अरे सेन्सॉर सेन्सॉर…

सेन्सॉरशिप चा खरा अर्थ मला २५ जुन १९७५ ला समजला.  माझं वय साधारण १५ असेल तेंव्हा. सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे पेपरकडे झेप घेतली. आमच्या घरी तेंव्हा तरूण भारत यायचा- ( नागपूरला अजूनही तरूण भारतच घेतात माझे वडील) . पेपर उघडला आणि पहिल्या पानावर बऱ्याच ठिकाणी कोरे दिसले. माझ्या उण्यापुऱ्या १५ वर्षाच्या काळात कोरे असलेले फ्रंट पेज मी या पूर्वी कधीच पाहिले  नव्हते, पण असा कोरा पेपर दिसल्यावर बहुतेक प्रेस खराब असेल म्हणून असं  को पान आलं असावं असाही संशय आला. पहिल्याच पानावर एक मोठ्या अक्षरात बातमी होती ’आज पासून पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली म्हणून.

आता ही आणीबाणी आणि मिडीया सेन्सॉरशिप एकदमच लागू करण्यात आली. कुठलाही मजकूर छापण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले होते.तरूण भारताच्या बऱ्याच बातम्या सेन्सॉर ने काढून टाकल्या ,त्यामुळे राहिलेली कोऱ्या  जागा ही आणीबाणीचा निषेध म्हणून   कोऱ्याच ठेवल्या होत्या. ही खरी पहिली वेळ सेन्सॉरशिप म्हणजे नेमकं  काय हे समजायची.

सिनेमा सुरु होण्यापूर्वी एक भारतीय न्युज रील दाखवण्याची पद्धत होती पुर्वी.  ती दाखवून झाली की मग   सिनेमाच्या आधी एक सर्टीफिकेट दाखवायचे सेन्सॉरबोर्डाने इश्यू केलेले. त्यावर सिनेमाचे नाव आणि लांबी म्हणजे किती रिल्स आहेत ते लिहिलेले असायचे. ती पहिली स्लाईड दाखवली की सगळे लोकं किती रिल आहे ते म्हणजे १६, किंवा १७ जे काही लिहीले असेल ते मोठ्याने कोरस मधे सोळा ……..असे म्हणायचे. अगदी ठरलेल्या रिच्युअल्स प्रमाणे हे सगळं चालायचं- आणि याच दिवसात पहिल्यांदा सेन्सॉर म्हणजे काहीतरी असते असे समजले होते. पण खरंच या सेन्सॉर बोर्डाच्या सर्टीफिकेट चा अर्थ काय असतो ते मात्र माहीत नव्हते.

नंतर बरेच दिवस  सेन्सॉर बोर्ड असूनही  त्याचे अस्तित्व जाणवेनासे झाले. सेक्स आणि व्हायोलन्स या वर नियंत्रण  ठेवण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे- पण ते केले जात नव्हते. शोले मधल्या व्हायोलन्स बद्दल पण बराच उहापोह झाला होता.   सिनेमा तयार करण्याचे काम प्रोड्य़ुसरचे, डायरेक्टर आणि  नट नट्या फक्त कामं करणार, नंतर हे सेन्सॉर बोर्ड त्यांना वाटेल ते कट्स सुचवणार, आणि मग सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगी देईल अशी व्यवस्था केलेली आहे.एखादं बोर्ड स्थापन होतं, पण त्या बोर्डाने कुठल्या  विशिष्ट  नियमांचे पालन करावे असे अपेक्षित असते ते  लिखित स्वरूपात नाही- कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. फक्त त्या बोर्डावर असलेल्यांच्या सद्सदविवेकबुद्धीला   स्मरून ते सिनेमामधे कट्स सुचवतात –  सिनेमात काय दाखवावे आणि काय नाही हे अजूनही कायद्याप्रमाणे ठरवले गेलेले नाही .

पूर्वीच्या काळी चुंबनाचे सिन्स पण कट केले जायचे, आणि फक्त दोन फुलं एकमेकांच्या जवळ आलेले दाखवून आर्टीस्टिकली काय होतंय ते उद्युक्त केले जायचे. पहिला न्युड सिन बहूतेक मेरा नाम जोकर मधे सिमी गरेवालचा होता. नंतर स्क्रिप्टची गरज म्हणून चुंबनाचे सिन्स  सेन्सॉर बोर्डाकडून सर्रास पास केले  जाऊ लागले.  समाजाच्या बदलत्या आवडीचे लक्षण आहे हे? की थोपलेल्या बदलामुळे तीच आवड निर्माण झालेली आहे??

