पोपट आणि कुत्रा…

या विषयावर पुलंनी लिहुन ठेवल्यामुळे इतर कोणी यावर लिहिण्याचा प्रयत्नच करत नाही.  पुलंचा जो पोपटावरचा लेख होता त्यावर तर मी अगदी जाम फिदा होतो. सगळ्यात सुंदर लेख होता तो पाळीव प्राणी या  विषयावरचा. त्यातलं ते वाक्य अजुन ही आठवतं, की म्हातारे आजोबा वारले आणि त्या पोपटाने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना आवाज देणे थांबवले.. 🙂

 

हॉटेल मधे जेवणारा पोपट..

 

पण आपल्या आजच्या लेखाचे दोन ’ हीरो’  पोपटअगदी ठरवून  ठेवल्या प्रमाणे पुलंच्या लेखातल्या पोपटाच्या अगदी विरुद्ध वागत होते. तर  एकदा माझी भाची  गौतमी नाशिकला हॉटेलमधे जेवायला गेली होती.. आता माझीच भाची म्हंटल्यावर जे काही दिसेल त्याचे फोटो काढायची सवय 🙂 अगदी जेवणाच्या डिश पासून तर कसलेही फोटॊ क्लिक करित असते ती, अगदी म्हशीचं शेण जरी पडलेलं दिसलं तर-   ते पण!

तर त्या हॉटेलमधे एक फॅमीली जेवायला आली होती. त्यांच्या बरोबर त्यांचा पाळलेला पोपट पण होता. सगळ्यांच्या बरोबर हा पोपट बसला होता जेवायला. अगदी व्यवस्थित वेगळी डिश दिली होती त्याला. त्या डिशच्या काठावर बसून  तो पोपट व्यवस्थित जेवत होता. घरचे सगळे मेंबर्स जेवायला आले तर मग पोपट का नाही?? आता हैद्राबादला लग्नाच्या निमित्याने भेट झाली भाचीशी तेंव्हा तिने त्याचा काढलेला फोटो मला ब्ल्यु टुथ ने दिला, आणि ही सगळी घटना सांगितली. तर  तोच  फोटो आता इथे पोस्ट करतोय…

हा फोटो पाहिल्यावर मात्र आमच्या घरी  असलेल्या पोपटाची आठवण झाली आणि त्याचा पण फोटॊ शोधून काढला..  जवळपास २५ वर्षं आमच्या घरी होता हा पोपट. हा अगदी   लहान असतांना, म्हणजे त्याच्या अंगावर पिसं पण नसतांना एका आदिवासी बाईने आणून दिला होता. सुरुवातीला त्याला बघून तर आई घाबरलीच होती, की हा जगतो की मरतो म्हणून. पिवळी चोच, अंगावर काटे काटे होते त्याच्या. त्यामुळे तो पोपटच आहे की दुसरा कुठला पक्षी तेच कळंत नव्हतं..पण नंतर हळु हळु काही दिवसांनी अंगावर हिरवी गार पिसं आली.

इतका लहान असल्याने , तेंव्हा त्याला चक्क भाताची पेज भरवून वाढवलं होतं. मोठा झाल्यावर सुध्दा जरी पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं तरीही तो कधीच उडुन गेला नाही. पिंजऱ्याचं दार हे केवळ त्याला मांजरापासून  वाचवण्यासाठीच लावावं लागायचं.

रोज सकाळी उठल्यावर पिंजरा स्वच्छ करणं हे एक काम असायचं.हा पोपट मी जेंव्हा ७वीत होतो तेंव्हा आणला होता. मला खूप आवड होती  पक्षी, प्राण्यांची..  म्हणून एक कुत्रा पण पाळला होता घरी.   तो लवकरच वारला, पण हा पोपट मात्र आमच्या घरी जवळपास २६ वर्षं होता. कांही वर्षानंतर त्याला मोकळं सोडण्याचा पण प्रयत्न केला होता, पण त्याला पिंजऱ्यातच सेफ वाटायचं. पिंजऱ्या बाहेर टोमॅटो ठेवला, आणि दार उघडून ठेवलं, तर तो टोमॅटॊ चोचीने उचलून परत पिंजऱयात जाउन बसायचा.

 

आमच्या घरचा पोपट.. दार नेहेमीच उघडं असायचं त्याच्या पिंजऱ्याचं..

आमच्या घरचा पोपट .. दार उघडंच असायचं त्याच्या पिंजऱ्याचं नेहेमी...

