आजोळ..

आजोबांचं घर- १५० वर्ष जुनं असलेलं

कार मधे समोरच्या सीट वर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. दूरुन ते   घर पुन्हा दिसतं का म्हणून आसुसलेली नजर शोधत होती. त्या घराकडे नजर गेली, आणि एकदम चर्र झालं. समोरचे ते दोन मोठे सिंह आणि चांगले दीड फुट व्यासाच्या लाकडी खांबावर आधारलेली ती गोल मोठी बाल्कनी दिसली नाही. नेहेमी कपाळाला कुंकू लावून छान मेकप केलेल्या गरत्या बाइने एकदम विधवेच्या स्वरुपात समोर यावे तेंव्हा कसा एकदम धक्का बसेल ?? तसेच झाले होते मला.

उतरल्यावर आधी विचारलं ती गोल बाल्कनी कुठे गेली? तर भाऊ म्हणाला की ती पडली एक दिवस.. एका कोपऱ्यात त्या खांबाचे अवशेष दिसत होते.

पणजोबांनी बांधलेली  ती १५० वर्ष जुनी वास्तू अजूनही गत वैभवाच्या खुणा अंगावर बाळगत अजूनही ताठ मानेने उभी रहाण्याचा प्रयत्न करत होती. मी त्या मधे सगळ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी शोधत होतो. १७ खोल्या असलेला तो डौलदार वाडा आता एकदम हिरमुसलेला वाटला. पुर्वी आजी, अजोबा आणि आठ मुलं. इतकी मंडळी घरची आणि गडी माणसं  ह्या सगळ्यांचा राबता असायचा. पण वडिलोपार्जित इस्टेटीला लागलेल्या शापाचे अवशेष मात्र अजूनही हा जुना वाडा भोगतोय. इतर भावंड जरी इथे येऊन रहात नसली, तरी आपला हक्क सोडायला तयार नाहीत. त्या मूळे डागडूजी साठी कोणी खर्च करायचा??

घराचं दर्शनी दार. वर गोल बाल्कनी होती ती पडली आता. दार १५० वर्ष जुनं आहे

सगळे जण व्यवसायाच्या निमित्याने घर आणि गांव सोडून निघून गेले, पण या वडिलोपार्जित घर काही आयुष्यभर तिथेच रहाणाऱ्या मामाच्या नावाने करुन द्यायचा मोठेपणा कोणी दाखवला नाही – कदाचित  म्हणूनच असेल की त्या घराची दुरुस्ती वगैरे कधीच केली गेली नाही. घरा मधे सागवान लाकडाचा इतका जास्त वापर केलेला आहे की जरी ते सगळं लाकूड जरी काढलं तरी क्मीत कमी एखादा नवीन बंगला बांधून होईल. १० लाख रुपये तरी नक्कीच यावेत लाकडाचे.
माझी मुलगी आज पहिल्यांदाच ( समजायला लागल्या पासून) माझ्या आजोळी येत होती. आजपर्यंत या घराबद्दल   इतकं काही ऐकलं होतं तिने माझ्या कडून आणि आज्जी ( माझ्या आई) कडून की तिला पण खूप उत्सुकता होती. घराजवळ कार पार्क केली आणि घराच्या समोरच्या उघड्या असलेल्या दारातून आत शिरलो. नुकतंच आनंदवनात फिरून आलो होतो त्यामुळे आधी मस्त पैकी माठातलं पाणी प्यावं म्हणून पायातले बुट काढुन पाय धुतले आणि माठाकडे वळलो, तर तिथे माठाच्या जागी एक फिल्टर लागलेला होता.. फ्रिझमधली बाटली काढली आणि तोंडाला लावली. कडक उन्हाळ्यात थंड पाण्याची चैन म्हणजे वाह!!!!!!!

घरभर बरंच काही बदललेलं दिसत होतं. पुर्वी घरामधे असलेला माणसांचा राबता आता नसल्याने ( फक्त चार माणसं आणि १७ खोल्यांचं घरं) घर एकदम रिकामं रिकामं वाटत होतं.फक्त पाच खोल्या वापरात होत्या.  मी पण चहाचा घोट घेत हळू हळू बदललेल्या परिस्थितीला समजवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मुलगी अजूनही बुजल्या सारखी वाटत होती – की मला तसं वाटत होतं?

घराची मागची पडवी. भिंतीचे पोपडे पडलेले पाहून कसंतरीच वाटत होतं

बाबा, मला दाखवा गाईंचा गोठा म्हणजे काय आणि कुठे आहे तो??  घरातून मागच्या अंगणात जातांना देवघर दिसलं . नकळत देवासमोर उभं राहून देवाला हात जोडले गेल. समोर तो हैद्राबादच्या निझामच्या पेंटरने काढलेले बलाजीचे पेंटींग दिसले . आजी म्हणायची त्यात जे चमकणारे खडे आहेत ते हिरे आहेत. त्यांना पाहिलं आणि नकळत आजीची आठवण झाली. कधी ओरडल्याचा आवाज ऐकू येतो की- अरे देवघरातुन बाहेर निघ लवकर.. सोवळं नेसल्या शिवाय आत जाऊ नकोस……!!