मी पूर्वी झारसुगडा नावाच्या एका ओरीसामधल्या लहानशा गावात कामासाठी गेलो होतो. दुपारी  उन्ह खूप जास्त असते, म्हणून दुपारी कोणीच नसायचे   साईटवर. सिनेमा हॉल मधे एअर कुलर होता म्हणून दुपारी    दुपारी वेळ काढायला म्हणून सिनेमा पहायला जाऊन बसलो. सिनेमाचे नाव  आठवत नाही.  सिनेमा सुरु झाल्यावर लक्षात आलं की हा तर  डब सिनेमा आहे, पण तरीही ठिक आहे म्हणून पहाणे सुरु ठेवले.मस्त पैकी एक झोप काढावी म्हणून छान सेट झालो खुर्ची वर, थोडा डॊळा लागला असेल  तोच   पाच दहा मिनिटात लोकांनी ओरडा सुरु केला आणि  हॉल मधे चक्क हा नेहेमीचा सिनेमा बंद करून ब्लू फिल्म दाखवणे सुरु केले गेले होते. मी फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होतो..

काही गोष्टी सगळ्यांमध्ये बसून करायच्या नसतात- तर एकट्याने बसून करायच्या असतात- जसे ब्लु फिल्म्स पहाणे वगैरे..  पण इथे मात्र शेकडॊ लोकं एकत्र बसून असा चित्रपट पहात होते – मला एकदम किळस आली, आणि उठून सरळ बाहेर निघून गेलो. परवाच टाइम्स ऑफ इंडीयामधे वाचले की ,  नुकत्याच  झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आलेले आहे की जवळपास ९७ टक्के पुरुषांनी कधी न कधी ब्लु फिल्म पाहिलेली असते, किंवा पहातात!  म्हणून पहाणे किंवा न पहाणे हा प्रश्न नाही , तर सिनेमा हॉल मधे ब्लु फिल्म दाखवली जात होती म्हणजे  आणि सेन्सॉर बोर्डाच्या सर्टीफीकेटचे महत्व काय राहिले?  जर  ब्लु फिल्म्स एखाद्या सिनेमा हॉल मधे उघडपणे दाखवले जातात, तर याचा अर्थ हा पण होतो, की लहान गावात  चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले सिन कट न करता पण  सिनेमा दाखवला जात असावा, किंवा जाऊ शकतो .   हे सगळं पाहिल्यावर मनात प्रश्न उठतो तो म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या  सर्टीफिकेटला खरंच काही अर्थ उरतो का?

बिग बॉस आणि राखी का इन्साफ मधे दाखवले जाणारे सिन आणि भाषा या बद्दल न बोललेलेच बरे. नुकतीच त्या दोन्ही कार्यक्रमांची वेळ प्राइम स्लॉट वरून  काढून रात्री ११ नंतर करण्यात यावी असा निर्णय दिलाय न्यायालयाने. टिव्ही वर दाखवले जाणाऱ्या कार्यक्रमावर तर अजिबात काही अंकुश नसतो. त्या प्रोड्युसर्सची  इच्छा असेल ते दाखवले जाते. बिग बॉस मधे उघडपणे पुरुषांनी स्त्रियांच्या अंगचटीला जाणे, किंवा उचलणे, शिवीगाळ वगैरे अगदी सामन्य जिवनाचा भाग म्हणून दाखवले जातात. हनीमुनच्या रात्रीचे डायरेक्ट प्रक्षेपण केल्याने तर लोकांना जास्तच जाणवली नग्नता, आणि कोणीतरी कोर्टात केस दाखल केली …राखीका इन्साफ या शो मधे आलेल्या एका माणसाने राखीने केलेल्या अपमानामुळे आत्महत्या केली . या कारणामुळे हा शो लेट नाईट दाखवावा म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे, पण अजूनही प्राइम टाइम मध्येच हा शो दाखवला जातोय.

पूर्वी शिवसेनेने एकदा या शो वर बंदी आणावी म्हणून वॉर्निंग दिली होती, आणि काही दिवसांसाठी शो बंद पण झाला होता, पण नंतर म्हणजे दोन तिन दिवसांनी   बहूतेक मांड्वली झाली असावी आणि हा शो पुन्हा सुरु राहू देण्यास शिवसेनेने परवानगी दिली . ज्या कारणासाठी ही बंदी घातली होती (पाकिस्तानी कलाकारांचा समावेश) ते कारण   पुन्हा  परवानगी देतांना बाजूला ठेवल्या गेले , ती पाकीस्तानी  नटी अजूनही त्या शोमध्ये आहेच-अर्थात याचे कारण काय असावे ते आपण सगळे जाणतोच!

असाच एक कार्यक्रम अ‍ॅक्स युवर एक्स” मधे पण आपल्या ’एक्स बॉय किंवा गर्ल फ्रेंडचा’   बदला घ्यायला एक चॅनल मदत करते. आणि तो प्रकार टिव्ही वर दाखवला जातो. एखाद्या स्त्रीच्या पर्सनल आयुष्याचे धिंडवडे काढायचा अधिकार त्या चॅनल ला कोणी दिला?या कार्यक्रमाला कोणीतरी  स्पॉन्सर केलेले आहे. शो च्या शेवटी जेंव्हा ती मुलगी रडते -भेकते तेंव्हा तिला सांगितलं जातं की तिच्या बॉय फ्रेंडने हा बनाव रचला आहे म्हणून- आणि तेंव्हा तो  अ‍ॅंकर हसत होता ते पहातांना खूप संताप येतो. प्रोग्रामच्या अ‍ॅंकरच्या अथवा प्रोड्य़ुसरच्या  बायकोच्या किंवा बहिणीच्या बाबतीत तो असे शो करेल का- हा प्रश्न मनात येतोच.

