माय मराठी..

काल दुपारी घाकट्या  मुलीचा फोन आला ऑफिस मधे , ’बाबा मला गो-गेट हायस्कूल सेंटर आहे बोर्डासाठी” गोरेगांव इस्ट लिहिलंय त्या नावाखाली. मला क्षणभर समजलंच नाही हे गो-गेट काय प्रकरण आहे ते. माझ्या तरी माहिती मधे हे गोगेट नावाची शाळा नाही. पुन्हा तिला निट बघून सांग म्हंटलं, तर तिने स्पेलिंग वाचून दाखवलं, आणि मी हसतच सुटलो. गोगटे नावाचं स्पेलिंग तिने गोगेट म्हणून वाचलं होतं.

माय मराठी मातृ भाषा!! बोली भाषा तरी व्यवस्थित बोलता येते ( अर्थात व्यवस्थित म्हणजे इंग्लिश शब्द येतातच म्हणा), पण हे गोगटॆ नांव सरळ सरळ वाचता येऊ नये?? या शाळांमधे इंग्रजी पहिली भाषा , हिंदी दुसरी, आणि मराठी थर्ड लॅंग्वेज असते. आता तिसरी भाषा म्हणजे दहावी मधे पण अगदी लो लेव्हलचं मराठी असतं. या गोष्टीला काही उपाय नाही, पण कमीत कमी मराठी नावं तरी नीट उच्चारता यायलाच हवीत असं  वाटतं . कमीत कमी असे कानाला बोचणारे उच्चार नसावे.

आज सकाळी सिद्धीविनायकाला जाउन आलो.सिद्धिविनायकाच्या समोरच्या पेट्रोलपंपावर कुसुमाग्रजांच्या जन्म दिवशी म्हणून खास कार्यक्रम असतील असे पोस्टर्स  लावलेले दिसले.मुंबईला हे असे मोठे बॅनर्स लावणे हे तर आधी केलं जातं , मोठा फोटॊ मुख्य नेत्याचा, आणि लहान फोटो फुटकर फालतू -स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांचे. या बारीक फोटो मधले लोकं पाहिले की ते नेते असल्या पेक्षा गल्लीतले गुंडच जास्त वाटतात. असो.. विषय तो नाही.

एका पोस्टरवर माहिम ते दादर  ग्रंथ दिंडी काढण्य़ात येईल असे लिहिले होते.   तसंच दुसऱ्या पार्टीचा पण काहीतरी कार्यक्रम आहेच. आता ही ग्रंथ दींडी काढायची म्हणजे काय करायचं?? तर एक ५० -१०० माणसांचं टोळी  करुन रस्त्यावरून पालखी मधे मराठी ग्रंथाची मिरवणूक काढायची. मी म्हणतो त्याने काय साध्य होणार आहे?? मराठी साठी काहीतरी केल्याचं समाधान??   असं काहीतरी निरर्थक करायचं, आणि मग त्याची पेपरमधे प्रसिद्धी करुन आपल्या पक्षाला मराठीचा किती कळवळा आहे ते दाखवायचं- त्यामुळे मला हे असे कार्यक्रम म्हणजे मराठीच्या शेकोटीवर स्वतःच्या पक्षाची पोळी भाजुन घेण्याचा प्रकार वाटतो .

राजकीय पक्षांनी हे असे निरर्थक कार्यक्रम करण्या पेक्षा शाळांमधे मराठी निबंध स्पर्धा, आर्ट्स कॉलेजेस मधे शिरवाडकरांच्या साहित्यावर निबंध स्पर्धा, ब्लॉगर्स साठी एखादी मराठी लेखन स्पर्धा (ही बाकी नेटभेटने ऑर्गनाइझ केली आहे  बरं का- रजिस्टर केलं नसेल तर जरुर करा) , शिरवाडकराच्या एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण करण्याची स्पर्धा वगैरे आयोजित केली असती तर जास्त बरे झाले असते . या शिवाय मराठी साहित्य शिकणारे  जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एखादी स्पर्धा- एखाद्या कादंबरीवर  परिसंवाद, एखादं नाटक असे काही तरी केले तर जास्त योग्य होईल असे वाटते.

वृत्त पत्रामधे एक लहानशी बातमी देउन कुठल्या राजकीय पक्षाने कस साजरा केला मराठी दिवस? ह्याची बातमी  कशी येईल इकडे लक्ष देण्यापेक्षा  , मराठी उ्त्थापनासाठी जे काही करता येइल ते   करायला हवे.आपण ब्लॉगर्स, आपण इथे फक्त शुभेच्छा देतोय एकमेकांना?? पण व्हॉट नेक्स्ट?? सिग्निफिकन्स काय या दिवसाचा?? विवा शिरवडकरांचा वाढदिवस आज आहे, म्हणून एकमेकांना मराठी दिवसाच्या बद्दल शुभेच्छा  देऊन काय होणार?

