मराठीकरण..

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी मनाला तो बोर्ड पाहिलं की एकदम धसकाच बसतो, आणि सरळ विमानतळावरून पुन्हा घरी जावं असं वाटू लागतं.

विमानतळ इतका सोपा सरळ शब्द असतांना हा असा विचित्र शब्द शासकीय कार्यालये का वापरतात हे काही लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेस विमानात बसल्यावर बाहेर पाहिलं तर हमखास तो शब्द आठवतो.  त्या वाक्याचा अर्थ काहीही असला तरी मला मात्र तो “भारतीय विमान पत्तन -म्हणजे  ’भारतीय विमान पडण्याची जागा’ असाच वाटतो. त्या पेक्षा सरळ सरळ ”एअरपोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडीय़ा’  हा शब्द वापरला तर जास्त योग्य होणार नाही का?

एखाद्या शब्दाचे मराठीकरण शब्दशः केल्यास किती विचित्र अर्थ निघू शकतो हे या गोष्टीवरून लक्षात येते. माझं पण मराठीवर प्रेम आहे, पण प्रचलीत असलेले इंग्रजी शब्द डावलून त्या साठी अस्तित्वात नसलेले मराठी शब्द तयार करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याची खरच काही आवश्यकता आहे का?

असे नवीन शब्द तयार करुन   वापरल्याने भाषेची समृद्धी वाढते असेही काही लोकांचे मत आहे, पण त्या पेक्षा जुने प्रचारात असलेले मराठी शब्द, जे आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेले आहेत त्यांचा आवर्जून वापर केल्याने ते शब्द पुन्हा प्रचलीत होतील आणि  मराठी भाषेची मूळातच  सुंदरता , समृद्धी  टिकवून ठेवायला मदत होईल असे वाटते.

इथे एकच शब्द दिलाय, असे अनेक विचित्र शब्द प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याने काय साध्य होईल हे मला तरी कळत नाही. ऑक्सफर्ड डिक्शनरी मधे सुध्दा इतर भाषांमधले (मराठी, हिंदी, अरेबिक वगैरे) प्रचलित शब्द आहेतच. त्या शब्दांना पण इंग्रजीने आपलं म्हणून मान्य केलेले आहेच.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , , , . Bookmark the permalink.

46 Responses to मराठीकरण..

 1. हो विशेषनाम मराठीत भाषांतरित करायची गरज नाहीच…
  भारतीय विमान पत्तन प्राधिकरण .. हे भारी होत 😉

  • कुठल्याही गोष्टीचा अतीरेक वाईट. एवढंच म्हणायचं. असे अनेक शब्द आहेत के जे हल्ली वापरात घेतले जात नाहीत, त्यांचा वापर केला तर समजू शकतो. पण हे असे भाषांतर?? हॉरीबल..

 2. Nilesh says:

  Mahendraji,

  Ajoon ek shabda disto to mhanje upari upakaran, kinwa lift karata udwahak wagaire.
  Ase shabda lihun gondhal honyachi shakyatach jasta.

  Cheers
  Nilesh Joglekar

  • असे शब्द खरंच लवकर समजत नाही. आणि समजलं नाही मग आपण मराठी आहोत की अजून कोणी असंही वाटतं.

 3. ’पतन’चा शब्दश: अर्थ इंग्रजीत ’पडणे’ असा होतो, त्यामुळे विमान पतनचा अर्थ म्हणजे विमान पडण्याची जागा असाच होईल. ’एअरपोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडीय़ा’ हे शब्द योग्य वाटतात, याचं मराठीकरण करायचं असेल, तर ’भारतीय विमानाश्रय प्राधिकरण’ असं करावं लागेल, म्हणजे ते कुणालाही मराठीत समजू शकेल. तुम्ही एअरपोर्ट अधिका-यांकडे असं पत्र पाठवू शकता.

  माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक इंग्रजी शब्दाला समानार्थी मराठी शब्द शोधण्याची गरज नाही. मंगळसूत्र, जान्हवं यासारख्या शब्दांना समानार्थी इंग्रजी शब्द नाहीत, मग त्यांना काय इंग्रजीत ’होली थ्रेड’ म्हणायचं का? सगळ्याचंच मराठीकरण करण्याचा अट्टहास थांबवला पाहिजे. चपखल बसणारे व सहज समजणारे कुठल्याही भाषेतील शब्द वापरावेत असं मला वाटतं. भाषा ही संवादाचं माध्यम व्हावी, वादाचं नाही. मध्यंतरी ब्लॉग या शब्दाला समानार्थी मराठी शब्द तयार करण्याचं पिक आलं होतं, मला त्याचा वात आला, म्हणून त्या मेल्सना मी फिल्टर लावून टाकलं.

