आवाज..

प्रेम सकाळी सुरु होऊन रात्री संपतं का? नाही , तसं नाही.. प्रेम तुम्हाला जेंव्हा फारशी गरज नसते, तेंव्हा सुरु होतं, आणि जेंव्हा खरंच आवश्यकता असते तेंव्हा संपलेले असते.झोपेचं पण तसंच आहे. तुम्हाला अगदी भरभरून झोप आलेली असते, पण तेंव्हा काहीतरी काम निघतं आणि  झोपायला मिळत नाही, आणि जेंव्हा झोप येत नसते,  तेंव्हा बायको  आता झोपा लवकर किती वेळ नेट वर बसणार आहात??.

माझं आणि झोपेचं  पण तसंच आहे-एकदम ३६ चा आकडा.कुठे आणि का बिनसतं तेच समजत नाही. सकाळी साडेचारची वेळ , आणि एकदम आवाज सुरु होतो, मुन्नी बदनाम हुई… किंवा प्यार हुवा, इकरार हुवा… आणि रिव्हर्स गिअर मधे ट्रकच्या इंजीनचा सकाळच्या शांत वेळेस येणारा तो आवाज… खाडकन झोप उघडते. माझं घर आहे टाइम्स ऑफ इंडीयाच्या सबर्बन प्रेस जवळ. रोज सकाळी ५-६ कंटेनर भरून कागद इथे उतरवला  जातो. माझ्या साखर झोपेची वेळ आणि या कंटेनर्सची  येण्याची वेळ अगदी एक ठरलेली आहे.  या ट्रकचा आवाज, त्या वॉचमन चा शिटीचा आवाज, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज, असे अनेक आवाज माझ्या पाचवीला पुजलेले आहेत.

आवाजामुळे मी  खरंच अगदी जाम वैतागतो. सकाळी साडे पाच वाजता होणारा मशिदीचा ’अल्ला हो अकबरचा’ भोंगा असो काय किंवा, लोकल मधे मोठ्याने मोबाइल फोन वर कोणीतरी लावलेली गाणी , मोठ्या आवाजात गप्पा मारणारे लोकं, टिव्ही चा आवाज खूप मोठा ठेवणारे खालच्या मजल्यावरचे लोकं, भांडी लावल्याचा आवाज, लोकलचा खडखडाट, ट्राफिक जॅम मधे अडकलेले असतांना मागच्या वाहनाचे हॉर्न- असे अनेक आवाज कायम छळत असतात.

ह्या आवाजा व्यतिरिक्त एक अजून आवाज असतोच – ’आतला आवाज ’ तो नेहेमी सांगत असतो -अरे दुर्लक्ष कर, या वर काही एक उपाय नाही, तुला हे सहन करावेच लागेल.

’आतला आवाज’ हा खरा ’आवाज’ .वेळोवेळी उपयोगी पडणारा, किंवा तुमच्या निग्रहावर पाणी फेरणारा.  सिगरेट सोडल्यावर जेंव्हा विथड्रॉवल सिम्प्टम्स असतात, तेंव्हा खरंच या आतल्या आवाजाचा खूप त्रास होतो. सिगरेट सोडून दोन दिवस झाले असतात,मोठ्या मुश्किलीने दोन  तिन दिवस एकही सिगरेट न ओढता काढले असतात, बराचसा कॉन्फिडन्स पण डेव्हलप झालेला असतो, तेवढ्यात आतला आवाज  ओव्हर पॉवर करणं सुरु करतो, ” अरे ओढ रे एक सिगरेट काय होतं? तुझ्या मधे कॉन्फिडन्स आहे, तू कधीही सोडू शकतोस,  एक ओढ , हवं तर पुन्हा सोडून दे… ” आणि असे आवाज डोक्यात उठायला लागले की मग हळूच पावलं त्या सिगरेटच्या द्कानाकडे वळतात , आणि भैय्या एक विल्स देना… म्हणून पैसे समोर ठेवले जातात. पण मी मात्र त्या आतल्या आवाजावर ताबा मिळवला होता, आणि आता २० वर्ष झाले सिगरेट सोडून..

