प्रिय आमूचा एक …

एक पोस्ट खूप स्वप्नाळू पोस्ट वाचलं  मनमौजीच्या ब्लॉग   वर एक पोस्ट. ते वाचून अंतर्मुख झालो. आणि ह्या महा्राष्ट्र दिनी मला काय वाटतं ते लिहायचा प्रयत्न करतोय इथे.

चांदा ते बांदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.. या घोषणेला आता खूप वर्ष झालीत. कदाचित आजच्या पिढीला ते माहितीही नसेल की ही घोषणा कसली ते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा भाषावार प्रांत रचने अंतर्गत लढल्या गेलेला एक लढा होता. आज जर एखाद्या तरूणाला हे चांदा कुठे आहे  किंवा बांदा कुठे आहे हे विचारलं तर सांगता येणार नाही. बांदा हा शब्द चुकून बांद्रा ऐवजी लिहिला गेलाय असंही वाटतं बऱ्याच लोकांना.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या मधे किती लोकं बळी गेले? १०६!! आजच एक पोस्ट वाचलं रोहनच्या ब्लॉग वर त्या मधे सगळ्यांची नांवं  दिलेली आहेत. ती वाचतांना  सहज मनात आलं की या १०६ लोकांना शहीद म्हणणं पुर्णपणे चुकीचे आहे.   कारण   तेंव्हाच्या राजकीय  कारणातून केल्या गेलेला खून होता तो त्या १०६ लोकांचा ! या १०६ लोकांच्या मधे नेते किती होते? एकही नाही !!! एकाही नेत्याने संयुक्त महाराष्ट्रासाठी जीव दिलेला नाही, मात्र एकदा महाराष्ट्र झाल्यावर सत्तेचा मलिदा खायला सगळे एकदम समोर आले.

मोरारजी देसाईंच्या त्या कार्यवाही मुळे जरी संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुर्ण झाला- आणि संयुक्त महाराष्ट्र जरी मिळाल्यावर तरी  त्या सगळ्यांची ( १०६) नावं विस्मृतीत गेली. त्यांचे पुढचे वारसदार यांच्यासाठी पण काहीच केले गेले नाही. नुकतीच बातमी वाचली शासकीय यंत्रणेने शोध घेतला असता , त्या १०६ पैकी  फक्त ३६ लोकांचे वारस सापडले शासनाला.नशीब, पन्नास वर्षानंतर का होईना, या लोकांच्या वारसांचा शोध घ्यावासा वाटला या नेत्यांना- आणि त्यांच्यासाठी काही करावंसं वाटलं. त्या काळी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी या १०६ लोकांच्या  मृत्युनंतर संबंधितांवर ( म्हणजे गोळीबाराचा आदेश देणाऱ्यांच्यावर  )मनुष्यवधाचा  गुन्हा का  दाखल केला गेला नाही ? हे अजूनही समजत नाही.

सारखं १०६ हुतात्म्यांच्या बद्दल बोलत असतात हे नेते..त्या पैकी केवळ दहा हुतात्म्यांची नावं काय ते सांगा म्हणाव?.. दहा कशाला पाचही पुरतील. त्यांनी जे आपले जीव दिले, ज्यांच्या जिवाच्या भरवशावर तुम्ही राज्य करताय, त्यांच्याच झालेल्या मृत्यु घटनेवर   हे नेते लोकं अजूनही आपली पोळी भाजून घेत आहेत.

आज एक मे ला झाडून  सगळे  नेते त्या हुतात्मा चौकात जातील आणि त्या नावं असलेल्या अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील- आता त्याला श्रद्धांजली म्हणायचं की  एक   उत्सव? हा प्रश्न निराळा, कारण त्या श्रध्दांजलीला एक प्रकारे उत्सवाचच स्वरूप आलेलं आहे.सकाळपासून तुतारी, सनई , चौघड्यांचे स्वर गुंजतील , पुष्प चक्र वाहिली जातील , टिव्ही चॅनल्सला ’बाइट्स’ दिले जातील. आणि उद्या पासून सगळे सोईस्करपणे विसरून जातील !

बरं ते जाउ दे.. आजच्या या महाराष्ट्र दिनी आज पर्यंत ज्या हजाराच्या वर झालेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, त्या करता शासनाने मदत केलेली आहे असे ऐकतो. त्यातल्या केवळ पाच शेतकऱ्यांची नांव सांगा म्हणाव! एकाही माईच्या लाल नेत्याला दो्न चार नावं पण सांगता येणार नाहीत. मेलेल्या मुडद्याच्या टाळू वरचे लोणी  खाण्याची  मानसिकता असलेल्या लोकांकडून अजून कसल्या अपेक्षा करायच्या? केवळ मतासाठी त्या भागात आपले तोंड दाखवणारे हे नेते!!

आजपर्यंत किती मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा पाहिला आहे? तो पण संयुक्त महाराष्ट्रातच आहे ना? याला उत्तर देणे कदाचित अवघड होईल.

एक थोडा  सोपा प्रश्न.. गडचिरोली जिल्ह्यातल्या तालुक्याचं नांव सांगा बघू? नाही माहिती. जाउ दे.

परभणी जिल्ह्यातल्या तालुक्याचं नांव माहिती आहे??

हेमलकसा कुठे आहे हो??जिल्हा कुठला ?? अहो तेच ते.. प्रकाश आमटेंचं?

