आजी

पूर्वीच्या काळी आजी म्हणजे घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. तिला ’मोठी आई’  म्हणायची पद्धत होती विदर्भात. कारण काय, तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती  असायची, त्या मधे  आपल्या आईला आई म्ह्टल्यावर    वडलांची आई म्हणजे ’मोठी आई  .

तिच्या कडे काय नसायचं? अगदी डोकं दुखतंय, थांब सुंठ उगाळून देते म्हणणारी आजी, पाय लचकला? आंबे हळद उगाळून लावून देणारी  आजी , बाजार आणायचा? थांबा म्हणून  कंबरेच्या केळातून( नऊवार लुगडं  नेसताना पोटाशी केळा प्रमाणे गॊळा होतं, त्या मधे पैसे ठेवायची आजी ) किल्ली  किल्लीने कपाट उघडून पैसे काढून  आजोबांच्या हातात देणारी – थोडक्यात म्हणजे काय तर आजी म्हणजे सबकुछ!! असं तिचं घरातलं स्थान असायचं ! पूर्वी घरामधे कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आजीची परवानगी घेणे आवश्यक असायचे.स्वयंपाक काय करायचा या पासून तर चिंगी साठी तो साठ्यांचा मुलगा चांगला की जोशांचा?? घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचे मत म्हणजे फायनल मत असायचं.आजोबा पण, ” अहो, ऐकलंत कां, …. म्हणून शेवटचा कौल आजीचा घ्यायचे.  आजी शिवाय घरातलं पानही हलत नसे.

मुलांवर संस्कार करण्याचे काम पण  तिचेच असायचे. मग ते सकाळी उठल्यावर श्लोक वगैरे म्हणणे असो, की रात्री बे एकं बे, ते तीन दाहे तीस पर्यंत मुलांकडून पाढे, रामरक्षा वगैरे झोपण्यापूर्वी म्हंटले की नाही या कडे लक्ष देण्याचे काम   पण तिचेच ! मुलांना शिस्त लावणे हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्या शिस्तीच्या बडग्याखाली त्यांचं लहानपण कोमेजून जाऊ नये म्हणून  काळजी घेण्याचं काम पण तिचंच असायचं.  एखाद्या वेळेस   आई मुलावर ( म्हणजे तिच्या नातवावर) कुठल्याही कारणाने  रागावली  किंवा मारायला लागली,  की त्याला   त्याला लगेच पदराआड घेणारी  आणि मार चुकवणारी पण   आजीच असायची.

संध्याकाळी बाहेरून खेळून आल्यावर आधी हात पाय धू मग नंतर घरात ये असं म्हणणारी आजी, देवाला नमस्कार करून रामरक्षा म्हणून झाल्यावर तिला नमस्कार करायला गेलो की ” आई बाबांना नमस्कार केलास की नाही?” या जगात त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नसतं राजा! ” असं सांगणारी आजी!  रात्री झोपण्यापूर्वी पुराणातील कथा सांगणारी आजी.. आणि त्याच बरोबर आमच्या आजीच्या उतार वयातही तिच्या शब्दाबाहेर न जाणारे वडील पाहिले की आज आमची मुलं काहीतरी मिस करताहेत असे वाटते.

एकदा आजीला म्हणालो होतो, की जर ’आई- बाबा’ या जगात सगळ्यात मोठे आहेत, तर मग आई बाबा जिवंत असतांना पण आरतीच्या शेवटी आपण “त्वमेव माता च पिता त्वमेव…………..” असं का म्हणतो? देव हा देव आहे , त्याला आई – बाबा का बनवायचं?? तूच तर नेहेमी म्हणतेस, की जगात फक्त एकदाच आई-वडील मिळतात आणि ते देवापेक्षा पण मोठे असतात – मग हे असं कां?” त्यावर आजीने दिलेले उत्तर आजही लक्षात आहे, ” अरे ते आपण देवाला तू माझ्या ’आई-वडिलांसारखा ’ माझी काळजी घे म्हणून घातलेले साकडे आहे हे.  तुझी काळजी  कोण घेतं?  तुझे आई-बाबाच घेतात ना? मग त्या देवाची  आई-बाबांशी तुलना करून आपण आईवडीलांना मोठेपणा देतोय , देवाला नाही…..” हे विसरलेले वाक्य परवा पुन्हा आठवले आणि मग आजी आठवली.. आणि हा लेख लिहायला घेतला.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर व्हायची म्हणून आजी व्हायचा मान पण फारच लवकर मिळायचा. वयाच्या ४० च्या  दरम्यान   स्त्री आजी व्हायची, पण हल्ली तसे नाही- वयाची २५शी ओलांडल्या शिवाय काही मुली लग्न करत नाहीत. त्यामुळे वयाची पन्नाशी ओलांडल्या शिवाय  मुलींच्या आयांना आजी होण्याचा चान्स मिळत नाही. करीअर , लग्नाचं वय, सगळं काही बदललं आहे.

