फिअर इज द मोटीव्हेटर..१

वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं होतं की आज हा दिवस पहावा लागतोय आपल्याला?

सिगरेट खरं तर त्याने सोडली होती, चार वर्षापूर्वीच. पण आज मात्र पुन्हा सिगरेट ओढायची इच्छा झाली. कशाला उगाच सोडायची सिगरेट??शेजारच्या सिगरेटच्या टपरीकडे नजर गेली, आणि त्याने एक पॅकेट  ’विल्स नेव्ही कट’ घेतली. सिगरेटचं पाकिटं पण काही उघडत नव्हतं, पानवाल्या भैय्याकडे पाकीट दिलं, आणि  त्या भैय्याने पण अंतर्ज्ञानाने जाणल्या प्रमाणे कात्रीने पाकिटावरचे पॅकिंग कापून दिले. एक सिगरेट शिलगावली, आणि दिर्घ कश घेत पुढे निघाला तो.चार वर्षानंतर पुन्हा सिगरेटचा धूर फुप्फुसात भरून घेतला, आणि रक्तात सामावून घेण्यासाठी श्वास रोखून धरला, पण किती वेळ? एक मोठा निःश्वास टाकत श्वास सोडला आणि  गिरगाव चौपाटीच्या वाळू मधे बसला.

तेवढ्यात एक माणूस हातामधे लहानशी पाउच सारखी बॅग घेऊन धावत जात होता. मागे असलेले पोलीस पण आपली सुटलेली पोट सावरत, धापा टाकत त्याचा पाठलाग करत होते.रोहन बसलेला होता ती जागा थोडी अंधारी होती. कदाचित आज असलेल्या अमावस्येमुळे आणि अजिबात प्रकाश नसल्याने अजिबात दिसत नव्हता. त्या माणसाने हातातली पाऊच रोहनच्या दिशेने भिरकावली, आणि अंधारात कशाला तरी अडखळून पडला.तो उठून उभा होई पर्यंत मागे असलेले पोलीस पण पोहोचले आणि त्याला हातकड्या घालून घेऊन गेले. तो मागे अंधाऱ्या कोपऱ्याकडे पहात पोलीसांबरोबर गेला. काय असेल बरं त्या पाऊच मधे?

रोहन देसाई. एका मोठ्या मल्टीनॅशनल फर्म मधे मार्केटींग मॅनेजर . गेल्या चार वर्षात मिळालेल्या तीन प्रमोशन्स मुळे रोहन आज त्याच्या बरोबर नोकरीवर रुजू झालेल्या  ट्रेनी इंजिनिअर्सचा बॉस झाला होता.सगळं कसं अगदी व्यवस्थित सुरु होतं. अहो, अजून काय हवं एखाद्याला? चांगली नोकरी ९ लाखाची , थोडीशी बावळट , पण  सुंदरशी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करणारी  गर्लफ्रेंड. लग्न करायचं पण ठरवलं होतं दोघांनी.पण तेवढ्यात हे आजचं हातात असलेलं पाकीट , त्याने अख्खं आयुष्यच बदलून टाकलं होतं.

सहा महिन्यापूर्वीची गोष्ट , हातातल्या पत्राकडे नजर गेली, आणि त्याच्या नजरेसमोरून आयुष्यातले गेले सहा महिने आठवले. एक दिवस ऑफिस मधे अचानक पोट दुखायला लागलं,ईतकं असह्य दुखणं होतं की त्याला, ऍंब्युलन्स बोलावून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. डॉक्टरांनी तपासण्या केल्यावर सांगितले, की ऍपेंडीक्स आहे साधा, एक लहानसे ऑपरेशन केले की झाले. काही फारशी काळजी करण्यासारखे काही नाही. ऑपरेशन झाले, काही कॉम्प्लिकेशन्स नव्हते, फक्त काही बाटल्या सलाईन, ऍंटीबायोटीक्स आणि एक बाटली रक्त, इतकच लागलं होतं त्याला. दहा दिवसानंतर पुन्हा ऑफिस मधे जॉइन झाला रोहन.  किती सोपं आहे नाही? आपल्या ऍपेंडीक्सच्या जखमेचा व्रण  फक्त शिल्लक राहीला त्या घटनेची आठवण म्हणून.

सहा महिने अजिबात काही घडले नाही असेच गेले, पण नंतर मात्र सर्दी खोकला, आणि इतर फ्लु ह्या सगळ्या आजाराने अगदी त्रस्त झाला होता रोहन.डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतली, की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, पण बरं काही वाटत नव्हतं. शेवटी सगळ्या प्रकारच्या पॅथॅलॉजीकल टेस्ट्स पण केल्या. काहीच सापडत नव्हतं. शेवटी डॉक्टर म्हणाले, आता ही शेवटची टेस्ट करू या आपण. त्याने तो कागद हातात घेतला, त्यावर लिहिले होते ’ एलीसा ’!  तो कागद उचलला आणि त्याला एकदम धक्का बसला. एलीसा  म्हणजे एड्स चेक करायला सांगतोय हा ? घाबरला, पण पॅथॅलॉजीस्ट कडे निघाला , रक्त द्यायला!

