पटोला

हा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा  “सुरभी”  नावाचा कार्यक्रम    आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम  होता तो. भारतातल्या वैविध्यपूर्ण गोष्टी, कला,संगीत वगैरे विषयांवरचा हा कार्यक्रम अजूनही लक्षात आहे. चांगल्या कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नाहीत, आणि   ते गोपी बाऊ किंवा अक्षरा आणि त्या सुहाना सारखे ( ही सगळी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत , जी नेहेमी कानावर पडतात, कार्यक्रमांची नावं माहिती नाहीत ) भिकार कार्यक्रम प्रेक्षकांच्या माथी मारले जातात- असो, विषयांतर होतंय!

चौदा विद्या आणि चौसष्ट कला आहेत असं म्हणतात.  कांही कला तर फक्त वंशपरंपरागत वारसा हक्काने पुढल्या पिढीकडे गेल्या असतात. एका घरातले वडिलधारे लोकं आपल्या पुढच्या पिढीच्या उदरभरणासाठी ह्या कला शिकवीत असत. आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती शिवाय इतर कोणालाही ही कला येऊ नये हा उद्देश असायचा, आणि अशाच तर्‍हेने पिढी तर पिढी कलेचा वारसा जात होता.  हल्ली पुढली पिढी पूर्वापार चालत आलेल्या कलेची जोपासना करेल का याची शाश्वती देता येत नाही.

काही कला तर काळाच्या ओघात   नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या कलांसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि इतके कष्ट घेतल्यावर पण मिळणारा पैसा हा खूप असेल असे नाही- म्हणूनच वडिलोपार्जित कला जोपासण्या पेक्षा ,इतर काही जास्त  पैसे आणि समाजात प्रतिष्ठा देणारे काम करण्याकडे  तरूण पिढीचा कल असतो.

अहमदाबाद जवळ  साधारण १०० किमी वर असलेले एक  पाटण नावाचे  प्राचीन  गांव. जर इथे जवळच ऒएनजीसी ची साईट नसती, तर कदाचित इकडे आलो पण नसतो. या गावाचा उल्लेख पुरातन लेखांमधून बरेचदा येतो. हे गांव मुख्यत्वेकरून प्रसिद्ध आहे ते केवळ ’पटॊला’ या साडीच्या प्रकारासाठी आणि जवळच असलेल्या एका  हेरिटेज ’ रानीकी वाव’ ह्या विहिरी साठी.

गावाच्या वेशीवर अजूनही बुरुज आणि भिंत दिसते. गावात प्रवेश करण्यासाठी असलेला दिंडी दरवाजा  अजूनही शाबूत आहे.जवळपास हजार बाराशे वर्ष जूनी असलेली तटबंदी पण अजूनही गतकाळाच्या वैभवाची साक्ष देते. वेशीच्या आत शिरल्या बरोबर,दोन्ही बाजूला असलेले जुन्या प्रकारचे वाडे, एका निराळ्याच विश्वात   आलोय याची जाणीव होते.

हे गांव प्रसिद्ध आहे ते केवळ इथे विणल्या जाणाऱ्या ’पटॊल” या साडी प्रकारासाठी.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या लेखनातही या पटोला/पाटण चा उल्लेख आलेला आहे (स्त्रोत – एन्सायक्लोपेडीया म्हणजे  बायको  ). हजारो वर्षांपासून   ही रंगीत वस्त्र विणण्याची कला अस्तित्वात आहे.   पटोला साडी विणणे म्हणजे   खूप कठीण काम!   सिल्क चा दोरा रंगवून त्याची साडी विणणे – हे जर सांगितले तर ते खूप सोपे वाटेल पण तितकं सोपं नाही ते हे जेंव्हा तुम्ही साडी विणताना पहाता तेंव्हाच लक्षात येते

