कारगिल..

कारगिल विजय - मुश्कोह शिखर

कारगिल च्या युद्धामधे  हौतात्म्य पत्करलेल्या  योध्यां मधे कोण  कोण होते??  खाली यादी देतोय बघा..

मिलिटरीचे अधिकारी
मेजर :- १०
कॅप्टन :- ८
लेफ्ट. कर्नल:- ३
लेफ्टनंट:- ७
शिपाई :- २७
सगळे मिळून अधिकारी २८, आणि शिपाई २७.

एअरफोर्सचे अधिकारी
स्क्वॉड्रन लिडर :-२
फ़्लाइट लेफ्ट:- २
सार्जंट:- २

सगळे मिळून ६

वर दिलेली यादी आहे सगळ्या हुतात्म्यांची..(नेट वरून घेतलेली ) या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी कितीही जरी  केलं तरीही या देशातला प्रत्येक नागरिक त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही या बद्दल कोणालाच आक्षेप नसावा .  जेंव्हा शासनाने ठरवले की या लोकांसाठी काहीतरी करायचे आहे  , तर   कुठल्याच लेव्हल वरून या गोष्टीला विरोध होणार  नाही, आणि  प्रत्येक भारतीय या गोष्टीचे स्वागतच करेल याची खात्री होतीच. नेमका   आपल्या नेत्यांनी जनतेच्या ह्याच मानसिकतेचा फायदा घेण्याचे ठरवले.

एक संधी दिसते आहे या शहीदांच्या नावाने पैसे कमवायची, तेंव्हा   नेत्यांच्या बरोबर, आर्मीचे  उच्चाधिकारी ,  मंत्री आणि त्यांचे  नातेवाईक आपापल्या बाह्या सरसावून आपापला वाटा उचलायला पुढे झाले. चोर चोर मावस भाऊ या अर्थाची एक म्हण आहे हिंदी मधे…एखाद्या मेलेल्या प्रेता भोवती जशी गिधाडे जमा होतात, तसे हे सगळे  लोकं एकत्र होऊन  त्या ’संधी ’ भोवती घोंगावू लागले.

या नेत्यांनी एक जावई शोध लावला, की कारगिल मधे शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवांसाठी  मुंबईला फ्लॅट्स हवे आहेत (?)…  मग काय करायचं? मिलिटरी ची एक जागा आहे कफ परेडला, तिथे   एक  बिल्डींग बांधायची आणि  ५०-६०  लाखात विधवांना/ कारगिल वीरांना फ्लॅट्स द्यायचे.

काही मुलभूत प्रश्न आहेत बघा माझ्या मनात.

पहिली गोष्ट जर एखाद्या यो्ध्याची विधवा जर दिल्ली मधे रहात असेल तर तिला मुंबईला फ्लॅट देऊन काय साधणार?? किंवा तिला इंटरेस्ट तरी असेल का या मुंबईच्या फ्लॅट मधे?? अर्थातच नाही. हीच गोष्ट इतर शहरात रहाणाऱ्या कारगिल विधवांना पण लागू होते. एखाद्या चंदीगढच्या, हिमाचल च्या विधवेला मुंबईला फ्लॅट ऑफर करण्यात काय हशील आहे?कदाचित एखाद्या हिमाचल मधल्या शिपायाच्या विधवेला तिच्या गावात किराणा दुकान सुरु करायचे असेल, दुसऱ्या एखाद्या विधवेला दुसरं काही करायचं असेल, तिच्याच गावात राहून,  कोणाला शेती करायची असेल  ! दुर्दैवाने कोणाला काय मदत हवी आहे हे विचारण्याचे पण कोणी कष्ट घेतले नाहीत आणि स्वतःच्याच मनाने काय करायचं याचा निर्णय घेतला.

वर दिलेली यादी बघा…वर दिलेल्या शहीदांच्या यादी मधे ऑफिसर्स आहेत २७…  इतर सैनिक आहेत २८ -सैनिकांच्या विधवांना प्रॉव्हीडंट फंड , आणि इतर  फायदे मिळून जवळपास १५ ते २० लाखापर्यंत पैसे मिळाले असतील. त्या पैकी जे अगदी तरूण वयात गेले, ( म्हणजे कॅप्टन , नायक वगैरे च्या लेव्हलचे) त्यांच्या विधवांना तर दहा लाख तरी प्रॉव्हिडंट फंड मिळाला असेल की नाही याची शंकाच आहे मला . समजा सगळे पिएफ चे पैसे भरले तरी पण नंतर लोन फेडायला पैसा कुठुन येणार आहे त्यांच्याकडे? मिळणारी तुटपुंजी पेन्शन आणि वाढणारे खर्च  अशी परिस्थिती असेलच..अशा परिस्थितीत एकही विधवा ते ४०-५० लाखाचे फ्लॅट्स अफॉर्ड करू शकणार नाहीत- याची पुर्ण कल्पना त्या चोर  नेत्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना होती.

