द लोनली पिपल….

नागपुरचा एन आय टी गार्डन.. अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे हे.

आत्ताच प्रभात फेरी आटोपून आलो. हल्ली दररोज न चुकता एक तास तरी फिरून यायचा पायंडा पाडलाय. नागपुरला एक बगिचा आहे , त्रिमूर्ती नगरला. काल जेंव्हा या बगिचा फिरायला गेलो, तेंव्हाच जाणवलं की असा बगिचा मुंबईला नाही. अतिशय सुंदर मेंटेन केलेला आहे. आजचा विषय़ हा ’बगिचा’ नाही.

बगिचा मधे सकाळी ५-३० ची वेळ. बहुतेक सगळे वयोवृद्ध लोकं बगिचामधे आले होते. बगिचा अतिशय सुंदर आहे. जॉगिंग ट्रॅक जवळपास अर्धा किमी ते पाउण किमी अंतराचा आहे. अतिशय सुंदर हिरवळ , आणि त्यात काल तर मस्त पाउस होता सकाळी. हातात आईची पिवळ्यारंगाची छत्री घेउन मी फिरायला गेलो होतो. 🙂

या बगिचात अगदी पहाटे म्हणजे ५-३० वाजता कांही मध्यमवयीन आणि कांही  वयोवृद्ध लोकं काठी टेकत आले होते. काही म्हातारे लोकं तर केवळ गप्पा मारत बसलेले दिसले. एक गोष्ट लक्षात आली, की वय वाढलं की मग मरणाची भिती वाटू लागते आणि मग तरुण पणी केलेली शरीराची हेळसांड भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जातात.कांही लोकं अगदी ट्रॅक सुट घालुन तर कांही नाईट ड्रेस मधे कान टोपी मफलर गुंडाळून होते – जसे मांडी न घालता येणारे लोकं जेंव्हा मांडी घालण्याचा प्रयत्न करित होते, किंवा हात उंच करण्याचा प्रयत्न करित होते तेंव्हा मात्र खरंच केविलवाणं दिसत होतं………. असो….

जे कोणी लोकं बगिचात होते त्या पैकी प्रत्येक माणुस वेगवेगळा व्यायाम करित होता. कोणी योगा, तर कोणी इतर आसनं . काही लोकांचं लक्षात आलं की त्यांचा हात त्यांना वर करता येत नाही तर काही लो्कांना मांडी घालता येत नाही. ही लोकं आपल्याला जे जमत नाही तेच करण्याचा अट़टहासाने करण्याचा प्रयत्न करित होते. ज्यांचं वय  खूप जास्त झालंय अशा एक आज्जी, ज्यांना कदाचित संधिवात त्रास असाव्या त्या  तर एका बेंच वर बसून एका हाताची बोटं उखळीत मुसळ फिरवल्या प्रमाणे फिरवत दुसऱ्या हाताने फिरवत  होत्या. प्रत्येकाचा आपापल्या परीने  आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करित होते, कदाचित आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये अशी इच्छा पण असावी या मागची.. पण अगदी खरं लिहितोय.. या मधे   कांही प्रयत्न हे अगदी केविलवाणे वाटत होते.

एका बाजुला योगा शिबिर सुरु होतं . तिथे  एक स्वामी योगा शिकवत होते. मी जवळपास दिड तास ट्रॅक वर फिरलो, आणि या दिड तासात या सगळ्या मंडळींचं अवलोकन केलं. यात दोन प्रकारचे वृध्द दिसले, एक म्हणजे सुखवस्तू आणि दुसरे म्हणजे त्रासलेले.. एक त्रासलेल्या आज्जी तर बेंच वर आजोबांच्या शेजारी बसून दिड तास सारखी कसली तरी कम्प्लेंट करित होत्या. पण काही मात्र अगदी इमाने इतबारे व्यायाम करण्याचा प्रयत्न करित होते.एक आजोबा वय बहुतेक ६० च्या वर असावं, स्किपिंग करतांना पण दिसले- आता या वयात स्किपिंग केल्याने प्रोस्ट्रेटचा त्रास होऊ शकतो हे त्यांना कोणी सांगितलेलं दिसत नव्हतं.. म्हणून ते काम आज मी केलं.. नको तिथे नाक खुपसायची सवय आहेच ना मला…

कांही तरुणी पण दिसल्या. जॉगिंग करता आलेल्या. तसेच कांही आंबट शौकीन पण होते त्या मुलींच्या मागे पुढे जॉगिंग करणारे. चला , या निमित्ताने का होईना , तरुण जॉगिंग करतात हे पाहुन बरं वाटलं. कालच्या पावसामुळे वातावरण खुप मस्त झालेलं होतं. झाडावरची फुलं … छान दिसत होती.सकाळी घरुन निघालो तेंव्हा शेजारच्या घराच्या दारावरचा चमेलिचा मांडव फुलांनी डवरला होता आणि सुवास मन वेधून घेत होता.दीर्घ श्वास घेउन हा गंध श्वासात समावून घ्यायचा प्रयत्न केला..

