निराशा

जगात निराशावादी लोकांचे प्रमाण वाढलेले आहे हे नक्की. कुरकुरे लोकं हे नैराश्याने ग्रासलेले लोकं.नैराश्य येण्यास कुठलंही लहानसं कारण पुरेसे असते, आणि  जर  हे कारण फार काळ टिकून राहिलं की मग मात्र   आत्महत्येचे विचार मनात येणं सुरु होतात.   आत्महत्या करणे हा  काही सगळ्या प्रॉब्लेम्स चे उत्तर होऊ शकत नाही.  नैराश्य आलं की फक्त एकटं न रहाता, आपल्या मित्राबरोबर, जरी राहिलं तरीही त्या भावनेवर मात केली जाऊ शकते.  एखाद्या मित्र, मैत्रीण, आई वडील किंवा जो कोणी जवळचा असेल त्याच्याशी  मनात काय ते बोलून संवाद साधल्यास या नैराश्यातून बाहेर पडणॆ सहज शक्य होऊ शकते.  पण जर एखादा मुलगा  हजारो मित्रांच्या मधे राहूनही एकटा असेल तर?

नैराश्य यायला काही पण चालतं. शेअर मार्केट मधे गुंतवणूक ,एखाद्या मुली वरचे प्रेम ,  परीक्षेत नापास होणे किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळणे, फेसबुक वर किंवा सोशल मिडीयावर केली जाणारी एखाद्याची फरफट( सायबर बुलींग) वगैरे  अशी  अनेक  कारणं   असू शकतात.

“स्पर्धेतील मिळवले जाणारे यश म्हणजेच सुख” या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेऊन जगणारी अनेक मुलं दिसतात. मग   स्पर्धांमुळे  इतर हुशार मुलांशी बरोबरी करण्यासाठी  अभ्यास एके अभ्यास करत, जीवनातल्या इतर सगळ्या आनंदाला फाटा देऊन,  मानसिक दृष्ट्या  मार्कांच्या मागे फरफटत जाणारी बरीच मुलं दिसतात. या रेस मधे जर जिंकलो नाही तर आयुष्यात काही अर्थ नाही असे काहीसे विचार मनात घर करतात- आणि शेवटी ह्याच विचारांच्या मुळे नैराश्य येते.

पुढे मोठं झाल्यावर शिक्षण पुर्ण करून नोकरीला लागल्यावर,  लहानपणी मनावर  बिंबवलेल्या नैतिकतेच्या धड्यांमुळे  जगात् असलेल्या आदर्श वादावर अवजवी विश्वास ठेवला जातो- पण या भौतिकी जगात  जेंव्हा तो आदर्श वाद कुठेच दिसत नाही तेंव्हा मात्र वैफल्याची भावना मनात निर्माण होते.

आयुष्यातल्या कालच्या शाश्वत वाटणाऱ्या गोष्टी आज कोलमडून पडलेल्या दिसल्या की  हे जीवन अशाश्वत आहे हे लक्षात येऊन  भीती वाटू लागते.(जसे  आजी- आजोबांचा, किंवा घरातल्या इतर कोणाचा मृत्यु या जगात कोणीच शाश्वत नाही याची जाण करून देतं).  आजच्या दिवसा कडे पूर्णपणे  दुर्लक्ष करून भविष्यात आपल्यासाठी  काय मांडून ठेवलं आहे, यावर विचार करुन आजच्या दिवसातला आनंद घालवणाऱ्या लोकांमधे   माझा  पहिला  नंबर लागतो.

मृत्युची भीती ही प्रत्येकालाच वाटत असते.    भीती जरी वाटत असली, तरी मृत्यु आणि जिवनामधे एक शर्यत सुरु  असते. आपण जीवन जगायला पुढे धावत असतो, आणि मृत्यु आपला पाठलाग करीत असतो. आपण थांबलो, की मृत्यु आपल्याला गाठणार हे नक्की, हे माहिती असल्याने धडपडत का होईना पण कसंही करून, प्रसंगी खुरडत का होईना,   पुढे सरकत  रहाण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण—– जेंव्हा आपल्या परीचयातलाच एखादा  धावणं थांबवून मागे वळून मृत्युकडे धावत जाऊन त्याला कवटाळतो, तेंव्हा आश्चर्य   वाटतं की त्याने असं का करावं?

आपण का जगतो? मला वाटतं,  आपल्याला ’मॄत्युची भीती’वाटते म्हणून. केवळ भीती वाटते म्हणून आपण त्याला दूर ठेवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करतो. थोडं काही बरं वाटलं नाही , की डॉक्टर कडे जाणं, सकाळचं फिरायला जाणं, व्यायाम वगैरे वगैरे..मृत्युचा हसत खेळत स्विकारावे  करावा अशी अपेक्षा कधीच कोणी करत नाही.

