चापानेरचे वर्ल्ड हेरीटेज

खरं तर जेंव्हा त्या रस्त्याने गेलो, तेंव्हा आपण इथे थांबु असे कधीच वाटले नव्हते.   सकाळची १० ची वेळ होती. कोवळी उन्हं त्या तटबंदीच्या दगडावर पडून सोन्यासारखी झळाळी आणत होती त्या तटबंदीला. इतकं सुंदर दृष्य़ क्वचितच दिसतं, त्या सोनेरी रंगावर नजर ठरत नव्हती. मधेच एक सज्जा पण दिसत होता. तटबंदीला सज्जा?? पहिल्यांदाच पाहिला होता.

दुरुन दिसणारी भिंत आणि सज्जा

विटांचे बुरुज.. सगळी भिंत दगडाची मग हे बुरुज विटांचे का.

चापानेर!! बडोद्या पासून फक्त ५० किमी वर असलेली ही जागा. तसं म्हटलं तर ही जागा प्रसिद्ध  आहे ती पावागढ वासीनी देवी साठी. लोकं चापानेरला येतात, आणि इथून सरळ गडावर निघून जातात देवीच्या दर्शनासाठी. इथे ही तटबंदी असलेला भाग पहायला कुणीच येत नाही. माझ्या बरोबर असलेला मित्र पण म्हणाला की आधी इथे दहादा तरी येऊन गेलो असेन, पण फक्त देवीचे दर्शन घेऊन परत गेलो, इथे काय आहे ते पहायला आलो नाही. पण मला मात्र समोरच्या  तटबंदीचा  मोठा दिंडी दरवाजा  सारखा खुणावत होता- काहीतरी वेगळं पहायला मिळेल आत असे सारखे वाटत होते. शेवटी  रहावलं नाही, आणि ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली.

मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारची जागा. अजून किल्ल्यात जायचं आहे, पण समोरच आधी मुतारी दिसते. खरं तर हा फोटो वर लावायला हवा होता, आणि नंतर वरचा मुख्य दाराचा.

उतरून आत त्या दरवाजाकडे निघालो. बाहेरून पाहिल्यावर ही भिंत म्हणजे शहराची तटबंदी असल्यासारखी दिसत होती. त्या तटबंदीला पण सरकारी खर्चाने कुंपण घातलेलं दिसत होतं. मुळ बांधकाम काही ठिकाणी दगडी , तर काही ठिकाणी विटांचे बांधकाम दिसत होते. बुरूज विटांचा बघून तर मला आश्चर्यच वाटले. बुरूज तर दगडी असायला हवे ना?

कार पार्क करुन त्या दिंडी दरवाजा कडे निघालो. जसा जसा जवळ जात गेलो, तसा तसा मिथेनचा उग्र वास नाकात शिरत होता. किळस वाटली – आणि रागही आला, इतक्या चांगल्या जुन्या धरोहरचा मुतारी म्हणून केल्या जाणारा उपयोग पाहिल्यावर! आत काय आहे याची काहीच कल्पना नव्हती सरळ आत चालत गेलो. मुख्य दरवाजाच्या वर एक सज्जा दिसला. बहुतेक पूर्वीच्या काळी इथे वाजंत्री , म्हणजे चौघडा वाजवण्यासाठी लोकं बसत असावेत का? की  बाहेर नजर ठेवण्यासाठी आहे तो??

थोडं आत गेलं की तिसरं दार लागतं. गावातल्या लोकांचा वहिवाटीचा रस्ता आहे हा.

शहर मस्जिद पुर्ण व्ह्यु. पाच घुमट आणि बरेच खांब असलेले हे स्ट्रक्चर आहे.

