पुरुष जन्मा तुझी कहाणी….

शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा.

सीमाला वाटायचं की    दररोज सकाळी ऑफिसला जातांना आपली किती घाई होते?? राजाभाऊंनी थोडी मदत करावी किचनमधे सकाळी- पण राजाभाऊ मात्र दोन तीन कप चहा सोबत टाइम्स ऑफ इंडीयाचं पारायण केल्याशिवाय जागेवरून हलत नाहीत.

सीमाला वाटायचं, मेलं कधी विचारत पण नाहीत , की का गं? थोडी मदत करू का? भाजी चिरून देऊ का? किंवा कमीत कमी ऍक्वा गार्ड सुरु करुन बाटल्या भरुन फ्रिझ मधे ठेऊ कां? मेलं कश्शा कश्श्याची मदत करत नाहीत.

सीमाच्या नाकाचा शेंडा लाल झालेला दिसत होता. तिचं एक चांगलं लक्षात आलंय राजाभाउंच्या की ही चिडली की हिचे नाक लाल होतं, आणि मग थोड्या वेळात गाल पण लाल होतात, राजाभाउ नवीन लग्न झालं होतं तेंव्हा तिला मुद्दाम चिडवायचे. आणि मग तिची समजूत काढायच्या निमित्याने… … 🙂

पण आज मात्र राजाभाउंचा मूड थोडा बिघडलेलाच होता. आज  मुद्दामच त्यांना सीमाला चिडवायची लहर आली होती.तसं तर आजचा शनिवार, दोघांनाही सुटी.. आता भांडण झालं की दोन दिवस वाईट जाणार- म्हणून शक्यतो शनिवारी भांडणं टाळतात राजाभाऊ –  तरी पण त्यांच्या डोक्यात काल रात्री सीमाने  थोडे (!) दुर्लक्षच केल्यामुळे ्मूड ऊखडलेलाच होता.

संध्याकाळी घरी आल्यावर जेवायला बसल्यावर पानात शेपूची भाजी पाहून चिडले राजाभाऊ.  राजाभाऊंना  शेपू आवडत नाही फारसा – आणि सीमा ला खूप खूप आवडते शेपूची भाजी. काल दुपारी पण ऑफिसात त्यांनी डबा उघडला, तर त्या मधे चक्क दुधीची भाजी!!!मस्त पैकी बटाट्याची मसालेदार भाजी द्यायची आधी डब्यात , हल्ली हे नवीन सुरु केले होते. मटकी, मुग , उसळ वगैरे आणि अशा निरुपद्रवी रामदेव रेकमंडेड भाजा!

ती भाजी पाहिली की राजाभाऊंच्या तोंडातून त्वेषपूर्ण शिव्या बाहेर पडतात  त्या टिव्हीवरच्या रामदेव बाबाच्या नावे. च्यायला, अरे तुला खायचं तर खा ना दुधी,शेपू खा, पालक मेथी.. काय वाटेल तो पाला पाचोळा खा,  पण लोकांना कशाला खायला सांगतोस? काल त्या रामदेवबाबाने  टिव्ही वरच्या एका कार्यक्रमामधे सुदर्शन चक्राप्रमाणे हातावर स्वतःभोवती गोल गोल फिरून  (कोलांटी उडी मारून ) दाखवलं. सीमा ने ते पाहिलं, अन लगेच  दाखवलं आणि बोटाने – तर्जनीने राजाभाऊंच्या पोटावर हलकेच दाब दिला.. आणि   राजाभाऊंच्या वाढलेल्या पोटाकडे पहात म्हणाली अरे थोडं कमी कर रे…

राजाभाऊंच्या लगेच सीमाला म्हणाले, त्या बाबाला म्हणावं की , आधी सकाळी उठुन ८-३५च्या लोकलमधे   आत तरी शिरून दाखव म्हणाव.. आणि दिवसभर ऑफिसमधे किंवा साईटवर काम केल्यावर मग रात्री ८ -९ च्या दरम्यान लोकलमधे लटकत घरी आल्यावर मग अशी आसनं करुन दाखवले तर मानलं तुला. च्यायला, आमचं काय तुझ्या सारखं आहे का? आमच्या सारखी कामं करुन दाखव आणि मग ते पोट आतबाहेर करुन दाखवलं – (खपाटीला गेल्यासारखं )  एक वर्षानंतर तर तू म्हणशील  ते मी करायला तयार आहे .

