अब्रू ची किंमत किती आहे हो??

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात  जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. आज सकाळी टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधून घेतले. एका कंडक्टरला बलात्काराच्या गुन्ह्याला बद्दल फक्त ६००० रुपये शिक्षा सुनावण्यात आली .  एका मुलीवर बलात्कार केला जातो, आणि तिच्या अब्रू ची किंमत कोर्ट    फक्त सहा हजार ठरवतं.

काही दिवसापूर्वी एका केसचा निकाल पेपर मधे वाचला होता. त्या मधे कोर्टाने निकाल दिला होता की ज्या माणसाने बलात्कार केला त्या माणसावर त्याचे म्हातारे आईवडील अवलंबून आहेत, म्हणून त्याला जेल मधे न टाकता    ५०००० रुपयांचा दंड इतकी शिक्षा करण्यात येत आहे.

वर दिलेल्या दोन केसेस फक्त नमुन्यादाखल लिहील्या आहेत. वरच्या दोन्ही निकालावर काही भाष्य करणे हा कोर्टाचा अपमान होऊ शकतो, म्हणून फक्त इतकंच म्हणतो की कोर्टाच्या दृष्टीने एका स्त्री च्या अब्रु ची किंमत ही साडे सात ते पन्नास हजार रुपये !!!

हे वाचल्यावर कदाचित  थोडी असहाय्यता, थोडी चिड , थोडा संताप अशा सगळ्या संमिश्र भावना मनात येतील.  मागच्या आठवड्यात एका ७४ वर्षाच्या गृहस्थाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची चित्र फित बनवल्याचे वाचण्यात आले . ही बातमी जवळपास तीन दिवस दररोज येत होती. अशा तऱ्हेने की जणू काही हा जगातला पहिला आणि शेवटचा बलात्कार असावा . तो थेरडा तर सिरियल रेपीस्ट होता. त्याच्या कडे बऱ्याच सिडी सापडल्या. असो मुद्दा तो नाही. बलात्काराच्या केस मधे वृत्तपत्राच्या बातमीदारांच्या लेखणीला विशेष धार येते , आणि तोच तो विषय पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडला जात असतो- कारण लोकांनाही तेच वाचायला आवडतं.

बलात्कारा बद्दल पुर्वी एक लेख लिहिला होता “ बलात्काराष्ट्र” म्हणून. त्यात बरेच मुद्दे आले आहेत, म्हणून आता पुन्हा तेच ते लिहित नाही.आपण भारतीय लोकं पण थोडे विचित्रंच आहोत. ज्या भक्ती भावाने  रामायनातले सुंदर कांड ऐकतॊ किंवा सितेची पूजा करतो त्याच भक्तीभावाने महाभारतातिल द्रौपदी च्या चीरहरणाचा प्रसंग पण ऐकतॊ. खरंच कसे आहोत आपण?

दुर्दैवाने असे म्हणावे लागते की स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीचे जितके अवमुल्यन झाले आहे तितके पूर्वी कधीच नव्हते . पूर्वी स्त्री च्या अंगावर चार चौघांसमोर हात घालायची कोणाची प्राज्ञा नव्हती. आजच्या काळात एका स्त्रीची नग्नावस्थेत गावभर धिंड काढल्याची बातमी आपण अगदी मेलेल्या मनाने वाचतो. फक्त हे आपल्या बाबतीत होत नाही म्हणुन आनंद मानायचा अशी मनोवृत्ती हल्ली वाढीस लागलेली आहे. वर्षभरा पूर्वी एकदा मालाडला लोकलमधे चढतांना एक माणूस स्त्रियांच्या फर्स्ट क्लास मधे सौ. च्या मागे शिरला आणि त्याने चढतांना तिच्या पर्स मधे हात घातला. हे सगळं होत असतांना डब्यातल्या सगळ्या इतर स्त्रिया पहात होत्या, सौ. च्या लक्षात आल्यावर तिने त्याला पर्सने फटकारून दूर ढकलले, पण डब्यातली एकही बाई मदतीला धाऊन आली नाही. इतक्या सगळ्या बायकांसमोर त्या एकट्या माणसाचे काही चालले नसते, पण समाजातल्या एकजूटीचा अभाव- आणि मला तर त्रास होत नाही ना? ही मनोवृत्ती वाढीस लागलेली आहे.

पूर्वी एखाद्या मुलीला छेडतांना ती आपल्या भावाला, वडीलांना सांगेल ही भिती असायची , पण हल्ली वडिलांसमोर किंवा भावासोबत असलेल्या मुलींची पण छेड काढ्ण्यास कोणी घाबरत नाही.पूर्वी शेजारच्या घरातल्या मुलीला जरी कोणी छेडलं तरीही सगळे एकत्र येऊन त्या छेडणाऱ्याच्या घरी जाऊन कम्प्लेंट करायचे. आजकाल, बाप मुलाला मोटरसायकल घेऊन दिल्यावर म्हणतो, ” एखादी मुलगी पटव मागच्या सिटवर बसवायला” !असो जग फार पुढे जातंय असं वाटतं मला तरी.

या जगात पुरुष हा ५० टक्के श्वापद  असतो असे म्हणतात पण मला आजची परिस्थिती  पहाता पुरुष हा ९० टक्के गिधाड झाला आहे असे वाटते. जेंव्हा ही ९० टक्के श्वापदं स्त्रीयांकडे एक शिकार म्हणून पहातात तेंव्हा इतर दहा टक्के लोकं कुठेतरी नजरा लपवून बसलेले असतात. अहो-  जनावरांमधे तरी मेटींग ची काळ वेळ ठरलेली असते- अगदी तिन्ही त्रिकाळ सेक्सचा विचार हे प्राणी पण करत नाहीत. त्यांची पण वेळ ठरलेली असते. कुत्रा फक्त भाद्रपद महिन्यातच कुत्रीच्या मागे मागे असतो, पक्षी पण केवळ विणीच्याच काळात एकमेकांच्या जवळ असतात, पण मानव मात्र अगदी चोविस तासात कधीही सेक्स साठी स्वतःला तयार करू शकतो.  हेच ते कारण आहे की आज स्त्री स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.

