गमतीशीर म्हणी..

परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची  तिच्या वापरा मधे होती. ही म्हण आणि अनेक  अशा अनेक म्हणींचा खजिना असायचा तिच्या पोतडीत.

माझी आज्जी माझे खूप लाड आणि कौतूक करायची. मी काहीही केले तरी आईच्या मारा पासून वाचवायची. तेंव्हा ती भांडेवाली बाई ” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” अशी अस्सल इरसाल म्हण वापरायची. त्या तशा प्रसंगाला अगदी चपखल बसणारी. तेंव्हा मात्र त्या मावशीचा खूप राग यायचा- पण आज मात्र तिच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. श्लील- अश्लिलतेच्या मर्यादा ओळखून केलेल्या ह्या जुन्या म्हणी म्हणजे एक अमुल्य ठेवाच  आहे.

हा सगळा आपला पूर्वापार चालत आलेला भाषेचा ठेवा आता नामशेष होत चाललाय. बरेचदा तर शब्द चार चौघात बोलण्यासारखे नाहीत, म्हणून टाळल्या जातात. आपण साध्या साध्या वापरातल्या शब्दांकडे पण वाईट म्हणून बघतो.

बऱ्याचशा जुन्या गावाकडल्या  म्हणींच्या मधे काही म्हणी मधे तर बरेच श्लील -अश्लीलतेच्या मर्यादा रेषेवरचे  शब्द पण सर्रास वापरले गेलेले दिसतात. स्पष्टच बोलायचं तर  असभ्य समजले जाणारे, किंवा घाण समजले जाणारे शब्द विपुल प्रमाणात वापरले जातात . काही म्हणी तर पुर्ण म्हटल्या पण जात नाहीत, तर केवळ पहिला किंवा दुसरा अर्धा भागच वापरला जातो.अर्थात त्यात काही वावगं आहे असे नाही, पण पुर्ण म्हणी पण मजेशीर असतात. जसे नावडतीचे मीठ अळणी, हा अर्धा भाग नेहेमीच वापरला जातो, पण पुढचा अर्धा भाग आहे तो मात्र कधीच वापरला जात नाही. पुर्ण म्हण अशी आहे,  “नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचा शेंबुड गोड”

तशीच ही पण एक म्हण बघा” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं” या म्हणीतील पण फक्त पहिला अर्धा भाग वापरला जातो. तसेच ’येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे” ही म्हण पण त्याच प्रकारातली. नेहेमी अर्धवटच वापरली जाते त्यामुळे दुसरा भाग माहितीच नसतो.

म्हणी आणि  हे बऱ्याच वर्षा पुर्वी पासून चालत आलेले आहेत. एक पान भर एक्स्प्लेनेशन देउन जे होत नाही ते एका म्हणी मुळे होते. एक लहानशी म्हण बरंच काही न बोलता पण बोलून जाते.  भाषेचे सौंदर्य आहे म्हणी, अलंकारामध्ये असते. माझ्यासारख्या लोकांना जरी ते लिहिता येत नसलं तरीही वाचायला मात्र नक्कीच आवडतं.  . बहुतेक म्हणी या बोली भाषेत वर्षानुवर्ष ( कदाचित शेकडॊ वर्षापासून)  चालत आल्या आहेत.त्यातल्याच काही इथे लिहितोय.

उगाच काहीतरी कारण सांगायचं, म्हणजे वड्याचं तेल वांग्याला लावायचं असं कोणी केलं की त्या साठी ’ “पादऱ्याला  पावट्याचा आधार ” अशी म्हण वापरली जायची.  ही एक जुनी म्हण आहे  किती अर्थ पुर्ण आहे बघा, अजिबात काही सांगायची गरज नाही- ” अवघड जागचं दुखणं, आणि जावई डॉक्टर “. एका वाक्यात कितीतरी सांगून टाकलं – इतकं की अजून एक्प्लेनेशन द्यायची गरजच नाही.

एक म्हण आहे, ” कौतुकाची वरात, अन हागायला परात” या अशा खास  म्हणी पूर्वीच्या काळी नेहमीच्याच वापरात होत्या. एखाद्याचं कौतूक करायचं तर किती कराव?  बरेचदा एखाद्या माणसाला दुसऱ्याचे इतकी जास्त वर वर करण्याची सवय असते की दुसऱ्या पाहणाऱ्याला ती ’चमचेगीरी’ करतोय अशी वाटते. लहानशा म्हणी नुसार सगळी परिस्थिती कशी स्पष्ट होते पहा.

तशीच ही एक म्हण पहा, ” कावळा गेला उडून, गू खा चाटून”. पुर्वी वाळण टाकलं की कावळे उडवायला तिथे कोणाला तरी बसावं लागायचं. समजा एखाद्या वेळेस काही कामा निमित्त त्या व्यक्तीला उठून जावं लागलं आणि तेवढ्यात जर कावळे सगळं वाळण घेउन उडून गेले तर काहीच शिल्लक रहात नाही. हा झाला शब्द्शः अर्थ, आता व्यावहारिक अर्थ काय आहे ते सांगायची गरज वाटत नाही. इंग्रजी मधे एक म्हण आहे बोन्स  फॉर लेट कमर्स !

