स्त्री मुक्तीवाला चित्रपट

काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची   माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे,   पण   नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! ७  मार्चला दुपारी पाहिला  हा चित्रपट, नेमका दुसऱ्या दिवशी स्त्री दिवस होता, आणि वाटलं होतं की ८ मार्चलाच लिहावं या चित्रपटाचं परीक्षण, पण राहून गेलं.

आजकालच्या ह्या चढाओढीच्या दिवसात प्रत्येक माणसाला फक्त करीअरचाच विचार असतो. सकाळी ऑफिस मधे गेल्यापासून जी रॅट रेस आणि ऑफिसमधलं पॉलिटिक्स सुरु झालं की प्रत्येकच माणुस हा स्वतःचे इम्पॉर्टन्स  टिकवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. रात्री उशिरापर्यंत काम करणं, बायकोच्या वाढदिवस पण विसरणे असे अपराध तर नेहेमीच घडत असतात. बायको म्हणजे घरकी मुर्गी.. जादा विचार नै करनेका!!!  बायकोच्या बाबतीत तर सब कुछ टेकन फॉर ग्रॅंटेड असतं,  अगदी आपल्याच आयुष्यातली कथा पहातोय असं वाटतं सिनेमा सुरु झाला की.

डस्टीन हॉफमन.. म्हणजे टेडी क्रेमर, एक विवाहीत पुरुष. सुखा समाधानात जाणारं आयुष्य. बायको पुर्णपणे कमिटेड, एक सुंदरसा लहान मुलगा पण असतो त्याला त्याचं नांव बिली. बायको जोआना ही हाउस वाइफ.एक सुखी चौकोनी कुटुंब. स्त्रीला कायम गृहित धरलं जातं,  बहुतेक सगळे निर्णय घेतांना सुध्दा! मग आपलं चूल आणि मुल या मधेच स्त्री आपली ओळख हरवून बसते. बऱ्याच स्त्रियांना तर आयुष्यभर ही हरवलेल्या स्वत्वाची जाणिव होत नाही , पण या सिनेमात जोआनाला याचा साक्षात्कार होतो-  तेंव्हा जे काही नाट्य घडतं ते  म्हणजे १९७९ सालचा ऑसकर विनर क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर.  ह्या चित्रपटाचा  घटना  काळ आहे १९७९ .  एक कथा- आजपासून बरोबर ३० वर्षापूर्वीची, पण पहातांना हे जाणवतं की  अजूनही फारसा फरक पडलेला नाही.

जोआना ही एक हाउस वाईफ. आपल्या चौकोनी कुटुंबात वरकरणी पुर्णपणे रमलेली- नवरा, त्याची चांगल्या पगाराची नोकरी, मुल सगळ काही असतं- अजुन काय हवं असतं सुखी संसारात??  एक दिवस टेड घरी येतो अतिशय आनंदात असतो, की त्याला एका मोठ्या अकाउंटची जबाबदारी मिळाली असते. घरी जाउन बायकोला या आनंदाच्या बातमीमधे कधी सामावून घेतो असं झालं असतं त्याला.

घरी पोहोचतो, आणि जोआना (त्याची बायकॊ) एक बॉंब फोडते.. सांगते, की  मी आता घर सोडून जाणार आहे. टॆड ला सुरुवातीला नेहेमीप्रमाणे हे चहाच्या कपातलं वादळ वाटतं, पण खरंच तसं असतं कां?? टेड खूप प्रयत्न करतो तिला समजवण्याचा,  की तिने सोडून जाऊ नये म्हणून . पण जोआना चा निर्णय पक्का झालेला असतो !!!

वरकरणी सुखी दिसणाऱ्या ह्या सुखी संसारात जोआना  कधीच रमलेली नसते. मुल, नवरा, त्याची चांगल्या पगाराची नोकरी, या सगळ्या गोष्टींमधे सगळं मटेरिलस्टीक सुखं हात जोडून उभी असतात. पण तिची घुसमट होत असते. तिला नेहेमी ’ स्व ’ त्वाची जाणीव पोखरत असते. आणि  एक दिवस ती निर्णय घेते की तिला स्वतःचं आयुष्य जगायचंय.. आणि ती या सगळ्या भरल्या संसारातून घराबाहेर निघते.. लहानग्या बिलीला  ( मुलाला) टेडच्या जबाबदारीवर सोडून. ( एक आई मुलाला सोडून निघून जाते , ही गोष्ट पटायला थॊडी अवघड वाटते  पण ………)

आजपर्यंत स्वय़ंपाक घर म्हणजे काय ते कधी पाहिलेलं नसतं टेड ने. आता घर सांभाळायचं, मुलगा सांभाळायचा – आणि ऑफिसला पण जाउन नवीन जबाबदारी असलेली नोकरी पण सांभाळायची. बिलीला शाळेत नेणं आणणं, त्याच्या वेळा सांभाळतांना त्याची उडणारी तारांबळ अतिशय सुंदर दाखवलेली आहे.

