पत्रिका …

बाहेरून कार पार्क करून नेहेमीप्रमाणे लेटर बॉक्स उघडला , आणि त्यामधील पत्रं बाहेर काढली. आजकाल पत्र येणं तसं कमीच झालेले आहे. पत्र येतात ती फक्त बॅंकांची किंवा शेअर्सच्या संदर्भातली. या पार्श्वभूमीवर ते एकुलते एक ‘पोस्ट कार्ड’ लक्ष वेधून घेत होते. कार्डावरचा मजकूर चक्क  प्रिटींग प्रेस मधून छापून घेतलेला दिसत  होता.

कार्ड वाचायला सुरुवात केली, आणि एकदम हसूच आलं. कार्ड होतं एका मित्राच्या वडीलांच्या मृत्यु संदेशाबद्दल- आणि तरीही हसू?? काहीतरी चुकतंय ना??   आमच्या कडे विदर्भात कोणी वारल्यावर तेरवीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याची पद्धत आहे. काही विशिष्ट समाजात तर बऱ्याच लोकांना पत्रिका पाठवून बोलवायची पद्धत असते.

कार्डातला मजकूर होता, ” आमचे येथे आमचे तीर्थरूप श्री नारायणराव उर्फ नानासाहेब यांच्या मृत्यु प्रीत्यर्थ (??) तेरवीचा समारंभ करण्याचे ठरवले  आहे, तरी आपण सर्वांनी अवश्य जेवणास यावे ही विनंती. आणि शेवटी लिहिले होते मुहुर्त:- (……….)  !!!!!!आता एखादा माणूस वारल्यावर त्याबद्दल तेरवीचा “समारंभ”?? साधं सरळ ’तेरवीचा कार्यक्रम ’ आहे असं लिहिलं असतं तरीही चाललं असते. मुहुर्त?? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय??  पत्रिके मधे कुठला शब्द वापरावा याचे भान सुटले की असे होते.

पत्रिका हा आजकाल तर एक धंदाच झालेला आहे. लग्न ठरलं की प्रिंटींग प्रेस मधे जायचं आणि हव्या असलेल्या विषयावरची पत्रिका  त्या प्रिंटींग प्रेसवालयाला मागायची. तो त्याच्याकडे आजपर्यंत प्रिंट झालेल्या पत्रिका ज्या एका छानशा अल्बम मधे लावून ठेवल्या आहेत -तुमच्या पुढे सरकवतो. तुम्ही आवडलेलं डीझाईन त्याला सांगितलं की मग पुढचं सगळं सोपं असतं. लोकं फक्त डिझाईन अप्रुव्हल ला भरपूर वेळ लावतात, मॅटर जुन्याच एखाद्या पत्रिकेवरचं फक्त नावं बदलून छापलं जातं. मॅटर मधे काही चुका असतील तर त्या तशाच पुन्हा रिपीट केल्या जातात, म्हणूनच ह्रस्व दीर्घाची एकच चूक बऱ्याच पत्रिकांवर दिसून येते. कधी तरी एखादा उत्साही कलाकार आपल्या पत्रिकेचा मजकूर स्वतः लिहितो – तेवढाच काय तो एक विरंगुळा.

मध्यंतरी  शिवाजी महाराजांच्या काळातल्या प्रमाणे कापडावर छापलेला खलिता पण पाठवायची पद्धत होती. बरेच लोकं तशाच  पत्रिका छापायचे.  एका सुंदरशा केशरी रंगाच्या कपड्यावर लग्न पत्रीका छापून मग तिला एका काडी भोवती गुंडाळून वर रेशमी दोऱ्याने बांधून पाठवायचा प्रकार होता तो. याच सुमारास कमीत कमी ६ पानी पत्रिका पाठवायचे फॅड पण निघाले होते. मारवाड्यांच्या लग्नात तर पाणी-ग्रहण लिहिले असते. हे पाणी ग्रहण म्हणजे काय? हा प्रश्न तर कित्येक वर्ष सुटत नव्हता . भलतंच काहीतरी संशय यायचा  वाचतांना 🙂 !