  मला एक प्रश्न पडला आहे – जर पतनचा अर्थ पडणे असा होतो, पडणे म्हणजे खालीच पडणे (कारण – गुरूत्वाकर्षण) तर मग अध:पतन म्हणजे काय?

  • अध:पतन – अध:पात; अध:सरण – खाली वाहत जाणे

   पत्तनचा हिंदीत अर्थ होतो बंदरगाह. त्यामुळे ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’
   हे ”एअरपोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडीय़ा’ चे हिंदी भाषांतर असावे असे वाटते.

   • कदाचित हींदी पण असू शकते, पण असं कशाला करायचं? कठीण लिहिलं की चांगली भाषा हा कन्सेप्ट चुकीचा आहे.

    • Abhijit says:

     पत्तनचा मराठी अर्थ शहर असा आहे व हिंदी अर्थ पोर्ट/ बंदर असा आहे. वरील भाषांतर हिंदी असून. विमानतळावर अट्टाहासाने मराठी बोर्ड लटकवायला काही राज ठाकरे सत्तेवर नाहीत. त्यामुळे ते हिंदीच आहे.
     बाकी अवघड प्रतिशब्द बनवू नयेत याशी सहमत.

     • अभिजीत
      🙂 मुंबई एअरपोर्टवर शेडूल्ड अरायव्हल्स चा एक बोर्ड चक्क मराठी मधे आहे. डोमॅस्टीक एअरपोर्टवर. त्याचा पण काढलाय फोटो. लिहिन लवकरच!! 🙂

  • कांचन,
   मला पण नेमकं हेच म्हणायचंय, समानार्थी शब्द शोधण्यापेक्षा जो आहे तोच शब्द वापरला तर जास्त योग्य होईल. असे मराठी करण करुन आपण काय साधतो ? आता हेच बघा इ मेल ला विरोप हा शब्द कोणीतरी शोधुन काढलाय, आणि नेमका तोच वापरला जातो. विरोप चं लॉजिक काय आहे? असे निरर्थक शब्द रुळवण्यापेक्षा सरळ आहे तेच शब्द वापरले तर काय हरकत आहे?

   • Abhijit says:

    विरोप मी नाही शोधला पण इ निरोप ला मराठीत विद्युत निरोप करता करता विरोप शब्द ज्न्माला आला असावा.

    • अभिजित
     हा शब्द मुद्दाम रुळवायचा प्रयत्न केला जातोय. विरोप म्हणजे जर विद्युत निरोप… असा असेल तर काय बोलणार?
     इथे विद्युत कुठे आली? हाच जो अट्टाहास आहे मराठीकरणाचा, तो थांबवला पाहिजे. नाहीतर असेच चुकीचे काहीतरी स्लॅंग शब्द रुळतील. इथे इलेक्ट्रॉनिक्स, वापरून ईरोप का नाही केला? असो पण तसे करणेही योग्य नाहीच!!

     • abhijit says:

      अगदी बरोबर महेंद्र काका. रुळवायचा प्रयत्न केला जातोय. मला पण हा शब्द पचला नव्ह्ता अजिबात. काहीच्या काही वाटतं. विरोप म्हटलं की. कायमचा निरोप घेतल्या सारखं वाटतं. ब्लॉगचं पण तेच होतं जालनिशी काय संवादिनी काय ! काय उचलावं ते समजत नाही.

      पण मी एक शब्द बनवलाय हां . फायरफॉक्स ला अग्निजंबूक
      कसा आहे ? 🙂

      • अग्नी जंबूक ( जंबुक म्हणजे कोल्हा हा अर्थ आहे का? मला जुन्या इसापनितीच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते. )
       मस्त आहे शब्द. 🙂 असेच विनोदी शब्द तयार होतात, शब्दशः भाषांतर केले की.

  • ह्या कॉमेटला काय उत्तर द्यायचे ते मी विचारच करतोय दोन दिवस. शेवटी विचार केला जाउ द्या, आपल्या बुध्दीच्या पलीकडचं आहे हा विषय. सोडुन द्यावा एक्सपर्ट लोकांसाठी!!! 🙂

 4. यशवंत कुलकर्णी says:

  मी एका मराठी वृत्तपत्रात भाषांतरकार म्हणून नवीनच लागलो होतो. पहिले काही दिवस तर मला ते लोक जोक करतायत की काय असाच संशय येत होता. निविदा सूचना, ए.ए.आय, डि.ए.व्ही.पी. च्या जाहिरातींमध्ये सुरुवातीला मी देखील अशीच भयानक भाषांतरं केली होती.
  भारत के राष्ट्रपती के लिये तथा उनकी ओर से निम्नलिखित मदों के प्रापण हेतू मुहरबंद निविदाऎं आमंत्रित की जाती है, जो की अमुक दिन के तमुक बजे उपभांडारपाल, उत्तर पूर्व रेल, गोरखरपूर के कार्यालय में खोली जायेंगी..
  काही कळले का?