तसेच  आपल्या बॉय फ्रेंडची किंवा गर्लफ्रेंडची   किंवा पती पत्नीची लॉयलटी टेस्ट करण्यासाठी पण एक कार्यक्रम दाखवला जातो. त्या मधे त्या मुलीला किंवा मुलाला तिच्या सध्या असलेल्या फ्रेंड पेक्षा जास्त सुंदर आणि श्रीमंत फ्रेंड भेटतो आणि मग तिला/ त्याला प्रपोझ करतो. जर त्याने नाही म्हंटले, तर लॉयलटी टेस्ट पास.. नाही तर फेल.. आणि जर तो/ती टेस्ट फेल झाले तर मग टिव्ही वर लाइव्ह मारामारी शिवीगाळ दाखवली जाते.. हा शो  पण एक चॅनल स्पॉन्सर करतं. या शो मधे लपवलेल्या कॅमेऱ्याने सगळा शो रेकॉर्ड केला जातो. हा  कार्यक्रम असो किंवा सच का सामना  असो- रिअ‍ॅलिटी शो च्या नावाखाली अगदी काहीही दाखवायची पद्धत सुरु झालेली आहे. या व्यतिरिक्त पण बरेच शो आहेत ज्यांची इथे  उदाहरणं देता येतील. पण कोळसा उगाळावा तितका काळाच- किती वेळ उगाळायचा??

आपले टिव्ही चॅनल्स फक्त दोन प्रकारचे कार्यक्रम देतात- एक म्हणजे वर दिलेले किंवा दुसरे म्हणजे सास बहू सिरियल्स… म्हणजे सोप्स! करमणुकीच्या नावाखाली आपण काय दाखवतोय किंवा कितपत न्युडीटी असावी , कितपत सेक्स दाखवावा यावर  काहीतरी नियंत्रण असावे असे  वाटू लागले आहे. मध्यंतरी काही मोठे विचारवंत टिव्ही वर येऊन याच विषयावर चर्चा करीत होते, की ही बिग बॉस वरची बंदी योग्य आहे की नाही म्हणून? त्यावर एक महाभाग म्हणाले, की तुमच्या हातावर चॅनल बदलायचा रिमोट असतो.  त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा की तुम्ही टिव्ही पहातांना मुलांच्या सोबत बसा, त्यांना एकट्याला टिव्ही पाहू देऊ नका असा घ्यायचा का? आणि हे गाढव लोकं असे शो दाखवणार आणि वर आपल्यालाच ज्ञान शिकवणार?? यांची लायकी आहे का तेवढी ??म्हणत होते आम्ही हवे ते दाखवू तुम्ही चाइल्ड लॉक करा . घरामधे १५-१६ वर्षाच्या मुलांना चाइल्ड लॉक उघडता येते हे ते विसरले!

टीव्ही वरच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉरशिप असावी की नाही ? हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून म्हणजे दोन वर्षापुर्वी झालेल्या २६/११ पासून ऐरणीवर आहे. तेंव्हा दाखवल्ल्या गेलेल्या  लाइव्ह न्युज मुळे त्या टेररिस्ट लोकांना फायदा झाला होता हे उघड सत्य आहे- आणि त्यांच्या सॅटलाइट फोन वरून ते सिध्द पण झालंय. त्या मुद्द्यावर   अजूनही काहीच निर्णय झालेला नाही.टिव्ही वर काय दाखवावे आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा आज सर्वस्वी त्या चॅनलच्या प्रॉडक्शन हाऊस कडे असतो -आणि माझ्या मते ते त्याचा ते पुर्ण गैरफायदा घेतात. टिव्ही वरच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉरशिप असणे अतिशय आवश्यक झाले आहे, नाही तर थोड्याच दिवसात तुमच्या दिवाणखान्यात टिव्हीवर मुलांसोबत टीव्ही पहातांना तुम्हाला एक हात रिमोटवर आणि दुसरा मुलांच्या डोळ्यावर ठेवायची वेळ येईल.

अर्थात, सध्या तरी आपल्या हातात फक्त रिमोट आहे, बाकी काही नाही….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to अरे सेन्सॉर सेन्सॉर…

 1. अगदी खरं आहे काका. आजकाल दूरदर्शनवर काय दाखवायचं याला काही धरबंधच राहिलेला नाही. लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची या चॅनलवाल्यांची तयारी असते. कोणाचं लग्न, कोणाचा हनीमून, शिवीगाळ, मारामारी, प्रेमभंग, चांभारचौकशा… कुठलाही विषय वर्ज्य नाही आजकाल. टीआरपी असलं की झालं….

  • संकेत
   बरेचदा तर घरच्यांसोबत बसून टीव्ही बघायची पण लाज वाटते, टीआरपी साठी काय वाटेल ते दाखवणे सुरु आहे आजकाल. इमोशनल अत्याचार हा पण एक तसाच शो आहे.

