चवीनं खाणार गुजरातला…

आता पर्यंत उगिच वाटायचं की आपण खादाडीवरच जास्त लिहितो की काय ते.. पण तसं नाही. वर्षभरात फक्त ८ लेख म्हणजे काही फार नाहीत हो. माझ्या शरीराचा आकार बघुन उगिच लोकांना वाटतं की मी फक्त खादाडीचेच लेख लिहित असेल म्हणून. बरेच दिवस झालेत गुजरातच्य खादाडीवर लिहायचं म्हणुन विचार सुरु होता, पण खादाडीवर लिखाण  अती होतंय असं वाटायचं म्हणुन लिहिलं नव्हतं. आज सहज जुने फोटो पहात बसलो होतो, तर हे गुजरातचे फोटो समोर आले, आणि विचार केला- येस्स्स!!!!!!!.

गुजरात म्हणजे उत्कृष्ट व्हेज जेवण मिळण्याची जागा. तुम्ही गुजरातला गेलात, की तुमचे मित्र /नातेवाईक तुम्हाला आवर्जुन गुजराती थाळी साठी म्हणुन  विशाला  नावाच्या   रेस्टॉरंट मधे किंवा कुठल्याही ’जी’कारान्त  (सासूजी, नानीजी,वगैरे वगैरे )रेस्टॉरंट मधे  घेउन जातील. दिड ते दोन  फुट व्यासाच्या थाळी मधे ठेवलेल्या १२-१५ वाट्या आणि इतर  फरसाण  गोष्टींनी भरलेलं ते ताट , यावर लिहीणार नाही ,कारण ते तर अगदी कॉमन आहे. तर अहमदाबाद मधली एक हटके जागा आहे तिच्याबद्दल लिहिणार आहे आज.

अहमदाबादला असलो की ऑफिस पासुन जवळच असलेले माझे एक फेवरेट रेस्टॉरंट आहे – त्याचं नांव स्वाती. दोन मजली असलेलं हे रेस्टॉरंट म्हणजे तुमच्या सगळ्या व्हेज खाण्याच्या फॅंटॅसीज पुर्ण करण्याचे स्थान आहे. इथे प्रत्येकच गोष्ट थोडी हटके आहे. कुठेही सहसा न मिळणारे पदार्थ इथल्या मेनु कार्ड मधे हजेरी लाउन असतात. मी श्रीनिवास, आणि सौरभ – आम्ही तिघंही दुपारी जेवायला ( छे — जेवायला नाही,  स्पेशल स्नॅक्स साठी )  गेलो होतो. रेस्टॉरंट मधे प्रवेश केला, तर दस मिनिट लगेगा म्हणुन बाहेर उभं केलं. इकडे तिकडे पहात वेळ घालवत उभे होतो. पण पोटात कावळे कोकलत होते. तेवढ्यात पुकारा झाला आमच्या नावाचा, आणि आम्हीआत शिरलो . अहमदाबादला पण लोकांचं बाहेर खाण्याचं प्रमाण फार जास्त आहे 🙂

या रेस्टॉरंट मधे मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी हटके   मिळतात. बऱ्याच गोष्टी तर केवळ याच हॉटेल मधे मी मेनू कार्ड वर बघितल्या. इथे आलं आणि तुम्ही चार पाच लोकं असाल तर निरनिराळ्या डीशेश मागवून शेअर केल्यास जास्त प्रकारांची चव घेता येईल. उन्हामुळे घसा नुसता कोरडा पडला होता. वेटरने मेनू कार्ड समोर आणून ठेवले आणि आम्ही सर्वप्रथम  फ्रेश लेमन ची ऑर्डर दिली. नेहेमीचा अनूभव म्हणून मी इथे ऑर्डरची सूत्र हाती घेतली.

दालबाटी..

