वाइफ बॅशिंग सर्व्हे

‘थंब रुल’ हा शब्द आपण नेहेमीच वापरतो. तो कसा  काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड  मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त  अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे  कायद्याने मान्य होते,  म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला.

राजा भाऊंचं लग्न झालं होतं, तीर्थरुपांच्या समोर पाया पडायला म्हणून जोड्याने वाकल्यावर , वडील हळूच फक्त राजाभाऊंना ऐकु येईल अशा आवाजात  म्हणाले, नमस्कार करायला आलात, एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही गृहस्थ झाला आहात- स्वतः बरोबर पत्नीचीही जबाबदारी आता तुमच्यावर आहे. प्रसंगी भांडणं होतील, खूप संताप येईल – पण तेंव्हा मी आज सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा ” पत्नी ही घरातली लक्ष्मी असते, तिच्यावर कधीच हात उचलायचा नसतो”. ही शिकवण राजा भाऊंच्या अगदी मनात पक्की बसल्याने,   आयुष्यभर प्रकर्षाने पाळली.असं नाही की  राजा भाउंचे कधी बायकोबरोबर भांडण होत नाही, किंवा त्यांना बायकोचा राग येत नाही, पण  वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवतं आणि मग हात उचलला जात नाही- राग शांत होतो.

लग्न झाल्यावर भांडणं होणारच-  आयुष्यभर  “न भांडता ” सोबत रहाणारे नवरा – बायको मला अजून तरी भेटायचे आहेत.  लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड, भांडणं ही ठरलेली आहेतच- फक्त त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. वाद विवादाची तीव्रता वाढल्यावर  बायकोवर हात उचलणे हे पण तसं जगभर कॉमन   आहे.  बाहेरच्या देशात अशा केसेस तर नेहेमीच रजिस्टर होत असतात.

जगभरात नवऱ्याने बायकोला  मारहाण  करण्याची जी चार मख्य कारणं आहेत ती अशी आहेत. १) सेक्स ला नकार देणे २) वाद विवाद करणे ३) न सांगता घराबाहेर जाणे ४)मुलांकडे दुर्लक्ष करणे ही आहेत.

या घटना फक्त  समाजाच्या खालच्या आर्थिक  स्तरांमधेच  ( कामगार वर्ग, ब्लु कॉलर्ड )  घडतात असे नाही , तर ’उच्च शिक्षित , कारखानदार, सिनेमा नट – नट्या’  सगळ्यांच्याच बाबतीत  या  प्रकारच्या घटना  घडत असतात. अ्धुन मधून एखाद्या अशा घटनेच्या  शिकार शिकार झालेल्या  एखाद्या अभिनेत्रीचे फोटो  पेज थ्री वर पण  दिसतो.  अशा घटना जरी घडत असल्या तरीही ,फक्त  बहुतेक वेळा अशा घटनांना प्रसिद्धी  न देता, पातेल्यातलं वादळं पेल्यातच शमवले जाते.  पोलीसांपर्यंत जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाण नगण्य आहे.

”   बायकोला पुरुषाने मारणे  हे तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य?” ह्या प्रश्नावर  टाइम्स ऑफ इंडीयाने एक प्रातिनिधिक स्वरुपाचा सर्व्हे केला होता. सर्व्हे फक्त टीनएजर्स साठी – वय वर्ष १५ ते १९ पर्यंतच्या तरूण तरूणींच्या साठी होता.    यावर   तरुण , तरुणींनी दिलेली  उत्तरं आणि सर्व्हेचे रिझल्ट वाचल्यावर मला तर धक्काच बसला आणि  वाईटही वाटलं. कारण परिस्थितीच  तशी काळजी करण्यासाखी  आहे.

५७ टक्के मुलांनी आणि ५४ टक्के मुलींचे पण  बायकोला मारणे योग्य असेच मत दिले. एक वेळ मुलांनी बायकोला मारहाण करणे योग्य  हे मत दिले तर एक वेळ समजू शकतो,  पण ५४ टक्के  मुली पण जेंव्हा स्त्रियांना नवऱ्याने मारल्यास हरकत नाही असे मत देतात, तेंव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणीची कीव येते – त्यांची  लग्नानंतरच्या  सह जीवनाविषयीची ही अशी मतं पाहिल्यावर ह्या मागचे कारण काय असेल याचा विचार केल्यावर जे काही माझ्या मनात  आलं   ते खाली लिहितोय.