आजचे हातातले जे पाकिट होते ते याच टेस्टचे होते. त्यात दिलेला रिपोर्ट पाहिला , त्यात लिहिले होते ’एच आय व्ही’ +! सगळं जग स्वतःभोवती फिरतंय असे वाटले त्याला. कसं शक्य आहे हे? आज पर्यंत कधी आपण तसं काही केलं नाही, मग हे असं कसं झालं असावं आपल्याला??काही तरी चूक झालेली असेल बहूतेक. स्वतःचीच समजूत काढणे सुरु केले, आणि असा विमनस्क होऊन रेतीमधे बसला होता तो, पण डॉक्टरांचे शब्द, ” औषधं घ्या, बरं वाटेल” – काही खास गोळ्या आहेत एच आय व्ही च्या , त्या घेत रहा.  एच आय  व्ही झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. डॉक्टरांचे नुसते शब्द कानावर पडत होते, अर्थ काही लागत नव्हता, आणि आता तो तेच पाकीट घेऊन गिरगावच्या ह्या चौपाटीवरच्या रेती मधे बसलेला होता.

त्या माणसाने अंधारात फेकलेली ती पाऊच तिथे शेजारीच पडली होती. काय असेल बरं त्या पाऊच मधे? ड्रग्ज? पैसे? हिरे? की बॉम्ब- की जो पाउच उघडल्यावर ब्लास्ट होईल असा? कशाला घाबरायचं आता? असा विचार करुन ती पाऊच उचलली. चांगलीच जड पाऊच होती ती. दिड एक किलॊ तरी असेल सहज , मनात विचार केला आणि ती पाऊच आपल्या लॅपटॉपच्या बॅग मधे टाकून रेती तुडवत पुढे निघाला रोहन.

समोरच्या मरीन लाइन्स वरून येणाऱ्या ट्राफिकची वर्दळ सुरु होती. काही चेहेरा रंगवलेल्या वेश्या पण खास आविर्भावात आपली गिऱ्हाइके गटवण्यासाठी उत्तान पणे वागत होत्या. १५-२० कॉलेजची मुलं ” मी अण्णा हजारे” च्या टॊप्या घालून लोकपाल विधेयक झालेच पाहिजे म्हणून  घोषणा देत ओरडत जात होते. करमणूक, मौज, की समाज बदलण्याची इच्छा – जे काही असेल त्यांच्या मनात , पण दिसत मात्र असं होतं, की ती मुलं हा सगळा प्रकार एंजॉय करत होते. तिथे बसला असतांना त्याच्या मनात विचार आला की हे असे टोप्या घालून काय होणार आहे?  काहीतरी भरीव करायला हवं. तो झपाझप चालत निघाला, त्या माणसाने आपल्याकडे फेकलेल्या त्या बॅग मधे काय असेल बरं?

घरी पोहोचल्यावर कपाटातली टिचर्स ५० ची बाटली काढली- ’इट्स टाइम टु सिलेब्रेट बॉस’ चिअर्स फॉर द रिमेनिंग डेज ऑफ लाईफ’ स्वतःशीच बोलून त्याने एक चांगला मोठा पेग घशाखाली ओतला. नेहेमी पिण्याची सवय तर नव्हती रोहनला, पण आजचा दिवस वेगळा होता. अहो २८ व्या वर्षी जर तुम्हाला एक दुर्धर रोग झालाय, आणि तुम्ही आता थोड्याच दिवसाचे सोबती आहात हे समजल्यावर काय अवस्था होईल मनाची? दोन पेग घेतल्यावर पिझाहट वाल्याने आणलेल्या पिझाचा एक तुकडा उचलला आणि लॅपटॉपच्या बॅगमधली ती पाऊच काढली.

पाऊच उघडली, आणि त्यातून एक पिस्तूल, एक लांबशी नळी आणि काडतूसांचा एक बॉक्स बाहेर पडला.थरथरत्या हाताने त्याने ते पिस्तूल उचलले, आज पर्यन्त केवळ सिनेमात पाहिलेले ते पिस्तूल आज प्रत्यक्षात बघून काहीतरी वेगळं च फिलिंग येत होतं. सोबत असलेली ती नळी म्हणजे सायलेन्सर असावे, त्याने ते उचलले, आणि पिस्तुलाच्या समोरच्या नाळेवर बसवले. कुठली तरी जर्मन मेकचं होतं ते पिस्तूल.  त्याने समोर नेम धरून त्याचा ट्रिगर नकळतपणे दाबला. खट आवाज झाला पण बुलेट बाहेर निघाली नाही. म्हणजे काय? बुलेट्स नाहीत आत??