थोडं आत चालत गेल्यावर आपल्या गेलेल्या वैभवाच्या खुणा अंगावर बाळगत दगडी भिंत साथ देत होती. समोरच्या दरवाजाच्या शेजारी एक फुलं कोरलेले दिसत होते. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक चांगल्या स्थिती मधे असलेली एक पाच घुमट असलेली इमारत आणि तिचे दोन मिनार लक्ष वेधून घेत होते. टूरीझम डिपार्टमेंटचे  तिकिटांचे काउंटर पण गेट वर दिसले.   आत गेल्यावर एक मॉडरेटली कलाकुसर केलेली इमारत समोर दिसत होती. एका दगडावर लिहले होते, की ही इमारत १५२२ साली बांधण्यात आली .म्हणजे ५३३ वर्षापूर्वी- मनातल्या मनात गणित केले.

भिंत, बाहेरून दगडाची आणि आत मात्र विटा , चुना बांधकाम असलेली.

जामा मस्जिद मिनाराचे कार्व्हिंग

कला कुसर जरी फारशी केलेली नसली, तरी इमारत खूप छान दिसत होती. इतकी वर्ष झाली तरीही अजुन ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. कदाचित फार जास्त लोकं येत नसेल म्हणून असेल. आत शिरल्यावर एखाद्या हिंदू मंदिराच्या प्रमाणे खूप खांब असलेले सभामंडप दिसले . प्रार्थना करण्यासाठी कोनाडे केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मस्जिद मधे पण एक प्रकारचा घाण वास सुटला होता. इथे पण कोणीतरी कोपऱ्या मधे मुत्रविसर्जन केलेले दिसत होते. इतकी जुनी आणि सुंदर वास्तू, जी पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे अशी- आणि ही अवस्था?? पुरातत्त्व विभाग बरोबर आपलंही काही कर्तव्य आहे हे मी विसरलोच होतो.

मस्जिदच्या आवारातच एक दगडी भिंत तुटलेली दिसत होती. ती पाहिल्यावर लक्षात आलं, की बाहेरची तटबंदी काही ठिकाणी विटांची, आणि काही ठिकाणी दगडी का आहे ते. बाहेरून दगडी बांधकाम, पण आतमधे मात्र चांगली ५ फुटाची विटांची भिंत आणि त्याला आतून पण दगडाने मढवलेले.. असा तो प्रकार दिसत होता. मस्जिद एका ओट्यावर बांधलेली आहे. ५०० वर्ष जुनी वास्तू ,म्हणून खूप महत्त्वाची वास्तू आहे ही.

This slideshow requires JavaScript.

आत मधे फिरून आल्यावर बाहेर निघालो, तर बाहेर गेटवर पुरातत्त्व विभागाच्या तिकीट घरात विचारले की इथे राजवाडा कुठे आहे? तसं काही शिल्लक नाही म्हणे इथे! पण हो, एक जामा मस्जिद म्हणून मस्जिद आहे म्हणे. साधारण एक किमी अंतरावर. उन्हं तर तापलं होतं, पण दहा मिनीटे चालल्यावर पुन्हा शहराची तटबंदी लागली. आता मोडकळीस आलेली, आजूबाजूला असलेले जुन्या घरांचे जोते, अर्धवट पडलेल्या भिंती…  एक वेगळीच वातावरण निर्मिती करत होत्या.  कोणीही समोर नव्ह्तं. मला क्लिंट इस्ट्वुड चा जुना सिनेमा आठवला. रखरखीत टळटळीत  दुपार झाल्यासारखं उन्हं सकाळच्या ११ वाजताच होतं.

मस्जिद समोर पोहोचलो. दुरून तर फक्त एक खूप मोठी असलेली मस्जिद असं वाटत होतं.  चार मिनार, भरपूर घुमट , असलेली एक मोठी इमारत दिसत होती समोर.उंचवट्यावर बांधलेली सोनेरी दगडांची इमारत , बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या खिडक्या – की त्याला सज्जे म्हणायचं? कोरीव काम केलेले आहे त्यावर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिसत होत्या. इमारतीच्या आवारात शिरल्यावर वर्ल्ड हेरीटेज चे बोर्ड दिसले. म्हणजे अनपेक्षित पणे  आपण एका महत्त्वाच्या जागी पोहोचलो तर!! स्वतःलाच शाबासकी दिली.