पहिल्या दिवशी  जेंव्हा जोआना जाते, तेंव्हा सकाळी उठल्यावर बिलीची भूणभूण सुरु होते , की आई कधी परत येणार म्हणून. ब्रेकफास्टला त्याला फ्रेंच टोस्ट हवा असतो. तो कसा बनवायचा हे अर्थातच टेडला माहीती नसते. मग लवकरच सुरु होतं परिस्थितीशी कॉम्प्रोमाइझ!! लहानग्या बिलीला पण लिमिटेशन्स ( टॆडच्या स्वयंपाकीची) समजतात, आणि नंतर दाखवलंय की तो पण दुसऱ्या दिवशी  सकाळी उठल्यावर बिली शहाण्यामुला सारखा डोनट आणि दुध काढून घेतो ब्रेकफास्टला- बिली कॉमिक्स वाचतो, टेड पेपर- आणि ते दोघं ब्रेकफास्ट करतात, तो प्रसंग पाहताना दोघांचीही परिस्थितीशी जुळवून घेण्याची धडपड लक्षात येते, आणि उगीच वाईट वाटतं.

रात्री जेवतांना न जेवता बिली आइस्क्रीम खाण्याचा हट़्ट करतो, आणि टेड त्याला आइस्क्रीम खाऊ नको म्हणतो , पण बिली हट़्ट सोडत नाही. इकडे टेडचा पण पेशन्स संपतो आणि तो बिली ला सरळ एका खोलीत कोंडून ठेवतो. रागाच्या भरात बिली ला बंद तर केलं, पण सोबतच त्याचं मन त्याला खात असतं.

थोड्या वेळाने ह्ळूच दार उघडून तो पहातो आणि त्याला तिथे पलंगावर बिलीला अंगाचं मुटकुळं करुन पांघरूण न घेता झोपलेला दिसतो. आईवेगळ्या त्या निरागस जिवाला बघून  टेड चा रांग शांत होतो आणि   त्याचा जीव कासावीस होतो. तिथे दोघंही एकमेकांशी बोलतात.बिली म्हणतो की त्याला   वाटत असतं की आपली आई ही केवळ आपल्यामुळे घर सोडून गेली. स्वतःला दोष देत तो इवलासा जीव मनःस्ताप करुन घेत असतो.

टेड त्याला समजावतो, की तसं नाही रे  – तुझ्यामुळे नाही सोडून गेली ती- तिचं  तर तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. ती शरीराने जरी इथे नसली , तरी मनाने तुझ्याजवळ इथेच आहे.हे ऐकल्यावर थोडं आश्चर्य  वाट्तं, कारण  साधारण पणे एखादा माणूस तर बायकोच्या बद्दल काहीतरी सांगून त्या मुलाच्या मनात बायको बद्दल तिरस्कार निर्माण करायचा प्रयत्न करेल – पण इथे तसं नाही – आणि टेड चे डायलॉग  मधुन त्याला झालेली स्वतःच्या वागण्या विषयीची अनुभूती  दिसून  येते.

तो  बिली ला बरोबरीच्या नात्याने जेंव्हा सांगतो  की मी तुझ्या आईला बायको म्हणून गृहीत धरुन वागलो, एक स्त्री म्हणून तिचे स्वतःचे काही तरी विचार असतील याकडे कधीच लक्ष दिलं नाही..  बायको म्हणजे तिने असंच वागायचं , रहायचं.. वगैरे आणि तिला समजून घेऊ शकलो नाही, म्हणून ती गेली. आणि ह्या प्रसंगानंतर लक्षात येतं की त्या दोघांमधे (बिली आणि टेड मधे) एक वेगळंच अंडरस्टॅंडींग डेव्हलप होतंय, आणि दूरी मिटलेली आहे. या पुढे दोघंही एकमेकांशी पूरक वागताना दाखवले आहेत.