हे तर आपल्या सर्वसामान्यांचे आतले आवाज. एक सहज मनात आलं की आपल्या नेते मंडळींचे आतले आवाज काय म्हणत असतील बर??

बांद्र्याच्या त्या बंगल्यात धाकटे साहेब समोर ठेवलेली आपल्या बंगल्याची ब्ल्यु प्रिंट पहात बसले होते. हेलीपॅड कुठे बांधावं बर? या वर्षी जर पुन्हा जास्त पाऊस पडला तर मग आपलं हेलीकॉप्टर घेऊन सगळीकडचे फोटो काढायला बरं पडेल. लोकं मूर्ख आहेत, जमिनीवरून चालत चालत पंढरपूरला वारीला जातात, अरे आकाशातून काय मस्त दिसतो तो भगवा रंग?खाली उडणारा धुराळा, स्वयंपाक करणाऱ्या वारकऱ्यांच्या चुलीच्या धुराने थोडे फोटो बिघडायची भिती वाटत होती, पण नाही … जमलं बॉ एकदाचं! ते फोटोचं पुस्तक उघडलं आणि आपली कलाकारी बघून ते स्वतःवरच खूश झाले.

आता फक्त मुंबई चे फोटो काढायचे आहेत, कुठेही काही ऍक्सीडेंट झाला, पावसाळ्यात पाणी भरलं की वगैरे वगैरे वेळी फोटॊ काढायला हेलीकॉप्टर हे हवेच!!हेलीपॅडची परवानगी नाकारताहेत हे एव्हिएशन मिनिस्ट्रीवाले- म्हणे एअरपोर्टच्या खूप जवळ आहे घर म्हणून… च्यायला, आता हा एअरपोर्ट वाशीला हलवण्याचे काम जरा मुख्य अजेंड्यावर घ्यावे लागेल, मगच हेलीपॅड बांधता येईल……
****
तेरामतीला साहेब घरीच बसले होते. समोरचा चहाचा कप खाली ठेवला, आणि ती बातमी वाचली की आता रामाने निळ्या झेंड्याला भगवी किनार लावायचं ठरवलंय म्हणे.. म्हणजे हिरवा ,केशरी (भाजपाचा) आणि निळा एकत्र झाले तर मग दोन्ही झेंड्यांमधे काय फरक राहील? काय करावं बरं?  डोळे बंद केले आणि साहेबांचा ’आतला आवाज ’ बोलू लागला . निळा रंगाचा नाही म्हटलं तरी थोडा फायदा होतोच इलेक्शनला. आज पर्यत एका नेत्याला हाताशी धरायची खेळी खेळत आलोय आपण, आता या वेळी जर तो नेताच साथ देत नसेल तर सरळ सामान्य जनतेलाच हाताशी धरू या. नेत्याचे जर फॉलोअर्स नसतील तर नेत्याला कोण विचारतं? एक काम कर, आतला आवाज म्हणाला, “दादरचं नाव बदल.. बस्स. चैत्यभुमी करा म्हणून गाजर दाखवलं  की सगळे फॉलोअर्स तुटतील त्याचे”. तसेच मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा मुद्दा आठवून दे लोकांना! आणि साहेब स्वतःशीच हसले, त्यांनी फोन घेतला आणि आपल्या एका पत्रकार मित्राला फोन लावला… म्हणाले, एक मोठी ब्रेकिंग न्युज देतोय तुला.. ताबडतोब ये इकडे!!..

