नो कमबॅक्स……१

असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं स्थान, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग?

काय झालं? माफ करा,स्वतःची ओळख करुन द्यायला विसरलो मी. मी कॅप्टन राज. वय वर्षे ४२. मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हंटलं तरीही चालेल. माझ्या बद्दल तुम्ही मागच्या कथे मधे वाचले आहेच.  नसल्यास , आधीची  कथा इथे वाचा.  सध्या माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असे वाटतंय. अहो दररोज दिवसभर काहीतरी करत वेळ काढायचा आणि रात्री बॉम्बे जिमखाना क्लब मधे   जायचं. रात्री उशीरा पर्यंत  घरी आलं की मग दुपारी उशीरा उठायचं, आणि पुन्हा तेच आयुष्य मागील पानावरून पुढे सुरु.

इतका पैसा गाठीशी असतांना आता या पुढे नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. करोडो रुपये कमावलेले, कितीही दोन्ही हातांनी जरी उधळले तरीही कधी संपणार नाही इतकी संपत्ती.लग्न केलेले नसल्याने पुन्हा कुठलेही बंधन नाही. हा सगळा दिनक्रम व्यवस्थित सुरु होता, असलेल्या पैशाकडे पाहून आजपर्यंत बऱ्याच मुली जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या, पण मी मात्र कटाक्षाने असे संबंध केवळ वन नाईट स्टॅंड पुरतेच मर्यादित ठेवले होते. कुठेच मानसिक गुंतवणूक होऊ दिली नव्हती. लाइफ  वॉज गुड- पण जो पर्यंत ती आयुष्यात आली नव्हती तो पर्यंत!

सोशल  पार्टी मधे  ती नेहेमी दिसायची. कुठल्यातरी एका कोपऱ्यात हातात ब्लडी मेरीचा ग्लास घेऊन पहिलाच ग्लास शेवटपर्यंत पुरवत बसायची. कोणाशी कधी फारसं बोलणं नाही, की कोणा मधे फारसं मिक्स अप होणं नाही. तिचा नवरा नेहेमीच सोबत असायचा. सुजीत मेहेरा.   पण तो अशा पार्टी आपले बिझिनेस संबंध  दुरुस्त करण्यासाठी वापरायचा. अशा प्रसंगी बायको बरोबर असली की समोरचा माणूस थोडा सॉफ्ट होतो -आपोआप!  एक्स्पोर्ट इम्पोर्टचा मोठा धंदा असलेला हा सुजीत पार्टी मधे केवळ धंदा वाढवण्यासाठी म्हणूनच यायचा. या अशा पार्टीज चा उपयोग धंदा वाढवण्यासाठी कसा करून घ्यावा ते यांच्याकडून शिकावे.

स्वतःवर प्रचंड विश्वास असलेला माणूस. स्वतः बरोबर बॉडीगार्ड लवाजमा घेऊन फिरणे याला आवडायचे नाही. पार्टीला येतांना पण स्वतःच आपली बी एम डब्लु ड्राइव्ह करत यायचा. शेजारी बायको बसलेली, मागच्या सीटवर ड्रायव्हर.  कस्टम बिल्ट कार होती ती.  पूर्णपणे बुलेट प्रुफ. अगदी चाकं, टायर्स सुद्धा. जवळपास एखादा बॉम्ब ब्लास्ट जरी झाला तरी त्या कारला काही होणार नाही. असंही म्हणतात की त्याच्या कार मधे सिक्रेट वेपन्स पण बसवलेले आहेत. जेम्स बॉंड च्या कार सारखे. हेच कारण असेल, त्याला बॉडी गार्डची गरज पडत नसावी. पण पार्टी संपली की मग मात्र हा मागच्या सिटवर शांतपणे झोपी जायचा.

जगणं म्हणजे दारू पिणं बस्स .. इतकच त्याचं आयुष्य होतं बहुतेक. सारखं दारू पिण्यामुळे आणि खाण्यामुळॆ अवाढव्य शरीर झाले होते.  पार्टी मधे पण याचे लक्ष बायकोकडे कधीच नसायचे. कोणाशी तरी कोपऱ्यात बसून बिझीनेस बद्दल बोलत बसणे हाच याचा नेहेमीचा उद्योग. पेज थ्री पार्टी मधे असेल त्या दिवशी त्या पार्टीला , आणि ज्या दिवशी पार्टी नसेल त्या दिवशी हा बॉम्बे जिमखाना क्लब मधे नक्की असणार. या क्लबची मेंबरशीप मिळणे फार कठीण.  एक्स्ल्युजीव क्लब फॉर इलाईट्स अशी टॅग लाइन आहे या क्लबची..

या सुजीत शी ओळख तर झाली होतीच. दररोज  पार्टी मधे किंवा क्लब मधे भेट व्हायचीच.थोडं फार बोलणं पण व्हायचं . एक गोष्ट बाकी आहे, माझा पूर्वेतिहास माहिती असल्याने कदाचित असेल, तो माझ्याशी नेहेमी सांभाळूनच रहायचा. कॅप्टन लेट्स ड्रिंक.. म्हणून बार कडे घेऊन जायचा, आणि हातात स्कॉच ऑन द रॉक्स चा ग्लास घेतला की एका बाजूला निघून जायचा.