जोआना ची एक शेजारीण मैत्रीण असते – मार्गरेट – मॅगी नांव तिचं! तिचा पण डिव्होर्स झालाय, ती आणि तिचा नवरा चार्ली वेगळे रहातात..  टेड ला नेहेमी वाटत असतं की आपल्या बायकोच्या डोक्यात हे स्त्रीमुक्तीचं भूत भरवणारी बया ही मॅगीच आहे. एकदा गार्डन मधे दोघांची भेट होते, तिथे दोघं गप्पा मारत बसतात. मॅगी विचारते, तुला आठवण येते का जोआना ची?? त्यावर क्षणभर थांबून तो उत्तर देतो.. नाही!!! ( अर्थात हे खोटं आहे हे त्याच्या बॉडीलॅंग्वेज वरुनच लक्षात येतं)

इकडे टेडचं सगळं आयुष्य बिली मय झालेलं असतं. त्याचं आपल्या कामाकडे लक्षं राहू शकत नाही.त्यात त्याची नोकरी पण जाते. जोआना घर सोडून गेल्यावर   वर्षभरात सेटल होते . चांगली नोकरी पगार, सगळं काही आहे तिच्याकडे , स्वतःची ओळख तिने तयार केलेली आहे. आता तिला बिलीची कस्टडी हवी असते.कसंही करुन बिली आप्ल्याजवळ रहावा असे तिला वाटू लागते. टेड तयार नसतो.  टेड आणि बिली मधले बंध इतके मजबुत विणले गेले असतात की त्याला बिली शिवाय रहाणं ही कल्पनाच असह्य होते.  जोआना   एका वकिलाकडे कस्टडी ची  केस देते  .

टेड ल काही सुचत नाही. नोकरी गेलेली, जर बिलीला आपल्याजवळ ठेवायचं, तर मग  फायनान्शिअली स्टेबल असणं आवश्यक!! नाहीतर बिलीची कस्टडी मेरी ला मिळणार हे नक्की. फायनानशिअल  स्टेबिलीटी दाखवायची म्हणून टेड नौकरी शोधू लागतो, आणि त्याला एक नोकरी मिळते. त्याच्या शिक्षण , अनुभवाला कन्सिडर केले तर एकदम   कमी दर्जाची  असते ती नोकरी .  पैसा पण कमी.. पण सध्यातर नोकरी म्हणजे काळाची गरज, बिलीची कस्टडी हा मुख्य इशू असतो ( इथे त्याच्या प्रायोरिटीज बदललेल्या दिसतात. सुरुवातीला केवळ करीअर ओरिएंटेड असलेला टेड आणि हा हळवा टेड दोन्ही एकदम मस्त उभे केले आहे डस्टीन ने). त्याला अजिबात दुसरा काही पर्याय नसतो नोकरी ऍक्सेप्ट करण्याशिवाय.

कोर्टात केस उभी रहाते. दोघांचेही वकील आपल्याच अशिलाला कस्टडी मिळणं कसं योग्य आहे हे दाखवण्यासाठी वक्तव्य करतात. एकमेकांच्या अशीलावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. दोघंही जेंव्हा वेगळे झाले असतात, तेंव्हा दोघांचंही भांडण वगैरे काहीच झालेलं नसतं, त्यामुळे दोघंही हे असे आरोप ऐकुन दुःखी होतात. सिनेमामधली उत्कंठा अगदी परिसीमेला पोहोचते. कोणाला मिळेल कस्टडी? आपल्याला सारखं वाटत असतं की टेडला मिळावी म्हणून!!सिनेमा पहातांना मला सारखं वाटत होतं की आता मेरी आणि टेड दोघांनीही एकत्र यावं, आणि बिली बरोबर दोघांनीही रहावं.

केसचा निकाल जोआनाच्या बाजूने लागतो. तिला कस्टडी मिळते बिलीची, केवळ आई आहे या मुद्यावर.बिलीला दोघंही हवे आहेत. हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात येत असतं.सिनेमाच्या शेवटी ती  लिफ्ट मधे वर जाते ती टेडकडे या गोष्टीची जाणिव करुन द्यायला .. आणि सिनेमा ऍबरप्टली संपतो..

एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे हा एक सिनेमा, असा शेवट का केला दिग्दर्शकाने म्हणून उगीच संताप येत होता. पण  नंतर लक्षात आलं की मी मनाने  फारच गुंतून गेलो होतो हा सिनेमा  बघतांना.  🙂 हे मात्र खरं की , जर हिंदी सिनेमा प्रमाणे याचा शेवट केला असता तर मात्र याचा इतका इम्पॅक्ट झाला नसता.

