“साध्याच माणसांचा एल्गार येत आहे,
हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.”
सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’ आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य! नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा नाही- तर हा लेख आहे ’श्रमिक एल्गार” वरचा- म्हणजे श्रमिकांची सेना! आता श्रमिकांची नुसती सेना असेल, पण त्यांच्याकडे योग्य सेनापती नसेल तर ती सेना काय करू शकेल? पण या ’श्रमिक एल्गार’ च्या बाबतीत तसे झालेले नाही. त्यांना अगदी योग्य सेनापती लाभलाय ज्या मुळे प्रत्येक बाबतीत या सेने ने हातात घेतलेले काम पुर्ण केलंय.
प्रत्येक वेळेस जेंव्हा एखादा ब्लॉग लिहतो, आणि त्यामधे काही करायची वेळ येते, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ब्लॉग वर एखाद्या इश्यु बद्दल लिहले की बऱ्याचशा कॉमेंट्स अशाही असतात, की असे लेख लिहून काय होणार? काय करू शकतो आपण? सगळ्या सिस्टीम च्या विरुद्ध आपण उभे राहूच शकत नाह, सगळी कडे करप्शन आहे भरलेले. ही लाल फित शाही काही काम करूच देणार नाही कोणाला, हे जे काही आहे, ते असेच चालत रहाणार वगैरे वगैरे …….
डोंबीवली फास्ट मधल्या नायका सारखी मानसिक घडण होत असते आपली बरेचदा! त्या डोंबीवली फास्ट च्या नायकाने स्वीकारलेला मार्ग पण योग्य वाटतो -वाटतं की हत्यार हातात घेऊन रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींचा बिमोड करावा! हा मार्ग जरी अयोग्य असला तरी सुद्धा बरेचदा आपलं मन त्या मार्गाकडे झुकते हे नक्की. अर्थात आपल्यावरचे संस्कार मात्र त्या गोष्टी तुम्हा-आम्हाला करू देत नाहीत हे नक्की..
पण केवळ योग्य दिशेने प्रयत्न करून गुंता सोडवण्याचे कसब असेल, तर कुठलेही काम कायद्याच्या चौकटीत राहुन पुर्ण केले जाऊ शकते ह्यावर आपला लवकर विश्वासच बसत नाही. परवाच वर्षाचा एक् मेल आला होता, आणि परोमिता गोस्वामी बद्दल समजले, की जिने चंद्रपूर जिल्ह्यात एकांगी लढा लढलाय गेले एक तप! त्यांच्या बद्दल वाचल्यावर मात्र जर एक गोष्ट लक्षात आली, की जर एखाद्याची खरंच काही करायची इच्छा असेल तर कुठलीच गो्ष्ट ध्येयपूर्तीकडे जाण्याच्या आड येऊ शकत नाही . त्याचीच ही कथा -मनातल्या पॉझिटीव्ह विचारांना नक्कीच चालना मिळेल हे वाचल्यावर .
श्रमिक एल्गार !सुरुवातील अगदी साधारण स्वरूपातील सुरु झालेल्या या संघटनेचे सध्या २० हजाराच्या वर सदस्य आहेत. श्रमिक एल्गार ट्रेड युनियन ऍक्ट च्या अंतर्गत रजिस्टर केलेली चंद्रपुर येथील एक संस्था – कुठलेही राजकीय लागेबांधे नसलेली. इथल्या भागात रहाणाऱ्या आदिवासी आणि गैर आदिवासी लोकांसाठी ही संस्था काम करते. जंगल विषयक कायदा, दारूबंदी , शिक्षण वगैरे सगळ्याच सामाजिक गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल आंदोलनं केली आहेत एल्गारने.
गडचिरोली जिल्हा!हे नांव प्रत्येकाने ऐकले असेलच. पोलीस डीपार्टमेट मधे शिक्षा म्हणून या जिल्ह्यात पोस्टिंग देतात म्हणून तरी हे नाव सगळ्यांना माहीती आहे, नाहीतर संयुक्त महाराष्ट्रात हा जिल्हा आहे हे कोणाच्याच ध्यानी मनी ही आलं नसतं.( महाराष्ट्रात असूनही नसलेला हा जिल्हा आहे ) नक्षलवादी कारवाया अगदी जोरात सुरु असतात इथे. या जिल्ह्यातल्या जंगलाला नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हंटलं तरीही चालेल, इतका जोर आहे त्यांचा इथे!