१०-११ वर्षापुर्वी झालेलं युध्द आज आपले सगळे देशवासिय विसरून गेले आहेत. आपले नेते आणि नागरिक  सुद्धा फारच  बेजबाबदार वागतात.एखाद्या खेळात  जर भारत जिंकला, तर तो  एखादे पदक मिळवणाऱ्या खेळाडूवर करोडो रुपयांची खैरात केली जाते. केंद्र आणि राज्य शासन एक करोड रोख, पन्नास लाख रोख अशा रकमा देतात.    तो खेळाडू  जरी १२वी नापास असेल तरी पण त्याला सरळ क्लास वन ची नोकरी दिली जाते, त्याबद्दलही  माझा अजिबात आक्षेप नाही.खेळाडूने एखादे पदक जिंकले तर देशाचे नाव उंच केले हे मान्य , त्या साठी त्याला एक कोटी दिले तरीही मान्य, त्या खेळाडूंची उघड्या ट्रक मधून मिरवणूक काढा.. ते पण मान्य, डोक्यावर घेऊन नाचा- ते पण मान्य, त्यांचे फोटो घरात लावून पुजा करा- ते पण मान्य………. पण  देशाला देश म्हणून एकत्र ठेवण्यासाठी बलिदान  दिलेल्या त्या शिपायाच्या /अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांसाठी काय केलं जातं हे आम्ही जाणून घेण्यात थोडा तरी ईंटरेस्ट घ्यायलाच हवा .

आपल्या नेहेमीच्या कामात आपण इतके मश्गुल असतो, की आपण त्या १० वर्षापुर्वीच्या घटनेला विसरून पण गेलो आहोत.   खेळामध्ये  मिळवलेल्या मेडल्स पेक्षा  सिमेवर सैनिकांनी केलेले  बलिदान जास्त श्रेष्ठ आहे,  पण  दुर्दैवाने निर्लज्ज राज्यकर्त्यांच्या डोक्यात ती गोष्ट घुसत नाही किंवा राज्यकर्त्यां कडून  मुद्दाम  त्या कडे दुर्लक्ष केलं जातं- कारण काय?? तर जनतेला पण इंटरेस्ट नाही म्हणून- जनतेला जितका इंटरेस्ट खेळात आहे त्याच्या एक  शतांश जरी या गोष्टीत असला तर शासनाची असे वागण्याची हिम्मत होणार नाही.पुन्हा एकदा लिहितो,  खेळाडूंसाठी काय  आणि किती केलं जातं यावर   अजिबात आक्षेप नाही, पण  त्याच सोबत, युध्दात देशासाठी जीव दिलेल्या त्या शिपायाच्या /अधिकाऱ्याच्या घरच्या लोकांसाठी जेवढं खेळाडूंसाठी केलं जातं त्यापेक्षा कांकणभर जास्तच करावं एवढीच इच्छा .

पतीच्या देशकार्यासाठी झालेल्या मृत्यूमुळे आधीच हवालदिल झालेल्या विधवांना मिळणारे तुटपुंजे पेन्शन आणि थोडाफार प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा इतकेच काय ते इनकम.हे असे फ्लॅट्स वगैरे  त्यांच्यासाठी म्हणून बनवायचे, नंतर मग अर्थातच  त्यांना परवडत नाही  किंवा त्याना हे फ्लॅट्स घेण्यात  काही इंटरेस्ट नाही, म्हणून तेच फ्लॅट्स आपल्या आणि आपल्या नातेवाईकांना अगदी  नगण्य भावात द्यायचे अशी मोडस ऑपरेंडी. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे मुख्य मंत्र्याने दिलेला राजीनामा स्वीकारला, म्हणजे आता तो त्या पापातून मुक्त झाला असा प्रचार राजकीय दृष्ट्या केला जातो.

या नेत्यांबरोबर इतर १६ जे मिलिटरीचे लोकं ज्यांनी कारगिलच्या  युद्धात भाग घेतला नव्हता, पण तरीही इथले फ्लॅट्स पदरात पाडून घेतले होते, त्यांचे वागणे पण खरंच अशोभनीय आहे, त्यांचे ही कोर्टमार्शल करून चौकशी करायला हवी.

जर असे फ्लॅट्स द्या्यचे असतीलच म्हणजे जर शासनाची खरंच फ्लॅट्स द्यायची इच्छा असेल तर  सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा त्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून   एकही पैसा न घेता हे फ्लॅट्स त्या विधवांना देऊन टाकावे. जर हवे असतील तर त्या ते ठेवतील, नाहीतर बाजार भावाने विकून टाकतील.एवढेच नाही तर  या शिवाय त्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारे व्यवसाय जसे पेट्रोल पंप वगैरे अलॉट करणे  जास्त योग्य ठरेल .

जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तरी या कारगिलच्या हुतात्म्यांच्या टाळू वरचे लोणी खाणाऱ्या या सगळ्या मिलिटरी अधिकाऱ्यांना, आणि नेत्यांना भारतीय जनता कधीच माफ करू शकणार नाही.आजच्या पेपरला वाचले की ते फ्लॅट पाडण्यासाठी नोटीस दिलेली आहे, जर सरकारला खरंच आपण केले्ल्या चुकीचे परिमार्जन करायचे असेल तर पुन्हा एकदा लिहीतो की  ते   पाडण्या ऐवजी  कारगिलच्या विधवांना विनामुल्य देऊन टाकावे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

62 Responses to कारगिल..

 1. mau says:

  किती सत्य लिहिले आहे तुम्ही..फार छान…..नुसते प्रतिक्रिया देणे म्हणजे काम झाले असे अजिबात नाही पण खरच विचार करण्याजोगा लेख लिहिला आहे तुम्ही…महेंद्रजी पुन्हा एकदा…कमाल केलीत…

 2. काका…राजकारण म्हणजे एक गटार झालं आहे….मला तर आता प्रत्येक राजकारणी सारखाच वाटतो आहे….सगळीकडे अराजकचं माजल आहे….ही कसली लो्कशाही??? बाजार मांडला आहे सगळा…हे राजकारणी लवकरच देश विकायला काढतील.

