ह्या फोटो मधे काय दिसतंय ? एक मंदीराचा कळस? मग त्यात इतकं विशेष काय- असे कळस तर जागोजागी दिसतात. एखाद्या सामान्य मंदिराचा कळस असता हा तर त्यावर इथे लिहायला घेतलं नसतं. पण थोडी विचित्र गोष्ट नजरेला पडली ह्या ठिकाणी म्हणून इथे – मंदीर आणि त्याच्या कळसावर असलेले पीर बाबाचे मजार सदृष खोपटे.. मंदीराच्या कळसावर एका मुसलमानाचे समाधी ( समाधी योग्य शब्द होईल की नाही ते माहीत नाही) कशी काय असू शकेल? एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं किती कठीण असतं नाही? पण ते तसं इथे आहे.
पावागढ! गुजराती लोकांची आवडती देवी. गरब्याच्या नाचात हिचा बरेचदा उल्लेख येतो. हिंदूंच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे. पावागढला अंबाजी पर्वत पण म्हणतात. अशी आख्यायिका आहे की, महाशक्ती पार्वती देवीच्या शरीराचे ५१ भाग झाले होते, शंकर ते घेऊन आकाशमार्गे जातांना त्यातला ह्रदयाचा भाग इथे या डॊंगरावर पडला म्हणून हे शक्ती पीठ इथे तयार झाले.
ही जागा तसं म्हंटलं तर खूप उंचावर आहे. वर जायला रोप वे ची व्यवस्था आहे. रोपवे ने गेलो तर फार तर ४-५ मिनिटेच लागतात. वर जायला पूर्वीच्या काळी रस्त्याने , काही ठिकाणी असलेल्या पायऱ्यांनी जावे लागायचे. कुठलेही वाहन वरपर्यंत जात नाही . आजही बरेच भक्त गण हे रोपवे ने न जाता पायी वर जातात. पायी जायला किती तास लागत असतील बरं??
आम्ही अर्थात कारने वर गेलो. एका ठरावीक अंतरावर पोहोचल्यावर उडनखटोला (रोप वे ट्रॉली चे स्थानिक नांव) स्टॅंड वर जाऊन रोपवेने सरळ वर गेलो. तिथे वर पोहोचल्यावर पण मंदिरापर्यंत पोहोचायला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात, तसेच जातांना रस्त्याने बरीच जैन मंदीरं ( प्राचीन ) दिसतात. काही ठिकाणी डागडुजीचे काम सुरु असलेले दिसत होते.प्रत्येक मंदिरापाशी थांबून दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. खूप जुने असलेली ही मंदीरं अजूनही चांगल्या स्थिती मधे आहे. इतकं असूनही एकाही जैन मंदीरात कोणी जातांना दिसत नव्हतं.पर्वताच्या खाली चापानेरला मुस्लिम साम्राज्य असतांना पण ही हिंदू आणि जैन मंदिरं चांगली कशी टिकली असावी हा प्रश्न सारखा डोक्यात येतच होता?