बरं आनंद वन कुठेशी आलं?

भामरागढ कुठे आहे हो?

काही लोकांनी जरी  युपी मधे म्हणून किंवा बिहारात  म्हंटलं तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही. अन म्हणे संयुक्त महा्राष्ट्र!!  यांचा महाराष्ट्र सुरु होतो मुंबई पासून आणि नाशिक कोल्हापुर आणि हल्ली लातूर पर्यत संपतो.

झोपी गेलेले शासन, जेंव्हा कोर्टाने थोबाडीत मारली, तेंव्हा थोडं गाल चो्ळत खाल मानेने म्हणते, की आता आय पी एल होऊन गेली, त्यामुळे कर लावता येणार नाही. तीन वर्ष झालीत या चोरांना सुट दिली जाते आहे. जे लोकं ५०० ते ५००० रुपये एका तिकिटाचे , आणि चार तासाच्या करमणुकीचे घेतात ,तेंव्हा  त्या  आय पी एल कडुन करमणूक कर का नाही? त्यांच्याकडून खरं तर जास्त कर घ्यायला पाहिजे. तो नुसता कर जरी गोळा केला असता, तरी सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करता आली असती.आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे काय? त्यांच्या साठी काही करायची इच्छा दिसत नाही शासनाची.

अगदी सरळ सरळ दिसतंय की कोणाच्या मध्यस्ती मुळे हा कर माफ करण्यात आलाय ते. आणि इतकं झाल्यावर पण मिडीया मात्र मागच्या दोन पायात शेपूट घालुन शासनाच्या जाहिराती मिळाव्यात म्हणून त्यावर काहीच छापायला तयार नाहीत. फालतू त्या सानियाच्या लग्नाच्या बातम्यांसाठी   अख्खं पान खर्ची घालतात, पण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांच्या बद्दल मात्र एक अक्षरही छापून येत नाही.

एक पुस्तक वाचलं होतं निगोशिएटर म्हणुन फ्रेडरिक  फो्र्सि्थचं . त्यात दिलं होतं की एखादी बातमी लाइव्ह    ठेवायची तर दररोज त्या बद्दल एक तरी वाक्य बातमीमधे आल्च पाहिजे. मग एक किडनॅपिंग झालेलं असतं, रोज च्या बातमीत एक ओळ अ्सायची – ’आज  किडनॅपिंगचा अमुक अमुक दिवस ’ अशी. पण आपल्या मिडियाला आत्महत्येची  बातमी  ही बातमी वाटतंच नाही, कारण त्यातली ब्रेकिंग न्युज व्हॅल्यु निघुन गेलेली आहे. दररोजच जर काहीतरी होतंय, कोणीतरी आत्महत्या करतोय, त्यावर काय लिहायचं? असो.

मुंबईला  भैय्ये येतात आणि  झोपड्या उभ्या करतात. त्याच झोपड्य़ांना  मतांसाठी रेगुलराइझ केलं जातं. झोपड पट्टी रेगुलराइझ केली की मग त्या भागात नेत्यांच्या पाट्या दिसतात- माननीय सो ऍंड सो यांच्या प्रयत्नाने ही  झोपडपट्टी  रेगुलराइझ केल्या गेली आहे म्हणून. तुमच्या आमच्या सारखे त्या पाट्यांकडे बघून बोटं मोडतात झालं.काही दिवसांच्या नंतर झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली त्या झोपडपट्टीतल्या  भैय्या लोकांना ( जास्तीत जास्त भैय्येच आहेत तिकडे  झोपड्यांमधे) एस आर ए च्या  अंतर्गत नवीन  फ्लॅट्स फुकट दिले जातात – या संयुक्त महाराष्ट्रात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न येतो तेंव्हा आपले नेते निर्लज्जपणे म्हणतात की शेतकरी दारुडे आहेत म्हणून आत्महत्या करतात.  त्या  झोपडपट्ट्यांतल्या लोकांना फुकट घरं देण्याऐवजी जर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर   थोड्या आत्महत्या कमी होती.

नुसता  संताप होतो. जिवाचा तळतळाट होतो जास्त विचार केलं की, म्हणून आता विचार करणंच सोडून द्यायचं अन कळपातल्या मेंढरासारखं जगायचं!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

32 Responses to प्रिय आमूचा एक …

 1. Pingback: प्रिय आमूचा एक … | काय वाटेल ते……..

 2. मी says:

  काका,
  पोस्तमधला शेतकरी आत्महत्यासाठी कर्जमाफी हा मुद्दा मला पटला नाही. या विषयावर कुंथून काढलेल एक प्रशांचा मॅप http://thelife.in/wp-content/uploads/2009/07/sheti.jpg इथे आहे. त्याशिवाय माझ्या (शेतिशी निगडित नसलेल्या) मेंदूनी सरळ विचार करून काढलेले प्रश्न : “शेती प्रश्न : 3 : प्रॉब्लेम नक्की काय आहेत ?” http://thelife.in/?p=130 इथे आहेत. कर्जमाफि किंवा पैसे वाहवून प्रश्न सुटत/सुटनार नाही, तर ‘वर्गिस कुरियन’ सारख्या विद्वानाला इन्व्हाईत करून एक विकसित अर्थव्यवस्था तयार करण हा उपाय आहे, जास्त नाही फक्त १०० कॉलेजेस निवडून त्यांच्यातल्या mba/engineering/commerce आदी विद्यार्थ्यांन हे प्रश्न्स दत्तक देऊन उत्तर शोधायला सांगा .. झटक्यात सोल्य्शन येतील. … जगातल कोणतेच महत्वाचे शोध, समस्याचे निवारण कोणत्याही राजकारण्याने केले नाही .. हो पण ज्या संस्थांनी, कंपन्यांनी ते विकसित केले त्यांच्याशी कुशल हातमिळवणी केली .. आपण तिथेच चुकतोय !