जामा मस्जिदचा मुख्य एंट्रन्स!

१५ फुट जाडीची भिंत ही शेवटची, आणि इथुन बाहेर पडलं की समोर दिसते ती जामा मस्जिद

मस्जिद खूप सुंदर आहे. बांधकाम पुर्ण होण्यास ८० वर्ष लागली असा कुठेतरी उल्लेख वाचला. पायऱ्या चढून आत शिरल्या बरोबर समोरच एक १५ बाय १५ चा व्हरंडा दिसतो. त्यातून डावीकडे पाहिले तर मस्जिदचे दार, आणि इतर ३ दिशांना बगीचे दिसत होते. कोरीव काम केलेल्या बऱ्याच जाळ्या मात्र आता तुटल्या आहेत, पण जितक्या शिल्लक आहेत तितक्या पाहिल्यावर इतर वस्तूची कल्पना येते.

आत शिरल्या बरोबर दोन्ही बाजूला पडलेल्या खोल्या दिसतात. नेहेमी प्रमाणे समोर एक मोठे आंगण आहे. तिथे साधारण लोकं नमाज पढण्यासाठी यायचे.   इथे पण गाईड नाहीच, त्यामुळे कोणीच काही सांगायला नव्हते.  पुन्हा तिकीट काउंटरवरच्या बाईंच्या कडे गेलो, आणि त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्या बाइने तिला माहीती असलेली माहिती  सांगितली.

छत आणि वरचे तिन मजले

कोरीव काम मिनारावरचे

तुटलेले खोल्यांचे अवशेष.. मशिदीच्या अंगणात. याच अंगणात आम जनता नमाज पढायची

ही एक ३ मजले असलेली मस्जिद आहे. अशा प्रकारची मस्जिद ही भारतामधे एकुलती एक आहे म्हणून महत्वाची.खालच्या मजल्यावर राजा स्वतः नमाज पढायचा, दुसऱ्या मजल्यावर त्याच्या राण्या, आणि तिसऱ्या मजल्यावर इतर सरदारांच्या बायका नमाज पढायच्या. मला आतापर्यंत वाटायचं की मस्जिद मधे फक्त पुरुषंनाच नमाज पढण्याची परवानगी आहे  , पण इथे समजलं की बोहरा  समाजात स्त्रियांना पण परवानगी आहे मस्जिद मधे येण्याची.मस्जिदच्या आतल्या भागात १७५  खांब आहेत. थोडंफार मंदिराच्या सभा मंडपा प्रमाणे बांधकाम आहे या मस्जिदचे. बऱ्याच ठिकाणी कोरीव काम पण केलेले आहे. पाचशे वर्षापूर्वी इथे कोणी मुस्लिम राजा होता, त्याच्या काळातले हे बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. त्या राजाबद्दल काही फारशी माहिती मिळाली नाही.

इतकी महत्त्वाची वास्तू, वर्ल्ड हेरीटेज असलेली, पण पूर्णपणे दुर्लक्षित. १४८८ पर्यंत हा किल्ला हिंदू राजा चौहानच्या ताब्यात होता, पण नंतरच्या काळात मात्र मुस्लिम राजा मुहम्मद ने ह्या राज्याला जिंकले.नंतर बेगाडा सुलतानाने ही जामा मस्जिद बांधली. १७५ खांब असलेली ही देखणी वास्तू युनेस्कोच्या नजरेस पडल्यावर हीला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा देण्यात आला. उंचावर प्लिंथ असलेली एक तीस मिटर उंचीची वास्तू अतिशय देखणी आहे .एका गोष्टीचे वाईट वाटले, की आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत ते पण आपल्याला इतर कोणीतरी सांगावे लागते? दुर्दैव!! दुसरं काय!!