वेटरने आधी दालबाटी आणुन ठेवली समोर. शुध्द तूपामधे बुडलेली ती बाटी मला वेडावून दाखवत होती, एकदा त्या दालबाटी कडे आणि एकदा आपल्या पोटाकडे पाहिलं, विजय झाला दालबाटीचा, पण  मी    एखाद्या लढवय्याप्रमाणे सरळ तुटून पडलो. इथली दालबाटी एकदम ऑथेंटीक राजस्थानी. दालबाटी सोबत लसूण चटणी आणि एका प्लेटमधे गोड  चुरमा पण होता.

सातपडी रोटी अन गट्टेका साग

हे संपवतोय तो पर्यंत सातपडी रोटी अन गट़्टेका साग होता. सोबत हिरवी चटणी. सातपडी रोटी म्हणजे रोटी लाटायची, मग तेल लाउन पुन्हा घडी घालायची, पुन्हा लाटायची असं सात वेळा करायचं. पहिल्यांदा जेंव्हा लाटता, तेंव्हा कुठलासा मसाला पण त्या रोटीमधे भरलेला असतो. इतकं तेल लागल्यामूळॆ एकदम खुसखुशित होते ही  रोटी. पानात पडल्यावर कधी संपेल तेच समजत नाही. इथे थालीपिठ पिठलं पण मेनू कार्ड मधे आहे पण ते मागवलं नाही.इथली बेक्ड मसाला खिचडी एकदम अप्रतिम असते. मायक्रोवेव्ह मधे चिज घालून केलेली ही खिचडी म्हणजे डायटिंगची वाट लावणारी 🙂 पण अप्रतिम चव असते . एकदा अवश्य ट्राय करा.

खीचू..

खीचू नावाचा एक पदार्थ मिळतो. बाजरी खीचू  किंवा मकई खीचू दोन्ही प्रकार इथे मिळतात. खीचू म्हणजे पापड करायचं  शिजलेलं पीठ. आता ह्या पिठाचे पापड करून वाळवतात असं सौरभ म्हणाला. ( तो एकटाच गुज्जू भाई, म्हणजे तो जे म्हणेल त्यावर विश्वास ठेवावाच लागला) जे काय असेल ते असो, पण हे खीचू मात्र खुपच टेस्टी होतं. या खीचुवर त्या वेटरने भरपूर शेंगदाण्याचं तेल टाकून आणलं होतं. बरोबर एक चटणी होतीच. एक प्लेट संपलं खीचू मग पुन्हा एक प्लेट मागव म्हणाला श्रीनिवस, म्हणून एक प्लेट मकईका खीचू पुन्हा ऑर्डर केलं. खातांना त्यावर घातलेलं इतकं मोठं तेल मात्र सारखं नजरेला येत होतं, तिकडे दुर्लक्ष केलं, आणि खादाडी सुरु ठेवली.

हांडवो

इतकं खाणं झाल्यावर पोट तर भरतच आलं होतं. पण तेवढ्यात त्या वेटरने समोर हांडवो म्हणून एक डीश असते ती आणुन ठेवली. साधारण ढोकळ्यासारखी दिसणारी ही डीश अतिशय टेस्टी असते. ढोकळ्याच्या  आणि हांडवो च्या चविमधे अजिबात समानता नाही. पोट भरलं असतांनापण एक डिश संपवली . इतकं खाणं झालं, तरीही मनामधे एक खंत राहूनच गेली – ती म्हणजे धनसाक भात खायची. अजिबात जागा नव्हती पोटात म्हणून ऑर्डर कॅन्सल केली , आणि आइस्क्रिमच्या काउंटर कडे वळलो ( पोटात जागा नसतांना आइस्क्रिमच्या काउंटरकडे कसे गेलात ते विचारू नका , त्या साठी कधिही जागा असतेच.अहमदाबादला येऊन आइस्क्रिम न खाणं ?? म्हणजे इंदौरला जाउन सराफा न पहाणं आहे. वन बाय टू करून आइस्क्रिम मागवलं, फ्रेश चिकूचं.