मुलगी थोडी बुजल्या सारखी झालेली होती. तिला गोठा दाखवायचा म्हणून मागल्या अंगणात गेलो तर लक्षात आलं की नेहेमीची पाणी तापवायची चूल आता तिथे नाही. जमीन एकदम सपाट केलेली होती. नकळत वर बघितलं ,तर ते मोठं आंब्याचं  झाड मात्रं डौलात उभं होतं. आंबे लटकलेले होते झाडाला. आसूसलेला नजरेने तिकडे पाहिले आणि मुलीसोबत मागच्या अंगणात नजर गेली.

परसदारचं आंगण

जवळपास ५ हजार फूटाच्या आसपास  (( जास्तंच असेल त्यापेक्षा पण ) परसदारातलं आंगण ( पुर्वीची परसदारची बाग), एकेकाळी इथे सगळी फळझाडं असायची , पेरू, डाळींब, संत्री वगैरे सगळी , तसेच भाज्या वगैरे पण खूप असायच्या- पण आता मात्र सगळीकडे वाढलेले तण वेडावून दाखवत होतं . नाही म्हणायला उगीच त्या औदूंबराची फळ मात्र वरून एक पक्षी तोडून खाली टाकत होता. त्याचा तो विचित्र दर्प नाकात शिरला. कढीलिंबाची छोटी छोटी रोपं सगळी कडे उगवलेली दिसत होती. एका कोपऱ्यामधे लावलेली आणि मामेभावाच्या हाताचा स्पर्श झालेली तो मोगऱ्याची बाग मात्र एकदम टवटवीत दिसत होती. म्हणाला ,वेळ मिळत नाही व्यवसायामुळे , पण ही फुल झाडं मात्र मी स्वतः मेंटेन करतो.

सगळीकडे कढीलिंबाची रोपं उगवलेली दिसत होती

गोठ्याकडे पाहिलं तर तिथे नुसती अडगळ भरून ठेवलेली होती. गाई म्हशी सगळ्या शेतावर पाठवून दिल्या आहेत असं म्हणाला मामेभाउ. इथे आजकाल कामाला माणसं मिळणं पण फार कठीण आणि महाग झालंय म्हणे. बायकांना पण जवळ्च सुरु असलेल्या नवीन हायडल प्रोजेक्ट आणि इतर ठिकाणी मिळणाऱ्या शंभर रुपये रोजा मुळे घरची कामं करायला पण त्या बायका तसेच पैसे मागतात. घरची गडी माणसं सध्या कोणीच मिळत नाहीत !!

गोठ्याच्या एका कोपऱ्यात ढेप ( सोयाबिन,दाण्याचं किंवा तीळाचं तेल काढल्यावर उरलेली चिपाडं – त्याला इंग्रजीत डिऑईल्ड केक म्हणतात!) ठेवण्याची जागा आता रिकामी नव्हती, तर तिथे बैलगाडीची चाकं पडली होती तुटलेली. खूप उदास वाटत होतं.  मागच्या पडवी कडे पुन्हा आलो तर ती पोपडे पडलेली भिंत पुन्हा वेडावून दाखवत होती. एक प्रकारची भयाण शांतता होती.

छकडा

मागच्या अंगणात रेंगी ( म्हणजे  बैलगाडी पण तिला वरुन गोल छत असतं, आत बसायला गवत आणि त्यावर गादी असते) छकडा – म्हणजे लहान चाकांची बैलगाडी जिला अगदी तरूण बैल जोडले जातात , ती खूप वेगाने धावते. तुमची हाडं खिळखिळी होतात रस्ता खराब असेल तर..शोधत होतो. भावाला विचारलं , तर म्हणाला , आता कोणीच वापरत नाही. रस्ते चांगले झाल्याने सरळ कार वापरली जाते कुठेही जायला म्हणून रेंगी, छकडा वगैरे काहीच ठेवलेंल नाही.

पेरुचं झाड, संत्रयाची ऑर्किड्स होती चार पाच त्यांना शोधलं, पण सापडले नाहीत ते. मागची विहिर आणि तिच्यावरचा रहाट पण दिसत नव्हता. विहीर बुजवली म्हणाला … अजून एक बालपणीची आठवण मिटली!! घरातून चक्कर मारली तर मुलीचा उत्साह अगदी ओसंडून वहात होता. प्रत्येक खोलीशी निगडीत काहीतरी एक गोष्ट आहे- आठवण आहे. घराच्या वर स्लॅब च्या ऐवजी लाकडी तुळ्य़ा बघून मुलीची क्युरिओसिटी वाढलेली होती. तिला त्या तुळ्या कशाला असतात ते सांगितलं. मोठी  लोणी का्ढायची रवी ( चांगली ४-५ फुट उंचीची रवी होती ) दोराने खांबाला  बांधून लोणी काढायची ती पण इतिहास जमा झालेली दिसली. विचारलं – पण …..!!

कोळशाची इस्त्री मात्र अजूनही वापरात दिसली.