तरी बरं, राजाभाऊंनी नुकतीच एक एल आय सी ची पॉलिसी  घेतली २५ लाखाची, त्यामधे त्यांचे पुर्ण मेडिकल चेकप झालं होतं. सगळं काही ठीक निघालं, कोलेस्ट्रॉल, बिपी, शुगर… काही नाही निघालं! तरी पण खाण्यावर बंधनं… च्यायला काय आयुष्य आहे आपलं??राजाभाऊ वैतागलेलेच होते.

लग्न झाल्यावर  सुरुवातीचे मंतरलेले दिवस असतात असे दिवस की  त्या दिवसात दोघांच्या शिवाय तिसरं  कोणीच नको असतं घरामधे. पण लवकरच  रुसवे फुगवे सुरु होतात. नॉर्मली सुरुवातीची

भांडणं किस ऍंड मेक अप  अशा प्रकारची असतात – दिवसा झालेली भांडणं सुर्यास्ता पर्यंत किंवा फार तर गादीवर पडे पर्यंत संपुन जातात.

पण आता लग्नाला इतकी वर्ष झाली , आता जरी भांडण  मिटले तरीही सीमाला मात्र आपण काहीतरी मिस करतोय असं वाटत असतं, राजाभाऊ  आपलं ऐकत नाहीत, ते असं कसं काय वागू शकतात  माझ्याशी? छेः.. लग्नापूर्वी असा नव्हता हा, प्रत्येक वाक्य हे ब्रम्हाज्ञा समजून वागायचा. काहीही म्हट्ल तरी वाक्य पुर्ण व्हायच्या आत सगळं कामं करुन टाकायचा, रंगात आला की सगळे पुस्तकी डायलॉग पण बोलून दाखवायचा, चंद्र आणून देईन,तारे तोडीन वगैरे वगैरे… पण आजकाल ?? हं……..लांबलचक सुस्कारा सोडला सीमाने.गेले ते  दिवस!!

सीमा आणि राजाभाूंचं लव्ह मॅरेज. दोघांचंही जितकं वय असेल तितकीच वर्ष त्यांची ओळख! सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण हल्ली एकदम राजाभाऊंचं वागणं बदललंय असं सीमाला वाटत होतं. आता हेच पहा नां, पुर्वी लग्न झालं की राजाभाऊ अगदी न कुरकुर करता ऑफिसातून आल्यावर तिच्या मैत्रीणीकडे जायचे तिला घेउन. कधी सीमाच्या माहेरी पण- तिच्या भावाशी पटत नसलं फारसं तरीही..

सीमाच्या भावांना तसाही राजाभाऊंच्या बद्दल रागंच होता मनात, आपली सुस्वरुप बहिण ह्या सर्वसाधारण दिसणाऱ्याने गटवली म्हणून. भावांचीही अजिबात इच्छा नव्हती सीमाने राजाभाउंसोबत लग्न करावं म्हणून. पण इश्वरेच्छा बलियसी.. सीमाच्या बरोबर राजाभाऊ अगदी रडूबाई टीव्ही सिरियल्स पण आवडीने बघायचे, तसेच नाटकं वगैरे बघायला पण जायचे. राजाभाऊंना गाणं ऐकायची आवड  आहे, पण केवळ सिडीवर – लाइव्ह प्रोग्राम नाही, तरीपण राजाभाऊ सीमासोबत नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स पहायला जायचे.अशा हज्जारो गोष्टी होत्या , की ज्या राजाभाऊ अगदी न कुरकुर करता करायचे सीमा बरोबर. हल्ली एकदम सगळं बदललंय ! वरची एकही गोष्ट करायला तयार नसतात.

“अहो… चला नां , जरा दादा कडे जाउन येऊ का आपण?”  म्हंटलं तर लगेच नाकपुड्या फेंदारून नाकावरचा चष्मा खाली करुन असे पहातात , की त्यांना कुठून विचारलं असं होतं सीमाला. त्यांना काहीही म्हंटलं तरी अगदी अश्शीच रिऍक्शन देतात हल्ली.

