चविने खाणार…कोचिनला

बरेच दिवस झाले एकही खाण्यावर पोस्ट नाही. म्हणून आजची पोस्ट लिहायला घेतली आहे. इथे कोचीन ला आलो की आवर्जून जायची काही ठिकाणं आहेत माझी. तसं कोचीन वेस्टर्न रीजन मधे येत नाही, पण नेव्ही च्या कामा साठी  इकडे यावं लागतं.  जर हे काम सोडलं तर कोचीनला येण्याचे काहीच काम नाही.

मेडिकेटेड गरम पाणी....

इथे आल्यावर काही जागा नक्की केल्या गेल्या आहेत . दिवसभर तर साईटवर म्हणजे पोर्टवर असतो, मग एकदा आत गेलं की पुन्हा बाहेर चालत  केवळ जेवणासाठी येणं  कंटाळवाणं होतं, म्हणून दुपारचं लंच स्किप केलं जातं. पोर्ट मधे प्रायव्हेट कार्स अलाउड नसल्यामुळे चालतच फिरावं लागतं सगळीकडे…

मंगळवारी इथे आल्यावर लोकल ऑफिस मधे जाउन आमचा एक जुना मित्र आहे सध्या इथला ब्रांच मॅनेजर, त्याला भेटलो. शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर रातको कहा जानेका? म्हंटल्यावर त्याने इथल्या रामवर्मा क्लब चं नाव घेतलं. हा क्लब १०० वर्षांपेक्षा पण जुना आहे. पुर्वी अगदी इ्लीट क्लास इंग्रज या क्लबचे मेंबर्स असायचे. त्यांच्या नंतर देशी  टॉप क्लास इथे येतो. म्हणे मेंवरशिप मिळणं पण कठिण आहे.

फिश टिक्का केरला स्टाइल..ऍम्बियन्स खुपच सुंदर आहे क्लबचं.. जवळपास दीडतास बसलो होतो क्लब मधे. इथली स्पेशालिटी म्हणजे फिश टीक्का .. मोहरीची डाळ वाटून लावल्याने एक तिव्र असा सुगंध असलेली आचारी स्टाइलचा फिश टिक्का आणि आणि चिकन सॉसेजेस.. एकदम मस्त आहेत ड्रिंक्स सोबत म्हणून खायला. आम्ही तिघं होतो, जवळपास तीन चार प्लेट तर नक्कीच संपवल्या असतील दोन्ही डिश मिळून. फिश तर इतकं सॉफ्ट की एकदम तोंडात घातल्या बरोबर विरघळणार. इथे कोचीनला आलो की बांगडे, सुरमई, पापलेट.. हे सगळं विसरायचं.. इथे आलो की फक्त टुना फिश खायची असा माझा दंडक आहे. मग ती टुना फिश बऱ्याच प्रकारात समोर येते. त्या पैकी एक टिक्का हा माझा आवडता प्रकार.

गन पावडर

बराच वेळ बसल्यावर, मग जेवायला कुठे जायचं? तर आंद्रा स्टैल नावाचं हॉटेल आहे क्लब पासून दोन मिनिटांच्या अंतरावर.. अगदी चालत जाण्यासारखं.. त्याचं नांव नक्की करण्यात आलं. आता केरळात येउन आंध्रा स्टाइल जेवण

कसं काय प्रिफर करतो मी? तर ही जागा न टाळता येण्यासारखी आहे. जोश जंक्शन पासून अगदी १०-२० फर्लांग असेल.. इथे व्हेज , नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. तसंही चिकन आणि फिश खाऊन झालं होतंच.. त्यामुळे व्हेज जेवणच मागवलं.शेजारीच तंदूर रेस्टॉरंट पण आहे.. ते पण बरंय..

समोर आधी एक केळाचं पान आणुन ठेवलं. आणि ती फेमस आंध्रा चटणी (चिंचेचा कोवळा पाला +चिंच+ मिरची)  आणि ती पावडर चटणी असलेलं ते स्टॅंड टेबलवर आणून ठेवलं. मी त्या चटण्यांना गनपावडर म्हणतो. इतक्या तिखट असतात त्या दोन्ही. मग एखाद्या पंगती मधे वाढायला यावं त्याप्रमाणे आधी एक वेटर येउन दोन तीन  भाज्या,रस्सम, सांबार आणि दही वगैरे वाढून गेला.