मुला-मुलींनी जे आपले स्वतःचे  मत  तयार करून घेतले आहे,   त्या साठी, त्यांना  मी या अशा विचारांसाठी दोष देणार नाही. मुलांची कुठल्याही गोष्टीवरची मतं ही एकदम तयार हो नसतात. लहानपणापासून  आसपासच्या घटनांचा त्यावर परिणाम होत असतो. एखाद्या  अगदी लहानपणापासून पट्टीच्या नॉन व्हेज खाल्लं जाणाऱ्या  घरातल्या मुलाला, कदाचित चिकन च्या दुकानात ते कापताना आणि स्वच्छ करतांना पाहून काही वावगं वाटणार नाही, कारण ते त्याकडे पहाण्याची त्याची दॄष्टी ही एक अन्न म्हणून असते. पण व्हेज खाणारा मुलगा, चिकन कापतांना पाहू शकणार नाही- कारण त्याच्या दृष्टीने चिकन ही एक कोंबडी म्हणजे जीव आहे.  दृष्टीकोन बदलला की विचार कसे बदलतात याचे हे एक उदाहरण.

मुलांवर लहानपणापासून कळत नकळत  संस्कार होत असतात. दुसऱ्याचे अनुकरण करणे हे लहानपणचे लक्षण आहे. बालवाडीत गेल्यावर पहिल्या दिवशी जेंव्हा एक मूल रडू लागते, तेंव्हा त्याला पाहून सगळा वर्ग गळा काढणे सुरु करतो. हे मुलं खेळायला शेजारी पाजारी गेली, की त्यांचा इतरांशी संबंध आला , की मित्र मंडळीचे पण मनावर नकळत संस्कार होत असतात. एखाद्या सिगरेट ओढणाऱ्या मित्रांमुळेच सिगरेटची सवय लागू शकते- (मला लागली होती). संगती संग   दोष अशी काहीशी एक म्हण आहे.

संस्कारक्षम वयामधे   टीव्ही वरच्या सिरिज, किंवा सिनेमा यांचाही खूप परिणाम होतं.  येता जाता उच्चभ्रू (!) घरातल्या पुरुषांनी स्त्रियांच्या खाडकन थोबाडीत मारणे वगैरे  तर नेहेमीच दाखवले जाते.  नेहेमी  तेच ते पाहून तेच योग्य आहे असे कशा वरून वाटत नसेल? स्वप्नरंजन आणि वास्तव यांची सरमिसळ होऊन मनात  द्वंद्व निर्माण होते. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हा निर्णय मनाला घेता येत नाही.

मुलांवर आई-वडिलांकडून केले गेलेले संस्कार सगळ्यात महत्त्वाचे. त्या संस्कारांवर इतर समाजातील घट्क  करणारे संस्कार सहजा सहजी ओव्हरपॉवर करू शकत नाही. आपले आईवडील कसे वागतात याकडे पाहूनच मुलांचे स्वतःचे विचार मनात पक्के होत असतात.  घरात जर मुलांनी लहानपणा पासुनच जर वडिलांना आईला मारहाण करतांना पाहिले असेल, तर त्या मधे अयोग्य वाटणार नाही. मला वाटतं की   सर्व्हेचा जो निकाल आलाय , त्याचे कारण पण  कदाचित त्या मुलांच्या घरची  परिस्थिती किंवा  वातावरण  असावे- आणि जर खरंच असे असेल तर ते काळजीचे कारण आहे.

आज स्त्रिया स्वावलंबी झाल्या आहेत, शिकल्या आहेत, स्वतः पैसा कमावू शकतात, इतकं असतांना पण त्यांनी अशा प्रकारे मारहाण करुन घेण्याची मानसिक तयारी दाखवावी हे मला खरंच पटत नाही. जर ५४ टक्के स्त्रियांना नवऱ्याकडून होणारी  मारहाण  योग्य वाटत असेल तर हे शिक्षण व्यर्थ आहे असे खेदाने म्हणावे लागेल. स्त्रियांनी स्वतःचे ’स्व’त्व ओळखून या अशा मारहाणीचा निकराने प्रतिकार करायला हवा असे   मला वाटते.

इतर देशातला सर्व्हे रिपोर्ट. काही मुस्लीम बहूल भागात हे योग्य असे वाटणारे ९० टक्के स्त्रिया आहेत  (!)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

45 Responses to वाइफ बॅशिंग सर्व्हे

 1. बरंचसं अपेक्षित.. निराशाजनक!!

