जे कोणी नेट वर असतात – नेट म्हणजे – फेस बुक, ऑर्कुट , किंवा माबो कर, मिपा कर, मिम, उपक्रम कर असतात ते सगळे एका कॉमन विकाराने ग्रस्त असतात , तो म्हणजे व्हर्च्युअल इगो. कसलं डेंजर वाक्य लिहिलंय मी. जवळपास नेट वरच्या प्रत्येकालाच या लेखात गोवलय कळत – नकळत.
मी स्वतः पण याच विकाराने ’अती’ग्रस्त आहे म्हंटलं तरीही चालेल. आज पर्यंत एक वर्ष आणि नऊ महिन्यात या ब्लॉग वर काय वाटेल ते वर ४९९ लेख लिहून झाले आहेत . जवळपास दर दोन तीन दिवसा आड एखादी तरी पोस्ट असतेच. मी इतक्या अनियमित पणे नियमित लिहिलं आणि ते पण ४९९ पोस्ट्स – ही गोष्ट इथे मुद्दाम लिहिणं म्हणजे पण एक प्रकारचा इगोच आहे. जर मला एखाद्या दिवशी आज लिहायचे काय? हा प्रश्न पडला किंवा कम्प्लिट ब्लॅंक आऊट झालं तर मात्र तो दिवस माझा खरोखरचा इगो दुखावणारा असेल- व्हर्च्युअल इगो नाही. असो..
तेवढंच नाही… तर प्रत्येकाचच एक व्हर्च्युअल व्यक्तिमत्त्व असतं. पुर्वी विविध भारतीवर एक टेकाडे भाऊजींची मालिका रोज लागायची . त्या पैकी एकही पात्र पाहिलेले नव्हते, पण तरीही प्रत्येकाची एक विशिष्ठ इमेज मनामधे निर्माण झालेली असायची. प्रत्येकाच्या मनातली मीना वहिनी ची इमेज किंवा टेकाडे भाऊजींची इमेज ही निरनिराळी असायची.
बरेचदा कामानिमित्त तुम्हाला लोकांशी फोन वर बोलावं लागतं, त्याचं फोन वरचं बोलणं ऐकुन पण त्या माणसाविषयी ची एक विशिष्ठ प्रतिमा तयार होते. त्या प्रतिमेरूप ती व्यक्ती असावी अशी एक किमान अपेक्षा असते. तर आपल्या त्या अपेक्षित रुप म्हणजे त्या व्यक्तीचे तुमच्या दृष्टीने व्हर्च्युअल स्वरूप ! एखाद्या व्यक्तीचे व्हर्च्युअल स्वरूप जे माझ्या दृष्टीने आहे, ते तुमच्या दृष्टीने असेलच असे नाही .. किंवा ती व्यक्ती आपल्या खऱ्या आयुष्यात त्या माझ्या मनातल्या रुपाला अनुरूप असेलच असेही नाही. हा कन्सेप्ट खरं तर सौ. ने एकदा सांगितला होता, तेंव्हापासून डोक्यात बसलाय.
बऱ्याच सोशल साईट्स वर लोकं आपलं खरं रूप बाजूला ठेऊन व्हर्च्युअल नांव घेउन वावरतात ( बरेचसे खऱ्या नावाने पण असतात ). इथे तुम्हाला खरं कोणी ओळखणारं नसतं, तेव्हा तुम्ही कशी भाषा वापरता कसे वागता यावर काहीच निर्बंध नसतो. इथे तुमच्या व्ह्र्च्युअल रुपाची कालांतराने एक इमेज तयार होते , ज्या इमेजची तुम्ही अगदी प्राणपणाने रक्षा करता. मग त्या व्हर्च्युअल नावाचा पण झालेला अपमान तुम्हाला सहन होत नाही.