या मस्जिदचे फोटो इथे लिंक वर  देतोय… इतके सुंदर फॊटॊ आहेत, पण सगळेच फोटो इथे देता येत नाहीत म्हणून  पिकासाची फक्त लिंक देतोय..

This slideshow requires JavaScript.

याचा पुढचा भाग म्हणजे पावागढ्च्या देवीचे मंदिर.. त्यावरचे पोस्ट लवकरच.. !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to चापानेरचे वर्ल्ड हेरीटेज

 1. कोरीव काम खूपच सुंदर आहे.
  मुत्र विसर्जनवाल्यांसाठी 3 ईडियटस् मध्ये दाखवल्या प्रमाणे कोपर्‍याकोपर्‍यामध्ये कायम २३० वोल्ट वाहून नेणार्‍या उघड्या तारा ठेवणे हाच एक जालीम उपाय आहे.

  • sसिद्धार्थ
   खरंच आवरायला हवं या लोकांना. गावातल्या लोकांचा वहिवाटीचा रस्ता आहे हा. त्यामुळे अगदी मुक्त वावर असतो लोकांचा. आणि त्या वायरच्या आयडीया सहमत आहे एकदम..

 2. mau says:

  खुप सुंदर माहिती…माहितीपुर्ण लेख !!!
  धन्यवाद!!!

  • पावागढला गेल्यावर पुढल्या वेळेस नक्की भेट द्या या जागेला. 🙂 मस्ट व्हिजीट प्लेसेस पैकी एक आहे ही.

 3. tejali says:

  kaka thanks 4 d nice information…n slide show too…2-3 diwasacha sutticha ptrogram sahaj karata yeil mala ata. thanks a lot.

  • अर्धा दिवस पुरेसा आहे या दोन्ही मस्जिद पहायला. पण जर रोपवे वापरून देवीचे दर्शन घेतले तर अर्धा दिवस तिकडे पण पुरतो. पण जर देवीला ट्रेक करून जायचं असेल तर मात्र दोन दिवस लागतील.

 4. Nikhil Bellarykar says:

  lai bhari mahiti indeed. Please unravel the treasure trove that is Gujrat.

  • गुजरात मधे नेहेमीच्या जागा भरपूर आहेत, अशी एखादी ’हटके’ जागा दिसली तर त्यावर नक्की लिहीन. 🙂 धन्यवाद!

 5. वाह सुंदर जागा आहे !!

 6. Tanvi says:

  महेंद्रजी खूप सुंदर आहेत फोटो… खरय आपलं दुर्दैव की आपल्याला अश्या जागांबद्दल जराही कल्पना नसते!!!

  आणि तुमचे मनापासून आभार की पुन्हा एकदा एक छान माहिती दिलीत….

  बाकि सिद्धार्थला दुजोरा!!!

  • तन्वी
   अनपेक्षितपणे हाती लागलेला खजीना आहे हा. मला तिथे जाई पर्यंत माहीती नव्हते की वर्ल्ड हेरीटेजची साईट आहे ही म्हणून…… गावात किंवा हमरस्त्यावर कुठेही बोर्ड लावलेला नाही या बद्दल.. 😦

  • नक्कीच.. बडोद्याला, अहमदाबादला गेलं की एकदिवस इकडे पण जाऊन येण्यासारखी आहे ही जागा.

 7. अरुणा says:

  आपल्या देशात अशी किति सुन्दर आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यान्चा आपल्याला अभिमान असायला हवा.आपण नुसतेच त्याकडे दुर्लक्ष करत नाही तर त्याचे नुकसान ही करतो, याचे फ़ार वाईट वाटते.
  सुन्दर फोटो आणि माहिती दिलीत त्याबद्दल अभिनन्दन.
  माझेही सिद्धार्थच्या सूचनेला अनुमोदन.