  • बरोबर आहे. कुठल्याही राजकारण्याचे उत्पन्ना पाच वर्षात किती करोड रुपयांनी वाढले आहे ते पाहिले की हे सहज लक्षात येतं.

 3. रोहन says:

  तुझ्या पोस्टबद्दल मला एक गोष्ट नेहमीच आवडत आली आहे ती म्हणजे तुझ्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तुझ्या लिखाणावर नाही तर तुझ्या लिखाणाच्या विषयावर खूप बोलावेसे वाटते. माझा अगदीच जिव्हाळ्याचा विषय. अनुभवले नसले तरी सैनिकी जीवन बऱ्यापैकी जवळून पाहिलंय मी. लडाख मोहिमेत तर जो भारावलो त्यानंतर एक द्रास मेमोरियल वर पोस्ट पण लिहिली होती. तुला लक्ष्यात असेलच. त्यावरची तुझी कमेंट पण मला खूप आवडली होती. http://indiatravel-rohan.blogspot.com/2009/09/blog-post_25.html

  कारगिल युद्धाची यादी तू कुठून मिळवलीस? ही यादी फक्त कारगिल भागात लढल्या गेलेल्या लढायांची आहे काय??? की संपूर्ण १९९९ च्या कारगिल लढाईची आहे? असेल तर ती चुकली आहे असे माझे मत आहे. ‘भारत-रक्षक’ ह्या साईटच्या मते एकूण शहिदांची संख्या तब्बल ४४९ आहे. पण द्रासची यादी सांगते की हा आकडा २७३ आहे. जबर जखमी झालेल्या अधिकारी-जवानांची संख्या पकडली तर आकडा १०९१ इतका जातो. त्या वरच्या पोस्टमध्ये एक फोटो आहे बघ मी द्रासला गेलो होतो तेंव्हा काढलेला.

  बाकी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर राजकारणात भ्रष्टाचार नेहमीच होता पण लष्करी संबंधातून वाढता भ्रष्टाचार बघून हे अधिक चिंताजनक होतंय. हे अधिक धोकादायक बनू लागले आहे. पण आपण हे कसे थांबू शकणार आहोत? हा एक यक्ष प्रश्न आहेच!!!

  • रोहन
   मी नेट वर सर्फिंग करतांना सापडली एके ठिकाणी बहूतेक एकट्या कारगील शिखराची असावी असे दिसते..

   इथे लिहू की नकॊ ते समजत नाही, पण एमईएस (मिलिटरी इंजीनिअरींग सर्व्हिसेसला ) तिथे काम करणारे ठेकेदार लोकं मनी इटींग सर्व्हिसेस म्हणतात… जास्त लिहित नाही, उगाच नको ते लिहीले जायचे..

 4. असले षंढ राजकारणी आहेत म्हणूनच आपल्या देशाची म्हणावी तशी प्रगती हो‍ऊ शकलेली नाही. आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातला सर्वांत मोठा काटा म्हणजे हे राजकारणीच आहेत!!!

  • संकेत
   केवळ राजकारण्यांनाच दोष देऊन चालणार नाही. इथे राजकारण्यांव्यतिरीक्त मिलिटरीचे मोठमोठे अधिकारी पण इन्व्हॉल्व्ह आहेत, म्हणुन मी थोडा जास्त डिस्टर्ब झालो. नेते हे पैसे खायला म्हणूनच नेते होतात, त्यांनी पैसे खाल्ले याचे मला विशेष काही वाटले नाही……….पण…

 5. Smita says:

  You are so right! malahee haach prashna varanvar manaat yet hota te sagaLa vachatana kee Kargil madhalya sagaLya vidhavanna mumbait flat kay karaychay? especially vikat ka aNee kashya gheteel tya? ek miLavata maNus gelyavar tyanchee priority hee ghar vyavastheet chalavaNa hee asel kee mumbait flat vikat gheNA? madat dyayachee hee koNatee vichitra tarha? Arthaat adarsh scandal madhale sahabhagee mantree santree pahilyavar /vachalyavar hee choree neetach lakshat yete, nirlajjapaNala kahee seema asavee? aNee majee cm chee family chee definition vachaleet na?:-) mazee bayako and Mula evadheech family , tyamuLe sasuchya navavar flat asel tar to bhrashtachar nahee!!! wa re wa!!! apuN hee tyanna kadhun takala yavar khoosh. evadhya paishanchya ghotalyacha kay zala- yaat apalyala veL/ interest nasatoch. tase tar te baramateekar yachya hee varchadh ahet, aKhha Pune ghashat ghatala tya lokaanee, SinhgaD fodun Nanded city phase 2 zalee nahee tar miLavaLee mhaNayacha! shameless!!!