अगदी साधी गोष्ट आहे- एखाद्या सोशल साईट वर तूम्ही काहीतरी लिहित असता, कॉमेंट्स देत असता किंवा आपले विचार जसे जमतील तसे मांडत असता. बरीच अशी संस्थळे आहेत अशा सोशलायझेशन साठी.वाद- संवाद सुरु असताना एकदम हमरीतुमरी वर येऊन भांडणापर्यंत कधी जाऊन पोहोचतो तेच कळत नाही बरेचदा !
इथे कोणीच समोर नसतो. कोणीही एकमेकांना ओळखणारा नसतो. आणि इतके असून सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या मताच्या विरुद्ध जर काही कॉमेंट्स पडल्या तर तो एकदम अपसेट होतो – अहो, तुमची आयडी ही व्हर्च्युअल नावाने घेतलेली, म्हणजे तुम्ही स्वतः नाही तरी सुद्धा अशा परिस्थितीत जर कोणी काही बोललं तर व्हर्च्युअल इगो हर्ट होतोच. बरेचदा तर एखाद्या मुद्यावरून वाद विवाद सुरु झाल्यावर तो गुद्यावर कधी येऊन पोहोचतो हे सांगता येत नाही. तिथे पण व्हर्च्युअल फ्रेंड्स असतात ते अशा प्रसंगी तुमच्या व्हर्च्युअल व्यक्तीमत्वाची मदत करतात . कुठल्याही प्रकारे अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीमत्वाचा इतका प्राणपणाने केला जाणारा सांभाळ.. आणि त्याचा सांभाळला जाणारा ’इगो’ म्हणजेच व्हर्च्युअल इगो.
अशा ठिकाणी खऱ्या नावाने वावरणाऱ्यांचा थोडा कोंडमारा होतोच.. कारण एक ठरावीक लेव्हल च्या खाली जाऊन लिहिता येत नाही- स्वतःची समाजातली एक प्रतिमा असते, तिच्या कडे दुर्लक्ष करून चालत नाही म्हणून! कोणी अपमान केला , तर तो खऱ्या व्यक्तीमत्वाचा असतो व्हर्च्युअल नाही .
मी अशा संकेत स्थळांच्या विरोधात अजिबात नाही- ती प्रत्येकाची पर्सनल गरज ,आवड आहे. माझं वजन जर ५० किलॊ असेल तर मला व्हर्च्युअल जगामधे १२० किलोचा हेवी वेट बॉक्सर म्हणून पण वावरता येतं. एखादी अगदी सर्वसामान्य रुपाची मुलगी स्वतःच्या ऑर्कुट प्रोफाईल वर स्वतःचं वर्णन हे एखाद्या सिनेमा नटी प्रमाणे करते, आणि फोटो मधे एखाद्या सुंदर नटीचा फोटॊ लावते, तेंव्हा लोकांना ’तिचा फोटो’ हा नाही हे माहिती असूनही शेकडॊ रिक्वेस्ट्स येतात- आणि ती आपलं व्हर्च्युअल जगातली सौंदर्यवतीच सुख उपभोगून घेते. थोडक्यात म्हणजे अशा व्हर्च्युअल आयुष्यात बऱ्याच फॅंटसीज ची पुर्तता करून घेतांना दिसतात लोकं- आणि म्हणूनच ( मी जरी अशा साईट्स वर जात नसलो तरीही ) मला ह्या साईट्स आवडतात- लोकांना आपली स्वप्न जगण्याचं एक ठिकाण म्हणजे अशा साईट्स .
अगदी सरळ धोपट भाषेत सांगतो, तुम्ही एखाद्याल फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, आणि त्याने, तिने ती नाकारली की तुमचा व्हर्च्युअल इगो हा दुखावला जातो . किंवा जर तुम्ही एखाद्याच्या फ्रेंड लिस्ट मधे आहात, आणि एक दिवस लक्षात आलं की त्याने तुम्हाला त्याच्या फ्रेंड लिस्ट मधून काढुन टाकलं तर किंवा ट्विटर वरच्या तुमच्या फॉलोअर्स पैकी काही तुम्हाला सोडून गेले, किंवा तुमची फ्रेंड्स लिस्ट अकस्मात पणे कमी व्हायला लागली तर व्हर्च्युअल इगोला ठेच पोहोचतेच.