  • सोमेश,
   विदर्भात दोन -चार एकर कोरडवाहू शेती असते प्रत्येकी. याचं कारण दर पिढीत त्याचं होणारं विभाजन. त्या वर घेतलेले कर्ज फार तर पाच -दहा हजार. पिक जळलं की मग ते कर्ज पण परत करता येत नाही. पिक जळलं तर बागायत नसल्याने, त्यांना काहीच करता येत नाही.
   जर आय पी एल ला करोडॊ रुपये टॅक्स माफी देतं सरकार, तर मग शेतकऱ्यांना का नाही?
   वर्गीस कुरियनने जे केलं, ते निश्चितच प्रशंसनिय आहे. एका केरळी माणसाने गुजरातमधे जाउन अमूल नावाची चळवळ सुरु केली, पार्शी डेअरी च्या विरोधात उभे राहून ती एक माइल स्टॊन आहे. तसे लोकं आता हवेत भारताला.

   तुझ्या दिलेल्या लिंक्स वाचतो आता.

    • सोमेश
     सगळ्या लिंक्स वाचल्या. जोडधंद्यांबद्दल जे लिहिलंय ते योग्य वाटतं. पण सद्य्स्थितीमधे शेतकरी चार महिने शेतीवर आणि उरलेले रोजंदारीने काम करतो.
     दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक असलेली कमी जमीन , त्यामूळे कदाचित स्वावलंबी होता येणं अवघड होतं. सावकारी तर अजूनही सुरु आहेच. बॅंक एकदा कर्ज देतं, पण पीक जळलं की मग दुबार पेरणी साठी सावकाराकडेच जावं लागतं..
     कर्ज माफी देणे हा एक तात्कालिक उपाय आहे, पण नद्या अडवणे, वळवणॆ हा दिर्घकालीन उपाय म्हणुन योग्य वाटतो. त्या दृष्टीने अटलजींचे भाषणात काहीतरी वाचल्यासारखे वाटते.

  • bharati says:

   आपले मुक्य्य मन्त्रिजि एम. बी. ए आहेत.काय थोडाफार बदल जाणवतो काय? तरी पण दत्तक प्रश्न योजना खरच राबवायला हवी.
   जुने प्रश्न नवी पिढी हे समीकरणच यशश्वी होईल यात शंका नाही.

 3. Pingback: Tweets that mention प्रिय आमूचा एक … | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 4. Pingback: प्रिय आमूचा एक … « स्वगत

 5. laxmi says:

  शेवटच्या दोन लाइन अगदी प्रत्येक सामान्य लोकांच्या मनातील लिहिल्यात .
  पण किती दुर्र्देवी आहे हे 😦

  • लक्ष्मी
   बरेच दिवसा नंतर कॉमेंट दिसली.. जे काही मनात आलं ते लिहिलं.. दुर्दैवी तर आहेच!

   • bharati says:

    100% सहमत ! मनातला राग कुणीतरी बोलून दाखवला.हे असेच परखड लिखाण असली वाटते!

 6. काका, सोमेश दादाच्या मतांशी मी सुद्धा सहमत आहे. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे सद्यपरिस्थिती (खासकरून विदर्भातील-नागपूर सोडून आणि मराठवाड्यातील-औरंगाबाद सोडून) अतिशय दयनीय आणि बिकट आहे. लोकांचे खायचे वांधे आहेत. आयपीएलच काय, हिंदी, परप्रांतिय आणि विदेशी चित्रपट, नेत्यांच्या जंगी मिरवणूका अशा अनेक गोष्टींमधून शासनाची तिजोरी कित्येक पटीने भरू शकते. पण आपले हरामखोर शासनकर्ते (ते महाराष्ट्रात जन्मले याचीच लाज वाटते जास्त!) इतके ओशाळलेले आहेत, की त्यांना ह्या गोष्टींचा नेमका विसर पडलेला असतो. मिडियाकडून तर कसलीच अपेक्षा नाही, त्यांनी लावलेले दिवे आपल्या सर्वांना तर आता माहितच आहेत, त्यामुळे ते असले काय अन् नसले काय, काहीही फरक पडत नाही! “नेमके प्रश्न काय आहेत?” हा सोमेश दादाचा मुद्दा मला पटला. या प्रश्नाचे काही अभ्यासू अर्थशास्त्र-संशोधकांनी आणि समाजशास्त्रातील संशोधकांनी मुद्देसुद उत्तरे गोळा करून त्याचा अहवाल तयार केला तरच शासनाला थोडीफार जाग येईल. पण प्रत्येकवेळी असे अहवाल तयार करण्यासाठी दरवर्षीच अश्या समित्या नेमल्या जातात, त्यांचे नंतर काय होते, कोणालाच माहित नाही…. दुर्दैव आपले!