 

या व्यतिरिक्त त्याला जरड वांगी  आणि कुठलंही बी असलेली भाजी किंवा फळ खुप आवडायचं. त्या वांग्याच्या बियांना तो बारीक करुन त्या बी च्या आतलं काहीतरी खायचा. दुध साखर पोळी कुस्करलेली , आणि चिवडा म्हणजे त्याचे सगळ्यात आवडते खाद्य. चिवड्यामधले तीळ, खसखस वगैरे त्याला खूप आवडायचे .खसखस, तीळ वगैरे गोष्टी तो बारीक करुन त्याच्या आतलं काय असेल ते तासन तास खायचा.

इतका माणसाळला होता, की अगदी मांजरी प्रमाणे आपले लाड करुन घ्यायचा आपले,डोक्यावरून हात फिरवलेला त्याला खुप आवडायचं- तसेच आयाळ कुरवाळावी तसे त्याच्या मानेला बोटाने खाजवलं की त्याला खुप आवडायचं.  आमच्या घरच्या लोकांना तो कधीच चावला नाही, पण बाहेरच्या माणसाने जवळ यायचा प्रयत्न केला तरी पण चोच मारायचा.

आमच्या घरात माझ्या दोन लहान मुली होत्या, तेंव्हा साहजिकच त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष  व्हायचं, म्हणून काही दिवस थोडा राग केला मुलींचा, पण नंतर लवकरच त्याला बहुतेक समजलं असावं की ही घरचीच मंडळी आहे, म्हणून मग त्याने त्यांना चोच मारणं बंद केलं.

दररोज रात्री त्याच्या पिंजऱ्याला झाकुन ठेवावं लागायचं. कधी विसरलो तर ओरडून ओरडून आकांत करायचा तो पिंजरा झाके पर्यंत.

त्याला पिंजऱ्यात बघून नंतर मग मात्र खुप वाईट वाटायचं .वाटायचं त्याने उडून जाव दुर कुठे तरी.. पण कधीच न उडल्याने कदाचित पंखाचे स्नायु डेव्हलप झाले नसावे त्याच्या… दुसरं म्हणजे , त्याला पिंजऱ्यामधे इतकं सेफ वाटायचं की त्याने कधीच उडून जायचा प्रयत्न केला नाही. मला तर कित्येकवेळा स्वप्नं पडायचं की आपला पोपट उडून गेलाय, आणि उंच आकाशात उडतोय म्हणून.. हे स्वप्न अजुन ही पडतं बरेचदा…

त्याच्या साठी एक मोठा पिंजरा करुन घेतला होता ज्यात तो २० वर्ष तरी राहिला.त्याच्या मृत्यु नंतर मात्र त्या पिंजऱ्याला तोडुन  फेकुन दिलं बाहेर.. नेहेमी करता.. आणि या पुढे आयुष्यात कुठलाही प्राणी पाळायचा नाही याचा प्रण करुन…  आणि कोणी पाळत असेल तर त्याला परावृत्त करायचं हे  ठरवून!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

32 Responses to पोपट आणि कुत्रा…

 1. ajayshripad says:

  मला तर आजही कुणी त्यांच्या घरच्या पाळीव प्राण्याची गोष्ट सांगीतली की पहीले पु. लं. च्या लेखाची आठवण येते…! 😀
  मी लहान असताना फार हट्ट करुन एक लॅब आणलं होतं ६ वर्ष होतां. काळ्या रंगाचा पण नाव ’स्नोई’… पण तो गेल्यानंतर हीम्मतच झाली नाही परत घरी कुत्रा आणायची. एकदा लळा लागला ना की फार कठीन होत, जेव्हा ते जातात. तसे मला कुत्रे आजही खुप आवडतात, मग तो इंग्रजी असो की आपला गावठी…!

  • अजय
   कुत्रा तर मला पण खुप आवडायचा, म्हणुनच मी त्याला आणलं होतं. आमच्या हॉल च्या दारात दिवसभर बसुन असायचा.. त्याचे ते पिंगट डॊळे आणि भव्य शरीर बघुन कोणाची हिम्मत होत नसे घरात यायची.
   त्याला आम्ही कधीच बांधुन ठेवलं नाही, पण तो नेहेमी दारातच बसुन असायचा दिवसभर..
   कोणितरी त्याला विषारी खायला घालुन मारलं होतं. अगदी टाचा घासत मेला तो. डॉक्टरला पण बोलाउन आणलं, पण तो पर्यंत तो गेला होता… !

