चिल्लर..


घरुन निघतांना सुटे पैसे हवेच असतात . रिक्षा, बस मधे कंडक्टर नेहेमी पुरुषांना खूप त्रास देतात सुटे पैसे नसले की. पुरुषांना हा शब्द विचारपुर्वक वापरलेला आहे. एखाद्या सुंदरीने दहाची नोट दिली, तर अजिबात कपाळावर आठ्या न आणता तिकिट देऊन सुटे पैसे परत देणारा कंडक्टर, तुम्ही दहाची नोट पुढे केली की चिरक्या आवाजात तुमची इज्जत काढून ठेवायला कमी करत नाही “इतके शिकले सवरलेला मानसं तुमी- अन राव सुटे पैसे आनत नाय !!” कंडक्टरच्या नोकरी मधे असा कुणाचाही अपमान करण्याचा परवाना त्याला दिलेला आहे , आणि स्पेशल ट्रेनिंग दिलं जात असावं का? हा प्रश्न नेहेमीच पडतो मला

एकदा कंडक्टर समोर दहाची नोट दिली, तर म्हणाला की ’साहेब सुटे द्या’,
म्हंटलं ’नाही माझ्या कडे ’
तर म्हणाला पुढल्या स्टॉप वर उतरुन घ्या !! (उतरुन “घ्या” काय ’घ्यायचं”?? हा खास कंडक्टरी शब्दकोशातील शब्द आहे).
मला पण थोडी घाई होतीच. ’म्हंटलं, कंडक्टर सरळ तिकिट द्या नाहीतर….’
तो म्हणतो नाहीतर काय?? एकदम भांडायच्या पावित्र्यात आला तो..नाय दिलं तर काय करणार तुम्ही?
म्हंटलं की मी काही करणार नाही, ’पण असे पैसे असतांना पण लोकांना सुटे पैसे दिले नाहीत, तिकिटं दिली नाहीत, की माणुस पुढल्या जन्मी पण कंडक्टर ‘च’ होतो बरं का…..” आणि त्याने माझ्याकडे न पहाता तिकिट दिले, आणि सुटे पैसे पण परत केले.

काल सहज घरुन निघतांना चिल्लर पैशांच्या डब्यात हात घातला आणि पैसे बाहेर काढले तर सगळे चार आण्याची नाणी बाहेर निघाली. अगदी वेचून वेगळे केल्याप्रमाणे सगळे चार आण्याची नाणी होती फक्त सगळी . प्रवास करतांना कंडक्टरने तीन रुपये सुटे द्या म्हणून पैसे मागितले, जवळ सगळ्यात लहान नोट फक्त दहाची नोट दहा रुपयांची ! शेवटी लॅपटॉपच्या बॅगेतून सगळे चार आणे झाडून गोळा करुन त्याला दिले, तर तो “काय साहेब? बसच्या प्रवासा करता बरेच दिवसा पासून सेव्हिंग करताय वाटतं!!  किंवा आयुष्यभर केलेले सेव्हिंग एकाच प्रवासात खर्च करताय की काय?  असा प्रश्न विचारेल का? ही शंका मला नेहेमीच असते.   आणि म्हणून हे सगळे चार आणे मी नेहेमीच घरच्या चिल्लर पैशांच्या डब्यात टाकतो.

आमच्या घरी एक नोटा इकडे तिकडे पडलेल्या असल्या तर त्याला शक्यतो कुणी हात लावत नाही. पण एक, दोन, पाच रुपयांची नाणी दिसली की सरळ बायको किंवा मुलगी स्वतःच्या पर्समधे टाकतात. रिक्षा, बस सगळ्याच ठिकाणी सुटे पैसे लागतात . चार आण्याची नाणी मात्र वर्षानुवर्ष जमा होत आहेत आमच्या घरी- त्यांना मात्र कोणी हात लावत नाहीत. भाजीवाला पण सरळ नकार देतो ही नाणी घ्यायला.