लोकलच्या ब्रिज वर असो किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मचा जिना चढताना असो, पुरुषाचे ओंगळवाणे स्पर्ष झेलल्या शिवाय स्त्रीला साधे चालता येणे पण अशक्य झालेले आहे. रस्त्यावरच्या नाक्यावर उभ्या असलेल्या वासू लोकांच्या कॉमेंट्स झेलल्या शिवाय रस्त्यावर चालणं पण मुश्किल झालेले आहे. ही परिस्थिती फक्त मुंबई मधेच आहे असे नाही, अगदी लहान शहरातही अशीच परिस्थिती आहे. आपली मानसिकता बरीच बदलली गेली आहे. पूर्वी स्त्री कडे पहाताना आई, बहीण, वहिनी वगैरे अशी नाती असायची, पण हल्ली मात्र एकच नातं उरलं आहे. ते म्हणजे नर आणि मादी.

जी गोष्ट कधीतरी घडते त्या गोष्टी बद्दल लोकांना काहीतरी अट्रॅक्शन असतं. पण जेंव्हा   विदर्भातल्या शेतकऱ्यां प्रमाणे दररोज आत्महत्या होणे सुरु झाल्यावर पहिल्या पानावरून ती बातमी तिसऱ्या पानावर, आणि आता कुठल्यातरी कोपऱ्यात दिलेली असते  आत्महत्या या जितक्या सहजपणे अजिबात मनाला लावुन न घेता वाचल्या जातात, तेवढ्याच अलिप्तपणे हे बलात्काराच्या बातम्या वाचल्या जातात, पण बलात्काराच्या बातम्यांचे पहिल्या पानावरचे स्थान दुर्दैवाने  कायम आहेच.

असं म्हणतात, की पूर्वी मुंबई सगळ्या स्त्रीयांसाठी खूप सुरक्षित होती- पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.भर दिवसा जेंव्हा लोकल मधे एक गर्दुल्ला स्त्री ची पर्स हिसकू शकतो, हल्ला करू शकतो, सगळ्यां समोर शारिरिक अंगचटीला जाऊ शकतो, तेंव्हा सुरक्षितता कशाला म्हणायची हाच प्रश्न पडतो.

स्त्रियांनो,  आज तुमचे संरक्षण करण्यासाठी कोणी नाही.  तुम्ही घराबाहेर पडल्या की तुम्ही ह्या श्वापदांच्या पिंजऱ्या आहोत हे समजून चाला. तुम्ही कितीही पवित्र असलात तरीही  ह्या पुरुषांना जन्म देण्याचे तुम्ही पाप केलेत, आणि आता त्याच पापाची फळं तुम्हालाच  भोगावी लागत  आहेत. आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आठवलं.. ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ह्रदयी  अमृत नयनी पाणी”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

45 Responses to अब्रू ची किंमत किती आहे हो??

 1. अभिजित says:

  >>बाप मुलाला मोटरसायकल घेऊन दिल्यावर म्हणतो, ” एखादी मुलगी पटव मागच्या सिटवर बसवायला”
  यात काही वावगं असं वाटत नाही. गर्लफ्रेन्ड बनवणं हा काही जबरदस्तीचा मार्ग नाही. मुलीला मुलगा पटला तरच ती त्याची गर्लफ्रेन्ड बनेल. अशा वाक्यांमुळे छेडछाड वाढेल असं म्हणता येणार नाही.

  • Bageshri says:

   impossible. म्हणजे जर आता वडिलांनीच अशी खुलेआम परवानगी दिली तर तो मुलगा पुढे जाऊन काय इज्जत ठेवणार आहे एखाद्या मुलीची? कशावरून एखादी आवडणारी मुलगी जर त्याला नाहीच पटली तर तो तिची छेड काढणार नाही? तिला त्रास देणार नाही?
   याचा अर्थ असा कि त्याच्या बापावरच नीट संस्कार नाहीत. चीड येते असल्या लोकांची. वेताच्या फोकाने बडवून काढायला हवे यांना.

   • अभिजीत
    मला तरी हे योग्य वाटत नाही. एकतर्फी प्रेमातून झालेला खूनी हल्ला अमृता पाटील केस माझ्या चांगली लक्षात आहे. तसेच ऍसिड हल्ले पण बरेचदा वाचण्यात येतात .

   • बागेश्री
    मूळ संस्काराचा प्रश्न आहे. नेमकं हेच मला म्हणायचं होतं.

    • Bageshri says:

     बरोबर आहे काका. जर संस्कारच नीट नसतील तर त्यांच्या घरातल्या स्त्रियांची तरी अवस्था काय वेगळी असणार आहे? आजकाल मोठ्य्न्साठी पण संस्कार वर्ग काढायची नितांत गरज आहे. परत शिवाजी महाराजांचा काळ यावा आणि स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणार्याचे डोळे फोडले जावेत. मगच स्त्रियांना न्याय मिळेल.

     • vijay bhate says:

      मी या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. प्रत्येक अपराधाला वेळीच कडक इलाज होणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी कोणा कृष्ण वा शिवाजीसारख्या विभुतिंची गरज पडू नये. घरचेच संस्कार शिस्तीचे असले तरच याला आळा बसेल.