सकाळी सुहासचा मेसेज वाचला, की कल्पेश ने आत्महत्या केली . कल्पेश – साधारण २५ एक वर्ष वय असेल, बझ वर आणि  ब्लॉग वर त्याच्याशी नेहेमीच गप्पा व्हायच्या. पण गेल्या ४-५ महिन्यांपासून नेट वरचा त्याचा वावर कमी झालेला दिसत होता. जर एखादं टेन्शन वगैरे काही असेल तर ते कोणाबरोबर तरी शेअर केलं असतं तरीही त्यातून काही मार्ग निघु शकला असता, पण नियतीला ते मान्य नव्हतं. एक दिवस सकाळी त्याने आत्महत्या करून निरोप घेतला.  हा लेख लिहायला घेण्याचे कारण म्हणजे कल्पेश  मोहीते. नैराश्य?? काय बरं कारण असेल आत्महत्येसाठी?

आय आय एम ची एक मुलगी, वय वर्ष २२ . उच्च विद्याविभुषित असलेली ही मुलगी, तिच्या मित्राने तिच्याशी संबंध तोडल्यावर , आणि फेसबुक वर ते (“Feeling super cool today. Dumped my new ex-girlfriend. Happy independence day.”)स्टेटस अपडेट केल्यावर आत्महत्या केल्याची बातमी एवढ्यातच वाचनात आली केवळ फेसबुक वर आपल्याला कोणी तरी सोडलं  इतक्या लहानशा कारणामुळे   आत्महत्या  करणे   संयुक्तिक वाटत नाही. एक  व्हर्च्युअल जगातल्या अपमानामुळे आलेले नैराश्य हे खरे मुख्य कारण आहे आत्महत्येचे.

जेंव्हा तुम्ही  फेसबुक वर किंवा एखाद्या संकेत स्थळावर, अथवा  ब्लॉग वर काही लिहिता, तेंव्हा एखादा  माणूस तुम्हाला विचित्र – अपमानकारक प्रतिक्रिया    देतो  किंवा इ मेल  ने पण अशी पत्रं पाठवून पाठपुरावा करतो .भाषा मुद्दाम अशी  वापरली असते की तुम्ही चिडावं,संतापावं- पण अशा प्रकारे प्रतिक्रिया देणारे हे मानसिक दृष्ट्या स्टेबल नाहीत , आणि असे मानसिक  रोगी  आहेत की ज्यांना सायकिअ‍ॅट्रिस्ट च्या मदतीची गरज आहे  -ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी भांडण्या पेक्षा , त्यांच्या कॉमेंट्स डिलिट करणे, फेस बुक वर त्यांना ब्लॉक करणे , इ मेल आय डी स्पॅम मार्क करणे, हे उपाय  जास्त योग्य ठरतात. एक म्हण आहे मराठी मधे ’ डुकराशी कुस्ती खेळण्यत काही अर्थ नसतो, जरी तुम्ही जिंकलात तरी घाणी मधे लोळायला मिळालंं म्हणून डुक्करच एंजॉय करतं” ही गोष्ट  प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवी. व्हर्च्युअल जगातला अपमान सिरियसली घेणे हा मूर्खपणा आहे हे नक्की.

सायबर बुलींग करता शिक्षा झालेली  पहिली केस इंग्लंड मधली आहे.  एका १९ वर्ष मुलीला तिच्याच शाळेतल्या दुसऱ्या एका मुलीला फेसबुक वर बुलींग केल्यामुळे त्या दुसऱ्या  मुलीने आत्महत्या केली म्हणून  जेल मधे पण जावे लागले होते. दुर्दैवाने आपल्या कडचे कायदे तितके कडक नसल्याने लोकांचं फावतं. एक यु ट्य़ुब वरचा सातवीतल्या मुलीचा आत्महत्येचा व्हिडीओ पण खूप गाजला होता. अशा प्रकारचे निराशेमुळे केलेल्या आत्महत्यांचे प्रमाण हल्ली खूप जास्त वाढले आहे.