बहुतेक रोज फिरणारे लोकं हे ठरलेले असतात, त्यांच्या मधे मी एकटाच नवीन असल्यामुळे सगळे लोकं हा कोण एलियन? म्हणून  पहात होते. मी मात्र सगळ्यांकडे पाहून ओळखीचं स्मित देऊन त्यांना हा कोण असावा बरं- कुठे पाहिलंय याला?? असा विचार करायला उद्युक्त करित होतो.स्मित दिल्यामुळे त्यांना कदाचित वाटत होतं की मी कोणी ओळखीचा आहे म्हणून.. असो..

हेल्थ जुस...

फिरणं झालं, आणि बगिचाच्या गेटजवळ एक माणुस रंगीत द्रव्य असलेल्या बाटल्या घेउन बसलेला दिसला. त्याच्या समोर जाउन उभा झालो, तर त्याने सांगितले की हे सगळे जुस आहेत. अगदी आवळा, कारलं, कडुलिंब, तुळस, आलं, लिंबु, बिट, गाजर, गव्हाचे अंकुर, दुधी, असे अनेक रस होते. आणि हेल्थ अवेअरनेस म्हणा हवं तर.. बरेच लोकं ते जुस पित पण होते. मी पण एक कडुलिंब आणि आवळा जुस घेतला. हा विकणारा माणुस सांगत होता की रोज सकाळी साडेतीन वाजता उठून जुस बनवून आणतो आणि इथे सकाळी ५ वाजताच येउन बसतो. प्रत्येक जुसची खासियत माहिती आहे या माणसाला.बराच वेळ गप्पा मारल्या त्याच्याशी. म्हणाला, हल्ली विक्री चांगली होते… लोकांचा अवेअरनेस वाढलाय हेल्थ बद्दलचा..

राजिवचं सध्या चेन्नई ला काम सुरु आहे.चेन्नाइ ला त्याला एक प्रोजेक्ट मिळालाय. नेहेमी चेन्नै ला जावं लागतं ( या गावाचं नांव पुर्वी चांगलं मद्रास होतं, पण मद्रासी लोकं लुंगी नेसतात, आणि त्याला चेन – नसते, म्हणुन नांव चेन्नाई -( चेन -नाही) ठेवलं असावं असं वाटतं. तो कांही दिवसांपूर्वी चेन्नाईला गेला असता, तिथे पार्थसारथी नगरला उतरला होता. तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिराचं आर्किटेक्चर खुप चांगल आहे म्हणून तिथे तो नेहेमी जायचा. तिथे कधीही गेलात तरी बरेचसे वृध्द लोकं बसलेले दिसायचे. दोन तिन दिवसांच्या नंतर सहज एकाला विचारले, की मी इथे सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही आलो, तरी पण तुम्ही इथेच असता? हे कसं? तर ते आजोबा म्हणाले, इथे येउन बसणाऱ्यांची मुलं परदेशी गेलेली आहेत. इथे घरी वेळ जात नाही, म्हणून आम्ही सगळे इथे येउन एकत्र वेळ घालवतो. पैसा भरपूर आहे.. पण करायचं काय? या वयात नातवंडांना खेळवण्याची इच्छा नातवंडांचे फोटो पाहून पुर्ण करावी लागते.

राजिवला  हात धरुन बराच वेळ त्यांनी बसवून ठेवलं. कदाचित हात सोडला तर तो लवकर निघुन जाइल.. म्हणुन असेल… विचारलं, तु काय करतोस, म्हणाला आर्किटेक्ट आहे, तर ते म्हणाले की बरं झालं तु आय टी मधे इंजिनिअरिंग नाही केलंस ते.. कमीत कमी तुझ्या मुलांना तरी तुझे आई वडील म्हातारपणी पाहू शकतील ,खेळवू शकतील.