मुलीला नेहेमी उखळ, जातं या बद्दल सांगत होतो मी. मात्र उखळ बुजवलेले दिसलं आणि जातं काढून टाकलेल दिसत होतं , तूर भरडली जात्या मधे की मग ती पॉलीश करायला – त्याची सालं काढायला उखळात घेउन त्याला कांडावं लागायचं.. अर्थात ह्या उखळाचा उपयोग मी फार कमी वेळा केलेला पाहिला होता. पण जातं मात्र आजी बरेचदा वापरायची. कोळशाची इस्त्री मात्र अजूनही उपयोगात दिसली. आजीची कुंकवाची पेटी पण आठवली. वापरात नसल्याने कुठेतरी ठेवली असं म्हणाला भाऊ.

घरामधे फक्त चार माणसं, म्हणुन फक्त ५ खोल्या नेहेमीच्या वापरात आहेत. बाकी सगळं घर बंदच करुन ठेवल्यामुळे नुसती अडगळ झालेली होती. घरचा आंबा तर होताच, पण शेतावरच्या  बांधाऱयाला लावलेल्या आंब्याची फळं पण यायची . मुठीच्या आकाराचा चोखून खायचा गावठी आंबा असायचा. वरच्या मजल्यावर माच लावला जायचा.  माच म्हणजे कैऱ्यांना गवतावर मांडून ठेवायचं त्यावर पुन्हा गवत, मग पुन्हा कैऱ्यांची रांग.त्या खोलीला आंब्यांची खोली असंच म्हंटलं जायचं.  त्या खोलीत गेलो, आणि मुलीला आजपर्यंत असंख्य वेळा ऐकलेल्या ती जागा दाखवली. गच्ची मधे उभा राहिलो. उन्हाने तापलेलं ते सिमेंट पायाला वास्तवाची जाणीव करुन देत होतं.

घरावर सावली देणारा, आंबा मात्र मस्त डवरला होता फळांनी . अतिशय गोड फळ आहे याचं. कच्ची कैरी पण गोड लागते.

समोर पहात आपल्या ओळखीची ठिकाणं शोधत होतो. समोरच काकडेंचा बंगला दिसत होता. बाल्कनी तुटून पडणार असं वाटत होतं. किरणताई आता कुठे असेल बरं?? उगीच विचार आला डोक्यात. लहानपणी पाण्याची बादली वर आणुन त्यामधे आंबे बुडवून ठेवायचे आणि मग ते दिवस भर चोखून खात रहायचं. आंब्याच्या कोयी मात्र समोरच्या काकडेंच्या घराच्या कौलावर फेकायचो.

वरच्या इतर खोल्यांना तर सरळ कुलुपं लाऊन ठेवलेलं होतं. खालच्या मजल्यावरून मामींचा आवाज ऐकू आला आणि मी खाली स्वयंपाक घराकडे गेलो. पुर्वी जी जमिनिवर आमची पंगत बसायची तिच्या ऐवजी आता डायनिंग टेबल होता त्यावर बसलो . लहान असतांना माझा एक मोठा भाउ होता तो नेहेमी कॉंपीटीशन ठेवायचा कांदा फोडायची. एक मोठा कांदा घेउन त्याला बुक्कीने फोडा म्हणून सगळ्यांना  चॅलेंज करायचा, पण कोणाच्याच हाताने फुटला नाही की शेवटी तो स्वतः मात्र एका बुक्कीत कांदा फोडायचा. आता इतक्या सगळ्या मुलांनी त्याला बुक्की मारुन फोडायचा प्रयत्न केलेला असल्याने तो अगदी नरम पडलेला असायचा कांदा ही गोष्ट लक्षात यायला खूप वर्ष जावी लागली.

जेवणं झाली..  बाबा, ही खोली कसली होती?? म्हणून एका बंद असलेल्या दाराकडे तिने बोट दाखवलं, तर ते म्हणजे बाळंतीणीची खोली असंच तिचं नांव पडलं होतं. वर्ष भर कोणी ना कोणी त्या खोलीत असायचंच.. मुलगी किंवा सून!! शेजारीच एक धान्याची खोली होती त्या खोलीत धान्य साठवून ठेवलेलं असायचं. गव्हात खेळायला ना नव्हती, त्यामुळे धान्यातही खूप खेळालोय लहानपणी.

जेवणं झाली , एक डुलकी काढून झाली.मुलीच्या पण तिच्याच बरोबरीच्या माझ्या मामेभावाच्या मुली बरोबरच्या गप्पा सुरु होत्या, तिला पण हे घर खूप आवडलं. पुढल्या वेळेस आपण इथे रहायला येऊ, आणि एक रात्र शेतावरच्या घरात  पण जाउन राहू- असं प्लानिंग सुरु झालं.जेंव्हा वरच्या मजल्यावर आम्ही गेलो होतो, तेंव्हा “बाबा  या वाड्यात आत्मा वगैरे काही आहे का हो?” हा प्रश्न जेंव्हा ऐकला, तेंव्हा मी तर उडालोच.. आणि हसत हसत नाही म्हंटलं, तेंव्हा तिचा चेहेऱ्यावरचे भाव पाहून आपण खोटं बोलायला हवं होतं कां? असं उगाच वाटून गेलं. मुलीने मोठ्या मुलीला फोन लावला, आणि असंभव मधला वाड्यासारखा वाडा पाहिला म्हणून सांगितलेलं ऐकलं , आणि पुढलं बोलणं इतकं हळू सुरु ठेवलं की मला ऐकू येणं बंद झालं 🙂

