तुम्ही कशावर झोपता?

तुम्ही कशावर झोपता??

हा प्रश्न जो विचारतोय त्याला काही अर्थ आहे. कदाचित काही लोकं म्हणतील गादी, पलंग , सतरंजी, चटई वगैरे आणि  काही तर म्हणतील की तुम्हाला काय करायचंय? माइंड युवर ओन बिझिनेस- कुठेही झोपू आम्ही  !! आजपर्यंत मला असं वाटायचं की आपण पलंगावर झोपतो म्हणून. पण तो गैरसमज होता हे लक्षात यायला खूप वर्ष जावी लागली. काहीतरी निरर्थक लिहितोय आणि टाइम पास करतोय असं वाट्तय का??   मला वाटतं  सगळं काही खुलासेवार सांगावच लागेल.

ढेकूण

तर -आमच्या घरी ढेकुण झाले! ढेकुण झाले ही काही अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाही – आणि ही गोष्ट जेंव्हा एका मित्राजवळ बोललो आणि त्याला म्हंटलं की उद्या यावर लिहितो ब्लॉग  !तर त्याच म्हणणं होतं की  ढेकुण झाले ही काही ब्लॉग वर लिहायची गोष्ट नाही खरं तर  ढेकुण झाले, ही गोष्ट लोकांना कळू देऊ नकोस !! किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही!!

म्हंटलं- कां रे बाबा? ढेकुण कुणाच्याही घरी होऊ शकतात, आणि तू तर   ’ढेकणांचे अस्तित्व लपवून ठेवणे म्हणजे मला माझ्या अनौरस मुलाचं अस्तित्व लपवून ठेवण्यासारखी  गोष्ट असल्या सारखा बोलतो आहेस तू?

खरं सांगायचं तर   इतक्या वर्षांमधे ढेकुण कसा दिसतो हे विसरूनच गेलो होतो. किशोरकुमारचे ते गाणे आहे नां – धिरेसे जाना रे खटीयन मे- ओ खटमल- त्या गाण्यातच  ढेकुण पाहिला होता.रिअल लाइफ मधे ढेकुण पाहिलाच नव्हता कधी.  इतक्या वर्षांमधे घरी ढेकुण होण्याची   ही पहिली वेळ ! आणि पहिलटकर्णीचे कौतुक करण्याची परंपरा आहेच आपल्या मधे  – नाही का?? त्यामुळे ढेकुण झाल्याचं कोतुकच वाटत होतं.

ढेकुण झाले हे लक्षात कसं आलं? एक दिवस दुपारी आम्ही पलंगावर लोळत पडलो होतो, तेंव्हा  एक बारीकसा किडा दिसला तुरु -तुरु धावत जातांना. कौतुकाने त्याला चिमटीत धरले आणि पहातो तर काय – ढेकुण!! आता हा ढेकुण आहे की एखादा बारीक किडा आहे यावर सौ. सोबत गहन चर्चा झाली आणि निर्णय झाला की हा ढेकुणच असावा, कारण, रात्री जे काही चावत, ते डास नसावेत!! मुलींना पण मोठया कौतुकाने बोलावून ढेकुण म्हणजे मराठी मधे  (!)तो  ’बेड बग’ दाखवला.  🙂   नेट वर जाउन ’बेड बग’ कसा दिसतो याचा  शोध घेतला आणि एकदाचं तो  ( आम्हाला सापडलेला ) ढेकुणच आहे यावर शिक्कामोर्तब  केले.

हे सगळं शोधतांना , ढेकणांची लाइफ सायकल पण सापडली नेट वर. त्या मधे म्हटलंय की दररोज पाच अंडी देते मादी.. हे वाचलं आणि  घाबरलोच- आणि ताबडतोब पेस्ट कंट्रोल करायचं हे ठरवलं!!!

ढेकणांची लाइफ सायकल..

बरं एवढं झाल्यावर आपल्या लक्षात का आलं नाही इतके दिवस? म्हणून स्वतःलाच   शिव्या शाप, वगैरे आणि माझ्यावर दोषारोपण – तुम्ही टु्रला जाता हॉटेल्स मधून तुमच्या बॅगेत येतात ते , किंवा विमानात चेक इन  बॅगेज मधे एकत्र बॅग असतात तिथुन आले असतील वगैरे  वगैरे… सगळं काही तुमच्या घरी होतं तस्संच – झालं आमच्या घरी पण. आणि आपल्या घरी हे  न बोलावलेले पाहूणे आले तरी कुठुन? ह्याचा पण शोध घेतला .

ढेकुण गादी मधे असे रहातात. याच दुमडी मधे तुम्हाला काळसर रंगाची अंडी पण दिसतिल त्यांची.

त्याच  दिवशी  रात्री  दोन वाजता काहीतरी चावलं, ( दुपारी ढेकुण सापडल्यामुळे ) म्हणून उठून लाईट लावून बघितलं तर एक पाहुणा तुरु तुरु चालत गादी खाली गेला. गादीवरची चादर बाजूला करून पाहिली तर तिथे त्याची पुर्ण फॅमिली दिसली  🙂 आणि ठरवलं की बस्स!! खूप झालं आता! यांना वाटेला लावलेच पाहिजे आता   लवकरच!!पेस्ट कंट्रोल साठी ऑफिस मधे सांगावं लागेल. आता ऑफिस मधे युजवली झुरळांसाठी पेस्ट कंट्रोल सांगायला काहीच वाटत नाही, पण ढेकुण साठी कसं सांगायचं??

