लॅपटॉप

लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर  लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू जोक्स पण मारून झाले होते. पूर्वीच्या काळी मराठी मासिकांमधून बॉस आणि सेक्रेटरी हे विषय इतक्या वेळेस चघळली आणि  चोथा करून टाकले होते की असे जोक्स आणि अशी नाती हीच खरी नाती असतात की काय बॉस आणि सेक्रेटरी मधे असा संशय यावा.

लॅपटॉप या शब्दाविषयी खूप आकर्षण होतं. फार दूर कशाला, आता फक्त सात आठ वर्षापूर्वीच तर या लॅपटॉपचे अस्तित्व जाणवायला लागलं होतं. चांगला दोन किलो वजनाचा असलेला तो दगड  गळ्यात बांधून फिरतांना पण   खूप अभिमान वाटायचा. आयबीएम चं नांव खूप प्रसिद्ध होतं तेंव्हा. बहूतेक सगळ्याच कंपन्या आयबीएमचे लॅप टॉप द्यायच्या आपल्या एम्प्लॉइज ला. चांगले दणकट असलेले हे लॅपटॉप्स तसेच वजनदार पण असायचे…

लॅप टॉप पण त्या कर्ण पिशाच्चा सारखाच. एकदा कानावर बसला की उतरत नाही . म्हणजे सेल फोन म्हणतोय मी. नसेपर्यंत खूप हवा हवासा वाटतो, पण एकदा एकदा हातात आला आणि एखाद्या ’च्यायला बंद का पडत  नाही हा?’ असे वाटत असते. सगळी प्रायव्हसी संपवून टाकलेली आहे हल्ली या फोनने.

सध्या तरी लोकं खोटं बोलू शकतात. म्हणजे अंधेरीला असतांना पण मी ठाण्याला आहे म्हणून सांगून टाकतात- ते कसं जमणार ३ जी मुळॆ? फोन करताना एकमेकांना पहायची सोय झालेली आहे आता ३ जी  मुळे. ही ३ जी टेक्नॉलॉजी  पण लवकरच बस्तान बसवणार  यात काहीच संशय नाही . अ्सो..विषयांतर होतंय.

अकाउंट्स मधला एक मित्र हलक्या आवाजात तो म्हणाला.  लॅपटॉप?? मज्जा आहे राव तुम्हा मार्केटींगवाल्यांची  , म्हणाला. लक्षात आलं,  एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती दूसऱ्याला मिळते आहे या मधेच असलेली असूया आहे या वाक्यात. आता काय तुम्ही लोकं घरी जाउन पण कॉंप्युटरवर गेम्स खेळू शकाल.  आयला  कसले कन्सेप्ट असतात ना लोकांचे…अरे काय म्हणजे आम्ही काय लॅपटॉप वर खेळच खेळत असतो असं म्हणायचंय का तुला? .चिडचीड  झाली नुसती.  साहजिकच आहे, जेंव्हा कॉम्प्युटर पण घरी असणं म्हणजे मोठेपणाचे लक्षण असायचे, तेंव्हा लॅपटॉप म्हणजे तर खूपच झालं. मी पण एक दिवस अभिमानाने तो दगड गळ्यात बांधून घेतला.

जेंव्हा अगदी नवीन लॅपटॉप आला होता तेंव्हा, पब्लिक प्लेस मधे लॅपटॉप सुरु करून कामं करणं ही  फॅशन झाली होती.  बसमधे किंवा ट्रेन मधे एखाद्याने लॅपटॉप सुरु केला की त्यामधे शेजारचा माणूस हमखास डोकावून पहायचा. विमानात तर अगदी एक तासाची फ्लाईट जरी असली त्यातली २० एक मिनिटॆ लॅपटॉप वर काम करणारे महाभागही होते.कॅप्टनने अनाउन्स केले  की इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू शकता, की ताबडतोब यांचा लॅपटॉप सुरु.मला तर संशय होता की लोकं काम करण्यापेक्षा आपल्याकडे लॅपटॉप आहे हे दाखवणे हा मूळ उद्देश असायचा?