Emily Moore , sentenced for 3 months for facebook bullying

जाता जाता एकच सांगावंसं वाटतं, की कुठल्या ना कुठल्या कारणाने नैराश्य येणं साहजिक आहे. ते प्रत्येकालाच येते, पण अशा वेळी आत्महत्या करणे हा उपाय नाही. अशा वेळेस एकटे न बसता, एखाद्या मित्र, मैत्रीण, आई वडील किंवा जो कोणी जवळचा असेल त्याच्याशी  मनात काय ते बोलून संवाद साधल्यास या नैराश्यातून बाहेर पडणॆ सहज शक्य होऊ शकते. जर कोणी फार जवळच्या गोष्टी  बोलण्या साठी   विश्वासू मित्र नसेल तर सायकोलॉजिस्ट हा पण पर्याय आहे.आपल्याकडे सायकोलॉजिस्ट कडे जाणं म्हणजे वेड लागलंय असं समजलं जातं. पण तसं नाही, जर अती नैराश्याची भावना मनात येत असेल तर सायकोलॉजिस्ट कडे जायला    काही हरकत नाही.

नैराश्यावर मात  करता येणे महत्वाचे, त्यावर  आत्महत्या  करणे हा काही  उपाय होऊ शकत नाही.बस्स ! एवढंच सांगायचंय मला.  हा लेख कल्पेश मोहीते ला समर्पित.  RIP!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

59 Responses to निराशा

 1. खरंय…. ह्या सोशल लाईफस्टाईलमध्ये, माणूस खऱ्या अर्थाने काही गोष्टींपासून दुरावत जातोय, माणसं दुरावत आहेत…. तो व्हिडिओ बघून काळजात धस्सस्स झालं 😦 😦

  ईश्वर कल्पेशच्या आत्म्याला शांती देवो….. !!!

  • सुहास
   तो व्हिडीओ खरंच खूप टची आहे, माझं पण मन सुन्न झालं होतं तो व्हिडीओ पाहिल्यावर. कल्पेशचं पण असंच झालं असेल का ? हा विचार सारखा मनात येत होता तो व्हिडीओ पहाताना.

 2. काय बोलणार? बातमी ऐकली तेव्हा काही समजेनासं झालं होतं! नैराश्य म्हणजे जळू असते.. रक्त पीत राहाते.. 😦
  ईश्वर कल्पेशच्या आणि अशा सर्वच अकाली हरपलेल्यांच्या आत्म्यांना सद्गती देवो!

 3. deopramod says:

  थोपुवर अशीच एक मुलगी माझ्या मित्रमंडळात आहे…जिने लिहिले होते…आयुष्याचा कंटाळा आलाय…आत्महत्या कराविशी वाटतेय.
  मी तिच्याशी त्या काळात सतत बोलत राहिलो. प्रत्येकाला काही ना काही समस्या असतातच पण आत्महत्या हे काही त्यावरचे उत्तर नाही…हेही (वाईट) दिवस जातील ह्या आशेवरच दुनिया टिकून आहे. तेव्हा मनातून तो विचार काढून टाक आणि वाट पाहा…ह्यातूनही निश्चितपणे मार्ग निघेल…हे सांगत राहिलो. सुदैवाने तिने माझं ऐकलं आणि आज ती सुखात आहे..तिला जे हवं होतं आणि त्यावेळी, मिळेल अशी अजिबात शक्यता नव्हती..ते मिळालं.
  मला वाटतं..तो विशिष्ट काळ असा असतो की त्यावेळी अशा लोकांना सतत कुणी तरी मानसिक आधार द्यावा लागतो…दूर्दैवाने कल्पेशला तो मिळाला नसावा.
  कल्पेशला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • प्रमोदजी
   तुमच्या नकळत तुम्ही खूप मोठं काम केलंय . कदाचित ती तुम्हाला मनोमन धन्यवाद देत असेल.तो विशिष्ट काळ असा असतो की त्यावेळी अशा लोकांना सतत कुणी तरी मानसिक आधार द्यावा लागतो…दूर्दैवाने कल्पेशला तो मिळाला नसावा.

  • Piyu says:

   कल्पेश माझा खूप चांगला मित्र होता… पण त्याने हे असे काही केल्यावर स्वत:ला त्याची मैत्रीण म्हणावे तरी कसे या विचारात आहे…
   त्याने त्याच्या मनात अशी काही खळबळ चालू आहे याचा कधीच कोणाला थांग लागू दिला नाही…
   माझ्या परीक्षेमुळे आणि त्याच्या जॉबमुळे आम्ही जवळपास १५ दिवस बोललो नाही… आणि आता… बोलायला तो उरलाच नाही… 😦

   आपल्यापैकी बरेच जण आज स्वत:ला आत्महत्या करण्याच्या विचारातून वाचवू शकले कारण त्यांनी आपले प्रॉब्लेम्स आणि दु:ख कोणाशीतरी शेअर केले.. आपले मन दुसर्यासमोर मोकळे केल्यावर केल्यावर दु:खाची तीव्रता काही प्रमाणात का होईना कमी होते…काही नवे मार्ग सुचतात..दिलासा मिळतो.. परिस्थितीला तोंड द्यायला धीर येतो..