असं म्हणतात की आजी अजोबा गेले की आजोळ संपतं.. पण माझं तसं नाही. मामा , मामी तितक्याच प्रेमाने कौतुक करायचे, आणि आता मामेभाउ पण तेवढाच अगत्याने बोलावतो. माणसाच्या आयुष्यात लहानपणीच्या आठवणींचं खूप महत्व असतं त्या कायम तशाच रहाव्यात असे वाटत असतं… पण ……

आता निघायची वेळ झाली. उगीच त्या वास्तुकडे बघून मन भरुन आलं. आणि ड्रायव्हरने टॅक्सी सुरु केली आणि मी मात्र माझं हरवलेलं बालपण मागे वळून ओलसर झालेल्या डोळ्यांनी शोधत होतो……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

55 Responses to आजोळ..

 1. महेंद्र जी गावाकडच्या आठवणी जागृत झाल्या
  http://mr.upakram.org/node/1191#comment-19641

  • प्रकाशजी
   खरंच हो, ते दिवस आठवले की कसं मस्त वाटतं. उन्हाळा म्हणजे मामाचा गांव हे पक्कं असायचं. एकाच वयाचे जवळपास १६ मुलं असायचो आम्ही त्या घरात. आणि १५ प्रौढ लोकं. सगळं भरलेलं घर असायचं..
   मुलांना सांगुनही खरं वाटत नाही ..

 2. Manmaujee says:

  मस्त झाली आहे पोस्ट. . .ती कोळशयाची इस्त्री भारीच…लहानपणी गावी पाहिली होती!!! शेवटी जुनं ते सोनं!!!

  • लहानपणी आमच्या घरच्या इस्त्रीचं हॅंडल तुटलं होतं, तेंव्हा आम्ही काशाच्या ( पितळेसारखाच असतो तो धातू) तांब्यात निखारे ठेउन आणि मग तो तांब्या कपड्याने धरून इस्त्री करायचो कपड्यांना. 🙂 हात भाजायचा, पण चालायचं ते पण.

 3. sahajach says:

  मस्त झालय पोस्ट…. थोडाफार अंदाज येतोय की हे लिहिताना तुम्हीदेखील किती हळवे झाले असाल!!! आमचं ईगतपुरीचे असेच मोठे क्वार्टर होते…. आता ते आमच्याकडे नाही पण अजुनही सगळी भावंड जमली की तासनतास त्याबद्दल बोलणे होते………….दरवेळी ठरवतो एकदा जमुया आणि ईगतपुरीला जाऊया….पण लहान ईच्छा सुद्धा पुर्ण होत नाहित… आणि खरं सांगु का जसे तुम्ही या लेखात घरात झालेले बदल नोंदवले आहेत तसे जर आमच्याही घरात असले तर (जे असणारच)पचायला कठीण जाईल या भितीने मी ही टाळतीये तिथे जाण्याचे…..

  • तन्वी
   एकदा जाउन या नक्की.. कशाही स्थितीत असलं तरी बरं वाटेल बघा. माझी प्रत्येक उन्हाळ्याची सुटी मामांकडेच गेलेली आहे.
   काल पण सारखं वाटत होतं, एखादा मामा येऊन टप्पल मारुन जाईल…

 4. छान् लिहिलाय् पोस्ट्..
  आमचाही वाई ला वाडा आहे..पण् टो भाउ बंदकीत् अडकलाय्..

  ओंकार देशमुख
  http://pune-marathi-blog.blogspot.com/

  • ॐकार
   अगदी खरंय ! म्हणूनच मी लिहिलंय वडिलोपार्जित इस्टेटीला भाउ बंदकीचा शाप म्हणून..
   सगळ्याच घरात हाच प्रकार आहे !

 5. sagar says:

  माणसाच्या आयुष्यात लहानपणीच्या आठवणींचं खूप महत्व असतं त्या कायम तशाच रहाव्यात असे वाटत असतं… पण ……

  खरच नेहमीच वाटत असं…

  • सागर
   अरे वय हे वाढतंच असतं, केस काळ्याचे पांढरे होतात, मुलं मोठी होतात.. शरीराचं वय जरी वाढलं, तरी त्या जागी गेलॊ की मन पुन्हा लहान व्हायचा प्रयत्न करतं..

 6. खूप निराश, भरून आल्यासारखं असं वाटलं पोस्ट वाचून झाल्यावर. आमचं गाव वगैरे काही नाही.. सगळं मुंबईतच.. तरीही 😦

  • हेरंब
   त्यासाठी गाव वगैरे असायची गरज नाही . आजोळ हे आजोळच असतं कुठेही असलं तरीही…
   🙂

 7. Tushar Malode says:

  मस्तच आहे लेख बालपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ……… बालपण आणि आजोळ एकाच नाण्याच्या दोन बाजू …….. बालपणी जवळ जवळ प्रतेक उन्हाळा मामांकडेच जायचा ……..

