चिरंजीव बाबांना….

चिरंजीव बाबांना,
शिरसाष्टांग नमस्कार .

काल सकाळी उठल्यावर तुम्हाला झोपलेले पाहीले, वयोमानामुळे कृश झालेला ८५ च्या आसपास वय असलेला देह, अगदी सडपातळ  शरीरयष्टी, बरेच दात पडल्यामुळे खपाटी गेलेले गाल, आणि बंद असल्याने खोल गेलेले डोळे- हे सगळं पाहीलं आणि मला गलबलून आलं. आयुष्यात आजपर्यंत कधी वाटली नसेल इतकी आत्मियता एकदम दाटून आली- थोडं भरून आलं, नक्की कशामुळे हे माहीत नाही.तुमचा थकलेला चेहेरा पाहून मनात कालवाकालव झाली.

खरं तर तुमचे वय मोठे, मी तुम्हाला तीर्थरूप लिहायला हवे पण, तुमचे छत्र कायम डोक्यावर रहावे असे वाटले, म्हणजेच त्यासाठी  तुम्ही ’चिरंजीव’ रहायला हवे  असे मनात आले म्हणून  हा असा मायना…

आज अगदी खरं खरं लिहितोय- तुमची साधी राहणी मला   लाजिरवाणी वाटायची मित्रा मधे. सगळ्यांचे वडील जेंव्हा पॅंट शर्ट वापरायचे, तेंव्हा तुमचा साधा धोतर आणि शर्ट घातलेले पाहिले की मला उगीच कमीपणा वाटायचा- आणि खरं सांगायचं तर  आपले वडील असे कपडे का घालतात म्हणून मित्रांसमोर लाज पण वाटायची.  त्या लहान वयात कपडे सगळ्यात महत्वाचे, आणि त्यावरून समाजात तुमचे स्थान तयार होत असते, असा एक  समज झाला होता हे तर कारण होतेच. बरं  इतर मुलं मित्र वगैरे आपल्या सारखीच मध्यम वर्गीयांचीच, वडीलांच्या पॅंट्स आल्टर करून त्याच्या हाफ पॅंट बनवून घालायचे, आणि तुम्ही पॅंट न वापरल्याने मला त्या मिळायच्या नाहीत-  म्हणून असेल कदाचित. तुमच्या त्या साध्या कपड्या आड दडलेलं तुमचं मन मला कधी ओळखता आलं नाही.

लहान वयात वडील गेल्याने अंगावर पडलेल्या जबाबदारीने तुम्हाला अकाली ’मोठं’ केलं होतं का??  वडलांचा झालेला मृत्यु  आणि आकस्मिकपणे पडलेली  भाऊ आणि बहिणींची जबाबदारी- कदाचित स्वतःच्या बहिणींचे लग्न जुळवताना आलेला कडू अनुभव, गाठीशी असल्यामुळे तुम्ही  लोकांकडून  एकही पैसा न घेता लग्न जुळवण्यासाठी केलेली मदत, स्थळं सुचवणे, आणि हा असा लग्न जुळवण्याचा घेतलेला वसा , आणि  त्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून लोकांना केलेली मदत…..त्यानिमित्त घरी येणारे लोकं… यांचा आम्हाला खूप राग यायचा. इतरांकडे फक्त त्यांचे नातेवाईक पाहुणे येतात, पण आपल्याकडे हे असे लोकं  (ज्यांच्याशी कुठलाही नाते  संबंध नाही असे)का म्हणून येतात पाहुणे म्हणून??  आमच्या आयुष्यातल्या प्रायव्ह्सी वर हे येणारे लोकं आक्रमण करताहेत असे वाटायचे.

शासनाचे  ’वर्ग एकचे’ (Claas I)अधिकारी होता तुम्ही ! पण स्वतःसाठी पैसा खर्च करणे कधीच मान्य नव्हते. नेहेमी अगदी फाटेपर्यंत वापरलेल्या चप्पल, आणि धोतर कुर्ता, असा वेश. बरोबरच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी स्कुटर घेतली होती, घरात फ्रिझ वगैरे चैनीच्या समजल्या जाणाऱ्या वस्तू घेतल्या होत्या, पण तुम्ही मात्र  आम्ही कितीही मागे लागलो, तरी कधीच ह्या गोष्टींसाठी खर्च केला नाही. स्वतःच्या गरजा अगदी कमीत कमी ठेऊन उरलेल्या पैशातून समाजाचे काहीतरी देणं लागतो, म्हणून केलेले एखाद्या दूरच्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे लग्न, किंवा परगावाहून कोणी मुलगी दाखवायला आणली, तर तो कार्यक्रम पण आपल्याच घरी करायचे- असो, परंतु हे सगळं पाहिले की आम्ही चिडून जायचो.  तेंव्हा नेमकं हे विसरायचो, की आमच्या  नेहेमीच्या गरजांना तुम्ही कधीच कमी पडू दिले नाही- विनाकारण तुमचा राग करत रहायचो..