   माझ्या मते तरी नैराश्याला तोंड देण्याचा हा एकच मार्ग आहे… आपल्या जवळच्या मित्रांना.. आपल्या आई वडिलांना किंवा कोणी जवळच्या वडीलधार्या व्यक्तींना.. काही नाही तर प्रसंगी थोड्या अनोळखी व्यक्तीला (उदा. समुपदेशक वैगेरे) विश्वासात घेऊन त्यासमोर मन मोकळे करणे…

   जे झाले ते आपण बदलू शकत नाही… पण यापुढे असे होऊ नये (आपल्याही आणि कोणाच्याही बाबतीत) यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहुयात…

 4. Tanvi says:

  वाईट वाटतय….

  ईश्वर कल्पेशच्या आत्म्याला शांती देवो….. !!!

 5. greenmang0 says:

  “डुकराशी कुस्ती खेळण्यत काही अर्थ नसतो, जरी तुम्ही जिंकलात तरी घाणी मधे लोळायला मिळालं म्हणून डुक्करच एंजॉय करतं” ROFLMAO

 6. Kaka, mala watat nairashya mhanje kay tar ek phase, aapanch aaplyala anubhawaichi, Khar sangte kaka hya ashya mandalina Tata Memomrial madhe phirun ye mhanun sangawe……..

 7. कल्पेशची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा प्रचंड धक्का बसला.. खूप वाईट वाटलं !! एवढा टोकाचा निर्णय घेण्याएवढे काय आघात झाले असतील बिचाऱ्याच्या मनावर याची कल्पनाही करवत नाही. असो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो !

 8. arunaerande says:

  अपेक्षाभंग आणि पब्लिक मानहानी ही नैराश्याची मुख्य कारणे असावीत.‘ लोक काय म्हणतील’, ‘आता मी बाहेर तोंड दाखवू शकणार नाही’ अशा प्रकारचे विचार नैराश्याला कारणीभूत होत असणार. अशावेळी तुम्ही म्हणता तसे जर चांगला मित्र मिळाला तर तो मदत करू शकतो. अन्यथा माणूस निराशेच्या गर्तेत बुडत जातो.
  पण अशा व्यक्तींना खूप मानसिक यातना होत असणार.त्याशिवाय त्या अशी निर्णायकी कृती करायला धजणार नाहीत. कदाचित they don’t realize the enormity of their action and then it is too late!
  either way it is very sad. pray that Kalpesh got some peace now. feel sad for gim though i did not know him.

 9. mathmet says:

  yawar Americet khup research chali ahe ani yawar medicine ghenare pun evdhe lok ahet ki pahun bhiti watte…kiyek wela samorcha manus ya conditioncha ahe he kalat pun nahi. medicine thamble ki kahitari wiprit kartat. Aplyakade ajun evdhe testing hot nahi…lakshat ale tar upchar ghene mahatwache ahe he lakshat ghetle pahije mhanje thode tari praman kami hoeel.

  • माधुरी
   यावर घेण्यात येणाऱ्या मेडीसिन्सचे साईड इफेक्ट्स खूप आहेत, पण मनावर ताबा नसेल तर औषधं घ्यायलाच हवे. काही दिवसानंतर औषधांचा डॊज कमी केला जातो.

 10. बातमी ऐकून धक्का बसला होता.. आत्महत्या खरंच उत्तर असेल का प्रश्नांचं? ते अभागी जीवच आता जाणो 😦

  • आनंद
   😦 आपल्या संपर्कात होता एके काळी तो, म्हणून जास्त वाईट वाटलं. फक्त कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही हे समजलं नाही.शेवटी इतक्या मित्रांनी घेरलेला पण तसा एकटाच होता तो .

   • arunaerande says:

    आपली मनस्थिती शेवट्पर्यंत लपवतात असे लोक. मनाचा वीक्नेस्स दुसर्‍यांना दिसू नये अशी धडपड असते त्यांची. आणि आपण नेहेमीच बिटवीन द लाइन्स ्वाचत नाही.

 11. Shradha B says:

  आयुष्यातल्या कालच्या शाश्वत वाटणाऱ्या गोष्टी आज कोलमडून पडलेल्या दिसल्या की हे जीवन अशाश्वत आहे हे लक्षात येऊन भीती वाटू लागते.(जसे आजी- आजोबांचा, किंवा घरातल्या इतर कोणाचा मृत्यु या जगात कोणीच शाश्वत नाही याची जाण करून देतं).