*********

दादरच्या एका प्रशस्त फ्लॅट मधे समोर सुरु असलेल्या भल्यामोठ्या प्लाझ्मा टिव्हीवर एक सिनेमा पहात बसले होते ते. हातात रिमोट होता, बाजूलाच दोन खास माणसं पण बसली होती.  कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ती दोघंही साहेब कधी बोलतात ह्याची वाट पहात शांत बसली होती. साहेबांचा आतला आवाज बोलत होता, अशी  किती टाळकी आहेत तिकडे त्या रामुच्या मागे? काही फरक पडणार नाही त्या रामुमुळे. तसाही निवडणुकीला अजून बराच वेळ आहे, रामभाऊ तो पर्यंत कदाचित थोडा निवळेल. समोर ठेवलेला कागद त्यांनी उचलला, आणि त्यावरची एक माहिती ऐकून त्यांचे डोळे लकाकले. त्यात लिहिलं होतं, ” एक मोठी इमारत आहे रामूची बांद्ऱ्याला” कुठून आणले इतके पैसे म्हणून विचारायचं की झालं, सगळी हवा फुस्स होईल..! दुसरं म्हणजे तेरामतीकरांच्या कॉमेंटचं उत्तर काय द्यायचं बर??.  सोप्पं आहे, आतला आवाज म्हणाला ”  म्हणजे हजाराच्या नोटांवर छापा म्हणाव फोटो बाबांचा “!!केंद्रात सरकार तुमचंच आहे नां, सहज शक्य आहे ते.तसेच म्हणाव, की तेरामतीचं  नांव बदला आणि…. ….!! साहेब उगाच स्वतःशीच हासले. त्यांनी समाधानाने मान डोलवली आणि टीव्ही बंद करून दोघांकडे वळले. जा रे , जरा खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना आत बोलाव………..!!

राजकुमार एकटेच बसले होते. आता चाळीशी ओलांडली आपली तरीही लग्न होत नाही  याचा आनंद मानावा की दुःख हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. किती कंटाळा येतो नाही?मतांसाठी, कुठेतरी झोपडीत जाऊन रहा,प्लास्टीकच्या घमेल्याने माती वाहून न्या. कोणातरी दलीत माणसाच्या झोपडीत जाऊन जेवा आणि तिथेच रहा. आतला आवाज एकदम मोठ्याने किंचाळला.. अरे किती दिवस हे असे जगणार? या पेक्षा इंग्लंड किंवा इटली काय वाईट आहे?? सगळं काही चांगलं आहे तिकडे, बार , पब्ज, आणि अजून बरंच काही.. हे नेतेगीरीचे गुण आपल्यात खरंच आहेत का हा प्रश्न पण नेहेमीच छळत असतो आपल्याला.पण केवळ ममा म्हणते म्हणून हे सगळं करावं लागतं. तेवढ्यात मांसाहेबांची हाक आली, आणि भानावर येऊन आपला खादीचा शर्ट च्या सुरकुत्या नीट करत ते  आतल्या खोलीकडे निघाले.
*****
मांसाहेब एकट्याच बसल्या होत्या, पूर्वी त्या पांढऱ्या टोपीवाल्याच्या वेळेस शेपूट घालून शरण जावे लागले होते. आता या वेळेस हा भगवे कपडे वाला पण तोच खेळ खेळतोय.  मागच्या वेळेस तो  अशाच उपोषणाला बसला होता, तेंव्हा मोहनने व्यवस्थित केस हॅंडल केली नाही म्हणून प्रकरण चिघळलं. या वेळेस काय करावं बरं?? आतला आवाज थोडा मोठ्यानेच म्हणाला.. ” अटक कर त्याला, सांग मोहनला त्याला अटक कर म्हणाव, म्हणजे सगळं कसं शांत होईल” . मांसाहेब समाधानाने हसल्या, आणि त्यांनी फोनचा नंबर फिरवणे सुरु केले… मोहनचा नंबर….

****

काय  हा  तुझा अवतार? बाई प्रमाणे अंगात सगळे बायकांचे कपडे काय, अंगावर ओढणी काय.. अरे काय झालंय हे  तुझं? त्यांचा आतला आवाज म्हणत होता,  या पुढे जे काय करायचं असेल ते थोडा विचार करून… नाही तर या वेळेस फक्त कपडे बदलले,  पुढल्या वेळेस ……………!!!