फेस बुक वर जास्तीत जास्त फ्रेंड्स असणे म्हणजे व्हर्च्युअल इगोचे लक्षण आहे. कालच ट्रेन मधे एक मुलगा आपल्या मित्राला सांगत होता की कुठल्यातरी टिव्ही अॅकटर ला अॅड केलं म्हणून. असे आपल्या ओळखीचे नसलेले सिनेमा, नाटकाचे कलाकार, किंवा संगितकार, गायक वगैरे आपल्या फ्रेंड्स लिस्ट मधे असणं हे मोठेपणाचे लक्षण समजलं जातं.जास्तीत जास्त असे कलावंत फ्रेंड्स लिस्ट मधे असणे हे व्हर्च्युअल इगो सॅटीस्फाय करणे नाही का?? अशा गोष्टीतून काही खास मिळतं असं नाही. मी स्वतः असे लोकं अॅड करण्यापेक्षा खरे खरे माझ्या सारखे लोकं मित्र म्हणून अॅड करणे जास्त पसंत करेन.
बरेचदा असंही वाटतं की मी जे लिहितो ते स्वान्त सुखाय..पैशा साठी नाही. मी जे मनापासून लिहितो, माझा ब्लॉग हा आयटी क्षेत्राशी निगडित नाही. एकही पोस्ट आयटी शी रिलेटॆड नाही, माझं एकही पोस्ट हे साहित्यिक व्हॅल्यु असलेले नाही याची मला पुर्ण कल्पना आहे, तरी पण मी लिहिलेल्या माझ्या प्रत्येक पोस्ट वर माझं प्रेम आहे. अहो मनापासून लिहिलं आहे प्रत्येक पोस्ट . म्हणूनच जर एखाद्या पोस्ट ला कोणी आवडलं नाही असं म्हंटलं, किंवा काय रटाळ लिहितोस असं म्हणून दुर्लक्षित केलं – तर व्हर्च्युअल इगो दुखावला जाईल का??
जाऊ द्या… बस्स संपवतो इथेच, नाहीतर भलतंच काही तरी लिहिलं जाईल… मनात आलं ते लिहून टाकलंय इथे. कोणाच्या भावना दुखवायची इच्छा नव्हती लिहितांना … तुमच्या व्हर्च्युअल व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देऊन पोस्ट संपवतो हे.
रच्याक.. हे ५०० वं पोस्ट बरं कां…. 🙂
मला वाटतं व्हर्च्युअल इगो हा आय.डी.मुळे निर्माण होत असला तरी तो त्या व्यक्तीशीच निगडीत असतो. दोन दिवसांपूर्वी मला कुणीतरी जीटॉक वर अॅड करून घेतलं आणि नंतर माझं नाव विचारलं तेव्हा व्हर्च्युअल इगो हर्ट झाला की त्याने नाव न विचारता मला अॅड केलं म्हणून आश्चर्य वाटलं, हे सांगता येणार नाही पण भुवया उंचावल्या, कुणीतरी इतक्या दिवसांनी नाव विचारलं म्हणून.
व्हर्च्युअल इगो सारखाच व्हर्च्युअल जेलसी नावाचाही एक प्रकार अस्तित्वात आहे. मी हल्ली रोज त्याचे चट्के सहन करत असते. कधी कधी असं वाटतं आपण ब्लॉगिंग करतो की युद्ध खेळतोय.
अरे! ५०० वी पोस्ट?! हार्दिक अभिनंदन! शेवटचं वाक्य दिसलं नाही..
व्हर्च्युअल जेलसी.. खरंय .. ते पण बऱ्याच प्रमाणात असतं. पण त्याचा अजूनतरी अनूभव घेतलेला नाही.