हल्ली चार आण्याच्या नाण्यांना काहीच किम्मत राहिलेली नाही. मुंबईला तर ही नाणी कुठलाच दुकानदार घेत नाही. कशाला एखाद्या वेळेस भिकाऱ्याला आपण ते नाणं दिलं तर ते तो घेईल की नाही याची पण शंकाच येते. चार आणे हे फक्त देवाच्या पेटीत टाकायला उपयोगी पडतात – तो देव मात्र बिच्चारा अजिबात काही कुरकुरही न करता ज्या निर्विकारपणे हजाराची नोट घेतो त्याच निर्विकार पणे चार आणे पण ठेऊन घेतो. लोकं जे भिकारी पण घेत नाही ते देवाला टाकतात!! 🙂

मी लहान असतांना तांब्याचा एक पैसा पण चलनात होता. तसेच दोन , तीन , पाच पैसे पण होते. आजची जी चार आण्याची स्थिती आहे ती एक , दोन ,तीन, पैशाची होती, पण पाच पैशाला मात्र किंमत होती- कोथिंबीर,मिरची,वगैरे मिळायचं . तीन पैशाचे नाणे षट्कोनी असायचे, एक पैशाचं आणि पाच पैशाचं चौकोनी तर दोन पैशाचे फुलाच्या आकाराचे. आजकाल सगळी नाणी ही गोल आकाराचीच असतात.

नंतरच्या काळात तांब्याच्या ऐवजी ऍल्युमिनिअमची नाणी पण निघाली होती एक पैशाची!! असं म्हणतात की त्या तीन पैशाच्या , आणि तांब्याच्या एक पैशाची किंमत ही फेस व्हॅल्यु पेक्षा खूप जास्त होती म्हणून काही लोकं ती नाणी वितळवून स्क्रॅप म्हणून विकायचे ,आणि कालांतराने ही नाणी नामशेष झालीत. याच नाण्यांप्रमाणे एक रुपयांचं चांदीच नाणं पण लवकरच नाहीसं झालं. मला अजूनही आठवतं, त्या एक रुपया मधल्या चांदीची किंमत ही आठ रुपये होती.ते पण नाणं हल्ली दिसत नाही कुठेच.

कोणाला पितळेचे कमळाचे चित्र असलेले वीस पैशाचे नाणे आठवते का? त्याची पण अशीच वासलात लावली आपल्या लोकांनी. बरेच लोकं तर या वीस पैशांच्या नाण्याच्या अंगठ्या करुन घ्यायचे. ( का? हे मला कधीच समजलं नाही)मी शाळेत असतांना घरुन जेंव्हा कधी पैसे चोरुन घेउन जायचो ( आमच्या लहानपणी मुलांना पैसे देणे वगैरे काही प्रकार नव्हते- तेंव्हा पैसे कधी हातात आले तर ते असेच घरातून चोरुन – शब्द फार खराब वाटत असेल तर उचलून हा वाचावा चोरुन ऐवजी) तेंव्हा दहा पैशात मस्त चैन व्हायची. पाच पैशाचे खारे दाणे आणि उरलेल्या पाच पैशाचं संत्र्याच्या चवीचं आइसफ्रूट!! आहाहा…. काय चव असायची!!

हल्ली मला थोडं कमी दिसतं जवळचं. ( वयाचा परिणाम आहे झालं) जवळचा चष्मा चांगला जाड भिंगाचा आहे-दूरचं बघायला चष्मा लागत नाही, त्यामूळे नेहेमी लावत नाही. आजकाल पैसे देतांना माझी खूप तारांबळ उडते.

चष्मा लावलेला नसला की एक रुपया आणि दोन रुपये हे अगदी सारखेच दिसतात. चुकून एक रुपयाच्या ऐवजी दोन रुपये दिले का आपण ही शंका नेहेमीच भेडसावत असते. पाच रुपयाचं नाणं पण अगदी पन्नास पैशाच्या सारखंच दिसतं. खिशात जर एखादं असेल तर मी ते अगदी सोन्याची मोहोर असल्या प्रमाणे जपून पाकीटात एका खास कप्प्यात वेगळं ठेवतो. एखाद्या वेळेस एखादं पाच रुपयांचं नाणं आठ आणे म्हणून दिल्या गेलं की खूप वाईट वाटतं. चिल्लर पैशाच्या बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे 🙂