      • विजय
       प्रतिक्रियेसाठी आभार..
       “आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सर्वच प्राण्यांना समान गरज आहेत पण बुद्धी आणि धर्मपालन हीच वैशिष्ट्ये आहेत जी माणसाला पशुंपासून वेगळे करतात.” हे एकदम पटलं.

   • prakash says:

    chki 50&mulache aahe pan. .50% muliche pan aahe muli kashala mulanchey mage lagtat jar 4 goshti jar aae vadlachey aikley tar as kadhi honar nahe muli paheley sotahun frend banavtat nantar prmat padtat yeat chuki konachi .gadhi geun denarey vadlanchi ka thy mulanchiiiii ??????

 2. माझ्या मते तर बलात्काराला शिक्षाही फक्त आणि फक्त देहदंडाचीच असावी..

  • यप्प…!!!

   आयुष्यात आजवर दोघांना कानफटवलंय…दोन वर्षापूर्वी चारकोपला असा एक प्रकार झाला होता. बस नं. २८६ लेडीज सीटवर बसलेल्या मुलीच्या बाजूला उभा राहून, एक मुलगा त्यांचे फोटो काढत होता. कसले ते सांगायला नको. त्याला हटकले तर त्याने माझी कॉलर धरली होती. त्याचा फोन मीच फोडला, त्याला बसमधून उतरवलं आणि तुडव तुडव तुडवलं होतं . त्याला पोलिसांकडे नेणार होतो, पण ती मुलगी नाही म्हणाली….

   अश्या लोकांची अशी चीड येते नं, पण किती जणांना हटकणार? सगळीकडे आपण सोबत जाऊ शकत नाही. त्यामुळे खूप जास्त काळजी वाटते. कल्पना करवत नाही की आपल्या आया-बहिणी-मैत्रिणीकडे कोण कश्या नजरेने बघत असेल…. 😦

   • हेरंब, सुहास
    माझा मुद्दा हा की याची किम्मत ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? अब्रू ची किंमत जर पन्नास हजार असेल तर त्या स्त्री ला वेश्या म्हणून ट्रीट केल्यासारखे वाट्णार नाही का?

    • vijay bhate says:

     जे अमुल्य आहे त्याची किंमत शिक्षेने होऊच शकत नाही, ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक इजाही आहे, याची किंमत कशी केली जाते?

  • मी हेरंब ह्यांच्या मताशी पूर्ण समाहत आहे. असे केल्या शिवाय लोक सुधारणार नाहीत. हि फाशी पण भर चौकात दिली पाहिजे आणि बलात्काराचे जितके प्रदर्शन पत्रकार आणि मिडिया करते तीतकेच ह्याचे हि होणे गरजेचे आहे.

   • बलात्काराला होणारी शिक्षा ही सौ़म्य नसावी इतकेच म्हणायचे आहे. नाहीतर ५० हजार रुपये द्या आणि बलात्कार करा असा संदेश जाऊ शकतो. पुढल्या केसेस मधे आधिच्या कोर्टाच्या निर्णयाचा रेफरन्स नेहेमिच दिला जातो. म्हणजे असे फार कमी शिक्षा असलेले निर्णय रेकॉर्ड झाले की मग पुढे या गुन्ह्याचं गांभिर्यच संपून जाईल.

  • Snehal says:

   Yes very true Heramb dada

  • prakash says:

   balat kar karnarey mansana nagda karun sarv angavarti mungey sodhley paheje karan..balatkar kar narey na he shekha barobar aahe asmalavatt

 3. Mohana says:

  लेख वाचताना विजय तेंडुलकरांच्या ’कमला’ नाटकांची आठवण झाली.

  • मोहना
   ब्लॉग वर स्वागत.. आणि आभार..मी हा लेख लिहितांना मला सावित्री हे नाटक आठवत होतं सारखं..

 4. प्रणव says:

  खरय काका,
  हल्ली आपल्या भावना बोथट झाल्यामुळे असे प्रकार सर्रास घडतात. माझा काही जात नाही ना? मग माझा काही संबध नाही असा विचार आता कॉमन झालाय. यालाच आपण कोडगेगिरी म्हणू शकतो.
  माझ्या मताप्रमाणे बलात्कार सारख्या गुन्ह्यासाठी देहदंडाचीच शिक्षा करायला हवी तीसुद्धा हालहाल करून आणि ते सगळा जाहीर रित्या सगळ्यांना दाखवला पाहिजे म्हणजे दुसरा कोणी नंतर असा करायच्या आधी १०० वेळा विचार करेल.
  –प्रणव

  • प्रणव
   शिक्षा जर अशी खूप कमी असेल तर कायद्याला कोणीच घाबरणार नाही, म्हणूनच तुझे म्हणणे अगदी योग्य वाटते.शिक्षा अशी असावी की “माझ्या मताप्रमाणे बलात्कार सारख्या गुन्ह्यासाठी देहदंडाचीच शिक्षा करायला हवी तीसुद्धा हालहाल करून आणि ते सगळा जाहीर रित्या सगळ्यांना दाखवला पाहिजे म्हणजे दुसरा कोणी नंतर असा करायच्या आधी १०० वेळा विचार करेल.” हे पूर्णपणे मान्य.

 5. जे बाप आपल्या मुलांना गर्लफ्रेन्ड मिळवायला सांगतात, तेच बाप आपल्या मुलींना “एखादा बॉयफ्रेन्ड पटव, त्याच्या गाडीवरून फिरण्यासाठी” असं बिनदिक्कतपणे सांगू शकतील का?