  आपल्या शेतकर्‍यांकडे काही ५-१० एकरांच्या वर जमिनी नाहीत, त्याचे कारणही तसेच आहे, कुटुंब नियोजनाचे धडे आमच्या पिढीतल्या मुलांना तरी माहित असतील की नाही, याचीसुद्धा मला भिती आहे! प्रगत देशांच्या पापाचे परिणाम आपले शेतकरी भोगताहेत. निसर्गानेच जर पाठ फिरवली तर सामान्य शेतकरी काय करेल हो…? अवेळी पडणारा पाऊस आणि त्याचे दरवर्षी कमी होत चाललेले प्रमाण, पाऊस झाला तरीही वेळेवर बियाणे, खते, औषधीचा पुरवठा न झाल्याने होणारे व भरून न निघणारे आर्थिक नुकसान, त्यासाठी सावकार, लुबाडणार्‍या संस्थानिक बँका, यांच्याकडून घेतलेले अवजड कर्ज, पुन्हा पावसाने फिरवलेली पाठ, अतोनात हाल, काही पीक हाती आले तरी मिळणारा कमी भाव, व्यापार्‍यांकडून होणारा घात, शेवटी सर्व काही आवाक्याच्याबाहेर गेले की “आत्महत्या”… यालाच शेतकर्‍याचे जीवन ऐसे नाव आहे! ही परिस्थिती बदलण्याची क्षमता शासनाकडे असुनही या परिस्थितीची फारशी जाणीव नसल्याने हे काम खुप अवघड आहे. हजारो कोटींचे पॅकेजेस जाहीर होतात, अर्धे त्यांच्या खिशात जातात, उरलेल्या मधले खालच्या पातळीकडील खादाडांकडे, अन् यातून जर दीड-दमडी काही-बाही उरले तर ते पैशावाल्या शेतकर्‍यांचा खिशात…! असो…

  हे खरं की, आपल्या हातात काहीही नसल्याने आपण जास्त काही करू शकत नाहीत (मागच्या “निर्लज्जपणा” लेखात सांगितल्याप्रमाणे हे नेतेमंडळी कसे निवडून येतात, हे मी कमेंटले होते.), फक्त आपापल्या ब्लॉग्जवर असे परखड लेख लिहिण्याशिवाय… शे-दोनशे लोकं हे लेख वाचत असतील, काहीजण आपल्या प्रतिक्रिया नोंदवतात, पण काही फरक पडला का याचा…! हे वाटतं तितकं सोपं तर मुळीच नाही… पण आपण ब्लॉगर लोकं (येथे “मी”पणा नाही, कोणीही ब्लॉगर होऊ शकतो आणि त्याचे विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून जगासमोर मांडू शकतो!) मात्र निराश न होता, हे प्रयत्न चालू ठेऊ, काहीही झाले तरीही…! कधी ना कधी आपली दखल घेतली जाईलच…!

  असो.. काका, मला जरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास फारसा माहित नसला तरी मला नेहमी अभिमान वाटतो की, आपल्या महाराष्ट्र भूमीला नेहमीच संकटांनी घेरले, पण इथून नेहमीच कोणी ना कोणी उठला आणि त्याने महाराष्ट्राला त्या संकटांतून मुक्त करून आपल्या मराठी लोकांसाठी तो झटला, सध्याही कोणीतरी असा व्यक्ती असेल, फक्त योग्य वेळ येण्याची तो वाट पाहत असेल!

  (जय महाराष्ट्र! करा कष्ट, नाहीतर व्हाल नष्ट! – एका मित्राचे ऑर्कुटवरील स्टेटस अपडेट)

  • विशाल
   वरच्या भागात लिहिलेल्या गोष्टींमधे केवळ एकच मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. त्या व्यतिरिक्त जे मुद्दे आहेत ते पण तितकेच महत्वाचे. मी अगदी सहज लिहितांना सुचलं तसं लिहित गेलो सकाळी.
   गेली तिन वर्ष सातत्याने पडणारा दुष्काळ आणि त्या बद्दल शासनाच्या निर्णयांचा नाकर्तेपणा याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तीन वर्र्ष न झालेल्या पावसाने घेतलेले सावकाराकडचे लोन…. असो..

   शेतकरी आत्महत्या करीत होते आणि शेतकी मंत्री आयपीएल च्या मॅचेस पहात होते.

   आयपिएल ला दिल्यागेलेली सुट, ती दिली नसती, तर कदाचित बराच पैसा हाती आला असता शासनाच्या. तो पैसा शेतकऱ्यांना मदत करायला वापरला गेला असता असे माझे म्हणणे होते.

   दोन , तिन एकर वाले शेतकरी जोडधंदा करण्याचा प्रयत्न करतातच. पण जर केवळ जोडधंद्यावर उदरनिर्वाह शक्य नाही. सोमेश च्या डायग्राम मधे जो शेतकरी कन्सिडर केलाय तो कमीत कमी दहा विस एकर असलेला असावा, तरच सोलरपॉवर , किंवा तत्सम गोष्टी शक्य आहेत. दोन् तिन एकरवाल्यांचे ते काम नाही.

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
   दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.