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून परवाच्या भाषणात एक म्हण वापरली होती, “शेण आपण खायचं, आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायच” . अर्थात अशा म्हणी वापरल्या की सरळ टाळ्या पडणारच भाषणात! तसंही एक आहे दोन्ही ठाकरे बंधू अगदी खास शेलक्या म्हणी शोधून वापरतात त्यांच्या भाषणांमधून – हा वारसाहक्काने मिळालेला ठेवा आहे त्यांना बहूतेक!

बरं सगळ्याच म्हणी काही अशा वाईट शब्दांच्या ( त्यांना वाईट कशाला म्हणायचं? साधे सोपे सामान्य शब्द आहेत ते)  असतात असेही नाही तर कधी कधी अगदी साधे शब्द वापरले  तरीही  सामाजिक जिवनाचे वास्तव म्हणून ” काळी बेंद्री  एकाची, सुंदर बायको लोकांची” अशी म्हण पण वाचायला मिळते.

एक म्हण  एका मायबोलीकराने वापरली होती ती मायबोलीवर वाचली होती ” नको तिथे बोटं घालू नये, आणि घातली तर वास घेत बसू नये” हसून हसून पुरेवाट झाली होती वाचल्यावर. एका लहानशा म्हणीमधे किती मोठा आशय आहे नाही?

“घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा” ही म्हण किंवा घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे ह्या दोन्ही म्हणी जवळपास एकाच अर्थाच्या पण एका म्हणीच्या ठिकाणी दुसरी वापरलेली चालत नाही. योग्य त्या वेळी योग्य ती म्हण वापरणे या मधेच खरी कला आहे.

बरेचदा अशक्य गोष्टींची अपेक्षा केली जाते. कितीही महत्वाचे काम असले म्हणून काय झाले?  नाही होणार सांगायची ही एक पद्धत पहा, तुम्ही कितीही सांगाल हो, काम झालंच पाहिजे म्हणून, पण “जावई पाहुणा म्हणून आला, तर रेडा दूध देईल काय?”

काही लोकं  जे अगदी ऑफिसमधे साहेब लोकांची चमचेगिरी करतात त्यांच्या साठी एक म्हण आहे, ’ साहेबाने रेड्याचे दुध काढ म्हंटले, तर तो चरवी ( भांडं) कुठे आहे म्हणून विचारतो’ . ही म्हण तर  मी पण बरेचदा वापरतो.

एखाद्या मोठ्या माणसाचा लहानसा सेवक पण खूप मान मरातब मिळवतो. उदाहरणार्थ, जसे आमिरखानचा ड्रायव्हर पण आमिरखानचा पर्सनल अ‍ॅडव्हायझर असल्यासारखा वागत असतो. अशाच प्रकारच्या प्रसंगांसाठी ” थोराघरचे श्वान,त्याला देती सर्व मान” ही म्हण अगदी पर्फेक्ट बसते.(आमिरखान नाव फक्त काहीतरी वापरायचं म्हणून वापरलंय.)

खूप खूप लक्ष द्यायचं, पण …. जाऊ द्या, एक म्हण , जी स्वतःच सगळं स्पष्ट करते – ” दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा, अन मोरीला बोळा घालायचा” मला ही म्हण पण खूप आवडते. ’ताका पुरते रामायण’ किंवा साधारण तशीच “नागोबा  म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाली की पुजतय कोण?” या एकाच अर्थाच्या म्हणी आहेत.एक नेहेमीच्या वापरातील, आणि एक विस्मृतीत गेलेली.

नवरा बायको, जावई सासरचे लोकं, सासू सून , या सगळ्या नात्यांचे वेगवेगळे पदर उघडले जातात या म्हणींच्या मधून.  अशा अनेक म्हणी आपल्या मराठी मधे आहेत.   ही एक गमतीशीर म्हण बघा ” भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला पुरणपोळी” किंवा ही “मी नाही त्यातली कडी लावा आतली”अशा द्वैअर्थी म्हणी पण आहेत बर्याच आहेत. या सारख्या अनेक म्हणी आहेत. पण  सगळ्यांच्या बद्दल लिहित बसलो तर एक ग्रंथच होईल, म्हणून थांबतो इथे.

थोडं शोधलं , तर नेट वर एक सुंदर साईट दिसली म्हणीं साठी खास वाहिलेली. त्या साईटवर अशा ९०० च्या वर म्हणी आहेत.अवश्य भेट द्या.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

153 Responses to गमतीशीर म्हणी..

 1. Mandar म्हणतो आहे:

  वाह वाह
  यातल्या बऱ्याच म्हणी माहिती नव्हत्या .
  आवडले !!!

 2. pravinbirade म्हणतो आहे:

  chaan mhani aahet

 3. Kiran म्हणतो आहे:

  Very good article. You might have known, but I give one link where blogger has written series about idioms and phrases in Indian Languages.
  http://sharadmani.wordpress.com/

 4. सुहास म्हणतो आहे:

  आवडेश..काही म्हणी खरच पहिल्यांदा पूर्ण ऐकतोय 🙂
  मस्त

 5. विशुभाऊ रणदिवे म्हणतो आहे:

  काका जबरदस्त….