वयाची ५०शी आली की आजी होण्याचे वेध लागतात. कोणी आपल्याला काकी म्हंटलं की चिडचिड करणाऱ्या मध्यमवयीन स्त्रिया पण आजी होण्याची चाहूल लागली की एकदम बदलून जातात. वेगळ्याच जबाबदारीची जाणीव होते, आणि मग “आपल्या वेळेस” सासुबाईना / आजे सासुबाईंनी  किंवा आईने काय काय केले होते याची उजळणी सुरु होते.  फक्त  नऊ वारी लुगड्याची पाच वारी साडी झालेली असते, पण मन तसंच हळवं असतं!

मला शाळे मधे असतांना ’य गो जोशी’ यांची दुधावरची साय ही कथा होती. त्यातलं आजीचं एक वाक्य, ’दुधापेक्षा दुधावरच्या सायीलाच जास्त जपावं लागतं’ हे वाक्य अगदी शब्दशः खरं ठरवणारी व्यक्ती म्हणजे आजी असायची. पूर्वीच्या काळी घरं जरी लहान असली, तरी मनं मात्र मोठी होती, म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती टिकलेली होती. आजकाल नेमकं याच्या उलट झालेलं आहे, लहान घर आहे, या सबबीवर वेगळं रहाणं  सुरु होतं. दोन मुलं असली, की आधीपासूनच दोन घरं विकत घेऊन ठेवण्याकडे वडिलांचा कल असतो, पुढे मग भांडणं कशाला हवीत मुलांमधे??  पण वेगळं रहाण्याचं खरं कारण मात्र वेगळंच काहीतरी असावं असं मला वाटतं. विभक्त कुटुंब पद्धती हा विषय नाही, फक्त लिहीण्याच्या ओघात आले म्हणून लिहीले आहे .

आजकालच्या दिवसात विभक्त कुटुंब पद्धती मुळे आजी – आजोबांचा सहवास तर खूप कमी झालेला आहे. याचं एक कारण म्हणजे आजकालचे आजी-आजोबा हे उच्च विद्याविभूषित, आणि चांगल्या मोठ्या पदावरून  निवृत्त झालेले असल्यामुळे , मुलांवर  ते अवलंबून नसतात. त्यांचं आपलं स्वतःचं एक विश्व असतं, पूर्वीच्या आजी -आजोबांप्रमाणे मुलांच्या संसारात ते स्वतःला अडकवून घेण्यासाठी  बरेचदा  तयार नसतात. दुसरं कारण म्हणजे मुलं कुठल्यातरी मोठ्या शहरात, दुसऱ्या देशात रहायला गेलेली असतात, मग सारखे तिकडे जाऊन रहाणे एक तर परवडत पण नाही, किंवा कंटाळवाणे पण होते.

एखाद्या लहान गावात पुर्ण आयुष्य गेल्यावर मग त्या गावात बरेच सोशल कॉंटॅक्ट्स तयार होतात. मग हे सगळं सेट झालेलं आयुष्य सोडून   शहरात जाऊन/ किंवा परदेशात जाऊन मुलाकडे रहायचं काम पडलं की  तिकडे कंटाळवाणं होणं हे साहाजिकच आहे.याचा अर्थ हा नाही की हल्ली आजी आजोबांचं मुलांवर , नातवांवर प्रेम नाही, तर प्रेम हे असतंच- दुधावरची साय नेहेमीच जास्त प्रिय असते दुधापेक्षा! जितका वेळ संपर्कात असतात  तितक्या वेळात नातवांच्या बरोबर घालवलेल्या वेळाच्या आठवणी   मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवतात- एकटे असतांना  पुन्हा  अनुभवता यावं म्हणून.