 2. Gaurav says:

  तुमचा ओरिसाचा अनुभव वाचुन माझ्या (शाळेतल्या) मित्राची आठवण झाली, तो सुद्धा असाच कुठलातरी हिंदी पिक्चर बघायला गेला होता आणि तिथे आत गेल्यावर कामसुत्र सुरु झाला (तो त्याने पुर्ण बघितला तो भाग वेगळा).

  पोस्ट मस्तच झाली आहे, राखीचा इन्साफसारखा थर्ड क्लास कार्यक्रम दुसरा नाही, पण मला वाटले त्या शो चे टाइमिंग ११ चे केल्याची बातमी आल्यावर त्या कार्यक्रमांची लोकप्रियता आणि लोकांची उत्सुकता आणखीच वाढली.

  • गौरव
   जर रात्री ११ वाजता दाखवला आणि दिवसाचे रिपीट टेलिकास्ट करू दिले नाही, तर आपोआपच टीआरपी कमी होईल.

 3. kaka, I was expecting an article from you on this topic. nehami pramanech aprateem lihilay !
  hi post netbhet masikasathi ghetoy.

 4. हेमंत आठल्ये says:

  बरोबर आहे. याला एकच उपाय ‘सेल्फ सेन्सॉर बोर्ड’ उर्फ ‘रिमोट’. कदाचित आश्चर्य वाटेल पण मी अजून एकदाही ते बिग बॉस, राखी का इन्साफ वगैरे पाहिलेलं नाही. आणि चित्रपटांचे बोलाल तर ‘हिंदी’ ला ‘नो एंट्री’ आहे. इंग्लिश पाहतो. मराठी चित्रपटगृहात जाऊन पाहतो. नाहीतर निदान ओरिजनल डीव्हीडी आणतो. एकच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हिंदी कार्यक्रम आवर्जून पाहतो. बाकी, लेख आणि विषय देखील खूप आवडला, अगदी नेहमीप्रमाणे!!!

  • सलील
   अवश्य घे.. माझी काहीच हरकत नाही. तसे बरेच विषय होते, जसे मेणबत्तीवाले वगैरे… (२६/११ मुळॆ) पण त्यावर बरेच लोकं लिहितील म्हणून हा लेख लिहायला घेतला.

  • हेमंत
   धन्यवाद.. तारक मेहेता सुरुवातीला बरा वाटला,पण नंतर मात्र तोच तो पणामुळे बोअर व्हायचा. तसाही मी टीव्ही फारसा पहातच नाही.

 5. एकदम मस्त पोस्ट काका.
  ते दोन्ही कार्यक्रम प्रदर्शित सध्या प्राइम स्लॉटलाच होत आहे कारण सुप्रीम कोर्ट ने त्यांना परवानगी दिली. सगळा खेळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी बस. मग ते कुठल्याही थराला जाउ शकतात.

  • कुठे तरी निर्बंध असायलाच हवा, नाहीतर कमीत कमी अशा कार्यक्रमांसाठी ऍडल्ट चॅनल वेगळे सुरु करावे असे माझे मत आहे.

 6. दिपक says:

  टिव्ही वरच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉरशिप असणे अतिशय आवश्यक झाले आहे, नाही तर थोड्याच दिवसात तुमच्या दिवाणखान्यात टिव्हीवर मुलांसोबत टीव्ही पहातांना तुम्हाला एक हात रिमोटवर आणि दुसरा मुलांच्या डोळ्यावर ठेवायची वेळ येईल.
  >> सध्यातरी आम्ही असाच टी.व्ही. पाहतोय!

  परवा एका मराठी चॅनलवरही हा वाद चांगलाच रंगला होता. काही म्हणा – या चॅनवाल्यांनी “धंदा” सुरु केलाय, असंच म्हणावं लागेल!

  • दिपक
   आतापर्यंत बरेच इश्यु डिस्कस झालेत. जसे टीआरपी साठी देशाची सुरक्षितता धोक्यात घालून कमांडोज चे लाइव्ह प्रक्षेपण.. आणि आता हे नग्न पणा , टी आर पी देशापुढे जास्त महत्वाची ठरते.. दुर्दैव आपलं!!

 7. छान! खरं बोललात. माझ्या लहानपणी घरात पाचवीपर्यंत लाईट नव्हती, किती बरं होतं ते. आम्ही साडे आठ वाजेपर्यंत झोपी गेलेलो असायचो. तो टि. व्ही. पाहणं म्हणजे आयुष्यातला सोन्यासारखा काळ वाया घालवणं आहे.

  • अहो, आमच्या लहानपणी टिव्हीच नव्हता, त्यामुळे मैदानी खेळ< शाखेत जाणे वगैरे सुरु असायचे. घरी आल्यावर जेवण झाले की लगेच झोपी जायचो.. मस्त दिवस होते ते..

   "टि. व्ही. पाहणं म्हणजे आयुष्यातला सोन्यासारखा काळ वाया घालवणं आहे." अगदी बरोबर.. पण हल्ली पालकच मुलांसोबत टीव्ही पहात बसतात तेंव्हा…….