 5. jeevantarang says:

  अगदी पटलं. प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधायची गरज नाही. मराठी भाषा एवढी समृध्द आहे ,फक्त त्याचा सजगपणे वापर व्हायला हवा.
  एक सहज आठवलं- चेतन भगत त्यांच्या कादंबरीमध्ये pol (अर्थात lane ,गल्ली) , halwai असेच शब्द वापरतात. त्यांचे इंग्रजीकरण करत नाही. मग आपणच तसा अट्टहास कां करतो? अर्थात चेतन भगत हे नांव उदाहरणादाखल घेतले आहे.

  • इंग्रजी मधे जंगल, खानसामा, चिकन टीक्का मसाला असे अनेक शब्द हिंदीतून घेतलेले आहेत , आणि व्यवहारात पण तेच वापरले जातात. चेतन भगत, अरूंधती रॉय वगैरे अनेक लेखक असंच लिहितात. दूर कशाला सिलेक्टेड मेमरी लिहिणारी शोभा डे पण असेच लिहिते.

 6. ngadre says:

  Nice. I had written similar on my blog.Post titled anuprastha mahasanyoji pind.

  Achook observations…

  • वाचलं आजच. पुर्वी सुटल होतं बहुतेक वाचनातून. जबरदस्त शब्द काढले आहेत शोधून.

 7. ajit says:

  mahendraji,
  chhan topic ghetlat. mi tumchya matashi sahmat ahe. baryachda so called tadnya mandali -especially ‘shasakiya’, aaplya dnyanachi unchi dakhavanya sathi asha prakarche klisht ani sahaj arth bodh na honare shabd shodhun tar kadhtatach shivay te attahasane ase pradarshit kartat. mala tar asha lokanchi keevach karavishi watate. tumhi mhanata tase apan oxfordche udaharan samor theun sahaj and rulalelya parbhashiya shabdana marathi pratishabda shodhanya peksha saral tech shabda waparavet. eg. transformer should used instead of ‘rohitra’.

  • काल सकाळी मी जेंव्हा बडोद्याला जायला म्ह्णणून एअरपोर्टला गेलो तेंव्हाच ही पाटी दिसली. आणि प्रकर्षाने जाणवले म्हणून रात्रीच पोस्ट लिहून टाकले..

 8. तुमचे म्हणणे पटते, काही शद्ब एंग्रजीतच चांगले वाटतात कानांना. काहीजण फेसबुक, ऑरकुट अशा सगळ्या शब्दांचे विनाकारण भाषांतर करत बसतात.
  मराठीचा हट्ट जरूर असावा, अट्टाहास करू नये.

 9. Pingback: मराठीकरण.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 10. “आपत्ती” ह्या शब्दाचा फोड करून एक अर्थ घेतल्यास
  आ(येणे)+पत्ती(नोटा) = काय ते ओळखा…
  “एक हरी पत्ती (सौ का नोट) देना भाई उसको” हे ऐकायला कसे वाटते…

  तेव्हा “विपत्ती” ही “आपत्ती” ह्यात फरक तो काय…?

 11. हे जे नाव आहे ते मराठीत नसून हिंदीत आहेत. पतन हा शब्द मराठीत पडणे या अर्थाने वापरला जातो, मात्र या शब्दाचा मूळ संस्कृत धातू उठणे या अर्थाचा आहे. (उदा. उत्पयति, उत्पन्न इ.) स्वातंत्र्य़ानंतर इंग्रजी शब्दांसाठी देशी शब्द देण्याचा जो उपक्रम घेण्य़ात आला, त्यावेळी मुख्यतः संस्कृतला आधार मानण्यात आल्याने हे गोंधळ झाले आहेत. चलनातून बाद झालेल्या शब्दांमुळे हे असं होतं. पोर्ट या शब्दाला द्यायचा म्हणून पत्तन हा शब्द दिलेला दिसतो. (port=बंदर म्हणजेच संस्कृत पत्तन.)
  माझ्या मते, खरी समस्या मराठीकरण नसून दुसऱ्या प्रकारची आहे. अगदी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीला विमानतळ प्राधिकरण म्हणण्याट चूक काय आहे? पण त्याचा विचार होत नाही. गुजरातीत विमानतळाला विमान मथक असा छान शब्द आहे. तमिळमध्ये विमान निलैयम असा शब्द आहे. पण लक्षात कोण घेतो?
  जेथे तेथे हिंदी आपल्या बोकांडी बसविली आहे. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे आयकर खाते. मराठीत त्याला प्राप्तिकर म्हणतात पण त्यांच्या कार्यालयात हिंदीचाच ’संचार’ असतो.