कोणी काही म्हणा,  मान्य करा किंवा करू नका, पण आतला आवाज हा नेहेमीच  बाहेरच्या आवाजावर ताण असतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

52 Responses to आवाज..

 1. काका…जबरदस्त …चाबुक लिहल आहे.

 2. खरंच, हे सगळं शब्दनशब्द खरं आहे…सगळ्या वरवरच्या ढोंगीपणावर, हा आतला आवाज ताण असतोच आणि तो कधी खोट बोलत नाही 🙂

  मस्त झालीय पोस्ट !!

  • तसं नाही सुहास,
   वर एक उदाहरण पण दिलंय, सिगरेटचं.. आतला आवाज पण बरेचदा नको त्या गोष्टी करायला प्रवृत्त करतो. प्रत्येकाच्या मनात अशा वाईट गोष्टी पण येतच असतात, म्हणून म्हणतो , आतल्या आवाजाचा पण पूर्ण विचार करायलाच हवा.

 3. अगदी खरंय… आतला आवाज हा खरं तर मनातून आलेला आवाज असतो… पण माहित नाही का? माणूस मनाचा आवाज न ऐकता, ह्याचं त्याचं ऐकून का वागत असतो…

  • वैभव
   आतला आवाज- मनातून स्वतःला एखाद्या गोष्टी बद्दल काय वाटतं यावर कॉमेंट करत असतो. प्रत्येकाच्याच मनात असा कल्ला सुरु असतो.एक बाकी आहे बहूतांश वेळा जे वाटतं ते योग्य असतं यात संशय नाही.( वाईट सवयींच्या बाबतित सोडून)

 4. आका says:

  आतला आवाज खुपच आतला वाटला…
  चांगला टोला मारलाय काका.. 😉

  • निनाद
   खरं सांगायचं तर नेत्यांच्या अशा घोषणा किंवा स्टॆटमेंट्स ऐकले की त्यांच्या मनात काय असेल हे असं बोलतांना? किंवा त्यांना काय आम्ही लोकं मूर्ख वाटतो का?? हा विचार नेहेमी येतो माझ्या मनात.

 5. Nikhil Bellarykar says:

  lay bhari !

 6. काका.. जबरा आहेत आतले आवाज! एकदम चाबूक.. मला धाकटे साहेब आणि राजकुमार स्पेशली आवडलं! 🙂

  • विद्याधर
   धाकट्या साहेबांबद्दल तर अजूनही बरंच काही लिहायचं होतं, पण मोठा झाला होता लेख म्हणून आवरतं घेतलं.

 7. महेंद्रजी! अगदी जबरदस्त पोस्ट आहे! एकदम आवडली! नेतेमंडळींचे आतले आवाज सुपर्ब! :))

 8. दुर्दैवाने सगळे आवाज आतले असले तरी खरे आहेत आणि ते सामान्य माणसाला देखील ऐकू येतात इतके लाऊड आहेत. आपल्याला ते ऐकू येवून सुद्धा आपण बहिऱ्यासारखे जगतोय कारण आपल्या आतला आवाज आपणच दाबून टाकलाय.

  • सिद्धार्थ
   डोकं गहाण टाकणं हा वाक्प्रचार आहे- आपलं डॊकं गहाण टाकल्यासारखं आपण वागतो, मग काय? ते करतील ते योग्य, ते म्हणतील ते खरं असं वाटायला लागता. व्यक्ती पूजा इतकी जास्त झाली आहे आपल्या मधे की एखाद्याला नेता मानलं की त्याच्याविरुद्ध एकही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नसतो आपण.