 8. तुम्ही ओरीसाचा अनुभव सांगताय. हे असे आपल्याकडे पण होते. १०-१२ वर्षापुर्वी मला असाच अनुभव. अमरावती मधल्या एका चित्रपटगृहात आला आहे. अमरावती काही छोटे शहर नाही आणि हे चित्रपटगृह पण भर वस्तीत होते. (आता ते बंद पडले.)

  • मला पण हेच म्हणायचंय// की सेन्सॉर सर्टीफिकेटला काही अर्थ राहीलेला नाही. एकदा सेन्सॉर कडून सहमती मिळाली, की मग सगळे कापलेले सिन्स पुन्हा मिक्स केले जात असतील.

   • <<>>>
    मलाही असेच वाटते. सेल्फ़ रिमोट हाच सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. बाकी ओरिसाच्या अनुभवाबद्दल म्हणाल तर ५-१ वर्षांपुर्वी मी हा अनुभव ठाण्याच्या वंदनामध्ये घेतला होता, आता बोला 😉

 9. आका says:

  मी युट्युब वर राखी का ईंसाफ पाहीला… किळस तर आलीच पण त्या मुर्ख प्राण्यांची ती लायकीच आहे हे लक्षात आल्यावर क्लोज बटण दाबलं..
  मी सुद्धा हिंदी सिनेमे न पहाता (अमीर चे वगळता) इंग्रजी किंवा मराठीच पहातो… मराठी मध्येही काहिच चित्रपट खरच पाहण्याजोगे आणि मनोरंजक असतात..
  बाकी सेंसोर बद्दल न बोललेले बरे..

  • मी पण मराठी सिनेमे किंवा हिंदी पहाणे जवळपास बंदच केलंय. सध्या फक्त नेट वरून डालो करून इंग्रजी सिनेमे पहातो.

 10. काका मस्त लिहिले आहे, एकदम प्रातिनिधिक वाटतो हा लेख.
  जरा टोकाचे वाटेल कदाचित पण मझे मत असे झाले आहे ना की टी व्ही हा काहीही करायला नसेल तेव्हा पहाण्याची गोष्ट आहे. अगदी नाही पाहिला तर उत्तमच. मनोरंजन सोडून सर्व असते तिथे. तो न पाहताही उत्तम मनोरंजन होते.
  प्रमुख्याने मुलांनाच पालक टी व्ही पाहताना दिसले नाहीत तर हे वेड कमी होईल. बाकी काही आपल्या हातात नसले तरी काय पहायचे आणि मुलांना काय पाहू द्यायचे हे तर आपल्या हातात असते ना. आपण जर टी व्ही पाहण्यात वेळ वाया न घालवता काही वेगळ्या गोष्टी करण्यात (ज्यामुळे खरेच मनोरंजन होईल) वेळ घालवला तर तशीच सवय घराला लागते, आणि मग स्वखुशीने सगळे टीव्ही पहाणे बंद करतात.
  हेच सर्व सिनेमांबाबतीतही खरे आहे, आज काल माझे नाटक पहाणे वाढले आहे चित्रपटांपेक्षा. 🙂
  सेन्सॉरपेक्षा मला याच गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे वाटते कारण आपण प्रेक्षक म्हणून हेच करू शकतो.

  • दिवसभर आई वडील दोघंही बाहेर असतात. दुपारच्या वेळ्से टिनेजर मुलं एकटीच घरी असतात, तेंव्हा त्यांना तर त्यांनी काय पहावं आणि काय नाही यावर काहीच कंट्रोल ठेवला जाऊ शकत नाही. संध्याकाळी सात ते नऊ या वेळात टिव्ही तर नक्कीच पाहिला जातो . जरी तुम्ही पहात नसला तरी मुलं पहातातच. एक दोन वेळा मी तो कार्यक्रम ’ इमोशनल अत्याचार ’ पाहिला होता – एखाद्याला पब्लीकली ह्युमीलिएट करणे कसे काय मान्य केले जाऊ शकते?

   तुमचे टोकाचे मत एकदम आवडले!!

 11. vikram says:

  T V pahtana nehami kahitari chukatay ase vatat asate aani ase vatu na dene he Censor Boardche kam aahe 🙂

  Baki post chan 🙂

  aamacha akach mantra Jab dekho SAB dekho 🙂

 12. Sarika says:

  Very True….. tumhi ullekh kelele TV varche karyakram pahanyasarkech nahit… Rakhi ka insaf tar kasa chalu rahilay ajun mahit nahi… Rakhi ka Svayamvar/ Rahul ka Svayamvar…. kay challay he?….madhyantari ‘Yala Jeevan Aise Naav’ navacha ek programme chalu hota, Renuka Shahane sadar karit ase…. jemtem 10/11 episod zale astil.. to band zala….. changle karyakram ka chalu thevat nahit??? ani No Grade che kase chalu rahatat……

 13. मनाली says:

  अगदी खरं आहे काका…
  आणि पल्लवी ताईच्या मताशी सहमत.. आमच्या घरी पण गेली महिनाभर
  t v बंद केला आहे…tata sky recharge केला नाही…जी शांतता सध्या अनुभवतो आहे ती शब्दात सांगणे कठिण आहे..सर्वांचा दिवस सकाळी ६ ला सुरु होतो आणि रात्री ९ ला मावळतो.