  • देवीदास
   संस्कृत काही फारसं कळत नाही, पण तुम्ही म्हणता तसं जरी असेल तरीही संस्कृत शब्द रुळवण्याचा आग्रह तरी कशाला? जसे गुजरात मधे बस मथक, विमान मथक हा शब्द अड्डा या अर्थाने वापरला जातो तसेच मराठी मधे तळ हा शद्ब आहेच. विमानतळ हा काही वाईट शब्द नाही? तो रुळवणे पण सोपं झाले असते, पण काहीतरी नविन करण्याच्या अट्टाहासापायी असे होते.

  • प्रिय श्री० देविदास देशपांडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले म्हणणे पटले.

   १. पत्तन म्हणजे पतन (पडणे) नव्हे. पत्तन म्हणजे descending, alighting, coming down इत्यादी.

   २. अर्थात आपला पत्तन शब्दाशी संबंधच नाही. कारण विमानपत्तन हा केंद्र सरकारी हिंदी पंडितबाबूंनी शोधून काढलेला शब्द आहे. मराठीमध्ये airport साठी विमानतळ असा शब्द आहे आणि त्यात मला काहीच वावगे दिसत नाही. “भारतीय विमानतळ प्राधिकरण’ हा शब्द का अयोग्य वाटतो हे मला समजत नाही. शेवटी एखादा शब्द योग्य की अयोग्य, हलका की बोजड, सुंदर की असुंदर, सोपा की क्लिष्ट, आपलासा की परका हे सर्व आपल्या सवयीवर अवलंबून असते. ऐकून ऐकून एखादा शब्द अंगवळणी (कानवळणी?) पडला की तो आपलासा वाटू लागतो. नाहीतर परका, नकोसा वाटतो, बरेच दिवस न भेटलेल्या मित्रासारखा.

   मातृभाषेलाही आपण न वापरून दूर लोटतो आणि परके शब्द जवळ करतो. मातृभाषेचा अतिरेक नसावा हे योग्यच. पण ती लक्ष्मणरेषा कशी ठरवायची? दहा शब्दांच्या वाक्यात आठ शब्द इंग्रजी भाषेतील वापरायचे (पल्लवी जोशी) मग ते वाक्य मराठी समजायचे की इंग्रजी? इंग्रज ते वाक्य आपले म्हणून मान्य करतील का? नाही. म्हणून मग त्याला मराठी म्हणायचे का? आणि वर आपण “स्वभाषेचा अभिमान जरूर असावा त्याबद्दल दुमत नाही.” असे म्हणायचे, स्वाभिमान धरायचा तो कोणाच्या भाषेचा?

   माझ्या मते अपरिहार्य व अत्यावश्यक असेल तेव्हा परभाषेतील शब्द जरूर स्वीकारावेत. पण त्यांना मुक्तद्वार ठेवू नये.

   क०लो०अ०

 12. bhaanasa says:

  तर काय… कधी कधी अगदी अट्टाहास केल्यासारखे वाटते. असे अनेक शब्द त्याचेच द्योतक आहेत. विमानतळ किंवा विमान उड्डाणतळ हे जास्त सोपे. आणि शासकिय भाषा तर एकदम खासच…. अनेकदा आम्ही सगळे आधी बुचकळ्यात पडत असू व नंतर खो खो हसत हसू.

  • नुकताच झालेला मंगलोरचा अपघात आठवणीत ताजा असतांना जर अशी पाटी दिसली तर काय अवस्था झाली असेल याचा विचार कर! मला तर सरळ घरी निघुन जावं असं वाटत होतं.

 13. महेंद्रजी आपला हा लेख फार्फार आवडला. मला पण विमान प्रवास करताना असा बोर्ड दिसला कि पोटात धस्स होते पण काय करणार !!!
  मी आणखी काही असे बोर्ड बघितले आहेत. खाली वाचा…. !!!
  १. शासकीय मुलांचे मागासवर्गिय वसतिगृह (कसे वाटले वाचतांना?)
  २. भारत सरकारका उधम. (भारत सरकारका उद्यम असे असायला हवे होते असे मला वाटते. एका अर्थाने उधमही बरोबर आहे !!!)

  • असे विचित्र शब्द तयार करायची शासनाची हातोटी अगदी वाखाणण्यासारखी आहे हे मात्र नक्की.
   “शासकीय मुलांचे “वसतीगृह.. 🙂 ही अशी नावं याचेच प्रतीक!

 14. मनोहर says:

  भारतीय विमान पत्तन प्राधिकरण या नावाचे AAI हे इंग्रजी भाषांतर आहे. पत्तन या संस्कृत शब्दाचा अर्थ परिसर असा होतो. हिंदीत ट आणि ण ही अक्षरे नसल्याने पट्टणचे पत्तन झाले आहे.