  Thanks for writing this

  • तुषार
   अगदी खरंय. बालपणींच्या आठवणींवर तर एक पुस्तक होऊ शकतं. मी आता लवकरच शाळेचे दिवस लिहायचा विचार करतोय..:)

 8. वा! माझ्या लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या… आजोळीच होतो – शिकायला!
  घर – व्हरांडा – बाजुला गाई – म्हशींचा गोठा… ती पाण्याची पाईपलाईन – चिंबुर – भला मोठा हौद – शेजारी नारळाची झाडं… – मळ्यातली आंब्याची झाडं – याच महिन्यात – पहाटे – पहाटे – सुटणारं सारं – आणि आमची आंबे गोळा करण्यासाठीची धावपळ!….. अहाहा – सारं कसं डोळ्यासमोर उभारलं! –

  धन्यवाद, महेंद्रजी!

  • दिपक
   बऱ्याच गोष्टी नामशेष झालेल्या आढळल्या. सकाळी उठल्यावर मागच्या अंगणातल्या चुलीवर पाणी तापवायचा चांगलं शंभर लिटरची एक भांडं होतं, आता चूल पण नाही, आणि भांडं पण नाही. बाथरुम मधे गिझर आलाय.

   म्हशीचं दुध काढणं खूप अवघड . अंगठा दुखून यायचा दूध काढतांना हाताला एरंडाचं तेल लाउन दुध काढायचॊ आम्ही. मला पण काढता येतं बरं का दूध..
   त्यामानाने गाईचं दूध काढणं सोपं असायचं. गाईच्या किंवा म्हशीच्या एका आचळाला हात लावित नसू आम्ही. ते आचळ त्या वासरासाठी सोडलं जायचं…
   बरंच काही मिस करतोय दिपक!!

   • Sagar says:

    काका
    मी प्रयत्न केला होता धार काढायचा पण मला आमची म्हैस हातच लावू देत नवती …तिला रोजचच धारावाला लागायचा…मला वासराला आईला प्यायला सोडायला खूप आवडायचं….एकदा एक वासरू जन्मल्यावर लावाके मेले होते म्हशीने ३ दिवस पान्हाच सोडला नव्हता ..

    • सागर
     ते शिकावं लागतं आचळ दाबलं जायला नकॊ. म्हशीला दुःख होतं. तसंच गाईचं पण आहे.
     लहानपणी शिकलेलो आहे हे सगळं उन्हाळ्याच्या सुटीत.

 9. सचिन says:

  अहाहा काका काय मस्त लिहलाय लेख. आणि सोबत फोटोची पर्वणी. मस्त बालपणात फिरून आलो. आणि मामाच्या गावाला पण जाऊन आलो. आजोळच्या आंब्याची आठवण झाली. आता ते आब्याच झाड नाहीये.

  बाकी तुम्ही फोटोत दिलेल्या आंब्याच्या झाडाला पाड लागलाय कि नाही ?

  • सचिन,
   हो आलाय की. भरपूर आंबे लागले आहेत. खरं तर तो आंबा म्हणजे पायरी आहे. कोंकणातून आणून लावलेली कोय आहे ती आज्जीने.. तिच्या हयातीतच फळ धरलं होतं या झाडाने.

 10. आजोळी तर घर बंदच असत, सणासुदीला कधि गेलं तर आजीच्या फोटोकडे पाहुन रडू येत मला, किती प्रेम कराव तिने आम्हा नातींवर काही प्रमाण नाही.
  परसदारी असलेलं खूप मोठ बकुळीच झाड, पाण्याची मोठी दगडी द्रोण, चाफ्याची झाड, सागवानाची, जांभळाची झाड, करवंदाच्या जाळ्या किती आणि कशाकशाच्या आठवणी.
  चिपळूणला मे महिन्यात सगळी चुलत, आत्ते, मामे भांवंड जमायची आणि जी काही धमाल यायची तशी आता तिथे येत नाही. सगळी मोठी झाली, कामानिमित्त दुर गेली, म्हातारी माणसं आहेत तिथे थकलेली 😦

  • सोनाली
   सुटी काढ आणि मार चक्कर .. अजून कोणी असेल ना घरी? एकदा जाउन ये. बरं वाटतं बघ.

 11. रोहन says:

  तुझ्या लिखाणात जादू आहे बघ.. गावाला घेउन गेलास एकदम. आमचे गावचे घर सुद्धा काही वर्षापूर्वी पडले. (नव्हे पाडले!!!) काळ आपल्याला पुढे घेउन गेला की आपण काळ पुढे घेउन आलो ??? काही समजत नाही. पण तुझ्या लहानपणाची एक-एक गोष्ट पुन्हा आठवताना मस्त वाटते असेल नाही!!!

  हां पोस्ट वाचता वाचता डोळ्यात थोड़ी उदासिनता आणि ओठावर मध्येच मंद स्मित येत होते… 🙂 लेख आवडला… 🙂

  • रोहन
   हे घर पण आता पडायलाच आलंय. जर दुरुस्ती केली नाही तर लवकरच नामशेष होईल असे वाटते. अरे मेन्टेनन्स अजिबात नाही घराला. कसं टीकेल ते?

