मस्त होते ते दिवस…… 🙂

 9. anukshre says:

  अजिंक्य १३ चा आताच पूर्ण झाला. सध्या मी हे सगळे त्याच्या बरोबर एन्जोय करते. अजूनही बाबांची कॉपी चे बहारदार किस्से आहेत. लिहीन त्यावर. मिशी मला का दिसत नाही त्या मुलासारखी अजून? लवकर हवे आहे सगळे, मी मात्र त्याचे लहानपण मिस करते.बाबांच्या ब्लेड चा प्रयोग आमच्या कडे ही झालाय.

 10. Rohini says:

  मस्त झाली आहे पोस्ट आवडली :). मजेचे असतात ते दिवस आणि नंतर त्या दिवसांच्या आठवणी सुद्धा. एवढ्यात परत आलात?

  • रोहिणी
   इतक्यात येणं कसं शक्य आहे? मस्त पैकी टाळलं जायचं, .नेमकी त्याच वेळेस कारवारला मिटींग निघाली.. एक मेजर रिर्ट्रोफिट आहे त्या संदर्भात, म्हणुन टाळता आलं….
   आणि माझा एक इंजिनिअर आहे, त्याला पाठवुन दिलं. तो पोहोचलाय पोर्ट ब्लेअर ला. नेमकी पुढे जाणारी शिप शनिवारी आहे,म्हणुन त्याला म्हंटलं की बाय रोड जा.. … १२ तास प्रवास , आदिवासी भागातुन…उद्या पोहोचेल पोर्ट वर.

 11. आरती says:

  अगदी अगदी…..आता माझा मुलगा नववीत आहे, त्यामुळे मी त्याच्या कडे जरा लक्ष ठेवुन आहे! खरंच हे दिवस फार छान असतात..फक्त फार मनाला लावून घेऊ नये अशी इच्छा! कारण याच वयात एकदम नैराश्य येण्याचीही शक्यता असते.
  अभ्यासाचं प्रेशर असतं, आणि मन दुसरंच गाणं गात असतं…

  • एवढं सिरियसली घ्यायची पण गरज नाही. प्रत्येकाच्याच बाबतीत थोड्या ना थोड्या प्रमाणात घडतंच.. आणि त्यातुन मुलं बाहेरही लवकरंच पडतात..

 12. ravindra says:

  खरय हे. अगदी तुमचं आमचं सेम असत. मला हि हा लेख वाचून शाळेचे दिवस आठवले. ते वयच अस असत. आरतीने लिहिल्याप्रमाणे आपली मुल मोठी झाली कि आपण त्यांची काळजी करतो. 😦 मस्त वाटल वाचून. 🙂
  वर्गातली एखादी मुलगी आवडते आणि तिच्याशी गप्पा माराव्याश्या वाटतात. पण समोर आली कि कसं तरी होत. आणि कविता सुचते.
  शाळा भरली कि डोळे तुझ्याच कडे पाहत राहतात,
  घंटा वाजली कि तुझ्या चेहऱ्याकडे टक
  लावून असलेले डोळे खाडकन उघडतात,
  शाळेत आणखी काही पिरिअड व्हावेसे वाटतात
  तुला मला सर्वांना हे असच होत का रे?
  तुमचं आमचं सेमच असता का रे ?

  • रविंद्र
   सकाळी दुसरा काहीच विषय सुचला, नाही आणि ही कविता आठवली, म्हणुन हे पोस्ट लिहिलंय.. फुलपाखरी दिवस संपले याचं वाईट वाटतं कधी तरी…पण चालायचंच.. चेंज इस इनएव्हीटॆबल..

 13. शिनु says:

  🙂

  सुंदर कविता आणि प्रस्तावना पण झ्याक. ते सगळंच तुमचं आमचं सेम असतं बरं कां, अगदी अर्ध्या झोपेत पाठीवर पडलेल्या रट्ट्यापासून सगळंच. :p

 14. काका नेहमीप्रमाणेच सगळं वर्णन कसं तंतोतंत… त्या दिवसांची मज्जा काही वेगळीच असते. भुतकाळाची सैर करून आणल्या बद्दल धन्यवाद!!!

 15. आनंद पत्रे says:

  महेंद्रजी, माझ्या मते आता तुम्ही तुमचा ब्लॉग सार्वजनिक ठेवू नका, लोकमतमधील चौर्य, ट्विटर वर पाहून सर्द झालो.
  फक्त सलेक्तेड लोकांनाच अपृव करा (मला सुद्धा) 😉

 16. Amruta says:

  हे same same फक्त मुलांमध्येच नाही तर मुलींमध्ये पण असतं बरं का..
  मस्त लिहील आहे आणि कविता तर खूपच सहज सोप्पी आणि सुंदर आहे

  • अमृता
   ते पुस्तक अप्रतिम आहे. बोलगाणी प्रमाणे कां फेमस झालं नाही ते कळंत नाही.पाडगांवकरांच्या कविता तर प्रत्येक वयासाठी लिहिलेल्या आहेत.

 17. abhijeet says:

  खरंच ‘तुमचं आमचं “सगळ्यांचेच” सेम असतं’…
  छान लिहलय…

 18. sagar says:

  Sir Tya lokmat chya kissyabaddal ek savistar postch taka…..plzzzz

 19. Aparna says:

  बापरे चाळीस कॉमेन्ट्स नंतर खरंतर नाही टाकली तरी चालेल कॉमेन्ट बहुतेक पण तरी…my 2 cents…..साधारण या विषयावर नागेश कुकुन्नुरचा चित्रपट आला होता “रॉकफ़ोर्ड” पाहिलात का?? आणि काय तुमचं आमचं सेमच असतं आणि मला वाटतं सर्वांचं ते तिथंच आटपतं पण…:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s