  • निर्लज्जपणा असल्याशिवाय नेता होता येत नाही. ती पहिली अट असते आपल्या राजकारणात. नांदेड सिटी फेज २ बद्दल मी वाचलं, तेंव्हा मला खूप हसू आलं होतं. हे लोकं करतील तितकं थोडंच आहे.
   पद्धतशीर पणे पैसे खाण्याचा मार्ग आहे हा.. मला जेफरी आर्चरची क्राइम पेज आठवली. 🙂

 6. शब्द न शब्द खरा लिहलाय तुम्ही..
  ह्या भ्रष्ट लोकांची भूक एवढी वाढली आहे की त्या सैनिकांच्या जेवणात आणि शवपेट्या विकण्यात कमिशन खातात हे लोक तर घरांबद्दल काय बोलू…आपल्याकडे ठोकशाहीच हवी हे माझा पक्क मत झालय गेल्या तीन-चार वर्षात. तेव्हाच ह्यांच्या बुडाला चटके बसतील…

  • सुहास
   कारगील वरचे अविनाश धर्माधिकारींचे भाषण ऐकले का? नसेल तर अवश्य ऐक. थोडा आवाज खर खर आहे, पण ऐक. हवे असेल तर माझ्याकडून घेऊन जा. मी सिडी बनवून ठेवतो.
   युद्ध सुरु होते कारगीलचे, आणि आपल्या सैन्याकडे पायात घालायला बर्फात घालायचे बुट पण नव्हते… अशा परिस्थितीत हे युध्द जिंकलो आपण. बरेचदा तर संताप येतो ऐकतांना ही लालफितशाही ऐकल्यावर………

   • नाही मी नाही ऐकल…एमपी३ मध्ये किती साइज़ आहे त्या फाइलची? ईमेल करता येईल का? जीमेलवर २०-२५ एमबी अटॅच करता येत..

    >> युद्ध सुरु होते कारगीलचे, आणि आपल्या सैन्याकडे पायात घालायला बर्फात घालायचे बुट पण नव्हते… 😦

    कस होणार आणि काय होणार 😦

 7. Mayur Awaghade says:

  @योगेश, आता काय उरले आहे.. देशाला, सुरक्षेला आणि इतर सगळ्याच गोष्टींना जवळपास विकलेच आहे त्यांनी..

 8. Mrunal says:

  Ajun tari kai honar ahe . to ek gela tar dusara uba rahanar. Hi rajkarnyachi kid mulapasun nasta
  karayala havi.

  • मृणाल,
   कमीत कमी दुसरा थोडा जपून राहील, काल राजाला पण राजिनामा द्यावाच लागला. पोलीटीकल स्ट्रेंथ जरी असली, तरी जनतेच्या इच्छेला दुर्लक्षले तर नक्कीच पुढली निवडणूक हरणार हे त्यांना पण माहीती आहेच, म्हणून अ‍ॅक्शन घेतली जाईलच.

 9. अजय. says:

  महेंद्रजी, धन्यवाद एक नेहमीसारखीच चांगली विचारप्रवर्तक पोस्ट साठी.

  माझ्यामते “हिंदुस्थान” चे राजकारणी या थराला पोहचण्याला आपणच सर्व जबाबदार आहोत. निवडणुकीला आपण एक हक्काची सुट्टी उपभोगतो तर मतदानाला का जात नाही ? मतदान फक्त ४० ते ४५ टक्के होते यासारखी लोकशाहीची थट्टा आणखी काय ?
  आदर्शची इमारत पाडणार हे वाचल्यावर मलापण हा मुर्खपणाचा निर्णय वाटला. यापेक्षा सर्व घरे शहिदांच्या परिवाराला देण्यात यावी.
  ही परिस्थीती बदलायची असेल तर चला सुरु करुया “व्होट बॅंक विरोधी” दल आणि पुढील निवडणुकीत भ्रष्टाचार्‍यांना घरी बसवुया.

  • अजय बरोबर आहे तुझं ….. एकतर लोकं मतदानाला उतरत नाही आणि जे उतरतात ते एका मताला ५०० – १००० रुपये मागतात …. दुर्दैव आहे आपले अजून काय?

  • तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय, आपल्यापैकी ५० टक्के लोकं मतदान करत नाहीत म्हणूनच हे असे लोकं पुढे येतात निवडून. मला अजूनही प्रमोद नवलकरांसारखे स्वतःला झोकुन देऊन काम करणारे नेते हवे आहेत. शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले नवलकर पाहिले, आणि नारायण राणे, छगन भुजबळ पाहिले की बरेचदा आश्चर्य वाटते की इतका फरक का असावा त्यांच्यात??

   आपण पक्षाला मतदान करतो. मत मिळवायला म्हणुन पक्षाला भरपूर पैसे देणाऱ्या लोकांना तिकिटं दिली जातात, आणि पक्षाच्या नावावर कोणीही आंडूपांडू निवडून येतो. आपण पक्षाला मतदान करणे बंद करून व्यक्तीसापेक्ष मतदान केले तर ही परिस्थती नक्कीच सुधारेल.

   बाळासाहेब चांगले म्हणून त्यांचे सगळेच कॅंडीडॆट्स चांगले , राज ठाकरे चांगले म्हणून त्यांचे सगळेच कॅंडीडॆट्स चांगले असेही नाही, नेमकी हीच गोष्ट विसरतो आपण.