  तरी काहितरी राहिल्या सारखे वाटते…. कदाचीत असे नाही ना झाले ” हक्काची मोरी, आणि मुतायची चोरी”

  आपला,
  (चावट) विशुभाऊ…

 6. रोहन ... म्हणतो आहे:

  वा एकदम मस्त.. मजा आली वाचताना… काही म्हणी नव्याने कळल्या तर काहींचा पुढचा अर्धा भाग कळला… अशीच एक म्हण … खिशात नाही आणा… अन मला बाजीराव म्हणा.. 🙂

 7. हेरंब म्हणतो आहे:

  हा हा .. भारी एकदम. बर्‍याचशा म्हणी माहित नव्हत्या. पण सही आहेत. मला तर म्हणी वापरायला खूप आवडतं. तुम्ही म्हणता तसं एका वाक्यात काम होतं उगाच स्पष्टीकरणं द्यायची गरज पडत नाही 🙂 .. अशीच ही एक होममेड म्हण .. अडला हरी, झक मारी !! 😉

 8. bhaanasa म्हणतो आहे:

  मस्तच रे. 🙂 कोकणातल्या काही म्हणी तर अगदीच…. अश्लिलच ब~यापैकी म्हणता येईल अश्या. पण इतक्या चपखल बसणा~या. 🙂 आमची आई काही म्हणी बरेचदा म्हणे….. कधी कधी कोणी अतिच खात सुटले की….’ खाऊन खग्रास आणि हागून सत्यानाश ’, कारण अंगी काहीच लागत नसे नं… 😀 काही लोकं खिशात पैसा नसतानाही फार रुबाब करत, तेव्हां म्हणे, ’खायला फुटाणे आणि टांग्याला आठाणे ’

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अशा जुन्या म्हणी आता नामशेष होउ नयेत अशी इच्छा आहे. खूप छान म्हणी आहेत जुन्या , मी अजून शोधतोय कुठे सापडतील तर.

 9. Manmaujee म्हणतो आहे:

  काका…लय भारी…जबर्‍या….अश्याच अजुन काही म्हणी…

  “स्वतःच ठेवायच झाकून अन् दुसर्‍याच पाहायच वाकून”
  “नको येऊ म्हणे तर कोणत्या गाडीत गाडीत बसू”
  “गावचं आल येडं अन् भज्याला म्हणताय पेढं”
  “***मारी गंगाराम फटके खाई सखाराम” (अर्थात चोर सोडून सन्याश्यास फाशी)

 10. Ganesh म्हणतो आहे:

  kaama pura mama ani taaka purti aataya bai !!!! 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   🙂 ती साईट बघितली का? शेवटच्या वाक्यात लिंक दिलेली आहे. खूप सुंदर आहे जुन्या म्हणी त्या साईटवर. अवश्य बघा.

 11. Mrs. Sadhana R. Raje म्हणतो आहे:

  Khoop masta aahe, gyanat bhar padli

 12. Himanshu म्हणतो आहे:

  simply superb
  तुम्ही कुठल्याही विषयावर इतक अप्रतिम कस काय लिहिता???

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हिमांशु
   मनात जे काही येतं ते लिहितो. तुम्हाला आवडतं, आणि इथे येउन कॉमेंट्स देउन उत्साह वाढवता, त्याकरता आभार.

 13. Nachiket म्हणतो आहे:

  येळेला क्येळं आणि वनवासाला शिताफळं…

 14. Pallavi म्हणतो आहे:

  सही!

 15. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  मस्त, तुम्ही सांगितल्या प्रमाणेच काही म्हणींचा दुसरा भाग खरंच माहित नव्हता..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   आनंद
   वापरात नसल्याने भाषा लुप्त होत जाते- हेच सांगायचं होतं. म्हणूनच सगळ्यांनी मराठी भाषा ही वापरायलाच हवी . हेच सांगायचं होतं.

 16. Prathamesh Advilkar म्हणतो आहे:

  महेन्द्र,
  खुपच छान लेख झाला आहे. यातल्या अनेक म्हणी माहीत नव्ह्त्या. Good Keep it up…!

 17. निरंजन म्हणतो आहे:

  काय गम्मत आहे, परवाच लेख लिहिला त्यात “रेड्याकडून दुधाची अपेक्षा करणे” अशी म्हण वापरली आणि तुमच्या लेखात त्याच अर्थाच्या अजून म्हणी सापडल्या. म्हणी हा मराठी साहित्यातला अमुल्य ठेवा आहे असं मला वाटतं. म्हणीवरची साईट मस्तच!
  -निरंजन

  • महेंद्र म्हणतो आहे:

   या लेखाच्या कॉमेंट्स मधल्या म्हणी पण त्या साईट वर ऍड केल्या गेल्या पाहिजे. त्यांचा इ मेल माहिती नाही. असो.
   साईट खरंच छान बनवलेली आहे, मला पण आवडली.