चंद्रपूर पासून जवळ असूनही दूर असलेला हा जिल्हा. नक्षलवादाचा या भागात असलेला प्रभाव, आणि त्यामुळेच या भागात लोकांसाठी ,( आदिवासी किंवा इतर )काही काम करणे अतिशय कठीण. नक्षलवाद्यांना हे सामाजिक काम करणारे लोकं म्हणजे सरकारी वाटतात, तर सरकारी लोकांच्या मनात कायम संशय असतो की हे लोकं नक्षलवाद्यांशी तर निगडित नाहीत?? इथे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवाद्यांशी आपले नांव जोडले जाईल का-ही भिती कायम मनात असते. पण अशा प्रतिकूल परिस्थिती मधे गेले एक तप काम करणारी एक व्यक्ती म्हणजे परोमिता गोस्वामी आणि त्यांचे सहकारी!
श्रमिक एल्गार ने या भागात काम सुरु करूनही आता जवळपास दहा एक वर्ष झाली असावीत. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट या कायद्या अंतर्गत त्या भागातल्या आदिवासी लोकांना जमिनीचे पट़्टॆ देण्याचे प्रावधान आहे ,पण शासनाच्या कूर्मगतीने सुरु असलेल्या कामामुळे , चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासींना मात्र या तरतुदी पासून काहीच फायदा होत नव्हता, तेंव्हा परोमिता गोस्वामी यांच्या सपोर्ट वर काही आदिवासी/गैर आदिवासी शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन, जंगलाच्या काही भागात केलेली शेती, त्यांना झालेली अटक .. … वगैरे घटना इतक्या वेगाने घडल्या की श्रमिक एल्गार चे नांव सर्वतोमुखी झाले .
१९९९ मधे सरकारी लालफितशाहीने सरळ या संघटनेचा नक्षलवाद्यांशी संबंध आहे म्हणून आरोप केले आणि तपासणीचे शुक्लकाष्ठ मागे लावून दिले. नक्षलवाद्यांशी काही संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी परोमिताला हायकोर्टात केस करावी लागली .हायकोर्टात बरीच वर्ष केस चालली, शेवटी २००२ मधे सेंट्रल गव्हर्नमेंट ने परोमिता आणि त्यांच्या संघटनेला क्लिन चिट दिली- की यांचे कुठल्याही नक्षलवादी ग्रूपशी संबंध नाही .
यांच्या संघटनेने बरीच समाजोपयोगी कामं केलेली आहेत. मुख्य म्हणजे दारू बंदी साठी ’मुल ते नागपूर विधानसभेपर्यंत काढलेला २००० च्या वर कष्टकरी बायकांचा पायी मोर्चा. जवळपास १३० किमी अंतर पायी चालत ३ दिवसात पुर्ण केले होते. दारू मुळे होणारे कुटुंबाचे नुकसान, आणि त्याच्या विरोधात सगळ्या स्त्रियांना एकत्र करून चळवळ उभी करण्याचे मोठे काम त्यांनी केलेले आहे. गवातली दारुची दुकानं बंद व्हावी म्हणून केलेल काम नक्कीच उल्लेखनीय आहे , पण केवळ ए्वढेच नाही तर , गावांमधला पिण्याच्या पाण्याचा इश्यु,शाळा अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी आंदोलनं केली- आणि नुसतीच आंदोलनं केली नाहीत , तर शेवटापर्यंत नेली- अगदी रिझल्ट्स मिळे पर्यंत!
त्यांची एक सगळ्यात मोठी सक्सेस स्टॊरी म्हणजे माणिकगढची. माणिकगढ सिमेंट म्हणजे चंद्रपूर मधला एक बिर्ला गृपचा मोठा सिमेंट कारखाना. सिमेंट कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून लाईम स्टॊन वापरला जातो. या लाइम स्टोनची खाण कुठेतरी जवळच असेल तर जास्त चांगलं. लाईम स्टोन ला खाणी मधून प्रोसेसिंग प्लांट पर्यंत नेण्यासाठी डम्पर , शॉवेल्स, किंवा कन्व्हेअर चा उपयोग केला जातो. माणीकगढ सिमेंट्ने खाणी पासून कन्व्हेअर बेल्ट लावण्यासाठी सरकारी जमीन वापरायचे ठरवले कारण कन्व्हेअर चा मेंटेनन्स चा खर्च डम्पर्स, शॉवेल्स किंवा डॊझर्स पेक्षा फारच कमी असतो , आणि विश्वसनीयता चांगली असते.