एकाने तर चक्क एक स्क्रिन सेव्हरच बनवला होता, डोन्ट स्टेअर अ‍ॅट मी…

सुरुवात झाली होती टॉप मॅनेजमेंटच्या लोकांना देण्यापासून. त्यातले काही लोकं तर अजूनही फॅक्स आणि टेलेक्सच्या जमान्यातून बाहेर आले नव्हते. अजूनही इ  मेल चा प्रिंट आऊट सेक्रेटरीने काढून दिल्यावरच तो वाचायचा आणि मग डिक्टेशन देऊन त्याचं उत्तर द्यायचं असा कन्सेप्ट असणारे आमचे एक बॉस होते- आता ते रिटायर झाले आणि म्हणून तर इथे मी लिहितोय त्यांच्या बद्दल. 🙂

दूसरी फळी म्हणजे आमचा पण नंबर लवकरच लागला. घरी लॅपटॉप घेऊन जायला लागलो, तर ए आता घरच्या लॅपटॉपचं काय करणार? (??????) असा भंकस जोक मारलाच एका मित्राने. पहिल्या दिवशी लॅपटॉप घेउन जेंव्हा घरी गेलो, तेंव्हा अगदी कृत कृत्य झाल्यसारखं वाटलं. ते चांगलं अडीच किलोचं वजन पण हवं हवंसं वाटत होतं. ती लॅपटॉपची बॅग लोकल मधे जेंव्हा वर ठेवली तेंव्हा पुर्ण वेळ तिकडेच  लक्ष ठेउन होतो.

घरी पोहोचल्यावर मग मुलींनी बाबांचा लॅपटॉप म्हणून बघितला. माउस कसा असतो ते – माउस कंट्रोल करत धाकटीने पेंट ब्रश उघडुन काहीतरी केलं. लवकरच त्यांचा पण इंट्रेस्ट संपला. दररोज लॅपटॉप खांद्यावर घेउन ऑफिसला जातांना अभिमान तर वाटायचा आणि   उगीच  एक मोठेपणा पण वाटायचा.

लॅपटॉप मिळालाय म्हणजे हा एक मोठा माणूस दिसतो. अशी एक इमेज असायची. जो लॅपटॉप मिळाला होता तो इतका स्लो होता की एकदा ऑन केल्यावर त्यापुढे बसून एक मेथीची जूडी पण निवडुन व्हायची तो सुरु होई पर्यंत.

सारखी लॅप्टॉपची बॅग कॅरी करुन लवकरच खांदे पण दुखायला लागले.डॉक्टर पण हे बंद करा म्हणाले- अर्थात ते शक्य नव्हतं. तरी पण रडत खडत ते ओझं वागवणं सुरुच ठेवावे लागायचे, जसे सेल फोन म्हणजे कर्णपिशाच्च तसेच हे एक दुसरे ओझे. घरून लॅपटॉप घेऊन निघालं की मग शेवटी आपण ओझं वाहणारा बैल आहोत की काय अशी पण शंका यायला लागली होती. यावरचा उपाय म्हणजे लॅपटॉप ऑफिसमधेच ठेवणॆ, पण नेमकं घरी पण काम पडायचं आणि लॅपटॉप नसला की कुचंबणा व्हायची.

खांदे दुखणं सुरु झालं. मग दोन्ही खांद्यावर घ्यायची रुकसॅक घेउन वापरण हा उपाय सुरु केला . तेवढाच आराम.. हे असं करता करता तीन वर्ष गेली आणि नवीन लॅपटॉप दिला कंपनीने.. हा कॉंपॅकचा एक लहानसा लॅपटॉप होता. लहानसा म्हणजे अडीच किलो च्या ऐवजी दिड किलॊ चा. थोडा आराम मिळाला. तरीपण खांदे दुखी आणि स्पॉंडीलायटीस सुरू झाला की तो  काही कमी होत नाही.

या सांधेदुखी मुळे वैतागून शेवटी आता एक नविन उपाय केलाय. घरचा माझा लॅपटॉप वेगळा घेतलाय ८ इंची सोनी व्हायो-७०० ग्राम वजनाचा . ऑफिसचा लॅपटॉप ऑफिसमधेच ठेवतो. टूरला पण स्वतःचाच लॅपटॉप नेणे सुरु केलंय.

एखादी हवीहवी वाटणारी वस्तू इतकी त्रासदायक होऊ शकते हा अनुभव मात्र खूप काही शिकवून गेला आयुष्यात.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

42 Responses to लॅपटॉप

 1. Pingback: Tweets that mention लॅपटॉप | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. दिपक says:

  अगदी मनातलं बोललात… आणि याच कारणांमुळं मी ते ओझं घरी नेत नाही!
  शिवाय बाईक वर यायचं – गळ्यात ते लोढणं आणि पुणेरी वाहतुकीचा सामना – ही कसरत = नकोच नको!