 18. महेश म्हणतो आहे:

  म्हणी पूर्ण सागीत्ल्याबद्दल धन्यवाद .म्हणी पूर्ण माहित नव्हत्या आपणासाठी एक म्हण देत आहे ,शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ अशी म्हण आहे, आपल्याला माहित नसल्यामुळे त्या आठवत नाही,

  • महेंद्र म्हणतो आहे:

   महेश
   धन्यवाद. शब्दांचा सुकाळ, तिथे बुध्दीचा दुष्काळ ही म्हण माझे शाळेतले गणीताचे सर वापरायचे. जुने दिवस आठवले.

 19. meharsha म्हणतो आहे:

  ekdum must
  tumhi dileli link ekadam bhannat
  “nako nako aan payalich chokho”
  ‘baapapari baap gela bombaltana hata gela’
  “subh bol narya tar mhashi melya sarya”

  • महेंद्र म्हणतो आहे:

   “बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला”
   “शुभ बोल रे नाऱ्या , तर म्हशी मेल्या साऱ्या” या म्हणीमधे विदर्भात पुढचा अर्धा भाग ” म्हणे मांड्वालाआग लागली ” असा वापरला जातो.

   • विजय म्हणतो आहे:

    प्रत्येक भाषेतच म्हणी हा खरोखरच अमोल ठेवा आहे आणि तो नुसता जतन केला जावा अशी अपेक्षा नसते तर तो सतत संवर्धित केला जावा अशी अपेक्षा असते. मला ही सर्वच चर्चा अतिशय महत्त्वाची, उपयुक्त व संग्राह्य वाटली. महेंद्र ह्यांनी शुभ बोल रे नार्‍या, तर म्हशी मेल्या सार्‍या हा उर्वरित भाग – जो मला तरी आजवर अज्ञात होता तो मिळवून दिला. मनःपूर्वक धन्यवाद. परंतु त्या म्हणीचा उर्वरित भाग विदर्भात ‘मांडवाला आग लागली’ असं जे म्हटलं आहे त्याबाबत मी असं म्हणू इच्छितो की हा भाग केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच भागात बहुशः वापरला जातो. कदाचित आता मी जो आणखी उर्वरित भाग देणार आहे तो सर्वांना माहीत नसेल. तो आहे –

    नारायणाला सतत अशुभ बोलायचीच खोड होती म्हणून घरात मंगल कार्य निघाल्याबरोबर आजीनं त्याला बजावलं, “आता तरी आपलं तोंड आवर, नार्‍या, नाहीतर नेहमीसारखं काहीतरी अचरटासारखं अशुभ बोलशील!”. तेव्हा नार्‍यानं आपली प्रतिक्रिया देतानं म्हटलं, “मला काय करायचंय, मला पिंडाएवढा भात द्या आणि तर्पणाएवढं पाणी द्या. मग मी मढ्यासारखा पडून राहीन. तुमच्या मांडवाला आग का लागेना नाहीतर नवरी मुलगी सती का जाईना!”

    – विजय पाध्ये (v.wordsmith@gmail.com)

    • महेंद्र म्हणतो आहे:

     विजयजी
     ब्लॉग वर स्वागत .
     म्हणी नेहेमीच्या बोलण्यात वापरात ठेवल्या तरच त्या जिवंत रहातील.
     दिलेल्या माहिती करता मनःपूर्वक आभार.

 20. rajeev म्हणतो आहे:

  असे एक म्ह्णणींचे जुने पूस्तक आहे, शोधतो…

  आमच्या ग्रूप मधे असलेल्या…………………नीजामी

  गावचा रांड्या सासूर वाडीचा देशपांड्या…..xx धूवायला नाही पाणी, वीहीर सोडून खोदतात लेणी..
  …..जेबमे रूपये अकरा, xx व्याला हवा बकरा…… हैदराबादका नबाब,भीकमे चाहीये कबाब …..
  ……..घरात नाही आटा,बोले मेरा भाई टाटा…… रूमालाची लूंगी,खानदान जंगी……
  खाना मीला तोही पैखाना आता……

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अरे छाप इथे सगळ्या म्हणी, तुझ्या म्हणजे नक्कीच मजेदार असतील.

   ” ** धुवायला नाही पाणी, विहिरी सोडुन खोदतात लेणी’ ही एकदम मस्त आहे. कोणाला लागू पडते बरं ही???? 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अरे छाप इथे सगळ्या म्हणी, तुझ्या म्हणजे नक्कीच मजेदार असतील.

   ” ** धुवायला नाही पाणी, विहिरी सोडुन खोदतात लेणी’ ही एकदम मस्त आहे. कोणाला नेत्यालालागू पडते बरं ही???? 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अरे छाप इथे सगळ्या म्हणी, तुझ्या म्हणजे नक्कीच मजेदार असतील.

   ” ** धुवायला नाही पाणी, विहिरी सोडुन खोदतात लेणी’ ही एकदम मस्त आहे. कोणाला (नेत्याला )लागू पडते बरं ही???? 🙂

 21. Rajan Mahajan म्हणतो आहे:

  Far sundar post. Vinodi Mhani vachun hasun hasun murkundi valali. Mhanincha artha ani apurna vaparatil mhani purna lihilyabaddal dhanyavaad. Link varil mhani pahilya. Mazhi Aai Kokanatil….ti don mhani nehami vaparat aali aahe.
  1. Baap Tasa Beta, Ani Kumbhar tasa Lota (Hi mhan tumhi dilelya sanketsthalavar aahe.) Hi ti ka vaparayachi yache spastikaran denyachi kahich avashyakata nahi.