   • tejali says:

    मला पण मांजर खूप आवडते. मझयाकडे ५-७ वर्षापूर्वी १ पिल्लू होत मांजराच. मला मांजर खूप आवडते म्हणून माझया मित्राने दिलेल मला भेट…पण नंतर थोडमोठ झाल्यावर ते बाहेरच खुऊप असायच..आणि एकदा बाहेर गेली माझी मनी आणि नंतर परत आलीच नाही. नंतर १५ दिवस शोधत होते..पण नाहीच मिळाली. तेव्हापासून कानाला खडा लावलाय मांजर पाळन्याबद्दल.आत्ता तुमचा लेख वाचून खूपच आठवण आली मला मनीची….

    • खूप जिव्हाळा लागतो या मुक्या जिवांचा.. खरंच, आपल्या जीवनाचा एक भाग होऊन जातात हे सगळे प्राणी. गेल्यावर घरचं कोणीतरी गेल्यासारखं दुःख होतं.

 2. सुरेश पेठे says:

  महेंद्रजी,
  तुमचे लिखाण हृदयाचा ठाव घेणारे आहे.

  • सुरेशजी
   धन्यवाद.. तो फोटो पाहिला ,आणि आठवल्या जुन्या गोष्टी म्हणुन लिहिलं.. एकदा वाटलं होतं की पब्लिश करु नये.. अगदी बाळबोध लिखाण झालंय… पण नंतर हिम्मत करुन पब्लिश केलं ..

 3. Aparna says:

  मी फ़ार्फ़ार पुर्वीपासुन प्राणी, पक्षी पाळण्याच्या विरोधातच आहे..त्याचं खरं कारण भिती पण असेल…पण तरी…:) ते त्यांच्या आणि आपण आपल्या राज्यात बरे…कसे???
  फ़क्त लहान असताना एक पंखाला लागलेलं कबुतर दाणा-पाणी देऊन भावंडांनी वाचवलं होतं आणि बरं झाल्यावर सोडून दिलं…पण तरी ते काही दिवस आमच्या गॅलरीत येऊन जायचं…नंतर रूळलं बहुतेक…या पोस्टमुळे ते मात्र आठवलं….

  • अपर्णा
   हा पोपट केवळ योगायोगाने घरी आला होता. जर त्या बाईने दाराशी आणुन दिला नसता- १ रुपयाला.. तर कदाचित कधीच पाळला नसता आम्ही.
   पण कुत्रा मात्र माझी आवड होती म्हणुन पाळला होता… आणि आजही त्याची आठवण येते..!! खुप उंच असलेला, तो पिंगट डोळे ( माझा मित्र सुनिल महाजन म्हणायचा,कोकणस्थी डॊळेआहेत त्याचे 🙂 ) आणि ब्राउन रंग… अजुनही नजरसमोर येतो..

 4. अनिकेत वैद्य says:

  महेंद्र,

  पोस्ट नेहमीप्रमाणे छान झालआहे.

  बरेच जण आपली आवड म्हणून प्राणी किंवा पकषी पाळतात. पण त्यांचा स्वातंत्र्वावर गदा आणतात. त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायल लावतात.

  प्राण्यांना मसाले, तिखट, तेल घालून शिजवलेले पदारथ जमत नाहीत. त्यामुळे बरेच प्राणि चिडखोर,आक्रमक होतात.

  • अनिकेत
   अगदी खरं खरं सांगतो.. हवं तर कन्फेशन म्हणा, पोपट पाळला म्हणुन जो गिल्ट आहे तो अजुनही गेलेला नाही…. पहिले दोन तिन वर्ष तर काहीच वाटलं नाही, पण जसे दिवस जात गेले, तसं खुप वाईट वाटायचं त्याला पिंजऱ्यात बघुन..
   घरचाच मेंबर असल्यासारखा असल्यामुळे जे काही घरात केलं जाईल ते खायला घालायचॊ आम्हीत्याला..

 5. sagar says:

  Kaka
  Chan zalay lekh..Aamchyahi gharat dobarman hota DON nav hot tyacha…..Aajhi kuthlahi doberman mhatal ki DON chi aathvan yete….Tas mala hi prani aavadtat pan pakshee matr palayla aavadat nahit karan mala ugachch guilt vatato.
  Jamal tar Kutryacha photo pan taka asel tar…..