  कंपनीनं “वर्क फ्रॉम होम” ही सोय दिलीय – त्यामुळं गरज पडल्यास – आपल्या घरच्या डेक्सटॉपवरुन काम करता येतं!

  • दिपक
   आम्हाला वर्क फॉम होम नाही, पण घरी पण हमखास काहीतरी काम पडतंच. शेवटी एक हार्ड डिस्क घेउन त्यात सगळा डेटा कॉपीकरून ठेवलाय.. आणि करतोय मॅनेज. पण टूरला जातांना मात्र लहान लॅपटॉप नेतो सोबत..

 3. सेम पिंच हिअर ऒलसो ! मीही तेच करतो, घरी एक डेलचं नोटबुक घेवून ठेवलय. टुरला वगैरे जाताना ते बरोबर वागवतो. पण तरीही रोज ऒफ़ीसचा डेटा यावरुन त्यावर कॊपी करण्याची कटकट आहेच. 😦

  • विशाल
   प्रोफेशनल हॅझार्ड्स म्हणायचं ह्याला बस! घरचे नेट बुक वेगळे ठेवणे हा एक बेस्ट उपाय. थोडा टायपिंगला त्रास होतो, पण चालतं…
   फक्त आउटलुक मधले जुने इ मेल्स पहाता येत नाही इतकाच काय तो प्रॉब्लेम असतो बस्स!

 4. Rajeev says:

  अरे बाबा,
  पाळलेल्या कुत्र्याच्या गल्ळ्यात पट्टा,
  गाढवाच्या पाठीवर माती भरायच झोंगळ,
  बैलाचा कासरा…….ह्यांच आधुनीक रूप म्ह्ण्जे…..

  LAP TOP…

  कींवा चांगल्या शब्दात…..(राज्रत्नानंदान्च्या भाशेत)
  गरतीच कुंकू…..
  वीठ्ठलाची तुळशी माळ….
  सन्याशाची कुबडी………..
  अभीसारकेचे केस……….ह्यांच आधुनीक रूप म्ह्ण्जे…..

  LAP TOP…

 5. Rajeev says:

  अरेच्या L A P T O P..स्पेलिंग उल्टे कर….
  “PO T” ” PAL” अर्थात पोट पाल …~”पोट पाळणारा “कींवा
  पोळपाट…(+लाट्णे) स्त्री च्या हातातून आप्ल्या हातात आलेले ???

 6. mau says:

  खरच आहे ! एखादी हवीहवीशी वाट्णारी वस्तू कशी त्रासदायक होते ह्याचा अनुभव आहे….. तशा सगळ्य़ाच हव्याशा वाट्णा~या वस्तु नंतर नकोशा होतात…………… 🙂 :d 😛

  एकाने तर चक्क एक स्क्रिन सेव्हरच बनवला होता, डोन्ट स्टेअर अ‍ॅट मी!! हे भारी..मस्त लिहिले आहे !!as usual [:)]

  • उमा
   🙂 बऱ्याच गोष्टी नकोशा होतात हे मी पण अनूभवले आहे. 😀
   पण म्हणून हव्या असलेल्या गोष्टी मिळू नये असे नाही. त्या मिळाव्या, आणि मग नकोशा व्हाव्या…
   माझी आज्जी मी खूप त्रास दिला की नेहेमी म्हणायची, तूला खूप मुलं होवोत , आणि ते पण तूला असाच त्रास देवो.. विषयांतर झालं, पण सहज आठवलं म्हणून लिहिलंय..

 7. रमेश म्हात्रे says:

  काका चार दिवसांनी नवीन पोस्ट टाकली खूप बिझी आहेत वाटत.
  एखादी आवडणारी गोष्ट इतकी कंटाळवाणी असेल, असे कधी वाटले नव्हते. बघूया आम्हाला कधी खांदेदुखीचा योग येतो.

