एक तरी कविता अनुभवावी ..

सुपर्णा चे  ( माझी सौ.) आजपर्यंत   तिचे बरेचसे लेख प्रसिद्ध झाले  आहेत, त्या पैकी मला आवडलेला लेख इथे पोस्ट करतो आहे.   कवितांचे  विश्व फार मोठे आहे. काही कवींनी तर आपल्या मनावर कळत नकळत राज्य केलं आहे,  प्रत्येक  कविता म्हणजे कविचे मनोगत!   कविता आणि त्या कवितेचा  सामान्य जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखवणारे  सदर  “काही ओळी अनुभवाव्या” ! तरुण भारतात या सदरा मधे  २५ लेख प्रसिद्ध झाले आहेत, आणि  त्या श्रुंखलेतला  हा २५ वा लेख.

आता लवकरच सगळे लेख तिच्याच ब्लॉग वर टाकणार आहे ( टाईप तर मलाच करावं लागतं म्हणून जवळपास वर्षभर अपडेट केला नव्हता तिचा ब्लॉग..) 🙂

कोन्यात झोपली सतार सरला रंग,
पसरली पैंजणे , सैल टाकुनी अंग,
दुमडला गालीचा, तक्के झुकले खाली,
तबकात राहीले , देठ लवंगा साली
झुंबरी निळ्या दिपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते, ज्याच्या साठी
ते डावलून तू दार द्डपिलें पाठीं
हळूवार नखलीशी पुनः मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करूनी मान
गुणगुणसी काय ते? -गौर नितळ तव कंठी-
स्वरवेल खरखरे, फुलं उमरते ओठी.
 

वडिलांचे पायी जाण्य़ाचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याकडे हिशोबाचे काम मला द्या, वडीलांच्या ऐवजी मी ते काम करीन” असे सांगायला गेलेले गदिमा त्यावेळी फक्त इयत्ता चौथीत होते.प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, आईवडिलांचा सुसंस्कार आणि लेखणीची प्रतिभा अशा सर्व मितींनी युक्त असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रसिद्ध ’रामायण कार’ गदिमा हे आहेत. पोटासाठी पराडकरांची “सुंगंधी धूप सोंगटी” विकणाऱ्या या महाकवीने गीत रामायणा द्वारे पुढील भारतीय पिढीसाठी संस्कृतीचा धूप महाराष्ट्रात दरवळत ठेवला . आपली प्रतिभावंत लेखणी आपल्याला केवळ पैसा देते, परंतु काळावर  कायमचा ठसा उमटवत नाही हा सल त्यांना होता.त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून ५६ व्यक्ती चित्रे , समूह गीत, या विविध प्रकारांनी भरलेले आणि भारलेले रामायण साकार झाले.

वर  उधृत  केलेली कविता ” जोगिया” ही माडगूळकरांची लावणीतल्या चरित्र नायिकेचे मनोगत व्यक्त करणारी कविता आहे. खरे तर लावणीतील नायीकेला चरित्र नायिका म्हणणे धारिष्ट्याचे होईल. परंतु  कविता गत ’ मी ’ ने ज्या लावणी नायिकेचे वर्णन केले आहे तिचा भाव , तिची समर्पण वृत्ती, प्रेमाच्या ठायी असलेली नीती, व श्रध्दा हे सारेच तिला चरीत्र नायिकेच्याही दर्जाच्या वर नेऊन पोहोचवतात.

लावणीचा पूर्व इतिहास जाणून घेणे खूप रंजक ठरते. ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायात लावणीचे वर्णन येते. ” तमाशाच्या धर्तीवर होणारे नृत्य गायन, गीत म्हणजेच लावणी आणि घाटीव म्हणजे स्तुतीपर गीते वगैरेंच्या गायनाने कानांना सुखावतात, त्यातच फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुवास! प्रेक्षक देहभान विसरून चोरी , लुटमार वगैरे  वाममार्गाने मिळवले धन उधळतात, म्हणजेच दौलत जादा करतात ” ही

जरी लावणी या प्रकाराची पूर्व पीठिका असली तरी लावणी खरी प्रस्थापित झाली ती पूर्व पेशवाईच्या कालखंडात. या काळात स्वराज्याचे साम्राज्य आले. मराठ्यांच्या हातात अमाप पैसा आला. त्यांची रहाणी करमणुकीची , ऐषारामाची, व वृत्ती सुख विलासी झाली. त्यातच मोगली वातावरणात वाढलेला शाहू सारखा   राजा आणि नानासाहेबांसारखा पेशवा असल्याने शाहीर, गोंधळी, भराडी, भांड, यांना नवनवीन विषयांवर नवनवीन ढंगामधे रचना करण्यात प्रोत्साहन मिळाले व उत्तर पेशवाईच्या कालखंडात लावणी  बहरात येऊन देखणी झाली.

