सोशलायझेशन…

आजकाल  आयुष्य इतकं व्यस्त झालं आहे की कोणालाच आपल्या मित्रांसाठी वगैरे  पण ’रिअल टाइम मधे’ वेळ काढता येत नाही. घरची काही ना काहीतरी कामं असतातच.  अगदी जिवश्च कंठश्च मित्राला भेटायच म्हंटलं तरीही कधी वेळ मुद्दाम काढावा लागतो .कधी आपल्याला वेळ असला तर त्याला वेळ नसतो किंवा  उलट पक्षी त्याला वेळ असतो तेंव्हा आपण बिझी असतो.

पूर्वीच्या  काळी बरं होतं , सोशलायझेशन म्हणजे केवळ गुरुवारच भजन एखाद्याच्या घरी असायचं आणि त्यासाठी जवळपास रहाणारे सगळे लोकं एकत्र जमायचे. मग त्या मधे हौशी कलाकार आपला गळा साफ करून घ्यायला गाणी म्हणायचे. एक फायदा असतो, अशा भजनाच्या कार्यक्रम मधे कोणीही कसंही गाणं म्हंटलं तरीही कोणी काही म्हणत नाही. कमीत कमी महिन्यातल्या चार गुरुवारी किंवा शनीवारी एकत्र भेटणे वगैरे असायचेच.कुठलं ना कुठलं कारण शोधून एकत्र भेटायचे लोकं. आजकाल काही ना काहीतरी कारण काढून भेटणं टाळतात लोकं. प्रत्येक जण आपापल्या पर्सनल स्पेस मधे गुरफटलेला असतो – कोषातल्या अळी सारखा.

या  शिवाय  प्रत्येक सणावाराला भेटी गाठी  व्हायच्या. श्रावण सोमवारी शंकराच्या मंदीरात जातांना पण आई  शेजारच्या काकूंना , ’तूम्ही येता का? असे विचारल्या शिवाय कधी  जायची नाही.

दर दोन तिन महिन्यातून एकदा दही काला हा पण कोणाच्या तरी घरी असायचाच- विदर्भात त्याला गोपाल काला म्हंटलं जातं. त्या मघे सगळ्यांनी आपल्या घरून काही तरी( म्हणजे पोहे, लाह्या, मुरमुरे, लोणची, एखादं फळ वगैरे) न्यायचं आणि मग एकाच्या घरी मोठ्या भांड्यात एकत्र करून काला बनवायचे. बरं हा दही काला हा कार्यक्रम केवळ स्त्रीयांचाच असायचा. स्त्रीयांची भजनं वगैरे झाली की मग आम्हा सगळ्या मुलांना बोलावून गालाला गुलाल लावून काला मिळायचा. त्या दही काल्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. प्रत्येकाच्या घरचं लोणचं वेगळ्या चवीच, आणि ज्वारीच्या लाह्या हा बेस असल्याने एक वेगळी चव यायची. ज्याच्या घरी काला, तो दही आणि बेस लाह्या अरेंज करणार . त्या काल्यामधल्या लोणच्याच्या फोडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. स्पेशली गोकुळाष्टमीला काला, आणि श्रीकृष्ण जन्म हा तर एक मोठा कार्यक्रम असायचा. खूप मजा यायची. रात्री उशिरापर्यंत अंगणात लगोरी किंवा धाबाधुबी खेळणे सुरु असायचे. वेगळेच दिवस होते ते..

माझं लहानपण अगदी लहान गावात गेल्यामुळे हे सगळं अनूभवता आलं.मी अगदी मध्यमवर्गीय घरामधे जन्म घेतला, त्यामुळे बहुतेक सगळे कन्सेप्ट्स आणि जिवनाच्या व्हॅल्युज अजूनही तशाच आहेत. आज जेंव्हा मुलींना सांगतो, तेंव्हा बाबा हे काय भलतंच सांगताय असे भाव चेहेऱ्यावर असतात. “तूम्ही लोकांच्या घरून वाटीमधे साखर मागून आणायचे?? असा प्रश्न जेंव्हा मोठे डॊळे करून मुली विचारतात तेंव्हा मात्र विचित्र वाटतं….