  2. Hulhulali Mashal ni Chalali Gondhalala (Hi mhan tumhi dilelya sanketsthalavar nahi.) Yacha artha sopa aahe, sadharan Harabharayachya zadavar chadhavane sarakha.

  “Me Shivajiraje Bhosale Bolatoy” hya chitrapatamadhye asankhya mhani aahet….Makrand Anaspurechya Tondi, mala ek athavate – Dokyala Gajra ani Gavbhar Najara. (Hi mhan tumhi dilelya sanketsthalavar nahi.)

  Dhanyavaad.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   राजन
   अशा बऱ्याच म्हणी आता विसरल्या गेल्या आहेत. शक्य तेवढ्या म्हणी , वाक्प्रचार उपयोगात ठेवले तरच ते जिवंत रहातील.
   भाषेची श्रीमंती या अशाच त्यामुळे वृत्त ,अलंकार , म्हणी, वगैरे मुळे ठरते, त्या मूळे त्या जिवंत रहायलाच हव्या. नाहीतर मराठी फक्त एक बोली भाषा होऊन राहिल- स्वतःची लिपी असलेली.

 22. सिद्धार्थ म्हणतो आहे:

  “नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचा शेंबुड गोड” आणि ” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं” ह्या म्हणी पूर्ण आज पहिल्यांदा कळल्या.
  “पादर्‍याला पावट्याचं निमित्त”वरुन कोकणातली “सत्य बोले Xचा, त्याची बसली रे वाचा” आठवली. आणखी एक “देव वासाचा, गुरव घासाचा”.

 23. मनोहर म्हणतो आहे:

  आपण ज्या म्हणी अश्र्लीलतेकडे झुकणार्या म्हणता त्या बीभत्सपणाकडे झुकणार्या आहेत, अश्र्लीलतेकडे नव्हे.

 24. Maithili म्हणतो आहे:

  Thanks ho kaka… hya mhaninche complete version mahitich navhate…!!!

 25. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  बर्याच नवीन आणि काही पुर्ण म्हणी वाचायला मिळाल्या…मस्त…

 26. पिंगबॅक गमतीशीर म्हणी.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 27. gauri म्हणतो आहे:

  namaskar kaka,
  me Gauri patwardhan, misalpav var rutu hirva madhe tumcha lekh vachla ani tyanantar tumchya blog la visit dili.
  Mastach blog aahe tumcha, ani ha lekh tar aflatun…mala kahi lihilayla titkasa jamat nahi pan vaachayla matra avadta…
  Hya blog var 2-3 lekh vachlet, saglech khup chan aahet…mala khup avadla tumcha blog mhanun pratisad dyayche tharavle 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   गौरी
   सर्वप्रथम ब्लॉग वर स्वागत, आणि ब्लॉग आवडला हे आवर्जुन सांगितल्याबद्दल आभार. आधी वाचन, मग लेखन असंच असतं. मी स्वतः पण लेखक वगैरे नाही. आपण जे चांगल्या लेखकांचे लेख वाचतो त्यामुळे वैचारिक बैठक पक्की झाली की मग आपोआप लिहायला सुचु लागतं. लिहिणं फार अवघड नाही. विषय ठरवायचा, आणि जे काही मनात येईल ते टाइप करायचं. बघ प्रयत्न करुन . नक्कीच जमेल. सुरुवात सिनेमाचे रिव्ह्यु, नाटकांचे रिव्ह्यु,वाचलेली पुस्तके यावर लिहायचं. शुभेच्छा.

 28. Nachiket म्हणतो आहे:

  one more..
  सतरा साड़े तरी कुल्ले उघड़े..
  Interesting post.

 29. Pushpraj म्हणतो आहे:

  “”साहेबाने रेड्याचे दुध काढ म्हंटले, तर तो चरवी ( भांडं) कुठे आहे म्हणून विचारतो’””
  हा..हा..खूपच मस्त काका ……..आणखी
  “नेशीन तर साडीच नेशीन नाहीतर तशीच नागडी बशीन”
  “कॉल नको पण मिस कॉल आवर….”
  “रात्र थोडी सोंग फार…”
  “गाव करील ते राव काय करील…..”

 30. jeevantarang म्हणतो आहे:

  छान पोस्ट आहे. खरचं काही म्हणी पूर्ण माहित नव्हत्या. ती लिंक दिलेली साईट पण खूप छान आहे. त्या साईटवरच्या बर्‍याच म्हणी कुठे ऎकल्याही नव्हत्या.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मी पण नव्हत्या ऐकल्या, पहिल्यांदाच ऐकल्या. कोंकणातल्या म्हणी वेगळ्या, तर कोल्हापुरच्या घाटावरच्या अजून वेगळ्या. विदर्भाचा एक वेगळाच बाज. आपल्याला इतर भागातल्या म्हणी माहिती नसतात.