 12. Shradha B says:

  kahi veles aapan aaplya manatalya gohti kunashi share karayala pudhachi vakti titki loyal ahe ki nahi yabaddal shanka yete…..nahitar tech aaplya ghotinche bhandawal kart basatat…..

  • श्रद्धा
   अगदी योग्य मुद्दा मांडला. आपल्या संपर्कात बऱ्याच व्यक्ती असतात, त्या पैकी सगळ्यात ट्रस्टवर्दी कोण हे ठरवून मगच बोलायचं. जर कोणीच नसेल तर आई वडील.. बेस्ट ऑप्शन!

 13. tivtiv says:

  कल्पेशबद्दल वाईट वाटले. त्याला शांती लाभो.
  पण तुमचा लेख आवडला.
  >>जेंव्हा तुम्ही फेसबुक वर किंवा एखाद्या संकेत स्थळावर, अथवा ब्लॉग वर काही लिहिता, तेंव्हा एखादा माणूस तुम्हाला विचित्र – अपमानकारक प्रतिक्रिया देतो किंवा इ मेल ने पण अशी पत्रं पाठवून पाठपुरावा करतो .भाषा मुद्दाम अशी वापरली असते की तुम्ही चिडावं,संतापावं- पण अशा प्रकारे प्रतिक्रिया देणारे हे मानसिक दृष्ट्या स्टेबल नाहीत , आणि असे मानसिक रोगी आहेत की ज्यांना सायकिअ‍ॅट्रिस्ट च्या मदतीची गरज आहे -ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी भांडण्या पेक्षा , त्यांच्या कॉमेंट्स डिलिट करणे, फेस बुक वर त्यांना ब्लॉक करणे , इ मेल आय डी स्पॅम मार्क करणे, हे उपाय जास्त योग्य ठरतात.>>
  हे आवडलं.
  विशेषतः नवीन ब्लॉग लिहिणार्‍यांकरता तर ह्या गोष्टी नक्की उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत.

  • टिवटिव
   मी नुकतीच एक आयपी ब्लॉक केली आहे. एकदा तुम्ही आयपी ब्लॉक केली की त्या आयपी वरून तुमच्या ब्लॉग वर पण कॉमेंट्स पोस्ट करता येत नाहीत. सगळे इ मेल्स , कॉमेंट्स स्पॅम मधे जातात. जगात इतकी माणसं आहेत, तेंव्हा एखाद्याशी आपलं जर जमत नसेल तर कशाला उगाच जुळवून घ्यायचा प्रयत्न करायचा? काही लोकं तुम्हाला आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करून तुमच्यावर प्रश्नांचा मारा करतात. पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधील नसता ही गोष्ट विसरू नका. तुमच्यावर ओव्हरपॉवर करण्याचा कोणालाच अधिकार नाही हे लक्षात ठेवायला हवे.
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 14. deepak1002in says:

  धक्कादायक बातमी. काय बोलु ते कळत नाही. 😦

 15. कधी कधी अशा आत्महत्या नैराश्यातून न येता निरर्थकतावादा तुन येतात. http://en.wikipedia.org/wiki/Nihilism मेंदुतील जैवरासायनिक बदल अशा गोष्टींना कारणीभूत ठरु शकतो. कल्पेश नेमक्या कुठल्या परिस्थितीतुन गेला असावा हे माहित नाही.आपण या विषयाला हात घालून विचार करायला लावलात.

  • धन्यवाद. हा एक वेगळा दृष्टीकोन आहे या कडे पहाण्याचा. मी स्वतःला जे वाटलं ते लिहिलय. केमिकल इम्बॅलन्स हा तर असतोच, त्याशिवाय आत्महत्येचे विचार मनात कसे येतील??

 16. purvatarang says:

  काही लोक असे असतात जे वर्चुअल जगात राहून, प्रत्यक्ष आयुष्यातली निराशा घालवण्याच्या प्रयत्नात असतात. मला वाटता कल्पेश त्यापैकीच एक होता. कारण सोशल नेट्वर्किंग मध्ये त्याचा खूप मोठा मित्र परिवार आहे, आणि त्या सर्वांशीच तो अगदी जवळचा मित्र असल्यासारखा वागायचा. पण त्याला प्रत्यक्षात काय प्रॉब्लेम्स होते हे त्याने कोणालाच कळू दिले नाही. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो…

 17. त्याचा ब्लॉग बघितला … काळजात धस्स झालं!!