हा प्रश्न केवळ परदेशी जाणाऱ्यांचाच नाही.. इथे आमच्या इथे पण भारतात घर सोडुन आई वडिलांपासुन दुर रहाणारे लोकं आहेतच ना? मग केवळ परदेशी कोणी गेला, ्म्हणून त्याला  आई वडिलांनी   दोष देणे योग्य वाटत नाही,मुलांचं पण आपलं करिअर असतंच..
.भारतात राहुन आईवडिलांना वर्षा्नू वर्षं न भेटणारे लोकं पण आहेतच.. !! बरेच आई वडील, जे फायनान्शिअली स्टेबल आहेत ते एकटं रहाणच पसंत करतात. त्यांना पण त्यांची स्पेस हवीच असते.

असो विषयांतर होतंय .. एक सांगावसं वाटतं.. नागपुरचा कायापालट झालाय बऱ्याच बाबतीत.. :)लेख फार मोठा होतोय, म्हणून संपवतो इथेच…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

14 Responses to द लोनली पिपल….

 1. sahajach says:

  मोठा आवाका आणि अनेक कंगोरे आहेत या विषयाला….ते एकटेपण परिस्थितीने आलेले असतो, शारिरीक व्यांधींमुळे असो त्रास देतेच…..खरय तुमचं आई-वडील एकटे पडायला मुलं परदेशीच जायला हवीत अशी अट नाही….
  पण एक मुद्दा असाही आहे की हे जे फायनान्शिअली स्टेबल लोक आहेत ते स्वत:च्या स्पेसचा बराच बाउ करतात…माझ्या पहाण्यात असेही आजी आजोबा आहेत ज्यांचा सुनांना सुना आल्या तरिही हे निवृती पत्करायला तयार नाहीत…किंवा सुनेच्या अडी निडीला जे कधिही धावून जात नाही स्वत:च्या नौकरीचे किंवा अन्य काही कारण सांगुन….अश्या वेळेस कळत नाही काय बोलावे!!!!
  तसा हा एक व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे…असो
  बाकी लेख मस्त…

  • अगदी खरंय. राजिवने काही दिवसांपुर्वी एक फोन केला होता चैन्नै हुन तेंव्हापासुन डोक्यात घोळंत होतं, ते आज लिहिल्या गेलं.ब्लॉगिंग सुरु केल्या पासुन अगदी लहान सहान गोष्टी कुठे ऐकल्या किंवा पाहिल्या की त्या सबकॉन्शस मनात घर करुन बसतात, आणि अशा अवचितपणे कागदावर उतरतात… अगदी विचार न करता , आपोआप !!!! .. मग नंतर वाटलं की हे डिलीट करावं, पण राहु दिलं..

 2. anukshre says:

  आम्ही पण परदेशात लोनली आहोत. पण काहीही करू शकत नाही. परदेशी विशेषतः
  आपले मुल अमेरिकेत जावे म्हणून पालकच त्यांना तयार करतात.अशा वेळी मानसिक स्पंदने वयोरुद्ध झाल्यामुळे
  सहजच येणे स्वाभाविक आहेत. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते लवकर लिहिणार आहे ह्या नाण्याची दुसरी बाजू.असो कालाय तस्मे……..

  • अगदी खरं आहे.. हा अतिशय नाजुक विषय आहे. लिहिण्याच्या ओघात ते लिहिलं गेलं.. असो… तुमच्या पोस्ट्ची वाट पहातो.

 3. तुमचा हाही लेख सुंदर आणि प्रवाही आहे. हल्ली हल्लीच तुमचे लेख वाचायला सुरूवात केल्याने ’राजीव’चा संदर्भ कळला नाही.

  sahajach च्या मताशी १००% सहमत. प्रत्येकाला स्पेस तर हवीच नाहीतर अतिप्रेमानेही गुदमरायला होतं. मात्र आपल्यावर प्रेम असणा-या व्यक्तींना (आई, वडील, मुलगी, मुलगा, सून, इ. इ.) आपण तितक्याच उत्कटपणे प्रतिसाद देऊ शकत नसू, तर निदान त्यांच्या प्रेमाचा आदर करणं आपण शिकलं पाहिजे. शिवाय स्पेस ही प्रत्येकाला हवी आहे, हे प्रत्येकाला कळायला हवं. कारण आपल्याला स्पेस हवी आहे असं म्हणताना ही लोकं दुस-याच्या खाजगी गोष्टीत नको इतकं लक्ष घालतात. आपण जे कार्यक्षेत्र निवडलं आहे, तेच दुस-याने निवडावं हा अट्टहास धरतात, तेव्हा ’स्पेस’च्या नावाने ओरडणारी हीच का ती लोकं असा प्रश्न पडतो. सल्ला आणि जबरदस्ती यातला फरक या लोकांनी शिकला पाहिजे. दोन मनांमधे दरी पडण्यासाठी मनाची दारं बंद केली की काम होतं, त्यासाठी लांब जाऊन रहाण्याचीही गरज पडत नाही.