“अहो.. सकाळी उठून फिरायला जा, थोडं चक्कर मारुन या एक तास भर, तेवढीच शरीराची हालचाल होते.. “पण राजाभाऊ मात्र कायम कंटाळाच करतात. तेच पुर्वी लग्न झालं होतं,तेंव्हा कसे रोज सकाळी सीमाबरोबर ते बाहेर चक्कर टाकायला जायचे- हे सगळं आठवलं आणि सीमाचे डॊळे भरून आले. काय चुकतं आपलं? परातीमधे कणीक घेतली सिमाने भिजवायला. हात कणकीने भरलेले होते, म्हणून गाउनच्या बाहिला डोळे पुसले आणि नुसती उदासपणे कणीक भिजवू लागली.

सीमाच्या मनात विचारचक्र सुरु होतं, मी त्यांना दुधी, शेपु का देते खायला? फॅट फ्री बटर  वगैरे का घ्या म्हणते? अहो , तुमचं वजन जास्त आहे, जरी कुठलाच आजार नसला, तरीही वजन कमी करायलाच हवं – नाही का? तर म्हणतात मी फॅट फ्री का खाउ? माझं कोलेस्ट्रॉल म्हणे १५८ आहे फक्त!! आता कोलेस्ट्रॉल कमी आहे म्हणून काय उगाच बटर खायचं?? ऐकतंच नाहीत हल्ली, अगदी लहान मुलासारखं करतात! आणि स्मित हास्य उमटलं सीमाच्या चेहेऱ्यावर.

राजाभाऊ आणि सीमाचा तसा प्रेम विवाह , राजाभाऊंच्या लग्नाच्या पत्रीका पण त्यांना स्वतःलाच वाटायला लागल्या होत्या. अशी परिस्थिती होती. असो, राजाभाऊंची सीमा बद्दल अजिबात काही तक्रार नव्हती. दोघांचंही  एकमेकांवर खूप खूप प्रेम होतं. तुझं माझं जमेना, आणि तुझ्या विना करमेना अशी स्थिती झालीय आता- सीमाला जाणवलं.

तसंही राजाभाऊ कामानिमित्त कायम बाहेर जातच असतात. त्यामूळे असेल कदाचित, अजूनही लग्नातलं नाविण्य टिकून होतं इतक्या वर्षानंतर पण.. सीमाला एक वाटलं, की सगळं काही चांगलं आहे, फक्त ह्या काही गोष्टी जर राजाभाऊंनी आपल्या मनासारख्या केल्या तर कित्ती मज्जा येईल नाही??

लग्नानंतरचे पहिल्या दोन तिन वर्षातले दिवस पुन्हा उपभोगता येतील! सीमाला ती जाणीवच खूप सुखावून गेली. त्याच आनंदाच्या भरात सीमाने राजाभाऊंसाठी चहाचा कप तयार केला आणि त्यांच्या समोर आणून ठेवला- काहीच न बोलता! राजाभाऊंनी निर्विकारपणे कप घेतला आणि चहाचे घोट घेत ते कुठला तरी ब्लॉग वाचू लागले.

************************************
दुपारची वेळ होती. राजाभाऊ जेवण वगैरे आटोपून शांतपणे झोपले होते. आज जरा मूड बरा होता.  राजाभाऊंच्या आवडीची मसाल्याची वांगी, भाकरी, लसूण ठेचा, मुद्दाम विरजवलेले दही , फॅट फ्री बटर, ताक आणि मसाले भात असा मेनु होता आज. त्यांच्या घोरण्याचा संथ लयबद्ध आवाज येत होता. श्वासागणीक पोट खालीवर होत होतं.. तिकडे दुर्लक्ष केलं आणि सीमाच्या मनात त्यांच्याबद्दलचा सगळा राग जाउन एकदम प्रेम दाटून आलं. पुन्हा डोळे पाणावले सीमाचे. कसा छान दिसतो हा झोपलेला असला की?? 🙂

सीमा समोरच्या खोलीत जाउन बसली. जेवण झालं होतं. आता टिव्हीवर एखादी सासु सुनेची मालिका लावून बसणार, तेवढ्यात लिओ  म्हणजे त्यांचा पाळलेला अल्सेशिअन कुत्रा  समोरून   निघून जायला लागला.त्याला बोलावले तर निरीच्छेनेच तो आला जवळ- मेला अजिबात जवळ येत नाही. सरळ पळून जातो  मुलींच्या खोलीत  खेळायला.