माझे आजोबा कलेक्टर होते, इंग्रजांच्या काळचे आय ए एस . त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आजी एकदम खचून गेली होती. तिच्या आयुष्यातला विरंगुळा म्हणजे नातवंडंच होती. सकाळी आंघोळ करुन आली की मग पिअर्स साबणाचा वास घरभर दरवळायचा.  आंघोळ झाल्यावर तो साबण आपल्या लुगड्याला पुसून ठेवायची, त्यामुळे तिच्या कपड्यांना पण एक मंद मंद सुगंध यायचा पिअर्सचा.  आजोबांचा मृत्यु माझ्या जन्मापूर्वी झाला, ती नेहेमी म्हणायची की जर तुझे आज आजोबा असते तर खूप कौतूक केलं असतं तुझं. अजूनही पिअर्स साबणाचा वास आला की आजीची आठवण येते.

आजकालची नऊवार लुगड्यातून पाच वार साडी किंवा पंजाबी ड्रेस मधे  मधे आलेली आजी पाहिली की एक लक्षात येतं,वरचे कपडे जरी बदलले असले, तरी मानसिकता तशीच आहे, आपल्या नातवंडांवरचं प्रेम तसंच आहे. पण नातवंडांचे प्रेम तितकंच आहे का?? आजकाल आजी जेंव्हा घरी येते, तेंव्हा मुलं पण एकदा नमस्कार वगैरे करून झाला की आपल्या कामाला लागतात. आजी- अजोबांचं अस्तित्त्वच त्यांच्या लेखी फारसं महत्त्वाचं नसतं. फक्त त्यांनी काही विचारलं, तर उत्तरं द्यायची बस्स.. इतकंच.. हे असे आजी- नातवंडांचे संबंध पाहिले की खरंच वाईट वाटतं, आणि त्या माऊली करता डोळे भरून येतात!

(सारीका खोतचे खास आभार, तिच्यामुळेच हा लेख लिहिला गेला )

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

69 Responses to आजी

 1. parag says:

  very nice
  I like it
  Memories my grandmother
  Thanks.

 2. सुंदर हळवा झालाय लेख.. खूप आवडला

  • आनंद
   थोडा जास्त हळवा झालाय खरा, पण लिहीण्याच्या ओघात जे काही मनात येत गेले ते लिहीत गेलो. नंतर काही पॅरीग्राफ काढून टाकायची पण इच्छा झाली होती, पण तो पर्यंत दोन कॉमेंट्स आल्याने काही बदलले नाहीत.

 3. kanchan says:

  खरच खूप छान झाला आहे लेख…. आज आजीची आठवण आली… मला पण आजीनेच देवाचे पुस्तक वाचण्याचे वेड लावले होते, तिच्यामुळेच देवाची ओढ लागली मला, तिच्या हट्टामुळेच पारायण करायची. आज मी देवाची सगळी पुस्तक जपून ठेवली आहेत, आजीची आठवण आली कि वाचायला. खरच माझी आजी पण खूप छान होती, मी तर मुद्दाम भांडण करायची तिच्याशी. तिच्या गावठी शिव्या ऐकायला खूप आवडायच्या म्हणून… 😛

  • कांचन
   चातुर्मासाच्या पुस्तकातल्या सगळ्या कहाण्या मला माहिती आहेत, गोष्ट सांग म्हटलं की एखादी कहाणी किंवा महाभारतातली, रामायणातली गोष्ट सांगायची ती. आजी म्हणजे आमच्या पिढीचा एक चालता बोलता एनसायक्लोपेडीया असायचा. लहानपण पूर्ण आजी सोबतच गेल्याने एक वेगळा ऋणानुबंध निर्माण होतो.

 4. खूप हळवं व्हायला झाले पोस्ट वाचून.