  • हे एक मी फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे. असे अनेक् शब्द आहेत. याच पोस्टच्या कॉमेंट मधे असे बरेच शब्द आलेले आहेत. मला एवढंच म्हणायचंय की जरुर नसतांना केलेल्या या भाषांतराची खरंच गरज आहे का? आहे ते शब्द वापरले तरीही चालू शकतात. ्किंवा प्रचलीत असलेले शब्द वापरल्यास जास्त योग्य ठरेल.
   जसे आपण बस स्टॅंड ला बस स्टॅंडच किंवा रेल्वे स्टेशनच म्हणतो नां? तसेच!!

 15. अगदी खरंय !! आणि हे मराठीकरणापेक्षा हिंदीकरणाचे दुष्परिणाम आहे.. ‘उपरी उपस्कर रेल’ म्हणजे ‘वरची वयस्कर ट्रेन’ असं काहीसं वाटतं.
  आणि विशेषनामांचं मराठीकरण करणं तर कटाक्षाने टाळलं पाहिजे. “आज मी नवीन सफरचंद मी-कुंडी (भांडं) घेतलं” किंवा “माझ्याकडे अतिसूक्ष्म मऊ खिडक्या ७ आहेत” हे ऐकायला कसं वाटतं.. ?? 🙂

  • हेरंब
   सगळ्यांच्याच नजरेले ही अशी मराठी बोचते, पण कॊणी त्यावर कॉमेंट करायचा प्रयत्न करीत नाहीत.
   अतीसुक्ष्म मऊ खिडक्या!! हा शब्द मी परवाच ऐकलाय. एकाने फेस बुकचा थोबाड बुक म्हणून उल्लेख केलेला वाचला कुठे तरी..

   • “थोबाडखतावणी” हा शब्द अजून लय भारी वाटेल… किंवा “मुस्काडवही” सुद्धा छान…

    बघा आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाहिये मात्र आपण “बाहेरच्यांनी सांगितल्याशिवाय स्विकारायचे नाही” ह्या रोगाने ग्रस्त आहोत… हेच प्रकर्षाने जाणवेल…

    • शिरिष
     लै खास, खास तुमच्या शैली मधे एक लेख ( विनोदी ) होऊन जाउ द्या याच विषयावर. 🙂

 16. Vidyadhar says:

  देविदासजींनी अगदी अचूक मुद्दा मांडलाय. मलाही हेच वाटत होतं, की पत्तन हा हिंदी शब्द असणार. आपण विमानतळ प्राधिकरण म्हणण्यात काहीच वाईट नाही, पण नको तिकडे मराठी माणसाचं राष्ट्रभाषाप्रेम जागृत होतं.
  बाकी, पर्यायी शब्द हे असायलाच हवेत असं माझं स्पष्ट मत आहे, पण विशेषनामांना नाही, जसं, फायरफॉक्स. विशेषनामांना पर्यायी शब्द हा उगाच केलेला खेळ वाटतो मला, हे म्हणजे, विद्याधरचं, नॉलेज-होल्डर केल्यासारखं आहे..;)
  पण विरोप, जालनिशी, ह्या आणि असल्या शब्दांना माझा आक्षेप नाही, उलट मी आवडीने वापरतो, शेवटी आपली भाषा आपणच टिकवायला हवी असं माझं मत आहे. (हे मत गेली तीन वर्षे भाषाप्रेमी युरोपात राहिल्यापासून अजूनच पक्कं झालंय).

 17. माझेही मत says:

  महेन्द्रजी,
  तुमचा हा लेख फार एकांगी झाल्यासारखा वाटतोय…तुम्ही लिहिताना दुसर्या बाजुचा पण विचार करायला हवा जे बर्याचदा तुमच्या बर्याच लेखात आढलत नाही…त्यामुले फार वरवरचे लेख वाटतात… (हे फक्त एक परिक्षण म्हणून घ्यावे…)..विषय मात्र अनेक तर्हेचे असतात….
  मुद्याचे बोलायचे झाले तर आजकल इंग्लिश भाषेतील शब्द मराठी लिखाणात सरास वापरले जातात..अगदी साध्या साध्या शब्दांसाठी…
  एखाद्या इंग्लिश शब्दाला मराठी शब्द शोधला आणि जर तो कठिन असेल तर त्यावर इंग्लिश शब्दाला मराठी शब्द शोधण्याची गरज काय म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते…पण त्यात खिल्ली उदावानार्याचे मराठी (किव इतर) भाषेबद्दल अद्न्यान असते ..आता जर म्हणाल की शब्द सोपे असावेत तर सगलेच शब्द सोपे कसे असणार…आणि कठिन आहे म्हणून ते स्विकारू नए काय??
  इंग्लिश शब्दाला मराठी शब्द शोधने हे काही चुकीचे नाही….
  जर एखादा शब्द मराठीत नसेल तर त्याला मराठी शब्द शोधण्यासाठी आपले भाषाद्न्यान्न ,कल्पनाशक्ति वापरून प्रयत्न करण्यात काय गैर आहे…
  ह्याचे एक उत्तम उदहारण म्हणजे
  सावरकर यांनी बर्याच इंग्लिश शब्दाना मराठी प्रतिशब्द शोध्लेत उदा…
  दूरदर्शन (television), दूरमुद्रक (teleprinter), ध्वनिक्षेपक (microphone) ,दिग्दर्शक(director), नेपथ्य(screenplay) ,वेशभूषा(costume), वेतन (salary) ,क्रमांक(number), विधि (law), विधिमंडल(legislature) ,संपादक (editor) , बाबा सावरकर यानी शोध्लेले/ला …दिन्नांक (date..) ..ह्याने खर्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध झाली…