   • अजय says:

    मला खर तर मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणुन मतदान करायला आवडते.
    पण मतदानाला गेल्यावर मी खरच बुचकळ्यात (!) पडतो कि वाईटातला चांगला कुठला त्याला मी मतदान करत आलोय. सर्व घटना आणि रोजच्या बातम्या बघितल्यावर मला वाटायला लागले कि हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे का ? कि आपण यांना निवडून देऊन एका पापात सहभागी होतोय.
    हे अस पाप दर पाच वर्षांनी करण्यापेक्षा आपण सर्व सुजाण व (सु)शिक्षीत लोक काय करतोय. जर काही वाईट लोक एकत्र येतात व वर्षानुवर्षे एकत्र राहतात तर आपण सुजाण नागरिकांनीही तस करायला काय हरकत आहे ?
    तर या लेखाला फक्त वाचुन विसरण्यापेक्षा वा यात जिवतोडून अभिप्राय नोंदवून गप्प बसण्यापेक्षा चला तर आपणही देशाला वाचवायची एक चळवळ सुरु करुया, जेणे करुन पुढील पिढी आपल्या नावे बोटे मोडणार नाही, आपल्याला दोष देणार नाही.
    आज प्रत्येक गावात, शहरात अत्रें पासुन बरेच कट्टे सुरु झाले आहेत. आपणही एक “सुजाण कट्टा” सुरु करुया व यात हवामानाच्या गप्पांसोबत पुढील निवडणुकीत कसे उमेदवार निवडून यावेत या संबंधी चर्चाच नाही तर ठोस कृती करुया.
    यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर पुढील महिन्यात एक दिवस एखाद्या मधवर्ती जागी भेटून पुढील दिशा ठरवता येईल.
    आहात तयार ?

    • अजय
     चांगली कल्पना आहे. फेसबुकवरच्य कॉज ला जॉइन झालोय.

     • अजय says:

      फेसबुक वरच्या कॉजला जॉईन झाल्याबद्दल आभार.
      या विषयावर मी बरेच दिवस फक्त विचारच करतोय पण मला काय हवय हे फार चांगल्या तर्‍हेने लिहीता येत नसल्याने मी गप्प होतो. पण या पोस्टने मला व्यक्त करायला वाव दिला.
      आपण फक्त विचारच करित बसलो तर या देशाच अस्तित्व फार काळ टिकणार नाही.

 10. smita says:

  काका, फारच पोटतीडकिने लिहिलय तुम्ही. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. आज आपल्या राजकारणी लोकांनी एवढा भ्रष्टाचार माजवला आहे की त्याची बोलून सोय नाही. एकंदरीत येणार्‍या काळात राजकारणी काय किंवा पोलीस अधिकारी काय, कोणीहीविश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, काही हाताच्या बोटांवर मोजण्या एवढे सोडले तर. भारतात आज एवढा आतँकवाद जो बोकाळला आहे त्याला हेच नेते जबाबदार आहेत, जर वेळीच योग्य कारवाया केल्या असत्या, अन् वेळीच योग्य ती शिक्षा दिली असती तर ही वेळ आलीच नसती. आपले सैनिक जे भारताच्या सीमेवर राहून आपल्या देशाचेच नव्हे तर आपले पण रक्षण करतात त्यांच्यासाठी सर्व डिक्लरेशन तर केले जाते पण प्रत्यक्षात मात्र ती मदत, वा मोबदला त्यांच्या पर्यंत पोचतच नाही. किती निर्लज्ज अन् निर्ढवले आहेत हे लोक. लाज वाटते आपली ही ढासळलेली लोकशाहीची अवस्था पाहून. ह्याला काहीच पर्याय नाही का? अविनाश धर्माधिकारी सारखे माजी अधिकारी पुढे येऊन काही केल तरच, कारण त्यांनी खूप जवळून लढाया, कोर्ट मार्शल, राजकारण्यांची लुड्बूड अन् त्यांचे कार्य पाहिले आहे. लवकरच काहीतरी उपाय निघेल अशी आशा करूयात.

  • स्मिता
   त्यांच कारगील वरचे भाषण अप्रतीम आहे. ते ऐकलं आणि दुसऱ्याच दिवशी ही बातमीप ्पेपरला आली!

   खूप काम करणारा नेता म्हणून प्रसिद्ध असलेला मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला एक नेता, आज करोडो रुपयांची प्रॉपर्टी बाळगून आहे. माझा बालमित्र आहे तो, म्हणुन नांव लिहित नाही- पण वस्तुस्थिती आहे ही.

   नेतागीरी हा बिझिनेस झालाय आजकाल..

 11. jkbhagwat says:

  Hi Mahendraji,
  I am a retired professor from National Defence Academy/I agree with you in all that you have so sincerely expressed in your blog.It is very painful for us at the faculty of NDA when we hear about the deaths of our young offices in J and K and , of course Kargil, and Mumbai.The faces are still fresh in my mind There are many young officers of the age 22 to 24 who had served only for a couple of years in the army on air force.The least that the Government can do now is to publicly apologise to the relatives of these brave martyrs.And of course the essential part , hand over the flats without taking any payment from them.
  May God give them the good sense to wash away their sins
  Regards’JKBhagwat

  • भागवत साहेब,
   इथे एका अधिकाऱ्याच्या जिवाची किम्मत किती आहे? तुम्हाला ती मिराज क्रॅश मधे मारल्या गेलेल्या एका २३ वर्षिय पायलटची केस आठवते का? मी नांव विसरलो, पण त्याच्या आई ने सगळ्या सिस्टीमशी भांडून विमान क्रॅश होण्याचे कारण पायलटची चूक नव्हती हे सिद्ध केले होते. अहो आपल्या नेत्यांना आणि मिलिटरीच्या अधिकाऱ्यांना पण त्या पायलटच्या मृत्युचे खरे कारण पुढे येऊ द्यायचे नव्हते.