   पार्श्र्वभूमी :
   संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची सांधेजोड करून राष्ट्रीय शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज प्रतिपादन केली. याच काळातील लोकशाही स्वराज्य पक्षाच्या (काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी) उद्देशपत्रिकेत व पक्षाच्या कार्यक्रमात भाषावार प्रांतरचनेचा आग्रह धरला व महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषी प्रांत व्हावा अशी घोषणा केली. १९१७ च्या कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. पट्टभी सीतारामय्या यांनी आंध्र प्रांत स्वतंत्र करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला अॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय, म. गांधी यांनी विरोध केला, तर लो. टिळक यांनी पाठिंबा दिला. म. गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्यावर १९२१ च्या नागपूर अधिवेशनात म. गांधी यांनीच ‘भाषावार प्रांतरचनेचा’ ठराव मांडला. कॉंग्रेसची फेर उभारणी भाषा तत्त्वावर केली यामुळे कॉंग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. १९२८ मध्ये कामकरी शेतकरी पक्षाने पं. मोतीलाल नेहरू कमिटीसमोर भाषावार राज्याची मागणी करून महाराष्ट्राची मागणी पुढे केली. नेहरू कमिशननेसुद्धा भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केली.

   १५ ऑक्टोबर, १९३८ रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘वर्‍हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत’ असा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. कारण ‘सी. पी. अँड बेरार’ प्रांतातून वर्‍हाड वगळून त्याचा स्वतंत्र विदर्भ प्रांत करण्यात यावा अशी शिफारस मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल यांनी केली होती. १९३९ च्या नगरच्या साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा’ प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल, त्याला ‘संयुक्त महाराष्ट्र’ असे नाव द्यावे असा ठराव झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग येथपासून वापरात आला. ‘सी.पी.अँड बेरार’ प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी ‘वर्‍हाड’ च्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ स्थापली. १९४१ मध्ये पुण्यात डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ स्थापण्यात आली.

   बेळगांव साहित्य संमेलन –
   दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत – वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.

   महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.

   दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.

   ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले

 7. thanthanpal says:

  एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव .मोठ्या शहरात जोरात साजरा होत आहे. आम्ही सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण सरकारी उत्सवाला साजरा करण्या करता वीज बंद केली जात नाही. पण हाय घड्याळात सकाळचे ६ वाजले आणि लाईट गेली ती ११ वाजे ला आली त्या मुळे सकाळची देशभक्तीपर गाणे मेरे देश की धरती वगेरे ऐकण्याची संधी गेली. यामुळे उत्सव आहे असे वाटलेच नाही. आजकाल कोंबड ओरडण्याची वाट पहावी लागत नाही आमचे घड्याळ वीज जाणे येणे यावरच लावली जातात.
  यापुढची सत्य घटना सांगतो.मुलाचा पुण्यातील IT कंपनीत काम करणारा मित्र आई-वडिलांना भेटण्यास बऱ्याच दिवसांनी गावाकडे आला होता. सकाळी गुल झालेली लाईट ११ वाजता आली. गप्पा मरत असताना लगेच घंट्या भरात वीज गुल. घामाच्या धारा सुरु. त्याने थोडा वेळ सहन केले. नंतर माझ्या कडे तावातावाने आला. काका , आता लाईट कधी येणार मी शांतपणे सांगितले ५.३ वाजता. तो चिडला , काका तुम्ही लोक इतके शांत कसे बसू शकता, लोक धिंगाणा करत नाही का? नेत्यांना , MSEB च्या लोकांना मारत का नाही. या ४५ डिग्री तापमानात पंख्या, कुलर शिवाय कसे राहतात . आमच्या कडे लाईट जात नाही. गेली तर अधिकाऱ्यांची खेर नाही. लोक ठोकून काढतात. ४ दिवसा साठी आलेला त्याने आजच्या रात्रीचे वातानुकुल बस चे परतीचे तिकीट काढले.
  यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड चांद्या पासून मुंबई पर्यंत महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी तर चूक ठरू नये

  • नुकतीच बेळगांवसहीत संयुक्त महाराष्ट्राची घॊषणा पण ऐकली. दर वर्षी प्रमाणे सगळ्या नेत्यांना एकदम कोणितरी अंगावर थंड पाणी ओतल्यावर जसे लोकं खडबडून जागे होतात, त्या प्रमाणे जाग येऊन पुन्हा एकदा बेळगांव महाराष्ट्रात आलाच पाहिजे अशी मागणी बऱ्याच स्टेज वरून झालेली दिसली. एक गोष्ट कळत नाही, पुर्ण वर्ष भर काय झोपा काढतात का हे सगळे लोकं? कालच म्हणजे महाराष्ट्र दिनीच कां आठवण होते बेळगांवची?
   असो..
   येडूरप्पा यांनी बेळगांवला दुसरे स्टेट कॅपिटल करण्याची घोषणा केल्याचे कळते. कधी करणार ते नक्की माहिती नाही. महाराष्ट्रात येऊन जर गडचिरोली, बुलढाणा, जालना, परभणी सारखी परिस्थिती होणार असेल तर त्या पेक्षा बेळगांव जर दुसरे कॅपिटल झाले तर कदाचित त्याला जास्त चांगले दिवस येतील. एक गोष्ट समजत नाही, बेळगांव कशासाठी हवंय महाराष्ट्रात?? असो..