  • आनंद
   मला हे अनपेक्षित होतं.
   मला वाटलं होतं की कदाचित शिकल्या सवरलेल्या मुली तरी या गोष्टीचा विरोध करतील,
   पण जेंहा शिकलेल्या मुली पण याची भलावण करतांना दिसल्या तेंव्हा मात्र माझी निराशा झाली. 😦

 2. Kanchan says:

  वाईफ बॅशिंग, बायकोला मारहाण हे शब्द जितक्या सहजतेने वापरले जातात तितक्याच सहजतेने हजबंड बॅशिंग, नवर्‍याला मारहाण असे शब्दप्रयोग वापरले जात नाहीत, हे उघड सत्य आहे. किती हास्यास्पद वाटतं हे ऐकताना – १) सेक्स ला नकार देणे २) वाद विवाद करणे ३) न सांगता घराबाहेर जाणे ४) मुलांकडे दुर्लक्ष करणे या सर्व कारणांसाठी बायकोला मारहाण होऊ शकते, अगदी ती नवर्‍याच्या बरोबरीने कमावत असेल तरीदेखील; पण नवर्‍याला मात्र या गोष्टींसाठी मारहाण हा शब्द नुसता वापरला तरी समाजाच्या भुवया उंचावतील. हा सर्व पुरातन काळापासून चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हिंसेइतका दुसरा परिणामकारक प्रकार अजूनतरी अस्तित्वात आला नसावा. दोन देशांमधील युद्धसुद्धा त्यासाठी होतात.

  संस्कार या प्रकारासाठी तर आई-वडीलांना जबाबदार धरूच नये. अगदी उत्तम संस्कार झालेली मुले-मुली सुद्धा बाहेरच्या जगात वावरताना संस्कारहीन वागू शकतात. हे मत थोडंसं कटू पण मला कीव येते त्या स्त्रीयांची, ज्यांना नवर्‍याकडून होत असलेली मारहाण योग्य वाटते. समाजात असेही नग आहेत जे केवळ बायकोच नाही, तर स्वत:च्या आई-वडीलांनादेखील मारहाण करतात.

  मुळात स्त्री असो, पुरूष असो किंवा लहान मूल असो, आपल्याच कुटुंबातील व्यक्तीवर केवळ मतभेद होत आहेत म्हणून हात का उचलावा लागतो? हा प्रश्नदेखील महत्त्वाचा वाटतो मला.

  • कांचन,
   वर दिलेली कारणं नेट वर सापडली. जगभरात कुठेही होणारे व्हायोलन्स हा याच कारणामुळे होतो- मग ते अगदी आ्फ्रिकेतला एखादा लहानसा देश असो , की अमेरीका.
   संस्कार हा शब्द नकळत होणाऱ्या संस्काराबद्दल वापरलेला आहे. वर दिलेले चिकन चे उदाहरण त्याच कारणाने दिलेले आहे. एखादी गोष्ट जर बालपणापासून पाहिली तर त्या गोष्टी कडे पहाण्याचा दृष्टीकोन तयार होत असतो. संस्कारासाी केवळ आई वडील हेच जबाबदार आहेत असे म्हंटलेले नाही. समाजातल्या इतरही घटकांचा खूप परिणाम याच संस्कार क्षम मनावर क्ळत नकळत होत असतो.
   एकंदरीत हात उचलणे हे योग्य्य नाहीच.. आणि कमित कमी स्त्रियांनी तरी ही मारहाण योग्य आहे असे म्हणू नये असे मला वाटते.
   हा लेख वाचून दहा मुलींना जरी ही लग्नानंतरची मारहाण वाईट आहे हे पटले तरीही या लेखाचे सार्थक झाले असे म्ह्णेन मी.

  • Piyu says:

   कांचन ताईशी सहमत आहे… मुळात घरात कोणीही कोणालाही मारहाण करणे चुकीचे आहे.. नवर्याने बायकोला काय किंवा वडिलांनी मुलाला बेदम मारहाण करणे काय..

   बहुतेक समाज कितीही पुढे गेला तरी “बळी तो कान पिळी” किंवा “ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस” हा शारीरिक बळावर आधारलेला जंगलाचा कायदा कायम अस्तित्वात राहील… तसे नसते तर स्त्रियांना घरातला कर्ता पुरुष म्हणून मान मिळाला असता एव्हाना…

   • पियू
    लेखाचा विषय मुलींना मारहाण करुन घेणे का योग्य वाटते?? हा आहे.
    अर्थात, मुलांना मारहाण करणे हे पण काही मान्य करता येण्यासारखे नाही.

    शेजारीच रहाणऱ्या एका डॉक्टर असलेल्या बायकोला नॅपकिन पलंगखाली फेकला म्हणून मोलकरणी समोर थोबाडीत मारणारा एक महाभाग आमच्याच कॉलनीत रहातो. मोलकरणीने अगदी कॉलनी भर सगळ्यांच्या घरी जाऊन ही गोष्ट ब्रॉडकास्ट केली म्हणून समजलं.

 3. creativemau says:

  lekh kharach changala lihila aahe..
  kahi dhakkadayak goshtinchaa ulagadaa jhala..baapre !! kathin aahe sagal…:(

  • धक्कादायक निकाल आहे सर्व्हे चा. मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणतात… पण खरंच तसं झालंय का?