   मी स्वतः पण माझ्या सुरुवातीच्या काळात ८३-८४ मधे कोलोस टॅट्रा आणि टॊपाझ च्या ट्रायल्स साठी बरेच महिने सिमेवर होतो. राजस्थानातल्या वाळवंटातली टोपाझची ट्रायल घेतांना तिथे उन्हाळ्यात , आणि थंडी मधे (विंटर ट्रायल्स) काश्मिरला एका भागात कशी परिस्थिती असते,हे मी स्वतः बघितलेले आहे. माफ करा, लिहिण्याच्या भरात स्वतःबद्दल लिहिणे कधी सुरु झाले हे समजलेच नाही.

   मला एक सांगावसं वाटतं, हे फक्त हिमनगा्चे एक टोक आहे.. अजून पाण्याखाली याच्या शतपट भाग जागा व्यापून बसलाय. जो पर्यंत या नेत्यांच्या घरचे तरूण मृत्यु पडत नाहीत तो पर्यंत या गोष्टीचा सिरियसनेस अजिबात समजणार नाही त्यांना..
   प्रतिक्रियेसाठी आभार..

   • लीना चौहान says:

    मिग- २९ च्या अपघातात मारल्या गेलेल्या कॅ. अभिजित गाडगीळ याच्या आई वडिलांनी केस केली होती. रंग दे बसंती या चित्रपटाच्या एंड स्क्रोल मधे त्यांचा उल्लेख आहे. या चित्रपटात जे माधवन चे कॅरॅक्टर आहे ते अभिजित गाडगीळ वर आधारीत आहे. त्यांचा लढा खूप हृदयस्पर्शी आहे. २४- २५ वर्षाचा अतिशय हुशार आणि कतृत्ववान मुलाचा असा अपघाती मृत्यू बघायला लागणे हे फार मोठे दुर्दैव आहे.

   • लीना चौहान says:

    मिग- २१ च्या अपघातात मारल्या गेलेल्या फ्लाईट लेफ्ट. अभिजित गाडगीळ याच्या आई वडिलांनी केस केली होती. रंग दे बसंती या चित्रपटाच्या एंड स्क्रोल मधे त्यांचा उल्लेख आहे. या चित्रपटात जे माधवन चे कॅरॅक्टर आहे ते अभिजित गाडगीळ वर आधारीत आहे. त्यांचा लढा खूप हृदयस्पर्शी आहे. २४- २५ वर्षाचा अतिशय हुशार आणि कतृत्ववान मुलाचा असा अपघाती मृत्यू बघायला लागणे हे फार मोठे दुर्दैव आहे.

    • मी तो चित्रपट पाहिलेला नाही. पण ती अभिजित गाडगीळ च्या आईची कथा मात्र वाचली होती. मला वाटतं त्यांचं नांव कविता आहे. खूप टची गोष्ट होती ती..

 12. महेश says:

  राजकारण्यांनी आपल्या सगळ्यालोकांचे ,वाटोळे केले आहे, राजकारण्यांनी टाळूवरच लोणी खायचं म्हटल्यावर लोक काय करणार ,प्रसासन अधिकारी व राजकर्ते जर भष्टाचार करीत असतीअल तर नुसती उपाय योजना करून चालणार नाही अशा सर्व लोकांना कामावर किवा मत्रीमंडळात स्थान असता काम नाही शेवटी अशा घटना घडणार तेव्हा लोकांनीच दक्ष राहून अशा गोष्टी मिडिया देऊन ज्यागृत राहावे आशा सर्व राजकारण्यांना लोकांनी धारा अजिबात देऊ नये,आपण चागल्या विषयाला वाचा फोडली

  • महेश
   अगदी खर खरं सांगतो….. जर भ्रष्टाचारी नेते नको म्हंटलं , तर मंत्रीमंडळच तयार होणार नाही.. हे मी विनोदाने नाही, तर सिरियसली लिहितोय..

 13. काका,
  ह्या कोडग्या लोकांना शिव्या घालतानाच आपणही किती कोडगे झालो आहोत, ही जाणीव जी तुम्ही करून दिलीत ना ते खूप खूप टोचलं मनाला..
  खरंच आपण सगळेच षंढ झालो आहोत…वांझोटे संताप व्यक्त करण्याखेरीज काहीच करू शकत नाही आपण! x-(

  • विद्याधर
   निवडणूकीत मतदान करून चांगले नेते निवडून देणे तर आपल्या हातात आहे, तेवढे जरी केले तरीही बराच वचक बसेल असे वाटते.या विषयावर लिहून कमीत कमी विचार मंथन झाले, लोकांच्या विचारांना एक चालना तर मिळाली– बस्स एवढंच काय ते अचिव्हमेंट.

 14. कारगिलच्या सैनिकांच्या उपेक्षेबद्दल मी मध्ये लिहिले होते, तेव्हा हीच भावना व्यक्त केली होती की क्रिकेटच्या पराक्रमावर सगळा देश पागल होतो पण कारगिल सैनिकाला घरी परतण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. ओबामांनी भारताचे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचे कितीही गुणगान गायले असले तरी मला वाटते की हा नुसताच पोकळ वासा झाला आहे. भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने देश पूर्ण पोखरून निघतोय. आता ह्यातून बाहेर कधी आणि कसे निघणार ते तो ईश्वरच जाणे!

