डबा..

डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे – वेगवेगळ्या आकाराचे डबे नजरे समोर येतात..

शाळेत जातांना डबा घेउन जाणे इथून डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदीरा पासून हातात दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत  मूल जातं तेंव्हा त्याला हे माहिती नसतं की  हा डबा आता आयुष्यभर साथ देणार आहे आपली.

शाळेत पण डब्यामध्ये सरळ भाजी पोळी किंवा घट्ट वरण तेल, लोणचं   पोळी असायची. आमचे हे नको, ते आवडत नाही असे  नखरे कधीच सहन केले नाहीत आईने , आम्हाला जे हवं ते नाही, तर तिला  जे वाटेल तेच दिलं तिने  डब्यात. खूप कंटाळा यायचा रोज तेच ते डब्यातले खायला. पण खरं सांगतो- तूप साखर पोळीचा रोल आणि पुडचटणी ( उडीद, चणा डाळीची  कर्नाटकी पद्धतीची चटणी) चा रोल खूप आवडायचा.

शाळेत कॅंटीन नावाचा प्रकार नव्हता. पण मधल्या सुटीत समोर एक बाई पेरू, चिंचा, आवळे वगैरे विकायला बसायची. एक लहानशी टपरी पण होती, तिथे बटाटे वडा आणि समोसा मिळायचा. (  घरुन पैसे चोरुन खाल्लाय बरेचदा 🙂 .. आणि मग पोट भरलं की डब्याचे काय करायचं?? कारण  डबा तसाच घरी नेला तर हमखास मार  ठरलेला , म्हणून   घरी येण्यापूर्वी  डबा सरळ एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायचा. अर्थात अशी वेळ महिन्याभरात एक दोनदा तरी यायची.

कॅटल क्लास?

डब्या पासून कुणीच सुटलेलं नाही.दुर कशाला, शशी थरुर सारख्याला पण अजुन ही गुरांचा   डबा आठवतोच ( कॅटल क्लास) कॉमेंट देतांना. मुकेश अंबानी चा पण जेवणाचा  डबा घरूनच येतो म्हणतात..लहानपणी शाळेत जातांना नेलेला डबा, नंतर कॉलेज मधे पण सोबतच असतो. नोकरी लागल्यावर एकटं रहावं लागलं की मग मात्र या डब्याची साथ सुटते.  सुरुवातीला तर खूप बरं वाटतं की आता डबा नाही. हॉटेलचं मस्त पैकी खायचं.. मग सुरू होतं बाहेर चरण ( त्याला खाणं म्हणणं चुकीचे वाटते मला… चरण हाच शब्द जास्त संयुक्तिक आहे माझ्या मते) लवकरच त्या रोजच्या इडली सांबार, किंवा तत्सम  दक्षिण भारतीय खाण्याचा कंटाळा येतो,   मग आपला मराठमोळा वडा पाव / मिसळ पाव जवळचा वाटू लागतो.

सुरुवातीला तर लक्षात येत नाही, पण लवकर कमरेभोवती पँट घट्ट झाली की हे तळलेले  खाणे आता कमी करायचे.. असं स्वतःशी ठरवून आपला मोर्चा सॅंडविच वाल्याकडे वळतो. सॅंडविच हा प्रकार सुरुवातीला एक दोन दिवस बरा वाटतो, पण नंतर लक्षात येतं की ही ब्रेड पोटामध्ये घट्ट बसते, आणि   नंतर मग दिवसभर पोट जड झाल्याचे विचित्र फिलिंग देत रहाते.

नंतर मग हेल्दी फुड म्हणून हॉटेलमधे जाउन चिकन फ्राय रोटी किंवा कबाब रोटी, भुर्जी पाव, खिमा पाव  खाणं सुरु केलं जायचं. त्याचा पण  फार तर एखादा आठवड्यानंतर कंटाळा येणं सुरु व्हायचं,  आणि मग मात्र पुन्हा  आईच्या हातच्या त्या भाजी  आणि नरम पोळ्यांच्या डब्याची आठवण यायची आणि आपण काय गमावलंय   याची जाणीव व्हायची.