 31. Kanchan Karai म्हणतो आहे:

  आईकडून, आजीकडून अशा ब-याच म्हणी ऐकल्या होत्या. गंमत वाटते ऐकताना की केवळ एका वाक्यात परिस्थितीचा सारांश किती गंमतीशीरपणे मांडला जातो.

 32. sagar म्हणतो आहे:

  “हगणार्‍याने लाजव नाहीतर बघणार्‍याने ”
  “आपलच ढुंगन पाद्र ”
  ;p

 33. mau म्हणतो आहे:

  khupach chhan mhani..mahit hi navhtaya hya mhani…thnx..

 34. Yogesh म्हणतो आहे:

  Kaka
  ” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” hi khari mhan nahiye.

  khari mhan ashi ahe
  “ladavali gur-vin devalat hage , ढुंगण धुवायला महादेव मागे “

 35. mahesh mohan shinde म्हणतो आहे:

  aadhunic mhani aalyamule junya mhani namshesh vyayala lagalya aahet……………

 36. लीना म्हणतो आहे:

  खूप सुंदर लिहिता तुम्ही.वेळेचे भान नाही रहात वाचताना.

 37. ashwini म्हणतो आहे:

  Ithe marathit type kase karayche?

 38. sandeep म्हणतो आहे:

  खरे तर ग्रामीण मराठीच म्हणिंने सम्रुध्ध आहे.
  शहरी लोकांना त्या वापरायची लाज वाटते.

  अशाच काही म्हणि.
  १. पी हळद आणि हो गोरिद
  २. ढवळ्या शेजारी बांधला पवळा,वाण नाही पण गुण लागला.
  ३. नाकाने कांदे सोलने.

 39. केतकी म्हणतो आहे:

  खूपच छान
  बऱ्याच नवीन म्हणी कळल्या. माझी आई सांगते की तिची आजी एक म्हण वापरायची.
  “सात साडे(साडी) तरी साळूबाईचे पाय उघडे”

  • महेंद्र म्हणतो आहे:

   केतकी
   ब्लॉग वर स्वागत.
   अशा खूप म्हणी होत्या ज्या पुर्वीच्या बोली भाषेत होत्या, त्या आता आपण वापरतांना पण लाजतो. असंच राहिलं तर सगळ्या म्हणी विसरल्या जातील लवकरच.. 😦

  • Vijay Padhye म्हणतो आहे:

   हीच म्हण कदाचित अनेक भागांत विविध प्रकारे प्रचलित असेल. मी ऐकलेली आणि ऐकवलेली म्हण ‘सात साडे झाले तरी भागूबाईचे कुले उघडे’ अशी आहे. आमच्या घरी ती सर्रास वापरली जात असे. आता सभ्यतेचे बुरखे घालून असभ्य वर्तन करण्याचे दिवस आले तशी ही म्हण अनेक म्हणींसारखी लुप्त झाली.

   विजय

   • महेंद्र म्हणतो आहे:

    विजय,
    ब्लॉग वर स्वागत ..
    कोंकण , विदर्भ, मराठवाड्यातल्या सगळ्या म्हणी जर एकत्र केल्या तर मोठा कोष तयार होईल त्याचा.

    • Vijay Padhye म्हणतो आहे:

     कोकण, विदर्भ, मराठवाडा एवढेच प्रदेश घेऊन कशाला कोश करायला हवा? अस्सल कोशकार कधीच संकुचित असत नाही – विश्वनाथ दिनकर नरवणे (‘भारतीय कहावत संग्रह” – भाग १, २, ३), अ०द० मराठी (‘मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार’) ह्यांच्यासारख्या झपाटून गेल्यासारख्या काम करणाऱ्यांची नावं आठवा. इथं उल्लेख केलेले कोश पाहिलेत, वाचलेत तर मी काय म्हणतोय त्याचं प्रत्यंतर येईल.
     गमतीखातर थोड्या म्हणी इथं सांगतो:
     मराठी – आपला गू आपणास घाणत नाही; आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटे; आपले ते गोजिरवाणे, लोकाचे ते लाजिरवाणे, माझी पोर गुणाची थोर अशा अनेक म्हणींमागे प्रायः एकच संदेश किंवा भाव व्यक्त केलेला आढळतो. पण इतर भारतीय भाषांमध्ये अशाच भावार्थाच्या म्हणी आहेत की नाही? आपलें चेडूं नक्षत्तर, पेल्यालें म्हारापोरा (गोवा), दूसरे की सो चूत, अपनी कहे योनि (हिंदी), आपणुं ते हा हा, बीजानुं ते ही ही (गुजराती), निजेर छेले सोनाधन, परेर छेले दुश्मन (बांग्ला), अपणा नींगर, पराया डींगर (पंजाबी)!

 40. GURUNATH म्हणतो आहे:

  लोका कवी विठल वाघ सर म्हणजे अस्सल वर्‍हाडी म्हणी चा खजिना नणन्द आणि सुनेच्या संबंधांवर एक फारच भारी म्हण

  “ज्या गावात ननद अशे तीया (तिच्या) पादीने कनीक नाशे”!!!!!!