आज मुंबईला एखाद्या बिल्डींग मधे सातव्या मजल्यावर जर कोणी रहात असेल तर त्याच बिल्डींग मधे माझ्या खालच्या फ्लॅट मधे कोण रहातो हे त्याला  माहिती नसते अशी परिस्थिती आहे. माझ्याही बाबतीत ते खरं आहेच.कोणाच्याही घरी जायचं असेल तर, मुंबईला आधी फोन करुन विचारायचं की तुम्ही घरी आहात का? आणि तुमचा काही प्रोग्राम आहे का? जर उत्तर नाही मिळालं, तरंच जायचं . सुरुवातीला जेंव्हा मी मुंबईला रहायला आलो , तेंव्हा तर मला या गोष्टीचं आश्चर्यच वाटायचं , पण नंतर हळू हळू सवय झाली. लक्षात आलं की मुंबईच्या लोकांना सकाळी सात-आठ वाजता कामावर निघाले की घरी यायला रात्री ८ ते ९ वाजतात, ज्यामुळे स्वतःची पर्सनल कामं करायला फक्त रवीवारच मिळतो. आणि ह्याच कारणासाठी म्हणुन  रविवारी कोणी घरी आलेलं शक्यतो नकोसं वाटतं लोकांना.

लहानपणी कोणाही कडे जायचे असले की सहज उठुन गेलो असे असायचे. माणूस हा नेहेमीच सामाजिक प्राणी राहिला आहे. प्रत्येकाला सोशल लाइफ आवडतं. एक सांगतो, परदेशात रहाणाऱ्या  एखाद्याने समजा कार किंवा घर वगैरे   घेतलं ,की  त्याला आपलं कोणीतरी कौतूक करावं असं वाटतंच. बरेचदा असंही वाटतं की आपली ही अचिव्हमेंट आपल्या ओळखीच्या लोकांनी पहावी आणि आपलं कौतूक करावं . जर कोणी कौतूक करणारं नसेल तर त्या नवीन गोष्टीपासून आनंद काय मिळणार?? जर एखाद्या मुलीने  सुंदर ड्रेस घातला, आणि तिला कोणी विचारलंच नाही- किंवा जर तिने केस कापले, फेशिअल केलं आणि तरीही कोणी विचारलंच नाही तर तिला कसं वाटेल?? साधारण तशीच भावना असते .

मला आठवतं की मी जेंव्हा पहिली कार घेतली होती आणि घरी आणली, तेंव्हा माझ्या वडीलांच्या डोळ्यातला अभिमान आणि कौतुकाचे भाव पाहिले आणि  – बस्स! सगळ जग आपल्या पायाशी लोळण घेतंय असं वाटलं होतं मला त्या क्षणी. वडीलांच्या डोळ्यातले ते भाव आयुष्यभर विसरू शकत नाही मी.असो.

सोशलायझेशन म्हणजे नेमकं काय??  एक  गम्मत सांगतो. माझ्या लहानपणी घरी कोणी बसायला आलं आणि चहासाठी दूध नसलं की आई हातात भांड देऊन शेजारच्या काकूंच्या कडून दूध आण, किंवा वाटीभर साखर आण, किंवा कधी तरी आल्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या चार काड्या, वगैरे वगैरे अशा वस्तू मागून आणायला पाठवायची आणि त्या मधे पण कोणाला कसलाच कमीपणा वाटत नसे. नंतर मग त्याच काकूंना, दूध, साखर किंवा काय असेल ती वस्तू नेऊन दे म्हणून आई पुन्हा एकदा पाठवायची.आता चार काड्या कोथिंबिरीच्या किंवा  आल्याचा तुकडा परत देण्यात काही विशेष आहे असे नाही. पण आठवणीने परत करणे हे मात्र नक्की व्हायचं. कदाचित आजकालच्या मुलांना ह्या मधे कमीपणा वाटत असेल पण आमच्या लहानपणी हे सगळं अगदी कॉमन होतं.

