आनंद..


आनंद कधी होतो मला?

दररोजच्या राजकीय नेत्यांच्या   वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!!  कधीच  नाही.

कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या तर एकवेळ बघतांना आनंद होईल पण इथे नेत्यांना शाब्दिक कोलांट्या उड्या मारलेल्या पहातांना फक्त करमणूक होते!  किती गम्मत आहे नाही? एखाद्या गोष्टीपासून करमणूक होऊ शकते पण आनंद नाही!

माझे बरेचसे मित्र ( आता त्यांना मित्र म्हणायचं कां??) आहेत की ज्यांना कायम मला जेंव्हा शक्य होईल तेंव्हा त्रास द्यायला आवडतं. कामाच्या बाबतीत तर हमखास. होतं काय , काही लोकांशी वर्षानुवर्ष संबंध येतो. आणि बरेच वर्ष संबंध आल्यावर मग संबंध मैत्री पुर्ण  होतात-उगाच वाटायला लागतं की हा आपला मित्र आहे म्हणून. पण खरी मैत्री नसते ती.

खरी मैत्री निस्वार्थी असते, जिथे मला तुमच्या कडून काही नकोय आणि तुम्हाला पण माझ्या कडून काही नको   म्हणजे   खरी मैत्री. असो.. ते मित्र शक्यतो तुम्हाला कायम मैत्रीचा हवाला देऊन काही ना काही तरी त्रासच देत असतात आणि केवळ भिडेपोटी तुम्ही सगळं  सहन करत बसता . तर असा एखादा मित्र  प्रॉब्लेम मधे अडकला   की  ( असुरी)आनंद होतो- पण इथे जरी आनंद  असला तरी करमणूक मात्र अजिबात नसते. असुरी आनंद जास्त वेळ टिकतो.

शाळेत शिकत असतांना   कधी एकदा शाळा संपते आणि आपण कॉलेजला जातो असे होत असते. एकदा शाळा संपली आणि टिसी हातात मिळाली, की आता कॉलेजमधे जाणार म्हणून आनंद तर असतोच, पण हुरहुर पण असते-

इंजिनिअरींगला गेलो याचा आनंद असतोच पहिले काही दिवस! हातामधे मिनिड्राफ्टर, स्लाईड रुल्स ( हल्ली कॅल्सी) , ड्रॉइंगशिट्स चं भेंडॊळं मिरवत कॉलेजात जातांना जे वाटतं त्याला अभिमान म्हणता येईल – आपण ब्रिड अपार्ट असल्याचा……तो आनंद होता कां? नाही…. बहुतेक नसावा!! तो एक काहीतरी मिळवल्याचा अभिमानच असावा.

कॉलेज सुरु झालं तरीही- कसं होईल?? ही धास्ती असतेच – च्यायला साली केटी लागायला नको.. !! नायतर बापुस वाट लावेल…( लक्ष्मणराव देशपांड्याच्या भाषेत- काय होईल? कस्सं होईल? लांबचा  पल्ला!)

कॉलेज सुरु झालं आणि पहिली दोन सेमिस्टर्स झाली की कधी एकदाचं संपते हे कॉलेज आणि  आपण नौकरीला लागतो असे होते.  शेवटचं सेमिस्टर असतं. मग सारखं राहुन राहुन पापा कहते है बडा नाम करेगा.. बेटा हमारा बडा काम करेगा हे कयामतसे कयामतचं गाणं घोळत असतं.बरीच वर्ष जिची  तुम्ही वाट पहात असता ती  एकदाची कुठे तरी नौकरी लागते. नौकरी लागल्यावर   आनंद असतो??  हो.. असतो ना.. पण फक्त   जॉइन होई पर्य़ंत असतो .. पण नंतर मात्र  .. एक भ्रमनिरास असतो!

’तिच्या’ बरोबर फिरतांना अंधाऱ्या रस्त्यावर तिला बाइक वर मागे बसलेली असतांनाच मागे वळून घेतलेला पहिले चुंबन? ह्या मधे आनंद वाटण्यापेक्षा हुर हुर , कोणी पाहिल का? ही चिंताच जास्त असते- . कारण कोणाला दिसलं आणि घरापर्यंत बातमी पोहोचली तर??