रस्त्याने वर जातांना दोन्ही बाजूला फोटोग्राफी, खाद्यपदार्थ, आणि इतर दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. आमच्या बाजू बाजूने बरीच गाढवं चालत होती. प्रत्येकाच्या पाठीवर असलेली पोती, मुकाट्याने वाहून नेत होती ती. इथे वर या दुकानासाठी सामान आणण्यासाठी एकच ट्रान्सपोर्ट अव्हेलेबल आहे, ते म्हणजे गाढव.केरोसिन पासून तर खाद्य पदार्थ किंवा गॅस सिलेंडर सगळं काही गाढवांच्या पाठीवरून आणलं जातं. थोडं पुढे गेल्यावर या गाढवांच्या साठी विश्रांतीची जागा पण खास तयार करून ठेवली आहे. गाढवं आहेत म्हणून सगळं नीट चाललंय – हा विचार मनात आला, आणि खदखदून हसू फुटलं. कुठल्याही क्षेत्रात, नौकरी करतांना वेळोवेळी भेटलेली गाढवं आठवली 🙂
गाढवांबरोबर मी स्वतःला नेहेमीच कोरीलेट करत असतो. गाढवाला ’वैशाख नंदन’ म्हणतात. म्हणजे वैशाखातल्या उन्हातही आनंदी रहाणारा प्राणी.याच संदर्भात एक कहाणी अशी पण सांगितली जाते – एकदा वैशाख महीन्यात एक गाढव माळरानावरून जात होता, त्याने मागे वळून पाहिले, तर त्याला मागे एकदम वैराण माळ रान दिसलं. एकही गवताचं हिरवं पातं नाही किंवा काहीच शिल्लक नाही असे… आमचे गाढव एकदम आनंदी झालं की राव , त्याला वाटतं की मागचं सगळं हिरवं गवत आपणच सगळं खाऊन टाकलंय ! तर म्हणून वैशाख नंदन. मान्य करायला हवंच , की नोकरी मधे आपणही वैशाख नंदना प्रमाणेच वागतो- कळत किंवा नकळत…!!
सगळ्यात जास्त दोन्ही बाजूला असलेली फोटोग्राफर्सची दुकान पाहून मजा वाटत होती. अहो काय नाही त्या दुकानात?? मोटरसायकल, कार, मागे बॅकड्रॉपला पावागढचा सिन, किंवा देवीदेवतांचे मोठे फोटो.. काय वाट़्टेल ते होतं तिथे. पण सगळ्यात ग्रेट म्हणजे पांढरा वाघ !! वाघावर बसून पण फोटो काढून घ्या… देवी प्रमाणे.. लहानपण पुन्हा एकदा जगतोय असं वाटायला लागलं- आणि खूप आनंद झाला . ही अशी दुकानं नेहेमी जत्रेमधे पहायला मिळायची मी लहान असताना.
एकदाचा वर पोहोचलो. पण अजुन बऱ्याच पायऱ्या बाकी होत्या. लहान असलेल्या पायऱ्यांवर खूप गर्दी होती. कसातरी कण्हत कुथत वर पोहोचलो. पुन्हा एकदा ठरवलं, की आता वजन नक्की कमी करायचंच.. च्यायला, किती त्रास होतो या वजनाचा.
पुढे मंदिरा मधे रांग होती. कोणीतरी मधेच रांगेत घुसत होता. तेंव्हा रांगेतले लोकं मात्र मोठमोठ्याने अंबे…….. करून ओरडत होते आणि आपली नापसंती दर्शवत होते.कोणी म्हणत होतं की ” अरे कमीत कमी देवाच्या ठिकाणी तरी आपली शिस्त पाळा”. मधेच कोणीतरी म्हणायचं, “जाऊ दे, त्याला देवी बघुन घेईल काय आहे ते.. त्याला देवीचं दर्शन फळणार नाही बघ” .. तो पुढे गेलेला माणूस जर कोडगा असेल तर याकडे दुर्लक्ष करायचा, पण एखादा पापभिरू मात्र पुन्हा रांगेत मागे रांगेच्या शेवटी जाउन उभा रहायचा दर्शनाला. खरं तर फार गर्दी नव्हती, तरी पण असे प्रकार सुरु होतेच..माझ्या रांगेतून जाऊन घेतलेल्या दर्शनाला फारतर दहा मिनिटे लागली असावी.:)
बाहेर पडलो, तर काही लोकं मंदिराच्या कळसाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चढतांना दिसले. एकाला विचारलं, की काय आहे वर? तर तो म्हणाला की वर एक मजार आहे . मंदीराच्या कळसावर मजार म्हंटल्यावर बसलेला अनपेक्षित धक्का झेलत मी पण वर निघालो. कळसावर एका लहानशा खोपट्यात काही फोटो वगैरे ठेवले होते, एक माणुस मोर पिसांचा पंखा घेऊन उभा होता.लोकांना लवकर चला म्हणून म्हणत होता. अतिशय कमी असलेल्या जागेतला तो माणसांचा कल्ला नकोसा वाटत होता मला तरी!