गावात शिरल्यावर पटोला हाऊस कुठे आहे ह्याची चौकशी करत निघालो. वेशी पासून एक किमी अंतरावर एक वाडा दिसला, त्यावर ’पटोला हाऊ” ची पाटी दिमाखात झळकत होती.आम्ही आत शिरलो, तर समोरच एक विणकाम करण्याचा माग लावून ठेवलेला होता. मागावर अर्धवट विणलेली साडी होती. भिंती वर बऱ्याच संस्थांनी दिलेली प्रशस्ती पत्रं,  आणि कॉलीन पॉवेल बरोबरचा फोटो, अमिताभ बच्चन इथे येऊन गेला होता तेंव्हा त्याच्याबरोबर काढलेला मालकाचा फोटो लावलेला होता. प्रशस्ती पत्रं तर अगणित होती- अगदी जर्मनी, जपान, मलेशिया, अमेरीका वगैरे अनेक देशांनी त्यांच्या या कलेची दखल घेऊन दिलेली प्रशस्ती पत्रं त्या मातीच्या भिंतीवर लटकलेली होती. कपाटात बऱ्याच ट्रॉफी ठेवलेल्या होत्या. फेम ऑफ वॉल चा फोटो राहिला काढायचा.

समोरच  पाटण पटॊला हाऊसचे मालक रोहित सालवी  उभे होते. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी अगत्याने स्वागत केले ,आणि थोडी प्राथमिक माहिती विचारल्यावर , पटोला या साडीच्या प्रकाराबद्दल माहिती देणे सुरु केले. इतर कुठल्याही प्रकारात साडी विणतांना एकाच रंगाचे दोरे वापरले जातात,  आणि नंतर मग त्यावर प्रिंटींग केले जाते. किंवा निरनिराळ्या रंगाचे दोरे वापरून डिझाइन तयार  केली जाते. पण या पटोला प्रकारात तसे नसते.

रोहित ने आम्हाला मागावर लावलेले रेशमी दोरे  आणि  अर्धवट विणलेली साडी  दाखवली. रेशमी दोऱ्यांना आधीपासूनच निरनिराळ्या रंगात रंगवले होते- उभे आणि आडवे दोरे विणण्या पूर्वी रंगवून त्याचे नंतर कापड विणायचे, की आपोआपच त्याचे डिझाइन तयार  होते. प्रत्येक दोरा हा वेगवेगळा रंगवलेला असतो.  कपड्याच्या मागच्या किंवा समोरच्या् बाजूने एक सारखेच डिझाइन दिसते.

मुद्दाम हातमागा जवळ जाऊन निरखून पाहिले तर प्रत्येक दोरा वेगवेगळा रंगवला होता. एकच दोरा आधी पिवळा, नंतर काही अंतरावर हिरवा, मग लाल, मग पुन्हा हिरवा असा काहीसा रंगवला होता. दोरा असा रंगवला होता की , ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी बरोबर डिझाइन विणलं जाईल. पटोला साडी ही प्युअर सिल्कची असते. एक साडी तयार होण्यासाठी कमीतकमी चार महिने वेळ लागतो. या मधे लागणारे कष्ट पहाता याची कमीत कमी  किंमत   दिड लाख रुपये इतकी असते.तर जास्तित जास्त किंमत ही तुम्ही निवडलेल्या डिझाइनवर अवलंबून असते. कुठलीही साडी ही केवळ ऑर्डर नुसार बनवली जाते. ही साडी कशी बनवली जाते हे रोहित सालवी यांनी दाखवले. इथे कामं करणारे सगळे लोकं म्हणजे कुटुंबातली मंडळी आहेत. सगळे भाऊ , आणि इतर स्त्रिया हे काम करतात.

आधी रेशीम आल्यावर , जितक्या लांबीचे कापड विणायचे आहे तितक्या लांबीचे तुकडे एकत्र केले जातात. प्रडिझाइन हे आधी कागदावर काढले जाते, आणि एकदा डिझाइन पक्कं झाल्यावर ज्या ठिकाणी रंग द्यायचाय त्या ठिकाणी बांधणी प्रमाणे दोऱ्यांना बांधले जाते.  जेंव्हा दोरे  रंगात बुडवले जातात, तेंव्हा फक्त उघडा भाग रंगवला जातो, आणि जो भाग बांधलेला  आहे तो  न रंगवलेला रहातो. जितके रंग , तितक्या प्रकारच्या बांधणी- बांधणीच्या साड्या पाहिल्या होत्या, पण बांधणीचे रंगवलेले दोरे म्हणजे अशक्य वाटत होते मला तरी. एका रंगात दोरे बुडवून रंगवून झाल्यावर काही ठिकाणचे बांधलेले सोडले जाते.  ह्या बद्दल जास्त