  • रमेश

   खूप काम होतं , आणि खरं सांगायचं तर चांगलासा विषय पण सुचत नव्हता. वर उमाला दिलेली प्रतिक्रिया वाच. 🙂

 8. कॉम्प्युटर सतत हाताळायला लागल्यावर मलासुद्धा घरी कॉम्प्युटरची गरज (?) वाटू लागली. तेव्हा लॅपटॉप घेतला. कॉम्पॅक्ट, घडी केल्यासारखा कुठेही कपाटात ठेवता येणारा, कुठेही घेऊन जाता येणारा म्हणून मला तो सर्व दृष्टीने परवडला होता. अजूनही तो लॅपटॉप माहेरी आहे. आता भाऊ तो घरातला कॉम्प म्हणून वापरतो. तिकडे गेले की मीही तो वापरते, तेव्हा स्पीडमधला फरक लक्षात येतो. चिडचिड झाली की मनात विचार येतो की याच स्लो लॅपटॉपसोबत आपण तीन वर्षं कशी काढली. पण काही म्हणा, खांद्याला ते वजन लटकवून जाताना एक वेगळाच रूबाब जाणवतो. थोडं वजन होतं खरं पण काय करणार?

  • सुरुवातीला बरं वाटतं, पण नंतर मात्र खूप वैताग येतो . हल्ली वजन कमी झाल्यामुळे बरं वाटतं. पण कमी वजन असलेले नेट बुक मात्र थोडे स्लो असतात ..

 9. Gaurav says:

  या लॅपटॉपमुळॆ, आमच्या Office मध्ये गेल्या तीन महिन्यात ४ मॅनेजर्सला स्लिप डिस्कचा त्रास झाला, त्यामुळे आता कोणीच लॅपटॉप घरी घेऊन जात नाही, बर्‍याच IT कंपनी कर्मचार्‍यांना घरी बसुन काम करण्याची सुविधा देतात ते सुद्धा या लॅपटॉपमुळेच, Given an option मी लॅपटॉप न घेणच पसंत करेल…

  • गौ्रव
   सगळीकडे हाच प्रकार आहे. बहुतेक सगळ्यांनाच स्लिप डिस्क चा त्रास होतोच. मी पण आहे त्यातलाच एक.. जेवढं दूर रहाता येईल तेवढं बरं.. फारच आवड असेल तर आपला स्वतःचा घ्यावा विकत.. पण कंपनीचा घेतला की ………..

 10. rewa says:

  …………..तो इतका स्लो होता की एकदा ऑन केल्यावर त्यापुढे बसून एक मेथीची जूडी पण निवडुन व्हायची तो सुरु होई पर्यंत……..
  अरे वाः तु हे वाक्य लिहिलंयस म्हणजे तु अतिशय गुणी नवरा आहेस म्हणायचा…चक्क मेथीची जुडी निवडायला बायकोला मदत???? यावरुन एक तर निश्चित इतर कितीही सुरुवातीला हव्याहव्याश्या वाटणार्या गोष्टी नंतर त्रासदायक वाटल्या तरी तु मात्र तुझ्या बायकोचा अगदी आवडता आणि कायमच ‘हवाहवासा’ वाटणारा लाडका नवरा राहणार हं!
  महेन्द्राच्या ब्लॉगला भेट देणार्य़ा तमाम नवरेमंडळींनी शिकावं काही तरी! :))

  • केवळ मेथीच नाही,तर कोशिंबीरी साठी काकडी टोमॅटॊ चिरून देणं वगैरे कामं पण करतो मी ( शक्य होईल तेंव्हा 🙂 ) कंसातलं महत्वाचं..
   अजूनही बरंच काही करतो मी , ही पोस्ट तू वाचलेली दिसत नाही.. http://wp.me/pq3x8-1CH

 11. आमच्या हातात लॅपटॉप पडेपर्यंत सगळीकडे सुळसुळाट झाला होताच… लॅपटॉप बॅग ऐवजी बॅकसॅक येई पर्यंत घरी नाही नेला लॅपटॉप…

 12. सुदैवाने अजून तरी लॅपटॉप घरून हापिसात आणि व्हाईसव्हर्सा न्यावा लागला नाहीये कधी. त्यामुळे अजून तरी हवीहवीशी वाटणारी वस्तू हवीहवीशीच आहे. मात्र लॅपटॉप किंवा एकूणच आवडत्या वस्तूचा हा असा त्रासदायक आस्पेक्ट मस्त सांगितलात.

  • इथे पार वाट लागते. एका पायावर बॅलन्स करत लोकल मधे लॅपटॉप वागवर प्रवास म्हणजे वाईट्ट अनूभव..

 13. मनोहर says:

  महेंद्रजी, कॉम्प्यूटर नेटवर्किंगचा उपयोग करून छोट्या लॅपटॉपची कुवत नाही तरी उपयुक्तता वाढविणे शक्य आहे असे मला वाटते.