  वाटलं …. कदाचित त्यावेळी त्याला कुणी आधार दिला असता तर …. कदाचित ….
  … पण कदाचित दैवाला तेच मान्य होतं. असो. माझे शब्द नि भावना काही महत्व ठेवत नाही. त्याने जे अनुभवलं, त्याचे निकटजण जे अनुभवताहेत, त्याच्या पुढे सगळंच क्षुद्र! .. पहिल्यांदा कळतंय ‘मौन’ का पळत असावेत.

  बाकी अपराधी भावनेने ( guilt ) सुद्धा बरेच लोकं करतात असे. माणूस शेवटी समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्या सोबत जर कुणी दिसलेच नाही त्याला, तेव्हा सुद्धा तो अश्या गोष्टींकडे वळू शकतो. ‘जगावं कशासाठी?’ पेक्षा ‘जगावं कुणासाठी?’ हा प्रश्न मोठा होऊन जातो अश्यावेळी.
  कारण काहीही असो काका, त्यावेळी ते पाऊल उचलणं खूप सोपं होऊन जातं मात्र मनाला.
  काय लिहू …..? …. काही अर्थ आहे का?

  • वैभव
   बरेच दिवस संपर्कात होता तो, पण एकाएकी संपर्क थांबला. ब्लॉग वर पण एके काळी नियमीत कॉमेंट्स द्यायचा. बझ वर असतांना तर नेहेमीच हा गप्पां मधे भाग घ्यायचा. त्याच्या कवितांवरून प्रेमभंग वाटतो का?

 18. SaBa says:

  RIP Kalpesh
  😦

 19. वाचून खूप वाईट वाटलं , असं का घडलं कोणीच नाही सांगू शकत 😦
  म्हणतात “या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” पण बराच वेळेस गोष्टी अशा काही घडतात कि
  आयुष्यावरच प्रेम नाहीसं होत आणि माणूस नकळतपणे असे काही पाउल उचलतो अविचाराने कदाचित असच काहीतरी झाला असेल त्याचा बाबतीत म्हणून कायम आपल्या जवळचा लोकांसमोर मन मोकळं करावं आणि त्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी बदलावी कारण आपण गोष्टी नाही बदलू शकत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एवढच म्हणेन

  • आदिती
   सध्या तरी आपण त्याच्या आत्म्यास शांती मिळावी याची प्रार्थना करु शकतो.

 20. hmmm… नक्कीच !

 21. Guru says:

  क्या बोलने का अब, मी कल्पेश ला वैयक्तिक नव्हतो ओळखत , रिप!!!!!!!

 22. Nikhil Joshi says:

  डुकराशी कुस्ती खेळण्यत काही अर्थ नसतो, जरी तुम्ही जिंकलात तरी घाणी मधे लोळायला मिळालंं म्हणून डुक्करच एंजॉय करतं
  Agadi Khara aahe

 23. Aratidgr8 says:

  Kharokharach Apratim Lekh lihila aahe tumhi.
  Mala avadli tumchi likhanachi shaili… 🙂
  Keep up Gr8 Work

 24. Rohan says:

  कित्तीतरी दिवस मला तुझ्या ब्लॉगवर कमेंट करता येत नव्हती.. 😦 सर्व पोस्ट वाचल्या आहेत मी. काल्पेश्ची बातमी ऐकून धक्का बसला.. 😦

 25. nayanraut says:

  आयुष्य हे चित्रपटासारखे असते, अर्धा एक भाग झाल्यावर आपल्याला कळते कि पुढच्या भागात काय वाढून ठेवलंय. पहिला भाग निराशाजनक असेल तर काही जण सोडून निघून जातात. जीवन हे एक जैविक शास्त्र आहे आणि प्रत्येकाचा आपल्या जीवनावर अधिकार आहे. आत्महत्या करणे ह्यात काही वागव नाही.

 26. Kanchan says:

  ईश्वर कल्पेशच्या आत्म्यास शांति देवो. त्याच्या आत्महत्येचं कारण त्यालाच ठाऊक. सोशल नेटवर्किंगवर इतके मित्र असूनदेखील एकाकडेही त्याला मन मोकळं करता येऊ नये हे सोशल नेटवर्किंगचं अपयश समजायचं की मित्रांचं कमनशीब?

  नैराश्यामुळे कुणी आत्महत्या करणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण नैराश्य कुठल्या गोष्टीमुळे आलं आहे हे समजलं तर कदाचित काही तोडगा निघू शकतो. तुम्ही सायबर बुलिंग हा विषयसुद्धा या लेखात मांडला आहे म्हणून तत्संबंधी नैराश्याविषयीच मत देते आहे. प्रतिक्रिया लांबवते आहे.