माइन्स पासून तर फॅक्टरी पर्यंत असलेली जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची, पण या जमिनीवर तिथले आदिवासी आणि इतर गैर आदिवासी लोक वर्षानुवर्ष शेती करत होते. फॉरेस्टची ही जमीन एकाही शेतकऱ्याच्या नावावर नव्हती हे पण लक्षात घ्या. एक दिवस फॉरेस्ट आणि माणिकगढ सिमेंटचे लोकं या लोकांकडे जमिनीचा ताबा मागायला गेले. भरपूर धमक्या देणे, दंडेली करणे वगैरे सगळे प्रकार करून झाले त्या फॅक्टरीचे. बरेच वेळा तर फॅक्टरीचे लोकं मशिनरी घेऊन पण आले होते काम सुरु करायला पण श्रमिक एल्गार ने या लोकांना भरपूर पाठबळ दिले.
कंपनीचे म्हणणे होते की ती जागा या लोकांच्या नावे नसल्याने तिचे कॉम्पेन्सेशन देण्याचा प्रश्नच येत नाही. कंपनीने मिनिस्ट्री ऑफ एनव्हायरोमेंट ऍंड फॉरेस्ट कडून आवश्यक तो क्लिअरन्स पण आणला होता. तसेच जमिनीची नाममात्र लिझ ची किंमत सरकारकडे जमा केली होती .
इकडे सगळ्या शेतकऱ्यांनी जो पर्यंत बाजार भावाने कॉम्पेन्सेशन दिले जात नाही , तो पर्यंत जमिनी ताब्यात घेऊ देणार नाही असा पवित्रा सगळ्या शेतकऱ्यांनी घेतला. कशाचा जोरावर सगळे लोकं कॉम्पेन्सेशन मागत होते? जमीन तर नावावर नव्हतीच एकाही शेतकऱ्याच्या?? हा प्रश्न आला असेलच मनात तुमच्या पण. इथेच परोमिता गोस्वामी यांचे एक्स्पर्ट गायडन्स उपयोगी पडले त्या शेतकऱ्यांच्या, की ज्या मुळे कंपनीला झुकावे लागले, आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
परोमिता ने काय केलं असेल? ’फॉरेस्ट एंटायटलमेंट ऍक्ट’ म्हणून एक कायदा अस्तित्वात आहे, की ज्या कडे कोणाचेच लक्ष नव्हते, या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि शेवटी बाजार भावा प्रमाणे या शेतकऱ्यांना ४ लाख रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि घरातल्या एका व्यक्तीला कंपनी मध्ये नोकरी असे निगोशिएट करून न्याय मिळवून दिला. उभ्या असलेल्या पिकाची जो पर्यंत कापणी होत नाही तो पर्यंत काम सुरु केले जाणार नाही असेही कंपनीने मान्य केले. अर्थात एखादी व्यक्ती जर कायदा जाणणारी असेल , तर तिला कायद्याच्या तरतुदींचा व्यवस्थित वापर करून घेता येतो.
काही लोकं कसे कुठलेही पोलीटीकल बॅकिंग नसतांना सामाजिक कार्य करू शकतात, आणि त्या मधे यशस्वी पण होऊ शकतात ह्याचं उदाहरण आहेत म्हणजे परोमिता गोस्वामी. जेंव्हा एखादा सुशिक्षित माणुस मनावर एखादी गोष्ट घेतो, तेंव्हा तो कायद्याच्या चौकटी मधे राहुन सुद्धा एखादे काम कसे करवून घेऊ शकतो याचे हे उदाहरण- ’डोंबीवली फास्ट’ हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही!
नुकताच यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे परोमिताचा सत्कार करण्यात आला, आणि त्यांना रुक्मिणी पुरस्कार देण्यात आला होता. हा लेख म्हणजे परोमिता गोस्वामींच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या पॉझिटीव्ह थिंकीग मुळे आपले जर कधी विचार भरकटले असतील तर ते विचार जागेवर यायला मदत होईल. आणि या जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे , आणि जर ध्येय योग्य असेल आणि स्वतःच्या ध्येयावर विश्वास असेल तर त्याची पूर्ती होणे काही अवघड नाही यावर विश्वास बसेल.
श्रमिक एल्गारचा ब्लॉग इथे आहे..
जर एखाद्याची खरंच काही करायची इच्छा असेल तर कुठलीच गो्ष्ट ध्येयपूर्तीकडे जाण्याच्या आड येऊ शकत नाही . परोमिता गोस्वामी ने हे सिध्द करून दाखवलेय. मानले तिला. इतक्या टेरर एरियात इतकी वर्षे जिद्दीने व खर्या तळमळीने कार्य करणे ही कमालच!