सगळ्यांनी ढेकुण या विषयी इतकं वाईट साईट सांगितलं – आणि मलाच दोष दिला  की आपल्या घरी ढेकुण झाले , या मागे पाकिस्तानचा हात असावा , आणि म्हणून पाकिस्तानला इशारा द्यायला मनमोहन सिंग यांना सांगितलं आहे असं सांगावं लोकांना,  असाही विचार आला मनात एकदा .शेवटी इस्टेट डिपार्टमेंटच्या इंचार्ज ला फो्न केला आणि सांगितलं, की बेड बग्स के लिये  पेस्ट कंट्रोल करना है.. यावर  तो म्हणाला- साब , आपके यहां  भी?? म्हंटलं, मतलब क्या है तुम्हारा? और किसके यहां किया?? तर म्हणतो, आपका सातवा फ्लॅट है पिछले महिनेसे- छे लोगेके यहां करा चुका हूं.. . आजकल  सब लोक तो कॉक्रोचके साथ बेड बग के लिये भी  पेस्ट कंट्रोल करके लेता है ……….ब्ला ब्ला ब्ला ब्ला…. बरंच काही सांगत होतो.तर शेवटी ठरलं की शनिवारी करायचं पेस्ट कंट्रोल. त्या माणसाचा फोन पण आला, आणि नक्की केल्ं की दुपारी ११ वाजता तो येईल आणि……….

बेड

हिच ती लोखंडी हिंज..

आमचा पलंग.. ६ फुट बाय ६ फुट असलेला ( ३ फुटाचे दोन जोडलेले बॉक्स बेड्स) तो पलंग गेल्या कित्येक वर्षात आपल्या जागेवरून हललेला नव्हता. त्या दोन्ही पलंगाखाली बॉक्स आहेत. बऱ्याच गोष्टी – ज्यांची गरज नसते त्या सरळ त्या खालच्या  बॉक्स मधे टाकुन देत असतो आम्ही.  आज जेंव्हा तो पेस्ट कंट्रोलवाला आला , तेंव्हा पहिल्यांदा त्या पलंगामधे असलेलया सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या त्याने मोठं इंटरेस्टींग प्रकरण होतं ते. तुम्हाला मी सुरुवातीला विचारलं नां- तुम्ही कशावर झोपता?? हाच प्रश्न तुम्ही जर मला विचारला असता,तर कदाचित ’दुपट्यावर’ असं उत्तर द्यावं लागलं असतं मला. माझ्या पलंगावर गादी खाली एक दुपटं (प्लास्टीकच) गेल्या १३ वर्षापासून पडलेले असावे. मुलगी मोठी झाली आणि बऱ्याच गोष्टी तर टाकुन दिल्या, पण एक दुपटे मात्र गादीखाली असलेली लोखंडी हिंज गंजल्याने गादी खराब होऊ नये म्हणून तिथे टाकलेले होते. गादी  बाजूला केली आणि ते दुपटं पाहिलं आणि स्वतःशीच  हसायला लागलॊ. तो पेस्ट कंट्रोल वाला आणि  सौ. माझ्या कडे काय विचित्र माणूस आहे म्हणून पहात होते.. मी हसू दाबतंच ते दुपटं बाहेर काढलं आणि आता त्या ऐवजी आपण एखादी जुनी चादर टाकू असे ठरवले.

रेकॉड प्लेअर, व्हिसीआर, रेकॉर्ड्स इत्यादी सगळं स्वच्छ केल्यानंतरचा आहे हा फोटॊ.

एका पलंगा मधे तर एक्स्ट्रॉ गाद्या, चादरी वगैरे होत्या , की ज्या कोणी पाहुणे आले की वापरायला काढले जायचे, पण दुसऱ्या पलंगा मधे जेंव्हा उघडला तेंव्हा तिथे जे काही होतं ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. लहान मुलीच्या लहानपणीची स्वयंपाकाची खेळ भांडी, गॅस, फ्रिझ, मिक्सर वगैरे कौतूकाने आणलेला खेळ. पितळेचा खेळ, लाकडी पोळपाट लाट्णं.. अगदी लहानसं, रिमोट कंट्रोल कार- १७ वर्ष जुनी – मोठ्या मुलीची लहानपणीची कार , स्क्रॅबल, सापशिडी- ह्या खेळांशी गेल्या दहा वर्षात कोणीच खेळलेलं नाही, एक डॉल हाउस!! आणि असेच लहान लहान खेळणी,स्केच पेन्स, डॉल हाउस फोल्डींग करुन ठेवलेलं, जुने एक्स रे, वगैरे वगैरे…..

पलंगामधली इस्टॆट.. जमा करून ठेवलेली.. मराठी पुस्तकांना कपाटं, आणि इंग्रजी पुस्तकं मात्र असे पलंगाच्या बॉक्स मधे बहुत नाइन्साफी है ये.. राज ठाकरे नक्कीच बक्षीस देतील मराठी पुस्तकांचा योग्य मान राखून कपाटात ठेवल्या बद्दल नाही हो, तर ही इंग्रजी पुस्तकं अशी पलंगात टाकली म्हणून.. वाट पहातोय मी. कदाचित उध्दव पण देईल काय सांगावं??

एक जुनं टर्न टेबल ( रेकॉर्ड प्लेअर)  आणि जुन्या रेकॉर्ड्स ( काय करायचं आता त्यांचं?? ) .  रेकॉर्ड प्लेअरला टर्नटेबल म्हणायची पध्दत होती –  का म्हणतात हे माहिती नाही.  ऑप्टोनिका शार्प चा व्हिसीआर, त्याचा रि्मोट,  एक एच पी चा प्रिंटर ( ज्याची शाईची कार्ट्रीज  नेहेमी वाळून जायची काम पडलं की ,एचपी वाला म्हणायचा की हमेशा वापरो, अरे म्हंटलं घरच्या साठी घेतलंय, रोज कसं वापरणार?- घरच्या साठी इंकजेट प्रिंटर कधीच घेऊ नका)  शाली -काश्मिरहून आणलेल्या – गेली पाच वर्ष पलंगामधेच पडून आहेत , मुंबईला कधीच  गरज पडत नाही, आम्ही त्या  का बरं घेतल्या – आणि कशाला आणल्या  हेच मला आज समजत नाही – आईला किंवा नागपूरकर मंडळींना द्यायला हव्या  असं म्हणून गेली कित्येक वर्ष पलंगात पडुन आहेत त्या 🙂   पण अशा अनेक गोष्टी आपण गरज नसतांना विकत घेतो, आणि पुढे सांभाळत बसतो ..ह्या शाली पण त्यातल्याच! एक सुंदर पुस्तक पण सापडलं- ’दे लिव्ह्ड विथ गॉड्स’ आणि  बरीचशी जुनी वाचून झालेली पुस्तकं. हॅरी पॉटरचे सगळे भाग, वगैरे…  मराठी पुस्तकं छान कपाटात ठेवली असतात, पण इंग्लिश पुस्तकांना कायम अशी ्दुय्यम वागणूक दिली जाते आणि सरळ माळ्यावर किंवा पलंगामधे !!!