 4. कालच आमच्या वाचन मंडळात ह्याच विषयावर चर्चा झाली .खरोखरच मुलींच्या प्रतिक्रिया निराशाजनक आहेत.

  • संध्या,
   मुलींना मार खाणं योग्य का वाटत असावं? स्वतःबद्दलचा न्युनगंड? त्यांची मानसिक जडणघडण तशी केली जाते मुद्दाम.. 😦

   • साधना परांजपे says:

    बऱ्याच मुलींमध्ये इतकी ताकद नसते की त्या होणाऱ्या मारहाणीला विरोध करतील, विरोध केला तर अजून मार बसेल म्हणून शांत राहतात.(अनुभवाचे बोल..). त्यातून विरोध करायचा म्हणजे नक्की काय करायचे? विरोध केला आणि घरातल्या लोकांनी घराबाहेर काढले तर कुठे जायचे?

    • साधना,

     इतका विचार मी केला नव्हता. पुरुषाला पण स्त्री ने घरातून निघून जागे, किंवा आपण मारहाण करतो ही गोष्ट जगाला समजावी हे आवडत नसावे. कदाचि्त ह्या भितीचा पण फायदा घेतला जाऊ शकेल का?

     • साधना परांजपे. says:

      पुरुषाला कशाला वाटेल स्त्री ने घरातून निघून गेलेले? (घरातील कामे कोण करणार?) आणि भीती चा फायदा म्हणण्यापेक्षा ‘गैरफायदा’ म्हणणे जास्त योग्य ठरेल. पण म्हणून भीती कमी होत नाही. ती भावना तशीच राहते. आणि म्हणून होणाऱ्या मारहाणीला विरोधायची ताकद मिळते असे ही नाही.

    • एखाद्या गोष्टीला तुम्ही विरोध करत नाही, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मान्य आहे असा अर्थ घेतला जाऊ शकतो. अन्यायाला विरोध हा करायलाच हवा. नोकरी करणारी स्त्री तशी स्वयंपूर्ण असते, कमित कमी पैशाच्या बाबतीत तरी! तेंव्हा असे अत्याचार सहन करणे योग्य का वाटत असावे??

     • साधना परांजपे. says:

      मुळात आपण विरोध म्हणजे कोणत्या प्रकारे करायचा हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. (विरोध म्हणजे काही मोदक नव्हे, केला की झाला.) विरोध म्हणजे नेमके काय? शाब्दिक वाद? चर्चा? की जशास तसे? शाब्दिक वाद करण्यासाठी समोरची व्यक्ती तितकी समजूतदार असावी लागते. नाहीतर असले वाद म्हणजे निरर्थक गांधीगिरी व्हायची. आणि जशास तसे हा मुद्दा किंवा मार्ग नेहेमीच अमलात आणण्यासारखा नाही,

      • घरातील इतरांना मारहाण होते हे सांगणे हा सगळ्यात चांगला उपाय. कुठल्याही पुरुषाला आपण बायकोला मारतो ही गोष्ट तिच्या आणि आपल्या घरी समजावी असे वाटत नसावे.
       शारीरिक विरोध तर कठीण आहे, कारण शेवटी पुरुषामधे शक्ती जास्त असल्याने वरचढ होईल. तेंव्हा ज्या वेळेस जास्त वाद विवाद होतात, तेंव्हा गप्प बसणे, आणि नंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा केली तर बरेचदा राग शांत झालेला असल्याने दुसरा ऐकुन घेण्याच्या मनःस्थितीत असतो.

       • साधना परांजपे. says:

        आपले संभाषण काहीसे भरकटत आहे असे मला वाटतंय. मुळात घरात स्त्री ला होणारी मारहाण का होते हे समजून घेणे गरजेचे आहे. या प्रकारच्या बाबतीत नेहेमी पती पत्नी हीच दोन टोके नसतात.मारहाण सहन करणारी स्त्री ही मुलगी,सून,ही असू शकते. मारहाण या प्रकारात समाविष्ट होणाऱ्या सगळ्यांचीच मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. उदा. पुरुष हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे की स्त्री मध्ये सद्गुण विकृती आहे? म्हणजेच त्यातून अमुक एका घरात पुरुषाला मारायला आवडते का? की मुलींना मार खायला आवडतो? की त्या सदर गोष्टी इलाज नसल्याने सहन करतात या गोष्टींचा उलगडा होईल. प्रत्येक गोष्टीला अनेक पैलू असतात. प्रत्येक घटना वेगळी असते,त्यामागची कारणे वेगळी असतात. आणि जरुरी नाही की मारहाण होण्या आधी वाद विवाद होणे गरजेचे आहे. त्यातून घरातले सगळेच जर सदर पुरुषाला सामील असतील, स्त्री च्या विरुद्ध, तर कोण, काय, कुणाला आणि कसे सांगणार? अशा वेळी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावायचे?