शेजारचे मामा, मला बटाटे वडा आवडतो, म्हणून मग आवर्जून मला बोलवायचे आणि सोबत बसवून खायला घालायचे. दुसऱ्या काकूंना माहिती असायचं की आई आज बाहेर गेलेली आहे म्हणून, मग बरोबर दुपारच्या खाण्याच्या वेळेस स्वतःच्या मुलांच्या बरोबर आमचीही डीश भरली जायची. कुणाला काय आवडते हे सगळ्यांनाच माहिती असायचं. मला पाटॊडीची भाजी आवडते म्हणून शेजारच्या घरी केली गेली की न चुकता माझ्यासाठी घरी एका वाटी मधे यायची.आईला बरं नसलं की घरच्या सगळ्यांचं जेवण शेजारून यायचं. एक वेगळीच घट्ट विण होती संबंधांमध्ये.  काही लोकं असंही म्हणतील, की त्या काळी फ्रीझ नव्हता म्हणून दुसऱ्याकडे दिलं जात असेल वाटीमध्ये घालून. पण तसं जरी असलं, तरीही  त्यामधे एक आपलेपणा होता ,ज्याचा आजकालच्या संबंधात बरेचदा अभाव जाणवतो.

शेजार्यांच्या घरचे सगळे नातेवाईक पण माहिती असायचे. शेजाऱ्यांच्या नातेवाईकांशी पण अगदी अघळ पघळ गप्पा व्हायच्या. ते पण अगदी आपलेपणाने आपल्या घरी येऊन बसायचे गप्पा मारायला.

इंटरनेट, टीव्ही वगैरेचं इतकं काही प्रस्थ नव्हतं. टिव्ही तर अजूनही यायचाच होता. फक्त मुंबईलाच टिव्ही सुरु झाला होता तेंव्हा. टिव्ही मुळे सोशलायझेशन कमी झालं का?? मला बरेचदा तसा संशय येतो.  कधी कधी असंही वाटतं की अजूनही सामाजिकीकरणाची आवड काही कमी होत नाही माणसाची. म्हणूनच तर आपण बझ, गुगल चॅट, सोशल साईट्स वर एकत्र येऊन आपल्याला आलेला एकटेपणा दूर करायचा प्रयत्न करत असतो.  माझं स्पष्ट मत आहे, प्रत्येकालाच सोशलायझेशनची गरज असते- मग ते पुर्वीचं खरं खूरं सोशलायझेशन असो , की आजच्या युगातलं व्हर्च्य़ुअल..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

46 Responses to सोशलायझेशन…

 1. व्हर्च्य़ुअल सोशालाझेशन हे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे आहे. पण सध्या सगळेच इतके सो कॉलड बिझी झालेत की तो आनंदही खूप मजेने लुटला जातो. असो….
  सोशालायझेशन ही आपली गरज आहे हे मात्र सत्य.

  • मोठ्या शहरात तर एक वेळ समजू शकतो, पण लहान लहान गावातही मुलं ऑर्कुट वगैरे शी हुक झालेले आहेत. मित्राला भेटण्यापेक्षा स्क्रॅप्स पाठवणे हे जास्त कूल…

 2. माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे त्याला सामाजिकीकरण आवड्णारच. मात्र व्हर्च्युअल सोशलायझेशन हा प्रकार कितपत खरा मानायचा याबद्दल माझं दुमत आहे. आपण सगळे बझ्झवर गप्पागोष्टी करतो; खूप मजा येते पण याच गप्पागोष्टी जर प्रत्यक्ष भेटून केल्या तर त्याचा अनुभव वेगळा आणि चांगला असेल. बझ्झवरसुद्धा गप्पागोष्टी रंगतात त्या सर्वजण एकमेकांना आता व्यवस्थित ओळखू लागलेत म्हणून. पण एखाद्या पोस्टला लाईक करणं किंवा Wow, great सारख्या प्रतिक्रिया म्हणजे सोशलायझेशन असं मी मानत नाही. व्यक्तीचा व्यक्तीशी सुसंवाद असणं महत्त्वाचं, मग ते व्हर्च्युअल असो वा अ‍ॅक्च्युअल. पण व्हर्च्युअल मधे हा सुसंवाद थोडा कमीच पडतो असं मला वाटतं.