  बलात्कारासारखा गुन्हा अभावितपणे घडत नसतो. पद्धतशीरपणे, योजना आखून केला जातो. असं नीच कृत्य करताना आई-बापाचं आपल्यावर अवलंबून असणं-बिसणं याचा विचार तो गुन्हेगार करत नाही का?

  या कृत्यामुळे एका स्त्रीला काय सहन करावं लागतं, हे केवळ एक स्त्रीच सांगू शकेल. कोर्टाच्या असल्या भंपक निर्णयांशी मी पूर्णत: असहमत आहे. कोर्ट त्या व्हिक्टीम स्त्रीला का विचारत नाही की तिला अशा नराधमला कोणती शिक्षा द्यावीशी वाटते? मला खात्री आहे की ती स्त्री जी शिक्षा सांगेल, ती त्या गुन्हेगाराला मुळापासून हादरवेल.

  बाय द वे, आपलं “माननीय” कोर्ट ही जी पाच पन्नास पैशांची शिक्षा सुनावतं, ते पैसे कुणाला मिळतात? त्या दुर्दैवी स्त्रीलाच मिळतात, असं कृपया सांगू नका. वेश्याव्यवसाय काय वाईट आहे मग त्यापेक्षा? त्या जज्जसाहेबांना म्हणावं, देव न करो पण तुमच्या मुलीवर असा प्रसंग आला की तुम्ही काय गुन्हेगाराला काय शिक्षा कराल ते पाहूच.

  स्त्रीने स्वत:च स्वसंरक्षण करायला शिकलं पाहिजे. असं म्हणणं हे कृती करण्यापेक्षा खूप सोपं आहे. पण इतर स्त्रीयांची साथ मिळणार असेल, तर अशक्यही नाही. जिथे अशी कृती घडतेय असं वाटतं तिथेच या नराधमांचे हातपाय तोडायला हवेत आणि या प्रसंगाची आठवण म्हणून त्यांच्या कपाळावर एक टॅटू काढायचा. प्लास्टिक सर्जननेसुद्धा टॅटू काढण्याआधी दोन वेळा विचार केला पाहिजे. डोक्यात याहीपेक्षा भयंकर विचार येतात.

  • कांचन
   मूळ लेखाचा भाग व्हायला हवा अशी कॉमेंट आहे ही.सहमत.

  • पूर्वी एका चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत असलेल्या डिंपलवर सामूहिक बलात्कार होताना दाखवला होता, त्याचा सूड म्हणून ती त्या सगळ्या नराधमांना ऑपरेशन करून नपुंसक करते असे पुढे दाखवले होते, हे अशीच शिक्षा योग्य आहे….बलात्कारीत स्त्रिच्या यातना जिवंतपणीच त्या नराधमांनाही भोगायला लागल्या पाहिजेत.

 6. गुन्हेगाराला शिक्षा सही हवी कि त्याला कायमची अद्दल घडली पाहिजे आणि समाजाला पण.इतिहासातील काही गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या आहेत.त्या काळी बलात्कार किंवा परस्त्री वर वाईट नजर टाकणे हा फार मोठा गुन्हा होता. त्या काळी अशा गुन्हेगारांना एक विशिष्ट औषध दिले जात असे. ह्या औषधामुळे त्यांची लैंगिकताच संपुष्टात याते असे. बाकी काही शिक्षा नाही. तू पुरुष ” पुरुष ” राहत नसे. हि शिक्षा मला फार आवडली. त्या पुरुषाचे की होत असेल हा विचार करूनच मला भीती वाटली. अशा कायदा परत सुरु करायला हवा.
  आणि मी म्हणतो कि स्त्रिया म्हणतात कि आम्ही पुरुषान पेक्षा कुठेच कमी नाही. नेहमी हे ऐकतो. पण ह्या अश्या प्रसंगी कुठे जातो तुमचा पुरुषार्थ? इथे बरोबरी करा कि. जर बलात्कारामुळे स्त्रियांचे आयुष्य उधवस्त होते तर तसे झाल्यावर त्या की करतात? आत्महत्या करतात. का? जर तुम्हाला आत्महत्याच करायची आहे तर ज्यांनी तुमच्यावर हे वाले आणली त्यचा खून करून आत्महत्या करा कि. समाजाला पण समजेल कि स्त्रिया कशाला म्हणतात. नुसती भोगायला स्त्री नाही. चंडी पण हीच आहे. पुरुष ५०% जनावर आहे म्हणतात तर स्त्री नाही का? जगवा स्त्रीयानो तुमच्यातील जनावर. त्यची आता गरज निर्माण झाली आहे. पुरुषांना स्त्रियांतील जनावर दाखवायची गरज निर्माण झाली आहे. मी जरी पुरुष असलो तरी मी स्त्रींचा आदर करतो. जर स्त्री देवी होऊ
  शकते तर ती चंडी हि होऊ शकते. प प्रश्न हा आहे कि सुरुवात कोण करणार? हि हिम्मत कोण करणार? ह्या स्त्रीनीच पुरुषाला हा फाजील अभिमान / गर्व दिला आहे कि तुम्ही करू शकता तुम्हाला कोणी हात लावणार नाही .
  नुसते ओरडत राहण्या पेक्षा जागे व्हा आणि आपल्या अत्याचाराचा बदला घ्या.