  • नेटवर्किंग साठी वगैरे चालत नसावे,.कारण अ‍ॅटम प्रोसेसर हे कम्पॅरिटिव्हली स्लो चालतं. पण आम्हाला फक्त इ मेल चेक करायला आणि डेटा स्टॊअर करायला चालून जातं. खरं सांगायचं तर स्पॉंडीलायटीसचा त्रास कमी होतो हे महत्वाचे. 🙂

 14. Pingback: लॅपटॉप | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 15. सर ,
  मला मात्र याचा फायदा झालाय, याच्यामुळे तर तुमच्या पोस्ट हॉस्पिटलच्या बेडवर झोपूनही वाचतोय

  • आजकालचे लॅपटॉप वजनाने हलके असतात, पण सुरुवातीला जे मिळायचे ते खूप वजनदार असायचे.
   लॅपटॉप चा फायदा तर आहेच- तो कसा नाकारता येईल?

 16. bhaanasa says:

  हा हा…. पूर्णपणे सहमत. आता 4G आला की मात्र सेलवर थापा मारायची सोय बंद होईल. अर्थात तो दोघांकडे असेल तरच. म्हणजे अजूनही भरपूर वाव आहे खोटे बोलायला. 😀

  मेथीची जुडी…. सुपर्णाने वाचले का रे हे? तसा तू गुणी आहेसच….. पण त्यापुढे जाऊन काकडी-टोमॅटोही … म्हणजे जरा अतीच होतयं बर का….. 😛 लॅपटॉपच्या वजनाने खांदे-पाठदुखी सुरू होतेय 😦 ही सगळी इलेक्ट्रॉनिक्स खेळणी म्हणजे अवघड जागेची दुखणी झालीत खरी…..

  • आता इथे एमटीएनएल ने सोय दिलेली आहे, पण वापरत नाही अजून तरी.. कशाला उगिच डोकेदूखी?

 17. महेश says:

  “वर्क फ्रॉम होम हि संकल्पना जरी चांगली असली तरी घरी काम होत नाही, घरचेच एवढे काम असते की आपण घरी आणलेले काम पूर्ण होत नाही ,घरी कोणीना कोणी (पाहुणे)येत असतात , घरच्यांची त्यात भर असतेच ,काय करणार ,सोयी असली तरी त्या नकोशा वाटतात, फक्त घरी आणल्याचे समाधान मिळते,

  • महेश
   पण ते नसले घरी तर मोठी पंचाईत होते. एकदा मला रविवारी पण जावे लागले होते .. घरी लॅपटॉप नव्हता म्हणून.

 18. मनोहर says:

  स्पॉंडीलायसिसचा त्रास कमी होण्यासाठी शरीराचा बिघडलेला तोल दंड, बैठका वा सूर्यनमस्कार या व्यायामप्रकारानी ताळ्यावर आणणे जरूर आहे.

 19. dropbox वापरत जा ..त्यामुळे घरी आणि office ..सगळ्या फाईल्स मस्त synch होतात..अगदी लगेच आणि काही मेहनत न करता…फक्त dropbox ब्लोच्क नको office मध्ये

  • ड्रॉप बॉक्स इतर फाइल करता ठिक आहे. पण आउटलुकचं काय? सगळ्यात मोठा तोच प्रश्न असतो.

 20. गौरी says:

  हा सिंदबादचा म्हातारा चार वर्षांपासून माझ्याही पाठीवर चढलाय. आता वर्षात आठवडाभराची सुट्टी असली कुठे बाहेरगावी जायला, तरी विचारतात लॅपटॉप सोबत नेणार ना म्हणून. 😦

 21. रोहन says:

  मला आवडतो लॅपटॉप … 🙂 मला स्वतःला लॅपटॉप पेक्षा ‘नोटबूक’ म्हणायला जास्त आवडते… गेली ४ वर्ष वापरतोय पण अतिरेक नाही… ३५ दिवसातून एकदा पाठीवर मारावा लागतो… मग घरी सुट्टीवर आलो की ३०-३२ दिवस त्याच्याकडे बघत नाही फारसा… 🙂

  • मी पण नोटबुकच वापरतोय हल्ली.फारस ग्राफिक्स वगैरे काम नसतं, फक्त नेट वापरायला पुरेसे आहे ते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s