  • अतुलजी
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रदिर्ध प्रतिक्रियेकरता आभार. दिवस भर मिटींग मधे असल्याने उत्तराला वेळ लागतोय.
   अहो अगदी जे काही मनात आलं ते लिहिलं. कदाचित एकांगी वाटत असेल ते, पण त्या क्षणी जे मला वाटलं ते लिहिलंय इथे. लेख वरवरचे वाटणे पण शक्य आहे, कारण माझा कुठल्याच विषयावर सखोल अभ्यास नसतो. फक्त आपले अनुभव आणि थोडंफार वाचन याच्या बळावर जे वाटेल ते लिहित असतो.

   खरं सांगायचं तर बऱेच जुने शब्द आज इतिहास जमा झालेले आहेत. पुर्वी जे शब्द अगदी नेहेमीच्या वापरात होते, ते पण आज मुलांना समजत नाही. जुने जे खरे मराठी वांग्मयातले शब्द आहेत तेच आपण आज वापरु शकत नाही, आणि असे नविन विचित्र शब्द तयार करण्यासाठी वेळ खर्ची घालतो. मला हे म्हणायचे आहे की नविन मराठी शब्द बनवण्याने काही विशेष साध्य होणार नाही असे वाटते, पण तुमचे म्हणणेही पटते की भाषा अजून समृध्द होईल. मराठी मधे जे संस्कृत शब्द घेतले आहेत ते पण अगदी जसेच्या तसे संस्कृत व्याक्रणासहित घेतले आहेत. त्याला मराठी व्याकरण लावलेले नाही.तसेच काही शब्द इंग्रजी घेतले तरीही काही हरकत नसावी.

   आजही बघाल तर दूरदर्शन बघितला असे कोणीही म्हणत नाही, किंवा दूरमुद्रक , हे असे शब्द कोणीच वापरत नाहीत- मग असे शब्द तयार करुन काय फायदा? असेही वाटते.. कारण कदाचित मॅटर ऑफ कन्व्हिनिअन्स असावं- . त्याच सोबत जे साधे सोपे शब्द आहेत जसे दिग्दर्शक , नेपथ्य , संपादक वगैरे हे शब्द आवर्जुन वापरले जातात.

   जे जुने खरे मराठी शब्द आहेत त्यांची काळजी आधी घ्यावी -ते काळाच्या ओघात नामशेष होऊ नयेत म्हणून, आणि मग नंतर नविन मराठी (विरोप, जालनिशी वगैरे प्रमाणे) भाषा बनवण्याचा प्रयत्न करावा. आज ज्याला बघावं तो आपलं मराठी करण करण्याचा प्रयत्न करीत असतो, आणि मग विरोप सारखे शब्द प्रचलीत होतात. त्या मुळे मराठीचे काय चांगले होते आहे ते कळत नाही. या उलट माझं मत तर असं आहे की जे शब्द इंग्रजी आहेत ते तसेच ठेवले तरीही हरकत नाही. आज मेज हा शब्द टेबल साठी कोणीच वापरत नाही.

   अर्थात हे माझे मत आहे,पण तुमच्या मता बद्दल पण मला पुर्ण आदरच आहे. प्रतिक्रिये करता पुन्हा एकदा आभार.

  • प्रिय माझेही मत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले विचार योग्य वाटतात.

   एखादा शब्द बोजड किंवा हलकाफुलका वाटणे, खटकणे किंवा न खटकणे, हे सर्व सवयीवर अवलंबून असते. सवयीमुळे माणसाला स्वतःच्या घामाचा दुर्गंध जाणवतच नाही. सवयीमुळे तोचतोच शब्द ऐकून ऐकून सोपा-सहज वाटू लागतो. एखादा शब्द अंगवळणी (खरं म्हणजे कानवळणी) पडला की तो बोजड वाटेनासा होतो, खटकेनासा होतो. डिस्ट्रिब्यूशन हा शब्द सहज, सोपा, हलकाफुलका वाटून वितरण, वाटप हे शब्द का खटकावे? मला हे सर्व अनाकलनीय (साध्या-सोप्या (??) इंग्रज्युद्भव शब्दांत – इम्पॉसीबल टू अण्डरस्टॅण्ड) वाटते.