   थोडं वाईट वाटलं. पण तेवढ्यातच एक जाणीव झाली की चेंज इज इनएव्हीटॆबल.

 12. मागे मी कोकणात गेलो होतो तेव्हा माझ्या आजोळी गेलो होतो. घर भाऊबंदकीत गेलं, पण बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुमचा लेख वाचून परत त्या आटवणींना उजाळा मिळाला.

  • निरंजन
   अहो हीच गोष्ट सगळ्याच घरांमधे दिसून येते. भाउबंदकीनेच तर आपलं नुकसान करुन घेतोय आपण. आता जो कोणी गावात रहातो त्याला घर देऊन टाकावं, म्हणजे कमीत कमी वडीलोपार्जित वास्तू टिकेल तरी.
   पण लोभ!!! कोणीच आपला हिस्सा सोडायला तयार नसतो.. आणि हेच आहे दुर्दैव मराठी माणसाचं!

 13. Vidyadhar says:

  गेल्याच वर्षी आजोबा गेले…ह्या सुट्टीत आजोळी गेलो होतो तर ते घर पाहवत नव्हतं….अगदी सहा महिन्यांपूर्वी तिथेच आजोबांबरोबर गप्पा मारल्या होत्या….
  बाबांच्या गावीही असंच…बाबांनी घर बांधलंय तिथे….आम्ही दरवर्षी जातो….शेवटची काही वर्षे आजीआजोबाही राहायचे तिथे….पण आजीआजोबांच्या भाड्याच्या घरात आम्ही सगळी भावंडे जमायचो, ते दिवस कधीच आठवणींच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत….
  वास्तू तीत राहणाऱ्यांची व्यक्तिमत्वे घेते असे म्हणतात….

  • विद्याधर..
   वास्तू तीत राहणाऱ्यांची व्यक्तिमत्वे घेते असे म्हणतात…….
   अगदी बरोबर!!
   पटलं एकदम पटलं..

 14. Nandu says:

  महेंद्र,
  एकदम आवडला, छान झ्हालय post . तुम्ही येव्हाद छान वर्णन केलाय पण गावाचं नाव काय आणि ते कुठे आहे ?
  .. नंदू

  • नंदू
   हे गांव म्हणजे बाबा आमटेंचं वरोरा. चंद्रपुर जिल्ह्यात आहे हे गांव. नागपूरपासून फक्त १०० किमी असेल..

 15. mugdhamani says:

  छान पोस्ट!
  आम्ही सध्ध्या ज्या घरात राहतो चेन्नईला ते ही असंच जुनं घर आहे, घरमालकांच्या घरच्या बर्याच लोकांच्या खुप आठवणी असलेलं…विहीर, आंब्याची नारळाची झाडं, जुन्या बाल्कन्या..जुने देवाचे फोटो..
  तुमच्या आजोळच्या वाडयाच्या जागी जर मोठा दुसरा वाडा उभा राहीला नं तरी तिथे पुर्वी सारखंच वाटेल…
  घरातली सग्ळी जुनी मंडळी जरी फोटोत गेली असली तरी वास्तुपुरुष असतोच की नेहमीसाठी तिथल्या तिथे..
  माझ्या आजोळचा वाडा पडला..आता तिथे मामाने नवीन घर बांधलं..तरी पुर्वी जी उब जाणवायची ती अजुनही जाणवतेच…

  • मुग्धा
   वास्तूपुरुष असतोच.. हे खरंय अगदी. जो भाउ गावात रहातो त्याच्या नावे घर करुन दिलं तर काय हरकत आहे,? पण मानवी स्वभाव खूप लोभी असतो..
   कदाचित इतर भावांनी हक्क सोडला असता, तर घर वाचलं असतं.. असं वाटतं.. असो.

 16. अगदी असच घर होत आमच अमरावतीला..मस्त झालीय पोस्ट.

 17. खरच छान झाली आहे पोस्ट…आम्हाला अगदि अलगद तुमच्या आठवणींशी जोडत तुमच्या आजोळच दर्शन घडवलत आणि सोबत आमच्या बालपणातही नेल…

  • देवेंद्र
   ते दिवस गेले पण आठवणीत आहेत अजून. प्रवासात खूप पुढे गेलोय पण , मागे काहीतरी राहून गेलं असं वाटत असतं सारखं

 18. दिपक says:

  महेंद्रभाऊ,

  फोटो आणि आठवणी वाचुन हळवा झालो. बर्‍याच आठवणींनी गर्दी केली मनात. तुम़च्या इतकाच त्या वास्तुलाही आनंद झाला असेल.

  अप्रतिम पोस्ट!

  • दिपक
   मला पण तसंच वाटतं.
   वास्तूपुरुष नक्कीच सुखावला असेल, आपल्यावर प्रेम करणारा कोणीतरी आला म्हणून..

 19. गौरी says:

  माझे आजोबा माझ्या जन्मापूर्वीच गेले, आणि आजी आमच्याकडेच राहायची. त्यामुळे आजोळ काय असतं ते अनुभवलेलं नाही. पण लहानपण भुसावळला रेल्वे कॉलनीमध्ये गेलं, तिथल्या इतक्या सुंदर आठवणी आहेत … भुसावळ सोडल्यापासून मी परत तिथे गेलेले नाही, जायची इच्छाही नाही. आठवणीतली सुंदर जागा विद्रूप झालेली बघायला नको वाटते. तिथल्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या पोस्टमुळे.