बर बरंच छळलं तुम्हाला, खरं तर ह्या पोस्ट मधे मला काय लिहायंचय हेच मला कळलेलं नाही. त्या मुळे तुम्हाला आपण एखादा शबाना काकुंचा आर्ट सिनेमा पहातोय असा भास होऊ शकतो. आणि तसं वाटलं असेल तर ………… ठिक है यार, माफी वगैरे काय मागायची?   आपला ब्लॉगच आहे काय वाट्टेल ते!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

69 Responses to तुम्ही कशावर झोपता?

 1. nilya म्हणतो आहे:

  महेंद्रजी आपल्याविषयी पूर्ण सहानुभूती बाळगून आहे. आम्हाला बराच ताप झाला. माझा याच विषयावरचा अनुभव लिहिला आहे. http://nilyamhane.blogspot.com/2009/08/blog-post.html

  • महेंद्र म्हणतो आहे:

   निलेश
   एकदा दिसल्यावर खूप त्रास झाला होता या ढेकणांचा.. रोज रात्री तिन वाजता उठून हिट चा कॅन घेउन वर निघालेले ढेकुण मारायची मी. ब्लॉग वाचला, मस्त लिहिलाय बरं कां..

   • nilya म्हणतो आहे:

    महेंद्रजी,
    मला निल्याच म्हणा. ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे. कायवाट्टेलते वरुन येणारी रहदारी वाढली आहे !
    तीन वाजता दोन वाजता छापे टाकण्यात जवळपास एक महिना घालवला आहे.

    धन्यवाद.

    • महेंद्र म्हणतो आहे:

     निल्या.
     सही.. रात्रीचा दिवस केलाय आम्ही पण यासाठी- जवळपास १५ दिवस. (मुलीची परिक्षा होती म्हणून टाळलं )दिवसभर ऑफिस मधे झोप येत रहायची. काय दिवस होते ते.. आठवले तरीही अंगावर काटा येतो. आमच्या घरी तर पडदे टांगायच्या पेलमेंट वर पण त्यांनी बस्तान बसवलं होतं.

     सगळं पेस्ट कंट्रोल झाल्यावर कपडे धुणे – अर्थात त्या बद्दल काहीच सांगणे न लगे. तुझ्या ब्लॉग वर विस्त्रूत लिहिलंय त्यावर. इथे फक्त घरीच वॉशिंग मशिन दिवसभर सुरु होती .. कपडे ,चादरी.. सगळं काही धुवुन काढलं. आता नविन मॅट्रेस आणि पलंग घेतोय..

 2. सोनाली केळकर म्हणतो आहे:

  सार्थ नाव आहे तुमच्या ब्लॉगचं 🙂
  मला वाटतं सगळ्यांकडेच असा पलंगाखाली मोठा खजाना असेल. आमच्याकडे तर लग्नातला नवर्‍याचा थ्री पिस सुट पण पलंगाखाली आरामात निजलाय, माझी पैठणी मात्र कपाटात फोल्डरमधे आहे हा! 🙂
  ढेकुण मी ही कधि पाहिला नाहीये आणि न दिसो ही सदिच्छा.

 3. Kedar म्हणतो आहे:

  Mahendraji, Mahesh Manjarekar asta tar mhanala asta “Masta Masta Masta”. Pan Mi To Navhech, mhanun apla sadhya sudhya bhashet mhanto, apratim post aahe. Aho mala kalala tumhala nemka kaay mhanaychay te. Purvi ek laghukatha vachali hoti, Haravale Mhanun Sapadle. Agdi tasach aahe ho. Masat vatala vachayla. Pan manat ekach prashna yeto, tya dhekanancha kaay jhala? Pest Control vala shevti tyachi jaduchi kandi ohirvun gela ki nahi?
  Aso, tumchya post madhun nikhal karmanuk milte. 2 vakya tar masta vatali ekdum. “Ya mage Pakistan cha haat asava..” ani “Aplya blog cha naavach aahe Kaay Vattel Te”. Jhakkaas.

  -Kedar

  • महेंद्र म्हणतो आहे:

   केदार
   एका शनिवारी ते पेस्ट कंट्रोल वाले आले, आणि स्पेशल ट्रिटमेंट केली गाद्यांवर , आणि पलंगावर. बरेच स्प्रे, पावडर्स वगैरे गोष्टींचा मारा केला, आणि शेवटी ते ढेकणं गेले. पंधरा दिवसानंतर पुन्हा रिपिट ट्रिटमेंट केली, आता मात्र ते पुर्ण पणे गेलेले आहेत.

   अजूनही बऱ्याच गोष्टी, जसे, कपडे धुणे वगैरे.. निलेशच्या ब्लॉग वर विस्त्रूत पोस्ट आहेच या विषयावरची. 🙂

   एकच आनंद आहे, या निमित्ताने का होईना, पण पलंगाखालचा कचरा बराच साफ झाला. 🙂

 4. rohini gore म्हणतो आहे:

  mast lihile aahe!