इतकं जेवण झाल्यावर रात्री काहीच खायचं नाही असं ठरऊन टाकलं होतं. कामं संपल्यावर रात्री अकराची ट्रेन होती गांधीधामला. कांडला पोर्ट ट्रस्ट मधे काम होतं दुसऱ्या दिवशी. तिथलं काम आटोपून आम्ही जामनगरला गेलो. गुजरात मधे गेल्यावर जर कच्छी जेवण नसलं, तर काय मजा? एकदा तरी कच्छी जेवण जेवावं असं वाटत असेल तर जामनगर बायपास वरच्या आशिर्वाद रेस्टॉरंट मधे अवश्य जायला हवं.तसं म्हंटलं तर गावाबाहेर असलेले हे रेस्टॉरंट , इथे टिपिकल कच्छी जेवण मिळतं. कच्छी म्हंटलं की लोकांना सेवटमाटरनू साग आणि लसणिया बटाका आठवतो. पण त्यापलिकडेही बरेच  कच्छी पदार्थ आहेत.

बाजरीची भाकरी , लोणी आणि गूळ

दुपारचे दिड वाजला होता. हॉटेलची चीरपरीचित इमारत समोर दिसली. बऱ्याच कार्स समोर पार्क करुन ठेवल्या होत्या.  इथे गेल्यावर काय ऑर्डर करायचं ते पण ठरलेलंच होतं. भरेला करेला, रिंगणा मसाला, अने बाजरानू रोटलो , मख्खन अने गुड साथे अशी ऑर्डर दिली. इथे बाजरीची भाकरी खातांना अजिबात कद्रू पणा करायचा नाही. भाकरी कुस्करून आणि त्यावर मोठा लोण्याचा गोळा , गुळ मिक्स करुन लसून चटणी बरोबर एकदम  भन्नाट लागतं. व्हेज वाले मित्र नक्कीच ट्राय करतील. काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीमधे करतांनाच थोडे तिळ घालतात, त्याची पण चव मस्त येते.

बाजरेका रोटला अन इतर डीश

समोर असलेल्या प्लेटमधल्या भाजा वगैरे तर उगिच मागवल्या असं वाटलं, पण नंतर भरेला करेलाची पुर्ण डीश संपवली मी. ताक मागवले आणि दोन घोट घेउन समोर ठेवले, तर ग्लासात एक माशी बसलेली दिसली. ग्लास परत दिला, आणि दुसरा मागवला. कच्छी जेवणामधे तेल भरपूर वापरले असतेच, तसेच तिखट वगैरे पण मु्बलक प्रमाणात वापरले जाते. जेवण एकदम टेस्टी असतं, जेवण झाल्यावर खिचडी अन कढी मागवायलाच हवी. पण आज  लोणी भाकरी इतकी आवडली, की तिच डीश रिपिट करू असं श्रीनिवास म्हणाला.

चॉकलेट पानवाला. इतकं सगळं झाल्यावर मग पान हे हवंच. म्हणुन मग चॉकलेटच्या लिक्विड मधे बुडवुन तयार केलेलं चॉकलेट पान हवंच..

गुजरात मधल्या खादाडीवर लिहितोय, तर मग चो्टीला च्या चौकडीवर असलेल्या त्या अ्नलिमिटेड सॅलड्स – ते पण वेगवेगळया प्रकारचे फ्री देणाऱ्या हॉटेल बद्दल तर लिहावे लागेलच, पण ते पुढल्या पोस्ट मधे कधी तरी. म्हणजे चविने खाणार गुजरातला भाग दोन मधे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to चवीनं खाणार गुजरातला…

 1. वा वा…सकाळी सकाळी खादाडीवर पोस्ट….निषेध 🙂
  दालबाटी, सातपडी रोटी, गट्टेका साग मी ट्राइ केलय मस्त लागत. खीचू आणि हांडवो चा फोटो बघून तोंडाला पाणी सुटला बघा एकदम. वाढलेल्या पोटाची चिंता नसावी, खाण्यासाठी जन्म आपुला 🙂 हे हे हे.

  • सुहास,
   कालच लिहून ठेवली होती पोस्ट.फक्त सकाळसाठी शेडूल केली होती. 🙂
   पोटासाठीच तर सगळं काही करतो आपण. उद्यापासून गोव्याला आहे चार दिवस.. 🙂

 2. आत्ताच गुजराथी जेवून आलो बाहेरून आणि बघतो तर ही पोस्ट. अर्थात जर्सीतलं गुजराथी आणि अमदावाद मधलं गुजराथी यांची तुलना करणं म्हणजे…. जाउदे उपमा आठवत नाही… 🙂 पण नि….. षे….. ध……….. !!!!