काही वर्षापूर्वी नाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती. तेंव्हा दुकानदार आपल्या नेहेमीच्या ग्राहकांना स्वतःचे कूपन द्यायचे, जे पुढल्यावेळी परत दिले की पैसे म्हणून कन्सिडर व्हायचे. नोटा पण फाटलेल्या होत्या तेंव्हा पण एक, दोन आणि पाचच्या नोटा कितीही फाटक्या असल्या तरी त्या एका प्लास्टीकच्या पाकिटात पॅक करुन हस्तांतरीत व्हायच्या. वेगळी समांतर अर्थव्यवस्था उदयास आली होती, आणि तिचा सगळ्यांनीच स्वीकार पण केला होता. एखाद्या दुकानाच्या नावाचं कूपन, नगदी पैशा प्रमाणे जपून ठेवायचे लोकं

पैसा आयुष्यात महत्वाचा असतोच- पण “सुटे पैसे” सगळ्यात जास्त महत्वाचे असतात ! आणि ह्याची प्रचिती नेहेमीच येते. खरंय की नाही?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव, Uncategorized and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to चिल्लर..

 1. लेख नेहमीप्रमाणेच निराळा आहे. मला चांगलं आठवतं, मी दहा एक वर्षांपूर्वी पुण्याला गेले होते, तेव्हा मुंबईत न चालणारी १०, २० पैशांची नाणी पुण्यात सहज चालली होती. असा भेद का हे मला अजूनही कळ्लेलं नाही. आता तर परिस्थिती आण्खीनच वाईट आहे. याच दिशेने आपण जात राहिलो तर सुट्टे पैसे ही संकल्पनाच उरणार नाही किंवा १ रूपयाचं नाणं हेच सर्वात लहान नाणं असेल. जर सुट्ट्या पैशांना किंमतच नसेल तर वस्तूंच्या किंमतीही राऊंड फिगर्समधेच दिल्या तर किती बरं होईल!

  • पैशाची किंमत कमी होत आहे म्हणुन हा सगळा प्रॉब्लेम. पोतं भरुन पैसे नेले की पसाभर धान्य मिळण्याचे दिवस फार दूर आहेत असे वाटत नाही. अफगाणिस्तानच्या करन्सीची जशी वाट लागली आहे तशीच आपली पण लागणार लवकरच. सरळ ही नाणी व्यवहारातून बाद करुन टाकावी म्हणजे झालं. तसंही येतं तरी काय हल्ली चार आण्यात?

   • Amol says:

    the rate of inflation reduces the value of the money, hence as the inflation increases the value of money used decreases. You need to use more amount of money this bigger bills, Although inflation means economy is good as well. if the rate of inlfation is well within control u dont need bigger bills, USA has 1 cent to 100 $ ( max) coins and bills, everything is usable every where in US. There was lecture by raju dixit on this on. smaller bill also would prevent corruption ( as he says)
    any wyas nice article and I m back again,

 2. हया ’ चिल्लरवरुन ’ रोजच कितीतरी (दुकानात,बस-रिक्षात,टिकिटखिडकीवर) ठिकाणी छोटेमोठे वाद होत असतात आणि होत राहणार…बाकी लेख नेहमीप्रमाणे फ़क्कड जमला आहे..

  • देवेंद्र
   ते चिल्लर वरचे वाद विवाद तर नेहेमीच होत रहाणार. पण कमी किमतीचे नाणे लोकं का घेत नाहीत हे मला तरी समजलेलं नाही.

   • ऑफ़िशीअली ती नाणी बंद झालेली नसतांनाही ही लोक ती घेत का नाहीत ते मलाही समजत नाही. हयावर किमंती राउंड-उप करणे हाच उपाय दिसतो आहे…बाकी एका बॅंकेतील वरिष्ठ अधिकारयाने असाच लोकांच्या अकाउंटस मधुन चिल्लर म्हणजे २५ पैसे वैगेरे कट करुन करोडोंचा घोटाळा केला होता…

    • एकच कारण लक्षात येतं. पाच रुपये चार आण्याच्या नाण्यात घेतले तर सोळा नाणी होतात. इतकी जास्त चिल्लर सांभाळणं कदाचित कंटाळवाणे आणि गैरसोईचे होते म्हणुन असेल.!!