 5. हेरंब म्हणतो आहे:

  >> ’ढेकणांचे अस्तित्व लपवून ठेवणे म्हणजे मला माझ्या अनौरस मुलाचं अस्तित्व लपवून ठेवण्यासारखी गोष्ट असल्या सारखा बोलतो आहेस तू?

  हा हा हा..

  आणि खरोखर ढेकुण कसा दिसतो ते मीही अजून बघितलेलं नाही 🙂

 6. कांचन कराई म्हणतो आहे:

  सर्वांच्याच घरी ढेकूण होतात पण सांगत कुणीच नाही, कारण ढेकूण हा प्राणी जितका चावण्य़ात वाक् बगार असतो, तितकाच दडून रहाण्यातही. कॉलेजला असताना एका मित्राने पोटाला सारखं काय चावतंय म्हणून अक्षरश: वर्गातच शर्ट काढून पाहिला होता, काही मिळालं नाही. शेवटी त्याने जिन्सचा बेल्ट काढला आणि त्याला ढेकणांचा समुदाय सापडला. जिथे त्याच्या बेल्टची शिवण उसवली होती. त्यात ढेकणाचं आख्खं घराणं होतं. ढेकणाच्या या छुप्या रुस्तमगिरीमुळेच लोक ढेकणांबद्दल सांगत नाहीत. न जाणो, आपल्याकडचा एखादा छुपा रुस्तम त्याच्या घरी जाऊन पोहोचायचा म्हणून ढेकूण झाले असं सांगितलं की लोक आपल्याकडच्या वस्तू (आपल्या नकळत) बारकाईने तपासून घेतात. आमच्या घरी ढेकूण झाले होते, तेव्हा मी गुप्तहेराच्या तोडीचं डोकं लावत त्यांचा उगम शोधून तिकडे बेगॉन, हिट, कधी कधी कोळशाचा धूर असं काय काय उपाय करायचे. कशाचा उपयोग झाला नाही. पेस्ट कंट्रोल सुद्धा होपलेस होतं. शेवटी रस्त्यावर धूर सोडणारे ते महानगरपालिकेचे लोक असतात, त्यांना पकडलं. त्यातल्या एकाला पैसे दिले आणि घरात ते औषध मारून घेतलं. एक वर्ष झालं, अजूनही घरात तो उग्र मंद वास कधी तरी दरवळतो पण ढेकूणांचा मात्र पार नायनाट झाला.

  या निमित्ताने तुम्हाला किती जुन्या गोष्टी सापडल्या पहा. टर्न टेबल हॅन्डल वालं आहे का? चित्रात समजत नाहीये. हॅन्डलवालं असेल, तर मी संपर्क करेन. रेकॉर्ड कुठल्या आहेत, हे जरा सांगता का? आता त्याच्या बाजारात सी.डी. निघालेल्या नसतील (चित्रं पाहून ब-याचशा सी.डी. न निघालेल्याच वाटतायंत) तर मी घेऊन जाईन.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   कांचन
   खरंय तुमचं;. बऱ्याच जुन्या गोष्टी आपण जपून ठेवतो. बहुतेक सगळ्या क्लासिकल आहेत. मॉर्निंग ऍंड इव्हिनिंग रागाज च्या सहा, माझी आवडती व्हिक्टर ह्युगो मोंटॅंग्रो ( गुड बॅड ऍंड अगली आणि सगळ्या क्लिंट इस्टवूडच्या प्रत्येक सिनेमाचे संगित यानेच दिलेले आहे. त्याची आणि गीत रामायण वगैरे.. बाकी आठवत नाहीत.. सगळ्यांच्याच सिडी वगैरे निघालेल्या आहेत. जर क्लासिकल ची आवड असेल तर माझ्या सेल फोन मधेच ३ जीबी डाटा असेल. 🙂 तो मी कधीही देऊ शकतो.

   आमच्या कडे पंधरा दिवसांच्या अंतराने दोनवेळा ते पेस्ट कंट्रोल केलंय. पहिल्या वेळेसच पुर्ण नायनाट झाला असावा, पण सेफ्टी म्हणून पुन्हा एकदा रिपिट केलं त्याने.

 7. कांचन कराई म्हणतो आहे:

  तुम्ही ढेकणांचे फोटो काढलेत 🙂 वहिनींनी काढून दिले, हे नशीब.

  लहानपणी एक गोष्ट वाचली होती, ज्यात एक लहान मुलगा एक ढेकूण पाळतो, त्याचं नाव औरंगजेब ठेवतो. ढेकूण उपासमारीने मेल्यावर त्याला दुसरे ढेकूण चावतात तेव्हा, तो चावून देतो. कारण त्याला वाटतं की त्याने पाळलेला ढेकूणच त्याला चावत असावा.

 8. sahajach म्हणतो आहे:

  महेंद्रजी मी कल्पना करू शकते काय वैतागातून पार पडलात तुम्ही!!! दोन वर्षाखाली हाच उपद्रव आमच्याही घरी झाला होता….. 😦 ….

  या पोस्टला ’मस्त’ झालय असे म्हणण्याचे धाडस करतेय कारण तो वैताग तुम्ही हलकाफूलका मांडलाय….नाहितर हे एकेका दिवसात डझनाने वाढणारे आणि तुरुतुरू पळणारे जीव आपले अगदी घामटे काढतात. आमच्याकडे मला मात्र रोज जाग यायची, मग आधि शोध मोहिम सुरू, सापडल्यावर दबक्या आवाजात त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू, विचारू नका!! आठवले तरी नको वाटते….