 5. tejali says:

  😥
  मुळात मानसिक जडण घडण योग्य रीतीनी होण्याची गरज आहे. शिक्षण संस्थानमधून लहानपणीच मूल्य योग्य रीतीने रुजावळी गेली पाहिजेत. आणि १ श्री अथवा पुरूष म्हणून जगाण्याएवजी माणूस म्हणून जगण्याचे शिक्षण देण्याची जास्त गरज आहे

  • तेजल
   मान्य. मानसिक जडणघडण योग्य व्हायला हवी हे सगळ्यात महत्त्वाचे. पुरातन काळापासून स्त्री ची प्रतिमा अत्याचार सहन करणारी, ’पुरुषाची सावली’, अशी अजूनही पुजली जाते.

   स्मृतीकारांनी तर सांगूनच ठेवलंय, ” न स्त्री स्वातंत्र्यमर्हती” ( याचं कारण हे स्त्री चंचल स्वभावाची असून तिला स्वातंत्र्य दिल्यास ती स्वैराचारी बनून कुलकलंक करते, तिला नेहेमी शील, पावित्र्य, मर्यादा इत्यादी नियमांच्या कुंपणातच ठेवायला हवे.लहानपणी वडिलांनी, तरूणपणी नवऱ्याने आणि म्हातारपणी तिची काळजी ही तिच्या मुलाने घ्यावी असे पण स्मृतीकार म्हणतात. स्त्री ही एक वस्तू असून तिला संरक्षणाची गरज आहे हे बरेचदा ठासून लिहिल्याचे जाणवत

   या प्रतिमे मधे एक बदल अपेक्षित आहे. तो झाला तरच हे चित्र बदलेल.

 6. अशा प्रकारचे सर्व्हेज घ्यायला लागतात हेच किती मागासपणाचं आणि दुर्दैवी लक्षण आहे !! आपल्यासारख्याच रक्तमासाच्या बनलेल्या आपल्याच व्यक्तीला हिंसा पोचवली जाऊ नये यासाठी कायदे करायला लागतात म्हणजे आपण अजूनही मध्ययुगातच आहोत याची खात्री पटते !

  • हेरंब,
   मध्ययुगात आहोत …. होय, यावरून आठवलं..
   आयुष्यात स्त्री चे स्थान खरे काय आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.,
   पुराण कालापासून स्त्रीचा सामाजिक दृष्ट्या कमीपणा दर्शवणाऱ्या अनेक कथा आपण गोष्टीरुपात वाचत मोठं होतो. स्त्री ही वस्तू असून तिचा कसा वापर केला याच्जाऊ शकतो याची उदाहरणं पण पुराणात बरेच ठिकाणी दिलेले आढळतात.. द्रौपदी ला द्युता मधे एक वस्तू म्हणून डावावर लावणे असो वा तिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग, हरिश्चंद्राने तारामतीला काही पैशासाठी म्हणून डोंबाला विकणे,एका परीटाच्या संशयावरून सीतेचा त्याग करणे म्हणजे स्त्री ही एक वस्तू आहे यावर शिक्कामोर्तब करणेच आहे. आज समाज बदलला, इतकी वर्ष झाली तरीही स्त्रिया स्वतःला एक वस्तूच समजतात याचं वैषम्य वाटते.

 7. arunaerande says:

  पूर्वापार नवर्‍याचा अधिकार मान्य करणे ही एक मनसिकता घडून गेली आहे. आणि कधी कधी खोट्या रोमॅंटिक कल्पना असतात की अशाने त्याचे पौरुष दिसते!( खास करून बायकांच्या मनात) असे मला वाटते. he kind off come out as more of a man! which is at the least ridiculous.
  पैसा हे पण अशा प्रकारच्या हिंसाचाराचे एक कारण असू शकते.
  आणि सहन करण्यार्‍यालच त्यात आणंद असेल तर आपण बापडे त्यांना कोण रोखणार?
  disgusting but true.

  • अरुणा

   सहन करणे म्हणजे आपण मोठी पतिव्रता आहोत हे असे समजणे . सहन करण्याची खरंच गरज आहे का आजकालच्या मुलींना?

   • arunaerande says:

    महेन्द्र,
    तुम्ही म्हणता ते खरे आहे. सहन करण्याची गरज नाहीच. आता बर्‍याच मुली अशा स्वतंत्र झाल्यापण आहेत. मुख्य गरज सगळ्यांचीच मानसिकता बदलण्याची आहे. तुम्ही म्हणता तसा सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारण्याचा प्रसंग मी स्वतः पाहिला आहे. समोर असून देखील काही करू शकले नाही, याचे दुःख होते.