 3. मस्त पोस्ट काका! खरच, सुट्टया पैशाचं महत्व रोज प्रवास करणाऱ्यालाच ठाऊक.

  >>> नोटा पण फाटलेल्या होत्या तेंव्हा पण एक, दोन आणि पाचच्या नोटा कितीही फाटक्या असल्या तरी त्या एका प्लास्टीकच्या पाकिटात पॅक करुन हस्तांतरीत व्हायच्या.

  काही दुकानदार स्वत:च्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी प्लॅस्टीकच्या पाकिटात नोटांबरोबर कागदाच्या एक तुकड्यावर दुकानाचे नाव, पत्ता पण टाकुन ठेवायचे. 🙂

  • आभिलाष
   आपल्या दुकानाची नांवं टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे, जर इतरांनी कोणी घेतली नाही तर मी नक्की परत घेईन ती नोट ~!! हा विश्वास निर्माण व्हायचा ज्याला नोट दिली त्याच्या मनात.

 4. आपण स्वतः व्यवहारातील एक सुटे नाणे बनण्याचा प्रयत्न करणे हेच आपले विश्वसनीय ध्येय…. असावे…

  बापरे काय लिहीलय मी इथे…

  मी एकच नियम पाळतो… मी सर्वदा (असतील तेव्हा) सुटे पैसे देतो… मग कधि कोणाकडे सुटे नसतील आणि सुट्ट्याचा प्रॉब्लेम आला की सांगतो ते वरचे पैसे ठेवून घ्या आणि दुसऱ्या कुठल्यातरी अडलेल्याचे (तिकीट वा) पैसे घेऊ नका… बहुतेक वेळा भाजीवाल्यांशी हा प्रश्न येतो आणि ते स्वतः जास्त पैसे घ्यायच्या ऐवजी आपल्यालाच सांगतात नंतर द्या…

  • शिरीष
   स्वतःची नाणी तयार करणं.. मस्त आहे आयडिया. पण या कल्पनेवर आधीच काम केलंय आपल्या इथल्या दुकानदारांनी ( प्लास्टीक मधली नोट) 🙂
   भाजीवाल्यांना खात्री असते की गिऱ्हाइक पुन्हा नक्की येणार याची म्हणून ते म्हणतात नंतर द्या म्हणून .

 5. ngadre says:

  hoy ho..nearest value che denomination dile tari sutte nahi ase mhantaat..visheshtha rikshaw wale.tyanchyakade tar kahich paise nastaat baryachda.rikamya khishane dhanda karayala kase nightaat kon jane?

  Ardha ardha taas gela ahe rickshaw thambvoon sutte shodhnyaat majha.

  1000 kinva 500 chi note javal asali tari apan practically ‘nirdhan’ asato..mag ugeech ekhadi 100+ chi vastu ghyavi lagte te 500 modayala.

  Aso..Devendra is so correct..lekh fakkad..

  • नचिकेत
   कितीही पैसे असले तरीही चिल्लर पैशांची किंमत ही कधीच कमी होत नाही. ट्रेनच्या प्रवासात एकदा मला नागपूरला जातांना पाचशेची चिल्लर शेवटपर्यंत मिळाली नाही. शेवटी एका पुस्तकाच्या दुकानातून पुस्तक घेतलं विकत.
   बाय द वे.. ब्लॉगर्स मिटला तुम्ही आला असता तर बरं वाटलं असतं.

 6. meharsha says:

  me ashi bus pravasi hote jyat khoop college student hote teva sagale group banvun conductarla suttya paisa sathi chaltana pahila aahe.

  • पण तशी वेळ फार कमी येते. आणि कंडक्टर म्हणजे बसचा राजा. तो तर सगळ्यांना पुरुन उरतो. शेवटी जर जमलं नाहीच तर सरळ बस पोलिसचौकीवर लावतात हे लोकं.