  • कांचन च्या मताशी पुर्णपणे सहमत आहे.

  • Meenal says:

   खरंय..!

  • अगदी बरोबर..
   सुसंवाद हा असायला हवा.. मग तो व्हर्च्युअल असो की अ‍ॅक्च्युअल.
   सोशलायझेशन म्हणजे स्वतःच्या स्पेस मधे दुसऱ्याला (शेजाऱ्याला , मित्राला ) सेफ प्लेस देणे. जर आपण ती देऊ शकत असू, आणि जर तो मित्र आपल्या स्पेसचा योग्य वापर करत असेल तर ते बेस्ट् सोशलायझेशन.

 3. अगदि मनातल लिहलत.तुम्ही लिहलेल्या बरयाचश्या गोष्टी मी सुदधा थोड्याफ़ार फ़रकाने अनुभवलेल्या आहेत.ते खरं खूरं सोशलायझेशन, ते ऋणानुबंध,ती आपुलकी आता हरवु लागली आहे.शेजारी किंवा नातेवाईकपेक्षा टीवीवरील कार्यक्रमातील पात्रांची दु:ख आजकाल लोकांना जास्त लागतात.माझही उदाहरण घ्या. मी इथे नेटवर लोकांशी जितका संपर्कात आहे तितका आमच्या बिल्डींगमधल्या लोकांशीही नाही….

  • टिव्हीवरच्या पात्रांची दुःख.. अरे हो, त्या टिव्ही च्या कार्यक्रमाच्या वेळेस जरी कोणाचा फोन आला तरीही लोकं अस्वस्थ होतात बघ. इथे मुंबईला लोकं रात्री आठच्या आधी घरी येत नाहीत. त्यामुळे फक्त रविवारच असतो शिल्लक, आणि त्या दिवशी घरची कामं असतात………..
   बिल्डींगच्या लोकांना पण वेळ नसतो ना आपल्या साठी.

 4. अजय. says:

  मनातल लिहीलय.
  प्रत्येक जन्माष्टमीला विदर्भातल्या न विसरता येणार्‍या गोपाळ काल्याची आठवण येतेच. आजच पोस्ट वाचताना तर ती अतिशय तीव्रतेने जाणवली. मी पण विदर्भातलाच असल्याने लहानपणी त्या गोपाळ काल्याची चव अनुभवली आहे. आई सोबत भजनाला गेलो होतो कि नाही हे आठवत नाही मात्र भजनाच्या शेवटी गोपाळ काला मात्र “पोटभर” खाल्लेला आहे. घरोघरुन येणारा जिन्नस एकत्र केल्यावर तयार होणारा काला मला तर अमृताहून आवडायचा.
  काला प्रसाद म्हणुन न खाता इतका खायला जायचा कि त्या रात्री जेवण बादच असायचे.
  सोशलायझेशनच्या बदललेल्या संकल्पनेत अशी मजा कशी अनुभवायला येणार. मित्रांना भेटायला वेळ नाही, घरच्या लोकांशी संवाद नाही तर इंटरनेट वर न बघितलेल्यां सोबत गप्पात मन कसे रमणार ?

  अजय.

  • अजय

   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
   “काला प्रसाद म्हणुन न खाता इतका खायला जायचा कि त्या रात्री जेवण बादच असायचे.”- माझं सुध्दा…
   इथे ब्लॉगर्स मिट केली होती मुंबईला, त्यामुळे बरेच लोकं छान मित्र झालेत. अगदी घरी येणं जाणं पण सुरु झालंय. त्यामुळे कदाचित गप्पा मारतांना खूप मोकळेपणा वाटतो. ज्या लोकांना अजून भेटलेलो नाही त्यांच्याशी पण फोन वर वगैरे गप्पा होतातच-
   आयुष्य हे असंच चालायच… .