आनंदाचा क्षण म्हणजे काय?  विमानात बसलेले असतांना निरभ्र आकाशात  दूर दिसणाऱ्या क्षितिजाच्या सूर्यास्ताच्या वेळच्या शेंदरी रंगछटा दिसल्या की मन प्रफुल्लित होतं. रंगीबेरंगी आकाश पहायला बरं वाटतं – तो आनंदच असतो का?

लग्नापूर्वी तिच्या कंबरेच्या खालपर्यंत लांब केसामधे मोगऱ्याचा गजरा माळतांना,  केसांचा मंद शिकेकाईचा सुगंध , अंगाचा सुगंध, आणि त्या मधे मोगऱ्याचा सुंगंध मिसळल्यामुळे तयार होणारा तो  एक निराळाच सुगंध नाकात शिरला  की जी अनुभूती किंवा जे भाव मनात निर्माण होतात  ते म्हणजेच  का आनंद?  की ती फक्त विषय वासना?

लग्न ठरलं , आता तिची तशी भेट चोरुन घ्यायची गरज उरलेली नसते. तिला हवं तेंव्हा तिच्या घरी जाउन हक्काने भेटता येत असतं- त्या मधे तो पूर्वीचा लपून छपून भेटण्याचा आनंद मात्र गमावलेला असतो. ती हुर हुर.. अजून कशी आली नाही ?? भेटण्याची वेळ दहा वाजता असेल तर ९ वाजताच जाउन पोहोचणे, आणि तिला पण ९ वाजताच त्या ठिकाणी आलेली पाहिल्यावर होणारा आनंद- क्षणिक असला तरी पण परिपूर्ण असतो.

लग्नामधे सनई चौघड्यांच्या नादा मध्ये तिच्या गळ्यात हार घालतांना मनात येणारे भाव म्हणजे जबाबदारीची जाणिव करुन देणारे! लग्न होतंय म्हणून आनंद नसतो झालेला- पुढे कसं काय होईल ही भावना सारखी मनात डोकावत असते! तिच्या मनात तेंव्हा काय असेल बरं??

लग्नानंतर तुम्ही बाप होणार ही बातमी जेंव्हा कळते तेंव्हा मनात जे कुठले भाव येतात तो म्हणजे आनंद का? कदाचित क्षणिक आनंद असतो, पण ताबडतोब  काळजी वाटु लागते. तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच एकदम बदलतो. काही तरी बहुमूल्य गिफ्ट तुम्हाला ती देणार .. मग तिची इतकी जास्त काळजी वाटते, पण ती  काळजी कशी करायची हेच समजत नाही. नुस्ता वेंधळेपणाच असतो झालं.

पहिली बाइक घेतो स्वतःच्या पैशानी. त्याचा आनंद मात्र बरेच दिवस टिकतो ( मॅन्स मेंटॅलिटी)तसेच पहिली कार घरी आणल्यावर ( आमच्या काळी सेकंडहॅंड असायची ) तरी पण घरी गेल्यावर बायकोला निरांजनाचं तबक आणून त्या कारची पुजा करतांना पाहिलं की जो आनंद होतो, तो  अगदी अवर्णनीय असतो.नंतर त्याच कारमधे बसुन चक्कर मारायला-फिरायला नेल्यावर होणारा आ्नंद प्राइसले्स !!.आज पर्यंत पाच वेळा कार बदलल्या. पण पहिली सेकंडहॅंड कार घेतल्यावर झालेला आनंद  मात्र  पुन्हा उपभोगता आला नाही. पहिलटकरणीचा आनंद होता तो.

आनंद खरं तर दोन प्रकारात डिव्हाइड केला जाउ शकतो, एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरा सामाजिक. जाउ द्या . आनंदाची व्याख्या कशाला करायची?

क मात्र मला नक्की समजलंय की आपलं मन  हे मर्कट बुद्धी असतं, ते तुम्हाला आनंद  फार काळ उपभोगू देत नाही. आनंदाच्या महासागरात तुम्ही पोहायला उतरलात की   ताबडतोब वास्तवाच्या  काळजी , हुरहुर इत्यादींच्या डोहात  आणून सोडते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to आनंद..