महेंद्र
मस्त विषय हाताळला आहे. टेकाडे भावजी चे उदाहरण एकदम फिट्ट. आणि टोपण नाव न घेणाऱ्यांची ऑनलाईन बुक्काबुक्की करताना होणारी कुचंबणा, सर्व काही छान मांडल आहे.
तुमच्या लेखांना साहित्यिक व्ह्याल्यू नाही म्हणता, पण साहित्यिक व्ह्याल्यू म्हणजे नेमके काय? खूप साऱ्या उपमा अलंकार वापरले, बोजड शब्द वापरले पण ते लिखाण मनाला भिडलेच नाही तर काय उपयोग? तुमच्या लिखाणाचं साहित्य मूल्यन वाक् पंडितांना करू दे. आम्हाला तरी तुमचे लिखाण आवडते बुवा!
निरंजन
अहो टेकाडे भाउजींची मालिका वपू लिहायचे त्याकाळी. आणि आम्ही न चुकता ऐकायचो ती. मजा यायची.
ते साहित्यिक बद्दल लिहिलंय ते एका कॉमेंटच्या संदर्भात आहे. मला एक क~ऒमेंट आली होती की मी इथे ब्लॉग वर लिहून मराठीचे अपरिमित नुकसान करतोय म्हणे.. तो संदर्भ डोक्यात होता लिहितांना..
शुभेच्छांसाठी आभार.
perfect article.
Khoop divas hech vichaar manaat hote. Tumhi mast shabd rup dilat.
By the way..
svant sukhaay lihito he ardhech barobar..svaant madhe end in itself asa arth yeto.
He lihine sva sukhaay(svaant navhe) aani vaachakansaathi suddhaa asatech..mag koni kahi mhano..
Otherwise lihoon diary t thevale asate. Publish nasatech kele.
संस्कृत कोणाला येतं इकडे.. काही तरी मोठ्या लोकांच्या लिखाणात ब्लॉग वर वाचून तेच शब्द वापरतो झालं.
मूळ उद्देश हा आपले विचार कोणीतरी वाचावे असा असतोच.. त्यात काहीच संशय नाही.
500 post badal abhindan kaka …….
hmm ego problem barech problem nirman karato…….
ज्यो
धन्यवाद.. शुभेच्छांसाठी आभार.
Abhinandan
Virtual ego…agadi khara aahe…sarwa muddyanshi sahamat!
Manali
Thanks for the comment…
500 post baddal abhinandan. Kaka, tumch mhanan agdi khar ahe. Tumchaya khas lekhanictun sakarlela shabdik rup je amhala pan mandavas vatatay… Lok Apale khot nav, agdi mahiti pan khoti takun va photo suddha khotach barr ka..asha social sites var takun kay sadhya kartat kay mahit? Tumhi mahanta tas aplaya fanatasis purna kartat kinva apali swapn jagtat. Pan hi lok he ka visartat ki as karun apan phakt kshanik anand milavato. Apanach apalya manala fasavat asto. Mag ha so called virtual ego dukhavnyach karanch kay? kadhi asha sites var kharach changli manse bhetatat, pan tras denarech ani ase khot vagnarech jast. thanks once again…
अगदी बरोबर… हा क्षणिक आनंद , म्हणा किंवा क्षणभरचा मोठेपणा. केवळ याच साठी सगळा खटाटोप असतो तो..
अगदी अगदी उत्तम लेख.. अगदी मनातलं लिहिलंत.. या सगळ्या तुंबळयुद्धात माझेही व्हर्च्युअल/पर्सनल इगोज दुखावले गेले आहेत. आपले प्रत्येकाचेच गेले आहेत.. पण तुम्ही ते शब्दांतून अतिशय अप्रतिम मांडलंत.
५०० नोंदींबद्दल हा हा अ.. !! लवकरच तुमच्या ५००० व्या पोस्टवर कमेंट टाकण्याचं भाग्य आम्हाला लाभो हीच सदिच्छा !!