घरी तुमच्याकडे येणारा माणूस कितीही मोठा असला तरीही   तुम्हाला नमस्कार करायचा, आणि ते  पाहून बरं वाटण्या ऐवजी राग यायचा. वाटायचं, की तुम्ही हे जे काही समाज कार्य करताय, ते केवळ  लोकांना दाखवायला, आणि समाजातली प्रतिमा उजळ रहावी  म्हणून. पण लोकं तुम्हाला जे नमस्कार करतात ते कृतज्ञ ते पोटी, आणि  त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या  माना पोटी, ही गोष्ट समजायला इतकी वर्ष का जावी लागावी हेच समजत नाही?

तुम्ही कोणाकडून कधी स्थळं सुचवायला किंवा पत्रिका पाहायला पैसा घेतला नाही याचा हा परिणाम म्हणजे प्रत्येकाशी एक वेगळेच भावनिक नाते तयार व्हायचे तुमचे- जे आम्हाला कधीच समजले नाही!येणारा प्रत्येकच माणूस तुमच्या रुपात, वडील , मोठा भाऊ, किंवा एखाद्या मान्यवराला पहायचा  . स्थळं सांगायला , पत्रिकेला एकदा पैसे घेतले की मालक – नोकर नाते तयार होते, आणि पैसे घेतले नाही की ’उपकाराचे नातं”- पण हे   जे ’उपकाराचे नातं”तयार व्हायचे ते तसे  जाणवू न देण्याचा मोठेपणा पण तुमच्या मधे आहे हे नक्की. एखादा नेता असो, किंवा दुसरा कोणी सा्धा माणूस  असो, सगळ्यांशी एकाच तऱ्हेने वागण्याची तुमची पद्धत पण मला नेहेमीच  विचित्र वाटायची.

या व्यतिरिक्त पत्रिका पहाणे हा छंद होताच. दररोज सकाळी न चुकता गुरुचरीत्राचा अध्याय वाचायचा, आणि मी जे सांगतो ते मी नाही, श्री गुरुंची कृपा म्हणून खरं निघतं ही श्रद्धा- ज्योतिष्य पहाणे हा व्यवसाय नाही, तर एक छंद आहे, म्हणून जवळपास ५६ वर्ष या छंदाची केलेली जोपासना.. मला नेहेमी वाटायचं , की    तुम्ही  पत्रिका पहाता, भविष्य सांगता, मग पैसे घ्यायला काय हरकत आहे? पण या छंदाकडे जोडधंदा म्हणून न पहाता, केवळ छंद म्हणूनच पाहिले..  आणि त्यामुळे  तुम्ही जी गुडविल कमावली आहे तिचे महत्त्व मला आज तुमच्या बरोबर रस्त्याने जातांना कोणीतरी भेटलेला माणूस रस्त्यावर तुम्हाला वाकून नमस्कार करतो तेंव्हा लक्षात येते.

संस्कृतचा प्रचंड अभ्यास, रुद्र, सुक्त,ऋचा  आणि इतर बरंच काही    मुखोद्गत असल्याचा कधी वृथा अभिमान कधीच दाखवला नाही. पुजा सांगत असलेल्या पंडीतजींना तुमच्या पेक्षा जास्त मला माहीत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतांना तुम्ही कधीच दिसला नाहीत- आणि तुमचे हे गुण कधीच लक्षात आले नाहीत. कदाचित त्या गुरुजींचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, म्हणून  त्यांच्या चुका वगैरे दाखवण्याचे तुम्ही टाळत असाल, हे आज लक्षात येतंय.

पतंग उडवायला म्हणून घरचे पाच रुपये चोरून पतंग आणली, आणि तेंव्हा छत्रीने मार खाल्ला होता ती आठवण, आणि नंतर कधीच पैसे चोरायचे नाहीत, अशी देवासमोर बसून घेतलेली शपथ, अजूनही आठवणीत आहे. पण त्या प्रसंगा व्यतिरिक्त कधीच मार खाल्ल्याचे लक्षात नाही.

आजी असतांना , ती बाहेरच्या खोलीत झोपलेली असतांना, जेंव्हा न्यायमूर्ती …. आले होते, तेंव्हा आजीला सोफ्यावरून न उठवता, खाली जमिनीवर सतरंजी टाकुन बसलेले – आणि त्यांनाही बसवलेले  जेंव्हा तुम्हाला पाहीले, तेंव्हा मात्र  कितीही मोठा माणूस घरी आला, तरी तो आईपेक्षा मोठा नसतो ही गोष्ट मात्र अगदी पक्की कोरल्या गेली मनावर.