 1. सुंदर. खुप साध्या विषयाची प्रगल्भ मांडणी !!!

  म्हंटलं तर आनंद प्रत्येक गोष्टीत आहे पण शोधू जाता कुठेच गवसत नाही असं काहीसं आहे. मला वाटतं समाधान हाती आलं की आनंद त्याच्याबरोबरच येतो मुक्कामाला. पण हे समाधान खूप चंचल असतं. फार काळ रहात नाही आपल्याबरोबर (आपल्याच स्वभावामुळे).. आणि त्यामुळे आनंदही निसटून जातो मुठीतून.

  खूप भावला लेख !!

  • हेरंब
   आनंदाचे क्षण सांभाळून ठेवायचे असतात ते स्मृती मधे. पुन्हा पुन्हा उपभोगता यावे म्हणून. 🙂

   ते गाणं आठवतं कां साउंड ऑफ म्युझिक मधलं? ब्राउन पेपर पॅकेजेस टाइड विथ द स्ट्रिंग्स दिज आर फ्यु …. आय सिंप्ली रिमेम्बर माय फेवरेट थिंग्ज व्हेन आय फिल सॅड… मला सुट होतं हे गाणं !

 2. बेष्ट..अगदी खरय..काय असतो आनंद? कोणाला जमलीय खर्‍या आनंदाची डेफिनेशन? आपल मनच आपल्याला आधी सांगत की बाबा जास्तवेळ राहणार नाही हा आनंद..सांभाळून..
  खूप मस्त पोस्ट काका..खूप खूप भावाली

  • सुहास
   अरे फारच नॉस्टॅल्जिक वाटत होतं आज सकाळी, म्हणून हे पोस्ट खरडलं कसं तरी..

 3. Sanjiv Siddul says:

  सुंदर…..
  मस्तच !!!

  • संजीव
   एकदम ’दिलसे’ लिहिलंय हे पोस्ट फक्त ३० मिनिटात!! 🙂 जमलं यातंच सगळं आलं. धन्स रे..

 4. सचिन says:

  काका,अगदी खर आहे कोणतीही नवी गोष्ट क्षणिक आनंद देऊन जातो. आनंद हा दीर्घकाळ टिकतच नसतो. म्हणूनच बहुतेक आनंदा साठी माणसाला नेहमी नाविन्याचा ध्यास असावा.
  नवी शाळा,नवी कपडे, नवी गाडी,नवी नोकरी,नवा गाव…………….
  क्षणिकच आनंद देऊन जातात या नव्या गोष्टी.

  • सचिन
   हीच गोष्ट मला मनाला काल पासुन बोचत होती. समाधानी रहायला कधी शिकणार आपण? हेरंबची कॉमेंट अगदी ऍप्रोप्रिएट आहे बघ.

 5. Maithili says:

  Sahiye…
  Mastach….. 🙂

 6. पोस्ट खुपंच आवडली आणि एकदम पटली.
  मनुष्यप्राण्याच्या असमाधानी वृत्तीमुळेच तो सतत प्रगती/अधोगती करत गेला कदाचित.

  • आनंद कधीच अविनाशी नसतो. प्रत्येकवेळी आनंद हा एक काळी किनार घेउन येतो आणि वास्तवाची जाणीव करुन देतो.
   खरंय तुझं.. समाधान हवंच..

 7. Gretchen Rubin च या अशा चर्वनावर/विशयावर happiness-project हे पुस्तक आहे. http://www.happiness-project.com/

 8. sahajach says:

  महेंद्रजी सुंदर पोस्ट …… 🙂

  विशेष म्हणजे हे खुपसे तुमच्या नेहेमीच्या पद्धतीचे लिखाण नाहीये…. सरळ, सडेतोड मुद्दे असलेले नसून जरा ललीत अंगाचे, बारिकसे नक्षीकाम केलेले, खूप कमी शब्दात खूप आशय मांडणारे …मस्तच.

  आनंद, समाधान अतिशय सापेक्ष गोष्टी, आपल्या मनाला ’थोडा है थोडे की जरूरत है’ ची सवय लावायची की ’बाबा रे तुझ्याकडे निदान थोडा तरी है ते तरी जप’ ची यावर बरचं अवंलंबून असतं…..