  • सिद्धार्थ,
   लिहितांना पोस्ट इतकं हळवं होईल असं वाटत नव्हतं. काही दिवसापूर्वी एक अपडेट वाचला होता,

   “आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींचा नेहमी आदर करावा
   १) आपण आयुष्यात जिंकावं म्हणून आपल्यासाठी सतत हारणारे……..वडील.
   २) आणि आपल्या हारण्यात आपली जित पाहणारी…….आई.”
   हा अपडेट आणि नुकताच सारिकाचा अपडेट (फेबु वरचा) एकत्रित पणे वाचल्यावर हे पोस्ट लिहावंसं वाटलं.

 5. अगदी माझ्या अमरावतीच्या गावी घेऊन गेलात काका. माझी आजी किती लाड करायची माझे सांगू, एक तर आम्ही मुंबईला असायचो, वर्षातून एकदा भेट व्हायची सुट्टीमध्ये. आज तुम्ही त्या आठवणींना उजाळा दिलात..

  सुंदर पोस्ट झालीय. मनापासून आवडली !!

  • सुहास
   आता जेंव्हा आपल्याला ’रम्य ते बालपण’ असे म्हणावेसे वाटते- आणि बालपण आठवते, तेव्हा लक्षात येतं की आपण मोठं झालोय.

 6. heramboak says:

  अप्रतिम लेख !! माझ्या आजीची प्रचंड प्रचंड आठवण आली 😦

 7. महेश कुलकर्णी says:

  सुंदर लेख, मस्त,आजीची फार आठवण येते,

 8. Avinash Borase says:

  khupach sundar lekh.Me aaj 35 varshancha ahe ani mazhi aaji ajun thantahanit ahe. kharach aajiche prem me changle anubhavale ahe.

 9. ketaki says:

  खूप खूप छान. मी कालच माझ्या आजीला भेटून आणि तिच्याकडून खूप लाड करून घेऊन आलेय. त्यामुळे मला जरा गहिवरूनच आलं म्हणा ना ही तुमची पोस्ट वाचून..
  आमच्या घरी तर माझी पणजी (वय वर्षे १०२) पण होती मी कॉलेज मध्ये असताना.माझे आणि भावाचे जाम लाड करायची. तिची पण आठवण झाली एकदम.

  • केतकी,
   आजोळ आणि आजी दोन्ही गोष्टी मिळायला फार नशिब लागतं.खूप छान वाटलं पणजी बद्दल वाचून. माझी पणजी पण मी पाहिली आहे. ती पण साधारण ९७ ची होऊन मग गेली होती. प्रतिक्रिय़ॆ साठी आभार,.

 10. प्रणव says:

  काका,
  खुप खुप धन्यवाद्, आजीची आठवां आली. सांगलीला घरी गेल्यावर में तुमचा पोस्ट नक्की माझ्या आजीला दाखवीन.
  नेहमीप्रमाणे सुंदर पोस्ट…
  प्रणव

  • प्रणव,
   ह्या पोस्टचा मुळ उद्देश हा नातवंडांना पण आजीच्या प्रेमाची जाणीव करून देणे हा होता. तो पुर्ण झाल्याचे बघुन समाधान वाटले. धन्यवाद.

 11. umesh says:

  Thank you 🙂

 12. अप्रतिम..
  तसं आजी ला विसरणं शक्यच नाहीं.. इतकं केल आमच्या आजीनं आमच.. आई जॉब करायची आणि आम्ही दिवस भर आजीच्याच छत्र छायेत आणि म्हणूनच तिच्या संस्कारात राहायचो..
  मन अगदी हळवं झाल पोस्ट वाचून..

  • अमित
   नशिबवान आहात . ह्या पोस्ट मधे आजकालचे आजी- नातवंडांचे नाते तुटत चालले आहे, कारण दोघंही फार तर वर्षातले पंधरा दिवस किंवा एक महिनाभर एकत्र रहातात, लहान घरं, विभक्त कुटुंब.. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे हा. प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते, मग त्या साठी नात्याचा बळी गेला तरीही चालतो. हे असं झालेल लक्षात आल्ं हे पण एक कारण आहे या पोस्टला लिहीण्य़ाचे. धन्यवाद…

 13. प्रसाद थरवळ says:

  काका खरंच पाणी आणलंत डोळ्यांत… आजीची जागा वेगळीच आहे आयुष्यात.. ती पोकळी कोणीही भरू शकणार नाही…!