  पूर्वी ठाण्याच्या येऊरला सकाळी सकाळी जॉगींगला गेलं की तिथेही असा एक ज्युसवाला असायचा. तुम्ही लावलेला फोटो पाहून लेख वाचण्याआधी त्या ज्यूसवाल्याचीच आठवण झाली.

  • राजिव म्हणज़े माझा मावसभाउ कम मित्र… आम्ही दोघांनी लहानपणापासुन मटरगश्ती केली आहे बरोबर. तो सध्या एक प्रतिथयश आर्किटेक्ट आहे .ब्लॉग वर जो स्वामी राजरत्न नावाने कॉमेंट टाकतो नां.. तोच..! आज जेंव्हा लिहायला बसलो, तेंव्हा तर केवळ एन आय टी गार्डन बद्दल लिहायचं ठरवलं होतं.

   पर्सनल स्पेस.. हा जो मुद्दा आहे तो खुपच नाजुक आहे. मला वाटतं प्रत्येकाच्या जिवनाशी याचा थोडा ना थोडा तरी संबंध आलेला असेलच.. कुठे तरी खुपतं ते मनामधे.. म्हणुन असं लिहिलं जातं. शेवटी ब्लॉग चं नांवच काय वाट़्टेल ते असल्याने लिहिलं जे मनाय येइल ते..म्हणुन जे लिहिलं ते राहु दिलं. कारण एक आहे, जर तुम्ही एकदा लिहिलेलं खोडलं, तर नविन लिखाण जमत नाही .. असं माझं मत आहे. म्हणुन हा नियम केलाय ब्लॉग वर लिहितांना , पहिले जे लिहिलं.. ते शेवटपर्यंत तसंच ठेवायचं.

 4. शिनु says:

  आई शप्पथ. हे वाचताना डोळे भरून आले आणि शेवटी घळघळा वहायलाच लागले………..आता रडू का जोरात? डोळे भरून येण्याची कारणं दोन एक म्हणजे अलिकडेच माझे वडिल मनानं अचानकच थकून गेलेले या दिवाळीच्या सुट्टीत जाणवलं……अगदी गणपती पर्यंत पहाटे चार वाजता भांडी खडाखड वाजवत चहा करतात आणि आमच्या साखरझोपा घालवतात म्हणून आम्ही सगळे त्यांच्यावर वैतागत उठायचो. त्यावेळेस ते म्हणायचे “काय म्हातार्यासारखे लोळत पडलाय, ऊठा पहाटेच्या मस्त गार हवेय व्यायाम करण्याचा आनंद काय असतो ते पहा तरी”……आणि आत्ता दिवाळीत सकाळचे आठ वाजले तरी पांघरून घेऊन झोपलेले पाहून गलबलायचं……..काही सांगायला गेलं तर “आता वय झालं असं वाटतंय गं म्हणून हात हातात धरायचे”……..अखेरीस त्यांना महिनाभरात पूर्वीसारखे “देवानंद”(हे आम्ही त्यांना लाडानं म्हणतो) बनवूनच आले….नाऊ आय ऎम हॆप्पी!
  कारण क्रमांक दोन…..मला तीन तीन मुलगेच आहेत आणि तीच माझी ईस्टेट आहे असं ऐटीत मिरवणार्या सासू सासर्यांना मुबलक पैशाशिवाय काहीच देऊ शकत नसल्याची खंत खुपच दिवसांपासून बोचत होती. कधी कधी वाटतं आपण त्यांना ते मागतील तितके किंबहुना न कागताही पैसे देतो त्यामागे त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही हा गिल्ट तर नाही? इकडे आम्हाला काही अडचणी आल्या म्हणजे दोन्ही पोरं एकदम आजारी पडली…अचानक टूर आली…अशा कोणत्याही कारणानं त्यांना हाक मारली की बॆग घेऊन दुसर्या दिवशी दारात हजर होणारे “आई बाबा” …….आम्ही सगळं सोदून त्यांच्याजवळ गावी जाऊन राहू शकत नाही आणि त्यांचं सगळं सोडून ते आम्हा कोणाहीजवळ रहायला तयार नाहीत……….सगळा गुंता…..मी ही अशा एकट्याच फ़िरणार्या आजी आजोबांना बघते तेंव्हा, दुखरे गुडघे घेऊन व्यायाम करणार्या आई आठवतात……काय करावं? चुकतंय का काही? सगळेचजण आनंदी रहातील असा मधला मार्ग असुच नये का?