बरं ते असो . पत्रिकेवरचा मजकूर पण खूप छान असतो, कधी तरी, ” श्रीबाबामहाराज यांच्या  कृपेने  आमचे घरी सौ… हिला सुपुत्र प्राप्त झालेला आहे , आता तो या जगात आल्यावर त्याला काहीतरी नांव द्यावेच लागेल ना, म्हणून त्याच्या नामकरणाचा कार्यक्रम ( इथे समारंभ चालला असता शब्द 🙂 ) आयोजित केलेला आहे, या शुभ प्रसंगी आपली आणि  सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे.. आता ही पत्रिका वाचल्या बरोबर माझ्या मनात  (१) हे बाबामहाराज  कोण हा प्रश्न मला पहिले पडतो??  (२)आणि यांना मुलं व्हायला ’बाबामहाराजांची कृपा”  का बरं लागली असावी हा प्रश्न पण पडतो .. विनोदाचा भाग सोडून द्या.. पण असे अर्थाचे अनर्थ निघतात पत्रिका वाचताना.

“नामकरण विधी” ची पत्रिका पण येते बरेचदा. इथे सरळ सरळ बारशाची पत्रिका म्हणता येईल, पण नामकरण विधी हा हमखास वापरला जाणारा शब्द! ( यात ’विधी”  हा शब्द वाचला, की मला ’प्रातर्विधी’ हा शब्द का आठवतो हेच समजत नाही) .

आमंत्रण आणि निमंत्रण या मधे पण बरेचदा लोकांचा खूप घोळ झालेला असतो. एकदा मला एक लग्नाची पत्रिका आली होती त्यावर पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात  “आमंत्रण” असे  लिहिलेले होते. पहिल्याच घासात खडा यावा तसे वाटले एकदम.

पत्रिकेतल्या मजकुराबद्दल तर न बोललेलेच बरे.. पत्रिकेच्या वर कोपऱ्याला एक हळदीचे बोट लावलेले असते – का ते माहिती नाही, पण कदाचित पद्धत म्हणून असेल. वर श्री भुतोबा प्रसन्न, वेताळेश्वर प्रसन्न, म्हसोबा प्रसन्न किंवा अगदी  शनीमहाराज प्रसन्न असं काहीही असू शकते. शनीमहाराज प्रसन्न हे तर माझ्या एका मित्राच्या पत्रिकेत होतं लिहिलेलं,  शनीची साडेसाती आहे, म्हणून पंडीतजींनी शनीमहाराज प्रसन्न लिहायला सांगितलंय असं तो म्हणत होता. अखंड बालब्रह्मचारी प्रसन्न हे पण एका लग्नाच्या पत्रिकेवर वाचल्याचं आठवतं.

पत्रिकेत किती नावं असावी याला पण काही धरबंद राहिलेला नाही. अजूनही गावाकडल्या लग्नात , आमचं नांव पत्रिकेवर नाही म्हणून आम्ही लग्नाला येणार नाही असं म्हणून रुसून बसणारे लोकं पण असतात.पत्रिकेच्या शेवटी सगळे काका, मामा, मावशा वगैरे नांवं लिहून झाले की  रिंकू , पिंकू, मोना, राजू, वगैरे मुलामुलींची नांवं…. आणि ’ काकाच्या लग्नाला नक्की यायचं हं……… असाही एक सूर लावलेला असतो. अगदी सुरुवातील जेंव्हा अशी पत्रिका पाहिली, तेंव्हा कौतूक वाटलं होतं, पण नंतर जवळपास प्रत्येकच पत्रिकेत असाच साचेबद्ध मजकूर दिसू लागल्यावर मात्र कंटाळवाणी व्हायला लागली.

“कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, पण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे” हे वाक्य पण वाचलं की मला संताप येतो. का कोणास ठाऊक पण फार उद्धट वाक्य वाटतं मला हे. (कदाचित नसेलही… पण मला वाटतं). काही लोकं लग्नाच्या पत्रिकेला अगदी  एखाद्या सार्वजनिक उत्सवाच्या पत्रिकेचे स्वरूप देतात. म्हणजे  पत्रिकेत एका बाजूला “कार्य वाहक ” म्हणून ८-१० नांवं दिलेली असतात, आता  लग्न कार्यामधे हे कार्य वाहक म्हणजे कोण ???   बरं एवढ्यावरच थांबत नाही, तर खाली पुन्हा प्रमुख उपस्थिती  आणि त्याखाली पुन्हा नावं… कमीत कमी १० तरी!!!!एखाद्या  राजकीय पक्षाचे कार्य असल्यासारखे वाटते अशी पत्रिका पाहिली की!