  • अरूणा
   आपल्या देशात अशा सुंदर असलेल्या जागांची पण माहीती आपल्याला नाही. तसेच शासन पण अजिबात प्रमोट करण्याकडे लक्ष देत नाही. फोटॊ सेल फोन ने काढले आहेत. मला सारखं वाटत होतं की जर एखादा चांगला कॅमेरा असता तर छान फोटो आले असते. आभार..

 8. Tushar says:

  हा किल्ला मुघल बादशाह हुमायून याने स्वतः येऊन लढून जिंकला होता. त्या लढाईचा इतिहास सुद्धा फार रोमांचकारी आहे.
  त्या मिनारांचे जरा बारकाईने निरीक्षण करा !!
  मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया च्या रचनेशी(समोरील बाजू व प्रवेशद्वार) त्याची तुलना करा.
  दोघांची Architectural Style सेम आहे. 🙂

  • तिथे माहीती द्यायला कोणीच गाईड नव्हता. आणि गाईड नसल्याने काही फारसं समजलं नाही. हुमायून ने केलेल्या हल्ल्याबद्दल पण कॊणीच काही सांगितलं नाही. गेटवे आणि हे मिनार.. आता पुढल्यावेळेस नक्की कम्पेअर करीन. सध्या दोन्ही गोष्टी एकदम नजरेसमोर आणून कोरीलेट करता येत नाहीत . प्रतिक्रियेसाठी आभार, आणि ब्लॉग वर स्वागत..

 9. सागर says:

  काका
  अतिशय उत्तम लेख.
  फोटो चांगले आहेत.आवडली पोस्ट

  • सागर
   आभार.. हे पोस्ट वाचून पुढे कोणी कधी पावागढला गेलं की इथे नक्की भेट देतील. बस, इतकीच अपेक्षा..

 10. राजे says:

  जबरदस्त सफर घडली राव तुमच्या मुळे..

 11. गुरुनाथ says:

  ” तसा तसा मिथेनचा उग्र वास नाकात शिरत होता ” आय गेस तो अमोनिया असतो!!! (सायंस टू मधे वाचल्यासारखे वाटते!!! असो!!!),
  तुम्ही जो सज्जा म्हणता आहात त्याला ऐतिहासिक परिभाषेत झरोका असे म्हणतात, एका पर्शियन रीवाजाला धरुन ही रचना असते, पर्शियन शहा दिवस सुरु करताना व संपवताना असल्या एका झरोख्यात बसुन जनते ला दर्शन देत असे, त्याला हे झरोकादर्शन करणे कंपल्सरी होते कारण त्याची पोरे त्याचा मुडदा पाडायला तयार असत तेव्हा “पब्लिक सपोर्ट” असावा म्हणुन हा दर्शनाचा खेळ असे, असो, तर सुरुवातीला दिल्ली च्या स्लेव्ह डायनेस्टी (ऐबक, इल्तुत्मीश) ह्यांच्या काळी तो मध्यपुर्वेतुन भारतात आला व भारतीय स्थापत्यकलेला ही देणगी मिळाली, उंच् उंच दरवाजे व असले सज्जे हे पर्शियन कलेचे नमुने आहेत, त्यांचे सौंदर्य पुढे मुघलांनी वापरले होते (उदा फ़तेपुर सिक्री) तसे पाहीले तर मुघल शैली म्हणजे मोठे बगीचे व प्रचंड बांधकामे, पण त्यांनी जाळी,झरोका,मिनार व अर्बास्क्यु (सोनेरी शाईने इमारतीत कुराणाच्या आयता लिहिणे) वगैरे नाजुक पर्शियन कला सुद्धा जोपासल्या होत्या, तर असे हे झरोका पुराण!!! ( आपल्या कडे देवडी दरवाज्याच्या आतुन असते सततच्या हल्यांचा स्थापत्यावर पडलेला अक असर समजा!!!) , राजा प्रत्येक सज्जात येत नसे त्याचा एखादा ठराविकच असायचा, पण पुढे सज्जांची युटीलिटि वाढली व ते राणीवश्याने दरबार पाहणे (पडदानशीन राहुन), उंच ठीकाणचे पहारे इत्यादी साठी पण वापरले जाऊ लागले

  • राजे says:

   क्या बात है, उत्तम माहिती मिळाली साहेब.