हेरंब,
५०००० अभी तो बहूत दूर है.. काही सांगता येत नाय .. जमतं की नाय ते… तरीपण प्रयत्न करूच..
लय झ्याक भाऊ,
हिथ एक एक पोस्ट लिहीणे अवघड वाटते अन तुमी ५०० पोचलात. लय भारी. काय मनाव तुमास्नी. लयच ग्रेट ते काय मनतात ते.
भाऊ तुमी जे काय बी लितात ते आमाले सर्वास्नी लयच आवडते. समद्यायले ते आवडलेच पायजे. पन तुमी आज खरच लय भारी लिहीला राव.
तुमाले टेकाडे भावजी भेटले का नाय ते ठाव नाय पन मले गेल्या वर्सी आपले नागपुर आकासवानीचे बालविहारचे अरविंद मामा भेटले हुते. लय झ्याक वाटला त्या दिवसी. लय दिवसांनी मामा भेटले ! ते बी ठान्यालेच रायतत.
टॆकाडे भाउजॊ, तुमच्या आई वडीलास्नी मालूम असन.. टिव्ही वाल्या जनरेशनले थेचं काही माईती रायनार नाई.. ते सिरियल टीव्ही च्या सुरुहोण्यापूर्वी फक्त रेडीओ वर असायचं..
सुभेच्छांसाठी आभार..
हबिणंदण दादानु, लेख मातुर न्हेमीसारकाच झ्याक झालाया बरं . आवाडला आमास्नी 😉
विशाल
मनःपुर्वक आभार ..
माज्या तर गेल्या येक वर्षात समद्या मिलुन पन्नासबी जाल्या नसतील. हा तशा कव्ता गेल्यात संबराच्यावर…, पर बाकी लिखान तसं ५० च्या आताभायीरच बगा 😉
होतील.. नक्की होतील. थोडी कन्सिस्टन्सी असू द्या…
अगदी बरोबर आहे. मनातलं बोललात. व्हर्चुअल इगो आणि पुराणातील सूक्ष्म शरीर ही संकल्पना यात थोडाफार साधर्म्य वाटतो. तसे अजूनही शक्य आहे ते. पुराण काळात दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी त्याचा वापर ऋषी मुनी लोक करायचे. तसे त्याच अर्थाचा पण तंत्रज्ञानावर आधारलेला हा ‘व्हर्च्युअल’ अवतार. आपला आयडी/टोपणनाव हा देखील सूक्ष्म शरीराप्रमाणे आहे अस मला वाटते. काय वाटते तुम्हाला?
हेमंत
पुर्वी सुक्ष्म शरीर माहिती गॊळा करण्यासाठी वापरलं जायचं. हे टोपण नांव मात्र लोकांना त्रास द्यायला वापरायची टेंडन्सी जास्त दिसते…
हा हा…मस्त पोस्ट आहे….वेगळा पण सर्वांनाच (तसा) माहित असलेला विषय…बाकी सगळं तर आहेच सध्या मी काम करते त्यात हे virtual पण जास्त आहे…सुरुवातीला ज्या काही चार पाच लोकांना भेटले त्यानंतर सगळा मामला virtual त्यामुळे जास्त लिंक झाली ही पोस्ट मला….. थोड रिस्की असतं virtual world मध्ये काम करायचं
हे सोशल साईट्स,अगदी ब्लॉगवर पण काही लोक नसलेल्या गोष्टी स्वत:ला लावून घेतात आणि मग त्यांच्या त्या अपेक्षांचा अप्रत्यक्ष त्रास आपल्याला होतो.
अरे हो पाचशेवार अभिनंदन…उद्या ट्रेकला साजरा करा…
अपर्णा
ट्रेक झाला. But could not keep body with soul.
पणआजपासून पून्हा वेट रिडक्शन प्लान सुरु केलाय.. 🙂
काका,
सर्वप्रथम ५०० बद्दल अभिनंदन!!!!!!