  खरयं लोक सांगत नाहीत ढेकूण झाल्याचे पण त्यामुळेच यांचा प्रसार होतो :)….. आमच्याकडे पेस्ट कंट्रोल करायला आलेल्या मल्लू माणसाने मला एक सल्ला फ्री (!) दिला होता…पुन्हा म्हणे घरात जर हा प्राणी नको असेल तर मल्लू लोकांना घरात घेणे बंद करा 😀 ….. कोणिही घरी आल्यावर आधि त्याच्याकडे निरखून बघा (हे माझ्या मनचे नाही ..हा त्या माणसाचा सल्ला आहे 🙂 )…ढेकूण पुरूषांच्या शर्टाच्या कॉलरवर आणि बायकांच्या पर्सच्या फटीतून येतात. मल्लूंना गाडीतही बसू देऊ नका ;)…

  मी काही दिवस ईमाने ईतबारे पाळला त्याचा सल्ला, अमित मात्र त्याच्या ढेकूण या विषयावरच्या डॉक्टरेट वर हसत असतो!!!
  पुन्हा काही अजुनतरी झालेले नाहीत..पण मला मात्र दहशत बसलीये ती कायमची !!

  मध्यंतरी मी आणि एका ब्लॉगवर एक भन्नाट पोस्ट वाचली होती (बहुतेक सौरभ कि असेच काही नाव होते…आठवत नाहीये आता) भन्नाट पोस्ट लिहीली होती त्यानेही…. आणि ते ही अमेरिकेतल्या ढेकणांवर 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अज्ञानात सुख आहे म्हणतात ते पटतं घरी ढेकुण झाले की. जो पर्यंत माहि्ती नव्हतं तो पर्यंत मला रात्री अगदी मस्त झोप लागायची. पण एकदा समजल्यावर मात्र रात्रीची झोप लागणंच बंद झालं होतं. हिट चा कॅन घेउन झोपायचॊ आम्ही.

   मग रात्र वैऱ्याची व्हायची- झोप नाही. थोडं कुठे खाजवल्यासारखं किंवा चावल्या सारखं लावलं की निशाचरासारखे आम्ही उठुन ’त्यांना’ शोधायला लागायचॊ. मुलीची परिक्षा सुरु होती म्हणुन पंधरा दिवस टाळलं होतं पेस्ट कंट्रोल.

   पण एकदा ते गेल्यवर जी शांत झोप लागली त्याचं सुख शब्दात सांगता येणार नाही..

 9. Sonali Morkar म्हणतो आहे:

  Dheknacha nusta nav kadhla tari kasatari hota. hostel la hote teva akhkha bed dheknanani bharlela asaycha, pan kadhi chavle nahit, ka kunas thavuk, ani pest control kelyavar tar itka ghan vas yeto ki literally sahan hot nahi. tumhi lavkar pest control kelat he chhan kela, karan tyachi fauj far lavkar vadhte.

  • Mahendra म्हणतो आहे:

   सोनाली
   खरंच अतिशय त्रास देऊ प्राणी आहे हा. दिवसाला एक मादी पाच अंडी देते, म्हणजे कमीत कमी महिन्याला एक मादी १५० नविन ढेकणांना जन्म देते. आणि नंतर फॅक्टोरिअल १५० काढला तर काय आकडा निघेल ?? नकॊ तो विचार उगिच!!

 10. vidyadhar म्हणतो आहे:

  मी आजवर ढेकुण फक्त जुन्या थियेटर च्या लाकडी खुर्च्यांमध्येच ‘अनुभवलाय’. असो. माझ्यावर काय कुणावरही वेळ न येवो…हि सदिच्छा!
  बाकी पलंगाखालच सगळं आमच्या घरीही तसंच…

  • महेंद्र म्हणतो आहे:

   विद्याधर
   काय करणार? बऱ्याच जुन्या गोष्टी पैसे देउन घेतल्या असतात विकत. जसे तो शार्प चा व्हिसीआर चक्क १९ हजाराला घेतला होता , आता टाकून द्यायचं म्हंटलं तरी हिम्मत होत नाही. मग घरी असा कचरा जमा होतो. पण वाटतं की एकदा मनावर दगड ठेउन सगळं माळ्यावर टाकावंच लागेल.

 11. Sarika म्हणतो आहे:

  रेल्वेच्या डब्यात सिटच्या फटित ढेकुण असतात.. घरी चुकुन येतील अशी रोज भिती वाटते…

  • Mahendra म्हणतो आहे:

   सारीका
   काळजी घेतजा. एक जोडपं घरी आलं पाहुणे म्हणुन की त्यांची वंशावळ वाढायला अजिबात वेळ लागत नाही.

  • कांचन कराई म्हणतो आहे:

   सारिकाशी सहमत. रेल्वेच्या डब्यातील बेंचच्या फटीत ढेकूण असतात. एकदा तर लोकलमधे इतकी गर्दी होती की उभं राहून प्रवास करणंही शक्य नव्हतं आणी ढेकूण चावत असल्यामुळे बसणंही कठीण झालं होतं. इंद्र भुंगा बनून कर्णाची मांडी पोखरत असताना, कर्णाला जसं वाटलं असेल, तसा अनुभव होता तो.

 12. ,महेश कुलकर्णी म्हणतो आहे:

  मस्त सुंदर लेख आवडला ,,,,,,,,,,,

  • महेंद्र म्हणतो आहे:

   महेश
   प्रतिक्रियेकरता आभार. अहो खूप त्रास झाला, इथे लिहिलं नाही, पण रात्र अन रात्र जागून काढल्या आहेत . एकदा समजलं ’ते’ आहेत, आणि मग झोप तर कधी लागलीच नाही व्यवस्थित, पेस्ट कंट्रोल करे पर्यंत.

 13. suruchi म्हणतो आहे:

  ढेकूण मी पण आज पहिल्यांदाच बघितलय.. ते ही तुझ्या ब्लॊग वर…छानच गंमत झाली ढेकणांची मात्र मामीला बरच पुरलं असणार आवर सावर… त्यात तू सगळ्याचे फ़ोटो काढत असल्याने अजून ताप!.. असो…मात्र एक गोष्ट चांगली लिहिलीयस “नागपूर कर मंडळी साठी”… ती नक्की फ़ॉलॉ कर….भरपूर खरेदी कर आणि लागलीच कळवत जा.. म्हणजे पलंगात, कपटात जागा अडून राहणार नाही…..काय?