  • गुरु
   अरे हो.. ते मिथेन नाही, अमोनियाच रे.. काय आठवलं ते लिहिलं गेलं बघ.
   राजाच्या दर्शनासाठी झरोका वेशी वर कशाला असेल ?? महालात असे झरोके आहे हे पाहिले आहेत मी

 12. Smita says:

  apalee bareech heritage sites ashee ka neglected asataat? tech military chya tabyat asalele bhaag kase rekheev, sundar asataat thevalele. corporates nee ‘dattak’ ghetalya tar kahee jaga? hee puN social responsibility ch tar ahe. hajaro varshancha itihaas asa heLsand karun fekalyasarakha vaTato…

  • हे खरं आहे. कुठल्याही प्रायव्हेट कंपन्या दत्त्तक घेऊ शकतात. पण ते काम सरकारचं नाही का?? सरकारने आपलं काम व्यवस्थित करायला हवं. इतक्या वर्षाचा इतिहास फेकल्या सारखा खरंच वाटतो. कार्पोरेट्स तर अगदी आनंदानी घेतील हे दत्त्तक – पण वर्ल्ड हेरीटॆज एखाद्याला प्रायव्हेट कंपनीला देणे पण योग्य वाटत नाही. ही राष्ट्रीय संपत्ती आहे , ती हळू हळू पर्सनल प्रॉपर्टी होऊन जाईल.

 13. गौरी says:

  सुंदर जागा आणि फोटो … तुम्ही म्हटलंय की वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, पण या ठिकाणाविषयी काहीच माहिती नव्हती.

  • आपल्या दृष्टीने पावागड महत्वाचं,आणि हे तर मुस्लीम लोकांचं, म्हणूनही कोणी जात नाही.

 14. अरुणा says:

  नुस्त्या एक ब्लोग वर किती महिती मिळते! आणि आपले मत पण निर्भीड पणे व्यक्त करता येते. याचा पतिणाम जर सरकार्वर झाला आनि सुधारणा झाल्या तर किती छान होईल!

  • मनातलं जे काही येईल ते लिहिण्यासाठीच तर ब्लॉग असतो. नाहीतर आजकाल निर्भिडपणे आपली मतं मांडायला जागा तरी कुठे आहे ??

 15. संजीव says:

  मी पण लिहिलंय पावागडवरती……
  http://chalatmusafir.wordpress.com/2010/09/23/to-pavagarh-by-pushpak-vimaan/

  Comments welcome..!

  • संजीव
   पोस्ट वाचलं, छान लिहिलं आहे. आता मी लिहायचं की नाही हा विचारच करतो:) छान आहे ब्लॉग काही पोस्ट्स वाचले..

 16. onkark says:

  काका खूपच मस्त जागा आहे.पावागडला जाऊन आलो तरी हि जागा पहिली नाही ……माहितीच नव्हते आधी 😦

  • अरे कोणालाच फारशी माहीती नाही. कुठे बोर्ड वगैरे पण लावलेले नाही. मला पण अपघातानेच सापडली. फारशी काही अपेक्षा न ठेवता आत शिरलो होतो त्या तटबंदीच्या.. तर हे घबाड हाती लागलं. पुन्हा कधी गेलास तर नक्की भेट दे. इथुन पुढे साधारण ३० किमी वर एक राजवाडा पण आहे तो पण पाहून आलो मी. फारसा काही चांगला नव्हता, एक साधारण घर होतं!!