एक कोणीतरी मुस्लिम देवीचा भक्त होऊन गेला. तो मंदिरात रहायचा आणि म्हणून त्याच्या मृत्युनंतर त्याची समाधी मंदिराच्या कळसावर बांधलेली आहे असं म्हणतात. तिथे गेल्यावर देवीच्या दर्शनानंतर वरच्या मजारचं दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पुर्ण होत नाही असं म्हणतात. लोकं ज्या भक्ती भावाने देवीला हात जोडतात, त्याच भक्ती भावाने त्या त्या मजार पुढे पण नतमस्तक होत होते. त्याला मजार म्हणणे पण त्याला योग्य होणार नाही, कारण वर समाधी वगैरे काही नाही, फक्त एक खोपटं आहे, आणि त्यामधे ठेवलेले फोटो !
वर जातांना दोन्ही बाजूंच्या कठड्यांना बांधलेला प्रत्येक लाल कपडा, दोरा , कुठल्या ना कुठल्या माणसांच्या तृप्त झालेल्या आशा आकांक्षाची कहाणी सांगत होते. एका कपड्याला उगाच हात लावला- बरं वाटलं, एक पॉझीटीव्ह थिंकींग… की हा कपडा म्हणजे कोणाची तरी इच्छा पुर्ण झाल्याचे प्रतीक आहे म्हणून.
अरे वाह, हे फोटो तर तुम्ही खुप आधी टाकले होते फेसबुकवर… मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम वणीच्या सप्तश्रुंगीसारखा वाटतो…
इथे कधी जाण्याचा योग येतोय ते बघुया… 🙂
्सुहास
अरे सहज शक्य आहे. दोन दिवस पुरेसे आहेत. रात्री निघालास की दुसऱ्या दिवशी रात्रीच्या गाडीने परत येता येऊ शकते.
Photos far chan aahet….bharat bhramantichi ek supt iccha aahe pahuya kas kai jamtay te
अश्विनी
सेल फोन ने काढलेले फोटो असतात माझे सगळे. म्हणजे सेल फोनच चांगला आहे म्हणायला हरकत नाही 🙂 धन्यवाद..
वा मस्त आहेत फोटो. देवळाच्या कळसावर मजार म्हणजे औरच आहे 🙂
हेरंब
देऊळ पण पौराणिक असलेले. म्हणतात, की श्रीकृष्णाचे जावळं इथेच काढले गेले, रामाने रावणाला ज्या बाणाने मारले तो बाण पण रामाला इथेच दिला पार्वतीने अशी आख्यायिका आहे
वाह ! मस्तच..
पावागढ करायला हवा कधीतरी…. 🙂
राजे
पावागड नक्कीच करायला हवा. जर ट्रेकींग ची इच्छा असेल तर एक चांगलाच कठीण ट्रेक होऊ शकतो पुर्ण. मजा येईल. आपला बझकर ग्रूप पहा तयार होईल तर.
Kiti mast na! Trekking pan hou shakel chalat gelo tar
गणेश ,
नक्कीच , मस्त ट्रेक होऊ शकतो. जवळपास १५ किमी तरी असेल ते अंतर..
आमचे महाराजवडील साहेब व मातुश्री जाऊन आले, हीज हायनेस युवराजांची इच्छा आहे, बघु योग कधी जुळतात, बडोदा संस्थानी राजेश्री गायकवाड सरकार ह्यांसी खलीता धाडोन भेटीची इच्छा जाहीर करावी लागेल असे दिसते!!!
युवराजांना सहज शक्य आहे. फक्त दोन दिवस जातिल .पुण्याहून प्रस्थान करावे, आणि सरळ बडोदे मुक्कामी पोहोचावे. सोबत एखादा मित्र असल्यास अजून उत्तम!! बडोदे संस्थान जवळच आहे पुण्याहून..