रामजोशी अनंत फंदीं सारख्या पिढीजात कीर्तनकाराने   देखील हातात डफ धरले. सवाल- जवाब या सोबतच विषय व रचना या मधे   अहमहमिका सुरु झाली. लावणीच्या रचना जास्त खटके बाज व प्रासयुक्त झाल्या. मराठी वीर लावण्या गुणगुणत लावणीच्या शृंगारात पूर्णतः बुडाले.

लावणीतील  श्रृंगार कानाला व मनाला सुखवणारा होताच परंतु तो डोळ्यांना सुद्धा सुखवणारा असावा म्हणून कवनाची लावणी ही फडाची लावणी झाली .शाहीर संतकवी, व पंडित कवी  यांच्यामधे मुख्य भेद काय असा सवाल रामदास स्वामींना केला गेला. त्यांनी याच्यावर फार मार्मिक उत्तर दिले. पंडित हे पाठ कवी, संत हे प्रासादिक कवी, तर शाहीर हे धीट कवी .

मराठी साहित्याच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येते की संताच्या लेखणीतूनही सामाजिक विचार मांडला गेला, परंतु तो उपमा दृष्टांताच्या पलीकडे गेला नाही . शाहिरानी मात्र लौकिक विषयांवर कवने करून आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो आनंद उपभोगायला भाग पाडले. त्यामुळे मराठी काव्यात ’शाहिरी काव्य’ हे अपूर्व आहे.या मधे प्रामुख्याने तत्कालीन विषय म्हणजेच लग्नानंतरचे पती विषयीचे प्रेम ,कोवळ्या मनाची अल्लड वृत्ती, पती दर्शनाची उत्सुकता, मुलूखगिरी वर गेलेल्या पती विषयीची हुरहुर, स्वारी येताच होणारा आनंद, स्वारीचा मुक्काम येताच उडणारी धांदल, रुसवे – फुगवे, राग- अनुराग, इत्यादी वर कवने झाली.

स्त्री -पुरुष प्रेमाचे उत्कट प्रणय विकारांचा स्वाभाविक आविष्कार मराठी भाषेतील लावणीत आढळतो तो तसा इतर भाषेत खचितच आढळेल. शृंगारा  प्रमाणेच पौराणिक व अध्यात्मिक विषय देखील त्यांना वर्ज्य नव्हते. कवनां मधे कूट योजना करून कलगीतुऱ्याचा बाज देखील त्यांनी वाढवला. शाहिरी काव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शुद्ध मराठीपण हे आहे. संत काव्य किंवा पंत काव्य भाषांतरीत केले तर ते कोणत्याही भाषेत खपेल, परंतु मराठी लावणीचा शाहिरी रंग कोणत्याही भाषांतरात उतरू शकणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ते काव्य पूर्णपणे लौकिक होते, तसेच ते फक्त पंडिती काव्या प्रमाणे केवळ उच्च वर्गाकरता मर्यादित नव्हते. त्यातील कवी हे बहुजन समाजातील असल्याने त्याचे शुद्ध मराठीपण जपले गेले. यातील उपमा प्रतिमा आणि वर्णने, या मनोहारी होत्या. उदाहरणार्थ ,

गगनात चांदणी ठळक मारीशी झळक
उभी गं अंगणी,
किती नटून थटून मारीशी छनछन
नैनांच्या संगिणी
किंवा
लहान चिरी कपाळी कुंकाची
लाल जशी पिकली मिरची.
किंवा
बहुतां दिवसी तुला भेटले आनंद मय दोघा
जसा पूर गंगेच्या ओघा.

लावणी ही नुसते माध्यमच नव्हते तर ते दृक़ श्राव्य माध्यम असल्याने त्याचा वर्णनपरता हा मुख्य गुण होता.