  • प्रसाद
   खूप नाजूक नातं असतं ते. ज्याने अनुभवले असेल त्यालाच समजू शकतं! सहज विचार आला मनात, की आजकाल काय गमावलं आहे आपण?? आजीच्या गोष्टी गेल्या, त्या जागी हॅरी पॉटर ट्वाइलाईट आले, आजीच्या गोष्टी ऐकायला नको असतात, त्या ऐवजी ट्वाईलाईट घेउन बसतात समोर मुलं.

 14. Pooja Muddellu says:

  khoop chaan zala aahe lekh kaka.
  tumacha postchi me niyamit vaachak aahe.tumhi varnan kelyasarkhich aahe mazi pan aaji
  thank you so much tila me nakkich vachun dakhaven

  • पूजा
   ब्लॉग वर स्वागत.. अवश्य वाचून दाखवा. खूप बरं वाटलं तुमची प्रतिक्रिया पाहून. धन्यवाद.

 15. खूप खूप आवडला तुमचा लेख…धन्यवाद…इतका छान लेख लिहिल्या बद्दल…असे वाचनीय आणि भावनिक लेख खूप कमी वाचण्यात येतात आजकाल…आणि तुम्ही प्रत्येक comment ला reply देता हे अधिक भावलं…

  • डॉ.सोमेश,
   ब्लॉग वर स्वागत. तुमच्या सारख्या लोकांचे प्रोत्साहन आहे म्हणून अजूनही लिखाण सुरु आहे. तुम्ही लोकं इतकं आवर्जून प्रतिक्रिया देता, मग उत्तर तर द्यायलाच हवं नाही का??प्रतिक्रिये साठी मनःपूर्वक आभार.

 16. Santosh says:

  Mala pan Aaji cha dokyawarun firnara haat athawala 😥

  Thanks!!!

  • संतोष
   आजी ही विस्मृती मधे जाऊच शकत नाही. आणि त्या हाताचा स्पर्श कायम लक्षात राहातो. .

 17. shubhalaxmi says:

  mala aaji khup athavte kahi divsanpasun, kontyana kontya lahan goshtivarun………
  dole sarkhe bhartat. tichya kushit shirun basne mala khup aavdayche pan ata ti nahi…………..
  khup chan ahe kaka sarvana tumhi ek veglyach vishwat gheun gelat thanx
  by tc

 18. बेस्टच.
  ह्यावर काही उत्तरच नाही.कितीही इच्छा असली तरी असे कुटुंब आता काही शक्य नाही.कुटुंबातल्या सगळ्याच माणसांच्या परीभाष्या बदलल्या आहेत.प्रत्येकाचा आपल्या आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला आहे.

  • हे जरी खरं असलं तरीही, आहे त्या परिस्थितीत नाते संबंध आणि त्यातले नाजूक भाव पण जतन केले गेले पाहिजे. तुम्ही जे वर लिहिलं आहे,अगदी तेच मी पण म्हंटलंय, प्रतिक्रियेसाठी आभार,आणि ब्लॉग वर स्वागत.

 19. शुभलक्ष्मी
  बरेच दिवसांनी कॉमेंट दिलीत. मनःपूर्वक आभार.

 20. भाऊ, वाचता वाचता मी आजीच्या आठवणीने चांगलच रडून घेतल. घरी कोणी नव्हत याचा पुर्ण फायदा घेतला. ज्यांना मोठ्ठ होत पर्यंत आजी असते ते केव्हडे नशिबवान असतात. माझ्या दोन्ही आज्या फार लवकर देवाघरी गेल्या त्यामुळे मला त्यांच फार प्रेम मिळालच नाही.
  लेख फारच छान लिहीलाय.
  दिनेश.

  • तुमची प्रतिक्रिया पाहून खरंच हा लेख लिहिल्याच चिज झालं असं वाटतं! नातेसंबंधातली विस्कटत जाणारी वीण लिहिण्याचा उद्देश होता. शेवटचा पॅरीग्राफ पाहिल्यास लक्षात येइल. अभिप्रायासाठी धन्यवाद..