निरीच्छेनेच का होईना पण तो जवळ आला म्हंटल्यावर  नकळत त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे सुरु केले.. आणि तो एकदम शांतपणे खाली बसला सीमाच्या जवळ. सीमाला आश्चर्य वाटले , आता याला पळायचं होतं, पण कसा बसलाय पहा आता अगदी आज्ञाधारकपणे.. सीमाने त्याच्या आयाळीवरून, गळ्याभोवती हात फिरवणे सुरु केले, तर तो एकदम पालथाच पडला आणि त्याने पोट वर केले. त्याला पोटावरून हात फिरवलेला खूप आवडतो हे सीमाला चांगलेच माहिती होते. हळू हळू त्याच्या पोटावरून, मानेवरून -हात फिरवणे सुरु केले. जवळपास तास झाला तरीही लिओ जवळच बसलेला होता. सीमाला आश्चर्य वाटलं, नेहेमी फारतर दोन तिन  मिनिटे जवळ बसणारा आज इतका वेळ बसला होता?? ते ही खरंच म्हणा, तिच्या लक्षात आलं की आपणही काही फारसं लक्ष देत नाही किंवा   खेळत बसत नाही लिऒशी!

सीमाला आठवलं, की संध्याकाळी कधी सोबत फिरायला गेला की त्याची चेन हातात धरल्यावर तो नेहेमी समोर चालतो- जणू काही तोच आपल्याला फिरायला नेतो आहे अशी ऐट असते त्याची. आपण त्याच्याच इच्छे प्रमाणे वागतोय असे दाखवून त्याला आपल्याला जायचंय त्या दिशेला बरोबर नेतो – पण त्याला वाटत असतं की आपण त्याच्याच इच्छे प्रमाणे चालतोय ..

बस्स!!!! सीमाची ट्य़ुब पेटली.. आणि तिला एकदम सुखी संसाराचा मंत्र सापडला! बस्स!! अस्संच करायचं आता! सीमाने ठरवले.बघु या काय होतं ते. जसं आपण लिओला वागवतो ना, फिरायला नेतांना – तसंच राजाभाउंना पण ट्रिट करायचं- प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छे प्रमाणे करतोय असं दाखवायचं आणि करायचं आपल्या मनाचंच. बस्स!! ठरलं तर!!

**********************************
संध्याकाळ झाली होती. राजाभाऊंची चुळबुळ सुरु झाली होती. झोप झाली होती, तरीपण राजाभाऊ उगाच लोळत पडले होते पलंगावर. सीमाने चहाचा कप समोर केला. सोबतच त्यांना आवडणारी  चॉकलेट क्रिम बिस्किट्स बॉर्न बॉर्न  आणि मोनॅको पण ठेवली होती प्लेट मधे. राजाभाउंनी आश्चर्याने पाहिले, च्यायला, मारीच्या सोबत ही चॉकलेट बिस्किट्स कशी  आज म्हणून?? सीमाने स्वतः पण आपली कॉफी घेतली होती. कप होता हातात, आणि सीमाने पण एक मारी उचलले, राजाभाउंनी पण एक मारी अन दोन मोनॅको बिस्किट्स संपवले. समोरच्या चॉकलेट क्रिम बिस्किटला हात पण लावला नाही.

छेः..राजाभाउंच्या मनात विचार आला,  आता सीमाने आपणहून आणून दिल्यावर खाण्यात कसली मजा आहे? ती नाही म्हणेल, वैतागेल, तर मग खायला मजा येते. तसंही आपल्याला ती क्रिम बिस्किट्स आवडत नाहीत, फक्त देत नाही म्हणून मुद्दाम करतो आपण!!सीमा मात्र मनातल्या मनात हसत होती.

संध्याकाळी सीमाला कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. आज पोळ्याबाई येणार नव्हत्या, सीमाला पुर्ण खात्री होती की जर राजाभाऊंना जेवायला जाऊ या बाहेर म्ह्ट्ल तर ते म्हणतील की  नको- घरीच जेउ.. काय करायच??

सीमाने त्यांच्याकडे बघितले, मुली कुठे आहेत घरामधे याचा कानोसा घेतला, आणि राजाभाउंच्या केसातून हात फिरवू लागली. राजाभाऊंचं लॅपटॉप वरचं लक्षं उडालं होतं आता पर्यंत. तरी पण ते बळेच काहीतरी वाचायचा प्रयत्न करीत होते. शेवटी सीमाचा हात केसातुन फिरणारा, मानेवर , मग कानाच्या पाळ्यांशी हलकेच चाळॆ करणारा.. दुर्लक्ष करणं सोपं नव्हतं. विश्वामित्राची पण वाट लागली होते मेनके मुळे.राजाभाऊ म्हणजे  काय साधा मानव प्राणी.