तुझ्या या लेखामुळे ’ श्रमिक एल्गार ’ चे कार्य आमच्यापर्य्ंत पोचले. धन्यवाद.
श्री,
हे पोस्ट नेहेमीप्रमाणे लाईट रिडींग मटेरिअल म्हणून लिहिलेले नाही. थोडं सिरियस नोट म्हणूनच लिहिलेले पोस्ट आहे हे. जेंव्हा ती वेब साईट पाहिली, तेंव्हा मीपुर्णपणे मेस्मराइझ झालो होतो आणि ठरवलं की यावर लिहायचं हे नक्की.
खूप क्रेडीटेबल काम केलेले आहे, आणि करते पण आहे परोमिता. खूप एनकरेजिंग पोस्ट आहे हे माझ्या मते. मनातले निगेटीव्ह विचार दूर व्हायला हवेत आणि या देशातल्या चांगुलप्णावर विश्वास बसायला मदत होईल असे वाटते.
This is very very inspiring post. Thanks for writing this post. Paromita and her team desires standing ovation! Great job!
रश्मी
धन्यवाद. खरंच त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे..
Great Lady. Hats off to Paromita .
सुशांत
आयर्न लेडी ऑफ चंद्रपूर???
सहमत आहे पुर्णपणे..
काका खुप छान लीहीले आहे. एवढी चांगली माहीती पोचवली म्हणून थॅंक्स. आणि परोमिताचे अभिनंदन. तिच्यापासुन खुप शिकता येण्यासारखे आहे. तिची साईट पहाते आता. आमच्याच चंद्रपुरची पण मला माहीत नव्हते तिच्याबद्द्द्ल
तनिष्का
ब्लॉग वर स्वागत 🙂
प्रतिक्रियेसाठी आभार.
श्रमिक एल्गार …. हा खराखुरा भारत आहे. ही परोमिता गोस्वामी खरी भारताची ऑयडॉल्स आहे. आज या सारख्या आणि अनेक अज्ञात श्रमिकांच्या जीवावर INDIA चा विकास होत आहे. पण… या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. आणि आम्हीच भारताचे भाग्य विधाते म्हणून INDIA चे खोटे सिक्के मिरवत आहे. आणि आपण ही त्यांच्या मागे मेंढरा च्या काळपा प्रमाणे पळत आहोत. वर्तुळाच्या बाहेर जावून परीचया दिल्या बद्दल अभिनंदन.
बरोबर आहे तुमचे म्हणणे. हा खरा भारताचा पाया आहे. आपले सगळे नेते मात्र आपले स्विस बॅंकातले अकाउंट्स कुरवाळत बसण्यात मग्न आहेत. कुठलेही स्वार्थ नसताना इतके काम करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तळागाळातल्या लोकांविषयी तळमळ ह्यातून सरळ सरळ अधोरेखित होते.
असे खरे खुरे आयडॉल्स नाकारून आपण सगळे कपडे काढून शरीर रंगवून बिलबोर्ड्स वरच्या लोकांना खरे आयडॉल समजतो हेच खरे भारताचे दुर्दैव..
वाह…ब्राव्हो!!
श्रमिक एल्गारच्या ह्या उपयुक्त माहिती बद्दल आभार… त्यांनी केलेले कार्य स्तुत्य आहे
आजवर ह्याची दखल कोणीच घेतली नाही याचीच खंत लागून राहिली मनाला 😦
सुहास
त्यांच्या ब्लॉग वर जाऊन पाहिलं, तर लक्षात येईल की बऱ्याच वृत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत त्यांच्या कामाबद्दल पण त्या बातम्यांमधे सातत्य नसल्याने लोकांच्या लक्षात राहिलेले नाही यांचे काम.
बिर्ला गृपच्या मोठ्या कंपनीशी लढा देणे आणि त्यातून त्यांना वाटाघाटी करावयास भाग पाडणे हा एक मोठा विजय समजतो मी त्यांचा.
तसेच दारूबंदी साठी केलेल्या कामाबाबत वर लेखामधे एक लिंक दिलेली आहे बघ, ती चेक कर, म्हणजे त्या दारूबंदीच्या कामाचा सिरियसनेस लक्षात येईल. दोन हजार बायका हातातली कामं सोडून विधानसभे पर्यंत १३० किमी ( दररोज ४० ते ५० किमी अंतर पायी चालत पुर्ण करतात..) यामधेच सगळं काही लक्षात येतं.