गेला एक आठवडा इंदौर, भोपालला   टुरवर होतो. त्यामुळे सारखं कुत्तेकी रोटी ( तंदुरी रोटी) खाणं सुरू होतं. कुत्तेकी रोटी अशासाठी म्हणतो, कारण  ती नेहेमी मैद्याची असते. अन एकदा थंड झाली की अक्षरशः रबर होते.(अर्थात कॉपर  चिमणी सारखे  अपवाद वगळता – कारण तिथे कणीक वापरतात रोटी साठी) शेवटच्या दिवशी तर इतका वैतागलो, की सरळ  घटीया ( हे एका जागेचं नांव आहे , उज्जैन पासुन १०-१५ किमी असेल) ला एका लहानशा धाब्यावर चक्क तवा चपाती आणि साधं वरण ( दाल फ्राय नाही.. साधं वरण..)  जेवलॊ.आता गेली कित्येक वर्ष म्हणजे  २५ वर्षापेक्षा  पेक्षा जास्त  दिवस झालेत, कामानिमित्त  सारखं फिरती  वर जावं लागत, पण इतका होमसिक कधीच झालो नव्हतो.आज जेंव्हा  इंदौरहुन घरी आल्यावर साधं वरण भात  तप जेंव्हा लिंबु पिळून खाल्ला, तेंव्हा जरा बरं वाटलं.

चहाचा साखरेचा चमचा

डबा पुराण खुप मोठं आहे. लहानपणी तेल आणायचं तर घरुन कडी चा डबा ( बरणी ) घेउन जावी लागायची.तो वाणी आधी त्या बरणी ( की भरणी हो??) चं वजन करायचा तुरी किंवा एखादं धान्य घालुन आणि मग तेल मोजायचा. तेलाचे प्लास्टीकचे डबे मिळत नव्हते पुर्वी.

चहा साखरेचे डबे पण आवळे जावळे असायचे . शेजारी शेजारी ठेवले की त्यापैकी कुठल्या डब्यात  चहा अन कुठल्या डब्यात साखर आहे, ते केवळ आईच सांगू शकायची. नंतर मात्र आमच्या घरी एक डबा किंचित मोठा आणला, तेंव्हा तो साखरेचा हे ओळखता यायला लागले . चहाच्या डब्यातला तो किलवरच्या आकाराचा चमचा , मी अगदी लहान असतांना पासूनचा अजुनही आमच्या घरी वापरात आहे. इथे फोटो देतोय बघा.

रिकामा डबा सापडला की डबा ऐस पैस खेळायला तर आम्हाला खूप आवडायचं. घरातुन आईचा ओरडा ऐकू येई पर्यंत खेळणं सुरू रहायचं.  एकदा तर त्या पायनॅपल स्लाइसच्या डब्याची कडा जरा तुटलेली होती, तेंव्हा बंड्याच्या पायाला जखम झाली होती त्या डब्याने. काही गोष्टी कशा आपण विसरू शकत नाही, तशीच ही पण सुमारे ४० वर्ष जुनी घटना.. बंड्याच्या पायातून रक्त आलं होतं ती..आणि मग त्याच्या आईने त्यालाच मस्त धुतला होता, कशाला गेला होतास असे रानटी खेळ खेळायला म्हणून!!

शाळेत अजुन एक डबा महत्वाचा असायचा. तो म्हणजे कम्पास बॉक्स. नेहेमी हरवला जायचा. आजीचा कुंकवाचा डबा तर नेहेमीच खुणावत रहायचा, त्यात काय इस्टेट आहे ती हाताळायची खूप इच्छा होती…

चक्की वर दळण आणण्याचा एक मोठा ऍल्युमिनियम चा डबा होता. तो सायकलला मागे लाउन कित्तेक वर्ष दळण आणलेलं आठवतं. दळण आणणं हे घरातल्या मोठ्या मुलाचं काम असायचं- नुसता वैताग असतो दळण आणणं म्हणजे…. शेवटी शेवटी तर तो डबा बघितला की संताप यायला लागला होता.