त्याने काडतूस डबा उघडला, त्यातले एक काडतूस हातात घेऊन कुठून भरायचे ते बघू लागला. पण हिंदी सिनेमात नेहेमीच रिव्हॉल्वर दाखवतात, हे पिस्तुल वेगळंच होतं. काडतूस कशी भरायची?? त्याने लॅपटॉप समोर ओढला आणि गुगल मधे टाइप केलं.लोडींग माउझर पिस्तूल.. आणि सर्च.. समोर उघडलेल्या वेब पेज वर बघून काही व्हिडीओज बघितल्यावर  त्या पिस्तुलाची रचना आणि बुलेट्स लोड कशा करायच्या ते  वाचले. हल्ली यु ट्युब वर बरेच व्हिडीओ असतात, त्यात बघून तर सगळं काही करता येतं. रोहनने   १० बुलेट्स लोड केल्या आणि पिस्तूल हातात  धरून वरचा स्लायडर सरकवून पिस्तुल लोड केले.

हातात पिस्तूल घेतल्यावर मात्र एकदम स्वतःमधे काहीतरी अमुलाग्र बदल झाल्याचे जाणवले.बाजूला पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले, आणि पिस्तुलाची नळी  नकळत स्वतःच्या डोक्यावर लावली , एक बोट ट्रिगर वर. मनात सारखे विचार येत होते, ” आता काय करायचं जगून? असं आजारी माणसासारखं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट” .  तेवढ्यात फोनची रिंग वाजली, त्याने फोन उचलला, आई होती फोन वर. आई बरोबर बोलणं झालं, आणि तो थोडा शांत झाला आणि सोफ्यावरच झोपी गेला.

*********
सकाळची वेळ. डोकं जड पडलं होतं. सोफ्यावर झोपल्यामुळे मान पण अवघडली होती.आळस देत बाथरूम मधे पळाला, सवयीप्रमाणे तयार होत असतांनाच त्याच्या मनात विचार आला, की आता ही कशासाठी मरमर करायची? आपण जगणार तरी किती आहोत असे? अजून समजा आपलं आयुष्य ५ वर्ष जरी समजलं, तरीही आपण जवळ असलेल्या पैशांवर सहज काढू शकतो. मग कशासाठी काम करायचं? लॅपटॉप उघडून रेसिग्नेशन टाईप करणे सुरु केले……. “येस!! इट्स ओव्हर!!! नाऊ ईट्स माय ओन लाईफ, नो वन कॅन बी अ  बॉस , बट मी”.

जिन्स, टी शर्ट, स्पोर्ट्स शू आणि पाठीवर हॅवरसॅक. सॅक मधे समोर असलेले पिस्तूल आणि बुलेट्स पण टाकल्या, आणि तो घराबाहेर निघाला. स्वतःचं आयुष्य पण ’द्स विधानीया’ मधल्या पाठक सारखं झालंय असं वाटत होतं रोहनला. पण काय करणार? तसच करावं का आपणही? व्हाय नॉट?? पण नको.. मनातले विचार पक्के होत नव्हते. समोर आलेल्या  टॅक्सी वाल्याला हात दाखवला. टॅक्सी थांबली आणि रोहन पटकन मागे बसला. पाठीवरची बॅग काढून त्याने सीट वर बाजूला ठेवली, आणि ड्रायव्हरला म्हणाला, की चलो माटुंगा चलना है. टॅक्सी वाल्याने रागाने पाहिले, म्हणाला, ” उतरो भैय्या, नही  जाने का है ” . दादरहून माटूंगा जाण्यासाठी टॅक्सी  मिळायला नेहेमीच त्रास होतो, कधीच टॅक्सी वाला येत नाही. उगाच रोहनने, त्याची मनधरणी केली, “अरे ले के चलो भैय्या, दवाखाना जाना है, नहीं चलोगे तो पुलीस बुलाउंगा”, पण त्या टॅक्सी वाल्यावर काही फरक पडला नाही. तितक्याच उद्दाम पण त्याने पुन्हा एकदा ओरडून सांगितले, ” अरे भाइ, नहीं जानेका बोला नां, नहीं जाएगा,  जा जाके पुलिस को बोल दे” . रोहन ला एकदम हतबल झाल्यासारखं वाटत होतं. त्याने सॅक उचलली, आणि चेन उघडून त्यातले पिस्तूल बाहेर काढले. ते पाहिल्यावर मात्र तो  ड्रायव्हर एकदम घाबरला, आणि साहब माफ करना, म्हणून टॅक्सी सुरु केली.