आणि ही एकदम जबरदस्त पोस्ट आहे! विषय एकदम मस्त मांडलात! मस्तच! 🙂
विद्याधर
धन्यवाद.. सगळ्यांनाच माहिती असलेला विषय.. कधी ना कधीतरी याचा उपद्रव झालेलाच असतो सगळ्यांना…
gr8 !!!मस्त विषय हाताळलात……….एक से एक उदाहरणे……सहीच एकदम !!!
टेकाडे भाउजीं ची मालिका म्हणजे प्रपंच नं…लहानपणी ऐकेलेली आठवतेय..मस्त होती…
बाकी व्हर्च्युअल ईगो बद्दल एकदम पटेश !!!!
५००…………..gr8…………………अभिनंदन !!!
बरोबर.. ती मालिका म्हणजे पुन्हा प्रपंच.. लेखक वपु..
आठवण करून दिल्याबद्दल आभार. फार कमी लोकांना त्या बद्दल माहिती असेल. टिव्ही जनरेशनला तर अजिबात माहिती नसावं त्याबद्दल..
अभिनंदन केवळ ५०० व्या पोस्ट साठी नाही. तर तो उत्साह व आनंद टिकून आहे. स्वांत सुखाय लिहिताना इतरांनाही त्या आनंदात सहभागी करुन घेतल्याबद्दल.
महेंद्र तुमच्या विषयी असुया युक्त आदर वाढतोय बरका? दृष्ट काढुन घ्या!
प्रकाश
धन्यवाद.. अहो आपल्याच माणसांची नजर लागत नसते बरं कां..
अजून तरी उत्साह टीकून आहेच. बघू कुठपर्यंत चालतं ते..
जो पर्यंत लोकं वाचताहेत , तो पर्यंत लिहित रहायचं.. लोकांनीवाचणं कमीकेलं की मग लिहिणं पण बंद..
parava tumachi ek post vachali… nokarini mala kai dila?… mala vatat ki tumachya nokarini tumhala ha blog dila.. karan tumhi itake firata.. mhanun mag itaka sagla pahayla milta tumhala.. loka bhetatat veg-vegali.. khana pina hota veg-vegala.. mag tumhala gharchyanchi aathvan yaycha chance milto.. jeva tumhi ghari yeta teva mag samrasun gharatalya goshti enjoy karta.. ajun hi ase jagata mhanun sensitive aahat.. mag tumhala aajubajula ghadanarya goshti lagech bhavtat..janvatat.. mag tumhi tyavar lihata..lokana kalava mhanun..ha sensitivitychach ek prakar..
mhanunch tar aaj 500 vya post paryant aalat.. aani 2 lakh 92 hajar something kalcha aakda hota total visits cha..aaj 293,569 aahe…
tumacha swabhav, jadanghadan, lahanpan, aai-baba, bayako, muli, mitra aani nokari sudhha.. sagalch karanibhut aahe..
tumhala shubhechha… ata 300000 visits cha tappa gatha lavkar…
स्वप्ना
कदाचित ९ ते ५ असा जॉब असता तर इतकं व्हॅरीएशन आलं नसतं लिखाणात हे मात्र खरं. खूप निरनिराळे लोकं भेटले आयुष्यात मार्केटींग मधे असल्याने ! त्यचाच ही इम्पॅक्ट आहे लिहिण्यावर बराचसा. तिन लाख च्या जवळपास पोहोचलो आहेच. कदाचित या८-१० दिवसात होतील असे दिसते.
महेंद्रजी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन…. 🙂
आणि हेरंब म्हणतोय त्याप्रमाणे लवकरच तुमच्या ५००० व्या पोस्ट वर कमेंट टाकायचे भाग्य मिळो!!! 🙂
बाकि नुसतीच ही माझी पाचशेवी पोस्ट असे न करता एका मस्त पोस्टच्या शेवटच्या वाक्यात तुम्ही तो उल्लेख केलात यात तुमचे मोठेपण दिसतेय…. लिहीत रहा आम्ही वाचतोय!!!