  • गौरी
   कदाचित खरंही असलं तरीही तिकडे जायची ओढ ही असतेच.. असंम्हणतात की जिथे नाळ गाडली गेली आहे त्या जागेची ओढ कधी सुटत नाही.
   मला अतिशय जास्त अटॅचमेंट आहे आजोळाशी. अजुनही आपलं बालपण शोधत असतो मी तिथे गेलो की.

  • गौरी
   कदाचित खरंही असलं तरीही तिकडे जायची ओढ ही असतेच.. असंम्हणतात की जिथे नाळ गाडली गेली आहे त्या जागेची ओढ कधी सुटत नाही.
   मला अतिशय जास्त अटॅचमेंट आहे आजोळाशी. अजुनही आपलं बालपण शोधत असतो मी तिथे गेलो की.
   कासव कसं आपल्य ठिकाणीच अंडी घालायला येतं तसं आहे हे.

 20. Bharati says:

  महेंद्र्जी,
  तुमचा ब्लॉग खूप छान सजवला आहे.तुमची भाषाशैली उच्च दर्जाची आहे.तुमच्या कुटुंबातील व्यक्ती भूंगा, रोहन,सह्जच,
  सोनाली,सागर,हेरंभ,सचिन,निरंजन,विद्याधर….ह्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्याशिवाय ब्लॉग सोडू नये वाटतो.आता प्रथम तुमचा
  ब्लॉग पहिल्यशिवाय नेट म्हणजे चुकल्यासारखे वाटते.अजुन खूप काही वाचायचे आहे.तुमचा ब्लॉग छान म्हणजेच कुटुंबाचेही
  छान असणार.धावती भेट घेतली आहे.ऐकसो ऐईक हिरे आहात.असे ब्लॉग वाचून लक्षात आले हे लिखाण संपादकीय लायकीचे आहे
  वर्तमान पत्रातून सर्वसामान्यांपर्यंत पोचले पाहिजे.तुमच्यासरक्यानी ठरवले तर लेखनीच्या जोरावर तुम्ही आज भरकतलेल्याआ
  समाजाला योग्य मार्ग दाखवून ऐकसंघ करू शकता.
  तुमची गाव भेट नि नव्या पिढीला घडवायचा घाट वाखाणण्याजोगा आहे.जुन्या वास्तू जपल्या पाहिजेत.त्यासाठी घरान्याने ऐकत्र
  येऊन जुन्या आठवणी आणि घरातील जेश्थान्च्या आठवणी सांगितल्या पाहिजेत.प्रत्तेकाला वेळ देऊन बोलायला लावून त्या आठवणी दुर्मिळ चित्रे ऐकत्र करून पुस्तक छाप्पावे आणि त्याची प्रत सर्वाना द्यावी तरच णव्या पिढीला पूर्वजांचे कष्ट आणि
  त्यांचे राहाणीमान समजेल.त्याना त्या वास्तू बद्दल आस्था वाटेल नि पूर्वजांचा आदर.
  आता शाळा कॉलेजच्या आठवणी…विनोदी,….बालपनीच्या भुताखेताच्या गोष्टी….यावर लेख होऊ द्या आणि आम्हाला आमचे किस्से सांगायला ही व्यासपीठ द्या.
  छान वाटले.धन्यवाद!
  भारती

  • भारती
   इतक्या सुंदर शब्दात दिलेल्या प्रतिक्रियेकरता आभार. वर्तमान पत्रात लिहिण्यासाठी विषयांची बांधिलकी लागते. ती आमच्या कडे नाही.
   जो पर्यंत एखादी गोष्ट मनाला भिडत नाही तो पर्यंत त्या विषयावर लिहिलं जात नाही.
   विनोदी, सामाजीक, राजकिय सगळं लिहितो मी, पण फक्त ती इच्छा आतून झाली पाहिजे, तरंच जमतं ते..

   इथे ब्लॉग वर आम्ही जे काही लिहितो ते स्वान्त सुखाय.. त्यामुळे त्याला बंधनात अडकवत नाही आम्ही कोणीच. जे काही लिहिलं जातं ते उत्स्फुर्त असावं असं वाटते.

   “जे मनापासुन लिहिलेलें असते ते दुसऱ्याच्या मनाला भिडते”
   आणि हो, ते शाळेचे दिवस तर नक्कीच लिहिणार लवकरच.. आता एक कथा लिहायला घेतली आहे खूप दिवसांच्या नंतर.