 6. Amit says:

  महेन्द्र काका मस्तच झाली आहे पोस्ट… तुमच्याकडे पुलंच्या लेखाची पीडीफ असल्यास शेअर कराल का प्लीज़…

 7. मला वाटतं सर्वच प्राण्याना “स्वच्छंदी” रहायला आवडतं! असं पाळीव लाईफ म्हणजे बांधिलकी होतं.. कदाचित पाळणार्‍यांना हे वेगळं वाटेल कारण त्यांचाही जीव जडलेला असतो!

  • स्वच्छंदी रहायला नक्कीच आवडत असावं . बर्ड्स केजींग तर खुप वाईट. एखाद कुत्रा वगैरे पाळणं ठिक आहे, पण हे पक्षी पाळणं खुप वाईट. कालांतराने त्यांचा इतका लळा लागतो, की त्यांनी उडुन जावं असं वा्टतं…

 8. anukshre says:

  मला ही पक्षी पाळणे म्हणजे त्यांच्या पंखावर आपण बंधने घालणे होय असेच वाटते. पण कुत्रा पाळायचा नसतो, आपले मुल समजून त्याला विशेष देखभाल, त्यांचेच खाणे देणे जरुरीचे असते. बऱ्याच घरी मी पाहीले तिखट, मीठ, तेलाचे खाणे पण घालतात. त्यांचे आयुष्य कमी होते. साधा fish tank असला तरी हलगर्जी पणा करून त्याचे कौतुक करतात. अशा लोकांनी तर प्राणी विषयावर काहीही न बोलले तर बरे…….
  प्राणी पेक्षा माणूस घातक आहे.

  • सहमत आहे. अगदी नविन असतांना काही वाटत नाही, पण नंतर मात्र त्याची किव येउ लागते. तो उडून गेला तर बरं असंही वाटतं.. पण तसं होत नाही.. असो… माणुस जास्त घातक आहे.. हे अगदी खरंय…. !! त्या लहानशा पोपटाच्या पिल्लाला घरट्यातुन काढुन आणणारा …. …… एक माणुसच!!!

 9. anukshre says:

  महेंद्रजी तुम्ही पोस्ट लिहिलीत कारण तुमचा जीव जडला होता. तुमच्या भावना मी समजू शकते पण माझी कुठलीही प्रतिक्रिया पब्लिश नाही केलीत तरी चालेल कारण मी प्राण्या करिता खूप कठोर पणे मनुष्याशी बोलते. हा विषय असा आहे की कि ज्यांना प्राणी पाळणे ह्या बद्धल विशेष माहिती नाही त्यांनी उगाचच ताशेरे झाडू नये. बाकी पोस्ट मधला पोपट खूप आवडला. तुमचे पटले नसते तर सपष्ट तुमचे नाव घेवून लिहिले असते त्यामुळे
  तुमच्या लिखाण बद्धल काहीच दुमत नाही. ज्यांना माणसे जोडणे कळते त्याला प्राण्याच्या भावना ही नक्कीच समजतात.

  • धन्यवाद.. खरं सांगायचं तर बऱ्याच गोष्टी आपण नकळत करतो. माझा कुत्रा मरायला टेकला होता, आणि मी काहीच करु शकलो नाही. चांगला तीन फुट उंच होता तो.. डॉक्टर घरी आणले, पण तेयेई पर्यंत तो गेला होता. खुप रडलो होतो तेंव्हा…

 10. anukshre says:

  माझ्या इथल्या खिडकीत चिमण्या येतात. सकाळी पहिली त्यांचा दाणा व पाणी ह्याची वाटी खिडकीत मी ठेवते मग चहा घेते. आज खास १५० कि मी अंतर पर्यंत मी बाहेर गेले का तर इथे चिमण्याच्या करिता एके ठिकाणी मातीचे घर म्हणजे भांडे मिळते ते घ्यायला दुसरे काहीही कारण नव्हते. पोस्ट करणार आहे मी, इथे मला एक चिमणी भेटायला खिडकीत रोज येते तो फोटो पण दाखवीन.