 7. bhaanasa says:

  महेंद्र, सगळ्यात पहिला फटका बसतो तो विमानतळावरच….. उतरल्या उतरल्या फोन करायचा म्हटला तर एक रूपयाचे नाणे हवे नं…. मध्यरात्री आतले बुथवाले फोन बंद असतात मग क्वाईन फोनला पर्याय नसतोच….. मी तर दरवेळी निघताना कमीतकमी २५/३० एक रूपयाची नाणी पर्समध्ये टाकतेच. अरे, पाच -दहा पैसे बाद झाल्याचे मी ऐकून होते….. तू म्हणतो आहेस की चार आणेही कोणी घेत नाही…. 😦
  त्या २० पैशाच्या नाण्याचे लक्ष्मी हार करून घेतलेले अनेक बायकांनी….. आजोबांकडे चांदीचे खूप शिक्के होते. हमखास लक्ष्मीपूजनला बाहेर येत ते. समांतर अर्थव्यवस्था मलाही चांगली लक्षात आहे. सुट्ट्यांचे महत्व जागोजागी जाणवत राहते हे मात्र खरेच.

  • हो.. हल्ली पंचविस पैसे पण कोणी घेत नाही. पुर्वीच्या काळी चिल्लरचं जे शॉर्टेज होतं त्याचं कारण होतं बेस्ट!! बेस्टचे कंडक्टर आपली झोळी भरुन चिल्लर त्यांच्या ऑफिसमधे जमा करायचे, बॅंका ती इतकी चिल्लर घ्यायला तयार नसायच्या, कारण वेळ फार जायचा मोजायला. असं करता करता सगळी चिल्लर बेस्टच्या तळघरात जमा झाली होती. (कित्येक करोड रुपयांची) नंतर मला आठवतं की नंतर बॅंक ऑफ ईंडीयाने घेतली वाटतं ती परत..
   काही दिवसात पन्नास पैसे पण बाद होतील. काहीच मिळत नाही पन्नास पैशामधे !

 8. Sarika says:

  परत करायला सुट्टे पैसे नसले की काही दुकानदार त्याबदल्यात चॉकलेट द्यायचे.. टोल नाक्यावर पण आम्हाला एक दोन वेळा अशी चॉकलेटस देण्यात आली…

  • शिरीष says:

   अचानक आठवण झाली म्हणून लिहितोय. मला अलिकडे असाच अनुभव बोचला तेव्हा मी आता टोल नाक्यावर त्या नाक्याच्या जवळपास उपलब्ध इतर गोष्टी (जशी काकडी, शेंगा वगैरे) मागायचे ठरवलेय… म्हणजे त्यांना आपल्या भावना पटकन आणि चांगल्या रीतीने समजतील अन्यथा ते चॉकलेटचाच व्यापार सुरु करतील (केलाही असेल म्हणा) ही भीती… त्या टोल नाक्याची पानपट्टी बनवावी असा विचार शिजतोय… (मनातल्या मनात).

   • Sarika says:

    अजुन एक म्हणजे… रिक्षावाले…. मिनिमम ९ रुपये मीटर झाल्यावर दहाची नोट दिली कि सरळ एक रुपया सुट्टा नाही म्हणुन सांगतात…. हा अनुभव मी कमीतकमी १५ वेळातरी घेतला आहे, प्रत्येकवेळी ९ रुपये सुट्टे असत नाहीत…

    • रिक्षावाल्यांचा तो तर अधिकारच झालाय पैसे परत न देण्याचा. आपणही शेवटी तो एक रुपया सोडून देतो.
     ती चॉकलेट्स मी पण बरीच जमा केली होती भोपाळ कडे तशी पद्धत आहे चॉकलेट्स द्यायची.
     चॉकलेट असतं पन्नास पै्शांचं , आणि हे टोल वर एक रुपयांच्या बदल्यात ते देतात. त्यांचा सरळ फायदा आहे पन्नास पैशाचा प्रत्येक चॉकलेट मागे.