सहज मनामधे आले साजणी कधी स्वामींचा एकांत घडे
तोच जासूदे येऊन सांगितले मुक्काम गंगे अलीकडे.

एकूण  काय तर लावणीची ही सारी वैशिष्ट्ये पाहिली तर साहित्याच्या प्रांगणात इतकी देखणी भर कुठल्याच प्रकाराने घातली नाही. पूर्वी स्त्रीची भूमिका पुरुष करित असत नंतर त्याची जागा हळू हळू पोटापाण्यासाठी म्हणून स्त्रियांनी घेतली आणि  लावणीवर अश्ललतेचा ठपका आला. लावणी सादर करणाऱ्या स्त्रीच्या मनात सतत कुठला तरी सल बोचत राहिला. हाच सल माडगुळकरांच्या ’जोगिय’ मधल्या नायिकेने सांगितला आहे. –

“मी देह विकुनीया मागून घेतले मोल,
जागविते प्राण हे ओपुनिया ’अनमोल’
रक्तांत रुजविल्या भांगेच्य मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा .”

जोगिया कवितेतील नायिकेला वाटते की देह विकून मिळालेले प्रेम हे शाश्वत नाही आणि ती सुद्धा शाश्वत प्रेमासाठी आसुसलेली आहे म्हणूनच ती एका विशिष्ठ तिथीला, त्या दिवसाला, अस्वस्थ होते. कवितेच्या पहिल्या कडव्यात नायिकेची व्रतस्थ स्थिती अत्यंत सुरेख पद्धतीने वर्णी नेली आहे. लावणी सादर केल्यावर रसिक जनांना न रिझवता ती थेट आत येते आणि त्या विशिष्ट दिवसाची आठवण म्हणून ’ व्रतस्थ ’ रहाते. काय घडले असते त्या विशिष्ट तिथीला? असे काय घडले असते की ’ का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?’  अशी तिला विचारणा होते? मग ती नायिका त्या दिवसाची कथा सांगते.

शोधित एकदा घटकेचा विश्राम,
भांगेत पेरूनी तुळस परतला शाम,
सावळा तरूण तो खराच ग वनमाली
लाविते पान …तो निघून गेला खाली.
अस्पष्ट स्मरे मज त्याचा वेडा भाव
पुसले हि नाहि, मी मंगल त्याचे नांव,
बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी
’मम प्रीती आहे जडली तुजवर राणी’!

असा हा खुळा घनश्याम तिच्या रंग महाली येतो , अन प्रीतीची याचना करतो.प्रथम हिला त्याची गम्मत वाटते. नीतीच्या या व्यापारी हा ’इष्काचा’ प्यार सांगतो म्हणून ती म्हणते-

हासून म्हणाल्ये, ’ दाम वाढवा थोडा…
या पुन्हा , पान घ्या… निघून गेला वेडा’ !

आता मात्र तिला खरंच त्याच्या निघून जाण्याचा पश्चात्ताप होतो आहे.शाश्वत प्रेमाचे दान अव्हेरल्याचे दुःख तिच्या पदरी आहे. त्यामुळे ती अस्वस्थ दुःखी होते, आणि म्हणून शेवटी ती त्या खुळ्या वेड्यासाठी पान लावते आणि त्याच्या खुळ्या वेड्या प्रितीचा सन्मान ती व्रतस्थ राहून करते.

ही तिथी पाळते व्रतस्थ राहूनी अंगे
वर्षात एकदा असा ’ जोगिया’ रंगे.

खरे तर कविता संपल्यावर मनात एक विचार येतो की असा कोणी घननीळ तिच्या जीवनात खरेच आला असेल का? की हा तिच्या मनातला, वास्तवात अस्तित्वात नसलेला प्रियकर आहे ? क. भक्तीच्या भावविभोर स्थितीतील कृष्णाला अर्पिलेली सुमनांजली आहे? तिच्या मनातले खरे खोटे तिच जाणे . परंतु एक मात्र खरे की कलावंतिणीच्या ठायी असलेली श्रद्धा,नीती, शाश्वत प्रेमाची चिरंतनता हे गुण नायकिणीला चरित्रनायिकेच्याही वरचे स्थान प्राप्त करून देते हे आणखी विशद करून सांगायला नको.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

19 Responses to एक तरी कविता अनुभवावी ..

 1. mau says:

  apratim !!!!