   काही लोकांच्या मते मराठी शब्द जोडाक्षरयुक्त असल्यामुळे उच्चारायला कठीण आणि किचकट असतात आणि म्हणूनच आपण ते वापरत नाही. पण खरं म्हणजे शब्दांचा सतत वापर हेच शब्द रूढ होण्याचे सर्वात मोठे कारण असते. आणि हे तत्व केवळ अर्थपूर्णच नव्हे तर अयोग्य व चुकीच्या शब्दांना देखिल व सोप्याच नव्हे तर बोजड शब्दांना देखिल लागू आहे. त्याचमुळे वितरण किंवा वाटप यापेक्षा डिस्ट्रिब्यूशन हा शब्द आपल्याला लवकर सुचतो. तीच गोष्ट कम्प्लीट (पूर्ण, संपूर्ण, पुरा), स्टार्ट (सुरुवात, आरंभ), स्पीड (वेग), ट्यूसडे (मंगळवार), ब्रेन (मेंदू), इण्टेस्टाईन (आतडे), स्टमक (पोट, जठर), फर्स्ट (पहिला, प्रथम, आधी), लास्ट मंथ (गेला महिना), ड्राय (कोरडा, सुका, वाळलेला), अट्ट्रॅक्टिव्ह (मोहक, आकर्षक, मनोवेधक), एण्ड (शेवट, अखेर), फास्ट (जलद, गतिमान, वेगवान, शीघ्र, जलदगती), स्लो (मंद, संथ, धीमा), मर्डर (हत्या, खून), ऑब्झर्वेशन (निरीक्षण), ग्रेट (महान, थोर, मोठा), एअरोप्लेन/प्लेन (विमान), क्रेझी (चक्रम, वेडपट, मूर्ख, विचित्र, लहरी), ट्वेण्टी-फिफ्थ (पंचवीसावा), प्रॉब्लेम (समस्या, आपत्ती, कटकट, अडचण, अडथळा, अडसर, हरकत, दोष, अपाय, दुखापत), टेन्शन (दडपण, चिंता, ताण, धाकधुक, विवंचना, काळजी), ट्यूसडे ऍण्ड फ्रायडे (मंगळवार आणि शुक्रवार), ग्रुप (गट, संघ, चमू, समूह, झुंड, मंडळ, कळप, जथा, युथ, पथक, टोळी, वृंद, ताफा, वर्ग, संच, गण (शिष्यगण), परिवार (मित्रपरिवार), डिस्ट्रॉय (नाश करणे), क्लोज (बंद), मार्केट (बाजार, मंडई), एक्स्चेंज (अदलाबदल), पोल्यूशन (प्रदूषण), रिक्वेस्ट (विनंती), एट्सेट्रा (इत्यादी)…. अशा अनेक शब्दांची. इंग्रजीमध्ये अक्षरे एकामागून एक वेगळी लिहिली जात असल्यामुळे त्यातील जोडाक्षरे डोळ्यांस दिसत नाहीत, पण बहुसंख्य इंग्रजी शब्दात ती असतातच. त्यामुळे मराठी भाषेतच जोडाक्षरे आहेत हा गैरसमज करून घेऊ नये. खरं पाहता शुद्धलेखन, स्पेलिंग, उच्चार इत्यादी बाबतीत मराठी, किंबहुना सर्वच संस्कृतोद्‌भव भाषा इंग्रजीहून कितीतरी बर्‍या आहेत. पण तरीही सवईने आपल्याला इंग्रजी सोपी वाटते कारण ती तशी डोक्यात बसली असते.

   असे शेकडो-हजारो इंग्रजी शब्द सांगता येतील की ते मराठीहून अधिक क्लिष्ट असूनही आपण मराठी शब्दांबद्दलच नाके मुरडतो पण इंग्रजी शब्द सहजपणे वापरतो. इथे इंग्रजीबद्दलच्या धाकामुळे, आदरामुळे “दुसर्‍याचा तो बाळ्या, आपलं मात्र कारटं”. अशी उलटी म्हण वापरावी लागेल. (किंवा घरातील आईपेक्षा दूरच्या मड्डमेचा रुबाब व धाक अधिक वाटतो.)