पूर्वीच्या काळी बरं होतं. आपलं सरळ काम असायचं.. मजकूर साधारण पणे असा असायचा:- आमचे येथे श्री कृपे करून आमची ज्येष्ठ सुपुत्र राघव याचा शरीर संबंध गोरवाडीचे चे त्र्यंबकराव यांची सुकन्या ची. सौ, का. गोदावरी हिज बरोबर , मार्गशिर्ष महिना,गुरुवार, शुध्द द्वादशी   शके १८९० या दिवशी गोरज मुहुर्तावर ( किंवा ब्राह्म मुहूर्तावर)  करण्याचे योजले आहे.तरी आपली उपस्थिती सहकुटुंब सहपरीवार प्रार्थनीय आहे” कशी अगदी सरळ   कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेली पत्रिका .. मी स्वतः पाहिलेली आहे अशी पत्रिका आजोबांच्या पोथीमधे.

लग्नाची पत्रिका किंवा मौंजेची  तेच आपलं थ्रेडींग सिरेमोनी हो… ती पत्रिका जर इंग्रजी मधे असली  की  त्यात इतरांना काय कार्यक्रम आहे ते समजावे म्हणून जे काही लिहिले असते, ते वाचले, तर ज्याला मौंज म्हणजे काय  घे माहिती असेल तरीही तो पण   विसरून जाईल असे वाटते. कैच्याकै लिहितात पत्रीकेमधे.

काही वेळेस  खाली लिहिलेले असते बरेचदा , की “योर प्रेझेन्स इज अवर ब्लेसींग्ज” !! मला तर कायम भिती असते की  कधी चुकून  “योर प्रेझेंट्स आर अवर ब्लेसींग” असं छापण्याची चूक त्या प्रिंटरने केली तर काय होईल?  मराठी लोकांमधे हल्ली इंग्रजी पत्रिका छापायची पद्धत निघालेली आहे.  ऑफिस मधे देण्याची पत्रिका  ( सगळे ऑफिसचे लोकं मराठी असले तरीही) इंग्रजीत छापली जाते. मग त्या मधे पण वाचतांना खूप करमणूक होते. जसे सौ. कां. चे इंग्रजीत  chi. sou. kan. – असे लिहिले जाते. हे वाचताना ’ सौ कान ’ असे इतर भा्षिक वाचतात, आणि  मग इतर भाषिक लोकांची ह. ह. पू. वा. होते. इंग्रजी मधे पत्रिका तर असते, पण मग वर गणेश प्रसन्न शेजारीच मल्हारी मार्तंड प्रसन्न , आणि त्याखाली मग अजून पाच देवांना प्रसन्न करूनच पत्रिकेचे लिखाण सुरु केलेले असते. पत्रिकेत एका बाजूला प्रोग्राम या हेडींग खाली  घटिका, पळे वगैरे  लिहिलेले असतात.  मर्यादा पुरुषोत्तम एकपत्नीव्रत पाळणारा “राम प्रसन्न “हे कधीच लिहिलेले दिसत नाही 🙂 पण ब्रह्मचारी हनुमान प्रसन्न मात्र दिसते पत्रिकेत लिहिलेले.

हे वाक्य की प्रेझेंट्स, किंवा पुष्प गुच्छ आणू  नये  बरेचदा पत्रिकेत लिहिलेले असते. आपल्यालाही बरं वाटतं की चला, एक तरी लग्न आहे बिना प्रेझेंट्स चे.. पण तिथे लग्नाला गेल्यावर वेगळंच चित्र दिसतं. आपण रिकाम्या हाताने गेलेलो असतो, पण इतरांनी प्रेझेंट्स आणलेले असतात, आणि नवरा मुलगा , मुलगी  इतरा कडून प्रेझेंट आणि बुके  बिनदिक्कत स्विकारताना दिसतात.  आपल्या कडे काहीच नेलेले नसते, आणि मग आपल्याला उगीच  लाजिरवाणे होते.  एकीकडे प्रेझेंट नको असं लिहायचं, आणि कोणी आणलं तर घ्यायचं, ह्या सारखी दुतोंडीपणा कोणी केला की संताप होतो जीवाचा.  उगाच  ज्यांनी पत्रिकावाचून  प्रेझेंट्स आणलेले नसतात त्यांना लाजिरवाणे होते.  या वर उपाय  म्हणजे मी हल्ली एक पाकीट सोबत ठेवतो लग्नाला जातांना.