या बाबतीत दादर सार्वजनिक वाचनालयात  मात्र बरेच कार्यक्रम होणार आहेत. जसे सकाळी साडे दहा वाजता कवी सम्मेलन,  ज्या मधे प्रथितयश कवींचा ( रामदास फुटाणे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे वगैरे )पण सहभाग असणार आहे. अतुल कुलकर्णीचा पण सत्कार केला जाणार आहे याच कार्यक्रमात.

कोमस तर्फे पण काव्य जागर  चेंबुर येथे आयोजित केलेला आहे. मधु मंगेश कर्णीकांसारखे  साहित्यिक या सम्मेलनाला हजर रहाणार आहेत. मनसे तर्फे पत्रकार काव्य सम्मेलन आयोजित केलेले आहेत ०- अशा कार्यक्रमाला अध्यक्ष कोण असावा? साहित्यिक ?? छेः.. नाही हो, साहित्यिक वगैरेचा काय संबंध? एक राजकीय नेता आहे याचा अध्यक्ष. मग असं वाचलं की या दिवसाच्या कार्यक्रमाला पण राजकीय वास येतो. अशा कार्यक्रमात स्टेज वर बसण्याचे टाळून एखाद्या साह्त्यिकाला स्टेज वर स्थान दिले असते तर जास्त योग्य झाले असते असे वाटते. असो, पण  असे काहीतरी ठोस कार्य शक्य होईल तितक्या संस्थांनी, राजकीय पक्षांनी ( राजकीय हेतूने प्रेरित न होता )  आणि प्रत्येकाने केले तर तो खरा मराठी दिवस ठरेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

22 Responses to माय मराठी..

 1. सौरभ पंची says:

  महेंद्रजी,
  आज मराठी भाषा दिनाची खुप छान भेट मिळाली. राज ठाकरेच्या एका पत्रावर सगळ्या मोबाईल कंपन्या सरळ झाल्या. आजपासुन मराठी हेल्पनाईन सुरु केली आहे सगळ्या कंपन्यांनी. पण याचे श्रेय कौशल इनामदारांना आणि ब्लॊगच्या माध्यमातुन या चळवळीला खुप मोठा सपोर्ट करणार्या तुम्हाला आहे. आता मनसेने क्रेडिट घेतले तरी हरकत नाही, चळवळीला यश मिळालं हे महत्वाचं. अभिनंदन 🙂
  जय महाराष्ट्र.
  -सौरभ पंची

  • सौरभ
   अजुनही नाही. मी आत्त्ताच व्होडाफोनला ट्राय केलं.. नाही बोलत मराठी मधे व्होडाफोनवाले.. 😦

 2. sanjay says:

  आव साहेब
  तुमच्या मुलीला बी थोडे मराठी शिकावा कि. आव आपली मराठी भाषा आहे.
  जय महाराष्ट्र

  • संजय
   मराठी तर यायलाच हवं .. तेच तर दुःख लिहिलंय आजच्या शिक्षण पध्दतीचं. मराठी ही दुसरी भाषा करायला हवी, म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या मुलांना थोडी उच्च प्रतिची मराठी शिकवली जाईल.’
   इंग्रजी शब्दांचे मराठी मधे कसेही उच्चार केले जाउ शकतात….

 3. Aparna says:

  गोगटेचं गोगेट म्हणजे परिस्थिती नक्कीच ठिक नाहिये….आपली मुलं अशी तर त्यांची मुलं काय दिवे लावतील??
  माध्यम कुठलं यापेक्षा यात काही सुवर्णमध्य आहे का हे पाहायला हवं नाहीतर आमचं कार्ट अमेरिकेतच शिकवावं की काय?? निदान अभ्यासाचा बोजा कमी असेल….

  • जसं नांव माहिती असेल तसा उच्चार केला जातो. कदाचित गोगटे नांव माहिती नसावं. जसे मते, माटे, मेट कसंही वाचलं जाउ शकतं तसंच हे एक असावं..