खूपच छान.. वैशाख नंदनाची गोष्ट जम आवडली .. आणि ती ज्याप्रकारे रिलेट केलीय तुम्ही.. एकदम ग्रेट 🙂 🙂
वैशाख नंदन- त्यावर एक श्लोक आहे, मी विसरलो आता. 🙂 धन्यवाद..
kiti mahitipurna lekh aahe..tumche lekh mala aavdtat. Amba deviche darshan ghyayla have.
Thanks
पूर्वा
धन्यवाद. बरेच दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो, पण पोस्ट लिहायचा कंटाळा येत होता. :)तसंही प्रवास वर्णनं मला लिहीणं कंटाळवाणंच होतं.
Vaishakh nandan chee goshta maheet navatee, aNee tee tulana mhanaje ekdam varmavar bot thevalat!!!:-)
स्मिता
स्वतःवरच केलेला विनोद शेवटी बरा असतो.. 🙂 कोणी दुखावला जात नाही, पण प्रत्येक जण स्वतःला कोरीलेट करतो.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार..
वैशाखनंदन फार ओळखीचं वाटलं 😉 😀 😀
मस्त माहिती.
गौरी
प्रत्येकालाच वैशाखनंदन ओळखीचं नक्कीच वाटतं , उगाच कोणीतरी परिचित माणुस नजरेसमोर येतो नाही??
देवळाच्या माथ्यावर मुसलमानी मजार….
संतापाशिवाय दुसरं काही वाटू कसं शकतं हिंदू लोकाना?? दुर्दैवाने पावागडवरच्या प्रचंड गर्दीपैकी कोणालाच त्याचं काही सोयरसुतक दिसत नाही.
संजीव
मला पण पडलेला प्रश्नच आहे हा. बरीच चौकशी केली तरी त्या मुसलमान देवीच्या भक्ताबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.
बऱ्याच दिवसांनी मी आपल्या ब्लॉग वर आले. हल्ली माझ्या हि पोस्ट नाहीतच. वर्डप्रेस फारसे उघडत नाही. फेसबुक वरून आले. नेहमी प्रमाणे उत्कृष्ट पोस्ट…मजार मुळे उत्सुकता वाढली.
अनुजा
धन्यवाद.. मी पण आता आवरतं घेणार आहे ब्लॉगिंग! एक मैलाच पडाव पोहोचतोय.. ५ लाखाचा. 🙂 कारकिर्द चांगली असतांनाच थांबवावं हे योग्य!
छान आहे.. ते नदीकाठी असलेले मंदिराचे अवशेष… त्याबद्दल काही माहिती आहे का? चापानेरला अजून काही दुसरे नाव आहे? पाटण/पट्टण वगैरे?
दुर्दैवाने इतिहास फक्त १५ व्या शतकापर्यंतचा आहे रेकॉर्डेड.. बैजू बावारा चा बैजू याच गावचा होता.
Sir, Tumchi website “http://kayvatelte.com” kiman 1 varshapasun Bookmark karun thevli hoti, pan vachnya sathi vel aaj mirala.
Vachnyaas survat, Pavagad pasun keli karan, yethil “Mahakali Devi” majhi “Kuldevat”.
Tumchya lekhanas toknyacha majha kahi adhikaar nahi, tari ek point yachyaat add karava ashi ichcha hoti.
Pavagad chi “Mahakali Devi” ani yethun kiman 200 te savva 200 KM chya antaravar (Rajasthan border javal) “Abu Ambaji” mahnje “Ambaji Devi”. Abu Ambaji la ek parvat aahe jyala “Gabbar” mhanun olakhtat.
सुदर्शन
ब्लॉग वर स्वागत, ही माहिती दिल्याबद्दल आभार. अंबाजी ला अजून गेलो नाही कधी. पण जायची इच्छा आहे.