  या t v बद्दल अजुन एक मुद्दा म्हणजे आजी आजोबा!! तेच इतका TV पाहत बसतात की मुलांना कोणत्या तोंडाने सांगायचे? आमचे आजी आजोबा आले की २४ तास Zee Marathi… channel पण बदलला जात नाही…काही बोलला की सुन वाईट…असो….सध्या तरी घरी शांतता आहे…

 14. महेश says:

  टी आर पी साठी किंवा प्रसिद्धीसाठी टीव्हीवाले काहीही दाखवतात ,घरातल्या सर्व लोकांनी टी व्ही योग्य वेळेस बघावा ,कोणाला दोष देऊ नये ,स्पधेर्चे युग आहे,पण काही गोष्टीवर कायदाचा अंकुश पाहिजे व लोकांचा पण

 15. मी टीवी खुपच कमी बघतो … पण जेव्हा बघतो तेव्हा खरच जाणवते कि सेन्सॉर शिपची गरज आहे..पण हे सेन्सॉर वाले पण किती चांगल काम करतात ते दिसतेच…रात्रीच्या प्राईमटाईम मध्ये तर त्या सगळ्या किळस आणणारया रिएलीटी शोजनी हैदोस मांडलेला असतो,चॅनेल बदलतांना पण ते बघुन संताप येतो…खरच सब वाहिनी त्यातल्या त्यात बेस्ट आहे,हल्केफ़ुल्के कार्यक्रम असतात त्यावर…

 16. महेंद्रजी,
  काय, कधी, कुठे आणि कोणी कोणी पहावे या तुमच्या विचारांशी पूर्ण सहमत.

  याच अनुषंगाने एक सांगावसं वाटतं की, मराठी चॅनेल्स देखील काही काही गोष्टींची पथ्यं पाळत नाहीत.
  कधी कधी विनोदाच्या शोज मध्ये, चॅनेलच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी, क्वचित प्रसंगी गाण्यांच्या शोज मध्ये सूत्र-संचालिकेचे किंवा बक्षीस घेण्यासाठी आलेल्या काही अभिनेत्रीचे कपडे आक्षेपार्ह वाटावेत असे असतात. दोन्ही खांदे उघडे किंवा एखाद्या खांद्यावरून ओघळलेला असा ड्रेस, तोकडे फ़्रॉक्स तसंच अशा शोजमध्ये दाखविल्या जाणार्‍या नृत्यांमधल्या तोकड्या कपड्यांमधल्या स्त्री कलाकार; यात कुठला मराठी बाणा जपला जातो, ते त्यांनाच ठाऊक. मराठमोळी नऊवारी साडी किंवा पाचवारी साडी नेसली पाहिजे अशा जुनाट विचारांचा मी नाही. जीन्स/ट्राऊजर आणि शर्ट/टी-शर्ट अशी वेषभूषा देखील आकर्षक तरीही संयत पद्धतीने करता येऊ शकते. अर्थात् सामाजिक जाणीव, संस्कार, पुढच्या पीढीची काळजी इ. संकल्पना/शब्द त्यांच्या शब्दकोषात असतीलल तरच.

  विवाहबाह्य संबंध किंवा विवाहपूर्व संबंधातून जन्माला आलेलं अपत्य हे अनेक मालिकांमध्ये दाखविल्याने, पुढील पिढीवर काय परिणाम होईल याबद्दल मालिका-लेखक किंवा मलिका निर्मितीशी संबंधित लोक किती विचार करत असतील हा फार मोठा शंकेचा भाग आहे.

  • ह्या सगळ्या मालिकांवर शैलजा शेवडे दर शनीवारी लिहिते लोकसत्ता मधे. या मालिकांमध्ये काय दाखवतील याचा काही नेम नाही. विवाह बाह्य संबंध, कपडे, रहाणी सगळ्याच गोष्टी आक्षेपार्ह्य आहेत. विनोदी मालीकांत तर अजिबात हसू येत नाही.

   कपडे आणि इतर गोष्टी पण आक्षेपार्ह्य आहेतच .निर्माते किंवा तिथे काम करणारे नट नट्या ह्यांना फक्त टीआरपीशी घेणं असते, पुढल्या पिढीवर काय परीणाम होईल त्याचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ तरीआहे का??

 17. mazejag says:

  kaka…agdi barobar…TV war nako te seens, serials ani ads…ythech dhumakul khalat astat….porich Disney channel avdat amhala…hanah montana,dorimon,etc etc…

  Kilas yete kadhi kadhi……pan tyatlya tyat changle programe manje “assignment”, sharadjinche RasshiCharka, pogo varch MAD,artzuka, ani maza all time favourite NDTV warchya mkt updates…baas…urli surli kasar maza Google bharun kadhto

  • हॅना मोंटाना मधे किंवा अजून एक लिझीमॅक्वायर नावाची मालिका, त्या मधे पण किसिंग सिन्स वगैरे दाखवले जातात. ७-८ वर्षांच्या मुलांनी असे सिन्स पहाणे आपल्या संस्कॄतीत बसत नाहीत.
   मुलींनी ९-१० व्या वर्षीच मोठं होण्याचं कारण पण या मागेच दडलंय का?