 7. savitarima says:

  बलात्कार करणाऱ्या पुरुषाला शिक्षा व्हायला हवी , ती त्या स्त्रीचा त्याने आत्मसम्मान धुळीला मिळवला म्हणून. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संभोग केला म्हणून. तिच्या मताचा, तिच्या विचारांचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अनादर केला म्हणून. पण बलात्कार करणाऱ्या पुरुषाला फाशी द्यायला हवी, त्याला चौकात फटक्याची शिक्षा द्यायला हवी, त्याची लैंगिकताचा संपायला हवी ,इ. इ. सर्व शिक्षा त्याला द्यायला हव्यात या भावनेमागचा विचार काय सांगतो….की त्याने तिच्या योनिशुचीतेचा भंग केला, तिला अपवित्र केले म्हणून !! मुळात स्त्रीला देवी बनवून ठेवले आहे मखरात !! स्त्रीने नेहमी पवित्र राहावे …पावित्र्याचा आग्रह स्त्रीच्या बाबतीतच का ? तर तिला होणारे मूल कोणत्या पुरुषाचे आहे ते समजावे म्हणून !! मग त्या मुलावर हक्क सांगता येतो ….माझा वंश असे छातीठोकपणे सांगता यावे म्हणून!!
  पुरुषाला व्यभिचारी हे संबोधन वापरले जात नाही कधी .. स्त्रीने मात्र जर …
  या योनिशुचीतेचा स्त्रियांवर एवढा पगडा बसवला गेला आहे की त्यामुळेच बलात्कार झाला की स्त्रीला आपण आता कोणत्याच उपयोगाचे राहिलो नाही….आता आपल्या आयुष्याला अर्थ नाही असे वाटते…..मग त्यातूनच त्या आत्महत्येच्या निर्णयाप्रत येतात.
  पुरुषांवर संस्कार करायचे हे ठीकच आहे …पण स्त्रीवर देखील संस्कार करायला हवेत …की बाई अब्रू गेली म्हणून आयुष्य संपले नाही !!
  Being Human हा संस्कार सर्वांवरच होणे गरजेचे आहे असे मला वाटते.

 8. Ashwini says:

  Thodkyat Sex hya autghatkechya pleasurla lokani vishetaha…media ne far far agdi nako tevdh futage dil aahe…lok tyachach vichar kayam karat aastat….agdi 24 taas…secured mhanavnaraya pandhar pesha wargat office madhe saadi ghalun jari gela tari kahi jan aahe “kya sexy lag rahi hein” as mhanare…..rahila prashan sajecha Middle east countries madhe jashi saja hote tasa zala pahije…jya awayawane gunha kela jata…tyalach saglyandekhat kalam karne….

  Ugich nahi ata sha preschools madhe sudha : good touch and bad touch oolkhane mulana shikwal jatay…..

 9. Hemant Pandey says:

  काका, हा तुमचा लेख वाचून डोक्याला मुंग्या आल्या आहेत. तीन वर्षापूर्वी माझ्या दहा वर्षाच्या मुलीला माझ्यादेखतच एकाने छेडले. मी त्याला तो बेशुद्ध होईपर्यंत चोपले.(त्यात तो हॉस्पिटल मध्ये मेला हा नंतरचा भाग.) पोलिसांनी प्रथम मालाताब्यात घेऊन चौकीत नेले. लॉकअप मध्ये टाकल्यावर तेथील हवालदार मला म्हणाला कि साहेब हे प्रकरण तुम्हाला लई खर्चिक होणारा हाये. पार मर्डर केस 302. तवा घारच्यास्नी तयारीला लागा म्हणव. त्यावर मीच त्याला सुनावले कि मी तेच केले आहे जे एका बापाला करायला पाहिजे. मी फक्त साहातास लॉक अप मध्ये होतो. त्या स्टेशनचा इन्स्पेक्टर कमालीचा इम्प्रेस झाला. त्यानेच मला बाहेर सही सलामत सोडले माझी पाठ थोपटून म्हणाला ” साहेब आज खूप वर्षानंतर एक खवळलेला माणूस पहिला” . मुलींना छेडणारे त्यांच्या अब्रूवर हात टाकणारे त्याच्याशी मस्ती करणारे ठेचूनच मारले पाहिजे. त्यासाठी जेलची हवा खायची व स्वाभिमानाने जगायची तयारी हवी. समाज-मित्र हे घरच्यांची काळजी घेतात. नाना पाटेकरांचा “प्रहार” पुन्हा एकदा पाहण्याची आपल्या सर्वांची वेळ झाली आहे.

 10. थोडं वेगळं मत मांडतो.
  पुरुष आणि स्त्री हे निसर्गतःच एकमेकांकडे आकर्षित होत असतात. या आकर्षणावर अनैसर्गिक सामाजिक बंधने घालणे हे अयोग्य आहे. या blog post मध्ये अधोरेखित केलेला प्रश्न हा फ़क्त कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. बलात्कार सोडा. जर एका स्त्री आणि पुरुषाने संमतीने शरीरसंबंध केला (लग्नाबाहेर) तरीही वर Comments लिहिणारे सर्व आदर्श नरपुंगव बंधुराज खवळून उठतील आणि मरण्या-मारण्याच्या बाता सुरू करतील. एक माईचा पूत म्हणणार नाही की बाबा रे, हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यांचा त्यांना पाहू दे.
  हे असले विचार असतील, तर सरळ मुसलमान का होत नाहीत हे लोक? आणा इस्लामिक कायदा, मारा दगड आणि करा खून भरचौकात!