 41. अतूल पाटणकर म्हणतो आहे:

  भारतभरात वेगवेगळया भाषामध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळ जवळ एका अर्थाच्या म्हणी या विषयावर शरदमणी मराठेचा ब्लॉग आहे. तुम्हाला आवडेल असं वाटतं.

  http://tinyurl.com/46j8lwq

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अतूल
   ब्लॉग वर स्वागत.. तो ब्लॉग मी पाहिलेला आहे पूर्वी एकदा… 🙂 छान लिहिलंय त्यांनी . बहुतेक कुठल्यातरी पेपरला पण आलंय ते..

 42. sanjay म्हणतो आहे:

  namaskar kaka,

  kaka tumhi khup bhannat lihta, ati shahana mansa sathi ek juni mahn,

  “gira to gira mgar tag upar”.

  sanjay.

 43. jori swapnil dinkar म्हणतो आहे:

  zakasss…. kahi mhanincha purn artha mahite nhvta to kalala

 44. ajit ambekar म्हणतो आहे:

  khupach chan vatal…..

 45. zmanoj म्हणतो आहे:

  आजच्या मराठी भाषेत बरेच शब्द, जे अर्वाच्य म्हणून समजले जातात, शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित शब्द होते. त्या शब्दांचा वापर अगदी ओव्या-अभंगामध्ये देखील आढळतो. उदाहरण द्यायचे झाल्यास गंड = गांड. आज हा शब्द वापरणे म्हणजे असभ्यपनाचे मानले जाते. माझी आजी व्यंकटेश स्तोत्र (नीटसे आठवत नाही, पण बहुदा व्यंकटेश स्तोत्रच असावे) वाचायची, त्यात एक ओळ होती “… गंड-स्थळी चा तेज..”
  अशीच एक वऱ्हाडी म्हण आठवते; “आधी नवऱ्याने म्हंटले सांड आन मगे गाव म्हणते रांड”. रांड हा आजकाल अवांछित शब्द समजला जातो. पण तुकोबांच्या काही अभंगांमध्ये हा शब्द सर्रास वापरला गेला आहे. ‘तुकोबांची रांडा पोरे’ असा एक उल्लेख कुठेतरी वाचण्यात आला होता. त्याकाळी रांड हा शब्द ‘लेक’ ह्या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जायचा.
  असोत. बऱ्याच दिवसानंतर गावकीतल्या म्हणींची उजळणी झाली ह्या लेखामुळे!

 46. Shweta म्हणतो आहे:

  माझी आजी कडून आलेली एक म्हण जी सर्रास आम्ही आजही घरात वापरतो… हा फक्त घरातच.. 😦

  ” मुर्खा, मुर्खा पाय भरशील.. मूर्ख म्हणे, उचलून खाल्ले तर काय करशील..???”

  • महेंद्र म्हणतो आहे:

   श्वेता
   जुन्या म्हणी खरंच खूप अर्थपूर्ण होत्या. पण हा ठेवा आपण आता विसरलो आहोत असे वाटते . बोलण्यात जर या म्हणी वापरल्या गेल्या नाहीत तर लवकर विस्मृती मधे जातील

 47. Milind म्हणतो आहे:

  kaka, ha post me khupach diwsani vachlai. hasun hasun damlo. kityek june kisse athavale.
  ajun ek ashich mhan ali aikaNyat.

  “ain shikarila…kutra hagayala”

  thodkyat aainveLela daga. 🙂

 48. mahesh म्हणतो आहे:

  ashich ek mhan aahe..aamchi aajji vaaparte…
  ”निचाच्या गांडीत घातला पाला…गार गार लागतोय, आणि जरा घाला…”

 49. yuvrajsing म्हणतो आहे:

  lay bhari rao

 50. Siddhesh म्हणतो आहे:

  valu uthala pan sanshay mitla
  ya mhani magchi goshta kay ahe?

 51. Nitin म्हणतो आहे:

  महेंद्र ..
  छान लिखाण आहे आपले ..
  माझ्या माहितीच्या काही..
  जास्त काम लागले नि त्याची भरपाई अयोग्य झाली कि वापरली जाणारी
  उटा रेटा नि गांडीत खुट्टा
  इतर
  बोलण्यात बढाई नी चीलटा संगे लढाई
  देणे घेण कुसळआच नी Xवण मुसळआच

 52. Bhaskar Pagare म्हणतो आहे:

  BHASKAR
  KHUP MAJA ALI VACHUN ASHICH AK MHAN
  ” KHISHAT NAHI KAHI MALA MHANA BHAI”

 53. pranita म्हणतो आहे:

  khupch sundar….. mala as vatat ki ya mhani kuthetari haravat chalalya ahet…… apan apali may marathi sodun western culture kade dhavatana disto… pan he vachun punha ekda marathichi takad samajte…

 54. Tanuja म्हणतो आहे:

  भाषेलापण चव येते ती अशा म्हणीमुळे.
  छान लेख आहे.