 17. गुरुनाथ says:

  <<>>>

  राजा प्रत्येक सज्जात येत नसे त्याचा एखादा ठराविकच असायचा, पण पुढे सज्जांची युटीलिटि वाढली व ते राणीवश्याने दरबार पाहणे (पडदानशीन राहुन), उंच ठीकाणचे पहारे इत्यादी साठी पण वापरले जाऊ लागले(वेशीवरचे सज्जे, रोजच्या वापरात पहारे व व्हि.आय.पी व्हिजिट च्या वेळी ताशे शहादणे वाजवायची जागा असे वापरले जात असत)

  • खरं आहे. अरे माझा काहीच अभ्यास नाही इतीहासाचा.

   • गुरुनाथ says:

    इतिहासाला अभ्यास कुठे करावा लागतो? तो टेक्निकल इतिहास असतो (पुरातात्वशास्त्र, डॉक्युमेंट कंझर्वेशन, आर्काय्व्हिंग वगैरे), एखादी गोष्ट पाहिल्यावर, “ही इथेच का?” हा प्रश्न मनात आणा, उत्तर समोर असते कारण बांधणा~याने, ते उत्तर पुढील पिढ्यांना सहजी मिळावे असेच बांधलेले असते मॅक्स केसेस मधे!!!. अन इतिहास वाचायचाच असेल तर इंग्रजी मधे भारी बुके आहेत काही काही, कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात जे.एल.मेहता पार्ट III मागा सल्तनत व एकंदरीत मध्ययुगीन भारतामधे जे काही सांस्कॄतिक बदल घडले त्याचे सुंदर चित्रण आहे, कादंबरी सारखे वाचाल पुस्तक असले भारी आहे वरतुन, आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस ची पोरे तेच वापरतो. 🙂

    • अरे बाबा, त्यासाठी इतीहासात इंटरेस्ट असावा लागतो, माझ्या कडे तोच नाही . . मला जाम बोअर होतो तो विषय.. 🙂 पण पुरातत्त्व विभाग, वगैरे वाचायला आवडतात…

 18. sumedha says:

  मस्त पोस्ट आहे . फोटो पण आवडले .

 19. गुरुनाथ says:

  शहाजाहान च्या महालाचा एक झरोका तर यमुनेच्या वाळवंटाकडे तोंड करुन बादशाह ला बसता यावा असा होता, दर वेळी तिथे बसणे शक्य नाही म्हणुन त्याने एक शक्कल लढवली होती, दवंडी पिटली की आजपासुन झरोख्यात एक दिवा रोज संध्याकाळी लावला जाईल, दिवा आहे म्हणजे खावंद फ़िट ऍंड फ़ाईन आहेत!!!!, तसेच ह्या मनुष्याने महालाच्या दारापासुन ते शयनकक्षापर्यंत घंटा टांगल्या होत्या लिंक्ड(असे म्हणतात सोन्याच्या!!) राज्यात कोणावरही अन्याय झाला तर त्याने ही घंटेची दोरी ओढायची असे फ़र्मान होते एकदा रात्री बादशाह झोपला असताना घंटा वाजली तेव्हा त्याने शिपाई पाठवले तर एक गाढव घंटा ओढत होते!!!, बादशाह ने त्याच्या मालकाला बोलावुन तंबी भरली होती, पुढे जर तुझ्या गाढवाने अत्याचाराची कंप्लेंट एफ़.आय.आर केली तर तुझे मुंडके मारु म्हणुन!!!!

 20. आल्हाद alias Alhad says:

  “जुन्या धरोहरचा मुतारी म्हणून “???
  धरोहर?
  काका, तुम्हाला वारसा असं म्हणायचं आहे का?

 21. रोहन says:

  किती सुंदर जागा आहे पण काय अवस्था करून ठेवली आहे.. दुर्लक्षित…. तू जिथे जातोस तिथून ही अशी माहिती मिळवून सर्वांपर्यंत पोचवतोस ह्यासाठी मनापासून धन्यवाद…

  • काहीतरी वेगळं सापडलं तरंच लिहीतो ब्लॉग वर. आणि मला नेहेमीच असं काहीतरी वेगळं सापडतं!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s