 2. tejaswini joshi says:

  aapan fakt pandharpeshi samajatil striyanchya bhavanancha tyanchya ejjaticha vichar karato.pan ya striyanahi man asate ,bhavana asatat yacha konich vichar karat nahi.ek upbhogachi vastu mhanun tyanchyakade pahile jate.sundarch jhalay lekh.vachatana nakalat dolyat pani tararal.

 3. SADANAND says:

  सौ साल जियो सुपर्णावहिनी,
  गदिमांची हि कविता लहान असल्यापासून फैयाजबाईंच्या आवाजात ऐकत आलो आहे. प्रत्येक वेळी जीव घुसमटून ओरडावंसं वाटलं आहे ” आग लागो ह्या प्रेमाला , जे जगूही देत नाही आणि मरूही देत नाही” . असं वाटणारे असंख्य असतील , पण वहिनींच्या या लेखातून ही कविता तितकीच जिव्हारी लागलेला एक समदुःखी जीव भेटल्याचं समाधान वाटलं . म्हणून आता कुसुमाग्रजांचं हेही म्हणणं पटतंय की ” क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा”

  एक फर्माईश करू वहिनी ? असंच विश्लेषण ” वेदात मराठी वीर दौडले सात” चं करा प्लीज !

  • धन्यवाद सदानंद.. निरोप कळवतो. ती नेट वर नसते, त्यामुळे टाइपिंग वगैरे मी च करतो.. आभार..

 4. Smita says:

  sundar lihilay kharach …

 5. Sonali Kelkar says:

  Mahendrakaka,
  Kai sundar shabda vaparale ahet. Suparnakakuna sanga, phar surekha lihila ahe lekh.
  khup pharak asato ne blogger lekhak ani khara lekhak yamadhe. ragavu naka ha 🙂
  sonali

  • सोनाली
   खरंय तुझं.. 🙂

   • Smita says:

    Sonali Kelkar mhaNaje Aryanchee Duniya waleech ka? to blog kuThe gela? kitee chan hota…

    • Sonali Kelkar says:

     Smita,
     Ho mich Aryachi aai. To blog aahe, pan mi khup divsat kahi lihile nahiye. Lavakarach suru karen lihayala. Tumhi tya blogchi ajun athavan kadhata he vachun khup bare vatale.
     Sonali Kelkar

     • Smita says:

      sonali, yes mala nakkeech tuzya blog chee aThavaN ahe, karaN aryanchya doLyatun tyacha vishwa tyachya aaine sadar karaNa hee farach cute kalpana hotee/ahe. tya vegaLepaNamuLe tuzya postschee mee vaat pahayache. in fact mazya muleelahee tyache sagaLe photo aNee khoDya faarach avadalya hotya. hope you will start writing again. mee madhe ekda access karu pahila tar ‘page not found ‘vagaire error yet hotee,..

 6. aruna says:

  पोस्ट वाचून बरेच दिवस झाले,पण अभिप्राय लिहिला नव्हता कारण जरा तब्येतीने लिहावे असे वाटत होते.तुम्ही दोघेही छान talented आहात.अशी जोडी कधी कधीच जमते. दोघन्चेही अभिनंदन.आणखी लेखांची वात पहात आहे.

 7. प्रसाद थरवळ says:

  Kaka Suparna kakinna Abhipray pohochava, “Lekh mastach zalay mhanun….., Pudhlya lekhachi vaat pahtoy..!” 🙂

  • ्तिच्याच ब्लॉग वर लेख टाकलाय अजून एक.. 🙂 हल्ली तिला शिकवतोय कसे उत्तर लिहायचे प्रतिक्रियांना ते.. 🙂

 8. Santosh says:

  Shabda purese nahit… karan tyanche dhani apan ahat 🙂

  Dhanyawaaad… Wachanacha ananda dilya baddal… 🙂

 9. Meena Thayalan says:

  Surekh, kai lihinar yababat, pan jeva jeva blog var yein nakki tumcha blog vachen barech rahile ahe vachayche

  • धन्यवाद.. 🙂 नक्की या. एक वर्ष हे सदर ती लिहित होती, तिच्या या ५६ लेखांचे एक पुस्तक परममित्र प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होते आहे. १३ जूनला विमोचन आहे पुस्तकाचे.
   प्रतिक्रियेसाठी आभार. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s