  • हेरंब
   गुजराथी व्हेज पण मला आवडतं, शक्यतो थाळीपेक्षा कठियावाडी प्रिफर करतो मी . थाळी पण चालते.. नाही असे नाही.. 🙂

 3. bhaanasa says:

  महेंद्र, तुझा किती जोरदार निषेध करू आता……… एक से एक चुनचुनके छळवाद टाकला आहेस तू…. डालबाटी, हांडवो, बाजरीची भाकरी आणि लोणी…. कलेजा खल्लास झाला… सातपेडी रोटी…. ह्म्म्म्म्म. हे खीचू तर मी नवीनच ऐकतेय… आता करायला हवे एकदा. खरेच आपण सगळे खाण्याचे जबरी वेडेच आहोत…. 🙂 🙂

  • भाग्यश्री
   हे खीचू मस्त लागतं चवीला. मी पण पहिल्यांदाच खाल्लं यावेळी. दाण्याचं तेल घालून देतात खायला, आणि तळलेलं लाल तिखट असलेलं तेल असतं

 4. shailaja says:

  मी शक्यतो हॊटेलमधले जेवण टाळते. पण तुमची पोस्ट वाचून तोंडाला पाणी सुटले. आणि तेहि प्युअर व्हेज म्हटल्यावर गुजरातला जावेसे वाटतेय.

  • शैलजा
   मला मनापासून आवड आहे चवीने खाण्याची. त्यामूळे हॉटेलींग पण आवडतं. नौकरी निमित्त नेहेमी फिरतीवर जावं लागतं, म्हणूण निरनिराळ्य़ा हॉटेल्स मधे जाणं होतंच.

 5. रोहन says:

  दादा.. तू काही फार लिहित नाहीस रे. फार खातोस हेहे … 🙂 आता बघ ना एका पोस्टमध्ये किती ते पदार्थ … उगाच नाही तुम्ही राजे !!!

  वा मेनू मस्त आहे.. दालबाटी – चुरमा. राजस्थान ट्रेकची आठवण झाली. खीचू कधी खाल्लेले नाही. मुंबईमध्ये कुठे मिळते का बघायला हवे… :डी

  • रोहन
   हे सगळं मी एका बैठकीत खाल्लं. विचार कर ! किती खायचं रे.. आता कमी करावं म्हणतोय 🙂
   वयोमानाप्रमाणे खाणं कमी करावं असं म्हणतात. मुंबईला मी पहातो मालाडला कुठे मिळतं का ते..

 6. Tushar Kulkarni says:

  मी अहमदाबाद ला एक वर्ष राहिलो . बहुतेक सर्व हॉटेल्स try केली . पण स्वाती चा उल्लेख प्रथमच ऐकला . Can you please give me the detailed address?
  Thanks.

  • तुषार
   स्वाती हॉटेल लॉगार्डन ( ज्याला लव्ह गार्डन पण म्हणतात 🙂 ) त्याच्या जवळ आहे. फेमस आहे जागा. मला वाटतं की सहा वर्षापुर्वी सुरु झालं हे हॉटेल. एकदा अवश्य ट्राय करा.

 7. sahajach says:

  सकाळीच बघितले होते की तुम्ही ही पोस्ट टाकलेली आहे…मग म्हटलं आधि जेवण करू आणि मग वाचू/पाहू…. पण माझी ट्रीक सपशेल फेल गेलेली आहे… पोट भरलेले असले तरी एक से एक फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलेच… 🙂

  भन्नाट आहे ही खादाडी….. दुसरा भाग लवकर टाका खादाडी राज्याचे राजे!!!!

  • अहमदाबादला गेलो की स्वाती हॉटेल माझं फेवरेट आहे. एकदा तरी तिथे जातोच. आणि नंतर जामनगरला गेल्यावर आशिर्वाद.. दोन्ही एकदम अल्टिमेट आहेत.