लिहीणे कठीण आ्हे,  आणि पुन्हा दुसरा रंग दिला जातो. याचे फोटो खाली देतोय. रोहितचे भाऊ स्वतः समोर डिझाइन ठेऊन बांधणीचे काम करीत होते. कुठलेही स्केल किंवा इतर काही साधन नसतांना केवळ नजरेने बघून बांधणीचे काम सुरु होते. इतकं पर्फेक्शन बहुतेक केवळ अनुभवातूनच येऊ शकते.

रंगवून झाल्यावर हे दोरे मागावर सेट केले जातात. उभे दोरे आणि आडवे दोरे हे वेगवेगळे रंगवले जातात. मागावर विणताना डिझाइन बर हुकुम योग्य त्या ठिकाणी योग्य रंग येऊन कपडा विणला जातो, आणि एक सुंदर डिझाइन तयार होते. हे पहातांना नकळत , त्या कलाकाराच्या कामासाठी तोंडून ” वाह” निघाल्याशिवाय रहात नाही. या कामासाठी नैसर्गिक  पक्के  रंग वापरण्याची पद्धत आहे. कशीही धुतली , तरीही त्या साडीचा रंग फिका होत नाही.  दुकानात एक ३०० वर्ष जूनी साडी ठेवलेली आहे एका फ्रेम मधे! की जी फाटली आहे, पण रंग मात्र अजूनही पक्का दिसतो.

ह्या गावातल्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय होता. पूर्वी  अशा प्रकारचे कपडे विणण्याचा व्यवसाय करणारी बरीच म्हणजे  जवळपास सातशे च्या  वर  कुटुंब होती, पण गेल्या काही शताब्दी मधे मात्र बहुसंख्य लोकांनी हा धंदा सोडून इतर उद्योगात उडी घेतली आहे. शिक्षण, घेऊन डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनिअर होणारे पण बरेच लोकं आहेत. दुर्दैवाने सध्या फक्त दोन कुटुंबात ही कला जिवंत आहे. आजच्या घडीला फक्त दोनच कुटुंब हा  पिढीजात व्यवसाय करतात किंवा या प्रकारचे कापड विणु शकतात.

आणि जाता जाता एक माहिती, मार्केट मधे मिळणारी पटोला साडी ही खरी पटोला नसतेच.खरी  पटोला साडी  दिड लाखाच्या वर असते. पटोला साडी ही फक्त ऑर्डर प्रमाणेच बनवून मिळते. हवी असेल तर   त्यांची साईट इथे पहाता येईल.(http://patanpatola.com/inside.html)

रोहित म्हणाले, जपान, अमेरिका, युरोपियन   देशांनी  त्याला मुद्दाम बोलावले होते प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी साठी. त्यांनी हा माग आणि रेशीम घेऊन त्याने जगभर प्रवास केलेला आहे.   जपान ने असा कपडा पॉवर लुम वर बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य  झाले नाही. बऱ्याच देशांनी दिलेली सर्टिफिकेट्स आणि इतर ट्रॉफी पाहिल्यावर त्यांच्या ही कला आपल्या देशात असल्याचा – आणि आपल्याला पहायला मिळाल्याने खूप अभिमान आणि  समाधान वाटले.   ही कला पहाण्यासाठी  अमिताभ बच्चन, मलेशियाचे प्रेसिडेंट ,पहिले राष्ट्रपती,नमो, वगैरे बरेच लोकं  इथे या घरात येऊन गेले होते असे रोहित अभिमानाने सांगतात. 

  आपल्या पुढच्या  किती पिढ्यां पर्यंत ही कला शिल्लक राहील ?  आपल्या पुढच्या पिढीला हा प्रकार पहायला तरी मिळेल का? हा प्रश्न मनात घेऊनच तिथून पाय काढता घेतला.