सीमा हळूच म्हणाली, अहो.. आपण आज संध्याकाळी बाहेर जाउ या का जेवायला?? आणि राजाभाऊंची प्रतिक्रिया येण्यापूर्वीच म्हणाली, ’ नको, जाउ द्या, घरीच करते काहीतरी , गेले चार दिवस तुम्ही पण ट्रुरलाच होता ना, मी काय मुलींची इच्छा होती काल  बाहेर जायची म्हणून म्हंटलं” ! हात सावकाश पणे मानेवरून खाली पाठीवरून फिरत होते..

सीमाने असे बोलल्यावर राजाभाऊ   लगेच म्हणाले, ’नाही गं.. असू दे  कशाला करतेस घरी, आपण जाऊ या नां बाहेर कुठेतरी!!तू थकली असशील ना.. सकाळपासून तुला काम करतांना बघतोय मी!’ आपण बाहेरच जाऊ मुलींची पण इच्छा आहेच ना जायची, चल तर मग लवकर तयार हो.. आणि तुझ्या आवडत्या हॉटेल मधे. सीमा खूष झाली.. युक्ती कामी आली म्हणून.

एकदा ही युक्ती लक्षात आल्यावर मग सीमाचं काय सगळंच काम एकदम सोपं झालं होतं. राजाभाऊंच्या कडून कुठलंही काम करुन घ्यायचं असेल तरीही ते कसं करुन घ्यायचं या मधे ती निष्णात झाली.

जसे , एखाद्या दिवशी माहेरी जायची वेळ आली, आणि सीमा म्हणा्ली, “अहो, आपण जायचं का आज दादा कडे ?” (हा प्रश्न विचारला की जुन्या राजाभाउंनी सरळ नको.. त्यापेक्षा तुला सोडतो तिकडे आणि मी मित्राकडे जाउन येतो.. असं म्हंटलं असतं )

पण आज नवीन स्ट्रॅटेजी प्रमाणे -आणि राजाभाऊ काही बोलण्यापूर्वी सीमा म्हणाली “नको, जाउ दे, तुम्हाला तिकडे बोअर होतं- त्यापेक्षा आपण मार्केटलाच फिरून येऊ, मग येतांना तुम्ही मला तिकडे सोडून या – येतांना मी परत येईन रिक्षाने!!”

राजाभाऊ शेवटी पुरुष , बायकोने माघार घेतली की त्यांचा भांडणातला रस संपून जायचा एकदम. जो पर्यंत बायको भांडतना उलट उत्तरं देते तो पर्यंत अहम अहमीकेने भांडायला मजा येते – नाहीतर अजिबात नाही!!

सीमाला पण सुखी संसाराचा मंत्र सापडला, तिच्यातला हा बदल सुखावह होताच, आणि राजाभाउंना पण ही गोष्ट समजली नाही असं नाही, पण राजाभाऊंनी पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपले लाड कौतुक करुन घेणं- एंजॉय करणं सुरु ठेवलं- आता मस्त पैकी सीमा वेळ बघुन राजाभाउंच्या केसातून हात फिरवत बसते, पाठीवर पावडर लाऊन देते, कंटाळा न येऊ देता  भरपूर वेळ पाठीवरून  मस्त नायसिल लाउन हात फिरवत रहाते, आणि आपल्याला गोंजारून घेणे वगैरे अगदी व्यवस्थित चाललंय राजाभाऊंचे, आणि सीमा्ला पण आपल्याला राजाभाऊंकडुन जसं हवं तसं करवून घेणं मस्त जमलय.. दोघांचं ही सहजीवन मस्त चाललंय..

जशी सीमाला राजाभाूंना हाताळण्याची युक्ती सापडली, तशीच तुम्हाला पण लवकरच सापडो हीच सदिच्छा व्यक्त करुन ही साठा उत्तरीची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण!!

दोन तिन भागात न प्रसिध्द करता एकाच पोस्ट मधे सगळी कथा पोस्ट करतोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , . Bookmark the permalink.

50 Responses to पुरुष जन्मा तुझी कहाणी….

 1. Manmaujee says:

  काका…ही तुमची कहाणी आहे काय???

  मस्त…मस्त…भन्नाट लिहलय.