लहानपणापासून जवळपास सगळेच लोकं  ” अमुक अमुक चा मुलगा” म्हणूनच ओळखायचे. का कोणास ठाऊक पण त्यामधे खूप कमीपणा वाटायचा- स्वतःचे काही अस्तित्वच नाही असे वाटायचे. पण आज मात्र लक्षात येतंय की माझं अस्तित्व जे आहे , ते केवळ तुमच्याच मुळे, आणि म्हणूनच आज तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो .आता या परमेश्वराकडे एकच मागणे आहे की ”  तुम्ही चिरंजीव व्हा, आणि असेच संस्कार माझ्या मुलांवर करण्याची पण शक्ती मिळू दे म्हणून आशीर्वाद द्या..”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

93 Responses to चिरंजीव बाबांना….

 1. त्या एका कुलकर्णींनी (डॉ.सलील) ’दमलेल्या बाबाची कहाणी’ सांगून रडवलं आणि आता हे दुसरे कुलकर्णी (महेंद्र) तस्साच काळजाला हात घालत आहेत… आवरा….. हे असं सणासुदीचं लोकांचे अश्रू काढायला काय बरं वाटतं का कुलकर्णी?
  बाकी, मला वाटतंय तुम्ही थोड्याफार फरकाने माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय लोकांच्याच मनातलं लिहीलंय… मला सुद्धा हे सर्व माझ्या बाबांविषयी कधीतरी बोलायचंय, लिहायंचय, … पण काय आडवं येत कळत नाही…. त्यांच्याशी असा मनःपुर्वक, भरभरून संवाद कित्येक वर्षाय मी साधलेला नाहीये हो.. अशी काय अदृश्य भिंत आमच्या दोघात आहे? मी त्यांच्या नजरेत नजर मिसळून एकदाही मोठ्या प्रेमाने बोलू शकलेलो नाही. नुसती माया पोटात आणि मनात असून काय उपयोग? ते ओठावर एकदातरी येईल का? तुमच्या पोस्टने माझी आजची झोप खाल्ली हे खरे…. भिजलेल्या उशीचे पातक तुमच्या माथी……….

  • विक्रांत
   बऱ्याच गोष्टी मनात घर करून होत्या, त्या मोकळ्या केल्या. एक वेगळंच बॅरीयर असतं मधे. कदाचित जनरेशन गॅप??
   दोघांपैकी एकाने तरी पुढाकार घ्यायला हवा म्हणजेच संवाद सुरु होईल. एकदा विचारांची देवाण घेवाण सुरु झाली की मग सगळं सोप्पं होऊन जाईल.

  • १००% खरंय विक्रांत. माझ्या मनात सुद्धा हेच उमटलं. मला बाबांची कितीवेळा अशी आठवण येते आणि डोळ्यासमोरचं सगळं धुसर होतं. कितीवेळा वाटतं की त्यांनी एकटं राहण्यापेक्षा आमच्याबरोबर इथे रहायला यावं. आम्हालाच आधार होईल. पण मुलीकडे मी राहून काय करू? पुणं सोडून मी काय करू? मला समजत नाही त्यांना हे कसं सांगू की मला त्यांचा सहवास हवा आहे. शेवटी फोनवर बोलून समाधान मानते. पण मनातला कढ बाहेर येतोच.

   महेंद्रजी, सर्दीमुळे आधीच डोकं जड झालेलं आणि त्यात ह्या पोस्टने मनही जड करून टाकलंत तुम्ही. किती मनकवडे आहात हो.

 2. काका,
  मला खूप लिहावंसं वाटतंय..पण जमेलसं वाटत नाही!
  आजचा दिवस कसा जाणार ऑफिसातला कुणास ठाऊक!

  • विद्याधर
   काही गोष्टी खूप दिवस मनात साचून असतात. त्यांचा निचरा झालेला बरा असतो, म्हणून हा लेख..

 3. निशब्ध आहे मी काका.. 😦

 4. Vivek Tavate says:

  मुलांच्या मनाची घालमेल या बांबा विषयीच्या लेखात दिसली आहे.

 5. nilesh joglekar says:

  This is amazing. Mahendraji, faar sundar lihila ahe. Manala bhidanara. Shewati manse japane mahatwache aste. Aplya generation madhe he kuthe tari harwat chalala ahe ase watate. Paise yetat jataat, pan manasachi shrimanti tyachya baddal aslelya lokanchya bhwaanamadhun disat aste. Nehmi pramane lekh chaan jamala aahe.

  Cheers
  Nilesh Joglekar

  • निलेश
   माणसं जपणं महत्वाच, आणि आपल्या जनरेशन मधे हीच गोष्ट आपण गमावून बसलेलो आहोत. मला पण जाणवते ही गोष्टं.
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 6. स्नेहल says:

  वडिलांची किंमत खरच आपल्याला नाही कळत, किती दुर्दैवी आहोत आपण

 7. SANGEETA BORKAR says:

  SUNDER LIHILE AHE, SHEVTI DOLYAT PANI ALE….., THANKS

 8. सचिन says:

  काका,
  अगदी मनातल लिहिलत. बाबां बद्दल खूप काही वाटत पण लिहता मात्र काहीच येत नाही.