 5. Vidyadhar says:

  काका,
  शंभर नंबरी बोललात एकदम!
  अगदी माझ्या लहानपणीही आमच्या इमारतीत थोड्याफार प्रमाणात अशी सहज ये जा, सहजीवन अस्तित्वात होतं..
  आता मात्र पुरतं नामशेष झाल्याचं जाणवतं!
  सोशल साईट्सच्या बाबतीत तुम्ही म्हणता तेच खरं…माणूस सोशलायझेशनच्या दुधाची तहान ताकावर भागवतोय!
  चालायचंच! कालाय तस्मै नमः!

  • या जगात कोणीही एकटा राहूच शकत नाही. अगदी धिरूभाईला पण आपला एखादा सुऱ्हद असावा असे वाटतच असेल. अमिताभ बच्चन म्हणुनच त्या अमरसिंगला घेउन फिरत असतो.. 🙂

 6. काका….अगदी मनातल लिहल आहे…माझ्या शेजारच्या फ़्लॅटमध्ये कोण राहत आहे हे अजुन मला माहित नाही….लहानपणी आम्ही वाड्यात राहयचो…तिथे जे सहजीवन अनुभवल त्याची उणीव नक्कीच भासते…

  >>माणूस सोशलायझेशनच्या दुधाची तहान ताकावर भागवतोय!
  चालायचंच! कालाय तस्मै नमः!+१

 7. Seema Tillu says:

  लहान गांवातच नाही तर मुंबईसारख्या शहरात सुद्धा असेच वातावरण होते.चाळींमधून किंवा वाड्य़ांमधून सर्व घरांची दारे दिवसभर उघडी असायची.त्यामुळे लोकांशी सहज संबंध ठेवला जायचा.आता चाळींमधूनही घरांचॊ दारे बंद असतात. मला वाटतं, की माणूस हल्ली स्व्केंद्रीत झाला आहे. त्यातून आता इंटरनेटमुळे तर माणूस आणखी कोशात गेला आहे. प्रत्येकाचे सोशल कॉंटॅक्ट्स आता फोन व नेट या यंत्रांच्या मदतीनेच होतात. वेळ नसल्यामुळे व्यक्तिश: भेटी होणे कमी झाले आहे.

  • सीमा
   ब्लॉगव र स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार. तुमची ही पहिलीप्रतिक्रिया असल्याने नियंत्रण मधेगेली होती. काल दिवसभर मी पण नेट वर नसल्याने अप्रुव्ह करु शकलो नाही.इंटरनेट आणि टिव्ही हे दोन मुख्य शत्रू सोशलायझशनचे..व्यक्तिशः भेटण्य़ाचे.
   मोठ्या शहरातून तर आहेच पण लहान गावामधे ही असेच सुरु असते. याच ब्लॉग वर पुर्वी एक लेख लिहिला होता. इंटरनेट चे गुलाम म्हणून. त्यामधली शेवटची कॉमेंट खूप बोलकी आहे. एका लहान गावातल्या मुलीची ती कॉमेंट आहे.

 8. mau says:

  k
  कांचनशी अगदी सहमत…सुंदर लिहिले आहे…..

 9. Meenal says:

  अघळ पघळ वागण्यातली लज्जत वेगळी..
  सोशलायझेशनचा मार्ग बदलला असेल, पण प्रयत्न तोच आहे.
  फरक नक्कीच पडलाय, खळखळून हसण्यात आणि hahaha लिहण्यात आहे तितकाच! 🙂

  • फरक नक्कीच पडलाय, खळखळून हसण्यात आणि hahaha लिहण्यात आहे तितकाच!
   वाह… क्या क्या बात है…
   🙂

 10. एकदम सत्य वचन काका:)
  आपण आता सोशल नेटवर्किंग वर्चुयलच आहे..
  जुने दिवस गेले जेव्हा शाळेचा, कॉलेजचा कट्टा भेटायाच ठिकाण असायच पण आता… 😦

  • अजूनही वेळ गेलेली नाही असे मला वाटते. काही लोकं अजूनही व्यक्तिशः भेटायलाच जास्त प्रिफर करतात- -किंवा आपणच जर ते सुरु केले तरीही सहज शक्य आहे.