  बाकि हेरंब +१

  • तन्वी
   ललीत लिहायचं म्हणून नाही, तर आपोआप ललीत लिखाण झालेलं दिसतंय. सकाळी थोडा मूड वेगळाच(!) होता आज. त्याच विचारात लिहिलं गेलं हे पोस्ट.
   जे आहे त्यात समाधान मानलं तर आनंद होईल कदाचित.. पण इतकं का सोपं आहे ते??

 9. …… महेंद्रजी… वा! आनंदाच्या एवढ्या वार्ता एकदम वाचनात आल्या नव्हत्या, किंबहुना कधी विचारही केला नव्हता…. आता आपली पोस्ट वाचल्यानंतर अजुन काही आनंदाच्या – वेळा- आठवल्या.. जसे – पहिल्या नोकरीचं ऑफर लेटर हातात पडल्यावर होणारा आनंद आणि जॉयनिंगच्या पहिल्यादिवशीचं टेंन्शन… पहिला पगार …. अपत्यानं “बाबा” किंवा “आई” म्हटल्यावर झालेला आनंद… एकंदरीच सारंच अवर्णनिय!

  असो.. नेहमीप्रमाणे हा लेखही एक वेगळा आनंद देऊन गेला 🙂

  • दिपक
   पहिली मुलगी झाली, आणि मी संध्याकाळी चक्क पोहायला गेलो होतो अंबाझरीतलावावर. वर निरभ्र आकाश, नागपूरचा उन्हाळा, गार पाणी नुसतं फ्लोटींग करीत होतो अर्धा तास.. तो अनूभव अवर्णनीय. I was feeling like a God- who has just created a marvel 🙂 असो…

 10. मस्त काका. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद होतो आणि मग मागे वळून पाहिलं की आपल्यालाच कळत नाही की त्यात काय होतं एवढं. आत्ता कालच बघा नुसतं सचिन तेंडुलकर Twitter वर आला म्हणून इतके दिवसांनी Twitter वर login केलं आणि जाता येता अपडेट्स पहातोय.

  बाकी हेरंब म्हणाला तसंच आनंद आणि समाधान ह्यांची सांगड घालणे सगळ्यांनाच नाही जमत. ज्याला जमलं तो सुखी माणूस.

 11. महेश says:

  आनंद हा आनंदच असतो ,तो जरी क्षणभंगुर असला तरी मनाला समाधान देऊन जातो,व हवेच्या झुळूक सारखा असतो,

 12. vidyadhar says:

  आनंदाचं इतकं प्रगल्भ आणि तरीही समजेलंसं विश्लेषण पहिल्यांदाच वाचलं. मस्त झालीये पोष्ट.

  बाय द वे काका, आनंद सध्या तरी दोनच प्रकारात डिव्हाइड केला जाउ शकतो, एक म्हणजे पत्रे आणि दुसरा काळे.

  सॉरी, मला मारायला शोधण्यात अर्थ नाही.

  • सही.. सकाळी देवांच्या मठीत पण हेच बोलणं सुरु होतं आज. 🙂
   तसंही मला हे दोनच आनंद माहिती आहेत !

 13. salilchaudhary says:

  MK khup chhan lekh.
  Va pu kalenchi athvan ali vaachtana
  blogcha makeover aajach pahila. “kayvatelte” is rocking 🙂

  • सलिल
   धन्यवाद. हल्ली वर्डप्रेसवर पण बऱ्याच नविन थिम्स येत आहेत. दोन तिन नविन थिम्स एकाच आठवड्यात दिल्यात त्यांनी.

 14. महेंद्र लेख सॉलिड आवडला. वर म्हणल्याप्रमाणे तुमच्या नेहमीच्या पोस्टपेक्षा वेगळा झालाय. तुमचं कॉमेंटमधलं एक वाक्य खूप आवडलं, “आनंदाचे क्षण सांभाळून ठेवायचे असतात ते स्मृती मधे. पुन्हा पुन्हा उपभोगता यावे म्हणून.” किती बरोबर आहे. तेच तुम्ही केलंय ह्या पोस्ट मध्ये.