  बर्‍याच लोकांना टेक्स्ट मेसेजमुळे गैरसमज होऊ शकतो, हे लक्षातच येत नाही. व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष जगात कितीतरी फरक आहे आणि हा फरक ज्यांना व्यवस्थित समजतो अशा लोकांनी हेसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की व्हर्च्युअल जगात एखाद्याची उडवलेली खिल्ली, व्यक्त केलेला राग हे सगळं प्रत्यक्षात जगणार्‍या एका हाडामाणसाच्या व्यक्तीशी संबंधित असतं. सिक्रेट ग्रुप तयार करायचा, त्यात काही विशिष्ट फ्रेन्ड्सनाच प्रवेश द्यायचा आणि मग अ‍ॅड न केलेल्या एखाद्याला टारगेट बनवायचं, त्यांची लेखनक्षमता आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची खिल्ली उडवायची, किंवा स्वत:च्या ब्लॉगवर स्केचेस टाकायची आणि आपल्याला काय असह्य होतंय हे अप्रत्यक्षरित्या सर्व ब्लॉगर्सपर्यंत पोहोचवायचं किंवा कुणाच्या तरी ब्लॉग किंवा फे.बु. पोस्टवर जाऊन नॅस्टी, सारकास्टिक कमेंट्स द्यायच्या आणि मग खाली कंसात सॉरी म्हणून स्मायली टाकायचा या गोष्टींचे परिणाम फक्त व्हर्च्युअली होत नाहीत. कुणाहीबद्दल अशाप्रकारे दूषित मत पसरवणं हा सायबर बुलिंगचा प्रकार आहे. आपल्याच मित्रवर्तुळातील कित्येक लोक कळत-नकळ्त हे सायबर बुलिंग आत्ता या क्षणालाही करत आहेत.

  सोशल नेटवर्क किंवा इतर व्हर्च्युअल सार्वजनिक ठिकाणी एखाद्याने पोस्ट टाकली तर त्या व्यक्तीचा माफक आदर ठेवून स्पष्ट कमेंट द्यावी असं मला वाटतं. कारण पोस्ट करणारी व्यक्ती जर लॉग आऊट झाली असेल आणि नंतर त्या पोस्टवर एकजरी खिजवणारी कमेंट आली तर नंतर त्या पोस्टवर पडलेल्या कमेंट्स तशाच आशयाच्या असतात. सगळेजण सारख्याच बुद्धीमत्तेचे नसतात त्यामुळे काही लोकांना आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी अशा पोस्ट म्हणजे चरण्याचं कुरण असतं. पुढे जेव्हा ती व्यक्ती आपल्या पोस्टवरच्या प्रतिक्रिया पहाण्यासाठी ऑनलाईन येते तेव्हा आपल्या पोस्टची अशी चिरफाड पाहून त्याला कसं वाटेल? असे मित्र असतील तर शत्रूंची काय गरज असाच विचार ती व्यक्ती करत असणार. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हीच परिस्थिती स्वत:च्या बाबतीत ओढवली तर कसं वाटेल? मात्र काही पोस्ट खरंच इग्नोर करण्याच्या लायकीच्या असतात. अशा पोस्टवरदेखील एकाच आशयाच्या कमेंट्स पडत जातात. खास करून स्त्रीवर्गाविषयी चेष्टा, निंदा-नालस्ती करणारी पोस्ट. मुळची पोस्ट साधीसुधी वाटावी इतक्या असभ्य कमेंट्स वाचायला मिळतात. स्त्रीवर्गाविषयी अशाप्रकारची असभ्य विधाने, फोटोशॉप वापरून तयार केलेले अपमानास्पद फोटो हे सर्व सायबर बुलिंग किंवा हेट, अब्युज मधे समाविष्ट होतं की नाही? सारकॅस्टिक कमेंट्स हा सायबर बुलिंगचा आणखी एक प्रकार आहे, असं मी मानते. गेल्या महिन्याभरात हा प्रकार वापरणार्‍या बर्‍याच व्यक्ती पाहिल्या. सारकास्टिक स्केचेससुद्धा काढता येतात हे मात्र पहिल्यांदाच कळलं. पण या व्यक्तींना स्वत:च्या बाबतीत हाच सारकॅझम सहन करता येत नाही. सारकॅझम सहन करता येत नसेल, तर दुसर्‍यांशी बोलतानाही सारकॅझम टाळावा, आपली प्रामाणिक प्रतिक्रिया द्यावी इतकं साधं सोपं जगणं जेव्हा अशा लोकांना जमेल का?

  आपण नाकारले जात आहोत, ही कल्पना निश्चितच कष्टप्रद आहे. पण नाकारले जाण्याचं कारण चांगलं आहे की वाईट यामुळे मन:स्थितीमधे बराच फरक पडू शकतो.