  • सचिन
   बऱ्याच गोष्टी ज्या लिहिता येत नाहीत, त्या फक्त अनुभवायच्या आणि जर आपलं कुठे चुकत असेल तर त्या चुका दुरुस्त करायच्या एवढं आपल्या हातात नक्की आहे.

 9. सोनाली केळकर says:

  खूप टची झाल्ये पोस्ट.
  एकटं असताना आई, बाबांविषयी विचार केला की लहानपणीच्या आपल्या काही काही बोलण्याबद्दल, कृतींबद्दल खूप गिल्टी वाटते.

 10. Tejashri says:

  Mahendra kaka, maze baba thode kami vayache ahet pan thodya phar farkani maze baba pan asech ahet ani mazya bhavna pan ashyach ahet…man bharun ala ……

  • तेजश्री
   याची जाणिव झाली की त्याप्रमाणे आपले वागणे आपण सुधारू शकतो ..
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 11. Rajeev says:

  ट्प.. ट्प…..ट्प….
  समजले असावे….
  आतापर्यंतचा सर्वोत्तम लेख….

 12. mau says:

  निशब्ध!!!!!!

 13. Pingback: चिरंजीव बाबांना…. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 14. ………………………. !!!!!!!!!

 15. Prasad says:

  बोलायला किंवा लिहायला जमत नाही आहे काका…एक्दम काळजात हात घातलास…खरच आईची माया, प्रेम दिसते नव्हे ती ग्रुहीत धरलेली असते…पण वडीलांचे प्रेम काहि औरच…

 16. Nisha says:

  Far chan
  So touching

 17. छान झालीये पोस्ट …

 18. Aparna says:

  नि:शब्द आहे मी….माहित नाही का…पण मला आई आणि बाबा यांच्याबद्दल सलग लिहिता येत नाही….त्यांनी आमच्यासाठी खालेल्या खस्ता आठवल्या की फक्त भरून येत आणि अक्षर धूसर होतात..अगदी आत्ता झालीत तशीच……

  • अपर्णा
   खरं आहे. फार कठीण आहे लिहिणं.. जे काही मनात आहे ते सगळं तसंच उतरेल याची गॅरंटी नाही.

 19. swapna says:

  “कितीही मोठा माणूस घरी आला, तरी तो आईपेक्षा मोठा नसतो “………. bhari aahet tumache baba.. achanak mazya babana bhetava vattay..
  aani ho.. patrika pathvatey lavkarch… vadilana nakki dakhava.. sanskrit madhye aahe na.. tyana aavdel, aani mala pan..

  • स्वप्ना
   अवश्य दाखवीन पत्रिका. संस्कृतमधली पत्रिका पाहून त्यांना नक्कीच बरं वाटेल.. मनःपुर्वक धन्यवाद.

 20. खूप छान उतरल्या आहेत भावना……!!
  आई, बाबा……हे विषय अगदी काळजालाच हात घालतात ना रे……!!

  • जयश्री
   अगदी खरं आहे. सकाळी पाच वाजता उठलो होतो, आणि त्यांना झोपलेलं पाहिलं, आणि अवध्या तीस मिनिटात टाइप केलंय हे पोस्ट, जे काही मनात येईल ते टाइप करत गेलो, पण पोस्ट करण्याची हिम्मत दोन दिवस झाली नाही- वाटलं खूप पर्सनल आहे , पोस्ट करू नये..पण ;लिहिलं..

 21. Mrs. Sadhana Raje says:

  masta lekha lihila aahet, dole bharun yetat. Maze aai – baba donhi nahit pan athvan khoop yete, man udas zala.

  • साधना मॅडम,
   तुम्ही नेहेमी वाचता हे माहीत आहे, पण या वेळी आवर्जून कॉमेंट दिलीत त्याबद्दल आभार. काही नात्यांच्या बाबतीत आपण थोडं जास्त सेन्सिटीव्ह असतोच…

 22. महेश says:

  आठवणीना पारभिजून गेलो परत आपण भूतकाळाकडे नेले.सुदर अप्रतिम ,

 23. Prasad Patil says:

  Jabardast!

 24. विक्रांत+१
  मी आईच्या खूप जवळ आहे. बाबांनी कधी कशाला विरोध केला नाही की पाय ओढले नाहीत तरी देखील त्यांच्याशी आई इतके स्पष्ट बोलता येत नाही. पण कुठे तरी काहीतरी साचून राहीले आहे हे नक्की. इंजिनियरिंग केल्यानंतर ४ महिने जॉब नव्हता. बाबादेखील तोपर्यंत रिटायर झाले होते. त्यावेळी एकदा जॉबवरुन फोनवर जोरदार रडू कोसळले होते तेंव्हा बाबा “अरे रडतोस कशाला? मी आहे ना?” असे म्हणाले होते ते आज ही लक्षात आहे. आज तुमच्यामुळे खूप काही आठवतय.