 9. Gurunath says:

  मी जो तो आवाज त्या त्या शैलीत ऐकण्याचा प्रयत्न केला अन गेला दिड तास एकटाच हसतो आहे मी, पण तुमचे अंतर्भुत अवलोकन खरेच खुप खरे आहे, माझा असला आवाज मी कधीच नाही ऐकला आजपर्यंत पण एक आहे, रंगदे बसंती मधले ते अतिशय खर्जातला स्वर असलेले “सरफ़रोशी की तमन्ना” ऐकले (फ़्लॅशबॅक मधले आहे ते गाणे) की कुठेतरी जाणवते असाच असेल तो आवाज, लहान असताना बरेच वेळी मी खुप किरकिर केली की आमचे बाबा मला छातीशी धरत व खड्या आवाजात पुर्ण अनुस्वार उकार मात्रांच्या सुस्पष्ट उच्चारांत “रामरक्षा” म्हणत असत, ती रक्षा मी त्यांच्या मुखातुन नाही छातीतुन ऐकत असे, तो आवाज पण असाच असे धीर-गंभीर, अनाकलनिय पण खरेच रिलॅक्स करणारा…. हे आतले आवाज खरेच फ़ार फ़ार भारी असतात म्हणुनच कदाचित म्हण पडली असेल “ऐकावे जनाचे पण करावे मनाचे”

  • अरे ती हेलीकॉप्टर मधून वारी चे फोटो काढण्याची बातमी वाचली, आणि जाम सटकली होती माझी. इतकी आवड होती तर मग त्या वारीबरोबर एक दोन दिवस तरी पायी चालत जायला हवे होते, आणि नंतर मग फोटो वगैरे काय काढायचे ते काढ ! पण सामान्यांच्या वरचे आपण कोणीतरी आहोत म्हणून हे असं वागायचं आणि सामान्यांनी ह्यांना डोक्यावर घ्यायचं!!!!!! कठीण आहे.

   • Gurunath says:

    आमची यु.पी.एस.सी ची पोरे स्टडी सर्कल मधली फ़ार मिष्किल अन मार्मिक असतात, एकाने त्यांचे “महाराष्ट्र माझा” हे हवाई फ़ोटोंचे पुस्तक पाहीले अवलोकले अन त्याच्यावर कंसात महाराष्ट्र माझा (सातव्या आस्मानातुन!!!!) असे लिहिले होते लॉल्झ!!!!!

 10. pranjal kelkar says:

  Due to this inner voice our mahatma give 56 crores to our closest friend, while separation 😀
  Due to inner voice our graet PM send Peace force to Shri Lanka 😀
  Due to inner voice BABA seat for FAST!!!!!!!
  Due to inner voice one MP said ‘LADENJI’
  Due to inner voice same MP said BABA is ‘THIEF’
  😀
  Due to this OUR INDIA IS GREAT
  😀 😀
  & last
  Due to inner voice MAHENDRAJI write this post

  • या आतल्या आवाजामुळेच हे पोस्ट लिहीणे झाले.
   ब्लॉग वर स्वागत प्रांजल..
   प्रतिक्रियेकरता मनःपूर्वक आभार.

 11. काका, प्रचंड प्रचंड आहे ही पोस्ट.. एकदम कडक.. तेरामतीच्या साहेबाचा आतला आवाज एकदम परफेक्ट आणि तितकाच कर्णकर्कश !!

  • हेरंब
   त्यांचा आतला आवाज त्यांना प्रत्येक वेळेस कुठल्या न कुठल्यातरी लफड्यामुळे बाहेर काढत असतो. एकदा काय झालं की साहेब बसले होते असे एकटेच. आयपीएल मधे सोनीटीव्ही शी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, पुराव्या सहीत बातम्या पेपर मधे छापून येत होत्या. त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले, ” अरे तुझी सत्ता आहेच ना पुण्य़ाच्या पालिकेत, उडव त्या दादोजींच्या पुतळ्याला, काढून टाक रात्री मधे ” आणि काय? दुसऱ्या दिवसापासून सगळे लोकं हे पुराव्यासहित पुढे आलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण विसरले!

 12. Aparna says:

  काका मस्त पोस्ट आहे. सच्ची. आतला आवाज आहे आणि तो आवाज देतही असतो पण सगळेच त्याचं ऐकत का नाहीत हा प्रश्न आहे. ….