  मुलगी झाल्यावर तुमचा आनंद, अंबाझरीवर पोहायला जाण, मला माझ्या अनुभवांशी परत जोडून गेला. धन्यवाद!

 15. mau says:

  अप्रतिम लेख !!मनाला अगदी स्पर्शुन गेला…
  समाधान असतं तर मग काय ….आनंदाला शोधीत बसला असता का मनुष्य??जे आहे ते आपलेच आहे त्यालाच जपुन ठेवावे हेच भान रहात नाही त्याला….आणि नविन काहितरी धुंडण्याच्या नादात तो असलेला सगळा आनंद हरवुन बसतो….नेहमीसारखीच सुंदर पोस्ट….

  • उमा
   अगदी बरोबर.. समाधानच नाही आपल्याकडे. नेहेमी दुसऱ्याकडे आहे, मग माझ्याकडे का नाही? हा विचार आला, की आपल्या कडे जे काही आहे, त्याचा पण आनंद उपभोगता येत नाही. कायम दुःखी ठेवण्याचं काम असमाधानी वृत्ती करते.

 16. Sarika says:

  काका,

  छान लेख. प्रत्येक आनंदाला दूःखाची फोडणी असते. आनंद क्षणैक टिकतो कारण ’मिळाले ते कमी आणि अजुन हवे’ हि वृत्ती.

 17. हा लेख वाचून सुखी माणसाचा सदरा नावाच्या गोष्टीची आठवण झाली. मला वाटते की आनंद ही अशी गोष्ट आहे की आपण मिळवायचाच असे ठरवले की मिळतोच. पण दुर्दैव असे की आपण आनंदी कसे नाही ह्याचा विचार करण्यातच आनंद मानतो 🙂

  • निरंजन
   ते एकदम नैसर्गिक आहे असे मला वाटते. आनंद मिळवायला कष्ट करायचे आणि मग दुःखी व्हायचे – हीच माणसाची लिव्हिंग स्टाइल झालेली आहे आजकाल.

 18. Manohar says:

  आपण भावनांशी आनंदाची गल्लत करता आहात. आनंद ही चित्ताची किवा मनाची स्थिती आहे, भावना नव्हे.

  • मनोहर
   खरंच लक्षात येत नाही. इतकं जास्त विचार करुन लिहिलेले पण नाही हे पोस्ट. जस्ट मनात येईल तसं लिहित गेलोय. 🙂
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 19. bhaanasa says:

  आज मिळालेल्या आनंदासाठी अगदी ह्या क्षणापर्यंत आपण झगडत होतो, तरसलो होतो हेच मुळी आनंद मिळताच आपण विसरून जातो. लगेच दुसरे काहीतरी हवेसे वाटू लागते….. जसे तू मागे म्हणालास…. नव्य़ा को~या गाडीची डिलिव्हरी घेतली आणि लगेच छोकरी म्हणाली….. बाबा, पुढची कार आपण होंडा सीटी घेऊ….. मग या नवीन कारच्या आनंदाचे काय झाले.. की ही फक्त कामचलाऊ…. मनाचे हे गणित न सुटणारेच….. मला तुझी ही पोस्ट खूप खूप भावली. अगदी दिलसे लिहिलेस. काळजी, हुरहूर… हे न सुटणारेच परंतु किमान तो क्षण तरी भरभरून अनुभवा….. हसा….समाधान मनभर पसरू दे….. 🙂

 20. ऋषिकेश says:

  महेंद्रजी तुमच्या ह्या पोस्ट वाचून पण जो आनंद होतो तो पण कधी कधी अवर्णनीय असतो…
  फार चांगलं वाटते कि जे कधी कधी आपल्या सांगायचे असते तेच वाचताना फार आनंद होतो…
  फार चं लिहिले आहे .. आभार…!! 🙂

  • ऋषिकेश
   आपण लिहिलेलं कोणीतरी वाचतंय, आणि आवडलं की आवर्जुन प्रतिक्रिया देते आहे हे बघितलं की खूप खूप बरं वाटतं..
   हे पोस्ट माझं मला पण खूप आवडतं. मनःपुर्वक आभार!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s