 11. मुळातच अब्रूची कोणती ही किमंत नसते ती अमूल्य असते . स्त्रीला उपभोग्य वस्तू मानल्या मुळे स्त्रियां वर मालकी हक्क गाजवण्याच्या पुरुषी कुसंस्कृती मुळे स्त्रियांवर अनेक बंधने लादल्या गेलीत , योनी सुचिता पवित्रता अश्या भ्रामक धार्मिक कल्पनांचे जाळे विणले गेले . यातूनच अब्रू , जबरदस्ती बलात्कार या गोष्टीना अवास्तव महत्व दिले गेले ..वास्तविक स्त्रियांना निसर्गानेच दर महिन्यास महावारी देऊन त्या पवित्र असल्याचे वरदान बहाल केले आहे. पण या कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्ष बलात्कारा पेक्षा बलात्कारा खटल्यात कोर्टात त्यांच्या अब्रूचे जास्त धिंडवडे काढले जातात . यासाठी अश्या गुन्ह्यास लिंग कापणे हीच एकमेव सजा देणे हाच उपाय. आजच्या मानवअधिकाऱ्यांना हा कायदा रानटीपणाचा वाटेल.पण यांच्या मतांची दखल घेण्याची गरज नही. हे सर्वजण हस्तिदंती AC मनोऱ्यात बसून गप्पा मारत असतात . जर यांच्यावर असा प्रसंग उदभवला तर ते मेणबत्ती मोर्चा काढण्या शिवाय कांही करणार नाहीत. स्त्रियांनीच आता या पवित्र शुद्ध या कल्पना झुगारून अश्या आरोपीस स्वत: सजा मिळेल या साठी सक्रीय राहावे. पुरुष लग्नाआधी आणि नंतर स्वत: बाहेर कीती ही शेण खातो पण स्वतः:चे लग्न ठरवताना मात्र पवित्र अपवित्र याचा विचार करतो यातच पुरुषाची वृत्ती दिसून येते.

 12. Santosh Kudtarkar says:

  Kaka;

  Chaan kelat tumhi ha post karun.

  Mala watata issue ha fakta Striyanchya surakshitatecha ani balatkaar wagairecha nahich ahe… Prashna ahe ki apan kiti surakshit ahot???
  Kayada ani suwyawstha yanna apan kiti maan deto???
  Kayade ahet pan tyancha jarab ahe ka janate war??? ani tyancha palan hota ahe ki nahi yachi koni khatri ghetay ka???

  Mi ithe UAE madhe ahe… Ithe baryach nationalities chi loka ahet… Ani manus ha sarwatra sarkhach asto… Pan ithe loka kahihi wawaga karayla ghabartat… 2 wela wichar kartat… ka???

  Tar shasan kathor ahe… konala tyatun sutaka nahi!!!

  Asa kahi apan aplya deshat ka nahi karu shakat??? Asa zala tar nakkich sagala sujalam sufalam honaar nahi ka???

  Maza wichar mandalay kaka… tumhala kai watata??? 😦

 13. Gurunath says:

  Sorry kaka marathi typing is not possible so taking the liberty to express in english….in cognizance with your article i would like to take your attention to the point which I support raised by the feminists, according to the IPC 376 (or 378 may be) which is the penal code for rape in our system only penetrative sex (that too only if the male genital is penetrated) is considered as a actual rape,any other pervert method or anything else measuring like the male genital if penetrated is not considered as sex including finger too!!! no matter if the finger belongs to a psychic rapist though!!!. in a recent demand the feminist factions of our society are asking to broaden the scope of the definition of penetrative sex which is un-consentual in nature to be rape. the debate is on going. so the answer to this in my opinion would be all about extendenting the scope of defining a rape and allied sexual assault cases so as to address the questions of women who really find the world full of perverts/padeophiles/rapists and psycopaths

 14. Hemant Pandey says:

  Dear friend Gurunath,
  You have very well acknowledged the IPC 376-clause A and paralell sections. Holding the basic thread of the topic, its the cost of event over a womans mind-socialy -financially-and above all at personal level. A rapist or an evening teaser not only has the intention of handling and playing with the physicals of a girl or a lady, but he damages the self respect of a woman a 100 times. Given for an example one is liable to be procecuted if a procetitute or beggar lady files a body harrasment complaint. Its the careless and neglegent Law Enforment Body and Extreamly devoted Democratic Laws, has made an impairable damages in the society. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील काठेवाडीतील सामुहिक बलात्कार असो किंव्हा मुंबईतील रेल्वे शेड्स मध्ये दररोज होणारे बलात्कार असो, वर्षानु वर्षे खटले चालून त्या बलात्कारित स्त्रियांच्या अब्रूची किंमत ठरवली जाईल. हिंदू धर्म शास्त्रा नुंसार आरोपीला तत्काळ देह-दंडाची शिक्षेची तरतूद आहे. ब्रिटीश कायदे तज्ञांनी हिंदू धर्माश्स्त्रांचे समूळ उच्चाटन केले आहे. त्याचीच आपण फळे भोगत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना तत्कालीन न्याय व्यवस्थेने देहदंडाची शिक्षा सुनावली नसती तर आज तुमचे- आमचे कोणाचेही वडील आले मनात संसार केला व आले मानात संन्या घेतला या वृत्तीचे झाले नसते याची खात्री कोण देणार? आपण फक्त श्री ज्ञानेश्वरांचा व भावंडांचा सहानुभूतीने विचार करतो व तत्कालीन न्याय व्यवस्थेला दोष देतो. परंतु कोण एका साधू महाराजांच्या उपदेशावर श्री विठ्ठल पंत कुलकर्ण्यांनी सन्यास पत्करला त्यावेळेस त्यांच्या बायकोच्या भविष्याची काय तरतूद केली? त्यावेळेसही भरडली गेली ती एक स्त्रीच. एक आईच एक मुलगीच. आपण गणपती नंतर दुर्गेची आरती करतो. परंतु आपल्या घरातील बाय-मुलीना त्या देविची शस्त्रे कधीच कशी दाखवीत नाही? आपल्याकडे लग्नात नवरदेवाच्या हातात मोठ्या कौतुकाने तालावर किंव्हा एक खंजीर देतात. त्याचे टोक कोणाला लागुनाये म्हणून त्यावर एक लिंबू देखील लावतात. पुढे हाच नवरोबा आयुष्यभर लिंबू सरबत पीत अयुअश्य काढतो. मित्रांनो व बाया- मुलींनो स्वसंरक्षणाची उर्मी बाळगा. शास्त्रा सोबत शस्त्रे (वेळप्रसंगी) वापरण्याची हिम्मत त्या दुर्गे कडून मागा. स्वत:वर अत्याचार होणारच नाही हि खात्री स्वत:ला दररोज जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी समजावा. मी हे फार पोटतिडकीने लिहित आहे. आपण इतिहास पूर्ण विसरलोय. जो पर्यंत आपण दररोज मरत जगणार तो पर्यंत आपली अतिरेकी लोकशाही अशीच आपल्या अब्रूची किंमत ठरवणार यात काहीच शंका नाही. काका, आपला मी थोडा वेळ घेतला, परंतु जे माझ्या हृदयामध्ये खदखदत होतं ते लोहिले. ट्रेकिंग करताना बर्याच वेळा मुलींना या गोष्टींची जाणीव करून दिली आहे. आपण मोठ्या धैर्याने हा विषय पटावर मांडलात. या साठी आपले व सर्व ब्लॉगर्सचे आभार.
  आपला हेमंत पांडे.