 9. तुमचा हा ‘चिल्लर’ वाचतांना असे वाटत होते कि तुम्ही काल माझ्या सोबत होतात कि काय बस मध्ये कारण तुम्ही सांगितलेला conductor चा किस्सा अगदी सेम टू सेम घडला माझ्या सोबत घडला नुसता अंगावर व्हस्कत होता तो.
  आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वर्षापुर्वी नाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती तेव्हा एक, दोन आणि पाचच्या नोटा कितीही फाटक्या असल्या तरी त्या एका प्लास्टीकच्या पाकिटात पॅक करुन हस्तांतरीत व्हायच्या. त्या अजूनही चालतात गावाकडे मी पण एक दोन वेळेस वापरल्या आहेत त्या.

  • सागर
   कंडक्टर्स चा असा अनुभव प्रत्येकालाच आला असतो कधी ना कधी तरी. त्यांचं पण आयुष्य पहा. दिवसभर बस मधे धक्के खात प्रवास करायचा. किती वाईट नाही?
   अशा परिस्थिती मधे त्यांची अशी चिडचीड होणं सहाजिकच आहे.

 10. thanthanpal says:

  या चिल्हर मुळे ग्राहक राजा मात्र अक्षरशः लुबाडला जातो. पेट्रोल पंपावर रोज हजारो लोक पेट्रोल,डीजेल भरतात. पेट्रोल भरणारा कधीच ५०-७० पैसे परत करत नाही. एकेका पंपावरील पेट्रोल भराणाऱ्याची कमाई रोज रुपये ४०० – ५०० पर्यंत होते. यामुळे कांही मालक तर त्या नोकरांना पगारच देत नाही आणि ग्राहकांना लुटण्याची खुली सुट त्यांना देतात. मंदिरातील, मशिदी तील चिल्हर 10 % ने विकली जाते. १०० रुपयांची नोट दिली तर ९० रुपयांची चिल्हर मिळते. म्हणजेच आपण एक रुपया दान करतो तेंव्हा देवाला १.१० रुपय मिळतात. गेल्या आठवड्यात मेलेल्या भिखारयाच्या खात्यातून 2 लाख रुपये बेकायदेशीर पणे काढताना एका मोठ्या बँकेतील व्यवस्थापकास अटक केल्याची बातमी होती. या चिल्हर च्या मोहामुळे जेल झाली.असो.

  • पेट्रोल भरताना मी सरळ पाचशे रुपयांचं टाक म्हणुन भरायला सांगतो, चिल्लरचा प्रश्न माझ्या कडून मी असा सोडवतो.

   चिल्लर ब्लॅक ने विकायचे दिवस आता नाहीत, पण पुर्वी मात्र नक्की होते. मला पण आठवतं. ( जेंव्हा सगळी चिल्लर बेस्टच्या तळघरात होती तेव्हाची गोष्ट आहे ही) शंभर रुपयांत नव्वदची चिल्लर मी पण घेतली आहे विकत.

 11. vidyadhar says:

  काका,
  नेहमीसारखीच अत्यंत ओळखीच्या विषयावर कधीही सुचणार नाहीत असले विचार लिहिलेत तुम्ही. मस्त.
  ती पाच, दहा आणि वीस पैश्यांची ऍल्युमिनियमची नाणी मला आठवतात. वापरली की नाहीत, ते मात्र आठवत नाही. नव्या पाच रुपयांच्या नाण्याचा घोळ मी एकदा घालता घालता राहिलो..
  बाकी..कंडक्टरचा किस्सा सही…तो उपाय एकदा करून पहावा लागेल…
  आणि हो..मी सुद्धा लहानपणी पैसे ‘उचलून’ ‘चार आण्याची पेप्सी’ प्यायचो. 😉

  • विद्याधर
   सगळेच जण घरामध्ये उचलेगिरी करतात (फक्त मान्य करीत नाहीत). घरची भाजी आणायला गेलं की थोडे पैसे स्वतः साठी कंची मारणे हे तर कॉमन आहे अगदी. हे काम मी नेहेमीच करायचो, म्हणूनच मला बहुतेक भाजी वगैरे आणणं आवडायचं 🙂 .