सर्वप्रथम श्रमिक एल्गारच्या ह्या उपयुक्त माहिती बद्दल खुप खुप आभार!!!!!
परोमिता गोस्वामींबद्दल वाचुन खरचं आश्चर्य आणि कुतुहल वाटले..रीअली ग्रेट..
अगदी पूर्णपणे अशिक्षित लोकांच्या पाठीशी उभं राहुन काम करायचं, सुरुवातीला त्या लोकांना पण विश्वास बसत नसेल की ही बाई आपल्याला का मदत करू इच्छिते म्हणून? त्यांचा विश्वास संपादन करायचा… कठीण आहे हे सगळं!
आणि हे एकदा करून नाही, तर सातत्याने करायचे हे तर खूपच क्रेडीटेबल!
काका त्या दिवशी तुम्ही परोमितांचा उल्लेख केलात तेव्हापासून उत्सुकता होती..अशा व्यक्ती समाजासमोर येणं महत्वाचं आहे…नाहीतर आपण काय करणार हे (मी धरून) सगळ्यांनाच वाटत असतं…ही पोस्ट लिहिल्याबद्दल धन्यवाद…आपण सर्वांनी यातून बोध घेतला पाहिजे….
अपर्णा
मला ही लिंक जेंव्हा वर्षाने पाठवली, तेंव्हा मी तर खूप वेळ सुन्न होऊन बसलो होतो वाचल्यावर. तो सगळा भाग माझ्या नजरेखालून गेलेला आहे. माणिकगढ, आवारपूर सिमेट्स वगैरे किंवा कोळशांच्या खाणी या सगळ्या मधे मी जवळपास दहा वर्ष सातत्याने जात होतो कामानिमित्त! त्यामुळे खूप अटॅच झालो जेंव्हा तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम वाचते तेंव्हा त्यांच्याशी..
अप्रतिम पोस्ट !!!!!! खूप छान माहिती..
किती महान काम केलं आहे परोमिताने.. थक्क झालो वाचून.. श्रमिक एल्गारचा ब्लॉगही सुंदर आहे.
हेरंब
धन्यवाद.. अरे हे पोस्ट तिनदा रिराईट केले आहे. मला प्रसिद्ध करतांना नीट जमलेलं आहे की नाही याची खात्रीच होत नव्हती. पोस्ट रिराईट केले की मला असे नेहेमीच वाटत असते. असो.
अजूनही काम सुरु आहे बरंच तिचं. कधी जमल्यास अवश्य भेट देईन तिला. 🙂 आणि नंतर पुन्हा एक पोस्ट लिहीन. 🙂
आदरणीय, व प्रिय महेंद्र सर ,
तुमचा हा लेख म्हणजे वैचारिक प्रगल्भतेचे व जबाबदार विचारांचे छान उदाहरण आहे. समाजातल्या विविध पैलूंना तुम्ही अत्यंत प्रभावीपणे सचित्र व सशाब्दांकित करून, अम्हसार्वांपुढे अत्यंत प्रभावी पणे मांडता. जेव्हडे काम गोस्वामींनी केले आहे त्याला जोड नाही. मला तर हे समाजाचे आधार स्तंभच वाटतात. तुमच्या हि या ब्लॉगच्या उपक्रमाला माझा असाच पतिसाद मिळत राहील. तुम्ही दररोज लिहा. आम्ही दररोज वाचत जाऊ व त्यातून अमूल्य माहिती व ज्ञान मिळवू. सर, वाट पाहत आहोत. कळावे …..आपला …..हेमंत पांडे(पुणे-1)
प्रिय हेमंत
अरे बाबा, हे सर वगैरे म्हणणं बंद कर. मला ऑफिसमधे बसल्यासारखं वाट्तं बघ. इथे मुद्दाम मी काय करतो , कुठे काम करतो ते दिलेले नाही कुठेच. मी इथे जे काही लिहीतो ते फक्त महेंद्र कुलकर्णीच्या कॅपॅसिटी मधे.
हे पोस्ट लिहीण्याचे श्रेय जाते वर्षाला! जर वर्षाने या कामाबद्दल कळवलं नसतं, तर मला कधीच समजलं नसतं. खरे आभार तिचे. दुसरे म्हणजे परोमिताने तिचे फोटो वापरण्याची परवानगी दिली म्हणून तिचे आभार..मी फक्त एक कारण झालो तुमच्यापर्यंत तिचे काम पोहोचवण्यासाठी..