  • हेमंत
   हा विषय लिहिला खरा, पण नंतर लक्षात आलं की फार व्होलाटाइल विषय आहे हा. जर प्रत्येक कॉमेंटला उत्तर देत गेलो, तर कदाचित मूळ विषयाला सोडून या पोस्टचे मुक्तपिठ होईल असे वाटले, म्हणुन प्रत्युत्तर टाळले. विषय फारच अवघड आहे, प्रत्येकाने यातून काय चांगलं असेल ते घ्यावं, इतकीच इच्छा!

   • Hemant Pandey says:

    धन्यवाद काका. हा विषय अत्यंत महत्वाचा आहेच, व त्याही पेक्षा स्त्रियांच्या आत्मा सन्मानाच्या दृष्टीने कुपाच महत्वाचा आहे. तुम्ही धैर्याने हा विषय आपल्या ब्लॉग वर आणल्याने आपले मनापासून आभार. कदाचित “वाट्टेल ते!” विषय घेणे हेच कारण असावे कि ज्यामुळे आम्ही आवर्जून व दररोज मेल्स चेक करतो कि आज काही ” वाट्टेल ते ” आहे का?

 15. Absoultely nice article…..Even I’ve read about that rapist oldie, yucks!

  What you said about Mumbai and small towns is especially stands true. I get such experiences in Mumbai but not so much like Pune. Here, staying and working as a single woman has its own drawbacks. Pune has no longer remained the cultural capital of Maharashtra (ok, maybe some parts of it!), with advent of more money came the advanced crime rates. The situation is going from bad to worse here – women are scared to get out post 9pm, unable to drive around and even return back from office. The reason – the same – lack of manners by the menfolk. The rape rate is so high around the IT parks that instead of taking any action against them; govt is advising women to beware for themselves. As someone said about Chh. Shivaji, yes we require such political will and justice system to protect women.

 16. अभय says:

  कडक शिक्षा असावी असे वाटणे स्वाभाविक आहे . महिला चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे मत मात्र वेगळे आहे. बलात्काराच्या घटनेत गुन्हा समोर न येण्याचे , गुन्हा नोदावला न जाण्याचे , केस चा निकाल स्त्रीच्या बाजूने लागण्याचे प्रमाण खूप कमी आहे . याला जवाबदार समाजाची मानसिकता आणि स्त्रीची जडण घडण आहे. यामुळे पिडीत महिलेचे नाव , फोटो जाहीर न करण्याचे बंधन माध्यमांवर घालावे लागले . हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शिक्षा कडक ठेवून काही खास साध्य होईल असे नाही .
  बलात्काराच्या घटनेतल्या काही गुन्ह्यात घरातल्याच व्यक्ती सहभागी असतात अशा वेळेस फाशीची शिक्षा ठेवल्यास गुन्हा दाखल न होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे . अशी घटना घडल्यावर पिडीत महिलेला यातून सावरायला , अन्य कोणाला हि गोष्ट सांगायला वेळ लागतो त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेईपर्यंत इतका वेळ जातो कि मेडिकल चेक अप चा खास उपयोग होत नाही . पिडीत महिलेची उलट तपासणी हि अत्यंत मानहानी कारक असते हि गोष्ट खरी असली तरी याला पर्याय नाही अन्यथा खोट्या केसेस मधला खोटे पण कसा कळणार ?
  वडिलांनी मुलाला मुलगी पटव असा सल्ला देणे अयोग्य ठरेल जर त्यांनाही फक्त टाइम पास अभिप्रेत असेल. अन्यथा मुलाने आपला जोडीदार स्वत निवडावा यासाठी दिलेली ती संमती असू शकते .
  एर्हवी जर वेग वेगळ्या माध्यमातून आपल्याला स्त्री देहाचे प्रदर्शन अभिप्रेत असते मग त्या क्रिकेट मधल्या चीअर गर्ल असोत कि कोणत्याही कार्यक्रमात मंचावर वर सत्काराच्या वस्तू वगैरे देणाऱ्या मुलींची सौंदर्य बघून होणारी निवड – तर या समाजात दुसरे काय होणार ? चीअर गर्ल हा वर वर काहींना राजी खुशीचा मामला वाटतो ( जसे तमाशालाही आपण कला म्हणून गोंजारताना त्यातले शोषण आणि स्त्री कडे बघणारी उपभोग वादी दृष्टी नजरे आड करत असतोच ) पण अशाच प्रकारे स्त्रियांना रिझवण्या साठी तरुण , चांगली दिसणारी मुले ठेवावीत हि कल्पना मात्र सहन होत नाही