रोहन च्या लक्षात आलं की ह्या ड्रायव्हर मधे पडलेला फरक हा पिस्तूल मुळे होता. टॅक्सी सुरु झाली, बाजूने ” मी अण्णा हजारे” च्या गांधी टॊप्या घातलेले  लोकं जात होते. हे एक नविनच फॅड निघालंय. रोहनच्या मनात आलं , की जर  सुखदेव, भगतसींग,नेताजीं सारखे क्रांतिकारी नसते तर? रॅंंड ला जो पर्यंत उडवला नव्हता, तो पर्यंत फिरंगी कुठे कोणाला घाबरत होते? पिस्तुलाच्या मुठी वरची पकड किंचित घट़्ट झाली, नकळत चेहेऱ्यावरचे स्नायू आक्रसले गेले, डोळ्यात रक्त उतरले. तेवढ्यात टॅक्सीवाल्याने टॅक्सी थांबवली म्हणाला,”साहब, माटूंगा आ गया”रोहन म्हणाला, “एक काम करो, अभी लोअर परेल चलो, सिताराम मिल कम्पाऊंड चलना है”. टॅक्सी वाल्याने काय येडा माणूस आहे अशा दृष्टीने पाहिले, आणि यु टर्न मारून निघाल.

सिताराम मिल कम्पाऊंड . या मिल मधे पूर्वी कधी तरी कपडे उत्पादन चालायचं, पण हल्ली गेले कित्त्येक वर्ष गिरणी कामगारांच्या संपापासून मिल बंद पडली होती. रिकाम्या जगांमधे, बरेच जुने विभाग गोडाऊन म्हणून भाड्याने दिलेले होते.  काही भागात तर ऑफिसेस पण  उघडले आहेत. काही वाहिन्यांची ऑफिसेस पण होती. कित्येक  एकराचा परीसर, एकदा आत गेल्यावर कोण कुठे आहे ते सापडणं कठीण.

टॅक्सीवाल्याला एका बंद पडलेल्या गोडाऊन पुढे निर्मनुष्य भागात थांबवले. सॅक मधले पिस्तूल काढून त्याच्या छातीवर टेकवून त्याला म्हणाला, ” पहेली बार जब माटूंगा चलने बोला था, अगर उसी वक्त हां बोलता तो आज नहीं मरता” आणि थंड्पणे ट्रिगरवरचे बोट आवळले. एका क्षणात फट़्ट असा आवाज आला आणि तो ड्रायव्हर शांत झाला. रोहनने बॅग मधली पोस्ट ईट ची स्लिप काढली, आणि त्यावर लिहिले, ” जर याने माझ्याबरोबर यायला नकार दिला नसता, तर अजून जगला असता” आणि आपली बॅग पाठीवर लावून कम्पाउंडच्या बाहेर दुसऱ्या दरवाजाकडे वळला.

बाहेर पडल्यावर त्याला  खूप हलके वाटत होते. चालत चालत बाहेर पडला व्हिटी च्या दिशेने.तेवढ्यात एक बस आली, बस मधे बसून निघाला तो. नकळत त्याला तो सिनेमा आठवला, डोंबीवली फास्ट!! च्या मारी तर, आपण तेच करू या की.फक्त थोडं जास्त सिस्टीमॅटीक.  फिअर इज द की.. एकदा समाजात भिती बसली, की सगळे कसे सुतासारखे सरळ होतील. पहिले टॅक्सी , रिक्षावाल्यां मधे एक भिती निर्माण व्हायला हवी, की त्यांनी कधीच कोणाला येणार नाही , असे म्हणण्याची हिम्मत करता कामा नये. दुसरी टॅक्सी,तिसरी टॅक्सी, चार रिक्षा वाले- पुन्हा प्रत्येकी  एक बुलेट, एक पोस्ट ईट.. तेच वाक्य!!

पुढचा भाग..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , . Bookmark the permalink.

9 Responses to फिअर इज द मोटीव्हेटर..१

 1. वाह वाह…. मस्त कथा. एकदम वेगवान. डोंबिवली फास्ट डोळ्यासमोर आला…

  आता पुढचा भाग वाचतो 🙂 🙂

  • सुहास,
   मला पण डेक्स्टर पहातांना तेच जाणवत होतं. एकीकडे प्रिप्लॅन्ड केलेले खून आणि दुसरीकडे केवळ इम्पल्सिव्ह स्टॆट ऑफ माईंड मुळे केलेले खून..:)

 2. Poorva Kulkarni says:

  nehmichya vishyapeksha vegli katha… Aavdli. part 2 vachte..

 3. geetapawar says:

  mast mala aawdli……………………

 4. Sadhana Raje says:

  sampurna katha ekdam masta aahe.

 5. Amol says:

  reading after long time, the pic you used for headline is of DEXTER who does the same thing , just your hero’s situation is different… I love dexter please do read it & watch it …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s