या सिनेमात डस्टीन हॉफमन ला खूप जास्त स्कोप आहे. आणि त्याने मिळालेल्या संधीचे पुर्ण चिज केले आहे. प्रत्येक फ्रेम मधे याचा अभिनय  आणि व्यक्तीरेखा अगदी मनाला भिडते.

जोआना  गेल्यावर  दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेंच टोस्ट करुन मागतो बिली, आणि टेड ला तो बनवता येत नाही- आणि शेवटी जेंव्हा बिली आईसोबत जायची वेळ येते, तेंव्हा टॆड फ्रेंच टोस्ट अगदी व्यवस्थित बनवू शकतो हा शॉट तर अप्रतिम… !!!एका लहानशा प्रसंगातून पुर्ण मेसेज कन्व्हे होतो .

सिनेमाचा शेवट बघून थोडं हेलावलो   होतो . डस्टीन हॉफमनचा इतका समर्थ अभिनय आहे या सिनेमात, की तुम्ही त्याच्या व्यक्तीरेखेमधे स्वतःला पाहू लागता, आणि कळत न कळत स्वतः कसं वागतो बायकोशी याचा पण विचार करु लागता. एक भावपूर्ण कलाकृती म्हणून हा चित्रपट कायम लक्षात राहील. बघितला नसेल तर अवश्य बघा!!! स्त्री मुक्ती वाल्या स्त्रियांनी तर आवर्जून बघावा असा ही चित्रपट आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to स्त्री मुक्तीवाला चित्रपट

 1. याचे बर्‍यापैकी इंडीयन वर्शन आले होते ’अकेले हम अकेले तुम’ नावाने

  • मी सिनेमा फार कमी पहातो, त्यामूळे तो हिंदी सिनेमा पाहिलेला नाही. कदाचित म्हणूनच मला हा सिनेमा खूप आवडला असावा..

  • अगदी बरोबर. पहिल्यापासून शेवटपर्यंत तसाच्या तसा छापला आहे पिक्चर हिंदीत. शेवटच्या प्रसंगात लिफ्टने जाण्याच्या ऐवजी दर बंद करताना दाखवलीय मनीषा कोईराला. पण प्रेक्षकांच्या नजरेत खरंतर तीच वाईट ठरते कारण ती आई वडिलांचा ऐकून मुलाला आणि नवर्याला सोडून जाते म्हणून.

 2. छान..मी आताच ह्याच टॉरेंट डाउनलोड करून घेतल. बघतो हा “स्त्री मुक्तीवाला चित्रपट” 🙂

 3. मला वाटतं, हे असं फक्त सिनेमातच होउ शकतं.

  • ते खरंय, पण सिनेमा पहातांना मी इतका रंगून गेलो होतो की ते लक्षातंच राहिलं नाही.

 4. Trupti says:

  kaka,
  “akele hum akele tum” ha hindi chitrapat agadi yach chitrapatavarun uchalala aahe…… aani tyacha shevat kuthalyahi hindi moviesarakhach goodie goodie kela aahe.
  mulachi custody aaila milalya nantarahi, ti aapalya patichya badalavakade aani tyachya putrapremapudhe zukate aani ekatra rahanyacha niryan ghete.
  fakt stree muktivala chitrapat mhanun nhave tar pati-patni madhil understanding ha suddha ya moviecha adhorekhit sandesh asava.

  • स्त्री पुरुषाच्या संबंधाचं अतिशय सुंदर चित्रण आहे या सिनेमात. हिंदी सिनेमा पाहिलेला नाही, आणि एकदा हा ओरिजिनल सिनेमा बघितल्यावर तो दुसरा सिनेमा बघायची इच्छा पण राहिलेली नाही. खरं सांगायचं तर हा सिनेमा पण पुन्हा पाहू शकणार नाही मी. once is enough!!

 5. sahajach says:

  ’अकेले हम अकेले तुम’ ची ओरिजिनल आवृत्ती आहे हा चित्रपट असे दिसतेय…..

  खरा प्रश्न हा आहे की घर सोडून एकवेळ ती स्त्री जाईलही पण ती ’मुक्त’ होते का अशी….असे सोनेरी पिंजरे जागोजागी आहेत खरं तर!!!!

  • ती मुक्त होते ते केवळ संसारातुन.. कारण नवरा आणि मुलगा दोन्ही बंधनं ती झुगारुन देते. हे मला पटलं नव्हतं.. पण शेवटी तो सिनेमाच आहे.