जेंव्हा तो  वेटर भात वाढायला येतो, तेंव्हा त्याने वाढणं सुरु करण्याआधीच नको नको म्हणायचं, म्हणजे तुम्हाला हवा तेवढाच वाढला जाईल भात. 🙂 नाहीतर एका सेकंदामधे मोठा डोंगर तयार होतो आपल्या समोर….एकदा तर तो डोंगर बघून भिती वाटते की कसा संपणार हा म्हणून.. पण एकदा सुरु केलं की लवकरच सगळं संपतं. खूप टेस्टी जेवण असतं इथलं.. व्हेज -नॉन व्हेज का्हीईही असो.. इथे एकदा व्हिजीट मस्ट!!

खाणे हा माझा अगदी आवडता पास टाइम. अगदी खरं सांगायचं तर खाण्यावर अगदी मनापासुन प्रेम करतो मी. अरे हे तर रोहनचं वाक्य !!!

इडीअप्पम सोबत स्ट्यु.. हे कधी कधी कोकोनट ग्रेव्ही मधे पण असतं.

दुसरा दिवस सकाळी वूड्लॅंड हॉटेलमधे गेलो होतो इडिअप्पम खायला इडीअप्पम आणि स्ट्यु – बेस्ट कॉम्बीनेशन आहे. थोडं आंबट जास्त वाटलं ईडीअप्पम , पण चांगलं लागत होतं.. मग शेवटी इडली वडा ऑर्डर करुन लवकर नाश्ता संपवला आणि साईटला गेलो. हे वुडलॅंड हॉटेल खुप चांगलं झालंय आजकाल. हार्बर व्ह्यु मधे नेहेमी उतरतो पण सध्या कुठली तरी डॉक्टर लोकांची कॉन्फरन्स असल्यामुळे  सगळं हॉटेल बुक करुन ठेवलंय त्या लोकांनी.. वुडलॅंडस्चं इंटीरियर पण मला आवडलं. रेस्टॉरंट एकदम मस्त आहे. टिपिकल मल्लू टच आहे डेकोरेशनला..

दुपारी चक्क दोन वाजता काम आटोक्यात आलं, आणि लंचसाठी वेळ मिळाला.. म्हणून दुपारी मेट्रोपोल मधे जाउन

हॉटेल वुडलॅंड्स

ऑथेंटीक केरळा फुड ट्राय करायचं हे ठरवलं. इथे गेल्यावर फिश करी (अर्थात टुना फिश) आणि उकडा भात . किंचित लालसर असलेला हा भात ह्यांचं कॉम्बो एकदम अप्रतिम.. ही टुना फिश जी आपल्या कडे खुप महाग असते ती इथे स्वस्त असल्यामुळे मुबलक प्रमाणात मिळते. टुना चं मीट अगदी देशी चिकन सारखं असतं. एकदा खाल्लं की पापलेट , सुरमाई एकदम मिळमिळीत वाटायला लागेल. मीटमधे देशी चिकन प्रमाणे रेशे असतात.. अल्टीमेट डिश आहे ती.

केरळा लंच

केरळ लंच.. टुना फिश करी राइस आणि व्हेज साईड डीश

इथली ती  भाजी ज्यामधे केळी , शेवग्याच्या शेंगा आणि इतरही काही भाज्या मिक्स असतात तीच नाव आता विसरलो पण ती एक भाजी आणि दुसरी म्हणजे बिन्सची भाजी कोंकणी पद्धतीने नारळ घालुन केलेली एकदम झकास.. सोबतीला आणखीन दोन ग्रेव्ही असलेल्या भाज्या आणि सांबार वगैरे होतंच..

सगळं संपवून अगदी आकंठ तृप्त होऊन उठलो आणि त्या वेटरने आणून ठेवलेलं ते गुलाबीसर रंगाचं गरम पाणी प्यायलो. हे लोकं जेवताना गरम पा्णी पितात – कोंकणातल्या प्रमाणेच.त्या पाण्यामधे कसली तरी मुळी उकळुन घातल्यामुळे त्याला तो टिपिकल लालसर रंग येतो.. साब ऐस्क्रिम?  म्हंटलं नै मंगताय…. !!!! 🙂 अरे जागाच नव्हती हो आइस्क्रिम साठी..

२४ तास कॉफी शॉप.