 18. हे राखी का इन्साफ, बिग बॉस वगैरे मला फक्त ब्लॉग्ज, वर्तमानपत्र वगैरे यामुळेच माहित आहेत. सुदैवाने बघायची कधीच वेळ आली नाही !! तसाही मी टीव्ही फारच कमी बघतो आणि एवढी छोटीशी गोष्ट आयुष्यात आनंदाची एवढी मोठी कवाडं उघडून देत असेल यावर विश्वास तरी बसेल का? 😉

  • ते सगळे शो मी तर कधीच पहाणे बंद केले आहे. मध्यंतरी बे वॉच ची पामेला पण आणली होती त्या शो मधे टी आर पी वाढवायला… तुला यु ट्य़ुब वर पहाता येतील. सगळे आहेत अव्हेलेबल.

 19. mau says:

  खुप छान लिहिलेत महेंद्रजी….हे असले कार्यक्रम दाखवुन आपल्यावरच एमोशनल अत्याचार होतोय असे नेहमी वाटते…आधी एकता बाईंनी कळस गाठलेला..नंतर कलर,स्टार च्या इतर चॅनल्स शर्यतीत उभ्या…आता मराठी सिरीयल्स ही त्याच मार्गावर….राखी सावंत आणि बिग बोस बद्दल तर बोलायचीच सोय नाही…आम्ही पण नुसते ऐकुन आहोत ह्या कार्यक्रमांबद्दल…सुदैवाने ह्या टीव्हीच्या व्यसनापासुन दुर आहोत..आणि तुम्ही म्हणता तेही अगदी खरे आहे.पुर्वी हा टीव्ही प्रकार जास्त प्रमाणात नव्हता.म्हणजे दिवसभरचे प्रक्षेपण नसायचे त्यांमुळे मैदानी खेळांना भरपुर वाव मिळत होता…उरलासुरला वेळ वाचन किंवा music ला दिला जात होता..रेडिओ वर प्रपंच किंव्हा लहान मुलांची अनेक नाटके सादर केली जात होती त्यांची आवड लागली .पण सध्या परिस्थीती हाताबाहेर जातेय हे नक्कीच…घरातील सगळेच वडीलधारे पण टीव्ही समोरुन हटत नाहीत.वेळ जात नाही हा बहाणा सांगुन टीव्हीवर पुर्ण कब्जा त्यांचाच….त्याच्त्याच सिरीयल्सची पुन्हा पुन्हा आवर्तने ..उरलासुरला वेळ मुलांचा CN बघण्यात जातो….मोठ्यांनीच स्वतावर ताबा नाही ठेवला तर लहानांना काय समजावावे?????त्यात एमोशनल अत्याचार ,राखी सावंत धुड्गुस घालतच आहेत..नियंत्रण कसे ठेवावे????

  • उमा
   धन्यवाद. मोठ्यांनीच स्वतःवर ताबा ठेवायला हवा, ह्या गोष्टीशी शंभर टक्के सहमत..

 20. टीव्ही वाल्याना थोडा चाप नक्कीच लावायला हवा आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असे काही दाखवल्यास राष्ट्र्दोहाचाच गुन्हा दाखल करायला हवा.

  बाकी बिग बॉस , राखी इत्यादी शोज वरचा तमाशा मला पेपर मधूनच कळला. शेवटी काय कार्यक्रम पहायचे आणि काय नाही हे आपल्याच हातात आहे ना! 🙂

  नेहमी प्रमाणेच मस्त लेख आहे.

  • आमच्या घरी पण टिव्ही फारसा पाहिला जात नाही. बहूतेक वेळा स्टार वरचे इंग्रजी शोज मुली पहातात. चॅनल व्ही पण फेवरेट आहे त्यांचा. आपणच थोडं लक्ष ठेवायचं म्हणजे झालं.

 21. ravindra says:

  महेंद्रजी, आपली ही पोस्ट वाचून मला ही ते दिवस आठवले. मी ही तेव्हा १५-१६ वर्षाचा होतो. मला सुध्दा वर्तमानपत्र वाचायची आवड असल्याने रोज शाळेच्या ग्रंथालयात आवर्जून वर्तमानपत्र काही निवडक मासिकं वाचत असे. तेव्हाच माझ आवडत मासिक धर्मयुग (हिंदी) आणि विकली (इंग्रजी) ही होती.

  • रविंद्रजी
   वर्तमान पत्र सकाळी घरी आलं की आधी कोण वाचतो, यासाठी धावपळ असायची सगळी/. प्रतिक्रियेसाठी आभार.

 22. मी मुंबईला आलो की प्रत्येक चॅनेलवरचे सगळे प्रोग्रॅम्स थोडे थोडे बघतो आणि डिसअपाँईंट होतो..
  आहट आणि सीआयडी पेक्षा चांगला दुसरा प्रोग्रॅम नाही हे सत्य आहे!!! Sigh!!