 11. Prasad Rokade says:

  नमस्कार महेन्द्र,
  नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर लेख. मला वाटतं आपल्या वयातल्या (वयोगट ४० -५० वर्षे) सर्वांच्याच भावना तू अतिशय चपखल पणे मांडल्या आहेत. पण यातही माझा अनुभव असा आहे कि पुरुष अजुनही आपलं सोशल लाईफ पुर्वी सारखं राखण्याचा प्रयत्न करतात. पण बायका मात्र त्याला विरोध करतात. मित्राकडे फोन न करता जायला मला तरी अजुनही आवडतं, बायको मात्र स्ट्रिक्ट्ली विरुद्ध असते. मुलांविषयी तर बोलायलाच नको.
  शेजार्‍यांकडुन काही मागणे म्हणजे तर महाअपमान समजला जातो. अर्थात बर्‍याच वेळा शेजारी देखील काही मागितले तर असे काही तुच्छ्तेने पाहतात कि मागणारा परत ते धाडस करत नाहि.

  • प्रसाद
   पुरुष अजूनही सोशल लाइफ सांभाळण्याचा प्रयत्न करतो . पण मित्राकडे जातो म्हंटलं की हातामधे पिशवी देऊन , आधी भाजी आणून द्या, किंवा तत्सम घरगुती कामं मागे लावायची ही पध्दत अजूनही बहुतेक घरी दिसून येते.

   शेजाऱ्यांशी संबंध हा मुख्य मुद्दा आहे. हल्ली संबंधच संपलेले आहेत. अगदी शेजाऱ्याच्या घरात कोणी वारलं तरीही कोणी येत नाही पोहोचावायला. ही वस्तूस्थिती आहे. मी यावर पण लिहिणार आहेच एक लेख. नुकताच घेतलेला अनूभव.

   सध्या सौ ला. तापामुळे द्वाखान्यात अ‍ॅडमिट केलेले आहे. एकही शेजारी आला नाही विचारायला काही मदत हवी का म्हणून. मी एकटा सुटी घेऊन दवाखान्यात दिवस भर बसलेला असतो. तेंव्हा हे जे शेजारधर्माचे लिहिले आहे तेप्रकर्षाने जाणवले.

   • Smita Ghaisas says:

    Very true. An extreme case of this was once represented in a spoof in some commedy show- a mid-thirtees couple goes around the town and go about their work as usual while carrying the dead body of an elderly relative because they don’t have the time to cremate him and no one helps them either…then a salesman approaches them and sells an ” instant cremator”- and poof goes the body- no traces no ashes no bother… dark humor onviously, but can we ignore the harsh reality??

 12. नशिबाने मी राहतो त्या भागात सोशालायझेशन अजून तरी आहें. तुम्ही लिहिलंय त्याच प्रमाणे मुलं एकमेकांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन येतात. शेजारधर्म अजून तरी पाळला जातो. महिन्यातून एकदा तरी आम्ही मित्र एकत्र जमतो आणि नुसत्या गप्पा टाकतो. पण मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आणि टावर संस्कृतीत ह्या गोष्टी लुप्त होत चालल्या असाव्या. तसे असेल तर वाईटच आहे.

  • निरंजन
   नशिबवान आहात. इथे प्रत्येकच जण आपापल्या कोषात गुंडाळल्या गेला आहे.. 😦
   मित्रांमधे चकाट्या पिटण्यातला आनंद मात्र खूप वेगळाच असतो.. खूप मिस करतो त्याला.

 13. अतिशय चपखल पोस्ट.. हे शेजाऱ्यांकडून मागून आणणं, त्यांना परत नेऊन देणं, आपल्या घरी काही विशेष केलं असेल तर त्यांना नेऊन देणं वगैरे प्रकार लहानपणी खूप केलेत.. गम्मत म्हणजे आमचे (इथले) आत्ताचे शेजारीही मराठीच आहेत.. त्यामुळे ही अशी भाज्यांची देवाणघेवाण अजूनही होत असते 🙂 ..