रात्री जेवायचं नाही हे आधीच ठरवून टाकलेलं होतं. पण रात्र झाल्यावर जेंव्हा फिरायला निघालो तेंव्हा इथलं २४ तास कॉफी शॉप आहे तिकडे पाय वळलेच.. आणि तिथे गेल्यावर एक पुट़्टू विथ चेना केरी  🙂 म्हणजे चना करी मागवली. पुट़्टु माझी फेवरेट डिश आहे. ही कशाही बरोबर खाता येते. बांबुच्या आत तांदुळाची जाडसर पावडर आणि नारळ एकत्र करुन भरतात आणि मग ते वाफवतात. खुप सुंदर चव येते त्या तांदुळाला , नारळात वाफवल्यामुळे.

काही लोकं वाफवतांना एखादं लिंबाचं पान किंवा, गाजर किस वगैरे पण सोबत टाकतात ज्यामुळे एक वेगळी चव आणि फ्लेवर येतो. लिंबाचं पान घालुन केलेला पुट़्टू मला खुप आवडतो. या पुट़्टु सोबत चना मसाला आणि दोन आप्पलम .. जबरी कॉम्बो आहे.. शेवटी कॉफी घेउन ऊठलो आणि परत आलो.

२४ तास कॉफी शॉप. म्युझियम समोरचं

पुट्टू विथ चना करी.

पुट्टू विथ चना करी.. मस्त डिश आहे ही.

.केरळला असतांना आपले काही लोकं पण दिसतात हॉटेल्स मधे. त्यांची ऑर्डर करण्याची पद्धत बघून जरा नवल वाटतं. ते इथे पण पराठा, रोटी वगैरे मागवतात. इथे आल्यावर इथल्या स्पेशल डेलिकसीज जर तुम्ही खाल्ल्या नाहीत तर काय अर्थ आहे? इथे आलात तर हे सगळे दिलेले प्रकार, आणि अजुन एक प्रकार आहे सालन नावाचा, सालन विथ पराठा हा पण नक्की ट्राय करा..

खूप मोठं होतंय पोस्ट.. म्हणून आता थांबवतो. इथेच पुढच्या वेळेस अजुन काही जागा… इथल्या कव्हर करीन..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , . Bookmark the permalink.

32 Responses to चविने खाणार…कोचिनला

 1. Abhijit says:

  लेख वाचून तोंडाला पाणी सुटले एकदम ! दक्षिणेत जावून तिकडचे मासे आणि भात खाल्लाच पाहिजे लगेच असे वाटू लागले आहे ! फोटोपण फार सुंदर आहेत. btw, भात वाढण्याआधी नाही नाही म्हणायची आयडिया तुम्हाला कोणी सांगितली का एकदा अनुभव घेतलाय त्याचा ? 😛

  • अभिजित
   एकदा घेतलाय अनुभव. अख्खं ताट त्यानी रिकामं केलं माझ्या पानात काही बोलण्यापुर्वीच.. आता जो भात वाढलेला दिसतोय तो नाही म्हंटल्यावरचा.. आणि तेव्ढ्यातच झालं माझं. इथले लोक असे दोन तिन सर्व्हिंग्ज घेतात. इथली फिश करी खोबरेल तेलातली असते, पण एकदम अप्रतिम… गोव्या नंतर खावी तर केरळातली फिश करी.. फिश करी ही आप्पम किंवा इडिअप्पम बरोबर पण खातात. मला ट्राय करायची होती पण राहुन गेलं..

 2. Aparna says:

  रात्रीची जेवणं झाल्यावर वाचलं तरी वाचून आणि फ़ोटो पाहून सॉलिड भूक लागली आहे. मजा आहे तुमची काम तर काम आणि खाना तर खाना…अशा ट्रिपा असल्यावर सगळेच फ़िरतीच्या नोकर्या करायला तयार होतील…
  मी ट्युना कधी भारतीय पद्धतीने खाल्ला नाहीये. इथे अमेरिकेत त्यांच्या पद्धतीची मेयो मारलेली सॅंडविचेस खाल्लीत. पण आता त्यासाठी केरळला जायला पाहिजे असं वाटायला लागलं.
  माझी इथे एक केरलाईट मैत्रीण मागे एकदा पुट़्टू खायला बोलावत होती. शेवटी जायचं राहिलं आणि आता तर आम्ही तो भाग सोडून दूर आलो. त्यासाठी पण केरळ …थोडक्यात काय तर आता पुढच्या भारतदर्शनात केरळला पहिली पसंती…:)

  • केरळला तर जायलाच हवं. प्रत्येक भागाची एक खासियत असते . पण नेमकं आपण कुठेही गेलं तरी आपल्या नेहमीच्या टेस्टचं मिळत का ते बघतो. केरळला येउन फिश करी राइसच खायला हवा. तंदुरी रोटी अन व्हेज कोल्हापुरी नाही… 🙂 आणि नेमकं तेच चुकतं आपलं. मी सकाळी रेस्टॉरंटमधे पाहिलं तर आपले मराठी टुरिस्ट तेच नेहेमी प्रमाणे इडली दोसा आणि ऑम्लेट ब्रेड घेउन बसले होते. थोडी हिम्मत करुन नविन काही तरी ट्राय करायला हरकत नसते खरं तर..