 21. tanks mala mazya mothya aaichi punha yekada aathavan karun dilybaddal.

 22. geetapawar says:

  kai sangu aji hi kiti chan aaste kiti goad aaste, daat nslel aaste tari ti sunder watat ,,…
  devache mantra jaap karun gharla prapanchala raksha kar aashi ishvra charni vinavni karte,,,,,, me majy aaji mle aaj he jag pahte…………………i lov my aaji…… thanku kaka… nice post.

  • गीता
   त्या साठी शब्दच अपुरे आहेत! शब्दात मांडता येत नाहीत त्या भावना तुम्ही इथे न लिहिता पण पोहोचल्या. मनःपूर्वक आभार!

 23. Smita says:

  sundar, ekdam dilse lihilay. ajee baddalchya mazya manatalya sagaLyach aThavaNee special ahet…sudaivane mazya muleelahee ajee ajobancha sahavas aNee prem bharbharun miLala. puN ata ajubajula pahate tar naveen hou ghatalelya baryach aai babanche aai vavaDeel ha additional ‘role’ karayala thoDe nakhush asataat.. aNee mug “ugach tras nako kuNala” mhNun paLanagharacha paryay shodhala jato.. ajee cha fakta dress badalalay asa mala vaTat nahee, mindset puN badalalay haLu haLu, te guntun rahaNa itaransarakhach ajeelahee aajkaal nako vaTayala lagalay.. sagaLech atmakendreet zalet, mag ajee taree poorNa apavada kashee rahaNaar? Kalay tasmain maha , dusara kay??

  • स्मिता
   खरं आहे. जीवनची समिकरणं बरीच बदलत चाललेली आहेत. पाळणाघरचा पर्याय शोधायची वेळ येते म्हणजे त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध तितकेसे दृढ नसावेत . दुसरा मुद्दा जो मी वर लिहिला आहे, जर एखाद्या वृद्ध माणसाला ३०-४० हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर तो अशा जबाबदाऱ्या घेण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य, स्वतःचे सोशल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो.
   आजकाल जबाबदारी घेतली जाते ती केवळ गरज म्हणून किंवा निकड म्हणून- प्रेमापोटी जे केलं जातं ते जबादारी नाही तर नाते संबंधातली सुंदर गुंफलेली नक्षी!!

 24. मला माझ्या दोन्ही सख्ख्या आज्या आठवत नाहीत. इतर कुठल्या आजीचा तितका सहवास नाही, त्यामुळे लळा नाही. पण आपल्या आयुष्यात आपण कशाला मुकलोय, हे केव्हातरी असं लिखाण वाचलं की लक्षात येतं.

  • अतूल
   ्धन्यवाद.. माझी आजी लग्न झाल्यावर पण होती दोन वर्ष. मोठ्या मुलीला तिचेच नांव ठेवले आहे. ती ज्या दिवशी गेली, त्या दिवशी आपली आई गेल्याप्रमाणे दुःख झाले होते. आजीबरोबरचा मोकळे पणा होता तो आई सोबत नव्हता, कुठली गोष्ट आईला सांगायची, तर आजी च्या माध्यमातून सांगितली की बरोबर व्हायची.
   आपल्या मुलांना तरी ह्याची जाणिव असावी असे वाटते . पण एकंदरीत कमी झालेले एकत्र रहाणे, किंवा संबंध या मुळे आणि मोठे झाल्यावर मुलं स्वतःच्याच विश्वात इतकी गुंतलेली असतात की त्यांची फारशी अटॅचमेंट होऊ शकत नाही आजी आजोबांशी..

 25. छानच आहे लेख…
  आजीची खूप आठवण आली वाचून…
  तिने केलेल्या खमंग मेतकुटाची चव अजून जिभेवर रेंगाळतीये…

  • गायत्री
   धन्यवाद.. तिच्या हातची चव कशी विसरु शकतो?? तिची ती स्पेशालिटी असते नाही?