पण हे सगळं पाहिल्यावर मात्र वाटतं की विवाह हा एक संस्कार आहे, आणि म्हणूनच त्याचे इतके बाजारीकरण होऊ नये.पत्रिका छापताना आपण कशासाठी छापतोय ह्याची जाणीव ठेवली की मग मात्र पत्रिका व्यवस्थित छापली जाईल.  माझी फक्त एकच इच्छा आहे, कुठलीही पत्रिका पाहिल्यावर ’आता आवरा’ असे म्हणायची वेळ येऊ नये बस्स!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

51 Responses to पत्रिका …

 1. हा, हा. मृत्यू प्रित्यर्थ!
  मजकूराचा आशय समजून न घेता लिहिलं की असं होतं. आमच्या कडे एकदा अशीच बारशाची एक पत्रिका आली होती – “सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे पुत्ररत्नाचे आगमन झाले आहे….” त्या घराचं सालाबादमुळे कसं गोकूळ झालं असेल, याचा विचार करकरून आम्ही हसलो होतो.

  पाणी ग्रहण हा शब्द मला वाटतं ’पाणि ग्रहण’ असा लिहिलेला असावा. याचा अर्थ विवाह असा आहे. पाणि म्हणजे हात, तो हाती धरला म्हणजे विवाह केला.

  काही लोकांच्या पत्रिकेत नातेवाईकांची नावं इतकी असतात की मजकूर कुठे आहे, तेही समजत नाही. प्रेझेंट आणू नका सांगितल्यावरही प्रेझेंट्स दिली जातात कारण तिकडे जाऊन कोरड्या शुभेच्छा द्यायच्या आणि पुन्हा खाऊन पिऊन कसं यायचं हे अपराधी फिलींग असावं बहुधा.

  काही काही पत्रिका सेंटेड पेपरवर छापलेल्या असतात. एवढा खर्च पत्रिकांवर कशासाठी करतात, हे मात्र कळत नाही. आता तर इंटरनेटचा जमाना आहे. मागच्या वर्षी एका मित्राने लग्न करताना स्पष्ट सांगितलं की ज्यांना इंटरनेट वापरता येतंय, त्या ओकांना मी ईमेलच करणार. उगीच खर्च नको. मला त्यात काही चुकलं असं वाटलं नाही. हल्ली फोनवरून पण आमंत्रणं होतातच की. आता ईमेल…

  • पाणिग्रहण असावा बहूतेक. पण वाचतांना अगदी अवघडल्यासारखं व्हायचं..सेंटेड पत्रिका, चांदीची पत्रिका, सोन्याची पत्रिका बरंच काही ऐकलंय हल्ली.

 2. sahajach says:

  मस्त झालयं पोस्ट नेहेमीप्रमाणेच…

  या पत्रिका छापायला दिल्या की त्या घरच्या काही मंडळींच्या काव्यप्रतिभेला बहर येतो आणि आणि आपल्या डोक्याला ताप होतो…..चंद्र सुर्याच्या साक्षीने, वाद्यांचे मंगल सुर बिर वगैरे काय काय असते त्यात….. काही पत्रिकांमधे ईतकी नावं असतात की वरवधूचे नाव कुठेतरी कोपऱ्यात असते अगदी…. त्यात त्यांचे शिक्षण 🙂 लिहीणे हा ही एक वाढवा असतो….

  ईंग्लिशमधे लिहीलेल्या पत्रिकाही बरेचदा करमणूकीचा विषय होतो…

  मला तर नेहेमी हा अनावश्यक खर्च वाटतो पण अजूनही ही पद्धत रुढ आहेच आपल्याकडे त्यामूळे बरेचदा टाळता येत नाहीच… तरिही साधी, सोपी, सुटसुटीत असावी पत्रिका असेच मत आहे!!!