 3. अप्रतिम पोस्ट आहे. तोंडाला पाणी सुटले.
  फिश म्हटल्यावर मला पण परवापर्यंत खाल्लेले मालवणी आठवतंय. वेंगुर्ल्याला बांबू रेस्टॉरंट आहे तिथे अप्रतिम फिश मिळते. आम्ही ३ दिवस तिकडेच पडीक होतो. शिवाय शौकिनजनांसाठी आचमनाचीपण सोय आहे 🙂
  गोव्यात रेषाद मसाल्यातले फिश आणि आंबटतिखपण वेड लावतंय.

  केरळी मित्र शोधला पाहिजे आता कुणीतरी 🙂
  त्या घरगुती जेवेण मिळेल अशा जाहिराती देऊन कंडक्टेड टूर्स नेणाऱ्या कंपन्यांचे मला फार हसू येते. जायचंच कशाला मग… घरीच बसायचं.

  • या कॉमेंटला काय उत्तर द्यावं म्हणुन विचार करित होतो सकाळपासुन. वेंगुर्ल्याला अजुन गेलेलो नाही, एकदा गेलो तेंव्हा सौ. बरोबर होती. म्हणुन नॉन व्हेज खाता आलं नाही. आपलं साधं डाळभात आणि कोबीची भाजी खाल्ली होती.. 🙂 गोव्यातल्या खुप चांगल्या जागा माहिती आहेत. त्यात एक म्हणजे जर तुम्हाला शेल फिश ची ऍलर्जी नसेल तर स्टार रेस्टॉरंट मधे क्रिस्पी फ्राय शेल्स मिळतात.
   बाहेर निघालं, की त्या भागात जे काही फेमस आहे, ते खायचं.. मी कधीच रोटी वगैरे खात नाही साउथ इंडियात गेलो की.

 4. vikram says:

  इतक इसकटून नका सांगत (लिहित) जाऊ ओ कसतरी होत
  संपूर्ण पोस्ट नोनस्टोप वाचला आणि पोटच भरलं

  ढेकर देऊनच प्रतिक्रिया देत आहे बाकी
  जवळपास तिन चार प्लेट तर नक्कीच संपवल्या असतिल दोन्ही डिश मिळुन. असे म्हणायला लागले एवढी ड्रिंक झाली होती का ?

  • विक्रम
   नाही फार नाही.. फक्त तिन !! आणि आम्ही तिघं होतो नां.. मग तेवढं हवंच.. दाणे, चणे,पापड नव्हतेना काही.. म्हणुन..

 5. RAJEEV says:

  खाण्यासाठी आटा पीटा..
  मला सोडून गाठलं होटेल,
  आता तुझे धोतर सूटेल..

  अरे भटा, अरे भटा……..
  पुढच्या वेळेस मला वीसर..
  केळीच्या साला वरून पंगतील घसर..

  अरे भटा, अरे भटा…अरे तू असा कसा ?..
  पोटा मधे दारू अन त्यात पोहतो मासा..

  ( हा लेख वाचून फ़ार चीड चीड होते आहे…)
  ढेर पोट्या भटा…
  आता तुला शाप देतो
  तुला दोन दीवस पुण्याच्या सुवर्णरेखा मधे जेवायला लागेल….

  • अरे तु जेंव्हा एकटा चैन्नाइ ला पडिक असतोस, तेंव्हा मी पण घरी फोडणीचा शिळा भातच खातो ना नाश्त्याला? करतो का कधी कम्प्लेंट ? मग??
   तु पण ये पुढच्या वेळेस.. सोबत. फिरायला मस्त आहे जागा.. हवं तर तुला पण नेतो, पण पुण्यातल्या हॉटेलमधे ते ही सुवर्णरेखा मधे साखर घातलेली कोशिंबीर खायला घालू नकोस रे बाबा. तुला हवं तर मी नेतो सोबत माझ्या.. 🙂

 6. RAJEEV says:

  चीडु नको…
  सकाळी फ़ोडणीची पोळी मीळाल्या मुळे असे
  काही बाही शाप तोंडात येतात……..