 21. सुरेश पेठे says:

  महेंद्रजी,
  लेख अतिशय सुंदर झाला आहे, पण का कोण जाणे वाचल्यावर एकदम विषण्णता आली. आमचा नाशिकचा वाडा पेशवेकालीन आहे ….म्हणजे आता होता असेच म्हणायला हरकत नाही कारण आता तो विकला गेला आहे व कधीही तोडायला सुरुवात होईल. तेव्हाचे ते सुरुचे खांब, नक्षीदार तक्तपोशी, मोठ्या मोठ्या तुळया, मोठे मोठे उंबरे ( मधल्या घरातील उंबऱ्यावर बसायचे कोणी ? अर्थात जो ज्येष्ठ असेल, मी कायम कनिष्ठ , तसाच राहीलो ) , दरवाजे हे भले मोठाले व ते लावल्यावर एक मोठा चौकोनी सागवानी वासा दोन्ही कडून भिंतीत सकवला की एकदम ” सेफ”. वर्षातून एकदा सर्व लाकूड कामाला तेल पाणी द्यावेच लागायचे ! आता किती वर्षात त्यांना ते मिळालेच नाही तर त्यांनी का तग धरावा !

  सर्वच जुन्या वास्तुंची थोड्याफार फरकाने हीच कहाणी आहे, आता तितकी माणसेही नाहीत व डागडुजीला पैसाही नाही. त्यांच्या गरजाही संपूष्टात ये चालल्यात.

  निजामा सारख्याला राजवाडा विकायला लागतोय मग इतरांची काय तमा !

  • सुरेशजी
   आपल्याकडे वडिलोपार्जीत इस्टेटला लागलेला हा शापच आहे. जुन्या लाकडांना ’बेल तेल’ पाजावं लागायचं. हे बेल तेल लावलं की मग मात्र ते लाकूड पुन्हा एक वर्ष चांगलं रहायचं.
   गेल्या कित्येक वर्षात तेल न मिळाल्याने पण त्या लाकडांमधे क्रॅक्स डेव्हलप होतात.
   तुमचा वाडा एकदा पहायला आवडेल. मी नाशिकला निघालो की तुम्हाला फोन करीन.
   वाटणी, हिस्से, हे दोन शब्द म्हणजे शाप आहेत असे वाटते.

 22. पोस्ट एकदम छान झाली आहे, खुपंच सहज वर्णन केले आहे तुम्ही…
  सगळ्यांच्या प्रतिक्रिया किती बोलक्या आहेत, तुमच्या लेख इतका मनाला भिडला की सर्वांना त्यांच्या अजोळाची आठवण आली…

  • आनंद
   आजोळ म्हणजे प्रत्येकाच्याच जीवनात एक नाजूक आठवणींची साठवण असते. मला वाटतं माझं आजोळ – तसंच प्रत्येकाचं आजोळ.. मग ते मुंबईला असो की पार तळ कोंकणात.. आजोळचे दिवस कधीच विसरले जात नाहीत.
   कायम नाजूक आठवणींच्या स्वरुपात लक्षात रहातात..

 23. bhaanasa says:

  महेंद्र, डोळे भरून आले वाचता वाचता. तू लिहीलेले वाचता वाचता कधी माझ्या आजोळी जाऊन पोहोचले ते कळलेच नाही.दरवेळी गेले की मी अशीच घरभर आठवणी गोळा करत भिरभिरत राहते. कुठे आजीचा स्पर्श सापडतो का, आजोबांची हाक ऐकू येते का….. पण सगळीकडे भयाण शांतता आणि मनात भरून राहते विषण्णता. जाऊ दे… अगदी हळुवार-मनापासून लिहीले आहेस सगळे. जणू तुझ्याबरोबरच फिरतेय आणि तू अग, हे बघ इथे ना अमूक होते असे भरभरून सांगतो आहेस असेच वाटत होते. कितीही त्रास झाला तरी मी प्रत्येकवेळी दोन्हीकडे जातेच जाते.

 24. Veerendra says:

  खूपच मस्त .. खरतर मी पहिल्यांदा फोटो पहिला तेव्हा प्रेमात पडलो त्याच्या .. आजूबाजूला एक ही घर नाही अन अगदी सुट्टी वास्तू खरतर पाहायला मिळत नाही. त्यानंतर आपोआप मनोगत ही वाचले गेले. खूप छान लिहिले आहे तुम्ही. आमच्या वाड्याची हे तीच आवस्था आहे. असो .

  मला या वाड्याचा मोठा फोटो द्याल का. बघतो याच चित्र करता येत का ते. ! 🙂

 25. Aparna says:

  मागच्या भारतभेटीत मामाकडे गेल्यावर जसं वाटलं अगदी तस्संच वाटलं हा अनुभव ऐकुन…आजोळचं घरही आम्ही जायचो तसं उरलं नाही…उरलंय ती फ़क्त मामा-मामींची अपार माया…आणि त्याबाबतीत मी खूप नशीबवान आहे असं वाटलं….

  • अपर्णा
   आजोळची आठवणच उबदार असते नेहेमी. अजूनही खूप बरं वाटतं लहानपणीच्या आठवणींच्या हिंदोळ्यात झोके घेतांना.

 26. ganesh nimbalkar says:

  मस्त झालय पोस्ट…. reaaly nice sir kharach, kup great lekhan aahe tumach…
  Everday i am reading ur old posts…really nice…keep it up..

 27. हेमंत लाटकर says:

  छान माहिती. आमच्या आजोबाचा (वडिलाचे वडिल) वाडा असाच आहे. पण तिथे काका राहत असल्यामुळे रिनोव्हेशन झाले आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s