  तसाही नागपूर मंडळीत माझा हक्क पहिला… आवडत्या मामाची आवडति भाच्ची…बरोबर न?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हं.. तुझ्या साठी नक्कीच आणिन- आवडती भाची म्हंटल्यावर आणायलाच हवं नाही??
   अगं, खूप ताप झाला होता ढेकणांचा. मी इतकं सहज म्हणुन लिहिलंय पण वैताग होता नुसता. झोपेशिवाय रात्री काढल्या बऱ्याच ! ’र’ ची परिक्षा होती म्हणून थोडं डिले केलं ते पेस्ट कंट्रोल. आता पलंग , गाद्या , सगळं बदलतोय.

 14. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  ढेकुणांशी आतापर्यंत तरी डायरेक्ट सामना नाही झाला पण दहशत मात्र प्रचंड बसली आहे… रोज ५ अंडी बापरे!!!

 15. krishnakath म्हणतो आहे:

  “ढेकूण”…..अहो काही सांगु नका…

  माझ्या आयुष्यातील ६ महीने बरबाद केलेली आहेत या रक्तपिपासु ढेकणांनी!

  एकूण हिशोब असा: १- बेड मॅट्रेस, एक छोटे कपाट, १ मोठे टेबल, ५ शर्ट, ४ पॅन्ट, अजुन बरेच काही चक्क फेकून द्यावे लागले अम्हाला. त्यात इथे बॉस्ट्नला लाकडी घरे…त्यामुळे आमचे घर म्हणजे ढेकणांचे Metro-polis City झाले होते!

  पण सर्वात जास्त झाली ती आमची “बदनामी”. (आम्ही ४ जणं off-campus रहायचो). आमच्या घाराला समस्त भारतीय विद्यार्थ्यांनी वाळीत टाकले होते! कोणीही आमच्याकडे यायचे नाही.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   तुमचा त्रास मी समजू शकतो. लाकडी घर म्हंटल्यावर तर मला वाटतं की घर बदलल्याशिवाय पर्यायच नसावा..

   पेस्ट कंट्रोल पण दोनदा करावं लागतं. पंधरवड्यातून. तिकडे फार महाग असेल नां? इथे फक्त २४०० रुपये घेतात एक वेळचे पुर्ण घराचे करायला..

   • krishnakath म्हणतो आहे:

    हो..आणि त्यात विद्यार्थी असल्यामुळे अजिबातचं परवडत नव्ह्ते. शेवटी आम्ही ढेकणांवरील रीसर्च पेपरस वाचले…कोणती रसायने पेस्ट कंट्रोलसाठी वापरतात ते शोधले. इथे DDT उपलब्ध नाही….कोणते रसायन सहज उपलब्ध आहे हे शोधले …शेवटी Deroin Dust ही पावडर मागवली….त्याचा बराच असर झाला….नंतर घरही बदलले.

    चार वर्षे झाली..पण अजूनही आमचे जुनिअर्स कधी भेटले तर आमच्या ढेकणांच्या घाराची आठवण काढतात…….:(

 16. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  लहानपणी गावाला पाहिल होत ढेकुण कधीतरी पण आमच सौभाग्य कि सध्यातरी दर्शन नाही झाल महाशयांच…बाकी बहुतेकांच्या पलंगामध्ये अश्या प्रकारचा काहि ना काही खजीना असतो…

  • महेंद्र म्हणतो आहे:

   देवेंद्र
   तसे आपल्याकडे ढेकुण येण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. प्रवासात विमान, रेल्वे मधुन, सिनेमा गृहातून,
   आमच्या घरी पण पहिल्यांदाच झाले, पण पहिल्याच वेळी त्याने पुर्ण पणे आपलं सामर्थ्य दाखवून दिलं. 🙂

 17. Manmaujee म्हणतो आहे:

  पुणं जस विद्येच माहेर घर तस ढेकणांसाठी प्रसिद्ध…तुम्ही जर शनिवार, नारायण,कसबा पेठेतील कॉट बेसिस वरील रूम पाहिल्या तर तुम्हाला तुमच्या घरचे ढेकून चिल्लर वाटतील. मी शनिवार पेठेत तब्बल १ वर्ष काढलय….काय भयानक ढेकून होते. पुस्तक,बॅग, कपडे सार्‍या ठिकाणी यांचा मुक्त वावर असायचा. रात्री झोपल्यावर सगळ टी शर्ट ढेकनानी भरून जायच…..फक्त नाइलाज म्हणून आम्ही तिथे राहिलो होतो. तो अनुभव परत घ्यायची काही इच्छा नाही. अहो घरी गेल्यावर आई बॅग ई. सगळ बाहेर ठेवायची…..त्या दरम्यान तर ढेकून फोबिया झाला होता कुठे पण गेलो की अंगावर ढेकून आहे की काय असच वाटायच….मित्राच्या घरी जाताना व्यवस्थित खात्री करून मगच घरात प्रवेश करायचो.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   पुण्याला पण??
   मला वाटतं ह्यांचं साम्राज्य सगळीकडेच पसरलेले आहे. फोबीया तर आम्हाला अजूनही आहेच. रात्री बरोब्बर तिन वाजता जाग येते, आणि आम्ही चादरी खाली, गादी खाली, त्यांना शोधतो. लकीली पुर्णपणे नायनाट झालेला आहे त्यांचा सध्या तरी.