  लेखाच्या अखेरीस लिहिलेलं शब्दश: खरं आहे. अमेरिका काय आणि मुंबई काय. त्यांना गरज असते तेंव्हा त्या क्शणाला आपण तिथे नसतो हेच खरं आहे.

  • मी जे कांही लिहिलंय तो माझा पण अनुभव आहे. माझे पण आईवडिल मुंबईला रहाण्यास तयार नाहीत… एकदा त्यांना जबरदस्तिने नेले होते तर दोन महिन्यानंतर सोडुन परत निघुन आले. आता वर्षात एखादा महिना येतात.
   सुपर क्लास वन ऑफिसर म्हणुन रिटायर्ड झाल्यामुळे पेन्शन पण भरपुर… म्हणजे खूप मिळते… ..त्यांना नागपुरलाच बरं वाटतं.. नशिबाने ८२ वय झालं तरिही पुर्ण ऍक्टिव्ह आहेत. पण एकटे रहातात इथे म्हणुन काळजी ही वाटतेच.. त्यांना कधी काही आजारपणात गरज वगैरे लागली तर इथे कोणिच येउ शकत नाही. मुलींचे कॉलेज, सौ.चं ऑफिस, माझा तर टुरिंग जॉब.. कसं जमणार?? मग येतो गिल्ट!!!! एक्झॅक्टली तुम्ही लिहिलं तसंच…. असो..

 5. bhaanasa says:

  आईबाबांपासून लांब राहणे….आमची तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे.आईबाबा तिकडे व लेक इकडे. जाये तो किधर जाये…इथे आलो तेव्हांपासून मनात फार फार उदास-अपराधी वाटत राहते.:( दोन वर्षांपूर्वी बाबा पुन्हा आजारी पडले तेव्हां मी रातोरात उठून निघाले रे पण तोवर आईला एकटीलाच सगळ्याला तोंड द्यावे लागले. नुसती जीवाची तगमग झाली माझ्या…..हा विषय फार फार गहन व हळवा आहे.नेमक्या गरजेच्या क्षणांना ते एकटे असतात ही जीवघेणी जाणिव पाठ सोडत नाही.
  ज्यूसवाला मस्त. अरे आमच्या कचराली तलावापाशीही एकजण असतो. विशेष म्हणजे तो संध्याकाळीही असतो.( हल्लीचे मला माहीत नाही ) त्यामुळे बरेचदा आम्हालाही चाखायला मिळायचा.:)

  • खरंय तुझं म्हणणं.. मला पण नेहेमी गिल्टी वाट्त असतं.. पण काय करणार?? असो..
   मी कारले, कडुलिंब आणि आवळ्याचा जुस ट्राय केला. काल गव्हाचे अंकुर असतात त्याचा + तुळस मिक्स पण ट्राय केला. चव कांही फारशी धड नसते. पण चलता है…

 6. Rajeev says:

  आम्हा मुर्ख लोकांना हे का कळ्त नाही, की जगात एकच गोष्ट अशी आहे
  जी आपल्याला लहान पणी घ्यायची अस्ते आणी म्हातारपणी मीळावी ही अपेक्शा असते..
  ——” वेळ “………..
  आपल्याला आपल्या लहानपणी न मागता आई बापांनी दीली.. ती वेळ
  त्यांना त्यांच्या नडीला द्यायलाच हवी…ती वेळ

  स्वामी राजरत्नानंद

  • स्वामीजी
   लाखात एक बोललात…. तुझ्याच कॉमेंटची वाट पहात होतो. थोडी आधी टाकली असतिस तर बऱ्याच लोकांना वाचता आली असती…

 7. nitinbhusari says:

  एकदम मनाला भिडलं. आमचीही अशीच अवस्था.

  आम्ही तीघे भाऊ, मी सगळ्यात मोठा, नागपुरला., मधला तिवस्याला, लहान अकोल्याला, आई बाबा नागपुर जवळच (अगदी 25किमी) गावाला राहतात. आमच्या सोबतच रहा म्हणून कितीही विनवण्या केल्या तरीही तयार नाही, कारण काय तर करमत नाही.

  आई आजारी पडली की बाबांना खुप त्रास होतो आणि आम्हाला त्यांचा त्रास पाहून आम्हाला खुप दुःख होते.

  • नितीन,
   खूप गोष्टी ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत , त्या सरळ सरळ मान्य करून टाकल्या की सोपं पडतं.. आणि जगणं पण सुसह्य होतं: मी नेहेमीच नागपूरला चक्कर टाकत असतो, आजही नागपूरलाच आहे :, तेव्ढीच भेट झाली की बरं वाटतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s