This slideshow requires JavaScript.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

56 Responses to पटोला

 1. shailesh says:

  वाचनीय आणि माहितीपूर्ण…इंग्रजांनी हेच केलं ..भारतात जिथे जमेल आणि जस जमेल तेंव्हा इथल्या कला संपवल्या.
  लोकांच राहणीमान आणि गरजा बदलवल्या..

  • शैलेश
   आपण लुई फिलिप च्या शर्टसाठी अडीच हजार देतो, पण हॅंडलूमचा कपडा स्वस्त मिळावा अशी अपेक्षा करतो.आपल्या मनात कष्टाची किंमत कमी असते.
   राहणीमान आणि गरजा बदलल्या आहेत, कारण आज सगळे जण मटेरिअलिस्टीक गोष्टींनाच जास्त महत्व देतात.

   केवळ इंग्रज नाही, आपण सगळे पण जुन्या कला संपण्यासाठी कारणीभूत आहोत. जुन्या गोष्टींना/ कलांना पुरेसे महत्व न देणे हे एक कारण, आणि ्जर कला जोपासायची म्हंटलं तर त्यातून मिळणारा अपुरा मोबदला….

   • Guru says:

    काका, लुई फ़िलिप ते पिटर इंग्लंड सगळे ब्रॅंड्स अरविंद मिल्स वगैरे देसी कंपन्यांचेच आहेत तरी ही “लुई” “पिटर” ला आपण सहज “नावावर” २५०० देतो कारण मुळात आपण अजुनही मानसिक गुलाम आहोत, “इंपोर्टेड” तेच उत्तम ही आपली मानसिकता आहे…… कार्बाईड टाकुन पिकवलेल्या आंबे सफ़रचंदांवर जेव्हा “बेस्ट एक्स्पोर्ट” चे स्टीकर लागते तेव्हा मिटक्या मारत ते विष खायला पण आपण तयार असतो

 2. Ashwini says:

  Speechless

  • अश्विनी,
   जेंव्हा मी प्रत्येक दोरा वेगवेगळा रंगवून मग तो विणलेला पाहिला, तेंव्हा माझा पण विश्वास बसत नव्हता- पण सगळं काही डोळ्यापुढेच होतं. कधी शक्य झाल्यास अहमदाबादला गेल्यावर इथे जाऊन यायला हरकत नाही.

 3. व्वा व्वा… एकदम नजाकत भरी कला आहे. आवडली माहिती 🙂 🙂

 4. thanthanpal says:

  येवला तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पैठणी विणण्या करता जगप्रसिद्ध आहेत. पैठणी साडी, सोन्या व चांदीच्या तारांनी बनवली जाते.पदरावर मोर किंवा बदक असलेली साडी म्हणजेच पैठणी!कित्येक हजार ते लाखोंमध्ये विकली जाणारी साडी म्हणजे पैठणीच! पैठणी प्रमाणेच औरंगाबाचे सिल्क (रेशीम ) असलेली हिमरू शाल सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे.पर्सिअन कलाकुसर असलेली ही शाल विणकामाचे उत्तम प्रतिक आहे. दोन प्रकारच्या धाग्यांचा मिलाफ हे हिमरू विणकामाचं वैशिष्ट्य. औरंगाबादच्या हिमरूला त्याच्या अद्वितीय शैली आणि डिझाइनमुळे मागणी असली तरीही आज हिमरू विणकाम करणारे फारच थोडे कारागीर उरले आहेत. आता तर इंग्लंड आणि अमेरिकेतही पैठण्यांची निर्यात होत असते.जगात इतरत्र कुठेच तयार होत नसलेली अशी ही पैठणी भारतीय संस्कृतीचा वारसा व महाराष्ट्राची शान म्हणून मानाने जगभर मिरवत आहे. एकूणच ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने पैठणीचा खप होत आहे. मात्र तिच्या किमतीबाबत तक्रारीचा सूर कायम आहे. एकीकडे ग्राहक जास्त किमतीबद्दल नाराजी व्यक्त करतात तर दुसरीकडे कष्टाच्या मानाने पुरेसा मोबदला मिळत नसल्याचे रडगाणे विणकर-कारागीर गात असतात. अडचणींच्या या उभ्या आडव्या धाग्यांच्या गुंत्यात पैठणी व्यवसाय गुरफटला आहे……….भारतात हे असेच चालते. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी असो वा परंपरागत पारंपरिक वस्तू बनवणारा कारागीर असो त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला कधीच मिळत नाही………..पण या वस्तू विकणारे मध्यस्त दलाल व्यापारी मात्र मालामाल होतात. जय हो !! जय हो!!!