तन्वी
जेंव्हा लिहिणं सुरु केलं होतं. तेंव्हा घेतलेले पहिले पाऊल इतहपर्यंत पोहोचबेल असे कधिच वाटले नव्हते.. लिहिणे तर सुरु ठेवणार आहेच फक्त अशी वेळ येऊ नये की लिहायला काही विषयच नाही म्हणजे झाला..
Mahendraji, ego is always VERY REAL, it’s just the expression that is through a virtual medium these day:-)
good going, congrats. (” RAchyak, 500 vee post”- )
स्मिता
ते रच्याक काय आहे माहिती आहे का?? बाय द वे.. चे शब्दशः मराठी भाषांतर.. हेरंबने केलेले रस्त्याच्या कडेने..
शुभेछांसाठी आभार.
अभिनंदन !!!पोस्ट एकदम भारी झालीये.पण सोशल नेट्वर्किंग साईट वर तुम्ही जे लिहिलत की फक्त लिस्ट वाढवली जाते तर ते हि असेल पण माझे स्वत :चे अनेक असे मित्र-मैत्रिणी आहेत की जे या साईट वरच मला भेटले पण आमची छान मैत्री झाली.कोणीही माझ्या क्षेत्राशी संबंधित नसताना ओळखीचे झाले.त्यामुळे या साईट चा उपयोग चांगला करायचा की वाईट ते आपल्याच हातात असत न ??
(विषयांतर झाले असावे असा माझा अंदाज आहे.पण या पोस्ट वरून काय वाटल मला ते सांगितलं )
आणि हो फक्त ५०० नाही तर ५०००० पोस्ट पण वाचायला आवडतील हो !!!!!!!
स्वप्ना
ब्लॉग वर स्वागत.. माझं पण सोशल साईट्स वर अकाउंट आहेच. अशा सोशल साईट्स वर वाईट लोकं असतात असे म्हणणे नाही माझे. पण खोट्या नावा आड लपणारे लोकं मात्र माझ्या पसंतीला कधिच उतरत नाहीत.
जेंव्हा कोणी खोटं नांव घेत, तेंव्हा स्वतःच्या खऱ्या आयुष्यात जे करू नये असे ्शिषठ संकेत आअहेत, ते पण करुन पहाण्याचा प्रयत्न करतात लोकं…
माझा अनूभव – ब्लॉगिंगच्या माध्यमातून मला जास्त मित्र मैत्रिणी मिळाल्या , कालच आम्ही २५ ब्लॉगर्स ट्रेक ला गेलो होतो. इथे एकच फायदा आहे, सगळे खर्या नावाने वावरतात, त्यामुळे जास्त सेफ वाटतं. आम्ही सगळे प्रसंगी भेटत असतो काही काम असो किंवा नसो, तरीही कुठेतरी भेट होतच असते..
“याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याच हातात असतं ..” हे वाक्य अगदी शंभर टक्के खरं आहे. लोकांना ओळखण्याचा एक सिक्स्थ सेन्स मुलींना असतोच.. पण.. तरीही लहान मुलींना धोका असतोच. एक लेख लिहिला होता पुर्वी. इंटरनेटचे गुलाम .. तो वाचला का?? याच ब्लॉग वर आहे. सर्च विंडॊ मधे सर्च करु शकता..
५०० व्या पोस्ट बद्द्ल अभिनंदन.
धन्यवाद… !! 🙂
when do you work, sir ????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
राजीव..
जेंव्हा तू टिव्ही पहातो तेंव्हा मी लिहितो, आणि जेंव्हा तू काम करतोस, तेंव्हा मी पण कामंच करतो.. 🙂
hya comment mule mala ugcih tya diwashi tumhi majhya blog war ek shanka wicharli hoti na ki IT wale kaam kadhi kartaat?? te aathwale..tumchya mitrala majhya post chi link dyayla hawi….:)
बरोबर.. सांगतो आता..
mahendra kaka,
500 post zalyabaddal ABHINANDAN……
aasch thumch likhan wachayla bhetav hi apksha karte………..
post nehmi pramane chan aahe………..