 4. हे हे गोगटेचं गोगेट 🙂

  राजकीय पक्षाबद्दल काही न न बोललेलच बरा साले हरामखोर पोस्टर वर फोटो झळकावायची एक संधी सोडत नाही..तो संजय निरुपम गोराईच्या गटाराला भेट देऊन गेला याच अभिनंदन करणार पोस्टर बघितला मी शिंपोली लिंक रोडला आता बोला…काल चारकोपला एक कार्यक्रम होता मराठी दिनानिमित्त पण तिथल्या गर्दीकडे बघितला (२००-२५० लोक) आणि तेवढ्यात बाजूने मुस्लिमांचा ईद निमित्त जुलुस जात होता तिथे बघितला ते १-२ हजार लोक होते..
  ते लोक त्यांच मनुष्यबळ दाखवायला काही करतील पण मराठी माणूस उसासेच टाकत घरी बसणार काय? की एक एका राजकीय पक्षाच्याच छत्री खाली राहायाच आपण?

  • सुहास
   हेच जरा कमी व्हायला हवं. हिंदु एकतेचे तर १२ वाजले आहेत. एखादी हिंदूंची न्युज कशी पेपरवाले छापायचं टाळतात ..

   तो बालु -मद्रासच आठवतो का? म्हणाला होता की मी हिंदु आये याची लाज वाटते मला.. हे असे नेते असले की मग झालंच. तेंव्हा सगळ्या सो कॉल्ड सेक्युलर पेपरनी त्याला डोक्यावर घेतलं होतं..

   राजकिय पक्ष जो हिंदुत्वाची कास धरेल् तो टिकला तरच.. नाही तर काय होईल कोण जाणे.

 5. bhaanasa says:

  गोगटेचे, गोगेट… हा हा….जाम हसले मी.:) मला कधी कधी वाटते हा इंग्रजी माध्यमापेक्षाही चॅटींग करताना धेडगुजरी मराठी-इंग्रजीमुळे होत असावे. आता हेच पाहा ना माटे चे Mate-मेट असे हमखास होतेय. हल्लीच शोमूला जीवलगा हे गाणे म्हणायला सांगितले असता गाणे मस्तच म्हटले पण मला हळूच विचारले की ममा, जीवलगाचा नेमका अर्थ काय गं? जीव म्हणजे काय ते मला माहित आहे पण लगा म्हणजे काय? 😦 चला निदान मोबाईल कंपन्यांनी मनावर घेतले म्हणायचे. धाकाने का होईना सुरवात तर झाली. रसिकाला अनेक शुभेच्छा! जय मराठी भाषा!:)

  • मोबाइल कंपन्यांनी घेतलं खरं मनावर. काल फोन केला तर मराठी बोलले नव्हते, पण आज मात्र पुन्हा केला तर बोलला मराठीत.. 🙂

 6. Abhijit says:

  तुमचे लेख नेहमी आवडतात. आजचा पण आवडला पण त्या्तले शब्द बोचले.

  थर्ड लॅंग्वेज
  लो लेव्हलचं
  पोस्टर्स
  पार्टी
  पेपर
  आर्ट्स कॉलेजेस
  ऑर्गनाइझ
  रजिस्टर
  व्हॉट नेक्स्ट??
  सिग्निफिकन्स काय या दिवसाचा??

  • अभिजीत
   धन्यवाद. मी अगदी मनात येइल ते आणि जसे शब्द आठवतील तसे लिहित असतो. एकदा लिहुन झाल्यावर पोस्ट पुन्हा वाचुन पण पहात नाही. माझं मराठी पण तितकंसं चांगलं नाही याची जाणिव आहे मला. बरं मराठी ्प्रतिशब्द आठवायचा प्रयत्न करीत बसलो तर पुढे लिहिण्याची लिंक रहात नाही.
   तरीही पुढे प्रयत्न करीन मराठी मधे इंग्रजी शब्द न वापरण्याचा. धन्यवाद.

 7. Abhijit says:

  महेंद्र काका,

  ही अडचण सगळ्यांचीच होते. पण मी सवय लावून घेतली की मराठी शब्दच वापरायचे. आता शब्द अडत नाहीत. १००% मराठी लिहिणं अगदी पुस्तकी होवून जाईल पण काही शब्द नक्कीच शक्य अस्तात ते आपण वापरले पाहिजेत.