  • ठणठणपाळ,
   अन्नधान्य पिकवणारा शेतकरी असो वा परंपरागत पारंपरिक वस्तू बनवणारा कारागीर असो त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला कधीच मिळत नाही…
   हे वाक्य शंभर टक्के खरं आहे. म्हणूनच जुन्या कलांच ऱ्हास होत चाललाय . पैठणी चं पुनरुज्जिवन शक्य झालं, कारण ती विणणं तस सोपं आहे, पण पटोला मधे प्रत्येक दोरा वेगवेगळा रंगवलेला असतो आणि म्हणूनच ही कला ते दोन कुटुंब किती दिवस जिवंत ठेवतात हे पहाणं फक्त आपल्या हाती आहे.

 5. प्रदीप भाटे says:

  वाचनीय आणि माहितीपूर्ण

 6. SURAJ MOHITE says:

  Sir i want to read e-books on the net. pl give me some links.
  after all your writing is unspeakable.

 7. anuvina says:

  साहेब,
  एखादा माहितीपूर्ण लेख कसा असावा याचं उत्तम उदाहरण पेश केलंय तुम्ही. वाचताना प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद मिळतो. शब्दांनी स्थळ काळ जिवंत करण्याची ताकद सगळ्यांकडे नसते ती तुमच्या लेखनात दिसून येते. असा ब्लॉग वाचायला मिळणं हे माझे भाग्य (पुस्तक, मासिक वाचनाचा अतीव कंटाळा येतो त्यापेक्षा ब्लॉग उत्तम).
  धन्यवाद,
  अनुविना

  • मित्रा
   धन्यवाद. इतकी तारीफ केली तुम्ही, मला चक्क ओशाळल्यासारखं होतंय. मनःपूर्वक आभार.

 8. Vrunda Kulkarni says:

  Khup chan lekh. He kala jopasanaryanche kautuk karawe tevadhe thodech. Ya lekhat kelele warnan sundarach. Ya sadiwishayi asaleli mahiti update zali.Ani kaka, tumhala manapasun complement , Tumache blog etake wegwegalya wishayawarache asatat ki pudhacha lekh kay asel yachi utsukata ajibat kami hoat nahi. Engineering sarkya technical field madhe kam karatana dekhil etak wachaniy likhan kharach appreciable aahe. Waiting for next blog!!!!

 9. GanesH says:

  Kaka khoop mast mahiti dili aahe….
  Encyclopedia chi defination vishesh aavdali aahe 🙂

 10. वाह काका, अप्रतिम कलेची ओळख करून दिलीत! ‘केवळ’ अनुभवाच महत्व कळण्यासाठी वरील परफेक्शन अगदीच उत्तम उदाहरण! बाकी किमतीबाबत प्रतिक्रियेला काहिही स्कोप नाही, अलबत कला अमुल्य आहे!
  असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आठवल… चॉकलेटचा बंगला आहेच पण त्यात नाचण्याच भाग्य नाहीये… तरीही 🙂
  (टीप: त्या विषयांतरा ला +१, सुरभि महाग असावी प्रायोजकांच्या भिकार अकेलेला, आणि त्याबाबतीत आता तर बराच आनंद आहे idiotbox वर)

  • अभि्षेक
   किंमत दिड लाख पण कमीच आहे या साठी!
   आज तुम्हाला दिसते आहे, आणि मिळू पण शकते ही साडी. फक्त वेटींग पिरियड पाच वर्ष आहे.. 🙂 कदाचित अजून काही वर्षानंतर ही दिसणारही नाही.