   तशीही या ब्लॉग वर कोणाकडुनच प्रतिक्रिया अपेक्षीत नव्हती. कारण आपण सगळे जण त्या नेत्यांच्या घोषणांना बळी पडून बेळगांव महाराष्ट्रात आलंच पाहिजे म्हणुन मानसिक दृष्ट्या लढायला तयार झालेलो असतो. काही झालंच तर नविन हुतात्मे तयार होतील आपलेच.. एखादा स्तंभ उभा होईल, आणि वर्षातून एकदा पुष्पचक्र बाहायला पण नेते येतील , उरलेला वेळ कबुतरांचा संडास होऊन राहिल आपला स्तंभ…. जाउ द्या. फार कडवट होतंय . थांबतो इथेच.

   प्रतिक्रियेकरता आभार.

 8. खरंच विषण्ण व्हायला होतं आणि आपण काहीही करू शकत नाही.. Helpless !!!!!!

  • हेरंब
   महाराष्ट्र जेंव्हा संयुक्त महाराष्ट्र म्हंटला जातो, तेंव्हा चांदा ते बांदा सारख्याच सुविधा का दिल्या जात नाहीत? हे वाक्य मनाला भिडलं..खरंच हेल्पलेस वाटतं.

   माझे मित्र नेहेमी म्हणतात, तुमचा सिएम होता वसंत पवार, पण् त्याने काहीच का केलं नाही विदर्भासाठी? आता होता, तो सि एम, पण केवळ पश्चिम महाराष्टातल्या नेत्यांचेच पाय चाटत गादी सांभाळली दहाव वर्ष त्याने. अजुनही पुसद ला गेलं की हे सिएम चं गांव आहे असं वाटत नाही.. अजूनही तिच पाय चाटत खुर्ची संभाळण्याची परंपरा इतर काही नेते चालवत आहेत. काय बोलणार यावर?

   श्रीकांत जीचकार सारखे नेते होते, दुर्दैवाने ते पण गेले.. आता जे शिल्लक आहेत त्यांना नेते म्हणायचं कां? हा एक प्रश्न आहेच.

   संयुक्त महाराष्ट्राची व्याप्ती अजून वाढवण्यापेक्षा आहे तेच राज्य व्यवस्थित सांभाळलं तरी पुरेसं आहे. अकोल्याला आठवड्यातून एक दिवस पाणी येतं. तशीच परिस्थिती जवळपास पुर्ण विदर्भात आहे. सरकारच्या दृष्टीने विदर्भ हा महाराष्ट्रात येतच नाही.. सबब.. काहीच केलं जात नाही- किंवा करण्याची गरज वाटत नाही. ४५ डिग्री टेम्प्रेचर, पाण्याची कमतरता, विज कपात- लोकं कसे जगत असतिल याची नुसती कल्पनाच करून पहा… ज्याचं जळतं त्याला कळतं.. हेच खरं.

 9. बराबर बोललात काका. सदर पोस्ट वाचून आणि त्यावरील विशालराव,सोमेशराव आणि परभणीकर साहेबांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रच लोकांच्या नजरेत असणार चित्र आणि याच लोकांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्ने दाखवतात. प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. आपल्यकडे प्रश्नांची यादीच यादी आहे, काहींची उत्तरे ही तयार आहेत, पण लोकांत म्हणा किंवा शासनात ते सोडवण्याची इच्छा तरी नाही किंवा मग भयंकर उदासीनता. विशाल ने सांगितले ती परस्थिती खरच खूप बोलकी आहे आणि सत्य ही. मराठवाडा नि विदर्भ औरंगाबाद आणि नागपूर सोडून बघितले तर बकाल आहे. आता तेथील लोकांना (म्हणजे आमच्यातील सगळ्यांना) अंधकाराची जाणीवच नाही आणि म्हणून अंधकारातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न नाहीत(अपवाद आहेत). म्हणून ज्यांना कळले त्यांनी ह्या अंधकाराचा बोभाटा करायलाच पाहिजे आणि फक्त बोभाटाच नव्हे तर जमतील तशी उत्तेही ही शोधायला पाहिजेत. परभणीकरांच्या अनुभवावरून सरळ दिसून येते की सदर युवकाला कमीत कमी अंधकाराची जाणीव तरी झाली म्हणजे हा युवक पुढे पुण्या-मुंबईतील झगमग पाहून कमीत कमी शासनाच्या किंवा मारकेटर्सच्या भूल थापानी भारून तर जाणार नाही की महाराष्ट्रात सगळा सुखा-सुखी आहे. आणि माझं व्यक्तिगत मत, आपला विदर्भ आणि मराठवाडा हे तसे पहिले तर स्वतःच एक प्रश्न आहेत, आपल्याकडील नेत्यांना आहे त्या निधीचा कधी नीट उपयोग करता आला नाही, जास्तीचा निधी जमवणे व खेचणे तर सोडाच. पश्चिम महाराष्ट्राला एकट्याला दोष देता फायदा नही, कारण उठ सुठ त्यांच्याकडे बोट दाखवून आपल्या नेत्यांनी इतकी वर्षे आपल्यावर सत्ता केली जसे की हे जन्माचे राजेच! आपल्या दयनीय स्थितीचे सगळ्यात मोठे कारण आपले नेते आहेत, सरकारी अधिकारी आणि भ्रष्ट व्यवस्था आहे. नेते बदले, मागण्या केल्या की सगळे व्यवस्थित होईल असा एक अंदाज आहे. शेतकरी आणि सामान्य जनता यांच्याशी प्रयोग करणे परवडत नाही आणि त्यामुळे वेगळा विदर्भ उत्तर आहे की नाही हे मला अजून तरी कळले नाही. शेवटी विदर्भ महाराष्ट्रात असो की वेगळा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत हीच अपेक्षा.
  आता समविचारी लोक येथे आहेतच तर माझी एक शंका ही बोलून धाखावतो. आता इंटरनेट वर मराठी मध्ये खूप कंटेंट आहे पण कधी कधी दुख होते की त्यातले बरेच- आज काय केले आणि काय खाल्ले, अय्या चित्रपट किती छान होता, म्हणजे आनंदी आनंद गडे या प्रकारातील आहे, आपल्या सारख्यांनी समाजातील जिवंत विषयवार लिहिले की वाचयल बरे वाटते. ‘ते’ लिहानारांचा राग मुळीच नाही पण आज काहीही गूगल करा सगळे निकाल सगळ काही सुखा सुखी आहे असच दाखवतात, आणि ते खर पाहिलं तर चुकीचा मेसेज घेऊन जाणारे आहे!
  असो महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीत, आपण सर्वांकडून फार मोठी भर पडो हीच अपेक्षा!
  जय महाराष्ट्र!