  • हा हा हा.. अरे काय विचारतोस?? 🙂
   माझीच काय , सगळ्याच पुरुषांची आहे ही कहाणी.. 😀

 2. ngadre says:

  great ahe story..kharech sarvach purushanchi..khoop bare vatale.sarvanchech ase asate he baghoon.

  Pan Rajabhau he kasale naav kadhlet ho junya 70’s chya kadambarisarkhe?

  • काहीतरी नांव लिहायचं म्हणुन लिहिलंय झालं. आधी बिना नावाने लिहिली होतं, पण थोडं वेगळंच वाटत होतं, म्हणुन हे नांव टाकलंय , टिपिकल मध्यमवर्गीय मध्यमवयीन मध्यममार्गी पुरुषाचे.
   पुर्वी असंच असायचं. लग्न झालं की , राजू चा राजाभाऊ व्हायचा, आणि बाळ चा बाळासाहेब!! 🙂

 3. thanthanpal says:

  ही काकांचीच नाही तर तुमची आमची सर्वांचीच कहाणी आहे. थोडक्यात सांगायचे तर
  एक प्यार का नगमा है ! मौजोन की रवानी है – जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है I
  कुछ पाकर खोना है , कुछ खोकर पाना है !!
  जीवन का मतलब तो आना और जाना है! दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है !!
  तू धार है नदिया की , मैं तेरा किनारा हूँ !तू मेरा सहारा है , मैं तेरा सहारा हूँ !!……….

  • वाह!! क्या बात है!!
   🙂
   नेहेमीच स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, नयनी अमृत हृदयी पाणी हे ऐकतच असतो,
   सलिलने दमलेलेल्या बापाची गोष्ट लिहिल्यावर मग हे ’पुरुष जन्मा ही तुझी कहाणी ’ लिहावंसं वाटलं.

 4. सचिन says:

  काका, नेहमीप्रमाणे हा हि लेख एकदम झकास.
  तुमच्या या अशा अनुभवी लेखांमुळे आमच्या सारख्याच जीवन अगदी सुसह्य होणार आहे.
  मैदानात पाय ठेवायच्या आधीच आम्ही शत्रू पक्षाला कशी मात द्यायची याची शिकवण आम्हाला आपल्या लेखामधून मिळते आहे.

  आभार.

 5. एकदम सही!! आपल्याच घरची कहाणी आहे असं वाटलं! वाचून झाल्यावर आपल्या गळ्यात पट्टा नाहीना ह्याची खात्री करून घेतली एकदा. 🙂

  • निरंजन
   असतोच तो,
   प्रत्येकाच्याच गळ्यात असतो तो पट्टा ,
   फक्त अदृष्य़ असतो ..

 6. bharati says:

  खुपच छान लिहिले आहे महेंद्र्जी,कुत्र्याचा पट्टा संकल्पना आवडली,जरा स्पष्ट लिहिते..SORRY..अगदी सगळे नवरे नाहीत ..तरी बरेचसे (पाहण्यात येतात)कोणत्या ना कोणत्या वाईट मार्गाकडे ओढले जात असतात किव्हा तो वाईट मार्ग पत्कर्ताना त्याना मोठा पुरुशार्त वाटत असतो.त्याला आपण गटारच संबोधले तर कुत्रा कितीचांगल्या जातीचा असो किव्हा त्याला किती जीव लावा, चांगले खायला द्या, पट्टा हातात ठेवावा लागतोच!! नाहीतर तो गटरकडेच जात असतो…नवरा किती चांगला प्रामाणिक असला तरी तो नवराच असतो….पट्टा हातात ठेवणारीजास्तआनंदीदिसते.(हेसरसकट सगल्यांना नाही बरे का बहुतकरुन पुरूषजातीसाठी म्हणते राग नसावा.)

  • भारती
   सगळ्याच स्त्रियांना ही युक्ती लग्नझाल्याबरोबर सापडते असे नाही.
   काही स्त्रियांना अगदी लग्न झाल्या झाल्या ही युक्ती लक्षात येते, तर काही स्त्रियांना बरीच वर्ष जावी लागतात.
   ज्यांना लक्षात येत नाही, त्या उगिच भांडणं करीत दिवस काढतात आणि कुंठत असतात.

   जर एखाद्या स्त्रीला ही युक्ती लवकर लक्षात आली नाही, तर मात्र तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं..