साधारण महिनाभरापूर्वी गोष्ट असेल. बॉम्बे क्लब चा बार. समोर टेबल वर काही लोकं  पूल खेळत बसले होते, आणि एका बाजूला एका टेबल वर सहा लोकं पत्ते खेळत बसले होते. त्या मधे एक सुजीत पण होता. चार पेग झाले होते त्याचे. तांबारलेले डोळे आणि समोर पत्ते- बहुतेक सारखा जिंकत होता, म्हणून त्याचा मुड पण चांगला दिसत होता.

एका कोपऱ्यात सुजीत मेहेरा ची बायको रश्मी मेहेरा बसली होती. समोर नेहेमीप्रमाणे ब्लडी मेरी चा ग्लास ठेवलेला होता. पूर्णपणे कंटाळलेली दिसत होती ती. तिला एकटीला रहायची वेळ फार कमी यायची. तिच्या सौंदर्यामुळे तिच्या मागे पुढे सारखं कोणी ना कोणी तरी असायचंच. आता पण ती एका तरूणी बरोबर गप्पा मारत बसली होती.    चेहेऱ्यावरचा कंटाळा दिसत होता तिच्या ..मला एक समजत नव्हते, की जर तिला आवडत नाही पार्टी मधे किंवा क्लब मधे तर ती इथे येते तरी कशाला?

गेले कित्येक दिवसा पासून मी  तिच्या मधे कळत नकळत गुंतत चाललो होतो.  पार्टी मधे, क्लब मधे दुरूनच एकमेकांकडे पहाणं सुरु होतं. पण नजर मिळाली, की नजर चुकवायची हा खेळ सुरु होता. नजर का चुकवतोय आपण? साधं सरळ स्मित हास्य का देऊ शकत नाही? बरं , आपल्या प्रमाणे ती पण कधीच चुकून नजर मिळाली, तर हासत नाही. पण पहात असते हे नक्की.

आज मात्र तिच्या कडे पाहिलं, आणि तिने पण नजरेत कुठलेही भाव न येऊ देता नजरेला नजर मिळवली. खूप जुन्या दिवसांची ओळख असल्या प्रमाणे , नजरेनेच बोलणं झालं.   तिच्या समोरच्या दोन्ही लोकांना टाळून ती बार कडे वळली. तिचा ब्लडी मेरीचा न संपलेला ग्लास टेबलवरच सोडून. मी पण हातातला स्कॉच चा ग्लास खाली ठेऊन तिच्या दिशेने बार कडे वळलो. तिथे जाऊन व्हिस्की  ऑन द रॉक्स ची ऑर्डर दिली. तिच्याकडे बघून हसलो, आणि हात समोर केला. तिने हातात हात घेऊन  नांव सांगितले. म्हणाली, बरेच दिवसापासून बोलायचं होतं.. पण तेवढ्यात वाजवीपेक्षा जास्त वेळ हात हातात आहे ही गोष्ट लक्षात आल्याने, तिने हात काढून घेतला, आणि म्हणाली, उद्या रात्री याच ठिकाणी, आणि काही न बोलता आपला ब्लडी मेरी चा नवीन ग्लास घेऊन तिथून निघून गेली. माझ्या तर अजिबात काही लक्षात आले नाही, पण स्वतःच्याच नशिबावर जाम खूष झालो आज.

किती तरी दिवसांपासून मी ह्याच दिवसाची वाट पहात होतो. उद्या काय बरं असावं? मी मेहेरा खेळत असलेल्या टेबलकडे वळलो . नेमका त्याच टेबलवर न बसता मेहेराच्या टेबलच्या मागच्या टेबलवर बसलो. तिथून मला मेहेराचे बोलणे चांगले स्पष्ट ऐकू येत होते. अर्धा तास झाला तरीही काहीच झाले नाही. केवळ खेळणे सुरु होते सुजीत मेहेराचे. तेवढ्यात मेहेराचा सेल फोन वाजला, कोण होतं ते माहिती नाही, पण मेहेराचे एक वाक्य कानी पडलं, ” हां, भाई, मै आ रहा हूं कल दुबई, टिकिट भी बुक कर  लिया है” आणि आकस्मित पणे कसलं तरी अनामिक दडपण आल्याप्रमाणे टेबल वरून हातातले पत्ते फेकून तो उठून गेला. रश्मी मेहेरा कडे इशारा करून निघाला सुध्दा तो परत. रश्मीने माझ्याकडे पाहिले, आणि ओळखीचे स्मित हास्य दिले आणि सुजीत मेहेताच्या मागे चालायला लागली. नेहेमी रात्री दोन वाजेपर्यंत पार्टी मधे मश्गूल रहाणारा सुजीत मेहेरा आज मात्र अकरा वाजताच परत जात होता. काही तरी बिनसलं होतं हे नक्की.

**********

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged . Bookmark the permalink.

4 Responses to नो कमबॅक्स……१

 1. geetapawar says:

  sir
  पहिला हि लेख no . १ होता आणि हा हि १ नंबर आहे सर खूप चं रंगवला आहे लेख……आणि ho पुढचा लेख लिहणे बाकी आहे का सर???????????

 2. प्रियांका चिंचमालातपुरे says:

  मस्त …. पहिल्यांदाच इतका सुंदर ब्लोग वाचला आणि तेही मराठीतून, अप्रतिम शब्द रचना!

  • प्रियांका
   ब्लॉग वर स्वागत. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.. माझा लॅपटॉप चोरीला गेल्याने थोडा उशीर होतोय उत्तरासाठी.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s