  • सिद्धार्थ
   अशा खूप गोष्टी मनात आहेत, ज्या इथे लिहिलेल्या नाहीत.. जरी बोलणं नसलं, अगदी अघळपघळ गप्पा नसल्या, तरी ” मी तुझ्या पाठीशी आहे” एवढी भावना पण पुरेशी असते या जगात उभं रहायला.
   एक गोष्ट मला पटते, ती म्हणजे – वडीलांचे मन समजायला स्वतःची मुलं मोठी व्हायला लागतात, तोवर काही निटसं समजत नाही बघ……

 25. खूप खूप मस्त काका! साधारणत: आपण मोठे झाल्यावरच ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. वयामुळे असेल कदाचित! पण ही जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे फार फार आवश्यक असते. जशी आपल्या बाजूने ही खंत असते की, आत्ता ह्या गोष्टी जाणवल्या तसेच ही खंत त्यांनासुद्धा असते. मुलाने हे नुसते बोलून दाखविले ना तरी त्यांना अगदी कृतार्थ वाटते. बाबा आणि आजोबा ह्या दोन्ही व्यक्तींच्या जवळ असल्याने मला दोन्ही बाजू जवळून पाहता आल्या 🙂

 26. Nachiket says:

  बाबांशी अगदी खूप बोलावंसं वाटतं..

  अजूनही इच्छा होते त्यांना मिठी मारून भेटायची.

  त्यांना न कळत्या वयात दिलेले मनस्ताप आठवतात.

  त्यांना उद्देशून मी माज आल्याच्या भरात हलकटासारखे अपमानास्पद बोललेलं ही आठवतं. ते शब्द कायमचे वार करुन गेले असणार त्यांच्यावर.

  पण ते तर माझ्या तेराव्या वर्षीच गेले.

  आज असते तर त्याची माफी मागायचं धाडस केलं असतं.

  पण गेली संधी फार पूर्वीच..

  मनाला खोल टच केलंत महेन्द्रजी..बरं झालं उशीरा वाचली पोस्ट..दिवाळीत वाचली असती तर फार बेचैनीत गेली असती दिवाळी ..

  बाय द वे..सुंदरच आहे पोस्ट..

  • नचिकेत
   मला वाटतं की प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही तरी घटना घडत असतात- तुमचे एकट्याचे काही एक्सेप्शन नाही. कदाचित या गोष्टीला किंवा अशा प्रकारच्या वादविवादाला जनरेशन गॅप हे कारण असेल का?

   काही लोकं अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडल्यच नाहीत म्हणून त्यावर पांघरूण घालतात, तर काही लोकं जे जास्त सेन्सिटीव्ह असतात ते पश्चाताप करतात..

   एक बाकी आहेच, की काहीही झाले तरीही वडील नेहेमीच मुलांचे अपराध पोटात घालून त्याचे अभिष्ट चिंततात..

 27. joshi L.G. says:

  Thanks A Lot for giving the words for the feelinng in the mind,

  No Doubt Mother is Mother but Every WhereEvery One, is trying to write on the mother only but Both the KULKARNI are great Because they thave written on father.

 28. महेंद्र,
  प्रतिक्रियेला शब्द नाहीत! तुम्हाला आणि तुमच्या वडलांना सलाम!

 29. GANESH NIMBALKAR says:

  खूप खूप मस्त काका! thanks a lot..

 30. vikram says:

  Pratekachya manatil Babanbaddal lihale aahe tumhi kaka

  akdum jabardast salammmmmmmm

  • धन्यवाद विक्रम.. पण खरं सांगतो जे लिहिलंय ते मला स्वतःलाच वाचतांना थोडं अवघडल्यासारखं झालं होतं..

 31. आका says:

  काय कुणास ठाऊक पण आज काल बाबांवरील काहीही लिखाण वाचलं कि लगेच भरुन येतं..
  नका हो असं लिहित जाउ…

  पण तरी… सगळं मनातलं बोल्लात बघा…

  • आनंद
   भावनांना खरे खरे शब्द मिळाले, आणि स्वतःचा मुखवटा बाजूला ठेउन लिहिलंय. आता जेंव्हा मला वडीलांची लाज वाटायची हे लिहिलं, तेंव्हा स्वतःचीच लाज वाटली. असे अनेक प्रसंग होते, पण सगळेच इथे लिहिले नाहीत.

 32. sonalw says:

  aaj radwlat kaka. mi saasri jatana majhya babancha chehra aajhi aathwato aani ajunahi bharun yet. aawandha yeto. nakki nahi saangta yet man tyanchi maaya mala satat halavi karat raahte.
  eka mulich tichya wadilanshi aslel naat khoop wegala asat. muli kahisha halawya astaat aani wyakt hotat baryachda.
  pan mulaga aani wadil he naat matr khup muk asat aani doghannahi wyakt hotana khoop wel laagto. barech baandh astaat. mhanunach jitak dabun thewal titkya force ne kadhitari to baandh futato!