 12. नेहमीप्रमाणे हटके विषय आणि उत्कृष्ठ मांडणी..आपल्या नागपुरात, अमरावतीत अश्या प्लास्टिकच्या पिशवितल्या नोटा, चार चार आणे प्लास्टिकमध्ये लॅमीनेट करून द्यायची पद्धत सगळा सगळा आठवला 🙂 कॅंडक्टरचा म्हणाल तर त्याना “पुरूष”मंडळीचा अपमान करायाच लाइसेन्स दिलय हे मात्र खर…हा हा हा 😀

  • सुहास
   कंडक्टर्सच्या बाबतीत तर काय , आलिया भोगासी असावे सादर .. असा प्रकार असतो.
   एखाद्या मुलीकडे सुटे नसले, तर तिकिटाचे पैसे द्यायला बरेच लोकं पुढे येतात, पण पुरुषाच्या मदतीला एकही स्त्री /पुरुष आलेला नाही बघितला कधी.

 13. अगदी कालच भाजीवाल्याकडे १५३ रूपये झाले. २०० रू दिल्यावर त्याने विचारले ३ रू सुट्टे. मी आपलं पर्स मध्ये सुट्ट्या पैशांच्या कप्प्यात बघायला सुरूवात केली मोजून २रू आणि २५ पैसे सापडले. त्याच्यापुठे ते सगळे ठेवल्यावर त्याने फक्त २ रू च उचलले. त्या २५ पैशां कडे बघीतलं सुध्दा नाही. 🙂
  आमच्या कडे बाबांनी अजुनही पूर्वीचे १ पैसा, २ पैसे अशी नाणी जपून ठेवली आहेत. मजा येते बघायला कधीतरी.

  • माझ्या कडे पण आहेत बरीच जुनी नाणी जमा करुन ठेवलेली. लहान असतांना पैसे मोजायला खूप आवडायचं. गेले ते दिवस!!

 14. मस्त लेख… पाच पैशाची जहाज बनवायची माझी मावशी. खुप मस्त असे ते दिसायला.
  बाकी चिल्लर सांभाळावीच लागते बस आणि लोकल प्रवास करणार्‍यांना…

  • आनंद
   रुखवतात ठेवायला म्हणुन पाच पैशाचं मंदीर बनवलं जायचं. काचेवर पाच पैसे चिकटवायचे अन ते मंदिर बनवायचं. अजूनही आठवतं. हल्ली तसं काही केलेलं दिसत नाही.

 15. Maithili says:

  Jagatalya kuthalyahi vishayawar lihu shakata buva tumhi…Aani te suddha itke chaan..!!! Kamaal aahe….
  Khoop mast… majja aali vachataana…!!!

  • मैथिली
   मनात इतकं काही येतं की लिहायला बसल्यावर काहीतरी सुचत जातं. बरेचदा लेख लिहून झाल्यावर जमले नाही असे वाटते आणि डीलीट करुन टाकायची पण इच्छा होते. पण आज पर्यंत केवळ एकदाच लेख डिलिट केलाय डबा नावाचा..

 16. amachya dukan samorcha chahavala, chillar dyayala niyamit dukanat yayacha. tyachyakade khup jama vhayachi ani amhala dukanat sarakhi kami padayachi. Shevati tyacha chahacha rate hi vadhalay ani chillarchi kimmathi kami zaliy tyamule chillarchi devan-ghevan hi bhutkalat geliy.

  Pan uraleli chillar driverne parat n denyacha anubhav mala mumbaila aala.

  ekada tar Conductor ne sutte paise nahit mhanun eka mitrala shevatparyant ticket dile nahi. tyachi utarayachi vel ali, tyane ticket magitale tar tyala ja mhanala. Khali utaralyavar TC ubha hota swagatala… conductor ne game khelali barobar…

  • दहाची नोट दिली की ९ रुपये झाले असले तरीही ड्रायव्हर चिल्लर नाही म्हणुन सांगतो आणि उरलेले पैसे परत देत नाहीत.