 8. anuvina says:

  आजच्या नवीन पिढीमध्ये “वावगं” असं काहीच वाटत नसावे ….. अगदी ही गोष्ट शारीरिक, मानसिक, वैचारिक पातळीवर …सगळीकडे दिसून येते. समलिंगी संबंध, त्यांचे विवाह, लग्ना आगोदर असलेला स्वैर स्वभाव जो पूर्वी पुरुषांमध्ये जास्त करून दिसून यायचा तो आता स्त्रियांमध्ये देखील बळावला आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सगळ्या गोष्टींचे अप्रूप मला तरी वाटले नाही.काही वर्षापूर्वी स्त्री मुक्ती संघटना अस्तित्वात आल्या पण आता “पुरुष मुक्ती संघटनांची” गरज वाटू लागली आहे. सगळेच संस्कार आयुष्यभर पुरून उरतातच असे नाही पण ते टिकून राहण्यासाठी “सुसंवाद” गरजेचा आहे. वैयक्तिक पातळीवर योग्य-अयोग्य याचे तारतम्य जर सुसंवाद आणि सुसंगत असेल तरच शक्य आहे.

  • आजच्या नवीन पिढीमध्ये “वावगं” असं काहीच वाटत नसावे ….. अगदी ही गोष्ट शारीरिक, मानसिक, वैचारिक पातळीवर …सगळीकडे दिसून येते. समलिंगी संबंध, त्यांचे विवाह, लग्ना आगोदर असलेला स्वैर स्वभाव जो पूर्वी पुरुषांमध्ये जास्त करून दिसून यायचा तो आता स्त्रियांमध्ये देखील बळावला आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सगळ्या गोष्टींचे अप्रूप मला तरी वाटले नाही.काही वर्षापूर्वी स्त्री मुक्ती संघटना अस्तित्वात आल्या पण आता “पुरुष मुक्ती संघटनांची” गरज वाटू लागली आहे.

   हे वाक्य पटलं.. सगळेच संस्कार आयुष्यभर पुरून उरतातच असे नाही पण ते टिकून राहण्यासाठी “सुसंवाद” गरजेचा आहे. वैयक्तिक पातळीवर योग्य-अयोग्य याचे तारतम्य जर सुसंवाद आणि सुसंगत असेल तरच शक्य आहे.

 9. sansar ha shabd ala ki dukh anand ya goshti yetatach ..tasech ya sansara madhe navra baykoche bhandan hotech jar ash goshti hot nasel tar sansar ya shabdala arthach urat nahimhanun ya goshti avarjun angi ghyavya lagtat,,,,,,thankyou

 10. Prajakta says:

  navaryani bayakola kiva bayakoni navaryala keleli maarhan chukach. kami pramanat pan navaryala pan maar sahan karava lagat asel kahi thikani.
  lagna adhi zashichya raani sarakhya vaganyarya mulisudhha lagnanantar vaad ghalun kiva maarhanila tasech uttar denyapalikade kahi karat nahit. ekatar purushapudhe baai chi shakti kami padate. kahi shastra ghetale tar samoracha manus varmi ghav lavun jayachi bhiti asate.
  gharat kitihi vaad zale, maramarya zalya tari to aai-vadalan-pasun lapavanech mulinna yogya vatate. je sahajik ahe.
  sagal zakayachi savay hi ethe ashi upayogi padate. konatyahi vadache kiva jivanishi nasalelya marhaniche conversion divorse/seperation madhe karayala konachi naa nasate. pan so called samajasathi baryach goshti guldastyatach thevalya lagatat. (karan lokana prashn khup padat asatat.)
  ya sagalyat marhan kashasathi hote te karan pan mahatwache ahet. sex kiva sanshay ya sathi, kartavya neet paar padunahi jar konalahi maar khava laganar asel tar vegale hone uttam. karan smorachyala sampavale tar apanahi tyat vinakaran adakato. karan sagale radanare melelyachya bajune asatat.
  ho, pan lutuputuchya ladhaya jagapasun lapavalya jatat he khare. samor cha manus attaparyant ek-dondach chukalay, baki sagal sundar ahe tyamule naate tasech continue kele jate.
  (he maze mat ahe. mi lahanpanapasun mazya aai-vadilanna kiva ajubajuchya konatyahi navar-bayako la maramarya karatana pahilel nahi.)

  • Prajakta says:

   ajun ek – pushapradhan sanskrutichya virodhat janarya mulila tondatun kahi chukiche baher padale ki maar khava lagato.