लहानपणी  आम्ही चप्पल  वापरायचो.  जेंव्हा पहिल्यांदा बूट घेतले, तेंव्हा त्याचा डबा कित्तेक दिवस सांभाळून ठेवला होता, त्या डब्यात मी पत्रं  (?) वगैरे  आणि  त्या खाली  मासिकं ( ???)  लपवून ठेवत असे…

सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचा डबा. पंधरा लीटरचा  तेलाचा डबा मिळायचा तो रिकामा झाला की  त्याचा वरचा भाग /तोंड पुर्ण मोकळे करून मग एक लाकडी दांडा आडवा  लावून ( हॅंडल म्हणून ) पाणी भरायला वापरायचो आम्ही.मी लहान असतांना यवतमाळला पाण्याचा खूप दुष्काळ होता. घरच्या विहिरीला पाणी नेहेमीच असायचं, पण ते  रहाटाने काढून भरावे लागायचे.  पाणी भरायला एक मोठा रांजण असायचा.  हा पंधरा लिटरचा डबा एकदा रहाटाला बांधला की चार पाच चकरा मधे काम संपायचं.दोन डबे दोन हातात घेतले की सरळ ३० लीटर पाणी भरलं जायचं एकदम. मोठा ड्रम पण  होता दोनशे लीटरचा.. तो आणि रांजण भरला की झालं. तेंव्हा नळ नव्हते आणि आम्हाला पुर्णपणे अवलंबून रहावे लागायचे विहिरीवरच.

मिल्क मेडचा डबा .  त्या डब्याने तर नुसता वात आणला होता..त्यावर तर एक पोस्ट आधीच लिहिलंय पा्सष्टावी कला म्हणून. अशा अनेक आठवणी आहेत डब्यांच्या पण आता थांबवतो हे डबा पुराण..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

36 Responses to डबा..

 1. sumedha says:

  महेंद्र
  तुमच्या त्या किलवर चमच्यामुळे मी क्षणात माहेरी जाऊन पोचले..आई कडे सेम चमचा आहे, चहाच्या डब्यात …
  लहान असताना वर्गात एक मुलगी डब्यात नेहमी लोणचे आणायची ..तिचे लोणचे स्पेशल असायचे,मारवाडी पद्धतीचे . मग आमचा त्यासाठी क्लेम असायचा , रोज एकीचा नंबर …
  आता रोज मुलासाठी डबा द्यावा लागतो …अर्थातच पोळी भाजीचाच अजूनही …

  • सुमेधा
   तो चमचा मी अगदी लहानपणापासून पहातोय. त्या चमच्याचा अंदाज इतका पक्का आहे की तो अजूनही बदललेला नाही . 🙂

 2. “चहाच्या डब्यातला तो किलवरच्या आकाराचा चमचा” +1….एकदा मी हट्टानी तो चमचा घेऊन पोहे खाल्ले होते …didnt feel like i am eating pohe.. 😉

  • तो आकारच इतका अट्रॅक्टीव्ह आहे की सगळ्याच मुलांना लहानपणी आवडतो तो. 🙂
   जसे पत्ते खेळतांना लहानपणी इस्पिक एक्का मलाच हवा असायचा.

   • swapna says:

    asach ka asata ki je aaplya lahanpani ghadlela asta tech jast hava havasa asta.. asa koni kadhi mhanat nahi ki bar zala buva he lahan pan gela.. ata je aahe te mast aahe.. bhutkalch nehami ramya ka vatato..
    kilvarchya aakaracha chamach aaplyala aavdto aaj kalchya stylish spoons peksha?

    • स्वप्ना
     तो चमचा अगदी लहानपणापासून पहातोय. त्यामुळे इमोशनल अटॅचमेंट्स आहेत. वर लिहिलंय हर्षदने त्याने लहानपणी त्याच चमच्याने पोहे खाण्याचा हट्ट्केला होता. आणि मग त्या चमच्याने पोहे खातांना काही फार बरं वाटलं असंही नाही. लहानपणच्या आठवणींचं असंच असतं , कुठेतरी मनात घर करून बसलेल्या असतात. हळूवार पणे त्याला कधीतरी स्पर्श झाला तरी पण खूप खूप बरं वाटतं.