 18. bhaanasa म्हणतो आहे:

  हा हा… एकंदरीत ढेकणांच्या मुक्त संचाराने सर्वत्र प्रजा त्रासलेली आहेच. अर्थात कोण्या एके काळी जेव्हां आम्ही चाळीत राहत होतो तेव्हां असेच कुठूनही लेकाचे शिरकाव करायचे आणि एकदा का घुसले की मग पाच पाच अंडी ( हे मला तुझ्यामुळेच कळलेयं… 🙂 ) मग काय विचारता…. नुसती पळता झोप थोडी… आमची आई प्रत्येकाच्या हाती रॉकेल भरलेले एक छोटेसे डबडे देई आणि ढेकूण पकडून त्यात बुडवायचे हा आसुरी आनंदाचा कार्यक्रम रोज रात्री चाले. आता मात्र गेल्या वीस एक वर्षात ही वेळ आली नाहीये आणि कधीच न येवो रे बाबा…. आत्ता मला तुझ्या पेस्ट कंट्रोलचे ’ राज ’ कळले…. 🙂 बाकी बेडमधला खजिना म्हणजे खरेच गौडबंगालच असते… टाकवत नाही आणि ठेववत नाही. आठवणी गुंतलेल्या असतात ज्याच्या त्याच्या… मग ढेकणांसाठी मस्त उबदार सोयच… हुश्श केलेस ना आता तरी… आता अजूनची पाळतीवर राहा बरं का…. चुकार मेला एखादा दडलेला असेल आणि पाच पाच हा उद्योग चालू झाला तर…. तुला पुन्हा पळता भुई आय मीन पळता पलंग थोडा असे होईल….. तू म्हणशील काय दुष्ट आशिर्वाद देतेय ही बया….. 🙂 🙂 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हो नां.. खूप त्रास झाला. त्यांना इतक्या मोठ्या पलंगामधे शोधणं पण एक मोठं कामच होतं..
   अजूनही पाळतीवर आहेच. दररोज रात्री तिन वाजता न चुकता जाग येते.. लाईट लाउन ’ते’ नाही ह्याची खात्री करून झोपतो .
   नविन पलंग आणि मॅट्रेस दहा दिवसांनी येईल. तो पर्यंत हेच वापरायचं.. 🙂

 19. vikram म्हणतो आहे:

  Kay vatel te lihata rav tumhi shyaaaa 😉

 20. KK म्हणतो आहे:

  हा हा…. मस्त….

  काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉगवरही मी या महान प्राण्यावर एक पोस्ट टाकले होते…

  Coincidently माझ्या ब्लॉगचं नावही हेच आहे….

  http://kaywattelte.blogspot.com/2009/11/blog-post.html

 21. Renuka म्हणतो आहे:

  Ha sagala prakar aikayla phone karaylach hava!! hahaha
  weekend la phone karte!! 🙂

 22. संतोष म्हणतो आहे:

  मला वाटतं. माझ्याकडे ढेकूण झालेले आहेत हे सांगण्याची लाज वाटल्यामुळे या वर करावयाची उपाययोजना एकमेकांशी चर्चा न झाल्याने जास्त माहित पडत नाहीत. मी एक आदिवासी दवा दारु नावाचं पुस्तकं वाचलं होतं त्यात बहाव्याच्या शेंगा पाण्यात उकळून ते उकळतं पाणी त्या कपड्यांवर व फर्निचर वर टाकणे किंवा आणखी एका वनस्पतीची पाने भिंती व पलंगाकडेस पसरुन ठेवली तर ढेकूण त्यावर सकाळी सापडतात असा उल्लेख होता. यावर लाल मिरची, वांग्याचा रस व पुदिना रस यांचा देखील चांगला उपयोग होतो असे एका वेब साईटवर होते तर दुसरीकडे एक कप पाण्यात लवेंडर, रोजमेरी, निलगिरी यांचे तेलाचे 10 थेंब व लवंग तेलाचे 3 थेंब याप्रमाणात डायलूट करुन स्प्रे करण्याबाबत लिहिलेले आहे. माझे देखील रात्री 3 वाजता शोधकाम चालू असल्याने हा प्रयोग करणार आहे. यशस्वी झाला तर कळवतो.

 23. Guru म्हणतो आहे:

  अर्र काका ये क्या सुन रा मै!!!!!!!… आज जरा बरे वाटले हो!!! मला वाटायचे ढेकणे हे फ़क्त ब्याचलर पोट्य़ांच्या फ़्लॅट्वर आयुष्य अन बॉस नंतर यमराजाने खास नेमणुक केलेले जीव असावेत!!!!!!!!,पण घरात सुद्धा ढेकणे होतात एकंदरीत…. आम्हालातर रुम वर शेवटी सवय झाली होती ढेकणांची!!!!!!!…. आमचा पार्टनर होता ढेकुण हंटर!!! रात्री अडीच ला पण उठुन गादीत हात घातला तर ३-४ ढेकणे काढायचा… आम्ही ती बाटलीत भरुन घरमालकाच्या घरात सोडायचो…. मग पंधरवड्याने आमचे पेस्ट कंट्रोल करुन द्यायचा मालक….. पहिल्यांदा ढेकुण चावले तेव्हा पाठीवर भले मोठे बेंड आले होते!!!! आता काय नाय!!!!!….. काका पेस्ट कंट्रोल केल्यावर एक फ़्यामिली आऊटींग करा…. तो वास पण विषारी असतो ब्वा!!!!!!……..