  पण हो… पूर्वीच्या काळचे ते नाके, कट्टे, पत्ते झोडणं, जागरणं, एकत्र पिक्चर बघणं, मॅचेस बघणं सगळं सगळं जवळ जवळ संपलंय 😦

  • हेरंब’
   शेजारी मराठी आहेत, आणि ते संबंध टिकवून आहेत??
   आमच्या इथे मराठी असलेले शेजारी पण तुटक वागतात. समोर दिसला तर काय कसं काय? बस्स एवढंच.. 😦

 14. Nachiket says:

  उत्तम लेख..

  चाळीत लहानपण गेलं त्यानंतरही लहान गावात आम्ही स्वत:च्या घरी कमी आणि मित्रांच्या घरी जास्त पडीक असायचो. पण त्यात दुसरं टोक गाठलं जायचं. म्हणजे नो प्रायव्हसी अबसोल्यूटली.

  एकाच्या घरी पाहुणे आले (रिक्षा थांबली) तरी सर्व बि-हाडातली डोकी लगेच बाहेर..कुजबूज..कोण आहेत हे..कोणाकडे आलेत.. हो का? कशाला? ..अश्शी भानगड आहे होय..?? तरीच मला वाटलंच.. असल्या भोचक चर्चा सतत होत असायच्या.

  सर्वांच्या खिडक्या कॉमन गॅलरीत..हवेला दुसरी खिडकी नाही. म्हणून ती उघडी. मग गॅलरीतून पास होणारा प्रत्येक जण अगदी प्रत्येक वेळेला आपल्या खिडकीतून डोकावणार. आपल्या पानातला मेनू बघणार..प्रसंगी त्यावर टिप्पणी करणार. घरातले वास घेणार.काहीवेळेला तेही अतीच होतं..

  एखादे वेळा उसने ठीक आहे (विरजण वगैरे)..पण ती उधारी उसनवारी करणा-या बायका त्याचा मनात हिशेब ठेवून एकमेकींना टोमणे मारायच्याच. वरचेवर उसने मागायला लागण्यात एकतर गरिबी (ती ठीक आहे एकवेळ), किंवा घरच्या सामानाच्या मॅनेजमेंटमधली कमालीची गाफीलता दिसते हे कोणाला जाणवायचेच नाही.

  सोशलायझेशन म्हणजे हजार लोक वगळून इतरांची खाजगी पातळीवर निंदा हेच ब-याचदा दिसते..

  सुवर्णमध्य कशाचाच सापडत नाही.

  • नचिकेत
   अगदी खरं खरं सांगतो, हा लेख मी स्वतः हॉस्पिटल मधे बसून लिहिला आहे. सौ. अ‍ॅडमिट आहे, आणि अशा वेळी शेजाऱ्यांचे वागणे पाहिले आणि खटकले.. जुने दिवस आठवले एकदम. सामाजिक समरसता जी पुर्वी होती ती आजकाल कमी झालेली दिसली. जे मला जाणवलं, तेच इथे शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. 🙂

 15. Nachiket says:

  Sorry..

  “सोशलायझेशन म्हणजे हजार लोक वगळून इतरांची खाजगी पातळीवर निंदा हेच ब-याचदा दिसते..”

  Corrected as:

  “सोशलायझेशन म्हणजे “हजर लोक” वगळून इतरांची खाजगी पातळीवर निंदा हेच ब-याचदा दिसते..”

 16. महेश says:

  लहानपण गावी गेल्यामुळे तेथील आठवण येते आयुष्यातील पाने चालताना आपल्या ब्लॉगचा छान उपयोग होतो ,प्रत्येक गोष्टीची मागोवा घावल्यास पाहिजे .पूर्वी माणुसकीची जान होती ,आता पण आहे पण कमी प्रमाणात आढळते ,.काळ बदला आहे.त्याप्रमाणे
  सोशलायझेशननवातावरण पण बदले आहे सर्वगोष्टीत बद्दल झाला आहे ,पिढ्यान पिढ्या असा बद्दल होताच राहणार ,पण आपण चांगलाच फरक स्पष्ट केला व नवीन पिढीला जाणीव करून दिली या बद्दलआपणास धन्यवाद

 17. काका लेख खूप छान आहे. माझे बालपण सुद्धा कोल्हापुरातल्या एका खेड्यातच गेले. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

  • प्रथमेश
   धन्यवाद.. जूने दिवस नूसते आठवले, तरीही आताचे दिवस फेस करायला एकदम मानसिक ताकद येते. नेमकं तेच करायचा प्रयत्न केलाय.