  • प्रकाश
   प्रतिक्रियेकरता आभार.
   इथे पश्चिम महाराष्ट्राला दोष दिलेला नाही. निधी खेचणॆ, आणि व्यवस्थित वापरणे, या पेक्षा स्वतःच्या पोळीवर कसे काय तुप ओढुन घेता येईल, कसे शाळा कॉलेजेस सुरु करायला परवानग्या मिळतील, या कडेच सगळे लक्ष लागलेले असते विदर्भातल्या नेत्यांचे. दर्डाजींनी यवतमाळला विमानतळ बनवला- कशासाठी? किती लोकं प्रवास करतात विमानाने? त्याच धरतीवर प्रफुल पटेलने गोंदियाला विमानतळ बनवला- काही गरज नसतांना.आज पर्यंत एकही विमान तिथे लॅंड झालेले नाही. तेच पैसे जनतेच्या पाण्याच्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी वापरले असते तर???
   दुर्दैवाने एकही नेता असा नाही की जो स्वतः काही निर्णय घेउ शकेल, किंवा विदर्भासाठी काही करू शकेल.

   माझा मुद्दा वेगळा विदर्भ किंवा विदर्भाच्या नेत्यांनी काय केलं? हा नाही-तर सरकारी यंत्रणेने काय केलं विदर्भाच्या विकासासाठी हा आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच विज, पाणी अशा सुविधा तरी देण्याकरता काय केले हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रशन अतिशय वाईट तर्हेने हाताळल्या गेलाय.नाऱ्या वसारखे लोकं जे अगदी काय वाटेल ते बोलतात, त्यामूळे त्यांची बौद्धिक पातळी खरंच संशय घ्यावी अशी आहे असे वाटते.

   आपली मानसिकता नेत्यांचे गुणगान करण्याची( भाट गीरी) आहे. नेत्याचा वाढदिवस असला की चाटु गिरीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे चौका चौकात लागलेले फलक. नेत्याचा वाढदिवस आहे, तर त्याला शुभेच्छा द्या नां.. रस्त्यावर बोर्ड लाउन काय दाखवता? की आम्ही किती चाटू आहोत ते?? जाउ द्या.काहीही करुन आपला स्वार्थ कसा साधता येइल, हे अगदी तळागाळातल्या लोकल नेत्यांपासुन ते वरच्या मोठया नेत्यांपर्यंत सारखीच मानसिकता आहे..

   • बरोबर बोललात काका आपण. कदाचित मला ही तेच म्हणायचेय. दोष ‘आपल्याच’ नेत्यांचा आहे. त्यात ही जनता त्यांनाच निवडून देते. राजकीय नेते भावनेचे राजकारण करतात आणि त्याला आपण बळी पडतो. चार समजूत दर लोक लेख लिहितात, आरडा ओरड होते, सगळ्यां वाटते पाण्याच प्रश्न सुटावा हा प्रश्न सुटावा पण मतदानाला जात नाहीत (काही लोक) आणि हाच तो गात असतो ज्यांच्या मतदानाला न गेल्यामुळे नको ती कोणत्याही पक्षाची लोक का असेनात निवडून येतात. त्या मुले इथून पुढे कोणतीही निवडणूक आली की हे (http://mukhyamantri.blogspot.com/2009/09/blog-post_19.html) लक्षात ठेवले जावे !
    इतक्या चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन!

    • आपण मतदान पक्षाला करतो नेत्याला नाही.

     जर निवडणूक झाली तर एखादे वेळेस कदाचित कलाम साहे्बांसारखा माणूस पण एखाद्या गुंडाविरुध्द डीपॉझिट गमावु शकेल. जो पर्यंत पक्ष न पहाता माणुस पाहुन मतदान करीत नाही , तो पर्यंत डेव्हलपमेंट्स शक्य नाहीत.

 10. thanthanpal says:

  की आता आय पी एल होऊन गेली, त्यामुळे कर लावता येणार नाही …………………………..
  सरकारी नोकरशाहीला पगारवाढ केली जाते तेंव्हा ती मागील २-३ वर्षा पासून लागू केली जाते. अनेक सरकारी नियमांची कायद्याची अंमलबजावणी जुन्या तारखे पासून केली जाते. तसेच हा कर लावलाच पाहिजे.काळ्या पैश्याच्या अश्या प्रकरणात INCOME TAX KHATE दंडा सहित रक्कम वसूल करते. कर लावण्यासाठी जे कायदे आहेत त्या कायद्याच्या आधारे कर लावता येतो नवीन कायदा करण्याची आवशकता नाही. फक्त जनहित करण्याची राजकीय हिम्मत पाहिजे .