धन्यवाद.
काका…खुप खुप आभार..
श्रमिक एल्गार ने केलेले कार्य स्तुत्य आहे…
सलाम त्यांच्या कष्टाला…सलाम त्यांच्या जिद्दीला….
सातत्य!! एखादं काम करायचं म्ह्टलं की त्यासाठी सातत्य असावं लागतं, कधी तरी थोडं काही तरी केल्यासारखं दाखवलं, आणि नंतर सगळं सोडून द्यायचं असं केल्याने काम होत नसतं. सातत्य असल्यामुळेच परोमिताला यश मिळालंय . नाहीतर त्या खेड्यातल्या स्त्रियांना खड्यासारखे बाजूला फेकले असते माणिकगढ ने..
श्रमिक एल्गार ने केलेले कार्य स्तुत्य आहे…
मनोज
प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.
These are our TRUE indian IDOLS…!!!Thanks for writing this post.
Marathi madhye type karu shakat nahi mhanun..sorry.
Tumachi likhan shaili khup chan ahe.ashach chan chan post tumachyakadun lihilya jawo hich devajawal prarthana…!!!
भालचंद्रजी
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या शुभकामना आहेत म्हणून आतापर्य्ंत लिहणं सुरु आहे. पुन्हा एकदा आभार.
This helps one in believing that there is something good in the world worth holding onto! A very different genre of post this time!! thank you veyr much.
स्मिता
असे बरेच लोकं खूप कामं करतात, पण पुरेशी प्रसिद्धी न मिळाल्याने पुढे कोणाला यांच्याबद्दल कळत नाही फारसं! या पोस्ट मुळे हे सिद्ध होतं की मनात आणलं तर कुठलंही काम ’कायद्याच्या परिघात’ राहुन पुर्ण केलं जाऊ शकतं.
हो, थोडं वेगळं पोस्ट आहे यावेळेस. ’काय वाटेल ते”ब्लॉग असल्याने, कुठलाही विषय पण चालतो. या पूर्वी डॉ. कोल्हेंच्या वर एक पोस्ट लिहीलं आहे याच प्रकारातलं.
महेंद्रजी मनापासून आभार या लेखासाठी…. परोमिताला आणि तिच्या कार्याला तर सलाम!!! ईच्छा असेल तर माणूस परिस्थितीला शरण जात नाही हेच दाखवून दिलेय तिने…
>>>अजूनही काम सुरु आहे बरंच तिचं. कधी जमल्यास अवश्य भेट देईन तिला. 🙂 आणि नंतर पुन्हा एक पोस्ट लिहीन. 🙂
आम्ही वाट पहातोय तुमच्या पोस्टची… शक्य झाल्यास परोमिताला भेटण्याचीही…
तन्वी
खरंच भेटणार आहे एकदा. फक्त कधी ते सांगता येत नाही- पण काही लोकांना आयुष्यात एकदा तरी भेटायचं आहे, त्या यादी मधे परोमिताचे नाव जोडल्या गेलं आहे हे नक्की.
खूप छान झालाय. लिखाण पण दुर्दैव कि आमच्या सत्ताधीशांना अशा कार्याची कधीच जाणीव होत नाही.
विजय
नेते लोकं एखादी गोष्ट चांगली होतांना दिसली की त्या गोष्टीशी स्वतःचे नाव जोडून घेण्यासाठी तयार असतात. 🙂 आता सपोर्ट देत आहेत सगळेच लोकं.
http://epaper.loksatta.com/92-indian-express/27-02-2011#p=page:n=31:z=2
आदित्य
🙂
Mahendraji thanks. I am working women but want to do something for needy people.Get inspiration from great paromito. no words for her greatness.
माधुरी
ब्लॉग वर स्वागत.. जर काही करायची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
परोमिता गोस्वामी कार्य खरच खूप महान आहे ….त्यांना सलाम…ही माहिती आमच्यासमोर आणलीत त्याबद्दल तुमचे आभार …जिथे तिथे देशाबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून शेवटी आपल्या हातात काय आहे अस बोलाणांर्यासाठी हे एक खूप चांगल उदाहरण आहे …
thanks . khoop chagale lekhan aahey.
Great women paromita.
कविता
ब्लॉग वर स्वागत .. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Kakarao… Lai bhari!!! 🙂
It’s highly inspirational… mahiti share karun tumhi kiti motha prabodhan kartay… Abhar!!! 🙂
संतोष
आवर्जुन दिलेलया प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.