 24. विनायक बेलापुरे म्हणतो आहे:

  हा हा हा !!
  महेंद्र जी
  मस्त. ढेकुण नाव काढले तरी लहानपणीच्या त्या भीषण रात्री आठवतात. आमच्या घरात आधी रहात होते त्यांनी असंख्य जीव लळा लाऊन पाळले होते.
  मग आई वडिलांनी युद्ध आघाडी उघडली होती. रॉकेल , बेगोन, ट्युगॉन यांचा यथेच्छ वापर झाला. त्या वेळ पासून पुन्हा आजवर ह्या आपत्तीला सामोरे जावे लागले नाही हे भाग्यच. कितीही मोठे फैव स्टार हॉटेल का असेना पण मैट्रेस उचलून पलंगाच्या कोपरा-कडात काळे ठिपके दिसतात का हे पाहिल्याशिवाय मन स्वस्थ होत नाही. एकदाच बाका प्रसंग आला होता जेंव्हा माझा मुलगा नर्सरीत असताना शाळेतून आल्यावर बायकोला त्याच्या डोक्यात एक “बाई ” सापडली. त्याला घरात बसू न देता आधी त्याचा चकोट करून आणला. आणि पुढचे १० दिवस घर नुसते कापराच्या वासाने भरून गेले होते. तेंव्हापासून बायकोचे त्याच्या वर्गातल्या डोके खाजावानार्या मुलींकडे बारीक लक्ष असायचे. 😛

  • महेंद्र म्हणतो आहे:

   विनायक,
   अहो खूप वैताग आला होता. जवळपास दोन महिने तर आम्हाला रात्री चावणारे ढेकुण आहेत हेच समजलं नव्हतं ही खरी गम्मत.

 25. Minesh Bhajekar म्हणतो आहे:

  आमच्या घरी सध्या भरपूर (ठाकरेंच्या सभेला देखील एवढी गर्दी झाली नसेल कधी..) ढेकुण झाले आहेत. मागच्या सहा महिन्यात दहा वेळा वेग वेगळ्या प्रकारचे पेस्ट-कंट्रोल केले पण काही उपयोग नाही. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कुणाला काही खात्रीशीर उपाय माहिती असेल तर कृपाकरून कळवा. मी आजन्म त्यांचा ऋणी राहीन… 😮

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मिनेश
   सध्या तरी आम्ही या त्रासातून पूर्ण पणे मुक्त झालो आहोत . पण दर पंधरा दिवसांनी एकदा, असे तीन वेळा पेस्ट कंट्रोल करून घ्यावे लागले होते. पेस्ट कंट्रोल ची कुठलीतरी लोकल कंपनी होती ती.
   या साठी ते आयुर्वेदीक किंवा हर्बल पेस्ट कंट्रोल अजिबात चालत नाही .

 26. सुमित म्हणतो आहे:

  हॉस्टेलवर ढेकणं चावत असताना ही पोस्ट वाचतोय. रात्र रात्र झोप नाहीये.

 27. Dhanshree म्हणतो आहे:

  khup chan

 28. Popat Chavan म्हणतो आहे:

  mast vinodi cinema banel dheknavarati. Ek trasalelya mansachi story dakhavata yeil muk cinemamadhun

 29. ढेकुण_पिडीत म्हणतो आहे:

  सध्या आमच्याही घरी (पुण्यात) माझा दहशतवादी कट सुरु आहे.. तो असरदार वाटतोय कारण जे भारत किंवा चीन ला जमलं नाही ते मला जमलंय.. ढेकणांच्या लोकसंख्येवर नियंत्रण येत आहे हळूहळू नायनाट अटळ आहे.. मी खालील उपाय करतोय..

  १) नको ते सामान भंगारात नाहीतर कचर्यात फेकून देणे.. (यात गादी सकट लाकडी दिवाण सुद्धा होता)

  २) अख्ख घर धुवून काढणे.. अंथरूण, पांघरूण, फारश्या, फर्निचर, कपडे, इव्हन उश्या पण धुवून काढल्या..

  २) आणी आता हल्ला.. रात्री २/३ च्या सुमारास कीटकनाशक मिसळलेले पाणी एका पंपातून सगळीकडे फवारणे. (म्हणजे रंगपंचमी पेक्षाही जास्त उत्साहाने, प्रत्येक ठिकाणी)

  हे कीटकनाशक कुठल्याही कीटकनाशकाच्या किंवा खतांच्या दुकानात मिळते. मी पहिल्यांदा घेतलं तेव्हा दुकानदाराने मला दोन औषधं दिली (खाली नावं दिलीयत) .. जी खरंच इफेक्टिव वाटतायत कारण पहिल्यांदा मारल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या अड्ड्यांवर असंख्य मृतदेह होते..

  – अजेंडा २५ ई.सी (२२५ रुपये)
  – हमला ५५० (९७ रुपये)

  ही औषधं मी एका लिटर पाण्यात ३५ मिलीलीटरच्या हिशोबानी टाकली (म्हणजे त्या औषधाच्या बाटल्यांच एक झाकण).. एक एयर पंप पण त्याच दुकानातून घेतला १५० रुपयांना..

  आता ती औषधं संपली होती म्हणून नवीन आणायला गेलो तर दुकान बंद, मग दुसरं कीटकनाशकांच दुकान समोरच दिसलं त्यांनी मला एकच औषधं दिलं

  – संग्राम इंसेक्तीसाईड (Sangram Insecticide) हे मात्र १०० रुपयांनाच मिळालं.

  (ता.क् – पुण्यात मंडईजवळील काका हलवाई दुकानाच्या समोर तोंड करून उभं राहिल्यावर डाव्या बाजून सरळ गेल्यावर एकमेकांसमोर दोन कीटकनाशकांची दुकानं आहेत.. इतर कुठल्याही किटकनाशकांच्या दुकानात देखील ढेकणांसाठी जहाल औषधं मिळतात, फक्त ती फवारताना स्वतःच्या नाकातोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी)

  साधारण दर ५ दिवसांनी परत अशी दोन-चार वेळा हल्ला करण्याची योजना आहे कारण अंड्यांमधून बाहेर आलेल्या नवीन पिढ्यांना रक्तदान न करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय..

  नवीन औषध वापरून बघतो हे देखील आणी रिझल्ट कळवतो.. परिणाम होतोय हे निश्चित आणी म्हणूनच समदुख्खी ढेकुण पिडीतांना न्याय मिळावा यासाठी हा दीर्घ प्रतिक्रिया लेखनप्रपंच..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s