 18. हेमंत आठल्ये says:

  माझ्या गावी अजून असंच चालत. म्हणजे अगदी मी गावी गेलो. आणि आई घरी नसेल. घराला कुलूप असेल तर गल्लीतील इतर घरातील कोणी ना कोणी असतेच. मग तिथे अगदी नाश्त्या पासून जेवणं पर्यंत अगदी घरच्यासारखे बिनधास्त सगळी होते. पण यात कुठेही म्हणजे माझ्या आणि त्यांच्यात दुरावा/ राग /त्रास नसतो. आणि असंच त्यातील एखाद्याच्या घराला कुलूप असेल ते सुद्धा माझ्या घरी हक्काने येऊ शकतात. शहरातील समाज हा.. सोडा. सगळे फक्त दुसरा शत्रू ह्याच नजरेने पाहतो. म्हणजे यात त्यांचीही काही चूक नाही. पण पुण्यात आल्यापासून गाव किती चांगला आहे याची कल्पना येते.

  • हेमंत
   जेंव्हा आपल्याला माणसांची गरज पडते,आणि नेमके तेंव्हा कोणीच जवळ नसते, तेंव्हा जूने दिवस आठवतात. सध्या मला पण फार गरज होती माणसांची, सपोर्टची…. म्हणून हे पोस्ट लिह्लं गेलं.

 19. poojaxyz says:

  namskar, baryach divsani tumchya blogla bhet dili,blog navyaane design kelaa aahe, ANIKET chyaa walnaavar gelaat vaate 🙂 🙂 🙂
  aso,haa blog waachun mala aamchya PAACHVICHYAA MARATHI PUSTKATIL “SNEHI” yaa dhadyachi aathvan zaali:)mastach zaalaa haa blog!

  • पूजा
   इथे फार लिमिटेड डीझाइन्स आहेत वर्ड्प्रेसवर. त्यामुळे तीच ती डिझाइन्स बहुतेक ठिकाणी वापरलेली दिसतील. 🙂

 20. meharsha says:

  sir
  ekdam patal , pan mumbait sudha mazya lahanpani asech watwaran hote pan halli saglech badalale aahe.

  • हर्षा
   प्रतिक्रियेसाठी आभार.
   सध्या सौ.ची तब्येत बरी नाही, आणि नेमके शेजाऱ्यांचे वागणे बोलणॆ पाहिले तेंव्हा जून्या आठवणी दाटून आल्या, आणि मग हा लेख लिहिला.

 21. ngadre says:

  Are bap re. Hospitalization karave lagle? Kasha ahet ata sou.

  After we communicated that day,I was little worried and anxios to know.

  In my comment I was just meaning that there is no good balance of privacy and socialization.

  I have seen konkan and ghat both regions and found that this nose poking attitude is most in konkan and least in Kolhapur,sangli etc.

  To add to it..I request you informally to call me anytime on anyday as a friend for any help. I am going to communicate my number to you in email. This is my first step to socializing with you and family.

 22. ganesh says:

  tumache lekha karach chagale and realistic aahet….

 23. रोहन says:

  अरे… तुझ्या काय अगदी आत्ता-आत्ता माझ्या शालेय जीवनात देखील मी शेजारून साखर वगैरे आणणे असे प्रकार केलेले आहेत. गेल्या १०-१२ एक वर्षात सर्व चटकन बदलले असे वाटते मला… 🙂 पुर्वीचं खरं खूरं सोशलायझेशन असो , की आजच्या युगातलं व्हर्च्य़ुअल……. चालायचंच.. वेळेप्रमाणे गोष्टी बदलणारच…
  मला स्वतःला पण लोकांना भेटायला, त्यांच्याकडे जायला, घरी बोलवायला आवडते. म्हणून तर सुट्टीवर आलो की मी उनाडक्या करत उनाडत असतो… 😀 मस्त पोस्ट…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s