  • तुला कोणी सांगितलं की मी चिडणार म्हणुन? मला तर तुला चिडलेलं बघुन मजा वाटते आहे.. आणि हो, पुढच्या आठवड्यात अहमदाबादला आहे. तेंव्हा पुर्ण ड्राय.. आणि फाफडा अने जलेबी खाउन रहाणार.
   हिवाळा आहे, त्यामुळे उंधीयु पण मिळेल.. 🙂 येतोस कां?

 7. सकाळी सकाळी अशी चविष्ठ पोस्ट वाचुन मन तृप्त झालं…. आणखी एक खुसखुशीत – खमंग पोस्ट! – बघु.. या मंथएंडला केरळच्या प्लान – अजुन झिरो फेज – मध्ये आहे!

  अरे हां, ब्लॉगवरती ते “स्नो फॉलचा इफेक्ट” मस्त दिसतोय… थंडी आणि ख्रिसमस आल्याची जाणीव!

  • कालच ठरवलं होतं की ह्याच विषयावर लिहायचं म्हणुन.. हो. ते स्नोफॉल इफेक्ट नविनच सुरु झालाय वर्डप्रेसवर. ऍक्टिव्हेट करुन पाहिलाय..
   केरळचा प्लान असेल तर नक्की करायला हरकत नाही..

 8. gouri says:

  प्रेमाने मासे खात नाही तरी पाणी सुटलं तोंडाला 🙂
  जिथे जाऊ तिथली खासियत चाखून बघितली पाहिजे हे खरंच. तिथे जाऊन वरण भाताचा आग्रह धरण्यात मजा नाही.
  केरळी स्टाईलमध्ये ’इश्ट्यू’ म्हणतात ना स्ट्यू ला? 😀

  • अहो, मी खरं तर अगदी बाळबोध ब्राह्मण घरातला. घरी तर अंडं पण चालत नाही. नौकरी निमित्य बाहेर पडलो आणि सगळं चाखुन पाहिलं.. फक्त बिफ /पोर्क नाही. इश्ट्य़ुच म्हणतात .. बरोबर पकडलंत..

 9. anukshre says:

  मस्कत म्हणजे दुसरे केरळ आहे. पोस्ट मस्त आहे. मी सर्व प्रकार घरी करते.तुम्ही नाव विसरला ते अवियल आहे. कोणी फ़्रमाईश केली तर रेसीपी ची पोस्ट लिहीन.

  • अवियल.. हो तेच होतं नांव.. त्याने प्रत्येक भाजीची नावं सांगितली पण सगळी विसरलो. इथला कलिग म्हणाला की तुम्ही त्या पुट़्टू चं पात्र न्या सोबत.. म्हंट्लं नको रे.. बायकोला वेळ नसतो फारसा.. आजकाल म्हणे अल्युमिनियमचं पण भांडं मिळते.. मी पाहिलेलं नाही, पण बघु या पुढच्या वेळी.

   आणि हो चेट्टीनाड चिकन आणि राइस पण मस्त आहे कॉम्बो.. 🙂

 10. श्री महेंद्र
  लेख वाचून तोंडाला पाणी सुटालं .फ़ोटो तर फ़ारच छान घेतलेत. God’s own country तील जेवण सुध्दा तोंडात बोटे घालायला लावणारे दिसते . आपली लेख लिहण्याची पद्दत आवडली .मी पण प्रयत्न करतोय लिहायचा. आपला उपक्रम असाच सुरु ठेवावा.

  • अक्षय
   धन्यवाद. काही तरी खरडत असतो. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा एक वर्ष लिहु असा संकल्प होता. आता एक वर्ष होतंय १७ जानेवारीला. तो पर्यंत तर नक्कीच लिहित रहाणार आहे, नंतर बघु पुढचं.

 11. आनंद पत्रे says:

  जवळपास २ लिटर पाणी गेलं तोंडातून… 🙂 हि खादाडी पोस्ट फारंच खमंग होती….