 17. Shweta says:

  काका;

  हा लेख वाचून अभिप्राय द्यावा कि नाही ह्याच विचारत पडले होते… “स्त्रीच्या अब्रूची किंमत काय असावी..???” हाच प्रश्न समाजाने प्रत्येक पातळीवर प्रत्येक वर्गाला विचारला असावा… पण मनाला संतुष्ट करणारे उत्तर अजूनही कदाचित सापडले नसावेच…

  आपण इथे स्त्रीच्या अब्रूवर हल्ला करणाऱ्या मानवी श्वापदांचा उल्लेख केलात, पण हीच श्वापद स्त्रीला प्रत्येक गर्दीतच का..?? कधी कधी स्वतःच्या हक्काच्या घरातही भेटतात कि..??. अशा परिस्थितीत त्याची शिक्षा काय असावी…??
  अब्रूचा बलात्कार होतो.. तसा तिच्या मनाचा, इच्छांचा…नि कधी कधी शारीरिक भूक भागवण्याकरता घरातल्याच सर्वात जवळच्या व्यक्तीने केलेल्या जबरदस्तीला हि कदाचित बलात्कारच म्हणावा का..??? नि म्हणावा तर त्याची शिक्षा काय असावी…???

  कितीही विचार केला तरी न उलगडणारी कोडी आहेत हि… नावाने “स्त्री स्वातंत्र्य” ह्या समाजाने स्त्रीला बहाल केल आहे.. फक्त नावापुरतंच कदाचित…!!!!!

  —- श्वेता नरे

 18. vijay bhate says:

  आपल्या वैदिक वाङ्मयात उल्लेख येतो की आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सर्वच प्राण्यांना समान गरज आहेत पण बुद्धी आणि धर्मपालन हीच वैशिष्ट्ये आहेत जी माणसाला पशुंपासून वेगळे करतात. पण आता ह्याच देशात पुरुषापेक्षा पशु अधिक श्रेष्ठ आहेत असे वाटायला लागते.

 19. Ashok Narayan Jadhav says:

  for comitting rape, one thing many people do not consider that high income group people especially girls use so provocative clothes that other common people gets lured, attracted towards them. However, they cannot implement their ideas on them due to social restriction. Then they use simple way to get them satisfied by catching any small or orphan girl from the vicinity area. So the root cause in fact goes to such things happening on ivory tower where they are well protected and safe; but the victims are made from the lower living area. So also the flow of information of various types is much exhastive and forceful that noboday cannot get detached from that resulting into committing such henious deeds forming dogma to humanity. In view of this our hindu culture emphasizing importance of control stands good and logical.

 20. Shivaji Patil
  , nmala vatat ya asha ghatnana film ind.jababdar aahe ,pictar madhil drushya pahun attachi navin pidhi ,jast karun ledis che praman adhik aahe tyanche rahni man yala karni bhut aahe v
  kahi pramanat aatachi tarun mule dekhil yala karnibhut aahet

  • शिवाजी पाटील
   ब्लॉग वर आपले स्वागत. अहो, ज्यांच्यावर अत्याचार होतात , त्यांनाच कसे कारणीभूत ठरवू शकतो आपण? मुस्लीम धर्मात ज्याप्रमाणे काळा बुरखा घालतात तसे तर शक्य नाही ना? आणि कपडे कसे वापरायचे याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहेच ना? अगदी बुरखा घातलेल्या स्त्रियांवर पण अत्याचार होतातच ना? ही एक वाईट मनोवृत्ती आहे.. एवढंच कारण आहे यात.

 21. swacchand says:

  स्त्रियांवरील बलात्कार हा अतिशय ज्वलंत व गुंतागुंतीचा असा विषय तर आहेच, पण त्याही पेक्षा स्त्रियांच्या आत्मा-सन्मानाच्या दृष्टीनेही तेव्हढाच महत्वाचा आहे. तुम्ही अत्यंत परखडपणे हा विषय आपल्या ब्लॉग वर आणल्याबद्दल प्रथम आपले मनापासून आभार मानतो.
  आपले अतिशय सुस्पष्ट विचार व आत्तापर्यंत व्यक्त झालेल्या सर्व प्रतिक्रियांशी मी पुर्णपणे सहमत आहेच,तरीही उपरोक्त विषयासंदर्भात मला सुचलेला एक वेगळा मुद्दा इथे सर्वांच्या चर्चेसाठी मांडू इच्छितो तो असा की,
  आजकालच्या महिला व तरुणीही आपली भारतीय संस्कृति व चांगले संस्कार विसरून जाऊन वेळी-अवेळी बाहेरच्या जगात वावरतांना उत्तान/तोकडे कपडे घालून , भडक/बटबटीत मेकअपकरून,सर्वांगाचे नको एव्हढे प्रदर्शन करीत व पुरषाच्या भावना चाळवतील अशा रीतीने वागतांना दिसतात ,मग त्याचेच पर्यावसान जर एखादे वेळी असे झाले तर व्यक्तिश:.मलातरी असे वाटते की आशा प्रसंगी पुरुष हा जरी दोषी असला तरी थोडाफार दोष स्त्रियांचाकडेही जाऊ शकतो.

 22. Pingback: स्त्री जन्मा.. | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s