 11. anukshre says:

  तुम्ही डॉक्टर आणला, पण हा माणसाने केलेला दगा होता कदाचित त्याचा मृत्यू विधात्याने असाच लिहिलेला असावा. तुम्ही काळजी घेतलीच होती.
  हा आयुष्यातला अपघात होता असे समजणे ठीक राहील. पण माणसे पाहून त्यांनी प्राणी पाळावे का नाही हे ठरवून जरूर विरोध करा. पेट्स हे काळजाचा हिस्सा असतात. अशा व्यक्तीने प्राण्या संबंधी केलेल्या हलगर्जीचे कौतुक करू नका. भले ते त्या व्यक्तीच्या विचारात असो, नाहीतर बोलण्यात, किंवा लिखाणात असो.

  • कुत्रा वगैरे पाळण्यास काही विरोध नाही , पण फिदर्ड फ्रेंड्स टाळावेत असे माझे स्वतःचे मत आहे..

 12. आनंद पत्रे says:

  खंर , खोटं काय माहित नाही, पण लहानपणी आमच्या आजीने सांगितले की चिमणीला जर मनुष्य स्पर्श झाला तर तिला बाकी चिमण्या मारून टाकतात.
  म्हणून आम्ही कधी चिमणी किंवा कुठल्या पक्ष्याला पाळले नाही, कुत्रा, मांजर सुद्धा कधी पाळावेसे वाटले नाही. त्यात मित्राच्या घरी त्यांचा पाळीव ‘मोती’ गेल्यावर त्याच्या आई आणि बहिणीचे रडवेले चेहरे पाहून कधीच पाळायची इच्छाझाली नाही….

  • कुत्र्याचा तर खुप लवकर लळा लागतो. प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर असतो तो.. आणि तो जातो तेंव्हा खुप दुःख देउन जातो.. कुत्राच नाही तर कुठलाही पाळीव प्राणी..

 13. bhaanasa says:

  महेंद्र मस्तच आहे की हा पोपट आणि पोस्टही. अगदी नीटवीट जेवतोय. बाकी मीही पाळीव प्राणी-पक्षी यांच्या विरोधातच आहे. प्राण्यांचे म्हणशील तर एक नंबर घाबरट म्हणून जास्त. पण पक्षी ….शोमू लहान असताना त्याच्या हट्टाखातर २ बुलबुल आणले पण एक मेला. मग दुसरा रोज नुसताच बसून राहयचा. खंगत चालला. म्हणून सोबत म्हणून अजून एक आणला. तर पहिला मेला….असे करत करत सहा जण गेले म्हटल्यावर उरलेला एक उचलला आणि त्या पक्षी वाल्याला नेऊन दिला. फार वाईट वाटले.तेव्हांपासून बंद. हा मात्र आम्ही गेली अनेक वर्षे मासे पाळलेत. खूप छान वाटते. थोडी नीट काळजी घेतली की मरत नाहीत. बाकी कुत्रे मांजर गेले की फार फार त्रास होतो. इतके जीवाला लागते ना…

  • एकदम मस्त होता म्हणे तो पोपट .. हॉटेलमधले सगळे जण त्याच्याकडेच पहात होते.. मासे पाळणं .. हं.. तो एक चांगला अल्टरनेटीव्ह आहे, जर काही पाळायचंच असेल तर..पण एक सांगतो.. डॉग इज द बेस्ट फ्रेंड ऑफ अ बॉय.. प्रत्येक टीन एजर कडे कुत्रा हा असायलाच हवा… 🙂

 14. sahajach says:

  ही पोस्ट कशी काय राहिली वाचायची……………मस्त आहे तो पोपट……मी दहावीत असताना बाबांना पण असेच एक पोपटाचे पिल्लू मिळाले होते…..मस्त होते एकदम…….आईला आईच म्हणायचे आमच्यासारखे…..घरभर फिरायचे आईच्या मागे मागे…….एकच वैताग होता त्याचा पठ्ठ्या मला सकाळी पहाटेच उठवायचा……ताई अभ्यास…करुन तो ओरडला की मला फार राग यायचा त्याचा…..एक मात्र आहे शाळेत आणि सेंटरला पहिली आले तेव्हा त्याचे क्रेडिट आमच्या मिठूलाच होते!!!

  तुमचा लेख वाचताना सारखा तोच येत होता डोळ्यासमोर…..

  • सकाळी दादा एकदा संध्या उठ, म्हंट्लं की हयाचा जप सुरु व्हायचा… पण काही वर्षा नंतर बोलणं पुर्ण बंद केलं त्याने..

 15. poonam says:

  khup divsanantar marathi lekh vachun khup bar vatl.pakshi kinva prani pal naye .tyana jeevan jagu dyave .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s