 26. Gurunath says:

  आत्ताच आजोळी जाऊन आलो (औदुंबर जवळ आहे), माझे बाळ कुठे राहते गा बाई म्हणत आजी ने ह्या वयवर्षे २६ अक्षरी सव्वीस फ़क्त!!!!!!व वजन ८० किलो अक्षरी …( अहं हं ते सोडा!!!) चे तोंडावरुन गोंजारत ४ तास लाड केले (जवळ बसवुन घेतले ते परत सोडेचना!!!!!), वरतुन सर्वाधिक दुर राहणार नातू म्हणुन घरातली चिल्लरपार्टी विरोध करत कंठशोष करत असताना सुद्धा सर्वात जाड व बेस्ट गोधडी मला दिली आहे आजी ने!!!!!!!

 27. गुरुनाथ
  सही.. करून घे होईल तितके दिवस… 🙂

 28. krutika says:

  ज्यांना मोठ्ठ होत पर्यंत आजी असते ते केव्हडे नशिबवान असतात. माझ्या दोन्ही आज्या फार लवकर देवाघरी गेल्या त्यामुळे मला त्यांच फार प्रेम मिळालच नाही.
  लेख फारच छान लिहीलाय

 29. pranjal kelkar says:

  फार सुंदर लेख आहे. मनाला भिडला १०वी पर्यंत दर शनिवार रविवार आजोळी जायचो. आज्जीचा खूप लाडका होतो. सगळ्यात लहान असल्याने सर्व चुका माफ. १०वी ला असताना आजी गेली.
  खूप रडलो त्या दिवशी. आई पेक्षा जवळची होती. आजून सुद्धा आठवण झाली कि डोळे पाणावतात. पण देवाने लगेच दुसरया आजीकडे पाठवले. 😀
  डिप्लोमा नंतर इंगीनीरिंगला admission मिळाली ती माझ्या गावाला रत्नागिरीला. दुसरी आजी तिथेच होती. खूप प्रेमळ होती. इंगीनीरिंग संपवून परत आल्यावर १ वर्षांनी ती पण गेली.
  इंगीनीरिंगला असताना वडिलाच्या आईला एकदा दवाखान्यात घेऊन गेलो कॉम्पौन्देर ने आजीचे नाव विचारले. झाली गोची???? आज्जी चा नाव काय??? आपण तर नावानी कधीच हाक नाही मारत फक्त आजीच तर म्हणतो??
  ती कॉम्पौन्डेर मी वेडा आहे कि काय या नजरेनी बघत होती आणि आज्जी हसत होती. 😀
  कॉलेज ला असताना क्रिकेट खेळून आलो कि दही दुध पोहे द्यायची आजी खायला. काय चव होती, त्यात फक्त आज्जी ची माया बास.
  इंगीनीरिंग संपवून येत असताना खूप दुख: झालं होता आजीला सोडून जावं लागतंय याचं.
  लेख वाचताना दोन्ही आज्यांची खूप आठवण येत होती. आई बोलायची तू आजी साठी दुधावरची साय आहेस. कळायचा नाही काही. आज तुमचा लेख वाचला आणि आईचे शब्द परत आठवले.

  • प्रांजल
   आजी नातू हे नातं इतकं नाजूक आणि विविध रेशमी संबंधांनी विणलं असतं की त्याच्या तलम पणाची तुलना कोणाशीच करता येऊ शकणार नाही. अनुभवलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवत रहायचे इतकेच आपल्या हातात असते.

 30. हळवा आणि छान लेख ….ह्याबाबतीत मी खूप नशीबवान आहे, मी तर आजही आजीचा खूप लाडका आहे… मी शाळेत जायच्या आधीपासून मला वाचता यायचं आणि मला ते शिकवलं होत माझ्या आजीआजोबांनी…. कितपत डोक्यात गेल असेल माहीत नाही पण रामायण-महाभारताच पारायण तेव्हाच झाल होत त्यांच्यामुळे… लहानपणीच्या अनेक आठवणींची गर्दी झाली आहे आता मनात ….

  • खरा नशिबवान म्हणतात याला. 🙂 आजीआजोबांचे छत्र मिळणे म्हणजे भाग्याचे लक्षण!

 31. mau says:

  सुंदर सुंदर आणि सुंदर ..आजोळी नेउन पोचवलेत हो…माझी आजी सुद्धा खुप माया करायची.आज पुन्हा एकदा खुप आठवण आली.