  • मी या पुढे पत्रिका जमा करण्याची हॉबी सुरु करीन म्हणतोय.. ! काही लोकं तर मुद्दाम काहीतरी विचित्र लिहिलेल्या पत्रिका छापतात.. चक्क कविता पण असतात पत्रिकेत तु म्हंटल्या प्रमाणे.. इंग्लिश मधल्या पत्रिकांची खरंच गरज आहे का?? हा पण एक महत्वाचा विषय आहेच. माझ्या मते लग्न अटेंड करणारे ९५ टक्के मराठी असतात. ऑफिस मधे विनाकारण इंग्रजी पत्रिका वाटल्या जातात – मराठी लोकांना पण!

 3. बापसे बेटा सवाई…

  स्वतः जाताना सर्वांना हसवून जायच्या ऐवजी बापाच्या १३ व्याला आपल्याला हसविले…

  (त्या अर्थाचा एक शेर आहे कुठेतरी हिंदी शिणेमात)

  • हो ना, सुरुवातीला मला पण हसणं आवरत नव्हतं बराच वेळ. नंतर सिरियसनेसची जाणीव झाली.

 4. आका says:

  श्री कृपे करून आमची ज्येष्ठ सुपुत्र राघव याचा शरीर संबंध गोरवाडीचे चे त्र्यंबकराव यांची सुकन्या ची. सौ, >>>

  काका ईथे शरीर संबंध शब्द बरोबर आहे का???

  बाकी पोस्ट झकास… माझ्या पत्रिकेत मी यातलं बरंच काही गाळलं होतं.. 😉

  • आनंद
   होय, हाच शब्द वापरला जायचा पूर्वी. मी स्वतः पाहिली आहे अशी पत्रिका.

   • ‘शरीरसंबंध’ ऐवजी ‘संबंध’ हवा वास्तविक. ‘शरीरसंबंध’ लिहिणार्‍यांना माझा साष्टांग दंडवत. तो मजकूर वाचून मी बराच वेळ हसत होतो. शरीरसंबंधासाठी मुहूर्त?? गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी, शके १८९०!! हाहाहा…

    • अरे खरंच अशी पत्रिका असायची पूर्वी, मी माझ्या अजोबांच्या पोथी मधे वाचली होती. 🙂

     • काका, म्हणूनच मी हसत होतो. शरीरसंबंधासाठी मुहूर्त ही संकल्पना माझ्या अजून पचनी पडलेली नाही. 🙂

 5. ngadre says:

  Hillarious..

  Shareer sambandh ha shabd porvi regular hota.

  Shirish Kanekaranni aaplya ‘Kanekari’ madhe yaa vishayalaa baraach vel dila ahe.

  Jhakas lihilet..

  • कधीतरी लहानपणी वाचलेलं लक्षात रहातं, आणि मग असं लिहायला बसलो की बाहेर पडते एक एक गोष्ट!

 6. ravindra says:

  संगणकाचे जग आल्यापासून लोकांची काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे संगणकावर असलेल्या माजाकुरावरच एडीटीन्ग करून झटपट काम करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आणि हो जो मजकूर तयार झाला त्याला न वाचता चापून टाकतात. जाब विचारला तर काय फरक पडला असे उलटे विचारले जाते. त्यामुळेच असा गोंधळ होतो. ऑफिस मध्ये बघा असाच प्रकार होतो. अर्थाचा अनर्थ होत असतो. महेंद्रजी, हे मशीन युग आहे आणि मशीनला हृदय नसते असे म्हणतात न त्यामुळे अशा चुका होणारच आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि हसून विसरून हि जायचा (अस आता जग म्हणते बर का मी नव्हे! 🙂 🙂 )

  • हसून विसरून जायचं- हे एकदम खरंय.. मी फक्त माझ्या हसवणुकीत सगळ्यांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करतोय इथे ब्लॉग वर लिहून…
   पत्रिकेच्या डिझाइनला जितकं महत्व देतात, तेवढंच मजकुराला पण द्यायला हवं..

 7. हा हा.. आणि अजून एक म्हणजे ‘सौ’ चं स्पेलिंग ‘sow’ हे असं करतात !!! sow वाचून तर माझी हहमुव 😀

  आका, संकेत, पूर्वीच्या लग्नपत्रिकांमध्ये ‘शरीर संबंध’ हा उल्लेख अगदी सर्रास आढळतो. त्याकाळी लग्नाचा मूळ (आणि केवळ) उद्देश वंशविस्तार हाच मानला जात असल्याने त्यात कोणाला काही वावगं वाटत नसे.