  • काही शब्द नक्कीच शक्य आहेत.
   बरेचदा विचार येतो मनात, की आपलं मराठी पण मटा सारख्ंच होतंय, आता मटा चं मराठी सर्वमान्य झालंच आहे, तेंव्हा काय हरकत आहे??
   तरी पण तुझा मुद्दा पटला मला.. जेवढं शक्य तेवढं तर मराठी लिहिलंच पाहिजे. 🙂

 8. Atul Deshmukh says:

  मराठी भाषेसारखीच मराठी शालांची पण दुरावस्था झाली आहे…महानगरपालिकेच्या मराठी शालांचा दर्जा खालाव्लेला आहे…आजकालची सुशिक्षित मंडळी ती कुठल्याही राज्यातली असो (इकडे दिल्लितही), English medium ला पहिला preference देतात…त्या पब्लिक स्कूलला हजारो रुपये भरतात…आजकाल बर्याच प्रस्थ मराठी माध्यमांच्या शालान्मध्ये semi-english सुरु केले आहे…म्हणून math,science ह्या विषयांचे शिक्षण मराठी मध्यमात असतानाही english मध्ये होऊ शकते…पण बरीच मंडळी सरकारच्या मराठी शालान्मधुन शिकणे कमिपनाचे समजतात..अर्थात मराठी माध्यमाच्या शालेतील पायाभूत सुविधा,शिक्षकवर्ग त्याला कारणीभूत असेल..पण म्हणून त्याचा दर्जा सुधार्न्यासाठी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सरळसरळ public school मध्ये जातात…मराठी दिवासनिमित्ताने मराठी शालेंबद्दल्च्या दुरावास्थेबद्दल कृति करायला हवी ..अहो आपल्या मुलाना मराठी शाळेत टाका, सोयी नसतील तर सरकारकडे तक्रार करा..मराठी शालेंचा दर्जा सुधारा…नाही तर मराठी शाला फ़क्त झोपड़पट्टी मध्ये राहणार्या मुलांची (ज्यांच्या पालकांकडे पब्लिक स्कूल मध्ये द्यायला महिन्यकाठी हजारो रुपये नसतात) शाला होवूनबसेल….अजुन एक सांगावेसे वाटते की आजकालचे पालक आपल्या मुलांवर अक्षरशा इंग्लिश लाद्तात हे पाहिले की त्यांची (पालकांची) कीव येते…अहो काय हे?? कोणतीही भाषा चांगली येण्यासाठी तिचे व्याकरण,वैविध्य,शब्दसंग्रह अभ्यासयाला हवे…नको तिथे तिचे उद्दातीकरण नको..

  • अतुल
   अक्षर अन अक्षर खरंय तुमचं.. पण तुम्हीच बघा, की आमची नौकरी फिरतीची कधीही कुठेही भारतभर बदली होऊ शकते, मग अशा परिस्थिती मधे इंग्रजी शाळांमधेच घालावं लागतं.
   मराठी शाळांची अवस्था अगदी दयनिय झालेली आहे, यात काहीच शंका नाही. मी स्वतः गव्हर्नमेंट शाळेत शिकलो. कंपोझिट मिडीयम होतं. म्हणजे गणीत सायन्स, इंग्लिश मधे इतर मराठीत.
   नुसतं मराठी मिडियम घेतलं की मग पुढे इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला त्रास होतो- कदाचित हे पण कारण असेल पालकांचे मुलांना इंग्लिश मिडियम देण्याचे.
   प्रतिक्रियेकरता आभार..

 9. अगदी खरंय तुम्ही लिहिलेलं.. शब्द न् शब्द..

  On a lighter note, ते गोगटे चं गोगेट वाचून तुफ्फान हसलोय मी 🙂

  • अरे हो नां. मी पण थोडावेळ चक्राउनच गेलो होतो गोगेट स्कुल म्हंटल्यावर.. 🙂 आता आमच्या आयुष्यातला शाळेशी संबंध संपला असं म्हणता येइल. आता पर्यंत मुलांच्या ओपन हाउस साठीजावं लागायचं..

 10. शब्दांमधील आघातानुसारही उच्चार बदलतात. या गोगेटसारखं एका अमराठी (बहुधा पंजाबी – नक्की माहित नाही) गृहस्थाने भडकमकर या आडनावाचा उच्चार भडक मकर असा केला होता. लिहिताना आपण Gogate असं लिहितो पण उच्चारताना Gogte असं उच्चारतो त्यामुळे काही शब्दांबाबत अशी भूलचूक होऊ शकते. जास्त लांब कशाला, मला स्वत:ला Theatre या शब्दाचं स्पेलींग कधीच लक्षात रहायचं नाही म्हणून मी द अत्रे असं लक्षात ठेवून ते लिहित असे. पण ’मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट होऊ लागलं’ की मात्र खरी भिती.

 11. vijayshendge says:

  तुझं स्पंदन आवडलं. माझ्या ब्लॉग वरील ‘ बाईची चप्पल ‘ या पोस्ट वरील तुझी प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल.

 12. manoj gandole says:

  ertrer

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s