 12. akhiljoshi says:

  तुम्ही माहिती देणार
  आणि आमच्या तोंडाला पाणी सुटणार.
  पोट तुमचे भरणार आणि
  आमची जीभ नुसती ओली होणार?
  तरीपण इतक्या छान खाद्यालेखनाबद्दल आभार

 13. sahajach says:

  सकाळपासून कमेंट लिहायला टाळत होते……सकाळीच अत्याचार होतो हा असा!!!! फोटो नका बरं टाकत जाउ…..मस्त फोटो पहायचे वर वर्णन वाचायचे आणि मनावर ताबा ठेवत कमेंट टाकायचे…..
  आता बहिणीकडे गेले की ताव मारणार सगळ्या डिशेशवर (व्हेज हो!!!)…तुम्ही लिहिलेल्या ठिकाणांची यादीच घेउन जाते बरोबर!!!!!

  • जरूर.. व्हेज पण चांगलं आहे तिथे. अर्थात थोडी चव डेव्हलप करावी लागते. तसंही सुप्रिया आहेच नां.. त्यांना जास्त माहिती असेल माझ्या पेक्षा 🙂

 14. Rohan says:

  वा… फोटोसकट चवदार वर्णन … टुना फिश टिक्का तिकडे नोर्वे आणि US ला खुप खाल्ला पण आपल्याकडे सुद्धा इकडे मिळतो हे नव्हते माहीत. बाकी मल्लू स्टाइल सर्व नावे नोंदवून घेतलेली आहेत… बरं का … 🙂 आता इकडे गेलो की अर्थात ह्या जागा ट्राय नक्कीच करणार.

  बाकी शेवटी बरोबर बोललास … जिकडे जावे.. तिकड़चेच खावे … नाहीतर मज्जा काय … 😀

  • टुना फिश मला सगळ्यात आवडणारी फिश. अरे एकदा कॅव्हिअर खाउन पाहिलं, पण एकदम मळमळणं सुरु झालं.. क्रॅकर्सवर टाकुन दिलं होतं एका ख्रिश्चन मित्राने. नाही आवडलं..

 15. bhaanasa says:

  अरे किती किती अत्याचार हा…..एकतर इथे थंडी ने मरतेय त्यात काहीतरी चवीचे खावे तर करायचा कंटाळा आणि तुझा त्यावर हा जबरा मारा….. जायें तो जायें कहॊं…. 🙂 मी मासे-चिकन खात नसले तरी हे असे सगळे पदार्थ व्हेजही छान लागतात. अवियल माझे आवडते. आणि तुला माहीत आहे का..खिरा काकडी असते ना त्याची केरळी स्टाईलने एक खास रस्सा भाजी करतात. अरे इतकी जबरदस्त लागते तीही. नुसते कल्पनेने तोंडाला पाणी सुटले रे…. खयालोमें जाणेही महागात पडेल इतका त्रास झाला बघ. नारळाच्या दाट रसात तांदुळाचे पीठ व गुळ मिसळून धिर्डी करतात ना तीही कसली सुंदर लागतात…… मी आले की तुला हे सारे खिलवावे लागेल. इतका त्रास दिला आता त्याची भरपाई कर…..:D

  • हो.. नक्कीच.. त्यात विशेष काय ! मला फक्त हॉटेल्स मधे मिळ्णारे पदार्थच माहिती.. नारळाच्या दुधाचं आणि गुळ खोबरं घातलेलं पायसम खाण्यात आलं होतं , पण ही धिरडी नविन दिसताहेत . पुढच्या वेळेस बघिन मिळते का कुठे ते?

 16. दोन दिवस तुमचा ब्लॉग वाचता नाही आला, तेवढ्यात ही खाद्ययात्रा पण झाली? सगळंच यंम यंम आहे हो. इतके छान पदार्थ समोर आले की काय खावं नि काय नको असं होत असेल ना! टुना फिश खाल्लं नाही मी कधी. सुरमईपेक्षा सुद्धा चविष्ट? मग तर ट्राय करून पहाणारच! हल्ली हल्ली माझंही मत्स्यप्रेम वाढीस लागलं आहे.

  पण असं नाही करू. इतके सगळे फोटो बघून भूक चाळवली ना!

  • टुना -इतर सगळ्या फिश मधे हा फिश चांगला वाटतो. आपल्या कडे महाग आहे फार ( असं म्हणतात- कारण मी कधिच गेलेलो नाही मार्केटला ) पण कोचिनला आलो की नक्कीच ट्राय करतो… हा फिश आणि चिकन चेट्टीनाड + केरळा पराठा.. लवकर प्लान करा केरळ ट्रिप.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s