 8. असं नाय करायचं. पोस्ट टाकता ते ठिक आहे पण फोटो का टाकता जोडीला? आज रविवारी कुठेही कमेंटायचं नाही असं ठरवल्यावर तुमच्या पोस्टमुळे माझा इरादा बदलला. आता मीही लवकरच खादाडीची पोस्ट टाकणार आहे.

  ** तुम्ही लावलेल्या ब्लॉगर मेळाव्याच्या विजेटमधे पोस्टची लिंक येत नाही. तुमची पोस्ट लिहाल, तेव्हा तुमच्याच पोस्टची लिंक द्या त्यात टाकून.

  • कांचन
   मला पण ते निटसं समजलं नाही, कसं बनवायचं ते विजेट? मी सरळ तुमच्या ब्लॉग अची लिंक दिली आहे मूळ पोस्ट पहायला.

   • महेंद्र :कांचनमला पण ते निटसं समजलं नाही, कसं बनवायचं ते विजेट? मी सरळ तुमच्या ब्लॉग अची लिंक दिली आहे मूळ पोस्ट पहायला.

    हे ते विजेट आहे. तुमच्या ब्लॉगवरील लोगोच्या ऐवजी हे विजेट लावलंत तरी चालेल. पुन्हा लोगोच दिसेल पण लिंकसह. शिवाय तुम्ही माझ्या ब्लॉगची लिंक नवीन पोस्ट मधे दिलेली आहेच त्यामुळे काळजी नाही.

    • हे ते विजेट आहे. तुमच्या ब्लॉगवरील लोगोच्या ऐवजी हे विजेट लावलंत तरी चालेल. पुन्हा लोगोच दिसेल पण लिंकसह. शिवाय तुम्ही माझ्या ब्लॉगची लिंक नवीन पोस्ट मधे दिलेली आहेच त्यामुळे काळजी नाही.

     या आधीची प्रतिक्रिया डिलिट केलीत तरी चालेल कारण काहीतरी निराळंच टाईप झालं.

 9. Bharati says:

  पोस्टमधील एकही मेनु मी खाल्लेला नाही.पण गुजराती घरगुती जेवणाची चव आजही जिभेवर रेंगाळते….माज़ी मावशी तिकडची
  नि तिच्याहातचे जेवण काय वर्णन सांगू ? अजुन तसे कुठे मिळाले नाही ती सुग्रीन गेली देवाघारी नि सोबत तिची कला पण गेली…
  आता तिकडे जाणे होत नाही,पण बालपणीची आठवण ताजी zआलिच.आणि गुजराती थालीबद्दल लिहून महेंद्राजिनी त्या मेन्यूना खरा न्याय दिला.हे मेनु मी पुस्तकात वाचले आहेत.वाटलेले काळात जमा ज़ाले असतील.पण ते अजुन मिळतात हे वाचून आश्चर्य वाटले! गुजरातला जायलाच पाहिजे !!! नि आनंदवनला…..

  • अवश्य जा एकदा. गुजरातला गेल्यावर अहमदाबादला जालच तुम्ही , तेंव्हा हे स्वाती हॉटेल चूकवू नका.

 10. सागर says:

  आताच बझ्झ केला की पुण्यात दाल बाटी चांगली कुठे मिळते म्हणून…निगडीत एके ठिकाणी गुलाबी दाल बाटी मिळते..छान असते ती पण… 🙂

  • निगडीला कुठे रे? मी चिंचवडला येतो नेहेमी. तिथे ते मयुरा हॉटेल एक माझं आवडीचं आहे व्हेज साठी> आणि दुसरं नैवैद्यम. ( मराठी जेवणाचं)