 3. Pingback: Tweets that mention डबा.. | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 4. mau says:

  अरे यार..काय हे..पुन्हा एकदा माहेरी खरचं नेउन पोचवले..माझ्या आईकडे पण असाच चमचा आहे….आणि त्या कडीच्या डब्ब्यात मी पोळीचा लाडु शाळेत घेउन जायची…माझ्याकडे आहे तो डब्बा..एकटा एका कोन्यात पडलेला..त्यात मी अजुनही १-२ लाडु भरुन ठेवते…काय सुंदर आठवणी..मुलं हसतात आता..पोळीचा लाडु आणि डब्ब्यात…????पण ते खरं खाणं…मेतकुट+तेल+कांदा..अह्हा..भुक लागली की हेच…… मस्त वाटायचे. माझी पण आई भलते सलते लाड अजिबात चालवुन घ्यायची नाही…मी तर कित्येक वेळेस बाबांना म्हणायची..आई बदला हो…j/ks aprts..postman तेलाचा ड्ब्बा अजुनही आठवणीत आहे..,आणि डालडा चा लहान डब्बा आम्ही डब्बा ऐस पैस म्हणुन घ्यायचो..धम्माल..तो डब्ब्याचा आवाज ही अजुनही कानात घुमतो…हल्लीच आई कडे जाउन आले तेंव्हा तो पेढ्याचा आकाराचा डब्बा पाहिला..तसा ड्ब्बा आता बाजारात मिळतही नाही..तुम्हा कोणाला शाळेत घेउन जायची एक पत्र्याची पेटी[दप्तरा ऐवजी]आठवते का???
  जाउ दे…खुप लिहीले नं….आता जुन्या आठवणींमध्ये जाणार नाही असे बरेचदा मनाशी ठरवते..बाकी पोस्ट भरभक्कम…जिंकलेत पुन्हा एकदा..

  • लहानपणीच्या आठवणी मस्त असतात. एकटा असलो की जुन्या आठवणी खूप डॊकं वर काढतात. आता एकदा लहानपणीच्या पोस्ट्स लिहायच्या आहेत. मस्त होते ते दिवस.
   ती अल्युमिनियमची पेटी माझ्याकडे पण होती. ईट वॉज अ प्राइझ्ड पझेशन..

 5. sushma says:

  kaka thumchya blogla barechda bhet dili pan mazyapeksha vayane mothya vadildharya vyaktila kay comment dyavi hech kalat navt….pan daba pahun mala ravalch nahi…

  mazya mavsine mi 4 varshachi astana mala 1daba dilta tho daba mi khup diwas vaprala…thod moth zalyas daba chota watu lagla nanatar aaine thoda motha daba ghetala…….pan maza shaletil pahila daba mi wisaru nahi sakat…….. tho daba mala khup aavdto manun tho daba mi chaha patti sathi waprte karan thya dabychya roj samparkamadhe rahanyasathi…….

  thumch likhan khupch chan aahe jasa wel bhetal tas sadhya june lekh wachti aahe…………..thumi khuthlyahi subject var “kay wattel the” lihu sakta…………..thumacha blog margadarshak ani manoranjak aahe……………..pudhil likhanasathi manapasun subeccha……….

  • सुषमा
   सेंटीमेंटल अटॅचमेंट्स असतातच जुन्या काही गोष्टींशी. भावनिक रित्या जोडल्या गेल्यामुळे फार आत्मियता असते.
   माझा पहिला नेक टाय अजूनही सांभाळून ठेवलेला आहे- वापरत नाही तरीही….! आणि प्रतिक्रिया अगदी मोकळेपणाने देत जा.

 6. छान झाल आहे डबापुराण…पैसे तुम्ही चोरायचात आणि मेजवानी मिळायची ती त्या कुत्र्याला वा..तुम्ही ह्यातल्या डब्यांचा कधी वाद्य म्ह्णुन उपयोग केला आहे का…

  • हो, त्यावर एक पोस्ट लिहितो लवकरच. पण त्यासाठी मला ते वाद्य बनवावे लागेल 🙂 मस्त आठवण करून दिलीस. मी बोंगो बनवायचो डालडाच्या डब्यांचा. 🙂

 7. मागे एकदा हि पोस्ट पब्लिश करून काढली होती का रे??? विषय छान आहे… लहानपणी ‘डब्बा एक्स-प्रेस’ खेळायला सुद्धा खूप मज्जा यायची…