  • कांचन
   सहमत आहे. केवळ याच एका कारणासाठी मी कुठल्याही सोशल साईट वर ( मिपा, मिम, माबो, ) वगैरे वर जात नाही.एखाद्याला कोपऱ्यात घेऊन त्यावर कुरघोडी करणे हा छंद झालेला आहे काही लोकांचा. काही सिलेक्टेड गृप्स म्हंटलं, तर त्या बद्दल फारसा विचार न केलेला बरा. असे अनेक गृप्स आहेत, जात, धर्म, द्वेश यावर अवलंबलेले. अशा गृप्स पासून दूर राहिलेले जास्त बरे. व्हर्च्युअल वर्ल्ड मधे व्हर्च्युअल व्यक्तिमत्व निश्चितच कुठल्यातरी व्यक्तीशी जुळलेले असते, हा विचार नक्कीच पटतो, पण व्हर्च्युल अपमानामुळे आत्महत्येइतकं मोठं पाऊल उचलणंही काही पटत नाही. पूर्वी मी जेंव्हा एका सोशल गृप वर थोडा अ‍ॅक्टीव्ह होतो, तेंव्हा एका पोस्ट मधे मला टार्गेट करून बराच कॉमेंट्स करण्याचा प्रयत्न केला गेला. व्यक्तिगत कॉमेंट्स पण होत्या. तसेच नुकताच एका व्यक्तीने इ मेल द्वारा खूप विचित्र इम्लेस पाठवून त्रास दिला- मी त्याच्याशी भांडावं, म्हणजे मजा येईल अशी त्याची इच्छा होती. शेवटी सरळ आयपी ब्लॉक करून मोकळा झालो. तो माणूस इंग्लंड मधे आहे. त्याने मला पाठवलेले त्रास देणारे इ मेल जर ब्रिटीश सायबर सेल ला पाठवले, तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होऊन अटक होऊ शकते. पण तसे केले नाही. असो.

   मस्करी, चेष्टा आणि अपमान या मधे अतीशय थिन लाइन असते, ती क्रॉस होऊ न दिली तरच मैत्री टिकणं शक्य आहे, नाही तर गैरसमजामुळे अजूनच मानसिक त्रास होऊ शकतो.

 27. महेश कुलकर्णी says:

  कल्पेशबद्दल वाईट वाटले. त्याला शांती लाभो.
  पण तुमचा लेख आवडला.

 28. काका, तुमचा लेख मनात एक वेगळीच पोकळी निर्माण करून गेला… डोक्यात विचारांचं थैमान सुरु झालंय… असा काय प्रसंग असेल कि त्या २५ वर्षीय कल्पेश ला स्वताचं आयुष्य असा अर्ध्यातच संपवावस वाटलं असेल…?? फक्त निराशा..? मृत्यूला समोर जायला खरंच खूप धाडस लागतं, आणि ज्या लोकां मध्ये एवढं धाडस आहे ते जीवनातल्या इतर समस्यांचा सामना का नाही करू शकत..??? त्यांना खरंच मृत्यू कळलाच नाही का..???? अशी काय वेळ असावी, कि निसर्गाच्या सगळ्यात सुंदर देणगीचा तिरस्कार वाटू लागावा..?? खरंच, या सर्वांची उत्तर द्यायला…आता कल्पेश परत येणार नाही… 

  • कल्पेश ने खरंच विचार करायला भाग पाडलं , की कुठलं असं कारण असेल की त्याने मृत्युला जवळ करण्याचे धाडस पण केले?

 29. Vaidehee says:

  “कुठल्या ना कुठल्या कारणाने नैराश्य येणं साहजिक आहे. ते प्रत्येकालाच येते, पण अशा वेळी आत्महत्या करणे हा उपाय नाही. अशा वेळेस एकटे न बसता, एखाद्या मित्र, मैत्रीण, आई वडील किंवा जो कोणी जवळचा असेल त्याच्याशी मनात काय ते बोलून संवाद साधल्यास या नैराश्यातून बाहेर पडणॆ सहज शक्य होऊ शकते. जर कोणी फार जवळच्या गोष्टी बोलण्या साठी विश्वासू मित्र नसेल तर सायकोलॉजिस्ट हा पण पर्याय आहे.आपल्याकडे सायकोलॉजिस्ट कडे जाणं म्हणजे वेड लागलंय असं समजलं जातं. पण तसं नाही, जर अती नैराश्याची भावना मनात येत असेल तर सायकोलॉजिस्ट कडे जायला काही हरकत नाही.” he khuup IMP. aahe , kharach…. IT IS THE Ri8 WAY TO LIVE A LIFE!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s