 6. Vidyadhar says:

  काका,
  शेवटच्या सीनमध्ये ती त्याला विचारते, “मी कशी दिसते?” तो म्हणतो “खूप छान!”
  मला वाटतं हे सूचक आहे.

  • मस्त आहे तो शॉट. मला बिलीला किचन टेबलवर बसवून तो अंडीफेटतो ना फ्रेंच टोस्ट साठी, तो शॉट पण खुप आवडला. असे अनेक पॉइंट्स आहेत त्या सिनेमात!

   • Vidyadhar says:

    आणि अजून एक मजा म्हणजे मी एक ठिकाणी वाचलं होतं, की तो “मी कशी दिसते?” वाला शॉट मूळ संहितेमध्ये नव्हता. मेरीलला वाटलं की कट झालाय शॉट आणि तिने डस्टिनला असंच विचारलं. डस्टिननेही उत्तर दिलं. डायरेक्टरला तो उत्स्फूर्त शॉट आवडला आणि त्याने तो तसाच सिनेमात ठेवला.

 7. खूप खूप वर्षांपूर्वी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला होता. तेव्हाही आवडला होता. चित्रपट भावनिक टेन्शन देतो हे खरंय, पण खूप छोट्या छोट्या गोष्टींतून कथा फुलताना दाखवली आहे. पिता व पुत्राचे भावबंध अतिशय तरलतेने हाताळलेत. डस्टीन हॉफमनचा अभिनय सुरेख झालाय. आवडत्या चित्रपटांच्या यादीतील ह्या विशेष चित्रपटाची याद ताजी केल्याबद्दल धन्यवाद! 🙂

  • मी खुप इन्व्हॉल्व्ह झालो होतो पहातांना , आणि पुरुष असुनही थोडा सेंटी झालो होतो पहातांना.
   पिता पुत्राचे भावबंध अप्रतिम रित्या हाताळले आहेत. आपण कधी त्या सिनेमाचा भाग होतो तेच लक्षात येत नाही. सिनेमात पुढे काय व्हावं हे आपणच मनातल्या मनात ठरवणं सुरु करतो. आणि तेच आहे या सिनेमाचं यश!!
   ब्लॉग वर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलित .. आभार..

 8. मला वाटतं आमीर असल्याने ‘अकेले हम अकेले तुम’ अगदी नाही तरी थोडाफार त्या तोडीचा झाला होता. हॉलीवूडवरून ढापलेल्या इतर हिंदी चित्रपटांच्या मानाने मात्र फारच छान. मला दोन्हीही आवडले खूप.
  डस्टीन हॉफमनचा अजून एक अप्रतिम चित्रपट म्हणजे रेन मन (Rain Man). त्यासाठीही त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता.

  • रेन मॅन पाहिलेला नाही. सध्या माय फेअर लेडी आणि इट हॅपन्ड वन नाईट पहायचाय शनिवारी. पण या पुढे ब्लॉग वर परिक्षण लिहिणार नाही…

   • का? उलट लिहा की परीक्षण. (तेही) तुम्ही मस्तच लिहिता 🙂

    • नाही मग हा ब्लॉग काय वाटेल ते रहाणार नाही. अगदी आतून मनातुन वाटलं लिहावंसं तरंच लिहितो सिनेमावर …:) नाही तर नाही..

     • इट हॅपन्ड वन नाईट खुप छान सिनेमा आहे, त्याचेही हिन्दीकरण झाले होते, तेही बर्‍यापैकी ’दिल है के मानता नही’ नावाने, परत नायक आमिरच.
      ब्लॉग काय वाटेल ते आहे ना, मग लिहिणार नाही असं ठरवुन नाही चालायचं 🙂
      अशीच चौफेर फटकेबाजी झाली पाहीजे 🙂

      • हे मात्र अती होतंय आता हिंदी सिनेमांचं. मला वाटतं की प्रत्येकच सिनेमा हिंदीमधे कॉपी केलाय की काय? ऑस्कर विनर.. कॉपी करा.. असं काहीसं चित्र दिसतंय. हिंदी मधे स्वतःची स्टोरीलाइन आहे ना थ्री ईडीयट त्यातलच एक उदाहरण!