   • प्राजकता
    उत्तरासाठी उशीर होतोय.. क्षमस्व. ही कॉमेंट उत्तर द्यायची राहून गेली होती.
    पुरुष प्रधान संस्कती आहे म्हणजे पुरुषाने स्त्रियांना मारायचे असे होत नाही. घरातले निर्णय वगैरे पर्यंत हा विचार असेल तर ठिक आहे, पण मारणे? बर्मा मधे स्त्रीप्रधान संस्कृती आहे, तिथे स्त्रिया नवऱ्यांना मारत असतील का? नाही .. अजिबात नाही. बाहेरचे फ्रस्ट्रेशन घरात काढणे हा एकच उपाय पुरुष करतांना दिसतात- आणि दुर्दैवाने स्त्रिया ते मान्य पण करतात..

  • प्राजक्ता
   नवऱ्याला मार सहन करावा लागतो, ही गोष्ट पटत नाही, कारण शारीरिक दृष्ट्या पुरुष हा नेहेमीच जास्त ताकतवर असतो, तेंव्हा पुरुष सहज पणे मार सहन करेल असे वाटत नाही.

   दुसरे , मुलींना या सगळ्या गोष्टी सहन करून गुलदस्त्यात ठेवाव्या लागतात – कारण त्यांना आई वडीलांना काळजी वाटेल का? हा विचार त्रास देत असतो. सुशिक्षित पुरुष पण मारहाण करण्यात मागे नाहीत . जरी या गोष्टी लपवून ठेवल्या तरीही त्यांचा विरोध करणे तर नक्कीच स्त्रीच्या हाती असते, तरीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ह्या गोष्टी वेळॊवेळी आई वडिलांना कळवत रहाणे हे मुलींचे कर्तव्य आहे असे मला वाटते. माझ्या मुलीने मला प्रत्येक गोष्ट सांगावी अशी माझी अपेक्षा आहे, लग्न झालं म्हणजे ती परकी झाली असे नाही. आई वडील मुलींसाठी नेहेमीसाठीच असतात.

   विशेषतः परदेशी गेल्यावर नवरा कसा वागवेल याची खात्री साक्षात ब्रह्मदेव पण देऊ शकत नाही. एका मित्राच्या मुलीची गोष्ट ऐकल्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली, सुशिक्षित स्त्री डीपेंडंट व्हिसा वर जावे लागल्याने केवळ घरातली कामं करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. असो विषयांतर होतंय, प्रतिक्रियेसाठी आभार.

   • Prajakta says:

    (maramrya frequently hot nasatat tya gharanbaddal.)
    aajkalachya muli nakkich uttaradakhal navaryala maratat. i don’t believe koni maar khaun ragavar control karu shakat asel. pan shevati shakti tar kami padatech. nokari karanarya mulina he anubhav yet nahit ani dependent mulina yetat asa nahi. shevati amachya pidhila ek shaap mhanaje kami vayat hatat yenara paisa, achievements, success vagere vagere ani tya jodila yenara ahankaar. manatun kitihi sorry mhanayachi ichha asali tari te tondatun nighale nahi tar tyala arth nasato. bhandanala pratyekachi karan vegali asu shakatat. agadi aai-vadilana kiti mahatwa dyayache ethapasun te mul konala kadhi kiti mahatwa dete ethaparyant.
    tasa basic vait konich nasate. pan vishay ani raag tya manasala vait banavatat.
    kahi lokana ase anubhav ajibat yenar nahit, tar kahina ayushyat ekada tari tond dyavach lagel. ekada ashi goshta zali ki thode diwas tanaav rahato.
    konatyahi gharat swabhavani jo koni garib asel to maarhan suru karit nahi. pan kadhi tyacha pan bandh futalach tar raag tokala janyachi shakyata nakarata yet nahi.
    conclusion: ekada ashi ghatana zalyavar most of the times, lok pudhe nahi asa honar ya ashevar parat sansaa suru karatat.

    • प्राजक्ता
     शेवटलं वाक्य लाख मोलाचं आहे. पुन्हा असे होणार नाही या आशेवर लोकं एकत्र येतात- पण तसं नसतं, एकदा मारलं की ती भिड चेपते, आणि पुन्हा पुन्हा मारामारी होणं सुरु होतं. दोघांनीही एकत्र रहायचं म्हंटल्यवर तडजोड आलीच, पण त्याच सोबत मारहाण सहन करणे हा काही उपाय नाही. तडजोड करतांना फक्त तुझ्या आई वडिलांना सांगते/तो इतकं जरी म्हंटलं तरीही बराच कंट्रोल राहू शकतो. आपला मुलगा बायकोला मारतो ही गोष्ट कुठलेही आईवडील/ समाज अ‍ॅक्सेप्ट करू शकणार नाही असे वाटते. अर्थात काही सासरच्या लोकांनी एकत्र मिळुन केलेल्या छळाच्या बातम्या पण आपण ऐकतच असतो , तरी पण उगाच एक भाबडा विचार मनात आलेला..
     राग हा कोणालाही येऊ शकतो, पण राग आल्यावर मारण्यापेक्षा घराबाहेर जाऊन एक चक्कर जरी मारून आलं तरी राग शांत होतो. (अनुभव) राग आल्यावर एकटं बसणं हा सगळ्यात चांगला उपाय.वादविवाद हे राग वाढवतात, तेंव्हा कोणीतरी एकाने माघार घेऊन वाद टाळायलाच हवे.
     खिशात खुळखुळणारा पैसा ठिक आहे, पण त्यामुळे मारामारी??
     भांडणाची कारणं बरीच असू शकतात, पण सर्व्हे मधे हीच तिन चार कारण पुढे आली होती, म्हणून तशीच इथे लिहिली.
     धन्यवाद.