  • २६/११………
   आपण सगळेच टीव्हीला खिळलेलो होतो. शेवटी एकदाचे ताज मधले सगळे टेररिस्ट मारले गेले, ज्या कमांडॊज नी हे काम केले त्यांच्या साठी एक सडकी बस समोर उभी केलेली होती. ते कमांडॊ बस मधे बसलेले पाहिले, साधी पिण्याच्या पाण्याची पण व्य्वस्था नव्हती त्यांच्यासाठी. *****

 15. vikram says:

  राजकरणी म्हणजे भ्रष्टाचार करणारच असा समज झाला आहे लोकांचा त्यामुळे त्यांना काही विशेस वाटत नाही भ्रष्टाचार झाला याचे
  कशात केला त्याच्याशीही काही देणे घेणे नाही उलट चव्हाण एवढ्या छोट्या प्रकरणात गेले याचेच काही जणांना दुख वाटत आहे आता काय बोलणार
  यात लष्करी अधिकारी अडकलेले पाहून खूप दुख झाले 😦

  बाकी तुमच्या सुचानेशी सहमत आणि उत्तम लेख .

  • विक्रम
   प्रतिक्रियेसाठी आभार. जे काही सांगायचंय ते बहूतेक सगळंच वर लिहून झालंय.. 🙂

 16. अगदी योग्य तेच लिहलत.खरच काय चालल आहे हे…विद्याधर म्हणतो त्याप्रमाणे, वांझोटे संताप व्यक्त करण्याखेरीज काहीच करू शकत नाही आपण! x-(

  • देवेंद्र
   वांझोटे संताप म्हणण्यापेक्षा आपल्या मनातलं स्फुल्लींगत कमीत कमी आपण तरी तेवत ठेवावं म्हणजे वेळ प्रसंगी त्याचा वडवानल होऊन उपयोगी पडू शकेल या अशा लोकांना जाळायला.. मतदानाच्या मार्गाने..

 17. Hemant Pandey says:

  Ya saglya prakarnache mul karan apan voting karat naahi hech aahe. Mahendraji voti kaa kele paahije he tumhi tumchyach shaileet liha!

  • हेमंत
   मतदान करणे हे तर सगळ्यात महत्वाचे.. मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस समजणारे लोकं आहेत आपल्याकडे. मल्टीप्लेक्स मधे खूप गर्दी असते मतदानाला.. अवश्य , मतदानावर पण लिहीन एखादा लेख लवकरच..

 18. Prasad says:

  काका.. ह्या अशा घटनांवरून लक्षात येत कि या सर्व भ्रष्टाचाराची पाळमूळ किती खोलवर गेली आहेत आपल्या देशात…!! आणि कुठे न कुठे आपण हि जबाबदार आहोत या सर्वाला…!!! ४० – ४५% मतदान होता या देशात, आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणे…!! मतदानाला गेलेली ४० – ४५% लोक हि चोरांच्या यादीतील त्यातल्या त्यात बरा चोर निवडून देतात आणि त्यांना निवडणुकी नंतर कळतं कि सगळ्यात मोठा चोर तर हाच निघाला..!! हे कुठे तरी थांबायला हवा…नक्कीच!! आता तर मनापासून वाटता या देशाला खरंच एका “हिटलर” ची गरज आहे…!! थोडी कळ आपल्यालाही सोसावी लागेल पण त्यावाचून पर्याय नाही सध्या…!!! हे असंच चालू राहिला तर खरंच हा देश विकून खातील हे राजकारणी… एक दिवस…..!!!!

  • प्रसाद
   आपली जनता विसरली सगळं काही. पहिल्या पानावर पुन्हा क्रिकेट आणि कोणी कसं खेळलं याची चर्चा सुरु झालेली आहे.. हा एक अतिशय फालतू मुद्दा आहे जनतेच्या दृष्टीने. ज्या देशाची जनता, आपल्या सैनिकांचा मान ठेवत नाही, त्या देशाचे भवितव्य काय असावे पुढे? याचा अंदाजच करता येत नाही.

 19. vishaal devkar says:

  kharach aapalya deshyatil rajkaran mhanje ek gatarach zali aahe.

 20. लीना चौहान says:

  आदर्श सोसायटीचे प्रकरण फारच लाजिरवाणे आहे. हि पोस्ट वाचल्यावर बराच वेळ काय करावे ते सुचत नव्हते. जवळ जवळ एक महिना झाला आता मला भारतात परत येऊन, रोज पेपरात टिव्ही वर भ्रष्टाचार अत्याचार इ बातम्या बघून आता वीट आला. या पोस्ट वर काही प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. मग वाटले ब्लॉग वर प्रतिक्रिया देऊन किंवा चर्चा करून काय साध्य होणार आहे? सगळे ब्लॉग्र एकत्र येऊन काही आंदोलन करणार आहेत की जनलढा सुरू करणार आहेत? स्वतःच्या मनातल्या भावना कोणाशी तरी शेअर केल्याचे समाधान घेऊन आपण परत आपल्या रुटिन मधे व्यस्त होणार. इथे परत यायच्या आधी स्वत:चा ब्लॉग सुरू करावा अशी फार खुमखुमी होती मला. पण इथे आल्यावर वाटत आहे की या व्हर्चुअल वर्ल्ड चा आसरा घेऊन आपण या सर्व परिस्थितीतून स्वतःची तात्पुरती सोडवणूक करून घेत आहोत का? रोजच्या बातम्या वाचून जी अस्वस्थता येते ती व्यक्त करण्याचे एक माध्यम एवढाच ब्लॉग चा उपयोग. आपले विचार ब्लॉग वर व्यक्त केल्याने परीस्थितीत तर काहीच फरक पडणार नाही.