 55. manoj badadhe म्हणतो आहे:

  पोस्ट वाचली. खूप छान लिहिले आहे. इथे लिंक दिल्याबद्दल आभार ब्लॉग वर स्वागत.. आणि आभार… ब्लॉग वर स्वागत.. आणि आभार…

 56. अभय विनायक मेहता म्हणतो आहे:

  वा महेंद्र ,मस्तच, या म्हणी वाचून उजाळा मिळाला,
  अजूनही नवीन, जुन्या म्हणींचे संग्रह मराठी भाषेत
  भरपूर मिळतील …आणि संग्रह उत्तरोत्तर वाढतच राहील ..
  “गु चा भाऊ पाद ”
  नाकाने कांदे सोलणे
  आणि बर्याच जशा आठवतील तशा पोस्ट करूच ..

 57. अभय विनायक मेहता म्हणतो आहे:

  धन्यवाद,महेंद्र ….दखल घेतल्याबद्दल …

 58. pragati म्हणतो आहे:

  wow me aaj chukun ya side var aale aani kup chan mahni vachayla milalya. thanks

 59. Arun Lakare म्हणतो आहे:

  Tumchya mhani wachalya. Khup Khup avadalya. Mala kahi suchlya ahet tya tumchya mhani madhe nahit tari krupaya tyachyat taka ( pl add it).
  1) Chambharachya mandikhali aari, aani chambhar porila mari.
  2) jyachi khawi poli tyachi wajavi tali.
  3) Naktichya lagnala satarashe vighne.
  4) Apale te bal aani dusaryache te karte
  Ajun kahi suchalya tar me parat pathavin.
  thank u.

 60. sandeep b.walvekar म्हणतो आहे:

  Va ….kya bat kya bat

 61. Bindiya म्हणतो आहे:

  Anakhi kahi mhani ji mazi aji vaparayachi
  Satara lugdi ni gand ughadi
  Divas gela retareti chandanyat kaus vati
  Navajala Gurav hagla devalat

 62. रमेश म्हात्रे म्हणतो आहे:

  काका, लेख नेहमी प्रमणे मस्त…

  “कावळ्याच्या हातात दिला करभार अन त्याने हागून भरला दरबार”

 63. पुंडलिक कोल्हटकर म्हणतो आहे:

  नमस्कार महेंद्र सर खुप छान लेख आणि म्हणी यामुळे जुण्या आठवणींना जाग आली की हो आपले आजी आजोबा सहज बोलतांना अशा काही म्हणी बोलत असत संक्षिप्त बोलीतुन मोठा आशय देत असत .
  पुंडलिक कोल्हटकर
  संगीतकार
  जळगाव

 64. ashish sawant म्हणतो आहे:

  mhani sarya mast ahet

 65. sandeep म्हणतो आहे:

  Please find
  Marathi Proverbs,Alfred Manwaring,Clarendon Press, 1899.

  He pustak eka Igraj gruhastani lihal aahe…
  Mast collection aahe

 66. Supriya म्हणतो आहे:

  आज तुमचा मी म्हणींचा पोस्ट वाचला , खूप चं आणि खूप मस्त लिहिला आहे हा पोस्ट तुम्ही… खरेच मी जेव्हा इयत्ता चौथीत होते तेव्हा स्कॉलरशिपला म्हणी वाचल्या होत्या आणि त्यानंतर आता तुमच्या या पोस्ट वर पहिल्या. वाचून आवडल्या मला , खूप जुनाट का होईना पण अर्थपूर्ण अशा आहेत, जुन्या काळातले लोक त्या वेळी अश्लील व श्लील ह्या बाबींचा विचार करत नसत ,…पण वाचताना व लक्षात घेताना ह्या म्हणी खूपच वेचक वाटतात ..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   आपल्या रोजच्या आयुष्यात ह्या म्हणी म्हणजे चवीला मीठ असते ना, तशा असतात..श्लिल अश्लिलतेच्या मर्यादा विसरल्या, तर खरंच खूप अर्थपूर्ण म्हणी आहेत या.

 67. pradip jagkar म्हणतो आहे:

  khup chan

 68. पवन निकम म्हणतो आहे:

  पोस्ट वाचली. खूप छान लिहिले आहे. काही नवीन म्हणी कळल्या………खरच मराठी भाषेमध्ये एवढा सुंदर खजिना आहे, पण दुर्दैवाने त्या खजिन्याचा वापर कोणी करत नाही. आणि हा सुंदर खजिना पुढच्या पिढीला सुद्धा उपयोगात यावा म्हणून कोणी पुढाकार घेऊन प्रयत्न करत नाही. लिंक जी दिलेली आहे, ती ओपन होत नाही.

 69. ashok dalvi म्हणतो आहे:

  khupch chhan

 70. Deepak म्हणतो आहे:

  वा फारच छान बऱ्याच माहिती नसलेल्या जुन्या म्हणी कळल्या अशीच एक माझ्या ऐकण्यातली
  म्हण
  ‘कावळ्याला केले कारभारी आणि गु आणला दरबारी’

 71. Ajitkumar Salunkhe म्हणतो आहे:

  मार्मिक भाषेचं कोंदण झाकण्यापेक्षा उलगडुन दाखवलं तर नक्किच मराठीची गोडी वाढेल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s