   • साधना परांजपे. says:

    तुमची दुसरी गोष्ट जास्त वैश्विक आहे.म्हणजेच जास्त युनिव्हर्सल आहे.

    • साधना
     विवाहाला २५ वर्ष होतील माझ्या. आजपर्यंत कधीही हात उचललेला नाही मी. आणि हे काही फार अवघड आहे असे नाही. फक्त पुरुषाने स्वतःच ठरवायला हवे, मगच शक्य आहे ते.

 11. भारतीय एकाच वेळी अनेक शतकात जगतात. ह्यामुळे आपल्याकडे अनेकदा काही समाजात बायकांना मारणे हे गृहीत धरले जाते. रुपेरी पडद्यावर गरीब नवरा आणि महामाया बायको असे गमतीदार जोडपे विशेतः रंजना आणि अशोक ह्यांचे पहाण्यास ठीक असते. एरवी आनंदी आनंद असतो.

  • निनाद
   अशोक सराफचा तो सिनेमा बहूतेक मी पण पाहिलेला असावा.
   बायकोला मारणे हे सहज सम्मत पण आहे काही समाजात. जर बायकोला नवऱ्याने मारले नाही, तर तो बायल्या समजतात.
   माझा एक बंगाली मित्र म्हणतो, की बंगाली पुरुष सिगरेट ओढत नसेल तर बायका त्याला सिगरेट ओढायला लावतात , काही सामाजिक समजुती खरंच विचित्र आहेत.

   • दारू पिऊन प्रसंगी बायकोला मारणे हे आपल्या काही जातींमध्ये दोन्ही बाजूने
    गृहीत धरले जाते.
    आमच्या कडे घरकामाला माझ्या लहानपणी ज्या काकू यायच्या, त्या एकदा माझ्या आईला सांगत होत्या की त्यांच्या नवर्यांचे त्यांच्यावर पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही, व त्याचे बाहेर बहुदा एखादे प्रकरण आहे.
    आणि ह्या तर्कामागील कारण म्हणजे तो घरी रात्री दारू पियुन आला की रीतीभाती नुसार तिला मारत नाही. थोडक्यात पूर्णतः दुर्लक्ष करतो.

    माझ्या लहानपणी दूरदर्शन वर तेंडुलकरांची नाटके किंवा त्यातील काही प्रसंग दाखवले जायचे. मी १० वर्षाचा असेल तेव्हा
    लालन सारंग ह्यांचे पल्लेदार संवाद , त्यातील पुरुष प्रधान संस्कृतीवर जळजळीत भाष्य , तो आवेश ती तडफ .प्रत्येक शब्दातील निखार ह्यांची धग बालवयात सुद्धा जाणवायची
    पार हादरून जायचो. तिच्या संवादांचा अर्थ उमजण्याचे वय नव्हते.
    पण त्यावेळी मनात कुठेतरी स्त्रियांवरील अत्याचारावर किंवा एका महिला व तिचे शोषण ह्यावर पोटतिडकीने बोलणाऱ्या लालन सारंग ला पाहून कुठेतरी आपण मोठे झाल्यावर असे काही करायचे नाही हा विचार मनात रुजला.

    • ” नवरा मारत नाही, म्हणजे त्याचे लक्ष नाही” ही मानसिकता बदलायला हवी. नेमकं हेच होत नाही, आणि म्हणूनच त्या सर्व्हेचा रिपोर्ट असा आला असावा.

 12. Bharat Mumbaikar says:

  काका, हे सर्वे रिपोर्ट कितपत खरे असतात, याविषयी मी स्वतः साशंक आहे. पण सर्वे रिझल्ट वाचून तर पार उडालोच.

 13. Rahul Mane says:

  खूप चं छान articles आहे वाचून आनंद वाटला तसेच बराच गोष्टी कळाल्या. कामावरून घरी गेलावर होणारा वाद माझा आत्ता लक्षात आला . पण मी कधी हि हात उचलत नाही . वाद होतात पण आत्ता तुमचे article वाचालानातर थोडी फार सुधारणा होईल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s