 23. संजीव says:

  नाही कुलकर्णी साहेब. अजिबात मान्य नाही.

  मला aastha वाहिनीवर येणारे बुवा पाहून राग येतो. ते भोंदू आहेत असं वाटायला लागतं. आणायची का बंदी?

  माझा २२ वर्षाचा चुलतभाऊ “न्यूज” लावली तर बोंबलतो. आणायची का बंदी? (तो वर उल्लेखिलेले सारे शो मात्र रोज बघतो !)

  तुम्हाला आठवत असेल, १५ वर्षापूर्वी “सरकाई लो खटिया” वर लोकसभेत बोंब झाली होती. आता तोच सिनेमा prime time ला TV वर येतो. भारताचं का ssssss ही बिघडलेलं नाही !

  • आस्था चॅनल मला पण आवडत नाही- पण त्या वरच्या शो ने कुणाच्या मनावर सेक्स बद्दल अती अट्रॅक्शन तयार होत नाही, तेंव्हा बंदी न आणली तरी चालू शकेल. २२ वर्षाच्या मुलाने ते शो बघितले तर ते ठीक आहे, पण १३-१४ वर्षाच्या कोवळ्या मुला मुलींनी ते पहाणे योग्य वाटते का तुम्हाला? मला वाटतं की आपली ऍक्सेप्टन्स लेव्हल हळू हळू वाढवत नेताहेत चॅनल वाले.

   माझ्या मते जे शो आई वडील किंवा मुलांबरोबर पहाता लाज वाटणार नाही, त्या पद्धतीचे शो असावेत.
   आणि भारताचं काही बिघडत नाही हे जरी मान्य असलं, तरी मुला- मुलींवर नक्कीच वाईट परीणाम होतात असे वाटते. एक करायला हवे असे शो जर दाखवायचे असतील तर ते रात्री दाखवणे कधीही योग्य ठरेल.

 24. bhaanasa says:

  टिआरपी च्या नावाखाली वाट्टेल तेच चालू आहेच आणि भाग घेणार्‍यांना हे कसे चालते हा प्रश्न मनातून जातच नाही…. बाकी चक्क सिनेमागृहात मूळ सिनेमा थांबवून ब्लू फिल्म… हे वाचून धक्काच बसला. 😦

  • ते झारसुगडाचं झालं, पण ठाण्याला पण दाखवत होते म्हणे एके ठिकाणी. एक क~ऒमेंट आहे वर बघ.

 25. deepak homkar says:

  महेंद्र जी खुप छान लिहल आहे. मी स्वता साम मराठी टीवी च बातमीदार आहे. त्यामुले टीआरपी वाढवन्यासाठी चेंनेल वाले जे जे करतात ते मी रोज अनुभवतो आहे.
  टीवी सिरिअलच्या बाबतीत म्हणाल तर मी खुपच कमी सिरिअल पाहतो (म्हणजे तुम्ही उल्लेख केलेली एकही सिरिअल पाहिलेलीच नाही). माझ्या शालेतल्या बाई म्हणायच्या एखादी सिरिअल पाहण्याऐवजी चार चित्रपट पहा कारण चित्रपट ३-३ तसत संपेल पण सिरिअल पहायची सवय लागली तर टी महीनोंनमहीने अणि अलीकडे तर वर्षानुवर्षे आपला वेळ खाते अन आपल्याला ठरलेल्या वेळी टीवी समोर ती सिरिअल पहायची सवय लागते. अणि तुम्ही सांगितलेल्या सिरिअल्ची सवय लागने म्हणजे मग स्वताची किम्बहुना स्वताच्या व्यक्तिमत्वाची वाट लाउन घेणे ठरते.
  खुप चांगले लिखाण वाचायला दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद .

  • दिपक
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता मनःपुर्वक आभार.
   सिरियल्स म्हणजे “वेळेचे सिरियल किलर्स” असतात. दररोजचा आयुष्यातला महत्वाचा वेळ यात खर्च केला जातो. संवाद पण तसा कमीच झालाय कुटुंबातल्या घटकांचा. मारूतीच्या शेपटी प्रमाणे सुरु असलेले हे सिरियल्स पहाण्यापेक्षा सिनेमे पहाणे कधीही योग्य. इंग्रजी सिरियल्स या बाबतीत बरे असतात, एकाच एपीसोड मधे गोष्ट पुर्ण होते. जसे कॅसल, फ्रेंड्स, बर्न नोटीस वगैरे, तसे सिरियल्स मराठी हिंदी मधे यायला हवे.

 26. काका उत्तम लेख. बिग बॉस, राखी का इन्साफ ह्या सिरियल्स दिवसातर दाखवू नयेच पण न्युज चॅनल्स वर दाखवण्यात येणारं यांचं प्रक्षोभक भागाचं पुनःप्रक्षेपण ताबडतोब थांबायला हवं..
  सगळ्यात जास्त सेंसरशिपची गरज आहे ती न्युज चॅनल्सला…

  • आनंद
   पुनःप्रसारण तर करतातच, आणि न्युज चॅनल्स पण बातम्यांमधे काही ठरावीक भाग घोळून घोळून दाखवत असतात..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s