 9. वाचता वाचता नवरा बायको व मुलगा हे चौकोनी कुटुंब कस काय ब्वॊ असा विचार सुरवातीला आला. पण पुढे वाचताना तो विरुन गेला.मी देखील सहसा चित्रपट पाहात नाही. पण याचे हिंदी वर्जन पहायला आवडेल. ते विंग्रजी कवा समजायच? न्हाई म्हनायाला निस्ती चित्र पघितली तरी बी उली उली समाजतयं असो.
  महेंद्रजी आपला उपक्रम आवड्ला. हळू हळू कुटुंब संस्था मोडकळीस येणार असे भाकीत आम्ही वर्तवले आहेच
  अवांतर- सात दिवसाचा आठवड कसा काय? सातवडा का नाही?

  • प्रकाशजी
   काल दिवसभर कामात होतो, म्हणून प्रतिक्रिया द्यायला उशिर होतोय. ते चौकोनी कुटुंब.. झाली खरीचुक लिहितांना. 🙂
   इंग्रजी व्हर्शन पण अगदी समजण्यासारखं आहे.. अवश्य पहा.
   ती फुलराणी हे पुलंनी ज्या सिनेमावरुन बेतलंय तो सिनेमा माय फेअर लेडी आज पहाणार आहे.रुपांतरीत सिनेमा पाहिला तरीही ओरिजिनल मधली गोडी अवीट असते हे नक्कीच!!! अहो सगळे लोकं बिझी आहेत घरचे. परिक्षा आणि अभ्यासात. मी एकटाच रिकामटेकडा 🙂

   • माय फेअर लेडी पाहिलाय मी. मधे जेव्हा डीव्हीडी च नवीन नवीन पेव फुटल होत तेव्हा मी ४ इंग्लीश चित्रपट असलेली एक डीव्हीडी विकत आणली होती. त्यात सगळे छान चित्रपट होते. माय फेअर लेडी, माय स्टोरी (इनग्रिड बर्गमन), शल वी डान्स आणि फॉरेस्ट गम्प. सगळे मस्त आहेत. ती फुलराणी पण पाहिलय, पण भक्ति बर्वेन्च नाही, अमृता सुभाष आणि अविनाश नारकरच. दोघेही लाउड वाटले जरा.

 10. bhaanasa says:

  एक अप्रतिम सिनेमा. आणि त्याची हिंदी आवृत्तीही सुदैवाने चांगलीच होती. मनिषा व आमिर दोघांनी व त्यांच्या मुलानेही खूपच मन लावून कामे केली होती. तरिही ओरिजनल मधली गोडी वेगळीच. चला पुन्हा एकदा पाहायला हवा आता.

 11. rohan says:

  ’अकेले हम अकेले तुम.’ हाहा … सर्व नाही पण बरेच हिंदी चित्रपट धापलेले आहेत हे नक्की. त्या मानाने सध्याचे मराठी चित्रपट कित्येक पटीने चांगले आहेत. स्टोरी आवडली. येताना फ्लाइट मध्ये मिळतो का बघतो… 🙂

 12. सिनेमाचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
  हा सिनेमा क्लासिक मध्ये गणला जातो. कारण युरोपातील त्या काळापासून ते आजतागायत घटस्फोट घेतल्यावर सिंगल मदर व फादर म्हणून जगणारे अनेक जणांच्या आयुष्याचे हे प्रातिनिधिक चित्रण आहे.
  आमीर चा अकेल हम … हा सिनेमा पण चांगला होता पण चालला नाही.
  दस्तीन हॉफमन चे चा मी जुना चाहता त्याचा ग्रेजुएट हा सुद्धा हॉलीवूड क्लासिक मध्ये गणला जातो.
  त्याची अती भिकार हिंदी आवृत्ती सौतन नावाच्या महिमा चौधरीच्या सिनेमाच्या रूपाने आपल्याकडे उपलब्ध आहे.
  आईच्या प्रेमात असलेला एक तरुण पुढे त्याच्या समवयस्क त्या आईच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि आई व मुली मध्ये तो मुली ला आपला अंतिम जोडीदार निवडतो. आणि मग त्या आईचा संघर्ष सुरु होतो. सिनेमा ६० च्या दशकात कमालीचा लोकप्रिय झाला होता.

  • निनाद
   हा सिनेमा खरंच काळजाला भिडला म्हणतात ना< तसा झालाय. पाहिल्यावर खूप वेळ नुसता सुन्न बसलो होतो. हिंदी सिनेमे तसे मी फार कमी पहातो. सिरीयल्स पाहून वेळ मिळाला तर इतर काही पहाणार नां.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s