   हमखास येणारे अनूभव आहेत हे. सिटी बस मधे तर नेहेमीचेच अनूभव असतात. तसा मी बसने फारसा प्रवास करीत नाही, पण जेंव्हा केंव्हा करतो, तेंव्हा मात्र नेहेमीच दोन तिन भांडणं दिसतात. कंडक्टरची वागणूक अशी का असते ? हा पण एक संशोधनाचाच विषय आहे. दिवसभर धक्के खात प्रवास करावा लागतो म्हणून तर नसेल?? बरेचदा कीव पण येते त्यांची.

 17. चार वर्षापुर्वी मी कुर्ला सांताक्रुझ अस बसने प्रवास करत असे. तिकीट होते साडे चार रुपये. मी एका छोट्या पर्समध्ये चाराआण्याची भरपुर नाणी ठेवली होती रोज दोन नाणी देत असे सुट्टी पन्नास पैसे म्हणून. एका कंडक्टरने चार आणे घ्यायला नकार दिला, मी म्हणाले, ही नाणी चलनात आहे असे बँका म्हणतात मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर तो रागाने म्हाणाला, मग सगळे तिकीटाचे पैसे द्या ना चार आण्याचे. मी लगेच त्याला चार आण्याची अठरा नाणी काढून दिली. त्याला काही सुचलेच नाही बोलायला. 🙂
  मी पण जपून ठेवल्येत जुनी नाणी आर्यनला दाखवायला.

 18. Santosh says:

  Sir;

  Lekh chaan ahe…

  Aplya lokana aplya currency baddal adar nahi ahe… They dream of Dollars / Dirhams and Euros

  Ek gosta sangto… Mi sadhya Dubai madhe ahe… Ithe eka Hotel Delivery boy la mhatla “Bhai note fata hua hai… Pls dusra dedo” to mala mhanto “ye note lenese jo inkar karega usko police ke paas leke jao”… hasu ala mala pan goshta khari ahe.

  They trust their currency… we don’t… May be currency madhe honare ghotale he suddha tya magcha karan asu shakta 🙂

  • तुमचा अनुभव खरंच अगदी आय ओपनर ठरावा. इथे नोटांवर स्टेपल करणे हा आरबीआय ने गुन्हा ठरवलेला असला, तरीही बऱ्याच लहान कोऑपरेटीव्ह बॅंकांमधे नोटांना स्टेपल केले जाते.
   कॅशिअर पैसे घेतले की कायद्याने गुन्हा असला तरी नोटांवर सरळ लिहितो किती नोटा आहेत ते .

   मला वाटतं की पैसा स्वस्त झालाय .. हेच कारण आहे. पैशाची किंमत कमी झाल्याने असे होते. आता विचार करा, की एखाद्याने दोन रुपये परत करतांना १० पैशांची विस नाणी दिली तर ती ठेवणं अवघड आहेच. दहा पैशामधे आजकाल काहीच येत नाही- अगदी कोथिंबिर सुध्दा मिळत नाही.

   २५ पैशांची पण अशीच अवस्था झालेली आहे. काहीच मिळत नाही २५ पैशात सुध्दा. साधं रावलगांव चॉकलेट, मिंटॊ, वगैरे पण ५० पैशाला एक मिळते. हे कारण पण असू शकत चलनातील २५ पैसे जाण्याचं.

 19. prasad says:

  छान लेख आहे. माझा एक अनुभव पुणे कोल्हापुर रस्त्यावर एका टोल नाक्यावर सुट्या पैश्यांऎवजी चोकोलेट्स देतात. दररोज हजारो चोकोलेट्स विकली (?)
  जात असतील पण कोणी काहिच बोलत नाही. मी तेथे हमखास सुटे पैसे ठेवुन जातो. नसतील तर बर्याच वेळेला भांडण होते.
  प्रसाद

  • प्रसाद
   असे बरेच टॊल नाके आहेत एमपी मधे.. तिथे पण चॉकलेट्स देतात ( एक रुपयाला एक या दराने)
   टोल टॅक्स हा राउंड फिगरमधे ठेवला तर हे प्रॉब्लेम्स सुटतील आपोआप.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s