   • कलेची किंमत पैशात करता येत नाही, म्हणूनच एखादं लहानसं पेंटिंग करोडॊ रुपयात विकलं जातं.

    • काका, कलेची किंमत पैशात खरंच नाही करता येणार. पण “ये जो थोडेसे है पैसे… ” हा माझा सर्वसामान्य(!) विचार. (भरकटलो, 🙂 माफी)
     एखादी exquisite कला जेंव्हा एवढी exclusive होते, आर्थिक पडत्या काळात अशा कलांचा ऱ्हास होतो. दोन कारणे, एक कुशल मनुष्यबळ आणि दुसर अर्थपुरवठा. At such situations ‘Art’ is above the basic needs. Hence a popular but simple, and which is inevitable lasts long.
     जर आत्ताच ५ वर्षांच वेटिंग आहे खऱ्या पटोला ला तर “काही वर्षांनी ही कला दिसणार नाही” हे जरा अशक्यच आहे मात्र. त्या कलाकारांना खूप शुभेच्छा.

     • पाच वर्ष शब्दशः घेऊ नका, मला म्हणायचं होतं की त्या किमती मधे पण लोकं विकत घेतात या साड्या!

      • अभिषेक says:

       🙂 काका अहो लोकच तशी exclusive असणार ती! (आणि हो, मला एकेरी आवडेल)

       • ओर्जिनल ची किंमत दिड लाखाच्या पुढे आणि सेमी पटोला, म्हणजे एक दोरा रंगवलेला दुसरा प्लेन अशी पंधरा च्या आसपास..

 11. सोनल says:

  हा लेख वाचल्यावर खूप अभिमान वाटला स्वताच्या जातीचा कारण मी जातीने कोष्टी आहे. खरं तर कपडे विणणे हा आमचा व्यवसाय आहे. पण आम्ही तो करत नाही. पण माज्या काकांची, मामाची आणि आत्याच्या मुली आहेत येवल्या मध्ये (लग्न होऊन गेलेल्या) त्यांच्याकडे मात्र माग आहेत आणि पैठण्या हि बनतात. माज्या वडिलांच्या घरी गावाला सुद्धा माग आहे आणि माज्या आत्यांच्या घरी सुद्धा हातमाग आहेत. त्यावर सतरंजी, चादर बनवली जाते. माज्या आईला सुद्धा हे काम येत पण बरीच वर्ष केलेला नाही मुंबईला आल्या पासून.
  sorry बरंच लिहिलं गेल पण खूप आनंद आणि गर्व वाटतो आहे हे लिहिताना. धन्यवाद मनापासून. गर्वाने छाती फुगली आहे.

 12. Soniya says:

  khup vachniya lekh ahe. asha kititari sundar sundar kala astiteat asatil.
  aapalyala mahitihi nasatil.
  asha kalakarana sarkarane protsahan dile pahije.
  baki lekh apratim.

 13. nagesh says:

  आपल्या पुढच्या किती पिढ्यां पर्यंत ही कला शिल्लक राहील ? आपल्या पुढच्या पिढीला हा प्रकार पहायला तरी मिळेल का? ……. Vichar karanyachi garaj aahe sir! … khupach serious maater sangun gelat shevati….

  • नागेश

   😦 खरं आहे.. दोनच कुटुंबं बाकी आहेत, अजून किती वर्ष हे सुरु ठेवतात ते देव जाणे!

 14. Guru says:

  आमच्या “मनिमाऊ” ला “पटोला” भयंकर आवडते हो काका!!!!!!, आता नेक्स्ट टाईम ह्या भांडवलावर काही “पटोला ट्रिव्हिया” बोललो तर मला काही “पर्क्स” मिळण्याची फ़ुल निश्चिंती आहे बघा!!! थॅंक्स……… तुमच्या एन्साय्क्लोपिडीया (म्हणजेच काकूंना) पण आभार सांगा……

 15. yogseh says:

  आज कालची पिढी पाशिमात्य फशन च्या आहारी गेली आहे. सध्या तर भारतीय पेहराव पाहण्यासाठी ग्रामीण भागात जावे लागते. किवा सांस्कृतिक दिवसाची वाट पहावी लागते. पटोला सारखी वस्त्र बनवून ते भारतीय कला जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मनापासून सलाम , आणि हि कलाकृती आमच्या समोर आणल्याबद्दल तुमचेही आभार…… 🙂

  • योगेश
   तुमचे म्हणणॆ अगदी खरे आहे. हजारो वर्षापासून चालत आलेल्या या कला जिवंत रहायला हव्या एवढीच अपेक्षा.