 11. Bharati says:

  महेंद्र्जी, आपण तेंडुलकर कडून सीक्स ची अपेक्षा करतो….गायकाकडे गाण्याची फ्रमाएश करतो..आवडत्या नेत्याकडे ,कामातील बदल,..आवडता पदार्थ बनवणारी जी असेल तिच्याच हातचा तो पदार्थ आपण फर्माएश करतो..आणि त्याना पण ते पुरे करण्यात आनंद वाटतो.तसेच मी जे काही आपल्या प्रोफाईएल मधून काही ब्लॉगची zअलक पहिली आणि मला पण या उत्तम लेखकांकडून फर्माईश करावी वाटते,एतर ब्लॉग पाहायचे राहीले आहेत त्याना अन्याय वाटायचा..पण मी सगळे ब्लॉग बघणार आहे .बघुया वेळ लागेल पण जेव्हा फिरिन तेव्हा प्रतिक्रिया देईनच.मला सरदेसाई, भूंगा,डोक्यात भुणभून्नारा..,हेमंत आठल्ये,सहजच,माज़ी या मना,पंकज,माज़ी स.भ्रमंती खूप आवडले काही ठिकाणी प्रतिक्रिया टाकता आली .
  आता अजुन पूर्ण वाचायच्या आधी फर्माईश केली तर त्यावर लिहिले नसले म्हणजे मिळवले! तरी पण मी करते……
  http://www.youtube.com/watch?v=lrbL1s9qwBs&hd=1 हे दुख आणि यावर वाचायला आवडेल.लहान मुलांचे दुख समाजापुढे आणायचे लिखानातून..ह्यावर तुम्ही, डोक्यात बुणभुणारा,हेमंतजी छान लिहु शकाल असे माज़े मत.बाकीच्याना पण विषय देणार..फर्माईश करणार आहे.कृपया रागाऊ नये.वाचायला खूप उशिरा येईन बहुतेक… पण नक्की!!!!!

  • छान विषय आहे. पण अभ्यास करावा लागेल लिहिण्यापुर्वी. पुढला आठवडा मी टूर वर आहे, पण लवकरच लिहिन.

 12. राजे नाही खादाडीचे अनभिषिक्त सम्राट आहात तुम्ही..पण म्हणुन आम्हाला नेहमी असे का जळवता… 🙂

  खीचू काय हांडवो काय मजाच मजा….

  • देवेंद्र
   🙂 फार कुठे फक्त ९ पोस्ट्स आहेत एक वर्षात. पण लवकरच दर दोन महिन्याला तरी एक पोस्ट टाकावे असा विचार करतोय. 🙂

 13. Ap____M says:

  When you wrote about Swati Snacks from A’bad, you haven’t mentioned Swati Snacks from Tardeo, Mumbai.

  • मुंबईच्या खादाडीची पोस्ट ताडदेवच्या स्वातीमधल्या ’दाल ढोकळी’ शिवाय होऊच शकत नाही. बरेच दिवसात तिकडे गेलेलो नाही, पण आता एकदा निष्चितच जाईन. आठवण करून दिल्याबददल आभार.

 14. Aparna says:

  काका….मला…………..वाचवा……………….सॉलिद भूक लागलीय आणि जेवायला (इकडचं) चायनीज आहे पण दिल मांगे वरती उल्लेखलेलं सगळं….खादाड राज्याचा राजा कसा असावा याचं चांगलं उदा. घालुन दिलंत वर मी कुठे खादाडीचंच लिहितो हे आहेच…..:)

  • अपर्णा
   खरंच.. वर्षभरात फक्त आठ पोस्ट्स!! बहूत नाइन्साफी है ये.. या वर्षी महिन्याला तरी एक पोस्ट टाकावी म्हणतोय.
   इथे या, मग जाउ या कुठे तरी खादाडी साठी 🙂

 15. hj91 says:

  Mmm….delicious. Start a youtube channel having theme ‘amchi khadya yatra..’

  There are plenty of cookery sites, but no marathi man/women has ever done it..starting a video blog showing places and its specialities..

  Good Luck.

  • हर्षद
   नुसते फोटो काढतो तरी बरेचदा लाजल्या सारखं होतं. लोकं विचित्र नजरेने पहातात 🙂 व्हिडीओ ब्लॉगिंगची आयडीया चांगली आहे. बघतो कसं जमतं ते.

Leave a Reply to कांचन कराई Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s