  • तन्वीने म्हंटल्या प्रमाणे कविता , चंद्र, सुर्य, नक्षत्र वगैरे….. सगळ्या गोष्टी एकाच पत्रिकेत गुंफायचा पण प्रयत्न दिसतो .

 8. Prasad says:

  Namaskar Mahendraji,
  मी बऱ्याच दिवसांपासून आपला ब्लोग वाचत आहे.
  प्रतिक्रिया तशी उशिराच देत आहे. क्षमस्व
  तुम्ही कुठल्याही विषयावर एकदम सोप्या भाषेत लिहिता!
  असेच लिहीत जा!
  नेहमी प्रमाणे हा पण लेख आवडला.
  एक शंका
  आमंत्रण आणि निमंत्रण मध्ये काय फरक असतो?

  • प्रसाद
   प्रतिक्रिये साठी आभार..
   निमंत्रण:- हा शब्द समोर नसलेल्या व्यक्तीला बोलावण्यासाठी वापरला जातो. जसे लग्नाचे निमंत्रण पत्रिका पाठवणे
   आमंत्रण:- हा शब्द समोर असलेल्या व्यक्तीला बोलवायला वापरतात. जसे स्टेज वर कार्यक्रम सुरु आहे, आणि वक्ता म्हणतो, “मी आता श्री…. यांना स्टेज वर आमंत्रित करीत आहे..” किंवा समजा लग्नात जेवणाची पंगत बसते आहे, तेंव्हा लोकांना चला, जेवायला चला, म्हणून “आमंत्रण” दिलं जातं,किंवा आमंत्रित केले जाते.
   तसा दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, फक्त दोन निरनिराळ्य़ा अर्थानी वापरला जातो.

 9. काही लोकं एवढ्या महागड्या पत्रिका कां छापतात तेच कळत नाही. केवळ स्वतःची सधनता दाखवायची म्हणून…? पत्रिका महाग असो वा साधी , कोणता कार्यक्रम कधी आहे ते पाहून त्याची कॅलेंडरवर नोंद झाली की पत्रिका परत पाहण्याची वेळच येत नाही. मला तर वाटतं हा अनाठायी खर्च आहे.
  बाकी मजकूरात र्‍ह्स्व-दीर्घाच्या चुका पाहील्या की खरंच राग येतो.
  आम्ही तर ’आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं ….’ वाचून खदाखदा हसायचो.

 10. वा महेंद्रकाका, एकदम मस्त निरीक्षण! मला यावरच एक ग्राफिटी मिळाली होती. ती मी सध्या जीटॉकचा स्टेटस मॅसेज म्हणून लावली आहे. “पत्रिका न पाहता लग्न करू नये…. छपाईच्या अनेक चुका असतात हल्ली! “

 11. smita says:

  “योर प्रेझेन्स इज अवर ब्लेसींग्ज” !! मला तर कायम भिती असते की कधी चुकून “योर प्रेझेंट्स आर अवर ब्लेसींग” असं छापण्याची चूक त्या प्रिंटरने केली तर काय होईल?
  Mast zhaliy post kaka. Mhanje je je lagnaghari pahavayas milate te te, an jya chuka genarally lok kartat tya sarv mandlyat tumhi. Specially patrikekhali asaleli asankhya nave. Te tar ne na ulgadnara kodach ahe. Kon konacha kashala chapaych evadh? an nahi lokanna savayach aste. sutsutit majkoor aslela and apan amantran detoy he na visarta jar patrika chapali tar uttam. Ata konachi patrika ali tar tumhi lihilela sarv janavel.
  Ajun ek Majkoor asto, “Shri karya siddhis neyas samarth ahet, tari apan yenyachi krupa karavi.” Are mag tumhi kay asamarth ahat ka mhanun hi ashi patrika chapata?
  Thanks.

 12. महेश says:

  हव्य्साला मोल नसत .पत्रिका आपण कुठली छापतो याचे लोकांना भानच राहत नाही हल्ली तर फोनने इमेलने किवा इतर काही गोष्टीचा उपयोग करून वेळ मारून नेतात लेख आवडला ,उत्तम ,

 13. Smita says:

  are wah dusaree post patkan alee tya manane. anee chhan ahe nehameepramanech!