 16. Atul Ranade says:

  Khupach Chhan Mahiti.

 17. अप्रतिम पोस्ट ! खरंच कसलं कष्टाचं काम आहे हे आणि त्यामानाने मिळणारा पैसा, प्रतिष्ठा किती तोकडी !!:(

 18. archana says:

  very very informative. waiting for more such info.

 19. krantis says:

  खूप चांगली माहिती. कमालीची कलाकारी दिसते आहे. अशा कलाकारीपुढे नतमस्तक!

  • क्रांती
   खूप सुंदर प्रकार आहे हा. एक अप्रतीम अनुभव आहे हे काम पहायला मिळणं म्हणजे. धन्यवाद.

 20. Madhuri Gawde says:

  evdhya kimtit saari. mhanje baghun samaadhan. pan maahiti maatra laakhachi.

  • माधुरी
   सेमी पटोला पण मिळते ना, त्या मधे एक दोरा आधीपासून रंगवलेला असतो, तर दुसरा दोरा हा प्लेन असतो. ती नक्कीच घेता येऊ शकेल. पंधराच्या आसपास आहे ती.. 🙂

 21. sakshi nerkar says:

  gr8 mahendraji khup chhan lekh aani mahiti saddi ghena tar shakya nnahi pan mi ti saddi pahayala naaki jain lavakarach. thanks, aani mi dekhil nagpurchich aahe sadhya punyat aasate lagnanantar.

  • साक्षी
   धन्यवाद..याच गावात एक जूनी विहीर आहे तिला रानीकी वाव म्हणतात, त्या विहिरीला पण भेट द्यायला हरकत नाही. त्यावर पण एक पोस्ट लिहितो आज. 🙂

 22. raj jain says:

  काका, वाचनीय आणि माहितीपूर्ण लेखन.
  आवडले.

 23. Girish says:

  mbk, remember we visited similar factory who manufactured bandhani sari? It was near junagad i guess. I could never visit patan though..

  • गिरीश
   आठवतंय मला. बहूतेक जुनागडजवळची जागा होती ती. अरे आपण मेहसाणाला इतकी वर्ष यायचॊ, पण इथे कधी का आलो नाही तेच समजत नाही. इथेच पुढे ती रानीकी वाव पण आहे.. पाटणला!

 24. महेश कुलकर्णी, says:

  खूप स्य्दार व छान प्रकार आहे मी स्वत;बघितला आहे,येवला इथे हा प्रकार प्रत्यक्ष बघितला आहे,जुन्या आठवणीना उजाळा दिला लेख वाचनीय आणि माहितीपूर्णआहे,खूप सुंदर प्रकार आहे हा. एक अप्रतीम अनुभव आहे

  • महेश
   धन्यवाद. येवल्याची पैठणी मी पण पाहिली होती. तो प्रकार या पेक्षा सोपा. कारण इथे प्रत्येक दोरा वेगवेगळा रंगवला जातो, आणि मग विणलं जातं.

 25. आमचे पूर्वज विणकामच करत होते. विणणारे म्हणजे विणकर म्हणजेच कोष्टी. माझ्या लहान पाणी घरी हातमाग होते. पण त्याकाळी ह्या उद्योगाला अवकळा आली आणि उद्योग बंद करावे लागले. नंतर पुनः शासनाने ह्या उद्योगाला प्रोत्साहन दिले. हातमागावर विणलेला कपडा मशीन पेक्षा कित्येक पतीने सुंदर असतो.

  • रविंद्रजी
   खरंय तुमचं.. कपडा दिसतो सुंदर पण कष्टही खूप लागतात त्याला.. प्रतिक्रियेसाठी आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s