   • Bharati says:

    कथेतल्या पुरुषाचे बायकोवर प्रेम आहे.त्याच्यात अहंकार आहे.हे तिला समजले आहे.अहंकार दूर करता येतो.पण प्रेमाचे काय?
    आपल्या देशात अश्या कितीतरी बायका कुढत जगत् आहेत मुलाबालांसाठी! त्यांच्या गुणाची सोडा रुपाची पण किमत शून्य आहे.
    कारण आपली पुरूष प्रधानसंस्कृती रचणारा पुरुषच असणार म्हणून त्याने सगळे कायदे पुरुषांच्या हिताचे बनवले आहेत.
    तुमच्या कथेतून संसार कसा असावा हे उत्तम उदाहरण आहे.तुम्ही काही पुरुषांना बदलायला निघालेले नाही पण तुमची कथा,विचार वाचून पुरूष बदलतील अशी आशा करायला हरकत नाही.

    • भारती
     धन्यवाद.. मी खरंतर एक विनोदी म्हणुन लिहायचा प्रयत्न केला होता. इतकं गहन पोस्ट होईल असं मलाही वाटलं नव्हतं.. 🙂

     • Bharati says:

      गहन विषय विनोदातून मांडणे म्हणजेच शाल जोडीतली मारणे.तर हेतू साध्य ! खूप छान लिहिता असेच लिहीत रहा…

 7. Pushpraj says:

  काका, खूपच छान…….लेख अगदी व. पुं. च्या स्टाइल मधला म्हणता येईल….

  • पुष्पराज
   धन्यवाद. वपूंच्या लेखात खूप उच्च दर्जाचं मराठी आणि उपमा अलंकार वापरलेले असायचं- आपल्याला कुठे जमतं तस- असो, पण तु वपूंच्या लेखनाशी तुलना केली ह्यात मी माझा गौरव समजतो.

   • Pushpraj says:

    खर सांगू काका….मी कालच व. पुं. च “नवरा म्हणावा आपला” हे पुस्तक वाचल…….पती पत्नी मधील रूसवे फूगवे…आनंद…दुख….एकमेकामधे असलेला समजूतदार पणा… अशा खूपशा गोष्टी एवढ्या सहजतेने आणि मजेदारपणे मांडल्या होत्या की एकदा वाचायला सुरूवात केली की सर्वकाही विसरून जावे…आणि तुम्ही सुद्धा अगदी त्याच थीम मधला लेख आज लिहिलाय….. बाकी ह्या बाबा लोकांबद्दलच्या मताशी १००% सहमत…

    • ब्लॉगिंग सुरु केल्यापासून इतर काही वाचनाला वेळच मिळत नाही. फक्त काहीब्लॉग वाचले जातात हल्ली.
     ह्या बाबा लोकांनी फार त्रास दिलाय ऑर्डीनरी माणसांना आपल्यासारख्या! 🙂

 8. आणि ते सुखाने नांदू…..लागऽऽऽऽऽले.
  पुलंच्या चितळे मास्तरांच्या गोश्ष्टीतल्या सारखा शेवट.
  काय मग राजाभाऊ…सीमावहिनींनी वाचली की नाही ही गोष्ट? 😉

  • अहो ’प्रत्येकच’ सीमा वहिनिंनी वाचायला हवा हा लेख.. म्हणजे जर ही युक्ती माहित नसेल तर माहित होईल . 🙂

 9. bhaanasa says:

  घाबरत घाबरतच लिहितेय अभिप्राय…. 🙂 ( नाहीतर सगळे मिळून हल्ला चढवाल… हीही…. ) महेंद्र, ब~याच चतुर – धोरणी बायका हा मंत्र आयुष्यभर वापरत असतीलच आणि कालांतराने त्यांच्या नव~यांनाही बरोबर कळत असेल. यातच मजा आहे. दोघेही खूश. इतक्या पण बायका छ्ळवादी नसतात हं का…… शेपू, दुधीभोपळा किती छान लागतात…… 😀 ( नचिकेत शेपू घरात पण आणू देत नाही….. एक तर मी घरात नाहीतर शेपू घरात…… एकदम हा पवित्रा….. हा हा…. ) बाकी खाण्याचे तंत्र सारखे बदलत राहते हे खरंच…. 😀 ….. मस्त झालीये रे कथा…. हलकीफुलकी…. आवडली.