  • सोनल,
   मुलगा वडील हे नात मुक असतं.. हे तर वरच्या सगळ्याच प्रतिक्रियातून दिसून आलं. मला वाटायचं की मी एकटाच असा वागलो, पण बहूतेक प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही जिवघेण्या आठव्णी आहेतच..
   मुलींचे आणि बाबांचे नाते जरा वेगळेच असते ह्याच्याशी सहमत आहे मी पण..

 33. Sandip says:

  नमस्कार महेंद्रजी. मी तुमच्या ब्लॉग चा नियमित वाचक आहे, पण प्रतिक्रिया आज प्रथमच देत आहे. नितांत सुंदर विचार लिहिले आहेत आपण. थोड्या फार फरकाने खूप जणांना वाटते पण कागदावर उतरवणे फक्त आपल्या सारख्या काहीजणांना जमते. धन्यवाद .

 34. मनात खुप भावना आहेत पण शब्द नाहीत…डिग्री पास आउट झाल्यानंतर सिविल मध्ये रिसेशन होत त्यामुळे मनासारखा जॉब मिळत नव्हता…त्याकाळात खुप फ़्रस्ट्रेट झालो होतो…एके रविवारी वैतागुन गावी गेलो….संध्याकाळी जेवण झाल्यावर त्यांच्या मांडीवर डोक ठेवुन मनोसक्त रडुन घेतल होत…त्यावेळी त्यांचा डोक्यावर असणारा हात खुप आधार देउन गेला…आज पण कधी कधी खुप फ़्रस्ट्रेट होत तेव्हा त्यांच्या मांडीवर डोक ठेवल की बस्स…मनाला खुप बळ मिळत.

 35. Smita says:

  mee jenva kadhee kamachya jagee asalelya strain muLe disturb hote aNee gharee chidchid karate tenva thodya veLane mazya manaat ha vichar nehamee yeto-kee apalya babanna even ajobanna nehameech tyancha kaam, tyamuLe yeNara stress ha kay avadat asel ka? mag kadheech kase te kahee katakatee aalyaparyant pohochu dyayache naheet? tyanna nasel ‘job satisfaction, competition related issues? changale motha padavar asalyamuLe hoNare sagaLe traas? hee sagalEe jabadaree kitee sanyamane te paar padayache, aNee kutumbala poorNapaNe insulate karun tya pasun? I don’t even know , ekada mee actually vicharala hota tyanna- tumhala nahee ka kadhee frustrations aalee office madhye , amhala kadheech kasa kaLala nahee tumchaa vait mood? tar nusatech hasale- “evadha kahee nahee, sagaLech baap karataat tevadhaach mee puN kela tu jara sensitive ahes mhaNun tula jasta tras hoto ” mhaNale.. amazing!!!

  mala thoda asahee vaTata ki -this is something w eneed to learn from men of earlier generation. they could isolate office and home better . may be to tyancha social role ahe he ingrained asalyane asel, aNee bayakanna kadachit -apalyala he sagaLa sodun choice ahe asa kuthetaree manaat koparyat asel-once again due to social conditioning.. anyway- that’s beside the point .

  but very diffiult never to complain about work-related things at home…aNee baba mandaLee te faar easily aNee routinely karataat

  • मला वाट्तं ते दोन्ही कंपार्टमेंट्स वॉटरटाइट ठेवत असायचे. ऑफिस – आणि घर. तसेच तेंव्हा सेल फोन, लॅप्टॉप, वगैरे इष्टापत्ती नव्हत्या, त्यामुळे पण एकदा घरी आले की ऑफिसचे काम विसरणे सोपे व्हायचे, ऑफिशिअल कामासाठी फोन वगैरे बंद असायचे. जरी एखादा फोन आला तरी काम तर !ओफिसमधे गेल्यावरच होणार, मग घरी फक्त ऐकुन नंतर सोमवारी करतो म्हणायचे.
   .
   आपल्या बाबतीत तोच खर इश्य़ु आहे, मी कालपासून सारखा इ मेल आणि फोन वर आहे, म्हणजे घरी असूनही ऑफिसचे काम सुरु आहेच. लॅप टॉप असल्याने, आणि इ आर पी असल्याने घरी पण काही फारसा आराम नसतोच. घरी पण काम सुरु असतंच.. चालायचंच, कालाय तस्मै नमः म्हणायचंझालं..
   उद्या पासून एक आठवडा टुर वर जायचंय, आणि आज सकाळ्पासून सारखा कामातच बिझी आहे..