  • लीना
   जन आंदोलन वगैरे सुरु करणे आपल्याला शक्य नाही याची मला जाणिव आहे. आता हेच पहा नां, गेले दोन दिवस इतकं काम होतं की मला ब्लॉग वर यायला पण झाले नाही, आणि कॉमेंट्सल उत्तरं पण देऊ शकलो नाही

   आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात- नोकरी व्यवसाय वगैरे… ब्लॉगिंग नाही. स्वतःच्या मनातलया भावना मनात ठेवून कुढत रहाण्यापेक्षा इथे लिहिल्याने मोकळं वाटतं हे नक्कीच.

   या डिस्कशन मधुन एक चांगला मुद्दा समोर आला तो म्हणजे मतदान करणे कसे आवश्यक आहे.स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी पण हे सांगायला लागावे हे पाहिल्यावर मनात प्रश्न उभा रहातोच की आपण खरंच लायक आहोत का लोकशाहीसाठी?

   • लीना चौहान says:

    तुम्ही म्हणता ते ही खरच आहे. शेवटी प्रत्येकाला आपापल्या प्रायोरिटीज ठरवून आपल्याला काम करावे लागते. पण शेवटी हिच मध्यमवर्गाची निश्क्रियता आपल्याला भोवत आहे का?
    ४ वर्षे परदेशात राहून भारतात आल्यावर सर्वात पहिल्यांदा जाणवते ते बेदरकारपणा आणि शून्य सामाजिक जाणिव. जो पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतः भारतीय असण्याचा अभिमान वाटत नाही तो पर्यंत ही लुटण्याची प्रवृत्ती अशीच राहणार. मेरा भारत महान हे आता परदेशात व्यवस्थित सेटल झाल्यावर म्हणायचे गाणे झाले आहे.

    • अजय says:

     मी वरच्या माझ्या प्रतिक्रीयेला महेंद्रने दिलेल्या उत्तराला परत एक अभिप्राय दिला आहे. कृपया तो वाचावा व आपण काय करु शकतो (?) याबद्दल विचार करावा.
     आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुणगान करतो. त्यांनी तर घरावर तुळशीपत्र ठेवले. एकटेच नाही तर संपुर्ण कुटूंबाने आपले हात पोळून घेतले. शहिद झालेले कितीतरी आहेत.
     आपण आजच सुरुवात करुन महिन्याला किमान एक रविवार खर्चुया व एकत्र येऊन काहितरी करुया.

     • लीना चौहान says:

      मी तुमची प्रतिक्रिया वाचली. पण फ़ेसबुकवर कुठले कॉज जॉईन करायचे ते मला कळले नाही.

      • फेसबुक वर अजय ने एक कॉज सुरु केलेले आहे , त्याबद्दल लिहिले आहे मी. 🙂 मी मतदान करीन म्हणून कॉज आहे सुरु केलेले.

 21. prabhakar says:

  No doubt your blog is best. Your all posts are best. I wanted to know one thing from you as I do not have any contact related to blogging that for few days I am not able to access “marathiblogs.net”. Is there any problem with the site really or I am not getting an access? Or any censor problem is there. Because I am in such a country where anything can be censored any time.Will you please reply me.

  • प्रभाकर
   सध्या मराठी ब्लॉग ही साईट बंद आहे- भारतात सुद्धा.. कारण काय ते समजत नाही.
   साईट कोणाची आहे , ते पण माहीती नाही, त्यामुळे कोणाला कॉंटॅक्ट करावा तेच समजत नाही.

 22. खरंच हे किती लाजिरवाणं आहे? राजकारण्यांना लाज राहिलीच नाहीये पण अजाणतेपणी आपणही कोडगे झालो आहोत.. शी !!!

  लेटेस्ट बातमी वाचलीच असाल. आदर्श सोसायटीच्या यादीत ज्या दोन सैनिकांची नावं दाखवून त्यांच्या नावावर इमारत उभी केली गेली होती त्या दोन सैनिकांची नावं कारगीलच्या युद्धात लढलेल्या वीरांच्या यादीत नाहीच आहेत असं लष्करप्रमुखांचं म्हणणं आहे. म्हणजे पायापासून सगळंच खोटं आहे यात !!!!!!!!!

 23. सचिन says:

  नमस्कार काका,

  अगदी कळीचा विषय आहे हा.. आपण मांडलेले मुद्देही यथायोग्यच आहेत..
  परंतु आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक आत्ता प्रसिद्धी मिळालेला विषय आहे हा.. म्हणून परत मागच्या पानावर गेलाय..
  १९९९ ला सुरु झालेले हे कांड २००३ मध्ये एका पत्रकाराने जगजाहीर केले.. पण सर्वांनी तेव्हा दुर्लक्ष केले.. आता वर येण्यामागे नक्की वेगळी कारणे आहेतच..
  याचा अर्थ माध्यमेही मोठ्या प्रमाणावर दोषी आहेत यात..

  http://www.thehindu.com/opinion/lead/article876702.ece?homepage=true&sms_ss=facebook&at_xt=4cd9e37d47149515,0
  प्रतिक्रिया पण वाचा .. खासकरून राजेश Mathews यांची..

  राजकारणी तर दोषीच पण एक दुसरी बाजू पण वाचायला मिळाली नुकतीच..
  http://kedarsoman.wordpress.com/2010/11/10/who-is-more-corrupt-middle-class-indians-or-politicians/

  कळावे,
  सचिन

 24. Pingback: links for 2010-12-01 « An Engineer’s God

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s