 32. Shweta Nare says:

  माझी आये (आजीला आम्ही आजी असा कधीच म्हटलं नाही) infact तस्स ती आम्हा भावंडाना म्हणूच देत नसे.. आयेची आई म्हणजे गिरण आये ( माझी पणजी, ती गिरणीत कामाला होती म्हणून गिरण आये )… त्या दोघीही मला माई नि माझ्या मोठ्या बहिणीस ताई म्हणत असत… 🙂

  त्या दोघींनी शिकवलेला.. ३ चे २ टाके अन २ चा १ टाका हा नियम एका सुईची विण घालताना आम्ही आजही विसरलो नाहीत….. दरवाज्याचे तोरण, रुमाल ते स्वेटर सगळं काही अगदी त्या भिंगाच्या चष्मा पलीकडल्या अनुभवी नझरेने आम्हा दोघींना शिकवलं नि आम्हीही ते आवडीने शिकलो….. पु. ल., शांता, व. पु., वि. स. ते अगदी गीत रामायणापासून ते चांदोबा वाचनाची आवड अगदी तिच्याचकडून आम्हाला मिळाली… 🙂 🙂 तसच संस्काराचे मुळ तिथूनच आले… नि त्यात परक्यालाही आपुलकीने वागवावे हि तिची शिकवण कारण ती खानावळ चालवायची त्यामुळे जाणता असो व परका स्वतःच्या तोंडातला घास देणारी माउली होती ती… 🙂

  अगदी शुद्ध मराठी ते कोंकणी भाषेचे बाळकडू तिने पाझल आम्हाला…. आजच्या जगात राहूनही घरपण काय आहे..?? हे आम्हाला माहित आहे ते कदाचित तिच्याचमुळे… 🙂

  सगळ अगदी डोळ्यासमोरून गेल… छान वाटला हा लेख वाचून…!! 🙂

  • श्वेता
   आजीच्या प्रेमाची माया कुठेच मिळू शकत नाही. आईचा मार बरेचदा वाचवलाय आजीने.. 🙂

 33. Rakhee Ramane says:

  Aaji tu mhanje aamchya dokyaverche Chattanooga aahes tu nahi tar aamhi konich nahi

 34. ha lekh vachla tevha mala maai panji war lihilay asa waTala
  December madhe majhi aaji (tujhi vimal atya) geli…aaj ha lekh vachun tichi punha khup aathvan yetey

  • हम्म.. बराच जूना लेख आहे हा, मी पण विसरलोय काय ल्हिलंय ते या लेखात 🙂 पुन्हा वाचतो आता एकदा.

 35. Ashwini says:

  mazi ajji pan chan ahe , her age is 80 now. tila khup shikun chan job karaycha hota pan tich lagn kel ,hi ek gosht tila khup khupte. tila wachnachi ani shikshnachi khup aawd ahe. ani ti khrach khup hushar ahe. meaths, English,History, Politics are her Favourite Subjects to read and study. aaj hi honti ladhai kiti sali zali kona brobar zali tila path ahe.jari ti adhichya kalatli ahe, tri kahi babtit tiche wichar modern yacha hewa watto. khrach jar tila ajun shiku dil ast tar ti khup mothya post war asti.

 36. सर्वेश शरद जोशी says:

  आजीच्या आठवणीने हळवा झालोच पण त्यासोबतच अनेक गोष्टी जाणवल्या.

  शेवटच्या परिच्छेदात ह्या लेखाचं सार दडलंय असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये. फक्त नऊवारीचीच पाचवारी झालेली नाही, तर बर्याच गोष्टी बदलल्यात. आजची आजी सुशिक्षित आहे, माहेरची मोठी बहिण असल्यास कदाचित त्यांच्या घरातली पहिली शिकलेली मुलगी. आणि अशा अनेक गोष्टी; अनेक संदर्भ बदललेत पण तरीही आजीचं आपल्या नातवा/नाती वरचं प्रेम तितकंच तलम, मुलायम पण तरीही उबदार असंच आहे. आजच्या डबल इन्कमच्या जमान्यात प्रत्येक घरात आजी असण्याची गरज आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s