 36. smita says:

  काका, मनाला भिडेल अस लिहिलय तुम्ही. बाबा, म्हणजे वीक पॉइण्ट आहे माझा. थोड्या फार फरकाने बहुतेक लोकांच्या मनात असाच काहीतरी असणार आहे पण म्हणतात ना जेनरेशन गॅप त्यामुळे कदाचित मन की बात मन में ही रह गयी. आपल्या आई वडिलांनी किती खस्ता खाल्या आपल्यासाठी ते आठवून गलबलुन येत. माणसाची किंमत तो असताना नाही कळत तो गेल्यावरच कळते, पण ज्याला आपल्या मनातील भावना खरच आई वडिलांपर्यंत पोहोचवायच्या असतील त्यानी वेळ दवडू नये, अन् त्यासाठी मदर्स डे, फादर्स डे ची वाट पाहु नये. धन्यवाद काका.

  • स्मिता
   खरंय.. मान्य.. हा लेख वाचून काहीलोकांनी जरी आपलं मन मोकळं केलं तरी खूप मिळवलं, आणि या लेखाणाचे चिज झाले असे समजेन मी.

 37. Vikram Bapat says:

  mazya kade shabd nahiyet… khupach chan lhile ahe .. pahilya comment madhe mhantalya pramane tumhi kalajatach haat ghatala…

 38. मालोजीराव says:

  तुमचे वडील कल्पवृक्ष आहेत आणि तुम्ही अर्थातच नशीबवान आहात, तुमच्या बाबांना मानाचा मुजरा !

 39. sahajach says:

  महेंद्रजी ही पोस्ट वाचली तेव्हा मी भारतातच होते…. मी पोस्ट वाचत असताना माझे बाबा माझ्या मुलांबरोबर अंगणात फटाके उडवत होते….. किती वर्षानंतर फटाके खरेदी झाली असेल माहित नाही, पण माझ्या लग्नानंतर गेल्या दहा वर्षात ईतक्या उत्साहातली ही त्यांची दिवाळी आणि मुलांबरोबरचं त्यांच खेळणं पाहून तुमच्या पोस्टचं चिरंजीव बाबा नाव सार्थ वाटलं, माझ्याही मनात अश्याच काही भावना होत्या तेव्हा!!

  एक अप्रतिम पोस्ट ईतकचं म्हणेन आत्ता…..

  • तन्वी
   स्टार माझा तर्फे पहिल्या सहा मध्ये आल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन. आत्ताच फोन केला होता, पण तो तुझ्या आईने उचलला. माझ्याकडे तुझा तिकडचा नंबर नसल्याने बोलता आले नाही.
   कालच माझ्या बाबांशी बोलणं झालं< माझ्या एका आतेभावाने त्यांना हे पोस्ट वाचून दाखवले. ्बोलतांना खूप गहीवरून आलं होतं त्यांना… पण छान वाटलं..

 40. अगदी भरुन आल हे वाचल्यावर…..

 41. Hi,

  We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
  Please provide your full name and email id.
  Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary – 09819128167 for more information.

  Regards,
  Sonali Thorat
  http://www.netbhet.com

 42. Gayatri says:

  Chhan lihilay khup..
  Agdi dolyat paani aal…
  Khup saar sachun aalay manat….pan shabd ch sample…!!!!!!

 43. bhaanasa says:

  तुझी ही पोस्ट आली त्याच्या आदल्याच रात्री आपण बोललो होतो… दोघेही नाशिकलाच होतो… वाचून इतकी रडले… काहीच लिहीले गेले नाही त्यादिवशी. आज पुन्हा वाचली… मन, डोळे सारेच कसे भरून आलेय…. कारणे अनेक आहेतच. काही ताजी काही जुनी…आजचा दिवस सारखे हेच घोळणार मनात. महेंद्र, फार फार हळवं केलस रे….

 44. SUSHMA says:

  me baba vishyi katha vachali aani dolyat pani aale maze vadil 70yrs aahet aani aatachya genration madhe bolayache mhanje te thode khadus aahet pan me he vachle aani mala tyanchya tya swabhavabaddal aatta kahich vatat nahi aqamhi tyana samjayala kahitari chukate aase vatate thanks .

  • सुषमा
   ब्लॉग वर स्वागत आणि लवकर लक्षात येणं महत्वाचं. बरेचदा एखादी गोष्ट रिअलाइझ करायला खूप वेळ होतो..

 45. Rajendra says:

  महेंद्र जी
  मनापासून लिहिले तुम्ही, मला खूप आवडले. मी नेहमीच तुमच्या पोस्त वाचतो.पण आज बर्याच दिवसा नंतर मन भरून आले. आज आपले जगणे एवढे यांत्रिक झाले आहे कि बाबांशी प्रेमाने दोन शब्द बोलायला व मन मोकळे करायलाही जमत नाही. एकाकांतात सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात- त्यांचे प्रेम, माया, धडपड सगळे सगळे आठवते पण का कुणास ठाऊक ते त्यांचासमोर व्यक्त करायला घाबरतो. आई-वडील लहान पानापासून आपल्याला देतच असतात व त्यांनी देतच राहावे हि आपली सर्वसाधारण इच्छा असते. पण आपणही त्याचे ऋणी आहोत आणि ही परतफेड ह्याच जन्मात करायची आहे हे बहुतेकजन विसरतात.
  धन्यवाद.