  • हो, मागे एकदा पब्लिश करून नंतर अनपब्लिश केले होते. तेंव्हा आवडले नव्हते हे पोस्ट मलाच. आता थोडं मॉडीफाय करून पुन्हा पोस्ट केलंय.
   खरंतर जितके ड्राफ्टस आहेत तेवढे सगळे आता पब्लिश करून टाकतोय. उगिच ड्राफ्ट ठेवायचे नाहीत असे ठरवले आहे. 🙂

 8. साध्या डब्यावर पोस्ट? आणि ती पण इतकी interesting? कमाल आहे तुमची काका! तुम्हाला विषय सुचतातच कसे आणि सुचले तरी इतकं मस्त कसं लिहु शकता तुम्ही? सकाळच्या चहाबरोबर तुमचा ब्लॉग वाचणे हा माझा आवडता छंद आहे. धन्यवाद!

  • अभिलाष
   मनःपुर्वक आभार. हे पोस्ट फार पुर्वी लिहिले होते, सहज जसे सुचेल तसे लिहित असतो . 🙂

 9. sahajach says:

  मान गये !!! महेंद्रजी तो चहा-साखरेचा चमचा हा भलता नाजूक विषय असतो… ते चमचे एकतर चहा आणि साखरेत गुडूप होतात मधे मधे मग ते डबे वाकडे करून ते चमचे बाहेर काढायचे आणि चहा करायचा…. ते चमचे नसले तर मी चहा करणार नाही कारण मग चव बिघडते हे आमच्या बाबांचे ठाम मत असल्यामूळे आम्ही ते जीवापाड जपतो…. चहा करण्याची बला आमच्यावर यायची नाहितर…… 🙂

  बाकि पोस्ट सहीच!!! याआधिच्या आजीच्या कुंकवाची डबी आणि पासष्टावी कला पण भन्नाटच होत्या तशीच ही पण ……..

  • तन्वी
   ते चमचे म्हणजे आईचे पण जिव की प्राण आहेत. त्या चमच्यांशिवाय चहा होऊच शकत नाही. चमचे खाली बुडले की डबा हळू हळू हलवायचा, ( डब्यातला चहा टॉस करायचा) मग चमचे वर येतात.. प्रॅक्टीसने जमते ते.

 10. काका…डबापुराण भारी झाल आहे..(नेहमीप्रमाणेच)… 🙂

 11. रमेश म्हात्रे says:

  काका,
  लेख नेहमी प्रमाणे मस्तच झालाय. बाकी तुम्हाला कोणत्याही विषयावर भन्नाट लिहिता येत.

 12. Vidyadhar says:

  काका,
  ही पोस्ट तुम्ही पूर्वी एकदा टाकून काढली होतीत काय? मला तसं स्मरतंय…
  पण पोस्ट बेस्टच आहे…पासष्टावी कला भारीच!

  • हो… एकदा ही पोस्ट पब्लिश केली होती, नंतर अनपब्लिश केली होती. आता ठरवून टाकलंय की ड्राफ्ट ठेवायचे नाही . म्हणून पब्लिश केली आत्ता!

 13. महेश says:

  लेख उत्तम झाला ,आठवनिना आपण उजाला दिला ,पूर्वीच्या डब्याचे वर्णन खरोखर आपण केले आहे, पूर्वी म्हणजे लहानपणी सर्वच लोक (घरातील )ती वस्तू जपून ठेवायचे ,आता तेच मुलांना आवडणार नाही चामाच्याचे वर्णन आपण तंतोत केले, आता तर लोक काहीना चमच्या म्हणतात ,अर्थ त्याचा वेगळा
  असतो एवढेच ,आपण केलेले वर्णन रास्त व योग्य आहे, अशाच आठवणीना उजाळा देत जा ,धन्यवाद ,

  • महेश
   हा लेख पुर्वी मलाच आवडला नाही म्हणून अनपब्लिश केला होता. पण आता वाटतं की तशी काही गरज नव्हती. बरा झाला होता लेख. 🙂
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 14. Rajeev says:

  काही ड्ब्याची आठवण राहीली…..
  अ‍ॅल्यूमिनियमचे पेटी वजा द्प्तर…त्यात लोणचे पोळीचा ड्बा..त्यातून वही सोडून नेमके ईतीहास कींवा मराठीच्याच पुस्तकावर गळलेले तेल…
  …मारामारीत चेपलेला ड्बा ( रंगीत अ‍ॅल्यूमिनियमचा )…शनीवारी न खाल्लेला व सोमवारी सकाळी बूरशी
  लागले्ली पोळी सापडणारा ड्बा…
  …२ कीलो चा गंजलेला सन फ़्लोवरचा ड्बा, आणी त्यातले काड्या पेटीचे छापे..
  …१ कीलो चा गोट्यांचा ड्बा…
  …होस्टेल वर घरून आलेला चीवडा लाडूंचा डबा…
  …राम सीतेची चीत्रे असलेला चपटा जून्या फोटोंचा डबा…
  … आईने जमवीले ल्या चील्लरचा पीतळी ड्बा..

  गेले.. ते डबे आता प्लास्टीक जमा झाले
  आता आपल्याला आजकाल बायको ही डब्यात घालते.. तो च आठ्वतो..

  • अरे आपण तो बोंगो बनवायचो डालडाच्या डब्याचा. आठवतो का? आधी डबा कापायचा खालून आणि वर न्युजपेपरचे कागद संपुर्ण कागदाला चिक्की लाउन चिकटवायचे एकावर एक. एका डब्यावर ४० तर दुसर्यावर ६०. चांगले खणखणीत उन्हात वाळले की मग त्याला तबल्यासारखे , बोंगो सारखे वाजवायचो..

   बायको डब्यात घातले, तिचा तो अधिकारच आहे. 🙂

 15. मनोहर says:

  यात ढबांऽऽय् ल्होकंय्‌ला विसरलात

 16. मस्तच लिहिलं आहेत. उगाच उडवलीत ही पोस्ट आधी..

 17. bhaanasa says:

  ए, माझ्याकडे इथे पण आहे तोच ’चमचा ’. आजीने लग्नात मला चहा साखरेचे तिचे डबे दिलेत त्याबरोबर ते चमचेही. अंदाज कधी चुकणार नाही गं तुझा. हे वर आणखी. पण खरेच आहे नं ते. एकदम पर्फेक्ट माप. आणि तो कडीचा स्टीलचा छोटासा उभट डबा. तू तर एकदम शाळेच्या दिवसात रमवलेस रे. 🙂 मस्त मस्त.

  • मला वाटतं की प्रत्येकच मराठी घरामधे तसा चमचा असावा. आमच्या घरचा मी गेली कित्येक वर्ष पहातोय. म्हणजे तो माझ्या जन्माच्या आधीपासून असावा. कडीच्या उभ्या डब्यामधे पण दोन खण असायचे एक लहानशी वाटी सारखी वर बसायची आणि मग झाकण.. आता मिळत नसावा तसा डबा.

 18. kalyani says:

  खूपच छान लेख आहे..तुमच्या ब्लोग मःधील काही लेख वाचले..संपूर्ण ब्लोगच खरोखर छान आहे..आज आईनी दिलेल्या dabbyachi प्रकर्षाने आठवण झाली..आता office मध्ये जाताना स्वतचा आणि नवरयाचा डब्बा बनवते तेव्हा समजत कि आई आपल्याला लग्नापूर्वी readymade डब्बा हातात द्यायची तेव्हा त्यात किती प्रेम ओतलेला असायचा.

 19. Aparna says:

  बरं झालं ही पोस्ट परत टाकलीत ते..मला वाटतं मीही पाहिली होती…..

  मला तो कडीवाला डबा अजुन आठवतो आणि आठवतात ते सर्व डबे जे मला वाढदिवसाच्या वेळी मिळालेले असल्यामुळे माझं नाव आणि वर्ष असं त्यावर लिहिलंय..माहेरहून ते माझे म्हणून परत घ्यावे म्हणते…अमेरिकेत आल्यापास्नं तर स्टीलचे डबे वर म्हटल्याप्रमाणे प्लास्टीक जमा झाले..पुन्हा एकदा स्टीलमय व्हावंसं वाटतं..फ़क्त इथे उठसूठ मायक्रोवेव्ह वापरला जातो आणि मग ते मायक्रोव्हवेबल प्लास्टिकच पदरी पडतं…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s