 14. swapna says:

  agadi hot topic… gharat hech challay na sadhya.. patrika selection…
  finally aamhi aamchi patrika “sanskrit” madhye chhapycha tharvalay.. agadi soppi bhasha ji saglyana nakki kalel.
  aai sankrit shikvate, aata kuni tari DEV-VANI cha prasar karayla hava na..

  • स्वप्ना
   संस्कृत समजेल म्हणा लोकांना,फक्त सोपी भाषा वापरायला हवी 🙂 शुभेच्छा.. मला पाठवणार ना पत्रीका? मी पुण्याला येतच असतो, येईन तुझ्या लग्नाला 🙂

 15. संजीव says:

  एकदा पैसे वाचवण्यासाठी पत्रिका स्वस्त छापखान्यात दिल्या गेल्या. या छापखान्याचा मुख्य धंदा नाटक-सिनेमाची पोस्टर छापणे हा होता. पत्रिका आल्या आणि पाहतात तर काय, खाली “वडीलमंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावे” याऐवजी “तिकिटविक्री चालू आहे” ही ओळ छापलेली ! – पु. ल. देशपांडे (व्यक्तिचित्र “नारायण”)

 16. atulpatankar says:

  एका वर्तमानपत्रातल्या ‘निधन वार्ता’ च्या खाली चक्क ‘आपले दुक्खेछुक’ म्हणून नावे लिहिली होती. बाकी असे सर्व मजकूर हा करमणुकीचा उत्तम मार्ग आहे. तुमची पोस्ट नेहमीप्रमाणे छान!

 17. santosh Deshmukh says:

  काका ऑफिसमध्ये दिलेली पत्रिका तर रफ पेपर पॅड म्हणूनच वापरली जाते तारखेच्या आधी मागून नी नंतर शिक्के चेक कारीण्याकारीता,ही! ही ही ही

  • हा नविन उपयोग पत्रिकेचा. मी तर फोन नंबर्स टीपून घ्यायला उपयोग करतो पत्रिकेचा, आणि नंतर पुर्ण भरली की मग सरळ डस्ट बिन मधे 🙂

 18. nagesh says:

  Saheba…mast lihalay,
  Pan lagnat gelysvar jevhan samor disun yete ki lokani gifts aanalet aani aapan nahi aanale tevhan pan tarambal udun nakkich javal pas kuthe buke stall aahe ka he pahanyasathi aapan jato he hi kharch na?/?…….bhagitale ki hasu yete
  Aaj kal lagnapatrike madhye photos denyache pan fad nirman zalele mi pahilay,
  aamchyakadhe lagn jodapyache mothe mothe banners lavatat

  • नागेश
   माझ्यावर तशी बरेचदा वेळ आलेली आहे. आणि आजकाल नेहेमी पाकिट तयार ठेवतो. 🙂 मुंबैला आलास की भेट.

 19. नमस्कार महेशजी,
  post छान आहे.
  असं वाटतं या internet च्या युगात अशा वेगवेगळ्या पत्रिका क्वचित पाहायला मिळतील.
  कारण “ई पत्रिकांच” युग येईल…आणि लग्नही..अशीच इंटरनेट वर लागतील…
  काय सांगावं ?

  • अगदी खरं आहे. इ पत्रिकांची सुरुवात झालेली आहेच, पण जुन्या लोकांसाठी अजूनही छापील पत्रिका पाठवली जातेच.
   लग्न तर इंटरनेट वर लागणं सुरु झालेलं आहे. मध्यंतरी यावर एक टीव्हीवर एक प्रोग्राम दाखवला होता, एका मुस्लिम लग्नाचा…

 20. आनंद पत्रे says:

  हा हा, मस्त झालीये पोस्ट…
  आजोबांच्या पोथीतली पत्रिका वाचून मी तर चाटच पडलो 😀

  • आनंद
   जुनी पध्दत एकदम सरळ सरळ होती…. स्पष्ट ! कदाचित आज ते अश्लिल वाटत असेल तरीही…