  • राजेंद्र
   ब्लॉग वर स्वागत, प्रतिक्रिया तर अगदी मनाला स्पर्शुन गेली, आणि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटले. धन्यवाद..

 46. Ravindra says:

  Mahendraji,

  Kharach baba chiranjiv asate tar. Maze baba khedyatil shetkari hote tyani aamchya ekatra kutumbasathi kiti kashta ghetle he ethe sangayche tar ratra purnar nahi. aaple doghanche baba sarkhech farak fakta te shetkari hote. gharchi paristhiti betachi atonat kashta yamadhun mothe kutumb sambhalun amhala engineer kele. changle diwas aale ani ani cancer ne aghat kela aso ashru awarat nahit ………………….. parat bhetu

  • रविंद्र
   मला वाटतं की ही गोष्ट जी तुम्ही लिहिली आहे, ती लवकर लक्षात यायला हवी आपल्या- बरेचदा आपल्याला काय वाट्तं त्यांच्याबद्दल हे सांगायचं राहून जात, बरेचदा हिम्मत होत नाही समोर बोलायची- कारण संस्काराचे परीणाम असतात ते. प्रत्येक गोष्ट आईच्या माध्यमातून बाबांपर्यंत पोहोचवयाची आपली सवय असल्याने आपण प्रत्यक्ष बोलायला लागलो की अडखळतोच.. असो..
   अभिप्रायासाठी आभार.,

 47. अरविंद दिगंबर हंबर्डे says:

  होत काय कि लहानपणी आपण खेळात, मित्रात गुंगलेले असतो. आई बाबा समजण्या इतकी अक्कलही नसते. हळुहळू आई बाबा समजत जातात. पण खूप वेळा मनातल सगळ बोलता येत नाही. अर्थात आपल्या वागण्यातून त्याना ते नक्कीच कळ्त.
  सगळ छान चालू असत आणि एके दिवशी ते हिरावले जातात. आणि अशावेळी बहीण भावाच नात कामी येत. बहीण आईची माया देते. भाऊ बाबांची उणीव भासु देत नाही.
  …………………………… देव खूप दयाळू आहे.

  • अरवींद
   प्रतिक्रियेसाठी आभार. आणि ब्लॉग वर स्वागत.. बहीण भावंडांच नातं हा एक दिलासा म्हणता येईल. पण जेंव्हा वडीलांबद्दल खरी जाणीव होते तेंव्हा समजतं की हे आधीच समजायला हवं होतं आपलाला. बहिण भावंडाचं नातं अर्थात थोडा दिलासा तर देऊनच जातं.

 48. sandip says:

  kaka sundar lekh. mala mazya bababadal asech kahi mhanayache ahe.

  • संदीप
   लवकर सांगा.. नाहीतर नंतर पश्चाताप होत राहील, की आपण का सांगितलं नाही म्हणून!

 49. Gurunath says:

  फ़ारच सही, ह्याच्या अनुषंघाने…. एक ऋचा आठवली….

  नेमके सुक्त किंवा संस्कृत आठवत नाही पण भावार्थ काहीसा असा आहे

  “माता ही जमीनी प्रमाणे असते…. किती ही कुदळी घातल्या तरी वात्सल्याचे मोतीच देते
  पण पिता हा आकाशा समान असतो… त्याच्यापर्यंत हात जरी पोहोचला तरी आयुष्य सफ़ल झाले
  पिता हा हाच प्राणवायु असतो ज्याचे अंतःकरण तुमच्या सहीत तुमच्या धरती स्वरुपी माते ला सहज कवेत घेण्याइतके विशाल असते”

  का काय माहीत पण एका विशिष्ट वया नंतर मुलाचे अन वडीलांचे बोलणॆ फ़ार कमी होऊन जाते….
  अगदी काही इश्यु नसले तरीही…. का कोण जाणॆ….

  तसेच अजुन एक ऑब्झर्वेशन…

  मुली कंपॅरेटिव्ह्ली बाबा च्या जास्त लाड्क्या असतात अन जवळ असतात… अन मुले आईच्या….

  तुम्ही हसाल पण अजुन ही घरी गेलो की एकदा तरी लिटरली आई चा पदर धरुन मागे मागे हिंडल्या शिवाय

  माझी ट्रीप सार्थकी लागतच नाही घरची!!!!

  😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀

  • आईचा लाडका असतोच मुलगा नेहेमी. पण वडीलांशी संवाद कमी होतो हे नक्की! का ते सांगता येत नाही..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s