 13. Smita says:

  atishay marmeek depict zalet he atale avaaz . puN ya sagaLya netyancha atala avaz asato ka kharach?? .
  suruvateela vaTala noise pollution var lihitay aaj, tyamuLe mee jara sarasavun vachat hote farach common problem ahe ha sahya shaharanmadhala..pun madhye ekdam vishayantar zalyasarakha vaTala. taree point is well taken as always!

  • स्मिता
   अगदी खरं ऒळखलं. हे पोस्ट अर्धवट लिहून ठेवलं होतं ते काल पुर्ण करायला घेतलं, आणि नकळत लिखाणाचा विषय बदलला गेला. पहिलं अर्ध पोस्ट चार महिन्यापूर्वी लिहिलेले असावे… 🙂 धन्यवाद..

 14. प्रणव says:

  काका, अहो काय बोलू…
  एकदम झणझणीत पोस्ट आहे… एकदम कडक
  १० पैकी १०

 15. aruna says:

  `जबरी कोमेंट. पण मला वाटतं कि खरा आतला आवाज जर या सर्वांनी ऐकला तर हे शरमेनी काळे ठिक्कर पडायला हवेत.

  • अरुणा
   शरम, लाज, वगैरे कशाला म्हणतात हे जर यांना माहीत आहे का?? सगळे एकजात बेशरम आहेत. प्रत्येक वेळी आपल्य पोळीवर तूप कसे ओढून घेता येईल याकडे लक्ष असतं सगळ्यांचं!

 16. महेश कुलकर्णी says:

  जबरदस्त. मस्त कडक.

 17. Vinay says:

  छान लीहल आहे. खूप दिवसनि ब्लॉग वाचला.
  विनय

  • विनय
   अरे हे लोकं अगदी डोक्यात जातात, यांचे स्टेटमेंट्स पेपरला वाचले की खूप चिडचिड होते. मग हे असं कधीतरी बाहेर येतं..

 18. sanket says:

  प्रचंड आवडली ही पोस्ट.. एकदम सही लिहीलं आहे.

 19. sumedha says:

  महेंद्रजी , आजची पोस्ट वाचून तंबी दुराई ची आठवण झाली. शालजोडी आवडली. आणि तुमच्या सिगारेट सोडण्याचे कौतुक वाटले.

  • सुमेधा
   आता झाली त्याला पण २० च्या वर वर्ष! सोडली बाकी खरी. कशी त्यावर एक पोस्ट लिहायचंय!

 20. अभिषेक says:

  पोस्ट भारीच! आणि प्रतिक्रिया पण! (माझी आपली साधीच!)

 21. Santosh says:

  Kaka!!!!
  Atala awaj aikawun… “Antarmukh” kelat ekdum… Chaan… Ekdum Chaaan 🙂

 22. प्रसाद थरवळ says:

  काय काका… कुठून सुरवात आणि कुठे शेवट……???? खरंच…. काय वाट्टेल ते…….!! 🙂

  • एका बैठकीत लेख लिहिला नाही की असं होतं. पहिला अर्धा लेख सहामहिन्यापूर्वी लिहून ठेवला होता.. उरलेला आता पूर्ण केला. म्हणूनच काय वाटेल ते झालाय. 🙂

 23. geetapawar says:

  kaka aatla aawaj aaplyala khup kahi janiv samjun deto…………..aani te karav mhnun aapan nerny ghetooooooooooooooooooo.thanks nice post..gn8 kaka…

 24. खास तुझ्या स्टाईलने ठेवणीतले शालजोडे मारलेस. आवड्या रे आवड्या.

  हा आतला आवाजच काय तो कर्ताकरवीता. कोणालाच तो चुकला नाही आणि चुकवता येतही नाही.

  • खरंय तुझं. दोन भागात लिहिल्याने पोस्ट जरा विस्कळित झाले आहे. पहिला अर्धा भाग काढून टाकावा का? हा विचार करतोय.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s