  • अगदी बरोबर बोललात.. पण मोठे साहेब आहेत कोलदांडा घालायला . कधीच निर्णय होऊ देणार नाहीत.

 11. महेश कुलकर्णी says:

  आपण लिहलेली माहिती अगदी बरोबर आहे,कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राबद्दल सर्व काही माहित नाही पण राजकारणासाठी त्या गोष्टीचा उपयोग मात्र ते करत असतात कारण त्यांनालोक नेते म्हणून वावराचे असते ,,,,,महेश कुलकर्णी

  • महेश
   या नेत्यांना गडचिरोली म्हणजे नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोट करुन पोलिसांना मारल्यावर भेट देण्याची जागा वाटते.
   केवळ मतांसाठी ह्या विभागाचा उपयोग करुन घेतला जातो. पोलिसांना पण गडचिरोली म्हणजे ’शिक्षा पोस्टींग’ म्हणुन दिली जाते.

 12. Manmaujee says:

  महेन्द्र काका, राज्यात फक्त शेतकरी एवढी एकच समस्या आहे का??? खूप सार्‍या आहेत…मग ती वाढत शहरीकरण ,वीज,रस्ते, नागरी सुविधा, शहरी कचरा, नदी प्रदूषण, पाण्याच व्यवस्थापन….. कोणत्याही प्रश्नावर फक्त तात्पुरता इलाज केला जातो.राजकीय नेते फक्त तोंड देखलेपणा करतात बाकी काही नाही….तुम्ही आता हेच बघा …दौंड अन् बारामती दोन्ही साहेबांचे बालेकिल्ले पण दौंड अन् बारामती यांच्या विकासामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बारामती मध्ये कधी आत्महत्या झाली आहे का??? तस पाहील तर बारामती हा दुष्काळीच परीसर पण मिळाल ना पाणी….बारामती मध्ये कितीस भारनियमन होत हे पण पाहील पाहिजे….त्याच्या पुढे आहे अकलूज ….त्या अकलूज मध्ये वॉटर पार्क आहे???? बारामती- दौंड ….अकलूज- सोलापूर हा किती विरोधाभास आहे….काही नाही सहकारातून फक्त स्वाहाकार झालाय.

  अस खूप काही आहे…..असो आपण कळपात चालत राहयच, स्वप्न बघायची (किमान तेवढ तरी आपण करू शकतो) , १ मे ला न चुकता महाराष्ट्र दिन साजरा करायचा….अन् बेंबीच्या देठापासुन बोंबलायच “जय महाराष्ट्र”

  • योगेश
   अगदी खरं लिहिलंस. नागरी सुविधा पण तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या बद्द्ल पण लिहिलंय वर . पाणी , इलेक्ट्रिक पॉवर हे दोन मुख्य इशु आहेत.अकलूज सोलापूर वगैरे जागा पुर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.संयुक्त महाराष्ट्र मिळवला, पण शेवटी सगळं दुर्लक्ष झालं ते रेस्ट ऑफ महाराष्ट्रा कडे.

 13. sonalw says:

  1 may cha Lokasatta madhil agralekh ya drushtine khup samarpak aahe. “Gaurav kasala?” ya shirshakacha. Maharashtrachya ekun adhigaticha aadhawa aani antarmukh karnaara ha lekh nakki wachawa pratyekane.
  Mumbai Milali Maharashtra harwala hi series pan asech anrmukh karayla laawnaari aahe.
  khup hatbal watat. chid chid hote aani aapan he kahich thopawu shakat nahi yane ajun nairashy yet.

  • एकेकाळचं बेस्ट गव्हर्न्ड स्टेट असलेला महाराष्ट्र आज बिहाराच्या पण खालच्या लेव्हलला पोहोचलाय , गव्हर्नंस च्या बाबतीत!! मी स्वतः गडचिरोली, हेमलकसा भागात फिरलेलो आहे. तिकडची परिस्थिती कशी आहे हे आपण इथे मुंबईत बसून समजूच शकत नाही. तो लेख वाचतो लोकसत्ताचा..

 14. Prakash says:

  करत नाहीये, पण कुणाला महराष्ट्र दिन विशेष, महाराष्ट्राचा घेतलेला एक छोटा आढावा, मनातली चीड आणि थोडाफार झालेला आनंद वाचायचा असेल तर येथे ( http://sites.google.com/a/jijau.com/www/jijaupdf/maharashtraDin2010JijaudotCom.pdf?attredirects=0&d=1 ) वाचू शकता. आपल्या काही प्रतिक्रिया, टीका असतील तर त्या ही कळवाव्यात.

  • पोस्ट वाचली. दिवसभर ऑफिसात होतो आता घरी आल्यावर वाचली पोस्ट. ती पिडीएफ फाइल असल्याने प्रतिक्रिया देता आली नाही.
   गेल्या पन्नास वर्षात काय मिळवले ? या गोष्टीचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या गोष्टी आहेत. असो.. बरंच लिहिलंय या विषयावर .. सुंदर लेख लिहिलाय तुम्ही..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s