 21. Smita says:

  mee alikade pahilelya kahee patrikaya e-patrika hotya aNee tya swata: navara-navaree ne miLun lihilelya . var eka pratikriyet mhaNalyapramaNe photo-saheet vagaire. puN photos madhalee javaLeek pahun mee evadhee cultural shock madhye gele:-) kee nakkee lagnachee patrika ahe kee ( kahee lok housene sagaLyanna zadun dakhavatat tase) honeymoon che photo ahet ya badddal shanka vatayala lagalee:, anyway generation gap I guess.. kalay tasmain maha ( asa sanskrit cha rupantar english spell kelela pahun swapna chee aai ( dev VANee shikavatat tya) mala maaph karot mhaNaje miLavalee …

  • तुमचे शेवटचे वाक्य एकदम पटले. जनरेशन गॅप.. या एकाच शब्दाचा निरनिराळा अर्थ मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. लहान पणी आपण लहान असताना आजोबांशी असलेले आपले संबंध आणि आजचे मुलांचे संबंध – किती जमिन अस्मानचा फरक आहे त्यात?? चालायचंच.. कालाय तस्मै नमः म्हणायचं झालं.

 22. Pranav Aawtade says:

  हा लेख मी आईला वाचून दाखवत असताना ती कपाट आवरत होती. त्यात बरेच जूने आहेर सुद्धा होते. मी “… “राम प्रसन्न “हे कधीच लिहिलेले दिसत नाही…” हे वाचायला आणि ” श्री राम प्रसन्न ” असं लिहिलेली पत्रिका आणि त्यासोबतचा आहेर सापडायला एकाच गाठ पडली म्हणून मुद्दाम लिहावसं वाटलं… 🙂

  • प्रणव
   मनःपुर्वक आभार.. खरं सांगायचं तर वाचून बरं वाटलं की मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नांव पण पत्रीकेवर असलेले ऐकुन.

   • Pranav Aawtade says:

    धन्यवाद.. 🙂 बऱ्याच पत्रिकांच्या शेवटी हेही लिहीलेलं असतं की ”आपली उपस्थिती हाच आमचा आहेर, कृपया आहेर आणू नये” हे वाचून कोणत्याही सुद्न्य वाचकाला प्रश्न पडेल की लग्नाला जावं की नाही. वास्तविक ती वाकये उलट क्रमाने लिहायला हवीत म्हणजे असे ”कृपया आहेर आणू नये आपली उपस्थिति हच आमचा आहेर”…. बहुतेक तो कमी लोकांनी यावं यासाठी गुप्त संदेश असावा!! 😉

 23. Gurunath says:

  Amaravati che lok akkhya vidarbhat innovative dokyache mhanun famous ahet (jase normally punekar asatat) tithe eka lagnat far sukhad dhakka patrike pasun lagat aala hota

  mulga-mulgi doghe hi class one adhikari….. lagn arranged hote pan mutual understanding farach jabardast hote…. tya mulache vadil pradyapak ani tyanchi shetakryansathi kam karaychi far icha, tar tyanni amravatitlya eka pratityash NGO la tyanchya garja v4rlya an direct patriket sangitle aher fakt cash to suddha tumachya icchene jo amhi amuk eka sansthechya madatisathi vaparanar ahot…

  aheravar nav nakki takane, incometax sathi jar pavtya lagnar asatil tar patriket khali chaplelya hya sansthechya pattyavar tya milu shakatil….

  tyaani 4.5 lacs donate kele!!!!,mhananne ekach amhala kahi kami nahi, jyanna kahi kami ahe ashyanna madat mhanun tumhi amhi hi uthathev karavi ase vatle an kele!!!

 24. abhijit says:

  hi !!!!!!!!!!! friends plz mala sangu shakta ka aamantran ani nimantran madhe kay farak aahe ???????? plz help me

 25. zmanoj says:

  एक पत्रिका वजा ‘पोस्ट कार्ड’ गावाकडे नेहमीच येतो.. “सालाबादा प्रमाणे औन्दाही श्री काळूआई कृपेकरून ‘गाव वेस’ मारुतीच्या जत्रेचे व भंडाऱ्याचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. तरीही आपण आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह जत्रेस उपस्थित राहून शोभा वाढवावी, आणि आम्हास उपकृत करावे.”
  जत्रा मारुतीची, आयोजन गावाचे, निमंत्रक असा कि ज्याचे जत्रेमध्ये काही योगदान नाही कि संबंध हि नाही. आणि निमंत्रण त्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबाला अन मित्रांना!

Leave a Reply to sahajach Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s