सुषमा
मनःपुर्वक आभार.. शुभेच्छां मुळेच तर लिहिण्याचा उत्साह टीकुन आहे. नाहीतर कधीच बंद पडला असता हा ब्लॉग..
५०० व्या पोस्ट साठी अभिनानंदन 🙂
अश्याच काहीश्या गोष्टी मांडणार हिंदू मधला लेख
http://www.thehindu.com/sci-tech/internet/article625076.ece
स्मीत
धन्यवाद. छान आहे लेख..आधी वाचला असता तर यातले काही मुद्दे घेता आले असते..
वर्चुअल आयडेनटीटी हि खरच आता इगो बनली आहे… आणि हो ती प्रत्येक जन जपण्याचा प्रयत्न करतोच…
५०० व्या पोस्ट बद्दल अभिनंदन!!
आताच एक बातमी वाचली इसकाळ वर … ओर्कुट वर ‘बॉम साबाडो’ नावाचा virus attack झाला आहे तर.. सोसिअल networking जरा जपून…
पूर्ण बातमी साठी इसकाळ ला भेट द्या…
मला पण बऱ्याच कमेंट्स आहेत याच्या .. काय करतो हा व्हायरस?
अगदी खर लिहलत…मी सुदधा हयाला अपवाद नाही, खुप वेळा घेतला आहे हयाचा अनुभव…
५०० व्या पोस्टबद्दल खुप खुप अभिनंदन, ….साहित्यिक व्हॅल्यु वैगेरे काय ते माहीत नाही बुवा आपल्याला पण तुम्ही जे लिहता ते वाचायला आवडते.तेव्हा असेच काय वाटेल तेच लिहत रहावे.शुभेच्छा..!!!
देवेंद्र
धन्यवाद.. प्रतिक्रियेसाठी आणि शुभेच्छांसाठी आभार..
अभिनंदन! आता लवकरच ‘सहस्रपोस्टदर्शन’ होऊन जाऊ दे 🙂
गौरी
जर शक्य झालं तर का नाही?? तुमच्या शुभेच्छा आहेतच, आणि जर उत्साह टिकला तर नक्कीच होतिल सहस्त्र पोस्ट्स..
वेगळा विषय पण नेहमीप्रमाणेच मस्त. “व्हर्च्युअल” विषयावर ५०० व्या खर्याखुर्या पोस्टबद्दल अभिनंदन.
सिद्धार्थ
शुभेच्छांसाठी आभार..
५०० व्या पोस्टबद्द्ल अभिनंदन…नेहमीप्रमाणेच एक वेगळा विषय हाताळला आहे.
प्रज्ञा
धन्यवाद..
५०० पोस्टसाठी हार्दिक अभिनंदन!!
धन्यवाद..
खूप चागला लेख लिहीलय, आपण खरच नतमस्तक झालोय वाचून !! तुम्ही कोण नी काय आहात हे लोकांनी सांगणे आणी आपण त्यांना पटवून सांगणे यातच खूप फरक आहे जर त्यांना पटले नाही तर मग माझ्यात ला मीच खूप जाचक ठरतो .मी ही खूप उशीरा आलोय आपल्यापाशी पण यातूनच न्यानार्जन होईल असे वाटते. ५०० ब्लोक साठी शुभेछा.अजून यावर दोन झीरो हवेत नी मी ते वाचावेत
संतोष
धन्यवाद… सध्या नेट वर नाही त्यामुळे लिहिण्य़ास उशिर होतोय.
रच्याकने ५०० झाले सही!!! 🙂
अरे ह्या बाबतीत मी स्वतःला जरा मोकळाच सोडलाय… 🙂 किती पोस्ट पडल्या, कमेंट्स किती आल्या आणि किती विझीतार्स आहेत ह्या सर्वच गोष्टींची खरच चिंता नाही मला…. बराय… 🙂