   पुण्यात फुले मंडई हा शब्द बोजड वाटत नाही, पण मुंबईत त्यालाच क्रॉफर्ड मार्केट हा बोजड व परका शब्द अधिक सोपा, साधा, आपलासा वाटतो. मुंबईत पाटीवरील सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कर्वे रस्ता, भालेराव मार्ग अशी नावे फार कृत्रिम वाटत नाहीत पण पुण्यात मात्र कसोशीने सेनापती बापट रोड, लक्ष्मी रोड, गोखले रोड, टिळक रोड, कर्वे रोड असेच म्हटले/लिहिले जाते.
   —————–
   आता रूढ झालेले अनेक शब्द लोकांना सुरूवातीला खटकले होते. काही मंडळींनी सावरकरांची खूपच टिंगल केली होती. पण आज वाचनालय, नगरपिता (आता नगरसेवक), नगरपालिका, इत्यादी, स्वतः, शासनव्यवस्था, न्यायससंस्था, लोकसभा, राज्यसभा, संसद, राज्यघटना, आमदार, विधानसभा, चळवळ-आंदोलन, राष्ट्रीय एकात्मता, संचारबंदी, असे हजारो शब्द नीटपणे रूढ झाले आहेत. दिनांक, क्रमांक, अनुक्रमांक, लोकसंख्या, जनगणना, कृपया, नगरपालिका, वाचनालय, शास्त्रज्ञ, सामान्य ज्ञान, अभ्यासक्रम, जीवशास्त्र, आंदोलन, चळवळ, अभियंता, प्रशस्तिपत्र, अर्थसंकल्प, बोलपट, महापौर, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, मध्यंतर, प्रेक्षागृह, टंक, दिनदर्शिका, धनादेश, महापौर, हुतात्मा, स्वनातीत, महाविद्यालय, मुख्याध्यापक, नौदल, दूरध्वनी, दूरदर्शन, चित्रपट, अधोरेखित, नौदल, दूरध्वनी, दूरदर्शन, चित्रपट, अधोरेखित, व्यंगचित्र, क्रीडांगण, उत्तरदायित्व, लाभांश, ध्वनिमुद्रिका, उत्तीर्ण, ध्वनिमुद्रिका, सेवानिवृत्त, पदच्युत, सार्वजनिक, सेवानिवृत्त, पदच्युत, ग्रंथपाल, बलात्कार, नभोवाणी, तथाकथित, बलात्कार, नभोवाणी, तथाकथित, रुग्णालय, प्रमाणपत्र, ध्वनिक्षेपक, इतिवृत्त (रिपोर्ट), बालवाडी, अंगणवाडी, प्रबोधिनी (अकॅडेमी) “इत्यादी”, इत्यादी. यातील बरेचसे शब्द आता इतर भारतीय भाषांमध्येही स्वीकारले जाऊन तिथे देखिल नीट प्रस्थापित झाले आहेत. सावरकरांनी आपले लेख, पुस्तके, नाटके, कविता, भाषणे यांच्या द्वारे हजारो उत्तम, नवीन संस्कृतोद्भव मराठी शब्द प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला व ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले देखिल. आज असे शब्द मराठी मध्ये इतके एकजीव झाले आहेत की ते नव्याने योजलेले किंवा प्रचारात नसलेले शब्द होते यावर आपला विश्वासच बसू नये. अर्थात आज सावरकरादींच्या तोडीचा, मराठी-संस्कृत-इंग्रजी या भाषांचेच नव्हे तर संस्कृतीचे देखिल यथायोग्य ज्ञान असणारा, विद्वान सापडणे कठीणच.

   नीट विचार केला तर – इत्यादी, स्वतः, बलात्कार, सार्वजनिक, असे अनेक (आज साधे वाटणारे) शब्दसुद्धा मराठीत नव्हते जे आपण आज सहजपणे वापरतो हे लक्षात येते. वरीलप्रमाणे विविध नवीन संकल्पनांना प्रतिशब्द योजणे आपण केलेच नसते व बर्‍याच वेळा केवळ षोक म्हणून मराठीत असलेल्या शब्दांच्याजागी हिंदी व इंग्रजी शब्दांचे रोपण चालूच ठेवले असते तर आज मराठीत नव्वद टक्क्यांहून अधिक परकीय शब्द आले असते. मग तशा भाषेला मराठी म्हणावे की एक इंग्रजी-हिंदीची बोलीभाषा?

   अतिरेक नसावा हे योग्यच. पण ती लक्ष्मणरेषा कशी ठरवायची? दहा शब्दांच्या वाक्यात आठ शब्द इंग्रजी भाषेतील वापरायचे (पल्लवी जोशी) मग ते वाक्य मराठी समजायचे की इंग्रजी? इंग्रज ते वाक्य आपले म्हणून मान्य करतील का? म्हणून त्याला मराठी म्हणायचे का? आणि वर आपण “स्वभाषेचा अभिमान जरूर असावा त्याबद्दल दुमत नाही.” असे म्हणायचे, स्वाभिमान धरायचा तो कोणाच्या भाषेचा?

   माझ्या मते अपरिहार्य व अत्यावश्यक असेल तेव्हा परभाषेतील शब्द जरूर स्वीकारावेत. पण त्यांना मुक्तद्वार ठेवू नये.

   क०लो०अ०

 18. ते विमान पत्तन मराठी नाही, हिंदी आहे,
  मराठीत विमानतळ प्राधिकरण असा शब्द आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s