  • तुझं म्हणणं अगदी खरं आहे. नवऱ्यांना पण समजत असतं, की ह्या वागण्यामागची भुमिका काय आहे ते.. पण तरिही तो एंजॉय करीत असतोच .
   शेपू दुधी वगैरे पेक्षा बटाटे रस्सा, वांगी मसाला, किंवा तत्सम भाजा जास्त चांगल्या लागतात – या दुधी वगैरे आजारी पडलं की खायच्या भाज्या आहेत असे माझे मत आहे !!:) नचिकेतचा स्टॅंड आवडला, आता वापरुन बघायला हरकत नाही .. 🙂

 10. जय हो राजाभाऊ आणि सीमावहिनींची !! 🙂 … झक्कास युक्ती कळली.. !!

  बाकी शेपू, दुधी या भाज्या पिकवल्याच नाहीत तर काय मज्जा येईल असा विचार नेहमी येतो माझ्या मनात 😉

  • हेरंब
   मला पण तसंच वाटतं. या भाज्यांच्या उदात्तीकरणासाठी रामदेव बाबा कारणीभुत आहे. 🙂
   या भाज्यांचे गुणगान इतके जास्त करतो तो की बायकांची मानसिक स्थिती पार वाट लागते..

 11. vidyadhar says:

  काका,
  भन्नाट झालीय गोष्ट. एकत्र पोस्ट केल्याने निषेधही नाही. मस्तच.

  • विद्याधर
   मला वाटलं होतं की फार मोठं पोस्ट होतंय आणि त्यामुळे वाचायला कंटाळवाणं होईल. तरी पण पोस्ट केलंय एकत्र.

 12. महेश says:

  भन्नाट आयडिया आहे.,घर घर कि कहाणी, गरीब बिच्च्चारे पुरुष ,

 13. एकंदरीत राजाभाऊ आणि सीमावहिनी यांचे ट्युनिंग पुन्हा पहिल्यासारखे जमले ते बरे झाले. पण सगळे राजाभाऊ मुळातच लबाड असल्यामुळे ते काही दिवसांनी सीमावहिनींच्या या युक्तीला जुमेनासे होतील आणि सगळ्या सीमावहिनींना नविन क्लृप्ती शोधावी लागेल असे वाटते. 🙂

  • ही युक्ती वर्षानुवर्ष चालू शकते. हीच तर खरी गम्मत आहे. सगळं माहिती असलं, तरीही..
   आणि हीच तर खरी गम्मत असते.. सचिनला दिलेला रिप्लाय पुन्हा खाली पोस्ट करतोय…

   “अरे इथे मात द्यायची नसते, त्यांच्याच शस्त्राचा उपयोग करुन घ्यायचा आणि हरल्यासारखं दाखवायचं.. बस्स!!! त्यातच तुमची जीत असते 🙂 ” विन विन सिच्युएशन”

 14. खुपंच मस्त आहे… क्रमशः न पोस्ट करता पुर्ण एकदाच पोस्ट केल्यामुळे अजुनच आवडले..
  मुलमंत्र खुपंच उपयोगी.

  • आनंद
   मला वाटल होतं की कदाचित खूप मोठा होतोय लेख.. पण ठिक आहे..
   आपणही तीच स्ट्रॅटेजी वापरायची.

 15. Aparna says:

  आत्ताच राजाभाऊ आणि सीमावहिनी दोघांनाही भेटल्यामुळे मी ही कथा म्हणून वाचली नाही..पण पुढे मागे वापरायचा एक मंत्र मिळाला इतकं मात्र खरं….(समझदार को इशारा…:))

 16. ऋषिकेश says:

  महेंद्र सर,
  अप्रतिम कथा… फार सुंदर लिहिले आहे.
  आणि हो Thanks for the clue!! 😉

  • ऋषिकेश
   दिलसे लिहिलंय… जे काही मनात आलं, ते लिहित गेलोय.. 🙂 क्लू खरंच कामाचा आहे, विन विन सिच्युएशन क्रियेट करतो हा क्लु.

 17. Vishal kamble says:

  khup chan story aahe…. ek dum real

 18. Vaibhavi says:

  kharach khup chan goshta sangitaleli aahe.

 19. Vaibhavi says:

  kharach khup chan goshta sangitaleli aahe.

 20. kaka………………………………………………………………………………..
  khup chan ahi hi

 21. “भुंग्या” मुळे हा लेख वाचण्यात आला..
  फारच सुंदर..!
  “सार्‍या पुरूषांच्या कहाणीचा अर्क आहे हा..”
  भुंगा आणि लेखक महेंद्र कुलकर्णी यांचे आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s